बर्ट्रांड रसेल.... एक आनंद यात्री

 बर्ट्रांड रसेल.... एक आनंद यात्री.


"बाबू मोशाय..जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नही" हा आनंद मधील डायलॉग आपल्या सगळ्यांना आवडला असेल. पण एखाद्याचे आयुष्य लांब आणि तितकेच मोठे असेल तर..??? आपल्या ९८ वर्षाच्या आयुष्या चा कसा सदुपयोग करता येईल हे आपल्याला बर्ट्रांड रसेल दाखवून देतात, तत्वज्ञान, गणित, विज्ञान, शिक्षण शास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांना आपल्या योगदानाने समृद्ध करत असतानाच जगाला शांतीचा संदेश देतात.


खूप वर्षांपूर्वी अनिल अवचट यांचे धार्मिक (की संभ्रम🤔) या नावाचे पुस्तक वाचनात आले होते.. त्यात अर्पण पत्रिका होती.. "गाडगेबाबा या थोर आस्तिकास व बर्ट्रांड रसेल या थोर नास्तिकास" रसेल.... नाव तेव्हा पहिले ऐकले.. कोण तरी मोठा माणूस असेल नसेल हा रसेल.. आपल्याला काय त्याचे. विषय तिथेच सोडून दिला... पण नंतर प्रेम, ज्ञान आणि मानवता या तीन बाबींचा ध्यास घेतलेला रसेल पुन्हा पुन्हा भेटत राहिला.. आणि त्याचा मोठेपणा समजू लागला.


विसावे शतक आपल्या बुद्धीच्या बळावर गाजवणाऱ्या हुशार व्यक्तींमधे बर्ट्रांड रसेल यांची गणना होईल. लहानपणी आईबापाच्या छत्रा विना वाढलेला, आत्महत्या करायच्या विचारात असलेला रसेल नंतर साहित्यात नोबेल मिळवतो. युद्धविरोधी भूमिका मांडली म्हणून देशद्रोहाच्या आरोपाखाली जेलवारी करून येतो, ज्या देशाचे कधी काळी आजोबा पंतप्रधान होते.. त्याचे ९८ वर्षाचे सारे आयुष्य म्हणजे निव्वळ दीर्घ चित्रपट आहे.. लगान पेक्षा मोठा 😃 


रसेल चा जन्म १८ मे १८७२ रोजी लय म्हणजे लयच रॉयल घरात झाला..  वडीलाकडचे आजोबा इंग्लंड चे दोन वेळा पंतप्रधान राहिलेले. ह्यांचे घर म्हणजे आलिशान राजवाडा.. एका अर्थाने तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला रसेल.. पण हे बाळ आस्तिक व्हावे की नास्तिक याचा लढा न्यायालयात गेला..आणि न्यायालयाने दिलेल्या निकालावर मात करून हा मुलगा नास्तिक चळवळीचा पाया झाला..


रसेलचे आई-वडील दोघेही विद्रोही.. काळाच्या पुढे असलेले नास्तिक. वडील जॉन स्टुअर्ट मिल चे शिष्य तर आई महिलांना मताधिकार मिळावा यासाठी चळवळ करणारी. त्या काळात बोलणे देखील वर्ज्य असलेल्या "संतती नियोजन" या विषयाचे आग्रही. बर्ट्रांडचा मोठा भाऊ फ्रँक याला शिकवायला एक शिक्षक यायचा..ज्याला टीबी झाला होता म्हणून त्याने लग्न केले नव्हते. मात्र त्याला शारिरीक संबंधांपासून वंचित रहायला लागू नये म्हणून बर्ट्रांडच्या आईचे त्याच्याशी संबंध ठेवावे हा निर्णय या नवरा बायकोने घेतला होता. ( आपल्या माहितीत स्त्रीवादाचा मुखवटा घेतलेले अनेक कार्यकर्ते असतील त्यांना सांगा हे)


साहजिक आहे की रॉयल आजी-आजोबांना हे चालणार नव्हते.. मग रसेलचे आई वडील अमेरिकेला येवून राहू लागले. मात्र दोघांनाही जास्त आयुष्य लाभले नाही. रसेल दोन वर्षाचा असताना आई तर चार वर्षाचे असताना वडील आणि बहीण  मृत्यू पावले... अकरा वर्षाचा फ्रॅंक आणि रसेल अनाथ झाले. या पोरांचा सांभाळ शिकवणीच्या शिक्षकांनी करावा.. आणि त्यांना नास्तिक म्हणून घडवावे असे मृत्युपत्र केले गेले होते.


आपल्या नातवंडांवर असे संस्कार व्हावेत हे अजिबात चालण्यासारखं नव्हतं. आजी आजोबांनी कोर्टात धाव घेतली. यांचे राजकीय वजन मोठे....  आणि जाणीव पुर्वक लहान मुलांना नास्तिक बनवणे हा तर त्या काळात विचार पण करणे शक्य नव्हते.. कोर्टाने निकाल दिला आणि आजी-आजोबांकडे या मुलांचा ताबा आला.


रसेल आणि मोठा फ्रॅंक राजवाडा.. त्याला लागून अकरा एकर ची बाग.. रसेल सहा वर्षाचा असताना आजोबा पण वारले.. आणि रसेल चे संगोपन करायची जबाबदारी एकट्या आजी वर पडली. आजी मग जरा शांत झाली त्यामुळे  रसेलवर देवधर्माची, प्रार्थनेची सक्ती केली नाही. मात्र लहानपणी झालेले आघात रसेलला अंतर्मुख करून गेले होते. फ्रॅंक कळता होता.. आजीच्या कर्मठ पणावर वाद घालायचा. रसेल मात्र कुठे बागेत लपून बसलेला असायचा दिवसभर.. कशासाठी जगतो आहे मी?? हा प्रश्न त्याला अनेकदा पडायचा. आत्महत्येचा विचार यायचा....मात्र आयुष्यात भूमिती आली आणि आयुष्याचे गणित बदलून गेले.


रसेल भूमिती मध्ये अक्षरशः दिवसभर डुंबु लागला. अकराव्या वर्षी त्याने भूमिती मध्ये नवीन सिद्धांत शोधून काढला..... पुढे शिकण्यासाठी केंब्रिजमधे आला... आपल्या मेहनतीने त्याने त्याचा दबदबा निर्माण केला. गणित आणि तर्क शास्त्र यांचा परस्परसंबंध दाखवून दिला.  त्याने Principia Mathematica या ग्रंथाचे तीन खंड प्रकाशित केले. रसेल ला लंडन च्या प्रसिद्ध रॉयल सोसायटीचे सभासदत्व मिळाले. ट्रिनिटी कॉलेज मध्येच त्याची प्राध्यापकी सुरू झाली. रसेल शब्दश जीव तोडून शिकवू लागला. रसेल दमून जायचा अगदी.... पण त्यातच त्याला समाधान मिळायचे.


सगळे काही सुरळीत सुरू होते मात्र आई वडिलांकडून मिळालेली विद्रोही गुणसूत्रे रसेलला शांत बसून देईना..  रसेलने पहिल्या महायुद्धाच्या काळात युद्धाला विरोध केला. त्याच्यावर देशद्रोही असल्याचा शिक्का देखील बसला.. जॉब पण गेला आणि तुरुंगाची वारीपण झाली. सहा महिने कारावास आणि १०० पौंड दंड.  जो भरण्यासाठी त्याच्या पुस्तकांचा लिलाव झाला. 


जीवनाचा खरा आनंद सापडलेला रसेल कारागृहात अगदी मजेत होता. चांगले वाचन सुरू होते. शिक्षा सुरू आहे याची आपल्याला जाणीव असावी म्हणून वॉर्डनने आपल्यावर रोज ओरडावे अशी सूचना त्यानेच दिली होती😃 तुरुंगातून बाहेर पडल्यावर जगभरातून रसेल ची मागणी वाढली होती.


रशिया चीन असा प्रवास सुरू होता. चीन मध्ये रसेल सारखे अनेक हरहुन्नरी लोक एकत्र आले होते ( भारतातून रवींद्रनाथ टागोर गेले होते) एक वर्ष चीन मध्ये विविध प्रयोग करण्यात रसेल ने घालवले. रसेलचे या काळात लिखाण जोरात सुरू होते. परत आल्यावर त्याने निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला.. पण उघड उघड नास्तिकतेचा प्रसार करणारा थोडीच निवडून येणार.. मग त्याने शिक्षण क्षेत्रात काम करायला सुरुवात केली.


शिक्षण क्षेत्रात रसेलचे काम महत्त्वाचे आहे. दुसरी बायको डोराबरोबर त्याने एक शाळा काढली.  प्रचलित शिक्षणपद्धती ला फाटा देऊन स्वतःच्या मुलांसाठी हा शाळेचा प्रयोग त्या दोघांनी केला. साहित्य आणि गणित शास्त्र उपयोगी विषय यांचे समीकरण त्याने बसवले. वयाच्या अकराव्या वर्षा पर्यंत गणित नाही. अकरा ते चौदा गणित आणि पंधरा ते अठरा व्यावसायिक शिक्षण.. अठराव्या वर्षी व्यक्ती "आत्मनिर्भर" होणार असा त्याचा फॉर्मुला.

रसेल चे गणितावर आणि गणीतज्ञावर खूप प्रेम.... यांना कुठून तरी आपल्या रामानुजन ची माहिती कळाली होती.. आणि जणू काही दुसरा न्यूटन शोधला आहे या आनंदात मद्रास मध्ये राहणाऱ्या, कधीही न पाहिलेल्या या कारकुनाचे पान भरुन कौतुक.. तेही कुठे तर आपल्या प्रेयसीला पाठवत असलेल्या प्रेम पत्रात.. आहे ना वेडा माणूस😂😂 असे म्हणतात की याने गणितावर जेवढे प्रेम केले तेवढे चारही बायका आणि शेकडो प्रेयसी वर केले नसेल.. कदाचित त्याचे वाढणारे आकडे हे पण त्यांच्यासाठी एक गणित असेल😃


रसेलचे वैवाहिक जीवन लौकिकार्थाने अयशस्वी म्हणावे लागेल. अर्थात रसेल सारख्या अलौकिक माणसाला आपण आपल्या चौकटीत बसवू शकत नाही. कॉलेज ला असताना ऍलिस या अमेरीकन मुलीशी  प्रेमविवाह केला. अर्थात आजीची संमती नसताना.. पण लग्नानंतर ७-८ वर्षांनी त्याला समजून आले की  ऍलिसवर त्याचे प्रेम नाही. मग घेतला घटस्फोट. असे एकदा, दोनदा नाही तब्बल तीन वेळा झाले.. शेवटी उतारवयात भेटलेली चौथी बायको एडिथ फिंच मात्र अखेर पर्यंत सोबत राहिली. मधल्या काळात अनेक स्त्रियांशी संबंध होते जे त्या काळात खूपच वादळी ठरले होते.. रसेलची रसिकता सगळीकडे जाहीर झाली. अर्थात रसेल ला त्याची तमा नव्हती


"रिचर्ड डॉकिंस" वरच्या पोस्ट मध्ये आपण वाचले असेल की रसेल चा "Why I am not a Christian" हे पुस्तक रिचर्ड्सला नास्तिक व्हायला कारणीभूत ठरले. या पुस्तकाने खूपच खळबळ उडवून दिली होती. अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने निरीश्वरवाद मांडून देवाचा बाजार उठवला होता. मात्र यामुळे रसेलच्या पोटावर पाय आला.


रसेल पुन्हा अमेरिकेत गेला होता आणि न्यू यॉर्क सिटी कॉलेजमधे तत्वज्ञान शिकवू लागला. मॅरेज अँड मोरल्स पुस्तक प्रसिद्ध झाले होते. ज्यात आजवरच्या विवाह संकल्पनेला तडा दिला होता. त्याचे देखील निमित्त झाले. "हा माणूस देवा धर्मा विषयी तसेच लैंगिकते विषयी समाजविघातक माहिती देत आहे,  त्याच्यामुळे आमची मुलं वाया जातील" या भीतीमुळे पालकांनी तीव्र विरोध केला आणि रसेलवर तत्त्वज्ञान शिकवण्यास बंदी घालण्यात आली.


आपला भाऊ पण पेटला मग. त्याने न्यायालयात धाव घेतली खटला दाखल केला. मात्र न्यायाधीश पण समाजाचाच भाग असतो ना. त्यांनी कॉलेजच्या मुलांना शिकवण्यास "मानसिकरीत्या दुर्बल" आहे असे रसेलवर शिक्का मोर्तब केले. मग रसेल ट्रिनिटी महाविद्यालयात शिकवू लागला, तिथे त्याने पाश्चिमात्य तत्वज्ञानावर त्याने जी व्याख्याने दिली तीच पुढे The history of western philosophy या पुस्तकाचा आधार ठरली.


या पुस्तकाची पण गंमत आहे.  एका विमान अपघातात ३८ पैकी १९ प्रवासी वाचले. रसेलला धूम्रपान केल्याशिवाय जमत नसल्याने त्याने सीट धूम्रपान विभागात बदलून घेतली होती. नेमकी अपघातात त्या भागातील लोक वाचले. रसेल साठी सहानुभूतीची लाट उसळली आणि अपघातापूर्वी तीन वर्ष प्रसिद्ध झालेल्या The history of western philosophy ची विक्री प्रचंड वाढली. आर्थिक बाबीत रसेल पुन्हा "सेटल" झाला


दुसरे महायुध्द सुरू झाले,  रसेलने युद्ध विरोधी चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा एकदा तुरुंगाची हवा खाऊन आला. पण या सगळ्यात त्याची लोकप्रियता वाढतच गेली. आणि त्यात त्याला साहित्यातला नोबल पुरस्कारही मिळाला. नोबेल भेटल्यावर भाऊची एवढी हवा झाली की विषय कोणताही असो.. रसेलचे त्यावर काय म्हणणे आहे हे विचारले जायचे.  बी.बी.सी.वर अनेक माहितीपटांत, मुलाखतींमधे रसेल दिसायचा. रसेल आता चालता बोलता विश्वकोश झाले होते. 


४० पेक्षा जास्त ग्रंथ आणि शेकडो निबंध लिहिणाऱ्या रसेल यांचा माझा सगळ्यात आवडता निबंध आहे तो त्यांनी लिहीलेला "आळसाचे महत्व." व्यक्तीला कामाचे दिवसात केवळ चार तास असावेत आणि बाकीचा वेळ त्याने आनंद मिळेल या बाबीवर उडवावा हे त्यांचे मत होते. याने अधिकाधिक लोकांना रोजगार पण मिळेल आणि व्यक्ती जीवनाचा आनंद पण घेईल. आनंदात घालवलेला वेळ कधीच वाया जात नसतो असे ते म्हणत. लहानपणी 'सैतान आळशी हातांकरता काही ना काही उद्योग शोधत असतो' असे ऐकल्याने मी उगाच खूप कष्ट केले. तुम्ही तरी जीवनाचा आनंद घ्या असे रसेल म्हणायचे. ( मोदींनी पण जरा कमी काम केले तर देशा चा विकास होईल असे जाणकार म्हणतात🤣)


"भारताचे स्वातंत्र्य" ही मागणी घेऊन इंग्लंड मध्ये स्थापन झालेल्या इंडियन लीग चे रसेल सात वर्ष अध्यक्ष होते. याच काळात v k मेनन तसेच सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याशी त्यांचे चांगले संबंध प्रस्थापित झाले. पुढे राधाकृष्णन राष्ट्रपती झाल्यावर पाठवलेल्या संदेशात ते म्हणतात की " एक तत्वज्ञ राष्ट्रपती पदावर पोचला आहे.. सॉक्रेटिस चे तत्वज्ञ राजा हे स्वप्न काही प्रमाणात साकार होते आहे." कट्टरवादी हेच मानवाच्या सुखाचा सर्वात मोठा अडथळा आहे असे म्हणणारे रसेल नास्तिक वादाचे आग्रही होते. 


अनेक वेळा धार्मिक लोक देवाचे अस्तित्व नाही हे तुम्हीच सिद्ध करा असे आव्हान देतात. त्यांची  खिल्ली उडवताना चहाच्या किटली चे उदाहरण देऊन निरुत्तर करायचे. जर मी म्हणालो की आकाशात देव नाहीत तर तुम्ही म्हणता सिद्ध करा.. ठीक आहे मी म्हणतो आकाशात चहा ची किटली आहे. काय तुम्हाला दिसत नाही का.. अहो खूप लहान आहे तुम्हाला शक्तिशाली दुर्भिन वापरली तरी नाही दिसणार. तुम्ही विश्वास ठेवत नाही ना.. मग दर रविवारी अश्याच आकाशातील देवाच्या भाकडकथा ऐकायला पोरांना कशाला चर्च मध्ये पाठवता..( मला तर गाडगेबाबांची आठवण झाली.. सरळ सोपे उदाहरण अगदी) तरुण पिढीतील फारच थोड्यांना "धर्म" पटत असतो.. आणि ज्यांना पटत असतो ते बहुतेक वेळा "सामान्य बुद्धिमत्तेचे" आणि "अत्यंत संभ्रमितच" असतात असे रसेल म्हणायचे.


ब्लेझ पास्कल आणि बर्ट्रांड रसेल  हे दोघेही गणितज्ञ. पास्कल असे म्हणतो की "देव आहे की नाही मला माहीत नाही.. पण देव असलाच तर..  म्हणून जोपर्यंत देवाचे नसणे सिद्ध  होत नाही तोपर्यंत त्याची पूजा केली पाहिजे.... काय घ्या चुकून तो असला म्हणजे" रसेल मात्र देव संकल्पना सपशेल नाकारतो..   तो म्हणतो...  समजा देव असला आणि मेल्यानंतर मला त्याच्या समोर उभे केले आणि त्याने मला विचारले की 'रसेल... तू माझ्यावर विश्वास का नाही ठेवलास' तेव्हा मी त्याला म्हणेल  'देवा पुरावा नव्हता रे .. खरचं पुरावा नव्हता ' देव असलाच तरी...देवाला रसेलचे प्रामाणीक उत्तर जास्त आवडेल की पास्कलची स्वार्थी भक्ती..???? सोचो..

रसेल यांच्या ,१९६३ साली आलेल्या "अनार्मड व्हिक्टरी" या पुस्तकावर भारतात बंदी होती बरका... भारत चीन युद्ध या विषयावर भारत विरोधी लिखाण त्यात केले आहे असा ठपका होता. अमेरिका, रशिया यांच्या शीतयुद्धाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या कुरघोडी यात नमूद केल्या होत्या. चीन ची बाजू त्यात प्रभावी  मांडली गेली होती. अर्थात भारताची बाजू त्यावेळी जगासमोर मांडण्यात आपले राजदूत यशस्वी झाले नव्हते हे सत्य आहे. रसेल हे कधीच भारत विरोधी नव्हते. 


रसेलने एका हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. राजेंद्रकुमार यांच्या अमन या १९६७ साली आलेल्या चित्रपटात ९५ वर्षाचे रसेल नायकाला शांतीचा संदेश देताना आढळतात. (गझल गायक जगजितसिंग यात अभिनय करत आहेत, तर नसिरुद्दीन शाह चा हा पहिला सिनेमा ज्यात त्याचे एकमेव दृश्य देखील कापले गेले आहे😵


"वैचारिक असहमतीची तीव्रता समजदार पणाच्या पातळीपेक्षा खाली जाते तेव्हा संवाद बेगडी होतो. मी आपल्याशी बोलू इच्छित नाही" असे रसेल यांनी सर ओसवॉल्ड मोस्ले यांना कळवले होते. मोसले हे इंग्लंडमध्ये वंशवादी संघटन चालवायचे. इंग्लंड केवळ ब्रिटिश वंशियांचे बाकीच्यांना हाकलून द्या  टाईप. आपली शक्ती अश्या गोष्टीवर वाया घालवली नाही रसेल ने. आपण देखील अंधभक्तांशी डोकेफोड करत असताना हे लक्षात ठेवले पाहिजे.


रसेल ला शांततेचा पुरस्कर्ता म्हणणे वावगे ठरणार नाही. दोन्ही महायुद्धात सरकार विरोधी भूमिका घेऊन या रॉयल घरातील माणसाने (तुलनेसाठी आपले अदानी अंबानी समजा)  तुरुंगवास भोगला आहे.   व्हिएतनाम युद्धाच्या विरोधात देखील रान उठवले. रसेल आणि आईनस्टाईनने जगभरातील अण्वस्त्रांना निकामी करावे असा जाहीरनामा १९५५ साली प्रसिद्ध केला. महात्मा गांधी आणि रसेल यांच्यात अहिंसा, शांतता अशा विषयांवर पत्रांद्वारे चर्चा झाली होती. 


आज रसेल आपल्यात नसले तरी त्याने निर्माण केलेली विपुल ग्रंथसंपदा आहे.. त्याने प्रसारित केलेले तत्वज्ञान जोर धरत आहे.. जीवनाचा खरा आनंद शोधायला मदत करत आहे. त्यांचे सर्वात जास्त विक्री झालेले "conquests of happiness" हे पुस्तक जगताना आनंद कसा मिळवावा हे अतिशय सोप्या शब्दात सांगते. सर्व प्रमुख भाषा मध्ये अनुवाद झालेले हे पुस्तक जगाला आनंदी करायचे स्वप्न पाहते. सुखी माणसाचा सदरा या नावाने करुणा गोखले यांनी मराठीत अनुवाद केला आहे. 


वयाच्या ९८ व्या वर्षी रसेलने आत्मचरीत्राचे तीन खंड लिहिले. केवळ शरीर म्हातारं झालं होत..  मेंदू मात्र तसाच चिरतरून.. अगदी २ फेब १९७० रोजी मृत्यूच्या काही तास आधी टाईम्ससाठी लिखाण केलं आणि मग शेवटचा श्वास घेऊन रसेल ने निरोप घेतला.शास्त्रज्ञ, गणितज्ञ, तत्वज्ञ, विद्रोही, लेखक, राजकारणी, शांतीचा आणि प्रेमाचा संदेशवाहक अश्या कितीही विशेषणांनी गौरवलेला  असला तरी रिच्या त्याच्यासाठी एकच शब्द वापरणार.. आनंद यात्री. बर्ट्रांड रसेल हा आनंदयात्री होता... आणि..


आनंद मरा नही.. आनंद मरते नही...👍🏼


#richyabhau

Comments

Popular posts from this blog

गोमू आणि गोमाजीराव

आपली पुस्तके