मंगळ.. मानवाचे नवीन घर?
? २ ऑगस्ट २०२० रोजी स्पेसेक्स या खासगी कंपनीने पाठवलेले पहिले अंतरीक्ष प्रवासी दोन महिने अंतराळात राहून पृथ्वीवर परतले आहेत. (खासगी कंपनीकडून स्पेसयात्रेचा हा पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे.) स्पेसेक्सचा मालक इलॉन मस्क २०२४ मध्ये मंगळावर पाठवायच्या यानांची उड्डाणचाचणी घेणार आहे. आपल्या फिकट निळ्या ठीपक्यावर जर भविष्यात तिसरं महायुद्ध झालं आणि त्यात अणवस्त्रांचा वापर झाला तर त्यात सर्वनाश होणार. त्यापूर्वी माणसाने मंगळावर पोहोचणं आवश्यक आहे. वेळेपूर्वी मंगळावर वसाहत प्रस्थापित केली तर किमान काही प्रजातींचं रक्षण करता येईल असं इलॉन मस्कला वाटतं. २०२६ मध्ये पाहिला मानव मंगळावर पाठवायचं नियोजित आहे.
पण खरच आपण त्यावर जगू शकू का... मंगळावर खरंच जीवसृष्टी होती का याबद्दल मतभेद आहेत. यावर शास्त्रज्ञांचे दोन गट पडतात. १९७०च्या दशकात राबवलेल्या वायकिंग मोहिमेमधील यानांनी मंगळावरील मातीमध्ये सूक्ष्मजीवांचं अस्तित्व निश्चित केलं होतं. मंगळ सध्यापेक्षा भूतकाळात जीवसृष्टीला अनुकूल होता तसेच पाण्याचं अस्तित्व होतं या बाबी लक्षात घेतल्या तर मंगळवरच्या जीवसृष्टीची कल्पना नाकारता येत नाही असं एका गटाचं म्हणणं पडतं.
मंगळावर जरी पाणी असेल तरी ते खूप खारट आणि आम्लधर्मी असले पाहिजे, त्यामुळे जीवसृष्टीला आधार देऊ शकत नाही तसेच मंगळाच्या वातावरणात ओझोनाचे प्रमाण फारच कमी असल्यामुळे मंगळाचा पृष्ठभाग व नजीकचे वातावरणाचे थर अतिनील किरणांपासून सुरक्षित नाहीत. त्यामुळे इथे कधीच जीवसृष्टी नव्हती... जर सूक्ष्मजीव आढळले असतील तर ते अंतरिक्षातून उल्का पिंडामार्फत आले असावे असन या दुसऱ्या गटाचं म्हणणे आहे.
मानव प्रत्यक्ष मंगळावर जाऊन तेथील मातीचे विश्लेषण समक्ष करेपर्यंत हा प्रश्न अनिर्णितच राहणार. यासाठी मानवासहित मंगळावर पाठवावयाच्या अवकाशयानाच्या निर्मितीचा विचार सुरू आहे.. नियोजनानुसार घडल्यास २०२६ मध्ये मानव मंगळावर पोचेल... आणि कदाचित भारतीयांच्या कुंडलीत ठान मांडून बसवलेला आणि विनाकारण बदनाम करून सोडलेला हा ग्रह आपल्याला खरचं मंगळ ठरेल... आपलं नवं घर बनेल... आणि कदाचित सोबतच्या कार्टून मध्ये दाखवल्याप्रमाणे हाऊसफुल पण होऊन जाईल.😁
मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह... आपला सख्खा शेजारी... आपण सूर्यापासून आहे त्याच्या दुप्पट लांबीवरून सूर्याभोवती फिरत असतो.. आयर्न ऑक्साइडचा बनलेला.... या गंजलेल्या लोखंडामुळे तांबडा दिसतो. वातावरणात ९५.७ टक्के कार्बन डायॉक्साईड आणि २.७% नायट्रोजन असलेला.. आपल्याला इथं वसाहत करायची असेल तर या Co2 चं रूपांतर ऑक्सीजनमध्ये करायला लागेल.. त्याशिवाय या तांबड्या ग्रहावर मानवाला मोकळा श्वास घेता येणार नाही.🤥
मंगळावर वर्षातले चार ऋतू असतात. उन्हाळा, शिशिर हिवाळा आणि वसंत. एक एक सीजन जवळजवळ सहा महिने. मंगळावर वर्ष ६८७ दिवसांचं असतं, आणि एक दिवस २४ तास ३७ मिनिटाचा.. दिवस म्हणजे स्वतः भोवती एक फेरी तर वर्ष म्हणजे सूर्याभोवती एक फेरी. उन्हाळ्यात सर्वाधिक तापमान ३० अंश तर हिवाळ्यात तापमान शून्याखाली १४० अंश सेल्सियसपर्यंत घसरतं.. मानवाची वस्ती झाली तर एसीची गरज नाही..उलट हीटर लावायला लागणार घराघरात.. 🔥
मंगळ काही बाबतीत आपल्या पृथ्वीपेक्षा महान आहे. सूर्यमालेतील सर्वांत उंच पर्वत "ऑलिम्पस पर्वत" उंची २२००० मीटर हा मंगळावर आहे.. आपला एव्हरेस्ट केवळ ८८५० मीटर आहे, त्याच्यापेक्षा जवळजवळ अडीचपट.. तसेच सर्वांत मोठी दरी "व्हॅलेस मरिनेरिस" मंगळावरच आहे. आपली पृथ्वीवरील मरियाना गर्ता (११००० मीटर खोल) जरी हीच्यापेक्षा खोल असली तरी लांबी ४,००० किमी, रुंदी २०० किमी असलेली ही दरी मरियानापेक्षा तिप्पट मोठी आहे. म्हणजेच व्हॅलेस मरिनेरिस दरी भरायला जेवढं मटेरीयल लागेल, त्यात आपली मरियाना गर्ता तीन वेळा भरून होईल.
गुरूत्वाकर्षणाची क्षमता वेगवेगळी असल्यामुळे पृथ्वीवर १०० किलो वजनाची व्यक्ती मंगळावर ३८ किलो वजनाची भरेल. (कुणाचे वजन प्रयत्न करून देखील कमी होत नसेल तर उपाय आहे..... वजनकाटा घेऊन मंगळावर जा😃😃) हा प्रश्न मला KBC मध्ये आला होता बरं का.. याशिवाय त्या भागात मंगळावर ज्या गप्पा झाल्या त्याची छोटीशी क्लिप सोबत जोडत आहे. पाहा नक्की..
पूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर पाणी असावं असा समज होता. पर्सिव्हल लॉवेल या उद्योगपती आणि हौशी आकाश निरीक्षकाने १९ व्या शतकात स्वतःचे पैसे खर्च करून बांधलेल्या वेधशाळामध्ये संशोधन करत असताना मंगळवर कॅनॉल असल्याचं नोंदवलं. त्यामुळे मंगळावर प्रगत जीवसृष्टी आहे, शेती करण्यात येते असे अनेक गैरसमज सर्वसामान्यांमध्ये पसरत गेले. मंगळावरील काही निमूळते व गडद पट्टे सिंचनासाठीचे पाण्याचे कालवे असल्याचा अनेकांचा समज होता. नंतर समजले की असे पट्टे मंगळावर अस्तित्वातच नाही आहेत व केवळ दृष्टीभ्रमामुळे ते भासतात.
मात्र २००८ साली फीनिक्स मार्स लॅंडरला मंगळावर ध्रुवीय भागात बर्फाच्या स्वरूपातील पाणी आढळलं आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर स्पिरिट, ऑपॉर्च्युनिटी व फीनिक्स या यानांनी जमा केलेले भूशास्त्रीय पुरावे असे सुचवितात की मंगळावर पूर्वी मोठ्या प्रमाणात पाणी होते आणि केवळ एका दशकापूर्वी छोट्या गरम फवार्यांच्या स्वरूपात पाणी अस्तित्वात होतं.
मंगळावर जीवसृष्टी आहे हे शोधून काढण्यासाठी एक प्रकारचा वॅक्युम क्लिनर मंगळावर पाठवला, त्यामध्ये एक पोषक किरणोत्सारी द्रावण भरलेलं होतं, ज्याला आपण सोप्या भाषेत साखरेचा पाक म्हणतो. मंगळाच्या पृष्ठभागावरील शोषून घेतलेल्या मातीच्या कणांमध्ये जर जिवंत घटक असतील, तर वॅक्युम क्लिनरमध्ये त्यांची वाढ सुरू होईल. साखरेवर पोषण होत असताना त्यांचे द्विपेशी अलैंगिक प्रजनन सुरू होईल आणि त्यांची संख्या वाढेल. त्यामुळे कार्बन डाय-ऑक्साइड वायू तयार होईल, ज्याची आपल्याला नोंद घेता येईल असा हा प्रयोग होता. मात्र हा प्रयोग यशस्वी झाला नाही. त्या वॅक्युम क्लिनर मध्ये कार्बन डाय-ऑक्साइड तयार झाला नाही. 😬
मात्र याचा अर्थ मंगळावर जीवसृष्टी नाहीच असा होत नाही.. आपण पाठवलेल्या यानाने शोषून घेतलेल्या मंगळाच्या मातीमध्ये साखरेवर वाढू शकतील असे सजीव नाहीत एवढाच त्याचा अर्थ होईल. या उपकरणाला सिनेमात दाखवतात तसा काल्पनिक मंगळवासी दिसणार नाही. इथं अंतरिक्ष वैज्ञानिकांची काय गल्लत झाली? त्यांनी त्यांच्या ज्ञानाप्रमाणे पृथ्वीवरील नैसर्गिक अधिवास मंगळावरील जीवांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, असा अधिवास पृथ्वीवरील बहुसंख्य प्रजातींच्या दृष्टीने देखील सोयीचा नसतो. तुम्हाला जर प्रजाती माहित नसेल तर तिला नैसर्गिक अधिवास कसा हवा हे तुम्हाला सांगता येणार नाही. अंतरिक्ष कार्यक्रमांमध्ये सर्व शक्यता लक्षात घ्यायला लागतील.. आणि शक्यतांची संख्या तर अमर्याद आहे.. 😭
एकीकडे आपण असे प्रयोग करत आहोत, तर एकीकडे ज्योतिषी मंडळी तुम्हाला कुंडलीत कडक मंगळ दाखवून घाबरवत आहेत 🤭मंगळ तुमच्या कुंडलीत कडक स्थानी असला तरी त्याला घाबरायचं काही कारण नाही.. कारण तो तुम्हाला सरासरी २२ कोटी किमी वरून पाहू शकत नाही.. मात्र आपणच त्याला पाहू शकतो. आपण सोडलेले तीन कृत्रिम उपग्रह मंगळाभोवती परिक्रमा करत आहेत. मार्स ओडेसी, मार्स एक्सप्रेस व मार्स रिकॉनिसन्स ऑर्बिटर हे तीन जासुस त्याच्यावर नजर ठेवून आहेत. मंगळ आपल्या नजरकैदेत आहे.. 😃
मंगळाला आपण सोडलेल्या उपग्रहांशिवाय फोबॉस व डिमाॅस हे दोन स्वतचे पिटुकले नैसर्गिक उपग्रह आहेत. म्हणजे त्याला दोन दोन चंद्र.. या उपग्रहांपैकी फोबोसचा व्यास २३ किलोमीटर आणि डिमाॅसचा व्यास १३ किलोमीटर आहे. हे दोघे म्हणजे ससा आणि कासव.. मेव्हणीने काम सांगितले तर दाजीबा जसे धावतात तसे फोबोस नुसताच धावत असतो.. दिवसातून दोनदा उगवतो आणि दोनदा मावळतो. 🤭 डिमाॅसचे मात्र सरकारी अधिकाऱ्यासारखे काम. पूर्वेकडून उगवून पश्चिमेकडे मावळण्यासाठी सत्तावीस दिवसांचा कालावधी लागतो.🤣
या दोन्ही उपग्रहांना अशी नावे मिळण्यामागे कहाणी आहे. रोमन पुराणकथांनुसार मंगळ हा भीती (फोबिया) आणि दहशत (ड्रेड) या दोन घोड्यांचा रथ चालवत असतो. त्यामुळे जेव्हा १९ व्या शतकात या उपग्रहांचा शोध लागला.. तेव्हा तीच नावे सुचवण्यात आली. मंगळास युध्दाचा देव मानण्यात येतं.. युद्ध आले की भीती आणि दहशत येणार असे त्या लोकांना सुचवायचं असेल.🤔👍🏼
प्राचीन भारतीयांनी मंगळास त्याच्या दिसण्यावरून अंगारक, लोहित इ. नावे दिली. अंगारक म्हणजे निखारा बरका.. मी लहानपणी लय लोकांना विचारले होता अर्थ.. कुणालाच सांगता आला नव्हता अंगारकीचा.. मंगळवारी चतुर्थी आली म्हणजे अंगारकी.. पण अंगारकी म्हणजे काय ते कोण सांगत नव्हते..
फलज्योतिषावाल्यांनी क्रौर्य, उत्पात, अग्निप्रलय, साथीचे रोग, दंगेधोपे, वादळे, युद्ध इत्यादींचे खापर मंगळावर फोडले. बिचारा मंगळ... त्याला माहित पण नाही पृथ्वीवर आपली किती दहशत आहे. काही पौराणिक भारतीय ग्रंथांत मंगळ पृथ्वीपुत्र असल्याचा उल्लेख आहे. मात्र दोघात एकच साम्य आहे.. दोघांना स्वतः भोवती फेरी मारायला जवळजवळ सारखाच वेळ लागतो. (पृथ्वी २३ ता. ५३ मि. तर मंगळ २४ तास ३७ मि.)
मंगळाच्या जन्माची कथा तर त्यावर लयच अन्यायकारक आहे राव.....😔 हिरण्यकश्यपुचा मोठा भाऊ हिरण्याक्ष पृथ्वीला चोरून घेऊन गेला होता तेव्हा विष्णूने वराहावतार घेतला आणि हिरण्याक्षाला मारून एकदम फिल्मी स्टाईलने पृथ्वीला सोडवलं.. आता जे चित्रपटात होतं ते इथे पण झालं. पृथ्वी प्रेमात पडली (डुकराच्या?) आणि त्यांच्या विवाहाचे फळ म्हणजे मंगळ.. म्हणजे मंगळ "सुवर की औलाद.."😔
या मंगळाचा फायदा घेऊन ज्योतिषवाल्यांनी चांगला धंदा वाढवला आहे. पत्रिकेत मंगळ ग्रह हा पहिल्या, चौथ्या, सातव्या आठव्या किंवा बाराव्या स्थानात असेल तर ती पत्रिका मंगळी असते. म्हणजेच १२ पैकी पाच पत्रिका. चाळीस टक्के लोकांना मंगळची दशा ... (भारतीय हिंदू लोकांशीच, त्यातही जे कुंडली पाहतात त्यांच्याशीच पंगा घेतो मंगळ.. बाकीच्यांना नाय त्रास देत😃😃)
ज्या लोकांना मंगळदोष असतो अशा लोकांचा स्वभाव हा तापट, हट्टी, भांडकुदळ असतो, त्यांचा संसार सुखी होऊ शकत नाही असं फलज्योतिष सांगतं, ज्याला काहीच आधार नाही. लोकांची भीती हाच त्यांचा धंदा असतो. ज्याच्या जन्मपत्रिकेतील मंगळ अशुभ स्थानी असेल त्यांनी पत्रिकेत असाच दोष असणारा जोडीदार शोधून लग्न करावं अशी मेख भटजी मारतात. अशामुळे अनेक मुलींचे आयुष्य बरबाद होते..😔
अर्थात मंगळ शांत करण्याचा विधी देखील भटजीकडे असतोच.. समस्या पण हेच बनवणार, उपाय पण हेच करणार.. तुमचा आमचा खिसा हलका होणार.. आणि पाच ते दहा कोटी किमी अंतरावर असणारा मंगळ शांत होणार.. त्याच्या यादीतील तुमचे नाव खोडून टाकणार.. खुळ्याचा बाजार नुसता.. ज्यात फक्त भटजीचा फायदा.. एक अभिषेक बच्चन सोडला तर मंगळ असल्याचा फायदा झालेला एक पण व्यक्ती मी तरी पाहिला नाही😃
मंगळाची दहशत तर शास्त्रज्ञांना देखील आहे.. अर्थात त्यामागे कारण आहे. आजवर मंगळावर सोडलेल्या ५८ पैकी ३७ म्हणजे जवळजवळ दोन तृतीयांश अंतराळयाने या न त्या कारणाने अयशस्वी झाली आहेत. यातील काही मोहिमेदरम्यान अयशस्वी झाले तर काहींमध्ये मोहीम सुरू करण्याआधीच बिघाड झाला. म्हणून गमतीने मंगळ हा "प्रचंड अंतराळ राक्षस" आहे जो ही अवकाशयाने खाऊन जिवंत राहतो हा विनोद नासामध्ये बहुचर्चित आहे.😃
३० जुलै २०२० रोजी नासाने मंगळावर इंजीन्यूएटी नावाचे हेलिकॉप्टर पाठवले, जे १८ फेब्रुवारी २०२१ रोजी तिथे पोचले. आता हवे तेव्हा, हवे तिथे हे १.८ किलो वजन असलेले हे हेलिकॉप्टर पृथ्वीवरील रिमोटच्या साह्याने उडवता येत आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत या हेलिकॉप्टर ने १७ यशस्वी उड्डाणे केली आहेत. कोणत्याही दुसऱ्या ग्रहावर मानवाने उडवलेले हे पहिले वाहन आहे. मंगळावर पृथ्वीपेक्षा १०० पट कमी गुरुत्वाकर्षण आहे. याचा विचार करूनच मंगळावरच्या वातावरणात उड्डाण भरण्यासाठी हे हातभर लांबीचे हेलिकॉप्टर डिझाईन करण्यात आलं आहे.
बाकी कुणी मंगळ पाहिला नसेल अजून तर इंटरनेटची मदत घेऊन त्याचा उदय किती वाजता होणार हे पहा.. पूर्व क्षितिजावर पहाटे साडे पाचच्या सुमारास तुम्ही मंगळ पाहू शकता.. सध्या गुरू, शुक्र आणि शनी संध्याकाळी छान दिसत आहेत, संध्याकाळी साडेसहा सातच्या सुमारास बाकीचे तारे उगवायचा आधी हे तिघे तुम्हाला ठसठशीत शुक्र, शनी आणि गुरू असे पश्चिम क्षितिजापासून वर अनुक्रमें दिसतील. जरा बारकाईने पाहिले तर या तिघांच्या आधी गरीब बिचारा पुसट बुध देखील दिसेल.
बाकी कुंडलीत कडक मंगळ असेल तर त्याची भीती सोडा आता.. कदाचित तुमचे, तुमच्या मुलांचे शुभमंगल मंगळावर देखील लागू शकते.. भटजीची गरज नाही..
#richyabhau
Comments
Post a Comment