आल्फ्रेड नोबेल... डायनामिक शांतीदूत
आल्फ्रेड नोबेल... डायनामिक शांतीदूत
"विज्ञान शाप की वरदान" शाळेत अनेक वेळा निबंधाला विषय असतो.. आणि बऱ्याच वेळा त्याचा कल असा असतो की विज्ञान हे वरदानच आहे.. मात्र त्याचा योग्य वापर झाला पाहिजे.. हाच नियम इथे लावला तर आल्फ्रेड निःसंशय नायकच ठरतो... मनुष्य प्राण्याचे कष्ट कमी करण्यात याचा मोलाचा वाटा.. मात्र तरीही त्याला "मौत का सौदागर" असे टोपणनाव ऐकून घ्यायला लागले.. मात्र काळाने अशी वेळ आनली की त्याच्या नावाच्या पुरस्काराला जगात सर्वात भारी समजले जाते... किती विसंगती ना...😀
आपण अनेक वेळा चिंता करतो की आपली पृथ्वी.. हा पिटूकला निळा ठिपका विस्फोटकाच्या राशीवर बसला आहे.. कधीही ही मानवजात आणि संपूर्ण जीव सृष्टी नष्ट होऊन जाईल.. ही स्फोटके बनवली कुणी??.. तर ह्या आल्फ्रेड नोबेल याने.. ज्याच्या नावाने जागतिक शांतीचा नोबेल पुरस्कार दिला जातो.. आल्फ्रेड नोबेल.. ३५५ पेटंट ज्याच्या नावावर नोंदवले आहेत असा संशोधक, रसायनी, उद्योजक, अभियंता.. एक साहित्यिक, दिलदार माणूस आणि शांतीचा दुत
आल्फ्रेडचा जन्म २१ ऑक्टोबर १८३३ मध्ये स्वीडनची राजधानी "स्टॉकहोम" येथील एका इंजिनीअर तथा संशोधक इमॅन्युएल नोबेल च्या घरात झाला. "ओलोफ रुडबेक" या सतराव्या शतकातील महान शात्रज्ञ आणि खगोलतज्ज्ञाच्या एकूण २४ पोरांपैकी एक पोरगी "नोबेल" घरात पडली.. तिचा वंश चालत चालत इमॅन्युएलपर्यंत आलेला.. म्हणजे संशोधन करणे जणू काही रक्तातच होते.. इमॅन्युएलने देखील प्लायवुडचा नवा प्रकार शोधून काढला होता. तसेच पानबुडीवर वापरायचे क्षेपणास्त्रवर (गाझी अटॅक मधाला टोरप्याडो आठवला का..तेच) काम करत होता.
इमॅन्युएल मोठमोठे पूल बनवण्याचे ठेके घेत असायचा.. ज्यासाठी डोंगर फोडून खडी बनवणे भाग होते. त्याकाळात सुरुंगसाठी केवळ गनपावडर हा एकच पर्याय होता. इमॅन्युएल त्यात एक्स्पर्ट.. मात्र धंदा हा धंदाच.. कधीही बसू शकतो तसे झाले.. आल्फ्रेड जन्मला आणि लवकरच त्याच्या वडिलांचे दिवाळे निघाले. आई कॅरोलिन कणखर स्त्री होती.. आठ पोरं सांभाळत असताना घरातच दुकान सुरू केलं. त्या काळात लसीकरणची सुविधा नव्हती.. आल्फ्रेडची चार भावंडे एका मागोमाग एक मेली.. आठ चे चार राहिले फक्त...😔 आल्फ्रेडची पण तब्येत काडीकुडी.. त्यात आर्थिक स्थिती चांगली नाही... शाळेत पाठवणे शक्य नव्हते... आईने मुलांना घरीच शिकवणं सुरू केलं. आणि १८३७ मध्ये बाप नशीब काढायला म्हणून रशियाला निघून गेला.
आल्फ्रेडला संशोधक वृत्ती व कार्यक्षमता याचा वारसा वडीलाकडून तर जीवनमूल्य आणि प्रामाणिकपणाचे संस्कार आईकडून मिळाले होते.. आईशी त्याचे नाते खूपच छान....पुढे "बडा आदमी" बनला तरी आईचे त्याच्या हृदयात स्थान कायम राहिले. जगात कुठे का असेना.. आईचा बड्डे असेल तर आल्फ्रेड घरी येणारच..
लहानपणी शाळेत जायचे त्याचे स्वप्न होते, ते काही काळाकरता तरी शक्य झाले.. वडील रशियाला सेट झाले .. आर्थिक स्थिती सुधारली.. आणि १८४१ मध्ये आल्फ्रेड शाळेत जाऊ लागला...दीड वर्ष.. १८४२ पर्यंत इमॅन्युएल एवढा सेट झाला रशियात.. की त्याने सगळे कुटुंब तिकडे बोलावून घेतले.. श्रीमंत झालेल्या आल्फ्रेडला शाळेत जायची गरज नाही.. शिक्षक घरी येऊन शिकवायला लागले. दिवसभर शाळा.. पण आल्फ्रेड न कंटाळता शिकायचा. इंग्रजी फ्रेंच जर्मन आणि रशियन या भाषा चांगल्या अवगत केल्या..
घरात रसायन शास्त्र तर होतेच, स्फोटक पदार्थांचे ज्ञान त्याला होते.. मात्र त्याला आवड होती साहित्याची..शेले च्या कविता आणि शेक्सपियर ची नाटके त्याला भुरळ घालत होती.. मोठे झाल्यावर मी साहित्यिक बनणार.. असे हा म्हणू लागला..🙊 एखादा गुजराती, मारवाडी किंवा सोनार कुटुंबात एखादा पोरगा म्हणाला 'म्या धंद्यात नाय पडणार आपल्या.. मापल्याला सैनिक व्हायच हाय..' तर त्याच्या घरात काय प्रतिक्रिया उमटेल.. अगदी तसेच आल्फ्रेड च्या घरात झाले.. कान धरून त्याला सांगितले. ' नसते धंदे नाय करायचे.. गुमान रसायन शास्त्र शिकायचे '😬
बापाने १८ वर्षाच्या आल्फ्रेडला अमेरिकेला पाठवले... शिकायचे आणि कारखान्यांना भेटी देऊन तिथे काम कसे चालते हे पण पाहायचे..केमिकल इंजिनीयर ची पदवी घेऊन फ्रान्स मध्ये आला.. तोवर हवेत निष्क्रिय असलेला घटक "नायट्रोजन" याला लोकांनी कामाला लावले होते.😀 स्फोटक कात नायट्रोजन संयुगांचा वापर होत होता. गन पावडरपेक्षा जास्त मोठा स्फोट करणारे ‘नायट्रोग्लिसरीन’ हे केमिकल "सॉब्रेरो" याने शोधले होते. आल्फ्रेड चे तिघे भाऊ तोवर वडिलांच्या व्यवसायात उतरले होते.. घरच्या धंद्याला पूरक होईल म्हणून नायट्रोग्लिसरीन या स्फोटकावरच आल्फ्रेडने संशोधन करायचे ठरवले.
नायट्रोग्लिसरिन मध्ये प्रचंड स्फोटक शक्ती होती.. मात्र ती बऱ्याच वेळा अनियंत्रित असायची. बिना ब्रेकची फुलं स्पीड गाडी😔 अनेक अपघात व्हायचे.. ते केमिकल नियंत्रित कसे करावे यावर आल्फ्रेड सखोल संशोधन करीत होता. यात त्याला अपघातानेच यश आले. प्रयोग करत असताना त्याच्या हातून केमिकल खाली पडले.. त्याला वाटले मेलो आता.. स्फोट होणार..मात्र धमाका झाला नाही... ते केमिकल पडले तिथे खूप माती होती.. यातून त्याला आयडिया आली आणि हेच ते ‘ब्लास्टिंग ऑइल.’ जन्माला आले.
१८५७ मध्ये त्याचे गॅस मीटर चे पहिले पेटंट नोंदवले गेले. आजवर आपण अनेक शास्त्रज्ञ पाहिले जे पेटंट घेत नाहीत म्हणून त्यांचे आपण कौतुक करतो.. मात्र आल्फ्रेड चे पेटंट घेतले म्हणून कौतुक केले पाहिजे.. कारण त्याने त्यातून प्रचंड पैसा मिळवला.. आणि नंतर त्याचा चांगला उपयोग झाला.. मात्र पहिले पेटंट घेतले तेव्हा त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती पुन्हा ढासळली होती... बापाचे पुन्हा दिवाळे वाजले होते.
१८५३ ते ५६ या काळात रशिया आणि अँग्लो फ्रेंच आघाडी मध्ये झालेल्या क्रिमियन युद्धात आल्फ्रेडच्या घरच्या कारखान्यांमध्ये लष्करी शस्त्रे बनवणे चालूच होते. हजारो कामगार काम करत होते.. मात्र लढाईत रशियाचा पाडाव झाला.. आणि ह्यांचे आर्थिक नुकसान... आई बाप सगळी विकाविकी करून मोजक्या पैशनिशी पुन्हा स्वीडनला परतले. मात्र आल्फ्रेड भावासोबत तिथेच राहिला. घरात किचन मध्ये प्रयोगशाळा तयार करून संशोधन करत राहिला. अश्या वेळी पेटंट रुपी मिळणारे पैसे त्याला अत्यावश्यक होते. त्याच जीवावर त्याने पुन्हा पैसे मिळवले आणि स्वीडन मध्ये कारखाना पुन्हा सुरू केला.
१८६४ मध्ये स्वीडन मधील नोबेल कुटुंबाच्या कारखान्यात स्फोट झाला. "एमिल" हा आल्फ्रेड चा भाऊ इतर चार लोकांसोबत बळी पडला. प्रकरण खूप गाजले. असे धोकादायक कारखाने शहरात नको म्हणून लोकांनी आवाज उठवला.. आल्फ्रेडने शक्कल लढवली.. एका तळ्यात जहाजमध्ये त्याने आपली प्रयोगशाळा आणि कारखाना थाटला.. भावाच्या अपघाताचा आघात होताच, त्यामुळे अधिक सुरक्षित स्फोटके कशी निर्माण होतील यावर त्याने संशोधन सुरु केलं. यातूनच "डायनामाईट"चा जन्म झाला. आणि जगातील सर्वात परिणामकारक तरीही नियंत्रित राहणारे विस्फोटक भेटले. आल्फ्रेडने त्याचे पेटंट घेतले.
नायट्रोग्लिसरिन व सिलिका एकत्र करून आल्फ्रेडने डायनामाइट तयार झाले. सिलिंडरमध्ये भरणे, त्याची वाहतूक करणे, हाताळणे या बाबी आता सोप्या झाल्या होत्या. अपघाताची शक्यता कमी झाली, तापमान व दाबाचा परिणाम नियंत्रणात आला आणि विस्फोटाची शक्ती वाढली. डायनामाइट मुळे खाणकामात, रस्ते व बोगदे बनवण्याच्या कामात आमूलाग्र क्रांती आली. डायनामाइटची मागणी प्रचंड वाढली. आल्फ्रेड कडे आर्थिक बाब भक्कम झाली आणि त्याने संशोधनावर भर दिला.. आल्फ्रेडच्या पेटंट्सच्या संख्येत भराभर वाढ होत गेली आणि त्याचबरोबर संपत्तीतही.... कोणताही मोदी मागे नसताना😀🤣
आल्फ्रेडच्या उरलेल्या दोन्ही भावांनी कॅस्पियन समुद्रात तेलाच्या खाणी शोधल्या.. आणि ते पण मालामाल झाले होते. पैसा आला की सगळी कडून येतो.. आल्फ्रेडने भावांच्या धंद्यात पण पैसे गुंतवून पैसे कमवले.. आणि नेहमी युद्ध विरोधी भूमिका घेणाऱ्या आल्फ्रेड चे ९० कारखाने सुरू झाले.. जे युद्ध साहित्य बनवत होते.. धंदेवाईक व्यक्तीला आवश्यक गेंड्याची कातडी त्याने व्यवस्थित पांघरली.
आल्फ्रेडने नंतर डायनामाईट पेक्षा प्रभावी जेलीगनाईट हे केमिकल बनवले तर १८८७ साली त्याने शोधलेले बॅलीसटाईट हे केमिकल अनेक वर्ष रॉकेट साठी वापरण्यात आले आहे. आल्फ्रेडने बनवलेली एकेक घातक शस्त्रे आणि रसायने यांचा युद्धात बेसुमार वापर होऊन खूप मनुष्यहानी झाली. आल्फ्रेड ने स्वतःची समजूत काढली होती की "जेव्हा माणसाला या रसायनाची दाहकता कळेल तेव्हा जगात कधीच युद्ध होणार नाही.." त्याचा हा समज जगभरातील देशांनी खोटा ठरवला. 😔
हा माणूस कदाचित फक्त व्यवसाय वाढ, संशोधन करणे अन् पेटंट घेऊन पैसे कमावण्यासाठीच जन्माला आला असावा.. त्याने धमाल केली आहे असे किस्से दुर्मिळ.. रिच्याने तर लिहिले पण नसते त्यावर.. जर नोबेल पारितोषिक सुरू नसते झाले तर.. मित्रांशी धमाल नाही.. ना कधी लग्न केले.. तीन वेळा प्रेमात पडला.. पण असल्या ठोकळा चेहऱ्याच्या विवेक ओबेरायला कोण भाव देणार😫
पहिली मैत्रीण तोंडावर नाय म्हणून गेली. दुसरी तर जाहिरात देऊन कामावर ठेवलेली सेक्रेटरी.. तिने पण नकार दिला.. आणि काम पण सोडले. बर्था किंस्काय हीच ती हुशार सेक्रेटरी, ती जरी जास्त दिवस सोबत नाही राहिली.. तरी आल्फ्रेडशी तिचा पत्रव्यवहार शेवटपर्यंत राहिला. तिने सुचवले म्हणून तर "शांती" या क्षेत्रात नोबेल पारितोषिक सुरू करण्याचे नमूद केले आल्फ्रेडने... आणि गम्मत म्हणजे आल्फ्रेड मेल्यावर सुरू झालेले शांतीचे नोबेल पारितोषिक १९०५ साली बर्था किंस्कायलाच भेटले. मेरी क्युरी नंतर दुसरी नोबेल विजेती महिला.
आल्फ्रेड ची शेवटची मैत्रीण सोफिया हेस, जी त्याच्या निम्म्या पेक्षा कमी वयाची होती.. ती ४३ व्या वर्षी याच्या जीवनात आली.. मात्र खूप वर्ष सोबत राहिली. ही अतिशय चुलबुली आणि चावट पोरगी होती. हिच्या सानिध्यात थोडे आयुष्य रंगीत झाले असावे आल्फ्रेडचे. पण काहीच वर्षे...१५ वर्ष सोबत राहिलेल्या सोफियाने एक दिवस बॉम्ब टाकला..🚨 मला दिवस गेले आहेत.. तुझ्या पासून नाही.. दुसऱ्या माणसापासून. चालले मी त्याच्याकडे..🥶 त्या माणसाने लग्न केले आणि दुसऱ्या दिवशीच पळून गेला...सोफिया परत आल्फ्रेड कडे.😬 किमान पैसे तरी दे पोटापूर्ते वगैरे मागणी. 😭आल्फ्रेडने अक्षरशः तिला केवळ पोटापुरतेच पैसे मिळतील अशी तरतूद केली😀 अर्थात आल्फ्रेड कंजूस नव्हता बरं का..स्वतः "नास्तिक" असला तरी चर्च च्या विधायक कामांना भरपूर निधी द्यायचा.🤔
आल्फ्रेडला स्वीडन पेक्षा पॅरिस मध्ये राहायला आवडतं असे. तिथेच त्याने बंगला आणि ऑफिस थाटले होते. स्वतची लायब्ररी आणि पागा वगैरे हौस त्याने इथे भागवून घेतली. तिथे राजा राजवड्यांप्रमाणे जीवनशैली जगत असलेला हा माणूस कधी काळचे गरिबीचे दिवस विसरला नव्हता. मात्र इटलीला गुप्तपणे स्फोटकांचा पुरवठा केला असा संशय घेऊन आल्फ्रेडवर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. परिणामी त्याने १८९१ मध्ये फ्रान्स सोडून इटली गाठली. पॅरिस चे घर आणि सोफिया.. इथेच सुटली..
१८९३ मध्ये त्याला "उपसाला" या स्वीडन मधील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित विद्यापीठाची मानद डॉक्टरेट देण्यात आली. डॉ आल्फ्रेड नोबेल यांचा साहित्यिक बनायचा लहानपणीचा कीडा अजून डोक्यातून गेला नव्हता. त्यानें "नेमेसीस" ही चार अंकी शोकांतिका लिहिली होती. मात्र ती प्रसिद्ध व्हायला २००३ साल उजडावे लागले. त्याच्या मृत्यू नंतर त्याची या नाटकाची हस्तलिखिते गायब करण्यात आली होती..
दिलदार तर आल्फ्रेड होताच... एकदा त्याला समजले की त्याच्या घरी कामाला असलेल्या मुलीचे लग्न आहे. त्याने विचारले तुला काय गिफ्ट देऊ.. ती चतुर.. बोलली 'जास्त काय नको.. तुमची एक दिवसाची कमाई द्या.'😀😀 झाली ना राव मालामाल.. देने वाला जब भी देता..देता छप्पर फाड के. 😀😍
नोबेल पारितोषिक मध्ये देखील विजेत्याला कोट्यवधी रुपये मिळतात.. केवळ व्याजपोटी एवढी रक्कम मिळावी इतकी रक्कम आल्फ्रेड नोबेल ठेऊन गेला आहे. त्याला असे बक्षीस का सुरू करावे वाटले.. याचा भारी किस्सा आहे. आल्फ्रेड चा एक भाऊ १८८८ मध्ये मेला.. मात्र पेपर वाल्यांना वाटले की आल्फ्रेड मेला.. त्यांनी बातमी दिली.. "मृत्यूचा सौदागर मेला" या बातमीने त्याचे डोळे उघडले.. आपण मेल्यावर आपले नाव असे घेतले जावे ही कल्पना त्याला सह्य होईना.. त्याने मृत्युपत्र केलं आणि आपल्या कमाई तील ९४% रक्कम नोबेल पारितोषिक साठी राखीव ठेवली. १८९६ मध्ये त्याने शेवटचा श्वास घेतला.. १९०१ पासून नोबेल पारितोषिक देणे सुरू झाले.
भौतिक, रसायन, औषधे, साहित्य आणि जागतिक शांती या पाच क्षेत्रात नोबेल देण्यात येते. तसेच स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेला १९६८ मध्ये ३०० वर्ष पूर्ण झाली म्हणून बँकेने आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक सुरू करण्याचे सुरू केले आहे. आजवर ५९७ वेळा नोबेल देण्यात आले असून ९२३ व्यक्ती आणि २७ संस्था यांना नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. १७ वर्षाची मलाला ही सगळ्यात कमी वयाची विजेती तर मागच्या वर्षी रसायन शास्त्रातील नोबेल चे विजेते जॉन गूडइनफ हे ९७ वर्षाचे सर्वात जास्त वयोवृध्द व्यक्ती आहेत.
नोबेल पारितोषिकांचा वितरण समारंभ दरवर्षी स्टॉकहोम येथे स्वीडनच्या राजांच्या हस्ते आल्फ्रेड नोबेलच्या स्मृतिदिनी होतो. प्रत्येक विजेत्याला आपल्या कार्याविषयी माहिती देणारे व्याख्यान द्यावे लागते. या व्याख्यानांना ‘नोबेल लेक्चर्स’ म्हणतात. या सर्व व्याख्यानांचा संच करून छापण्यात येणाऱ्या पुस्तकाला भरपूर मागणी असते.
गणितात नोबेल पुरस्कार नसतो याबाबत एक अफवा आहे.. आल्फ्रेडने ज्या मुलीला मागणी घातली होती तिने एका गणितज्ञासाठी नकार दिला होता म्हणून आल्फ्रेड ची गणीताशी खुन्नस.... खरे तर आल्फ्रेड चा समकालीन गणितज्ञ गोस्टा मिटाग लेफ्लर याच्या सल्ल्यानुसारच स्वीडनचे राजे ऑस्कर यांनी गणित विषयासाठी पुरस्कार देण्यास सुरुवात केली होती.. मग डबलडबल कशाला असा विचार आल्फ्रेडने केला असावा. माझे नोबेल हुकले ना राव यामध्ये😭
मेलेल्या व्यक्तींना नोबेल "मरणोपरांत" देण्यात येत नाही.. आल्फ्रेड नोबेल यांचं असा उद्देश होता की आत्तापर्यंत खुप वैज्ञानिक, विचारवंत पर्वता एवढे काम करून गेले आहेत म्हणून काय दरवर्षी मृत ग्रेट लोकांनाच पारितोषिक देत बसायाचे का. अशाने नवीन लोकांना ग्रेट बनायची संधी आणि उत्तेजन मिळणार नाही.👍🏼👍🏼 बाय द वे.. डोनाल्ड तात्या ट्रम्प यांना शांततेचे तर निर्मला आत्या यांना या वर्षीचे अर्थ शास्त्राचे नोबेल देण्यात यावे अशी मी शिफारस करणार आहे🤣
आजवर रवींद्रनाथ टागोर, डॉ. सी. व्ही. रमन, अमर्त्य सेन आणि कैलाश सत्यार्थी या भारतीयांना नोबेलने गौरवण्यात आले आहे. तर डॉ. हरगोविंद खुराणा, सुब्रह्मण्यम चंद्रशेखर, व्यंकट रामकृष्ण आणि अभिजीत बॅनर्जी (चारही जण अमेरिका निवासी) हे भारतीय वंशाचे नोबेल विजेते झाले आहेत. मदर तेरेसा आणि व्ही. एस. नायपॉल या परदेशी व्यक्तींनी भारतातर्फे हा पुरस्कार स्वीकारला आहे.
१९५८ साली जेव्हा १०२ अणुक्रमांकाचे मूलद्रव्य प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या बनवण्यात आले तेव्हा त्याला "नोबेलियम_ असे नाव देऊन आल्फ्रेड नोबेलला अवर्तसारणी मध्ये कायमचे स्थान मिळाले आहे. 'बर्ट्रांड रसेल' म्हणतो की "प्रत्येक व्यक्तीला काही करून अजरामर व्हायचे असते... सामान्य व्यक्ती लग्न करून मुले पैदा करतो.. आणि गुणसूत्रा द्वारे अमर होतो..😜 असामान्य लोक मात्र या जगाला असे काही देऊन जातात.. की ज्यामुळे ते अजरामर होतात.."👌🏿 कदाचित डायनामाईट कालबाह्य होईल, नवीन स्फोटके येत राहतील... पण "नोबेल पारितोषिक" कायम राहतील.. आणि आल्फ्रेड नोबेलला कुणी "मृत्यूचा सौदागर" म्हणणार नाही...
#richyabhau
#nobel
Great
ReplyDelete😍🙏
Delete