जॉर्ज बर्नार्ड शॉ.. द शोमॅन..
जॉर्ज बर्नार्ड शॉ.. द शोमॅन..
नोबेल आणि ऑस्कर असे दोन्ही पुरस्कार मिळवलेला हा लेखक... शेक्सपियर नंतर नाव घेतला जाणारा जागतिक दर्जाचा नाटककार..समाजवादाचा खंदा समर्थक, साहित्य आणि संगीत यांचा समीक्षक..असा पत्रकार ज्याच्या लेखनाचे आजही संदर्भ वापरले जातात... एक द्रष्टा तत्ववेत्ता... शासनाच्या युद्धनीतीचे जाहीर वाभाडे काढताना आपली लोकप्रियता पणाला लावणारा रंगकर्मी ..
६२ नाटके, १० कादंबरी, ३३ सामाजिक निबंध, १२ समीक्षण निबंध.. ज्यांचे जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. "शॉ चे यावर काय म्हणणे होते" हे वाक्य जगात कोणत्याही देशात, कोणत्याही विषयासाठी वापरले जाते असा हा "दिग्गज.." लहानपणी उपेक्षिताची भावना घेवून जगणारा एक लहान मुलगा नंतर जगात कुठेही चालणारे "बर्नार्ड शॉ" हे हुकुमी नाणे होणे... हा प्रवास खूप प्रेरणादाई आहे.
२६ जुलै १८५६ रोजी डब्लिन,आयर्लंड येथे एका किराणा मालकाच्या घरात शॉ जन्माला आला. दोन बहिणींच्या पाठीवर... त्याचा बाप जॉर्ज कार शॉ म्हणजे अगदी बोरिंग माणूस.. मुलकी खात्यातील नोकरी सोडून दुकान थाटले.. आणि दारूच्या नादात फुल्ल गाळात गेला. आई ल्युसिंडा एलिझाबेथ शॉ मात्र खूप महत्वकांक्षी.. तिचे मोठी गायिका व्हायचे स्वप्न. त्या नादात तिची जॉर्ज जॉन ली या संगीतकर्मिशी जास्तच घसट..एवढी की ली हाच आपला बाप असावा या शंकेने शॉ ची पौगंडावस्था ग्रासली गेली होती. त्यात काही दिवसानंतर ली आणि शॉ कुटुंबीय एकाच घरात राहायला लागले.
शॉचे शालेय जीवन पण खूप त्रासदायक असावे. कारण त्याच्या चार शाळा बदलून झाल्या. शाळा म्हणजे पालकांना पोरांपासून दिवसातील काही तास मोकळीक मिळावी म्हणून केलेला तुरुंग आहे असे शॉ म्हणतो. आईने मात्र या काळात त्याला कला गुणांशी ओळख करून देऊन त्यांची जोपासना कशी होईल यासाठी जाणीव पूर्वक प्रयत्न केलेले दिसतात. शॉ लवकरच पियानो वाजवायला शिकला. शिक्षण मात्र थांबले ते थांबलेच...😔
एकीकडे बेवडा बाप जो काय कामाचा नाही... आणि एकीकडे आई.. लीकडून पैसे घेऊन गरजा पूर्ण करते. आई चांगली पण तिची लीसोबतची घसट त्यावयात शॉची घुसमट करत होती.. यासर्वांचा परिणाम होऊन शॉ खूप अंतर्मुख झाला. शालेय शिक्षण पूर्ण करून १५ व्या वर्षी कारकुनी नोकरी पत्करून खर्डेघाशी करायला लागला. यावेळी कुणी शॉ ला पाहिले असेल..तर तो विश्वास ठेवू शकणार नाही की हे पोरगं एवढ मोठ नाव काढील. मानेवर खडा ठेवून अशी खर्डेघाशी करत होता की लवकरच त्याचे प्रमोशन पण झाले.
१८७३ मध्ये जॉर्ज ली इंग्लंडला शिफ्ट झाला, आणि शॉची आई दोन बहिणींना घेऊन त्याच्यामागे.. शॉला हे नाही आवडले.. तो आपल्या दारुड्या बापाची सेवा करत राहिला. मात्र दोन वर्षाने एक बहिण क्षयरोग होऊन वारली. तिच्या अंत्यसंस्कारसाठी वीस वर्षाचा शॉ मायानगरी लंडनला जो गेला..... तो तीस वर्ष पुन्हा आयर्लंडला आलाच नाही.
लंडन मध्ये येऊन करणार काय.. शिक्षण तर अर्धवट.. मात्र त्याने ठरवले होते की.. आयुष्यात काय बनायचे तर लेखकच ... काही दिवस आईने आर्थिक आधार दिला त्याकाळात....... शॉ ब्रिटिश लायब्ररी (तेव्हाचे ब्रिटिश मुजीयम) मध्ये अनेक विषयांचा अभ्यास करून बहुश्रुत झाला. लाजरा-बुजरा असलेला शॉ स्वतःची क्षमता वाढवत धीट, बेधडक होऊ लागला. जीवनाला आव्हान द्यायचा विश्वास त्याच्यात जागायला लागला. जॉर्ज हे नाव त्याने टाकून दिले.. आता तो केवळ "बर्नार्ड शॉ" म्हणून ओळखला जाऊ लागला.
लेखकच व्हायचे का ठरवले यावर शॉ म्हणतो की हा एकच पेशा असा आहे की ज्यात कसलेही कपडे घातले तरी चालते. डॉक्टर, वकील, कलाकार झालो की स्वच्छ कपडे घालून छान राहावे लागले असते. साहित्यिक जेव्हढा गबाळा तेवढे भारी असे लोक समजतात🤣 (मी कुठेतरी ऐकले होते की भेळ वाला जेवढा मळकट, तेव्हढी भेळ भारी.. ज्याचा अनुभव पुण्यात बाजीराव रोडला नुमवि पाशी मी घेतला आहे😂)
लेखक होणे सोपे थोडीच असते.. त्यात हा नुकताच मिसरूड फुटलेला, अर्धवट शिकलेला पोरगा..एक नाटक आणि एक कादंबरी प्रकाशकांकडून साभार परत आलेली...😔 आईकडून किती दिवस पैसे घेणार.. यावेळी त्याचा मानसबाप ( हा शब्द भारी😜) ली धाऊन आला. ली शॉला पैसे देऊन त्याच्याकडून संगीत समिक्षेचे लेख लिहून घ्यायचा... आणि स्वतःच्या नावाने छापायचा. लोकांना ते लेख आवडायचे.. आपण चांगले लेखक आहोत हे यामधून शॉ समजून चुकला.
त्याने कादंबरी नाटके लिहणे सुरूच ठेवले. "साभार परत" चे दुष्टचक्र काही पिछा सोडत नव्हते. नऊ वर्ष लिखाण करून केवळ सहा पौंड कमाई त्याने केली होती. दुसरे कोणी आशा सोडून पळून गेले असते. मात्र या खडतर परिस्थितीत निश्चयाने तोंड देत भाऊ टिकून राहिला. इथे त्याने जरा डोके चालवले. बुद्धिमंतांची कुठे चर्चा सुरू असेल तर त्या चर्चांमध्ये बिन बुलाये घुसून असा बोलायचा की आपल्या उपस्थितीचा ठसा उमटला पाहिजे.
हेन्री जॉर्ज यांचे व्याख्यान ऐकून शॉ समाजवादाकडे वळला. फेबिअन सोसायटी या समाजवादी संघटनेच्या पाक्षिक बैठकीला न चुकता जाऊ लागला.. आणि लवकरच तिचा प्रमुख आधारस्तंभ बनला. हीच संघटना पुढे मजूर पक्षात रूपांतरित झाली. (१९४५ मध्ये झालेल्या निवडणुकीत भारताला स्वातंत्र्य देण्याचे यांच्या जाहीरनाम्यात होते.. आणि सत्तेवर आल्यावर या पक्षाने त्याची पूर्तता केली पण)
शॉने महिलांना,कामगार वर्गाला उचित हक्क मिळावा म्हणून हिरीरीने प्रयत्न केले. शिक्षण, विवाह, धर्म, सरकार, आरोग्य आणि श्रमिकवर्गाच्या शोषणावर शॉने लिखाण आणि भाषण यातून आवाज उठवला आहे. त्यांचे जवळजवळ सर्व लेखन प्रचलित सामाजिक समस्यांवर होते, परंतु त्याला एक विनोदाची झालर होती. त्यामुळे ते रोचक होई.
इंग्लंडमध्ये योग्य त्या सामाजिक, आर्थिक सुधारणांमधून हळूहळू साम्यवाद यावा अशी इतर फेबिअन समाजवाद्यांप्रमाणे शॉची धारणा होती. आधी शॉ ने राजकारणात खूप वेळ दिला मात्र एकदा लेखनात यशाची चव चाखली.. आणि सक्रिय राजकारणासाठी शॉ वेळ देऊ शकला नाही. पहिल्या महायुद्धाच्या वेळी आंधळ्या देशभक्तीचा देशात पसरलेला उन्माद त्याला मान्य नव्हता. त्यावर लिहिलेल्या "कॉमनसेन्स" वर बरीच टीका झाली. शॉ ची देशद्रोही म्हणूनही संभावना झाली. (इंग्लंडची लोक परवडली.. भारतात असे काय बोलले असते तर पाकिस्तान ला रवानगी फिक्स😂 हा तर मुळचा आयर्लंड चा... नक्कीच पाठवले असते मायदेशी.)
शॉच्या काळी सर्वच नाटककरांवर इब्सेनचा मोठा प्रभाव होता... शॉ वर देखील. त्याचा अभ्यास करून "क्विटेसन्स ऑफ इब्सेनिझम" हे पुस्तक शॉ ने लिहले आहे. शॉच्या नाटकांनी इब्सेनची परंपरा ब्रिटिश रंगभूमीवर पुनर्जीवित केली. "शेक्सपिअरचा भव्यदिव्य नाट्यआविष्कारापेक्षा इब्सेनचे साधे सामाजिक नाटक जास्त महत्त्वाचे" अशा आशयाचे उद्गार शॉने काढलेले आहेत. नाटके लिहीत असताना शॉ ठरवून सामाजिक मांडणी करत होताच. प्रत्येक नाटकाला प्रस्तावना जोडून नाटक लिहिण्यामागे असलेला सामाजिक हेतू शॉ ने स्पष्ट केला आहे.
काय लिहिले यापेक्षा कुणी लिहिले हे नेहमीच पाहिले जाते. साहजिकच "समाजवादी शॉ" च्या लेखनाला विरोधी रंगाच्या समिक्षकांकडून स्वागतार्ह प्रतिसाद मिळणे कठीण होते. समीक्षक तर नेहमी खिजवायचे की "शॉची नाटके विनाकारण एक तास लांबलेली असतात." शॉने यांना हिंग लावून पण विचारले नाही. 🤣 लिखाण सुरू केल्यानंतर तब्बल सोळा वर्षांनी १८९४ साली त्याने यशाची चव पहिल्यांदा चाखली. प्रेम आणि युद्ध यामध्ये एका सैनिकाची गोची हा विषय घेऊन आलेले "आर्मस अँड द मॅन" हे नाटक गाजले आणि शॉ ला भरपूर आर्थिक प्राप्ती झाली.
सैनिक म्हणजे देशभक्तीची उत्कट भावना असे आजवर दाखवण्यात येते. मात्र या नाटकात शॉने पोटासाठी सैन्यात गेलेल्या आणि प्रेयसीसाठी झुरणाऱ्या सैनिकाची मानवी बाजू दाखवली आहे. युद्धज्वराच्या उन्मादी वातावरणाची सवय असलेल्या काही समीक्षक आणि प्रेक्षकांना ते रुचणार नव्हते. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचे वेळचा एक किस्सा आहे. प्रयोग हाऊसफुल.. आणि रंगला पण मस्त. प्रयोग संपल्यानंतर लेखक अभिवादनासाठी खाली वाकला आणि प्रेक्षकांमधून एक जण ओरडला "मूर्ख". हजरजबाबी शॉ लगेच म्हणाला "तू म्हणतोस ते मला पण पटते. पण इतक्या जास्त प्रेक्षकांविरुद्ध आपण दोघे काही करू शकत नाही" संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळ मध्ये बुडाले. 🤣 "हे नाटक जर सत्ताधीशांनी पाहिले असते तर पहिले महायुद्ध झालेच नसते" असे देखील शॉ म्हणायचा.
नंतरच्या काळात शॉची ‘मिसेस वॉरेन्स प्रोफेशन’, ‘सेंट जोन’, ‘सीझर अँड क्लिओपात्रा’, ‘हार्टब्रेक हाउस’, ‘मेजर बार्बरा’, ‘मॅन अँड सुपरमॅन’, ‘दी डॉक्टर्स डिलेमा’, ‘अँड्रोक्लस अँड दी लायन’ इत्यादी नाटकं गाजली. या सर्वात मनोरंजनासोबत सामाजिक संदेश होताच. शॉ यांनी ‘डॉक्टर्स डायलेमा’ या नाटकात वैद्यकीय व्यवसायातील हपापलेपणाचे चित्रण केलं आहे. या नाटकाच्या प्रस्तावनेत शॉ ने पुढील वाक्य लिहिलं आहे.. ‘एखाद्या पेशंटच्या बोटाची जखम ड्रेसिंग करून जर डॉक्टरला पन्नास रुपये मिळत असतील, आणि हात तोडून पाच हजार मिळत असतील तर डॉक्टर हातच तोडेल का जखम बरी करील😬?’
शॉ समाजाचे चित्रण करत असताना साहजिक नकारात्मक बाजू पुढे येणे आणि नाटकांचे बोचरे असणे अपरिहार्य आहे. आपली तेंडुलकरची नाटके पाहताना वाटते तशी अस्वस्थता या बोचऱ्या नाटकातून येते. शोषण होणारे आणि करणारे यांच्यात अतिशय अंधुक रेश असते. शोषणावर आधारलेल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये स्वत:ला निरपराध समजणारेही त्या शोषणात अजाणतेपणे कसे सहभागी झालेले असतात याचे चित्रण शॉने त्याच्या "विडोअर्स हाउसेस" आणि "मिसेस वॉरेन्स प्रोफेशन" या दोन्ही नाटकात केले आहे. काही क्रियाशुन्य लोकांना फुकटचे बुद्धिमंत म्हणवून घेणे खूप आवडते, अश्या लोकांचा मुखवटा काढायचे काम "फिलॅंडर" नाटकात करतो. स्त्री-पुरुषांचे नाते, विवाह ह्यांसंबंधीचा वेगळा पैलू "मॅन अँड सुपरमॅन" या नाटकात शॉ विनोदी अंगाने मांडतो.
शॉ चे सर्वांत गाजलेलं आणि जगभर पोचलेले नाटक म्हणजे ‘पिग्मॅलिअन’. समाजातील वर्गव्यवस्थेच्या मुळाशी असणऱ्या श्रेष्ठ-कनिष्ठतेबाबतच्या राहणीमान, प्रमाण भाषा आदी निकषांचा बाजार उठवत हसतहसत समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम शॉने "पिग्मेलियन" नाटकात केले. या नाटकावर "माय फेअर लेडी" नावाने दोन चित्रपट निघाले. या नाटकाला पु. ल. देशपांडे ह्यांनी "ती फुलराणी" ह्या नावाने मराठीत असे रूपांतरित केले की ते मूळचे परदेशी नाटक आहे असे वाटतच नाही.. आणि भक्ती बर्वे यांनी फुलराणी अमर केली😘😘
शॉच्या नावावर पण खरे-खोटे अनेक किस्से आहेत. त्याला एका महिलेने मेजवानी ला बोलावले होते. नेहमीच्या कपड्यात शॉ त्या महिलेच्या घरी गेला. मात्र बाई भडकली. कपडे बदलून आलास तर घरात घेईल.. मोठी मोठी लोक आले आहेत.. आणि तू असा भिकाऱ्यागत😡 शॉ चे ऐकायला तयार नव्हती. नाइलाजास्तव शॉ कपडे बदलून आला. जेव्हा पार्टी सुरू झाली तेव्हा शॉने आईसक्रीम आणि अन्य खाद्य पदार्थ कपड्यांवर पसरवले. सगळे उपस्थित चकीत 😬 शॉ बोलला "या मेजवानीचा हक्क मला नाही या कपड्यांना आहे".🤷🏿♀️ कोणत्याही व्यक्तीची पारख त्याच्या कपड्यावरून करू नये. भाऊ लेखक झाला गबाळे राहायला.... गबाळे राहण्यात धन्यता मानणाऱ्यांना त्यांचा आनंद घेऊन द्यावा हेच खरे😀
चिमटे काढायला शॉ वस्ताद.. आता हेच वाक्य पाहा ना.. “काही लोक वर्षामध्ये दोन किंवा तीनपेक्षा जास्त वेळा विचार करतात; आठवड्यातून एकदा किंवा दोनदा विचार करतो म्हणून मला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळते."🤣🤣 कधी कधी चिमटा काढताना सहज सोप्या शब्दात असे तत्वज्ञान सांगून जातो की थक्क व्हायला होते. खूप खोल... त्याच्या नाटकात एक संवाद आहे, एक पात्र दुसऱ्याला विचारतं,‘अरे, अमेरिकेमधल्या व्यक्तिस्वातंत्र्याची (लिबर्टी) काय सद्यस्थिती आहे.' दुसरा उत्तरतो, 'त्यांनी तिचा पुतळा बनवलाय!' 😬😬 आपण पण भारतात नुकताच "एकतेचा पुतळा" उभा केला आहे😔😔
शॉ चे एक वाक्य आहे, “संवाद घडला असल्याचा आभास तयार करणे, ही संपर्क साधण्यामधील सर्वात मोठी अडचण आहे.”शॉ जे सांगत होता त्याचा आज आपल्याला "मन की बात" असो किंवा "अक्षय कुमारने घेतलेली अराजकीय मुलाखत.." पदोपदी प्रत्यय येत आहे.😔 काही लोकांचे काम कमी.. मात्र दिखाऊ पणावर जास्त भर असतो... या विसंगतीवर बोट ठेवताना शॉ म्हणतो “एका तुरूंगापाशी शिलालेखावर छान लिहिलेले होते.. "वाईट करणे थांबवा: चांगले करण्यास शिका" परंतु शिलालेख बाहेरच्या बाजूस असल्याने कैद्यांना ते कधी वाचता आले नाही. ”🤣🤣
सेंट जोन हे नाटक जेव्हा खूप गाजत होते तेव्हा एका कार्यक्रमामध्ये शॉला विचारले की त्याने कॅथोलिक धर्म स्वीकारला आहे का? शॉ चटकन म्हणाला, “रोमन कॅथोलिक चर्चच्या व्यवस्थेत दोन पोपांना जागा नाही.🤣🤣” अर्थात कधी तरी शेराला सव्वा शेर मिळतो. मजूर पक्षाच्या समर्थक शॉने हुजुर पक्षाच्या चर्चिलला पत्र लिहिले, ”माझ्या नव्या नाटकाच्या पहिल्या खेळाची दोन तिकीटे सोबत पाठवीत आहे; एखाद्या मित्राला सोबत घेऊन यावे ….. जर कोणी मित्र असलाच तर" पंतप्रधान चर्चिल पण कडू होता.. त्याने उत्तर पाठवले,”पहिला खेळ पाहणे जमणार नाही. दुस-या प्रयोगाची दोन तिकिटे पाठवावी.. जर कधी तो होणार असेल तर.”🤣🤣
एकदा रस्त्याने जात असताना शॉला रद्दीच्या दुकानात त्याने लिहीलेले पुस्तक दिसले. कुतूहल म्हणून त्याने चाळून पाहिले तर हे पुस्तक "सप्रेम भेट" आणि सही करून त्याने एका मित्राला गिफ्ट केले होते.😡 दुसरा एखादा असता तर किती राग आला असता.... पण आपल्या भाऊने ते पुस्तक विकत घेतले... त्याच्यावर "अपडेटेड प्रेमासह" असे लिहून पुन्हा त्याच मित्राला पाठवले.🤣🤣 मोठी लोक उगाच नाही मोठी होत..😀
शाकाहाराचा समर्थक असलेला शॉ म्हणतो "व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही खाणारा एखादा माणूस आजारी असतो तेव्हा प्रत्येकजण त्याला खात्री देतो की तो बरा होईल.👍🏼 मात्र जेव्हा शाकाहारी व्यक्ती आजारी असेल तर प्रत्येकजण त्याला खात्री देतो की थोडे चिकन सूप नाही पिले तर तो नक्कीच मरणार आहे"🤣🤣🤣
शॉला इलेक्ट्रिक शेविंग मशीन साठी मॉडेलिंग करण्याची ऑफर आली होती. मात्र शॉने दाढी काढण्यास नकार दिला. कारण दाढी ही शॉची ओळख झाली होती. निर्मात्यानी खूप आग्रह केला तेव्हा शॉ म्हटला.. मी पाच वर्षाचा असताना वडिलांना विचारले "बाबा तुम्ही दाढी का करता?" त्यांच्याकडे उत्तर नव्हते.😀 त्या दिवसापासून त्यांनी दाढी केली नाही आणि मी पण ठरवले की मी पण कधीच दाढी करणार नाही....🧙🏾♂️ खरे खोटे कोण जाणे... पण त्याच्या चेहर्यावर चिकन पॉक्स ने सोडलेल्या डागांना लपवण्यासाठी शॉला दाढीचा उपयोग होत होता....
नोबेल आणि ऑस्कर दोन्ही पुरस्कार मिळवणारा २०१६ पर्यंत शॉ हा एकमेव व्यक्ती होता(२००१ मध्ये ऑस्कर मिळालेले प्रसिद्ध गायक बॉब डीलन यांना २०१६ साली नोबेलने देखील गौरवण्यात आले आहे.) मात्र दोन्ही पुरस्कार स्वीकारताना शॉने खूप खळखळ केली. त्याची बायको शांत डोक्याची ... "तुला नाही आयर्लंड ला पुरस्कार मिळाला आहे असे समज" वगैरे सांगून ह्याची समजूत काढली. आणि मग त्याने स्वीकारले.. Hollywood मधले नामांकित दिग्दर्शक ह्याच्यासाठी पायघड्या घालून वाट पाहत असताना या मनस्वी कलाकाराला मात्र रंगभूमीवरच रमायचे होते.
शॉचा जेव्हा ९० वा वाढदिवस होता त्यावेळेस त्याचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी अशी टूम निघाली की आपण शॉचे हाताचे ठसे घेऊन ठेवूया.. त्याची आठवण म्हणून ते कायम राहतील.. मात्र जेव्हा ठसे घ्यायची वेळ आली तेव्हा ठसे उमटत नव्हते. (साहजिक आहे म्हणा) पण शॉ तेव्हा म्हणाला "उगाच लेखन करत बसलो.. चोरी केली असती तरी चालले असते राव😜
"शक्य तितक्या लवकर लग्न उरकून मोकळे होणे हे स्त्रीचे लक्ष्य असते तर जास्तीत जास्त दिवस अविवाहित रहाणे हे पुरुषाचे काम" असे म्हणणाऱ्या शॉने आजन्म अविवाहित राहावे असे ठरवले असावे. लहानपणी अनुभवलेले आईवडिलांचे कटू नाते हे कदाचित यामागे असावेत. फेबियन सोसायटी मध्ये ओळख झालेली "शेरलेट" त्याला लग्न करूया म्हणत होती. याने मात्र तिला स्पष्ट नकार दिला होता. मात्र जेव्हा शॉ गंभीर आजारी पडला तेव्हा त्याची सुश्रुषा करण्याचा हट्ट शेरलेटने केला. प्रेमाचा बंध तयार झाला😍 आणि लवकरच चाळिशी पार केलेले दोघे विवाहबंधनात अडकले.. तिच्याशी शॉ अतिशय प्रामाणिक राहिला.😍 ८७ व्या वर्षी शेरलेट तर त्यानंतर सात वर्षांनी शॉ मेल्यानंतर दोघांची राख एकत्र करून त्यांच्या बागेत विखुरण्यात आली.😍
एकदा एक कलावंत व्यक्ती त्याच्या मुलांना घेऊन शॉला भेटायला आली होती. ते जात असताना शॉ म्हटला "मुला... तुझ्या नातवंडांना तू कौतुकाने सांगशील की मी कधीतरी शॉला भेटलो होतो" आणि एक पॉज घेऊन पुढे म्हणाला "आणि ते तुला विचारतील कोण होता हा शॉ.."😜 हा त्याचा विनय झाला... मला तर ही शक्यता पुढे १०० वर्षात येईल आणि त्याचे लिखाण कालबाह्य होईल असे वाटत नाही. अगदी ९४ वर्षाचे प्रदीर्घ आयुष लाभलेला शॉ अखेरपर्यंत लिखाण करत होता.. मात्र त्याचा एकसुद्धा टीकाकार म्हणू शकणार नाही की शॉच्या लेखनाचा शो उगाचच एक तास लांबला होता.. उलट तो म्हणेल.... "शॉ मस्ट गो ऑन"
#richyabhau
Comments
Post a Comment