शुक्र.. पृथ्वीचा जुळा भाऊ
शुक्र.. पृथ्वीचा जुळा भाऊ
"शुक्रतारा मंदवारा" हे गीत असू द्या किंवा "उगवली शुक्राची चांदणी...." चंद्र आणि सुर्य नंतर कोणत्याही आकाशस्थ ग्रहगोलाचा उल्लेख अनेकदा गीत, कविता यांच्यामध्ये झाला असेल तर तो या शुक्राचा... कारण पण तसेच आहे म्हणा... सूर्य आणि चंद्र याच्यानंतर आकाशामध्ये सर्वात तेजस्वी असणारी वस्तू म्हणजे शुक्र.. जगभरातील सर्व संस्कृतींना आणि त्यातील कलाकारांना या शुक्राच्या ताऱ्याने भुरळ घातली आहे. ग्रह असून ताऱ्याचा मान मिळवणारा हा एकटाच😀
पृथ्वीचा हा जुळा भाऊ... जुळा यासाठी की आकार, वस्तुमान, घनता या सर्वांच्या बाबत पृथ्वीशी त्याचे कमालीचे साम्य आहे. याचे घनफळ पृथ्वीच्या घनफळाच्या ९२%, वस्तुमान पृथ्वीच्या ८२% , सरासरी घनता पृथ्वीच्या ९४%, गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या ८६% आहे. त्याचा पृष्ठभाग देखील पृथ्वीप्रमाणे खडकाळ आहे. पृथ्वीशी त्याचे एवढेच साम्य बरका... बाकी दोघांच्या स्वभावात हिंदी पिक्चर मधल्या जुळ्या भावांच्या स्वभावात असतो तसा बदल आहे. यावर वातावरण कार्बन डाय ऑक्साईड चे. (९६%) आणि पाऊस पडतो सल्फर डाय ऑक्साईड चा. आणि सर्वात विशेष म्हणजे याचे वर्ष संपते तरी एक दिवस संपत नाही.. 🤣
शुक्र पृथ्वीवरील २४३ दिवसांत स्वतभोवती तर २२५ दिवसांत सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करतो. कसला मंद आहे ना😂 पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमण कक्षेच्या आत असल्याने आपल्याला शुक्र सूर्यापासून जास्तीत जास्त ४७° पर्यंत दूर दिसू शकतो. सूर्योदयापूर्वी पूर्व आकाशात शुक्र उगवणार असेल तर त्याला ‘पहाटतारा’ म्हणतात.. सूर्यास्तानंतर ‘सायंतारा’ म्हणून.... आणि त्याच्या सौंदर्याचे प्रदर्शन केवळ तीन तास.... दिवसातून एकदा... पहाटे किंवा संध्याकाळी....
जुन्या काळातील लोकांना सकाळचा व सायंकाळचा असे दोन वेगळे तारे आहेत असे वाटायचे. ग्रीकांनी त्यांना फॉस्फरस किंवा ल्यूसिफर (पहाटतारा) आणि हेस्पेरस (सायंतारा) अशी नावेही दिली होती परंतु पायथ्यागोरस बाबाने हे रामप्रसाद आणि लक्ष्मणप्रसाद दोन्ही एकच आहेत असे पटवून दिले. मग काय.... इतके दिवस वेडे बनवले म्हणून लोकांनी त्याचे लिंग बदलले..😬 प्रेम आणि सौंदर्य यांकरिता प्रसिद्ध असलेल्या रोमन देवतेवरून या ग्रहाला व्हीनस हे नाव पडले. “व्हेनिया” म्हणजे व्हीनस... देवाची दया
शुक्र हा सौरकुटुंबातील एकमेव ग्रह, ज्याचे नाव मादी देवतेवरून ठेवण्यात आले आहे. फ्रेया (फ्रायडे जिच्या नावामुळे आला) ही नॉर्स संस्कृतीत "लग्न आणि संततीची देवी." सुमेरियन संस्कृतीत "इनान्ना" तर बाबिलोयीन संस्कृतीत "इश्टार" ही देवी युद्ध आणि प्रेमाची. ( युद्ध आणि प्रेम काय संबंध.. पण आपल्याकडे नाही का एका पेक्षा जास्त महत्त्वाची खाती स्वत:कडे घेणारे मंत्री असतात... तसे असेल..) कदाचित युद्धात आणि प्रेमात सारे माफ ही म्हण हीच्यामुळेच सुरू झाली असेल.. फाईल एकाच टेबल वर जाणार ना😂
भारतात मात्र हीरोची हेरॉईन नाही झाली.. चक्क व्हीलन झाला.. बाकी सगळ्या ग्रहांची नावे देवावरून मात्र हा एकच "असुर.." कदाचित बाकी सगळे फिरतात त्याच्या उलट दिशेने हा फिरतो म्हणून असेल.. सुरांच्या (देवांच्या) "सुरात सूर" मिसळला नाही म्हणून हा "असुर" .. दैत्यगुरू शुक्राचार्य.. आपला भाचा "बळीराजाने" वामनाच्या बोलण्याला फसून दान देऊ नये म्हणून झारी मध्ये शिरून पानी थांबवताना स्वतःचा एक डोळा फोडून घेणारा..एक डोळ्याचा शुक्राचार्य..... संजीवनी विद्या अवगत असलेला.. पुराणातील माझे आवडते पात्र..
शुक्र हा भृगू ऋषींचा पोरगा भार्गव.. आई दिव्या ही हिरण्यकश्यपू ची पोरगी.. (त्या प्रल्हादची बहिण ज्याला बापापेक्षा नारायण आवडत होता.) एकदा देवांचा गुरू बृहस्पती याचे आणि इंद्राचे चांगले वाजले होते. त्यामुळे यज्ञाचे पौरोहित्य कोण करणार हा प्रश्न उद्भवला.. शुक्र बोलला मी करतो.. इंद्र बोलला नाय.. तुझी आई राक्षस.. शुक्र बोलला बाप तर भामन आहे की.. तरी इंद्राने काय ऐकले नाही.. मग शुक्र गेला राक्षसांकडे.. जिथे त्याचे स्वागत झाले..संजीवनी विद्या मिळवून वापरणे या अटीवर त्याचा झाला दैत्यगुरू शुक्राचा.. आणि पुढचा इतिहास आपल्याला माहीत आहेच त्याने इंद्राची आणि देवांची कशी ठासली🤣
त्याचे नाव भार्गव होते, ते शुक्र कसे झाले याचा पण किस्सा भारी... शंकर कडून तपश्चर्या करून संजीवनी विद्या शिकले होते.. त्यामुळे सगळे देव त्याचे दुश्मन.. मग त्यांनी शंकराच्या नंदीला पुढे केले... बैलच तो... लगेच धावला..... शुक्रला तोंडात उचलले.. आणि शंकराकडे नेले.. शंकराने तो नंदीचा उष्टा शुक्र गिळून टाकला.. लोकांना वाटले किस्सा खतम.. पण शुक्र शंकराच्या लघवी मधून बाहेर पडला.. नंतर त्याचे नाव शुक्र पडले असावे असे मला वाटते. शुक्रजंतू किंवा शुक्राणू हा शब्द कुठून आला यावर ही शक्यता जास्त पटते.. जीवन आणि संजीवन हा सामाईक धागा..(कुणाला वेगळी माहिती असेल तर स्वागत🙏🏽)
जीवन किंवा जीवसृष्टी शुक्र ग्रहावर असणे मात्र शक्य नाही.. कारण त्याचे प्रचंड तापमान, आम्लवर्षा आणि वातावरण... अब्जावधी वर्षांपूर्वी जेव्हा सूर्य आताच्या पेक्षा कमी गरम होता.. तेव्हा शुक्रावर उष्ण पाण्याचे महासागर असावेत. त्या वेळेस जीवसृष्टी अस्तित्वात आली असण्याची धूसर शक्यता अस्पष्ट आहे. मंगळ आणि शुक्र आपल्यापासून समान अंतरावर असले तरी आपण दुसरे घर म्हणून मंगळाचा विचार करू शकतो शुक्राचा नाही...
"दुरून डोंगर साजरे" या उक्तीचा प्रत्यय शुक्रवर तंतोतंत येतो. अजिबात देखणा नाही हा.. 😬 एफबी प्रोफाइल वर साऱ्या जगात सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या ग्रहाचे आधार कार्ड पाहिले तर पृष्ठभागावर, शक्तिशाली ज्वालामुखी सतत फुटत असतात.. वातावरण काजळी आणि सल्फरच्या लाल रंगाच्या संयुगांनी गच्च भरलेले असते. आपल्याला "चमकीला" दिसणारा हा ग्रह केवळ लाल आणि काळा.. अॅसिडचा पाऊस पडतो, पण थेंब खाली पोचण्याच्या आधी त्याची वाफ होते एवढा गरम हा शुक्र.. सूर्यमालेतील सर्वात गरम ग्रह.. हो.. बुध जरी सूर्याजवळ असला तरी त्यापेक्षा जास्त उष्ण शुक्र असतो. सूर्याच्या जवळ असल्यामुळे बुधचे वातावरण नष्ट झाले अाहे. त्याला उष्णता धरून ठेवता येत नाही. म्हणून दिवसा ४२७°, तर रात्री -१७६° एवढी तफावत बुधवरच्या तापमानात असते.
शुक्राचे वातावरण कार्बन डायअाॅक्साइडने बनलेले अाहे. हे ग्रीनहाऊस गॅसेस उष्णतेला बाहेर जाण्यापासून अडवतात. त्यामुळे सूर्याची उष्णता शुक्राच्या वातावरणात येते मात्र बाहेर पडत नाही.. नो आउटगोइंग.. शुक्र भट्टीसारखा तापत असतो.. दिवसापण आणि रात्रीपण.. तापमान ४६२° सेल्सियस.. कार्बन डायॉक्साईडचे दाट वातावरण असल्याने सूर्याचा शुक्रावर पडलेला प्रकाश मोठ्या प्रमाणात परावर्तित होतो. म्हणून तर शुक्र आपल्याला इतर ग्रहांपेक्षा अधिक तेजस्वी दिसतो. आणि लोक त्याच्या प्रेमात पडतात😍🤣
शुक्राचे सूर्यावर अधिक्रमण ही घटना लय भारी असते.. पृथ्वीच्या आणि सूर्याच्या मध्ये शुक्र येतो.. चेहऱ्यावर तीळ असावा तसा सुर्य दिसतो. अर्थात चष्मा लावून पाहायचे असते. पण असे सव्वाशे वर्षातून दोन वेळाच घडते.. जे आता २००४ आणि २०१२ साली घडून गेले आहे...😔 सहा जून २०१२ रोजीचे मी पाहिले होते.. कोवळ्या सूर्याच्या केशरी रंगाच्या पार्श्वभूमीवर शुक्राचा काळा ठिपका.. आता अजून ९७ वर्षांनी म्हणजे ६ डिसेंबर २११७ रोजी येणार आहे. तेव्हा आपल्यापैकी एकजण तरी असावा जिवंत आणि त्याने माझी आठवण काढावी😍🙏🏽
शुक्र जेव्हा सूर्याच्या अगदी मागे जातो तेव्हा काही दिवस दिसत नाही.. त्याला "शुक्रास्त" असे म्हणतात. याचे शुक्राचे चक्र ५८४ दिवसांचे असते.. दर ५८४ दिवस म्हणजे १९.५ महिन्यांच्या काळात सूर्य ९ महिने पहाटे आणि ९ महिने संध्याकाळी दिसतो. मध्ये १०-४५ दिवसात तो दिसत नाही. याचे गणित थोडे अनियमित असते पण जोतिशी मंडळी थोडीच सोडतात.. शुक्रास्त म्हणजे लग्नाचा प्रतिकूल काळ.. लग्न होणार नाही, काढीव मुहूर्त उपाय असतो म्हणा....ते जाऊ द्या... या कोरोना काळात ३० मे ते १० जून या काळात शूक्रास्त होता.. तेव्हा जोतीश्यांनी मार्च मध्येच घोषित केले की ८ जून रोजी उगवणारा शुक्र हाच कोरोना वर उपाय असेल.. त्यांना वाटले तोवर सगळे ठीक होऊन जाईल😬😬😬 आता मात्र तोंड लपवून बसले आहेत.😡
चंद्राप्रमाणे बुध आणि शुक्र ग्रहाच्या देखील कला दिसतात. बुध अंधुक असतो त्यामुळे मजा नाही.. मात्र शुक्राच्या कला भारी एकदम..पौर्णिमा, अमावस्या, कोर... उघड्या डोळ्यांनी नाही दिसत.. पण महागडा telescope पाहिजे असे पण काही नाही.. साध्या दुर्बिणी मधून पण या कला दिसतात. शुक्र सूर्याच्या मागे असताना संपूर्ण दिसतो. पौर्णिमा सारखा. तर समोर पृथ्वी आणि सुर्यमध्ये आल्यावर अमावस्या... या मधल्या काळात त्याचे रूप बदलत जाते टप्प्याटप्प्याने... सगळ्यात पहिल्यांदा १६१७ मध्ये गॅलिलीओने स्वतःच तयार केलेल्या दुर्बिणीमधून शुक्राच्या कला पाहिल्याची नोंद आहे.
शुक्र निरीक्षणाचे सर्वात जुने रेकॉर्ड ३६०० वर्षांपूर्वीचे आहे.. माया संस्कृतीत शुक्राचा व्यवस्थित अभ्यास करून २१ वर्षाच्या त्याच्या स्थितीच्या नोंदी ठेवल्या आहेत. ज्या आजही पाहायला उपलब्ध आहेत. शुक्राच्या ५८४ दिवसांच्या चक्राचा देखील त्यांना शोध लागल्याचे दिसून येते. दिवसाच्या शंभराव्या भागापर्यंत अचूक कालगणना करणाऱ्या माया संस्कृतीने शुक्राधारित कॅलेंडर बनवले होते.
गॅलिलिओने शुक्राच्या कला दाखवून कोपर्निकसच्या सुर्यकेंद्री सिद्धांताला पुष्टी दिली होती.. जेव्हा अंतराळात याने पाठवायची सुविधा उपलब्ध झाली तेव्हा अर्थातच या तेजस्वी ग्रहाचे सर्वात जास्त कुतूहल होते. १९६१ पासून आजपर्यंत शुक्रावर मानवीय अवकाशयानांनी ४३ वेळा स्वारी केली आहे. ३२ वेळा रशियन, १० वेळा अमेरिकन आणि जपानी मंडळींनी एकदा... रशियन यान शुक्रावर सर्वात पहिल्यांदा उतरले.. चौथ्या प्रयत्नात... पण ते पण केवळ एक तास टिकू शकले.. आम्लांनी आणि प्रचंड उष्णतेने त्या यानांचे नुकसान होत जाते. मात्र जुन्या चुकामधून शिकत नवीन प्रयोग सुरूच राहिले.
रशियाच्या व्हेनेरा मालिकेत सोळा याने पाठवण्यात आली आहेत. त्यांना शुक्राच्या पृष्ठभागाचे व वातावरणाचे तपशील मिळवण्यात यश आले. नासाच्या पायोनियर–१० व इतर अवकाशयानांनी १९७५ ते १९८४ या काळात शुक्रावरील सु. ३,००० छायाचित्रे घेतली व पृथ्वीकडे पाठवून दिली. नासाच्या मॅगेलन या अवकाशयानाने १९९२ अखेर जवळजवळ ९८% पृष्ठभागाचे नकाशे तयार केले. या मॅगेलन चित्रण मोहिमेमुळे शुक्रावरील एकमेव गोलाकृती ज्वालामुखी आणि भूसांरचनिक पद्धती यांसंबंधी माहिती मिळाली आहे. मधल्या काळामध्ये युरोपीय अवकाश संस्थेने देखील शुक्रावर यशस्वी रित्या व्हिनस एक्स्प्रेस या नावाने यान पाठवले आहेत. जपान ने २०१० साली पाठवलेले "अकाटसुकी" या यानाची मोहीम सुरू असून सदर यान डिसेंबर २०२० पर्यंत शुक्राच्या कक्षेभोवती फिरून माहिती गोळा करीत राहील.
आपल्या इस्रोने शुक्रग्रहावर २०२३ साली "शुक्रयान" पाठवण्याचे नियोजन केले आहे. असे झाले तर शुक्रावर स्वारी करणारी इस्रो ही जगातील पाचवी संस्था होईल. शुक्र ग्रहावरील वातावरण, शुक्र आणि पृथ्वी यांच्यातील साम्यस्थळे, विविध थर, वातावरण, सूर्याशी असणारा संबंध या सगळ्यांबाबत या मोहिमेत अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये फ्रान्स ने देखील आपला सहभाग देऊ केला आहे. ही मोहीम यशस्वी झाली तर इस्रोसाठी खूप मोठी बाब असणार आहे.👍🏼✊🏾
तर आपण पाहतोय की सर्व ग्रहांवर आपण याने सोडत आहोत.. आणि त्याच वेळेस कुंडलीत मात्र त्यांना स्थान देत आहोत. कारण आपण प्रश्न विचारत नाही.. जोतीषी म्हणाला, बुध, राहू, शनी हे शुक्राचे मित्र आहेत.. आपण मुकाट्याने मान डोलवतो.. शुक्र मंगळ हे एकमेकाचे दुश्मन... आपण म्हणतो हो असतील..अरे कुणी पाहिले त्यांना भांडताना...आपण फसतो कारण आपण ग्रह उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही पाहिलेले नसतात. शुक्र आजवर नसेल तर आज पाहा नक्की... आज रात्री तीन नंतर उगवेल आणि तांबडे फुटेपर्यंत आपण त्याला पाहू शकतो...
सोबतच्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसते आहे.. स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी चिन्हे आहेत का.. हो तीच आहेत.. पण ही कुठून आली माहीत आहे का... त्यातली स्त्री आहे शुक्र आणि पुरुष आहे मंगळ.. ग्रीस व रोमन पौराणिक कथेच्या काळात मंगळ व शुक्र यांची ही चिन्ह पहिल्यांदा दिसून येतात. शुक्राच्या चिन्हाला "शुक्राचा आरसा" देखील म्हटले जाते, हे चिन्ह स्त्रीत्व आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. मंगळाच्या चिन्हास दिसताच “मंगळाची ढाल व भाला” असे म्हणतात. या दोन्ही चिन्हांचा एकत्र वापर स्त्री पुरुष प्रेम दाखवण्यासाठी करतात. अगदी माया संस्कृतीत शुक्राची नोंद घेताना हेच चिन्ह वापरले आहे...
तर असा हा शुक्र... आपला सख्खा शेजारी.. आणि पृथ्वीचा जुळा भाऊ...... त्याची माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा.. या आधी मंगळ, बुध, गुरू, शनी यांच्यावर पोस्ट लिहिल्या आहेत.. नसतील वाचल्या तर टाका एक नजर🙏🏽...ही पोस्ट शेवटपर्यंत वाचल्या बद्दल... शुक्रीया.. शुक्रीया 😀🙏🏽🙏🏽
#richyabhau
खूप सुंदर माहिती.. मला या पोस्ट्स चा माझ्या क्लास साठी खूप छान उपयोग होतोय. मुलं पण खुष!!
ReplyDeleteक्या बात है... पोस्ट चा उद्देश सफल😍🙏
Delete