बुध.. तुज मंद म्हणू की जलद रे

 बुध.. तुज मंद म्हणू की जलद रे


लहानपणी जेव्हा समजले की बुधला सूर्याभोवती फेऱ्या मारायला केवळ ८८ दिवस लागतात तेव्हा वाटले होते की आपण पण बुध वर असतो तर तीन महिन्यांनी वाढ दिवस आला असता आपला.. किती मज्जा. मात्र जेव्हा समजले की बुधाच्या दिवसा नुसार त्याचे एक वर्ष केवळ दीड दिवसाच असते तेव्हा  त्यातील मजा निघून गेली. दर दीड दिवसांनी कोण बड्डे करणार राव.


हो बुध स्वतः भोवती फिरताना लय स्लो ग्रह आहे. एवढा लहान आहे (अवघी २४४० km त्रिज्या) तरी देखील त्याला स्वतः भोवती एक फेरी मारायला पृथ्वीचे ५८ दिवस लागतात. मात्र सूर्याभोवती फिरताना हाच अतिशय फास्ट आहे. एवढा फास्ट की बुधावरील तीन दिवसात त्याच्या सूर्याभोवती दोन फेऱ्या होतात. म्हणजे त्याची दोन वर्ष.. काही पुरुष नाही का आई ने काम सांगितले की हलत पण  नाहीत नाहीत लवकर, बायको ने सांगितले की धावतात.. तसच दिसते आहे. 


खरं तर अशी उपमा देऊन आधीच अन्याय झालेल्या  बुधावर अजून अन्याय करायला नको. खगोलीय दृष्ट्या किंवा पुराणकथांमध्ये बुध हा उपेक्षितच राहिलेला दिसतो. सूर्यापासून सर्वात जवळ असलेला हा ग्रह, ज्याला स्वतःचा एकही उपग्रह नाही. सूर्यमाला तयार होताना तयार झालेले बुध आणि शुक्र यांचे उपग्रह सूर्याने गिळले असावेत असे शास्त्रज्ञ म्हणतात. सूर्याच्या तेजापुढे दर्शन दुर्लभ असलेला हा शुक्र, मंगळ शनि गुरु या डोळ्याने दिसणाऱ्या ग्रहांमध्ये सर्वात निस्तेज. पृथ्वीवरून पाहत असताना सूर्यापासून जास्तीत जास्त २८° दूर जायची त्याला मुभा. 


पुराणाच्या वांग्यात मसाला भरताना या बुधावर विनाकारण  अन्याय केला आहे राव. मत्स्यपुराण मध्ये बुधाच्या जन्माची कथा दिली आहे. तारा आणि चंद्र यांच्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेला हा मुलगा. देव गुरु बृहस्पति याच्या तीन बायकांपैकी एक म्हणजे तारा, तर आधीच २७ बायकांचा दादला असलेला चंद्र (२७ नक्षत्र  चंद्राच्या बायका असून चंद्र रोज रात्री एकी सोबत असतो) तारा आणि चंद्र चे झेंगट जमले, तारा त्याच्या घरातच घुसली. गुरुची फुलं इज्जत डाऊन. विनवण्या केल्या तरी तारा यायला तयार होईना. 


झाले.. चंद्र आणि गुरुची जुंपली फाईट.. २७ सासरे असल्याने चंद्राचे पारडे जड, त्यात दुश्मन का दुश्मन दोस्त या नात्याने दैत्य गुरु शुक्राचार्य चंद्राला भिडलेले.. देवांची इज्जत खतरे मे. शेवटी महादेव आपल्या टीम ला घेऊन आले गुरुच्या मदतीला. दक्ष प्रजापती ला समजेना, चंद्र आणि शंकर दोघे जावई, कोणत्या टीम मध्ये जाऊ. शेवटी ब्रम्हा ला मांडवली करायला बोलावले. त्याने बोलबच्चन टाकून तारा ला पटवून गुरूकडे पाठवले आणि महायुद्ध टळले. 


चंद्रा पासून गरोदर झालेली तारा नांदायला लागली, बुध जन्माला आला आणि सगळ्याची कुजबूज सुरू झाली पोरग बापावर नाही गेलं. चंद्रा सारखं दिसतंय. चंद्राला माहीत होते ही आपलीच करणी.. तो पण पोराचे लाड करायचा.. त्यावरून पण गुरूच्या पोटात गोळा आला. परत वाद. शेवटी ब्रम्ह म्हणाला तारा सांगेल तो बाप. ताराने खरे काय ते सांगितले आणि बुध ची कस्टडी चंद्राला मिळाली.


झाल्या प्रकाराने बुधाच्या बालमनावर परिणाम केला.. तो उगाच उंडगायला लागला.. अशा वेळी किशोर वयीन मुलांना मवाली मित्रांचे आकर्षण असते. सूर्यमालेत सगळ्यात बदनाम ग्रह कोण तर शनी. दिवसभर शनि आणि राहू च्या नादाने चकाट्या पिटायचे बुधाचे लक्षण काही ठीक दिसेना, शेवटी शुक्राला वाटले की चांगल्या घरचे पोरं वाया जाईल म्हणून त्याने त्याला समजावले आणि सुधारले. 


त्यामानाने ग्रीक कथांमध्ये अन्याय कमी केला आहे बुध वर. फक्त त्याला झेऊस, व्हिनस इत्यादींच्या तुलनेत साईड रोल दिला आहे. देवांचा मेसेंजर म्हणजे पोस्टमन चे काम मर्क्युरीला. (शोले सिनेमा आठवा.. गब्बर, ठाकूर जय बिरू बसंती सोडली तरी कालिया सांबा सुरमा भोपाली, इमादचाचा सगळे लक्षात राहतात, पण सचिन ला शहरात बोलवणार मामाच पत्र घेऊन आलेला पोस्टमन कुणाच्या लक्षात राहतो का) नाही म्हणायला मर्क्युरी आणि त्याची आई माया यांचा उत्सव १५ मे ला साजरा केला जातो रोम मध्ये २५०० वर्षांपूर्वी बांधलेल्या मर्क्युरी मंदिरात😀


तर हा साईड हीरो. संशोधनाबाबत देखील साईडला राहिला आहे. त्याचे आणि शुक्राचे अंतरंग जाणून घेण्यासाठी पहिल यान सोडले होते १९७५ साली. त्या यानने चांगली कामगिरी केली होती. मात्र नंतर ३० वर्ष त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. २०११ साली पुन्हा मेसेंजर नावाचे यान पाठवले. ज्याने बुधाच्यापृष्ट भागाचा १०० टक्के अभ्यास पूर्ण करून चुंबकीय क्षेत्राची तसेच त्याच्या ध्रुवीय भागात असलेल्या बर्फाची माहिती शोधण्याची माहिती पाठवली आहे.


बुध म्हणजे सगळे शुद्ध अशी बुधवार संदर्भात म्हण वापरतात. मला तर लहान पणापासून आवडतो बुधवार.. कारण आज अमुक वार आहे म्हणून नॉन व्हेज खायचे नाही असे काही आमच्या लहानपणी तरी बुधवार संदर्भात नव्हते. आता समजतंय की "आज कोण वार बाई आज कोण वार" या बडबड गीतातील बुधवार हा नमस्कार करण्यासाठी विठ्ठलाला दिला आहे. चला या उपेक्षित ग्रहाला वाली भेटला म्हणायचा😀


#richyabhau

#बुध

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके

गोमू आणि गोमाजीराव

शेंडी जाणवे आणि दाढी टोपी