गोमू आणि गोमाजीराव

गोमू आणि गोमाजीराव
वळवळणाऱ्या सर्व जीवांमध्ये गोम या जीवाला जरा जास्तच महत्व मिळालेलं दिसतं, त्यामध्ये काय गोम आहे काय माहित? लाडक्या कोकणकन्येला गोमू असं संबोधन देऊन कितीतरी गाणी रचली गेली. सोम्यागोम्या या शब्दामध्ये टुकार लोकांची गणती केली जाते. अशी टुकार मंडळी जर थोडी प्रतिष्ठीत असतील तर टिकोजी गोमाजी म्हणवली जातात. हिंदीमध्ये गोमेला कनखजुरा आणि गोजर असे दोन शब्द आहेत. गोम कानात जाण्याची दहशत कनखजुरा हा शब्द व्यक्त करतो तर गोजर हा शब्द गोमेची गोवंशांची जवळीक जोडू पाहतो. "खायला हिरवं गवत आवडणं" हा एक भाग सोडला तर तसं गोमाता आणि गोमेमध्ये काही संबंध नाही. काही गोमा शाकाहारी तर काही कीटकाहारी असतात. पावसाळ्यात कीटकांची पैदास मोठ्या संख्येने होत असताना गोमांची संख्या देखील वाढलेली दिसून येते. शहरातील पोरांनी गोमा पाहिल्या असतील/ नसतील पण ग्रामीण भागात लहानाचा मोठ्या झालेल्या पोरांना गोमेची ओळख करून द्यायची गरज नाही. गोम आणि चप्पल यांचं अतूट नातं त्यांनी लहानपणापासून पाहिलेलं असतं. “दिसली गोम की ठेच तिला” हा एकच गोमांतक नियम त्यांना ठाऊक असतो. गोमेला पहिला फटका बसल्यावर ती प्रचंड त्वेषाने वळवळते. वास्तविक पाहता तिच्यापासून मानवाला धोका कधीच नसतो. गोम कधीच माणसाच्या अंगावर येत नाही. स्वतःचा संरक्षण करण्याच्या प्रयत्नामध्ये गोम चावली तरी गोमेच्या लहान नांग्यांना मानवाच्या कातडीला भेदणं क्वचितच शक्य होतं. इंग्रजी सेंटीपॅड हा शब्द गोमेला शंभर पाय असल्याचं सूचित करत असला तरी गोमेला शंभर पाय कधीच नसतात. कारण गोमेच्या एकूण पायांच्या संख्येला चारने कधीच भाग जात नाही, तिच्या पायांच्या जोड्यांची संख्या कायम विषम संख्येत असते. नेहमी घराजवळ आढळणारी गोम ३० पायांची असते, म्हणजे तिला पायांच्या १५ जोड्या असतात. तिच्या शरीराचे खंड असतात. एखाद्या ट्रेनचे डब्बे जोडावे तशी तिच्या शरीराची रचना असते. इंजिनचा पहिला डब्बा आणि शेवटचे दोन डबे सोडले तर प्रत्येक खंडाला एक पायांची जोडी अशी वाटणी असते. शरीराच्या एकूण खंडांची संख्या १८-१८० पर्यंत असू शकते. पहिल्या खंडावर तिचे अँटीना तसेच नांग्या असतात. शेवटचे खंड पुनरुत्पादन प्रणालीसाठी वापरले जातात. डोक्यापासून शेपटापर्यंत खंडांचा आकार मोठा होत जातो. जशी मोदींची दुसरी टर्म पहिल्या टर्मपेक्षा दुप्पट धर्मांध आणि विषारी आहे, तसाच गोमेचा शेवटचा खंड हा पहिल्या खंडापेक्षा दुप्पट आकाराचा असू शकतो. “गोमू माहेरला जाते रे नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा.” हे काम तसे खूप अवघड ठरू शकते. कारण बहुसंख्य गोमांना डोळेच नसतात. आपल्या घरांमध्ये आढळून येणाऱ्या गोमांना संयुक्त डोळे असतात तर काही प्रजातींमध्ये डोळ्यांसारखे ठिपके असतात. मात्र त्यांची पाहण्याची क्षमता खूप कमी असते. भक्ष्य पकडण्यासाठी किंवा खाद्य शोधण्यासाठी गोमांना त्यांचे अँटीनाच अधिक उपयुक्त ठरतात. गोमेचे विष मानवाला धोकादायक नसलं तरी तिच्या दंशामुळे उंदरांचा मात्र जीव जाऊ शकतो. मोठ्या गोमेचा दंश लहान मुलांसाठी प्राणघातक ठरू शकतो. नेहमीच्या गोमा चावल्या तर प्रौढ व्यक्तीला काही वेळ दुखतं. क्वचित ताप, चक्कर व डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. डोके नसलेल्या अंधभक्तांना कदाचित काहीच लक्षणे जाणवणार नाहीत. गोमांचे या पृथ्वीतलावरचं अस्तित्व किमान ४२ कोटी वर्षांपासून असल्याचं मानण्यात येतं. आकाराने चपट्या असल्या कारणाने मृत गोमा लवकर नष्ट पावतात, त्यामुळे त्या जीवाश्मरुपात पाहायला मिळत नाहीत. तेरा हजार उपप्रजाती असलेला हा शुद्ध भूचर कीटक जगातील सर्व उष्ण आणि समशीतोष्ण प्रदेशांमध्ये दमट जागा पाहून राहतो. गजपन, राडारोडा, बांधाच्या मधील सापडी, जमिनीतील भेगा, नहाणीची जागा या गोमेच्या आवडत्या जागा. काही गोमा सागरकिनारी, पाण्यापासून अंतर राखत राहतात, अंधारासाठी रिकामे शंख वापरतात. त्यांचे आयुष्य सरासरी चार वर्ष असले तरी काही गोमा दहा वर्ष देखील जगतात. मध्यंतरी तेराशे सहा पायांची गोम ऑस्ट्रेलियामध्ये दक्षिण किनारपट्टीवर सापडल्याची बातमी वर्तमानपत्रात आली होती. मात्र तो जीव गोम अर्थात सेंटीपॅड नसून पैसा अर्थात मिलीपॅड प्रजातीचा होता. सेंटीपॅड प्रजातीमध्ये एका खंडावर पायांची एक जोडी असते तर मिलीपॅडमध्ये एका खंडावर पायांच्या दोन जोड्या असतात. गोमेची लांबी सर्वसाधारणपणे २·५ ते १५ सेंमी असते. मात्र काही गोमा एक फुटापर्यंत मोठ्या असू शकतात. गोमा दिवसाउजेडी आपल्या निवाऱ्यात लपून बसतात आणि रात्री पोट भरायला बाहेर पडतात. गोमांमध्ये अन्ननलिका भली मोठी, लांबलचक आणि सरळसोट शरीरभर पसरलेली असते. अन्ननलिकेप्रमाणेच नळीच्या आकाराचं गोमांचं हृदय पूर्ण शरीरात पसरलेलं असतं. त्यावर असलेल्या छिद्रातून गोमांचं हेमोलिम्फ नावाचं रक्त शरीराच्या सर्व अवयवांना ऊर्जा आणि पोषण पुरवतं. हा रक्तपुरवठा होत असताना त्यात ऑक्सीजनची देवाणघेवाण होत नाही. श्वसनसंस्था स्वतंत्रपणे कार्य करतं. गोमेच्या चपट्या शरीरावर डोकं आणि धड असे दोन भाग दिसून येतात. डोक्यावर असलेले दोन अँटीना भक्ष्याच्या शोधाचे काम करतात. पकडलेल्या भक्ष्याच्या पोटात नांग्या खुपसून विष सोडलं जातं. त्यानंतर बेशुद्ध केलेलं भक्ष्य ग्रहण करून शरीरात मागं पाठवलं जातं. भक्ष्य चावण्यासाठी करवती दातांच्या दोन जोड्या असतात. लहान कीटक, कृमी, पाकोळ्या खाऊन गोमा जगत असतात. शाकाहारी गोमा पानं कुरतडून खातात.
घरात आढळणारी ३० पायांची गोम “स्कुटीगेरा कोलिओप्ट्राटा” या नावानं ओळखली जाते. घरातील झुरळं, डास, वाळवी आणि ढेकूण यांसारख्या उपद्रवी कीटकांना खाऊन गोम माणसासाठी उपकारकारकच असते. मात्र तिला मानवाच्या कानात जाऊन बसायची वाईट खोड आहे. त्यात तिचा दोष नाही, तिला अंधार आवडतो. ती निशाचर आहे, ती अंधारातच आपलं भक्ष्य मिळवते. पोट भरल्यावर पुन्हा अधिक अंधाराच्या शोधात असताना ती मानवाच्या कानात जाऊन बसते. फक्त बसत नाही तर चिकटून बसते. अशा वेळी मिठाचं पाणी कानात टाकलं तर गोमू बाहेर येते. तिला पाण्याचा प्रचंड तिटकारा आहे. सागरजल असो अथवा गोडं पाणी, तिला पाण्यात राहायला अजिबात आवडत नाही. कारण तिला नाक नसतं. तिच्या शरीरावरील सर्व खंडांवर श्वासरंध्रांची एकेक जोडी असते. म्हणजे जेव्हा तुम्ही पाणी टाकता, तेव्हा ते तिच्या या नाकांमध्ये जात असणार ना!! गोमेचं साधारणत: तीन ते सात वर्षं आयुर्मान असतं. एका मिनिटात २४ मीटर अर्थात एका तासात सुमारे दीड किलोमीटर वेगाने ती चालू शकते. जेव्हा गोम एका जागी शांत बसलेली असते, तेव्हा तिचं डोकं कोणतं आणि शेपूट कोणतं हे ओळखता येणं थोडं अवघड बनतं. कारण दोन्ही बाजू सारख्याच दिसतात. वसंत ऋतु सुरू होण्याच्या काळामध्ये गोमांचा विणीचा हंगाम सुरू होतो. गोमा सरासरी ६० अंडी एका वेळी घालतात. काही गोमा १५० अंडी देखील घालू शकतात. या अंड्यातून जेव्हा त्यांची पिल्लं बाहेर पडतात तेव्हा त्या पिल्लांना केवळ चार पाय असतात. विकासाच्या पहिल्या अवस्थेत त्यांना एक खंड आणि दोन पाय मिळून जातात. जस जसा त्यांच्या शरीराचा विकास होत जातो तसेच त्यांना दोन नवीन खंड आणि चार नवीन पाय येत जातात. पायांच्या १५ जोड्या झाल्या की घरात आढळणाऱ्या गोमेचं पिल्लू प्रौढ झालं असं मानलं जातं. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्या प्रजननक्षम बनतात.
गोम प्रजातीत पुनरुत्पादन दोन प्रकारे होतं. काही गोमा अंडी घालून उबवतात. काही गोमा त्यांची अंडी शरिरातच ठेवतात, बाहेर सोडत नाहीत. जेव्हा पिल्लं तयार होतात, तेव्हाच ती बाहेर सोडली जातात. शेवटच्या खंडावर असलेले पाय गोमेसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. गोमांच्या शेवटच्या खंडावर असलेले अवयव पायासारखे दिसत असले तरी ते खऱ्या अर्थाने पाय नसतात. हे अवयव त्यांना रोमान्स करताना उपयोगी पडतात. नर आणि मादीचे हे अवयव वेगळे असतात. या अवयवांना कामसंवेदना असतात. नर आणि मादी एकमेकांभोवती वेटोळे मारून प्रेमभावना फुलवतात. अँटीने आणि शेवटच्या खंडावरील पायसदृष्य अवयव यांच्या साह्याने ते एकमेकाला उत्तेजीत करतात. नर जमिनीवर शुक्राणू सोडतो, मादी ते उचलते. एक नर अनेक माद्यांशी सुखाने संसार करत असतो. गोमेच्या मादीमध्ये एक जननग्रंथी तर नरामध्ये १ ते २४ जननग्रंथी असू शकतात. या ग्रंथी शरीराच्या सेकंडलास्ट खंडावर असतात. विणीच्या हंगामात गोममादी आपल्या शरीरातून स्त्राव सोडत नराला आवाहन करते की “गोम्या संगतीने माझ्या तू येशील का, माझ्या पोरांचा पप्पा तू होशील का.” गोमाजीराव अर्थातच तयार असतात. त्यांचं मिलन झाल्यानंतर अंडी तयार होतात. अंडी शरीराबाहेर सोडणाऱ्या माद्या मातीत अंडी घालतात, आणि अंड्यातील आद्रता टिकून राहावी म्हणून त्यावर वेटोळे घालून त्यावर बसतात. अंड्यांवर बुरशी चढू नये म्हणून चाटून साफ करतात. काही माद्या अंडी पोटातच ठेवतात आणि डायरेक्ट पिल्लं बाहेर सोडतात. प्रौढावस्था गाठेपर्यंत काही गोममाता आपल्या लहान पिल्लांची सुरक्षा करण्यासाठी त्यांच्याभोवती वेटोळे मारून बसतात तर काही माता त्यांच्या नवजात पिल्लांना या भवसागरात एकट्यांना आत्मनिर्भर अवस्थेत सोडून देतात.
खूपच गंभीर माहिती सुरू आहे का.. आता जरा गंमत करू!! गोमांना कोणता खेळ अजिबात आवडत नसेल? अर्थात क्रिकेट.. कारण त्यात पहिल्याच बॉलवर एलबीडबल्यू होण्याची शक्यता असते. त्यांना निश्चितच फुटबॉल सर्वात जास्त आवडतं असणार, तोच खेळ त्यांना पूर्ण न्याय देऊ शकतो. मी लहानपणी एक जोक ऐकला होता. त्यात असं म्हटलं होतं की देवाने सर्व प्राण्यांना जेव्हा पाय दिले तेव्हा गणित कच्चं असल्यानं त्याचा हिशोब चुकला. त्यात सरपटणाऱ्या काही प्राण्यांनी पाय घेण्याचं नाकारलं असल्यानं पायांचा मोठा साठा उरला. प्राणी कमी आणि पाय जास्त या समस्येवर उपाय करत त्या धांदरट देवानं “कदम कदम बढाये जा” गाणं म्हणत कीटकांना सहा पाय देऊन टाकले, कोळ्यांना आठ पाय दिले. तरीही खूप पाय उरले म्हणून बचेकुचे सब गोमेला देऊन टाकले. गोम म्हणजे गूढ, असत्य असे जरी संदर्भ आजवर पाहिले असतील तरी मला तर गोम सत्याच्या जास्त जवळ असावी असे वाटते. म्हणतात ना सत्य बुट घालून तयार होत नाही तोवर मोदी जगभर सॉरी… असत्य गावभर हिंडून आलेले असतं. गोमेला देखील शूज घालून तयार व्ह्यायला एवढा वेळ लागेल की तोवर बाकीच्या प्राण्यांची पार्टी संपून जाईल. एकदा असंच झालं ना.. कोळी, मुंगी आणि गोम पार्टी करणार असतात. मात्र ऐनवेळी घरातील कोल्डड्रिंक संपते. गोम बोलते, मला जास्त पाय आहेत, मी लवकर जाऊन घेऊन येते. एक तास झालं तरी गोम का आली नाही हे पाहायला मुंगी आणि कोळी बाहेर पडतात तर गोम अजून दारातच, शूजच बांधत असते. एक बौद्ध साधू त्याच्या शिष्याला सांगतो की “जर तू लोकांना विनाकारण घाबरवत असला तर तुला पुढचा जन्म गोमेचा मिळेल.” अर्थात तो जन्म चीनमध्ये मिळायला नको कारण चीनमध्ये गोमांना मस्तपैकी फ्राय करून खाल्लं जातं. अर्थात त्यासाठी गोमांना पाळणं खूप कठीण आहे. कारण त्यांना तुम्ही गच्च डब्यामध्ये बंद करून ठेवलं तरी आपल्या चपट्या शरीराचा वापर करत त्या त्यातून पळून जाण्यामध्ये यशस्वी होऊ शकतात. थायलंड आणि व्हिएतनाममध्ये गोमांच्या मोठ्या आकाराच्या प्रजातींचे उत्पादन करून त्या खाद्य म्हणून वापरल्या जातात. शेतजमीन भुसभुशीत करण्याचं काम गांडूळाप्रमाणे गोमादेखील करत असतात.
भारतात काही ठिकाणी धनत्रयोदशीच्या दिवशी जर गोमेचं दर्शन झालं तर आपल्या घरी लक्ष्मी येणार अशी अंधश्रद्धा आजही बाळगली जाते. एरवी चप्पलनं स्वागत करणारे भारतीय या दिवशी वास्को द गोमाकडं प्रेमानं पाहतात. एरवी गोमदर्शन काही ठिकाणी शुभ तर काही ठिकाणी अशुभ मानलं गेलं असलं तरी “देवघरात गोम दिसणे शुभ” अशा अंधश्रध्देपोटी कुणी गोमेचे लाड केल्याचे मला तरी ठाऊक नाही. सुमारे पाच ते आठ हजार वर्षांपूर्वी गोमेला देवतेचे स्वरूप देण्यात आलं होतं. मानवाच्या मृत शरीरांना किडे खातात मात्र गोम या किड्यांना खाते म्हणून गोम ही मानवाच्या मृत शरीराचं रक्षण करण्यासाठी असते असं इजिप्तमध्ये मानलं गेलं. मानवाचं रक्षण करण्यास, त्याला संतती देण्यास “सेपा” नावाची गोमदेवता पुजली जायची. साप किंवा विंचू चावला तर ही देवता मरण्यापासून आपल्याला वाचू शकेल अशी अंधश्रद्धा त्याकाळात होती. “एक पाय तुटल्याने गोम लंगडी होत नाही” अशी आपल्या मराठीत म्हण आहे. मात्र गोमेच्या तेरा हजार प्रजातींपैकी काही प्रजाती लुप्त होत आहेत. जागतिक हवामान बदलाचा फटका गोमांच्या काही प्रजातींना बसत आहे. २०१९ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघानं जाहीर केलं आहे की गोमांच्या तीन प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. अर्थात इथं मानव दुसऱ्या मानवाची काळजी घेण्याचं टाळतो तिथं बिचाऱ्या गोमुच्या व्यथेला कोण ऐकून घेईल. हा कदाचित ज्ञानदा कदम मात्र तिचं दुःख पाहून नक्की रडेल!!

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

मधमाशी : टू बी ऑर नॉट टू बी