अब्राहम लिंकन...... मुक्तिदाता

 अब्राहम लिंकन...... मुक्तिदाता


अमेरिकेतील यादवी युद्धात दक्षिणेकडील राज्यांचा केलेला पाडाव आणि कृष्णवर्णीयांची गुलामगिरी कायद्याने रद्द करण्याचा निर्णय यासाठी लिंकन ओळखले जातात. यासाठी स्वपक्षीय आणि अन्यपक्षीयांचे सहकार्य मिळवून लिंकन यांनी तेरावी घटनादुरुस्ती मंजूर करवून घेतली.(घटना दुरुस्तीच्या साठी झालेल्या घडामोडीवर "लिंकन" नावाचा सिनेमा आहे स्टीवन स्पीलबर्ग ने काढलेला)  या निर्णयाचा परिणाम जगभर झाला. लिंकन यांना म्हणूनच महामानव म्हटले जाते..मात्र हे यशाचे शिखर सर करण्या आधी अपयशाचे कैक डोंगर पचवले आहेत लिंकनने.


एखादी व्यक्ती आयुष्यात वारंवार अपयशी होते.. इतकी नैराश्यात जाते की त्याचे हितचिंतक हा आत्महत्या करेल म्हणून चाकू सुरे इत्यादी बाबी त्याच्या हाताला लागू नये अश्या ठिकाणी ठेवायचे.  खायचे वांदे असलेल्या घरात जन्मलेली ही व्यक्ती अमेरिकेचा आजवरचा सर्वात लाडका राष्ट्राध्यक्ष बनतो.. आणि जगाला "लोकशाहीची व्याख्या" देतो... टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेरिकेचा सोळावा राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन. 


अब्राहमच लाडाच नाव आबे... एकदम आपल्या सोलापूरी टाईप😃 ( अगदी संसदेत गेला तरी त्याला कोणी पण आबे म्हणू शकत होता) त्याचा जन्म केंटकी प्रांतातील एका छोट्या खेड्यात एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. कुटुंबाच्या कठीण आर्थिक परिस्थितीमुळे तो एका वर्षापेक्षा जास्त काळ शाळेत शिकू शकला नाही.  


आबे सात वर्षाचा होता तेव्हा त्यांना राहते घर शेती सगळे सोडून जंगलात विस्थापित व्हायला लागले. शाळा सुटली त्यांची..बाप ह्याच्या शिक्षणा बाबत अतिशय निरुत्साही.. त्यामुळे ह्याला लवकरच कामाला जुंपला. त्यात नऊ वर्षाचा असताना आई मेली. दोन वर्षाने मोठी बहीण, एक लहान भाऊ मागे ठेऊन. आबे शेतात राबू लागला.. भावंडाचे पोट भरायची जबाबदारी त्यांनी नवव्या वर्षीच उचलली. 


बाप थॉमस लिंकनने पुढच्या वर्षी दुसरे लग्न केले. आबेची नवीन आई तिच्या आधीच्या तीन पोरांना घेऊन कुटुंबात सामील झाली. आता कहाणीमध्ये ट्विस्ट आहे...🤔 तुम्ही कल्पना केली असेल सावत्र आई आली म्हणल्यावर ट्विस्ट येणारच. इथे फसला तुम्ही..  कारण त्याची ही सावत्र आई सख्या आई पेक्षा जास्त जीव लावनारी होती. तिने आबेला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. मिळेल ते पुस्तक घेऊन आब्या शिकू लागला. 


आबेने एक होडी बनवली होती..ज्यात तो प्रवाशांची नेआन करता करता वाचन पण करायचा.. त्याचे हे वाचायचे वेड पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध झाले. अनेक लोक याला आनंदाने पुस्तक आणून देऊ लागली. त्यात त्याला टीप मिळाली की काही मैल अंतरावर एक निवृत्त न्यायाधीश आहे, ज्याकडे कायद्याची खूप पुस्तक आहेत.


आबेला पहिल्यापासून वकीलच व्हायचे होतं. त्याने टीप लागताच आपली होडी काढली आणि निघाला त्या न्यायाधीशांना भेटण्यासाठी. थंडीचे दिवस होते नदीमध्ये बर्फ होत होता पाण्याचा. त्याची होडी एका दगडाला धडकली आणि बर्फात फसली... मात्र आबे एवढ्या थंड पाण्यात पोहत पोहत इच्छित स्थळी पोचला. गरजू उमेदवाराची  पिळवणूक करणार नाही तो अनुभवी म्हातारा कसला....  तिथे केवळ दोन वेळचे खाणे आणि पुस्तक वाचण्याची परवानगी एवढ्या मोबदल्यावर प्रचंड काम आबेने केले. 


शिक्षण झाले नव्हते त्यामुळे आबेने कायद्याच्या अभ्यासासाठी स्वतंत्रपणे कायद्याचा अभ्यास करून परीक्षा दिली. रोज मैलोमैल पायपीट करून आबे न्यायालयात सुरू असलेले खटले पाहणे आणि वलिकांचे युक्तिवाद ऐकण्यासाठी जात होता. 


याच काळात उद्योग टाकायचा प्रयत्न केला आबे ने... एका मित्रासह भागीदारी मध्ये ट्रेडिंग स्टोअर टाकले पण धंदा फुलं गाळात गेला. पैसे गेले.. उसनवारी करायची वेळ आली.. मात्र एक काळजी आबेने घेतली. तो नेहमी सावधपणे आणि प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करीत असे ज्याने त्याला "होनेस्ट आबे" असे टोपणनाव मिळाले.

 

आबे आपल्या हजरजबाबीपणामुळे हवा करत होता. तेथील गुंडांना याचा राग येऊन त्यांनी आबेला फाईट करण्यासाठी चॅलेंज केले. (फुल फिल्मी ना).. आपला हा अँग्री यंग मॅन "आबिता बच्चन" तिथे भिडला की जाऊन..... लय मार खाऊन हरला.. पण त्याची "टशन" बघून गुंड लोकांनी त्याला पुन्हा त्रास पण दिला नाही. उलट निवडणुकांच्या प्रचारात ह्याला साथ दिली.


आबेने रेड इंडियन विरुद्ध लष्करी सैन्यात भाग घेतला आणि त्याला कर्णधार म्हणून बढतीही दिली गेली. (सध्या तेथील आदिवासी जमातीचे याच घटनेवरून लिंकनविरोधी आंदोलन सुरू आहे.) युद्ध  संपल्यावर आबेला न्यू सालेममध्ये पोस्टमास्टर म्हणून नियुक्त केले गेले. येथे त्याच्याकडे शिक्षणासाठी मोकळा वेळ होता.. समाजात इज्जत होती.


पण डोक्यात कीडे असलेली व्यक्ती असे सेटल आयुष्य थोडीच जगते. निवडणूक लढवावी वाटली.. त्यासाठी नोकरी सोडली.. पण निवडणुकीत सपाटून पडला. इथून पुढे त्याचा बुडत्याचा पाय खोलात.. राजकारणात एवढ्या वेळा पडला की याची माहिती असती तर अंतू बरवा "अन्नू गोगट्या" ऐवजी पोहऱ्याचा आब्या झाला का रे म्हणाला असता.


आबे वयाच्या २६ वर्षी पहिली निवडणूक हरला. आमदारकीची....  त्यातच ज्या मुलींवर प्रेम करत होता.. ती आजारपणात मेली.. नोकरी पण गेली छोकरी पण गेली. आब्याला धक्यावर धक्के बसत होते... आबे सैरभैर झाला. त्यात त्याला ड्रू मास नावाची ड्रग घ्यायचे व्यसन लागले. त्यात पारा असायचा. जो डोक्यात गेला की आब्या लय हायपर व्हायचा.. रागाचा पारा चढण्याचे तुम्ही ऐकले असेल, ह्याचा पाऱ्याने राग चढायचा.


त्याचा आयुष्यात मेरी आली आणि संसाराला दिशा मिळायला लागली.. त्यांना चार पोरं झाली..मात्र त्यातला एकच जगलं. श्रीमंतांच्या घरून आलेली मेरी या गरिबाच्या घरात सुखाने नांदली.. आबे वकिली करत असला तरी गरीबाची सेवा करायची हाऊस त्याला काही पैसे मिळवून देत नव्हती.. आपला अाब्या पैशाच्या मागे नव्हताच कधी..  त्याला समाजसेवेचे आणि राजकारणाचे वेड लागले होते. 


राजकारणात पुढे २९ व्या वर्षी त्याने स्पीकर साठी तर ३४ व्या वर्षी अमेरिकन कांग्रेससाठी निवडणूक लढवली पण त्यातही पराभव झाला. तीन वर्षाने त्याने त्याची त्या पदावर निवड झाली ( स्वीकृत नगरसेवक टाईप) तरी लगेच दोन वर्षाने परत त्याच पदासाठी निवडणूक लढवून  पराभवच पत्करला.


वयाच्या ४६ व्या वर्षी त्यानी खासदारकी साठी निवडणूक लढवली परत त्यात देखील पराभव. ४८ व्या वर्षी उपराष्ट्राध्यक्ष तर ५० व्या वर्षी पुन्हा खासदारकी ची निवडणूक हरले. मित्रांनो एवढे अपयश सहन करून सामान्य माणसाने निराश होऊन प्रयत्नच करणे सोडून दिले असते. 


पण १८६० मध्ये झालेल्या अमेरिकन president पदासाठी त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि या वेळी मात्र त्यांना यश मिळालं. जवळपास ३० वर्षे फक्त आणि फक्त अपयश झेलून वयाच्या ५१ व्या वर्षी अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे १६ वे राष्ट्रपती बनले.


राजकारणात उंची गाठणारे हे व्यक्तिमत्त्व 193 सेमी उंच ( सहा फूट चार इंच) होत, मात्र खप्पड गाल, तोंडावरती मस आणि जखमेचे व्रण यामुळे तो खूप उग्र दिसायचा. दाढी मुळे त्याची ही बाजू सावरली जायची. तो पहिला अध्यक्ष होता ज्याने दाढी वाढवली होती. त्याआधी जॉन ऍडमचे मोठे कल्ले वगळता बाकी सगळे राष्ट्राध्यक्ष क्लीन शेव्ह होते. "तू दाढी वाढवली तरच छान दिसेल आणि तरच निवडून येशील" असा सल्ला लिंकनला एका अकरा वर्षाच्या मुलीने दिला होता. लिंकनने तो अमलात आणला आणि तिचे आभार देखील मानले.


वयासोबत तापटपणा कमी होऊन मुत्सद्दीपना बाणवून घेतला अब्राहमने. अध्यक्षीय निवडणूक झाली, निवडून आला, आणि यादवी युद्ध सुरू आहे तरी गुलामगिरीच्या मुद्द्यावर पहिले तीन वर्ष तोंड उघडले नाही. १८६१ मध्ये अमेरिकेत गृहयुद्ध सुरू झाले जे १८६५ पर्यंत चालले. अध्यक्ष म्हणून अब्राहम लिंकन यांची निवड होणे हेच या युद्धाचे कारण होते. कारण लिंकनच्या रिपब्लिक पक्षाने गुलामांची मुक्तता याच मुद्द्यावर निवडणूक लढवली होती. 


दक्षिण कॅरोलिनाच्या नेतृत्वात दक्षिणेकडील सात राज्यांनी अमेरिकेपासून स्वातंत्र्य घोषित केले. दक्षिणेकडील बाजू उत्तरेपेक्षा सैनिकी दृष्ट्या श्रेष्ठ होती. मात्र तीव्र इच्छाशक्ती, मुत्सद्दीपणा आणि निर्णयक्षमता यावर लिंकन दक्षिणेकडील गुलामधारकांना चिरडून टाकण्यात यशस्वी झाले.

३० डिसेंबर १८६२ रोजी राष्ट्रपतींनी स्वातंत्र्याच्या गुलामांच्या घोषणेसाठी स्वाक्षरी केली. सर्व गुलाम मुक्त घोषित करण्यात आले होते. लिंकन ची लोकप्रियता प्रचंड वाढली.. त्यामुळे ते १८६४ साली दुसऱ्या टर्म साठी पुन्हा निवडून आले. 


आपला दुसरा कार्यकार्य सुरू होण्याच्या काही आठवडे आधी बायको सोबत नाटक पाहायला गेले असताना जॉन विल्क्स बूथ या कलाकाराने त्यांची गोळी मारून हत्या केली. गुलामी व्यवस्थेचे लाभार्थी आपल्याला सोडणार नाहीत, आपली हत्या होऊ शकते याचा लिंकन यांना पूर्ण अंदाज होता.. मात्र आपल्या तत्वापासून आणि ध्येयापासून त्यांनी माघार घेतली नाही..  एका गरीब घरात जन्मलेला आबे वयाच्या ५६ व्या वर्षी देशातील सर्वोच्च पदावर आपले कर्तव्य निभावत असताना हुतात्मा झाला.


यासर्व प्रवासात लिंकन यांना सर्वात जास्त साथ मिळाली आहे ती विनोदबुद्धी आणि हजरजबाबी पणाची.. त्यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. लहानपणी आबेला जास्त शाळा शिकायला मिळाली नाही तरी हजरजबाबीपणाचा एक नमुना त्याने शाळेतच दाखवला. वर्गात शिकवत असताना एकदा गुरुजी त्यांना म्हणाले, ‘लिंकन तुझी प्रगती फ़क्त खाण्यात आहे; शिक्षणात नाही.’ आबेने उत्तर दिले "याचा अर्थ माझ्या आई चांगला स्वयंपाक करते, तुम्ही मात्र चांगलं शिकवत नाही."  नक्कीच गुरुजींच्या डोळ्यापुढं तारे जमीन पर झाले असेल.


लिंकनची एकदा पार्टी मध्ये खूप गम्मत झाली. लिंकन मोठा चाकू घेऊन तंदुरी टर्की (कोंबडी सारखा एक पक्षी) कापत असताना अचानक एवढ्या जोरात पादले की सगळ्या पार्टीचे लक्ष त्यांच्याकडे गेले. सगळे टवकावरून पाहत होते की लिंकन आता कसे ओशाळवाणे होतील. एवढा मोठा माणूस आणि अशी परिस्थिती....  मात्र लिंकन शांतपणे खुर्चीवर उठले अंगात कोट काढला, हाताच्या बाह्या सरसावल्या, आणि  पुन्हा खुर्चीत बसले. पुन्हा चाकू घेतला आणि मोठ्याने म्हणाले "हे देवा आता तरी न पादता मला हा टर्की कापता येऊ दे." पार्टीत हास्याचा स्फोट झाला.


एकदा एक भडक मेकप केलेली महिला लिंकनला गळ घालू लागली की आपण लग्न करूया. म्हणजे आपल्याला जी मुले होतील ती माझ्यासाठी सुंदर आणि तुझ्यासारखी हुशार होती. लिंकन तिला त्वरित म्हणाला की समजा उलट झालं दिसायला माझ्यावर आणि बुद्धीने तुझ्यावर गेले तर अवघडच होईल.


खरा ख्रिश्चन असल्याचा दावा करत असला तरी लिंकन कधीही चर्चमध्ये गेला नाही की प्रार्थना केली नाही. याचे भांडवल एक पाद्री करू पाहत होता. निवडणूक प्रचारमधला हा किस्सा आहे. लिंकन च्या उपस्थितीमध्ये पाद्रीने जमलेल्या लोकांना विचारले की "आपल्यापैकी कुणाकुणाला स्वर्गात जायचे त्यांनी हात वर करा". खूप लोकांनी हात वर केले. त्यानंतर त्याने पुन्हा विचारले "आपल्यापैकी कुणाला नरकात जायचे नाही त्यांनी हात वर करा" आता तर बहुसंख्य लोकांनी हात वर केले. 


लिंकन मात्र अविचल होता.. पाद्री उपस्थित जनतेला म्हटला "पहा लोकहो या लिंकनला स्वर्गात जायचे की नरकात हे देखील कळत नाही" लिंकन शांतपणे म्हणाला की "मला ना स्वर्गात जायचे ना नरकात.  मला तर संसदेत जायचे आहे." लोकांच्या हास्याने पाद्र्याचा चेहरा बघण्यासारखा झाला.


यादवी युद्ध सुरू होते तेव्हा लिंकनच्या टीम मधला एक सेनापती लढाईचा अहवाल वेळीच पाठवत नसे. वैतागून लिंकनने एकदा त्याला रोजच्यारोज डिटेल रिपोर्ट पाठवण्याचा सक्त हुकूम सोडला. फील्ड वर काम करणाऱ्यांना असे ऑफिस मधून ऑर्डर आल्या की सटकते.. ह्याने पण  लिंकनला खिजवण्यासाठी तार पाठवून दिली "आज आम्ही शत्रूच्या चार गाई पकडल्या आहेत! पुढे काय करू सांगा" लिंकन त्याचा बाप.. "ताबडतोब त्या गाईंचे दूध काढून सैनिकांना पिण्यास द्या!" लिंकनने  उत्तर पाठवलं!


जनरल ग्रँट हा लिंकनचा सेनापती (नंतर तो अमेरिकेचा अध्यक्ष पण झाला) अतिशय पराक्रमी होता. यादवी युद्धामध्ये निर्णायक भूमिका बजावत होता. मात्र तो दारू पिण्यासाठी खूप बदनाम होता. इतर सेनापतींनी तक्रार केली की ग्रँट खूप दारू तिथे. तेव्हा लिंकन त्यांना म्हणाला "ग्रँट कोणत्या ब्रँडची दारू पितो, तुम्ही माहिती काढा, मी तुम्हा सगळ्यांना ती पुरवतो, तुम्ही पण तसा पराक्रम करा."


आपल्या सेनापतींची अशी पाठराखण करत होता. म्हणूनच कमी शक्ती असलेलं उत्तरेच्या सैन्याने यादवी मोडून काढण्यात यश मिळवले.. आज लिंकन चे नाव मानवतेला काळीमा फासणाऱ्या गुलामी प्रथेविरुद्धचा मुक्तिदाता म्हणून आदराने घेतले जाते .. ज्यामागे आहे अनेक अपयशाचे डोंगर पचवून यशाचे एव्हरेस्ट गाठणारी लढाऊ वृत्ती..अगदी तावून सुलाखून निघालेली.. आबे ते अब्राहम लिंकन या प्रवासाला रिच्याचा सलाम. 🙏🏽🙏🏽


#richyabhau

#लिंकन

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके

गोमू आणि गोमाजीराव

शेंडी जाणवे आणि दाढी टोपी