वासरे.. संवत्सरे
वासरे.. संवत्सरे
पंचांगामध्ये अशा काही गोष्टी दिलेल्या असतात की जे आपल्याला खूप गूढ वाटतात. मात्र त्यामध्ये गूढ असं काहीच नसते, असते फक्त गणित. काही हौशी लोकांनी लग्नाच्या पत्रिकेत भौमवासरे वगैरे शब्द वापरलेले असतात. आपल्या हातात पत्रिका आली की आपण फक्त लग्नाची तारीख, स्थळ आणि वेळ पाहतो, तो विषय क्लिअर झाला की बाकी आपल्याला फक्त जेवणाच्या वेळेशी मतलब असतो. त्यामुळे हे भौम वासरे वगैरे काय आहे याचा प्रश्न आपल्याला पडत नाही. असेल बाबा एखादा गोभक्त.. आणि लग्नामध्ये एखादा वासरू बांधलं असेल, आपल्याला काय घेणं!!
वासरे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून वार याचाच समानार्थी शब्द आहे. अनेक वेळा भौम् वासरे देखील लिहिलेले असते आणि पुढे मंगळवार पण दिलेले असते. हे म्हणजे लेडीज महिला असं म्हटल्यासारखे द्विरुक्तीचे उदाहरण झाले मात्र साध्या सोप्या गोष्टी जरा कॉम्प्लिकेटेड केल्या तरच ज्योतिषी मंडळीची हुशारी लोकांना दिसेल ना!! भानुवासरे किंवा आदित्यवासरे(रविवार), इंदुवासरे(सोमवार), भौमवासरे(मंगळवार), सौम्यवासरे(बुधवार), बृहस्पतीवासरे(गुरुवार), भृगवासरे(शुक्रवार), मंदवासरे(शनिवार) अशी आठवड्यातील वारांची नावे आहेत, मात्र ती प्रचलित नसल्याने काळाच्या पडद्याआड गेली आहेत, आणि कधी कधी समोर येतात तेव्हा अनोळखी, गूढ वाटतात.
भानू तसेच आदित्य हे सूर्यासाठी समानार्थी शब्द प्रचलित आहेत. इंदू हे चंद्राच्या अनेक नावांपैकी एक. मंगळाचे भौम हे नाव पृथ्वीपासून आले आहे. मंगळाला भूमीचा पुत्र सांगणारे महिसुत हे देखील नाव आहेच. उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या सर्व पाच ग्रहांमध्ये बुध हा सर्वात निस्तेज आहे, त्यामुळे त्याला सौम्य हे विशेषण लाभले आहे. बृहस्पती म्हणजे गुरू हे देखील प्रचलित नाव. शुक्र किंवा दैत्यगुरू शुक्राचार्य हा भृगू ऋषींचा मुलगा मानले गेले आहे, त्यामुळे त्याला भार्गव हे नाव लाभले आहे. भृगवासरे हा शब्द तिथून आला. उघड्या डोळ्यांनी दिसणाऱ्या सर्व पाच ग्रहांमध्ये शनी सर्वात दूर असल्याने त्याला सूर्यप्रदक्षिनेसाठी तीस वर्षे, म्हणजेच सर्वात जास्त कालावधी लागतो. म्हणून त्याच्या वाटेला मंद हा शब्द नेहमी येत असतो, जो इथे देखील आला आहे.
तर ही वासरे कुठून येतात यामध्ये केवळ गणित आहे, गूढ असे काही नाही.
तीच बाब संवत्सरांची. यांचे चक्र साठ वर्षांचे असते. दर साठ वर्षांनी प्रभाव, विभव, शुक्ल ते अक्षया हे चक्र फिरत राहते. सोबतच्या चित्रामध्ये त्यांची नावे दिली आहेत, ती इथे टाईपत बसत नाही. त्यातील काही नावे खूप मजेशीर आहेत, त्यामुळे यादी नक्की चाळा. दरवर्षी गुढीपाडव्याला नवीन संवत्सर सुरू होते. सन १९७४ मध्ये प्रभाव संवत्सर सुरू झाले होते, आता २०३४ मध्ये पुन्हा त्याचा नंबर लागेल.. इथे देखील सोप्या गोष्टी अवघ ड करून ठेवल्या आहेत. आज तुम्हाला कुणी तारीख विचारली तर तुम्ही रविवार, २५ जून २०२३ असे देखील सांगू शकता किंवा भानू वासरे, नलसंवत्सरे, आषाढ शुद्ध सप्तमी, शके १९४५ देखील सांगू शकता.. सोप्प काय आहे हे आपण ठरवायचे!!
सध्या "बहरला हा मधुमास" हे गाणे रिलकर मंडळीत लोकप्रिय आहे. पण मधुमास असा कोणता महिना असतो का?? हो..असतो. आपल्याकडे प्रचलित इंग्रजी आणि मराठी महिन्यांपेक्षा एक वेगळी कालगणना देखील आहे. यात महिन्यांची नावे मराठीत आहेत, मात्र कालमापन मात्र सूर्यावर आधारित आहे. प्रत्येक इंग्रजी महिन्याच्या २२ तारखेला हा महिना बदलतो. तपस, तपस्य, मधू, माधव, शुक्र, शुची, नभ, नभस्य, इषू, सहोर्ज, सहस, सहस्य अशी या बारा महिन्यांची नावे वायू पुराणात आढळतात. ही नावे २२ डिसेंबरपासून सुरू होतात. २२ फेब्रुवारी पासून मधुमास सुरू होतो, जो वसंत ऋतुचा कालावधी आहे.
अर्थात गाणे लिहिताना गीतकाराला ही नावे ठाऊक होती की नाही, ठाऊक नाही. कारण कोणी ही नावे आजच्या काळात वापरायची शक्यता नाही. मात्र आपल्याला इथे माहिती देऊन ठेवली.. म्हणजे भविष्यात कधी कानावर पडले तर आपल्याला गूढ नको वाटायला!!
गूढता हाच हेच ज्योतिषांचं भांडवल असतं. हाच त्यांच्या धंद्याचा पाया असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये काय गणित असते आपण हे समजून घेतले, तर या ज्योतिषांची दुकाने लवकर बंद होतील!!
Comments
Post a Comment