वासरे.. संवत्सरे

वासरे.. संवत्सरे पंचांगामध्ये अशा काही गोष्टी दिलेल्या असतात की जे आपल्याला खूप गूढ वाटतात. मात्र त्यामध्ये गूढ असं काहीच नसते, असते फक्त गणित. काही हौशी लोकांनी लग्नाच्या पत्रिकेत भौमवासरे वगैरे शब्द वापरलेले असतात. आपल्या हातात पत्रिका आली की आपण फक्त लग्नाची तारीख, स्थळ आणि वेळ पाहतो, तो विषय क्लिअर झाला की बाकी आपल्याला फक्त जेवणाच्या वेळेशी मतलब असतो. त्यामुळे हे भौम वासरे वगैरे काय आहे याचा प्रश्न आपल्याला पडत नाही. असेल बाबा एखादा गोभक्त.. आणि लग्नामध्ये एखादा वासरू बांधलं असेल, आपल्याला काय घेणं!! वासरे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून वार याचाच समानार्थी शब्द आहे. अनेक वेळा भौम् वासरे देखील लिहिलेले असते आणि पुढे मंगळवार पण दिलेले असते. हे म्हणजे लेडीज महिला असं म्हटल्यासारखे द्विरुक्तीचे उदाहरण झाले मात्र साध्या सोप्या गोष्टी जरा कॉम्प्लिकेटेड केल्या तरच ज्योतिषी मंडळीची हुशारी लोकांना दिसेल ना!! भानुवासरे किंवा आदित्यवासरे(रविवार), इंदुवासरे(सोमवार), भौमवासरे(मंगळवार), सौम्यवासरे(बुधवार), बृहस्पतीवासरे(गुरुवार), भृगवासरे(शुक्रवार), मंदवासरे(शनिवार) अशी आठवड्यातील वारांची नाव...