विंची चा लिओनार्डो - कला आणि विज्ञानाचा उपासक
विंची चा लिओनार्डो - कला आणि विज्ञानाचा उपासक
विंचीच्या लिओनार्डो ला आपण सगळेच प्रसिद्ध मोनालिसा च्या पेंटिंग चा चित्रकार म्हणून ओळखतो.. पण ही ओळख या जिनियस व्यक्तिमत्त्वाचे रेखन करण्यासाठी खूप कमी आहे. मायकल फॅराडे प्रमाणे ही व्यक्ती देखील उत्क्रांत झालेल्या मानवाच्या मेंदूचा सर्वोत्तम आविष्कार आहे.
हा विंच्या केवळ चित्रकार नाही तर शास्त्रज्ञ, गणितज्ञ, मूर्तिकार वास्तुविशारद, अभियंता, लेखक, संगीतकार, खगोल अभ्यासक, एवढेच नाही तर खडक शास्त्र, प्राणीशास्त्र, इतिहास, वनस्पतीशास्त्र, मानव शरीर शास्त्र या सर्व बाबतीत तज्ञ.. बाप माणूस होता. याच्या कल्पना शक्तीची झेप आणि त्याने केलेल्या कामाचा आवाका रोमांचक आणि प्रेरणादाई आहे.
पहिली गोष्ट विंची हे त्याच्या गावाचे नाव आहे, आडनाव नाही. आपल्याकडे जसे गारंबीचा बापू तसा तो विंची चा लिओनार्डो. त्याला आडनाव लावायची परवानगी नाही. कारण हा श्रीमंत बापाचा अनौरस पोरगा.. गेम ऑफ थ्रोन्स मधला जॉन स्नो जसा आपली ओळख मिळवायला धडपडतो.. तसेच ह्याचे पण झालेले दिसते.
मायकल फॅराडे प्रमाणे ह्याला पण शालेय शिक्षण मिळाले नाही. गणित भूमिती वगैरे विषय तर वयाच्या तिशी नंतर त्याने शिकले आहेत. वयाच्या चौदाव्या वर्षी फ्लॉरेन्स येथे तत्कालीन प्रसिद्ध चित्रकार व्हेरेक्यू च्या स्टुडिओ मध्ये उमेदवारी करायची संधी मिळाली. तिथे त्याने मन लावून काम केले आणि वयाच्या विसाव्या वर्षी चित्रकार म्हणून मान्यता सुद्धा मिळवली... त्याची प्रगती पाहून सोबतचे सहकारी त्याच्यावर जळले. त्याच्यावर समलैंगिकतेचा आरोप झाले त्यातून त्याची पुराव्या अभावी सुटका पण झाली.
राजकीय महत्त्वाच्या व्यक्तींना आपल्या अलौकिक बुद्धीसामर्थ्याचा जोरावर प्रभावित करणे हा त्याचा आवडता खेळ. त्याला शांतता प्रस्थापित करण्यासाठी ड्युक ऑफ मिलान कडे पाठविण्यात आले. तिथे त्याने ड्यूक ला पूर्ण कह्यात घेतले. आपले अभियांत्रिकी ज्ञान वापरून त्याने अनेक स्वयंचलित शस्त्र बनवली. बाहुबली मध्ये पाहिलेला भल्लारदेव चा रथ आठवतो का...असले यंत्र विंची सव्वा पाचशे वर्षांपूर्वी बनवत होता..😬😬
कला विज्ञान आणि निसर्ग .. या सर्वात आव्हान शोधत असताना तो या तीन ही बाबींची सांगड देखील घालत होता. माणूस उडू शकेल हे स्वप्न त्याने पाहिले. त्यासाठी आवश्यक डिझाईन बनवली. पॅराशूट आणि हेलीकॉप्टर यासाठी त्याने काढलेली चित्रे आजही अभ्यासली जातात. ( त्याने त्याचे प्रयोग केल्याचे काही चित्रपटात दाखवतात. त्याचा स्वभाव पाहता त्याने केले देखील असतील नक्की.)
दिसेल ते मानवी प्रेत किंवा मेलेला प्राणी याचे डीसेकशन करून आतील पार्ट पाहणे त्याचा आवडीचा विषय. ( तो प्रसंगी रात्री अंधारात एकटा जाऊन कबरी उघडून प्रेत मिळवायचा. फाडुन बघायचा आणि शिवून परत ठेवून द्यायचा अश्या देखील दंत कथा आहेत)
संशोधकांसाठी आवश्यक असलेली एक वृत्ती म्हणजे डोक्यात आलेली कल्पना कागदावर उतरवणे. याबाबत विंच्याला शंभर पैकी शंभर मार्क. कारण त्याने बनवलेली शेकडो अभियांत्रिकी डिझाईन तसेच शरिरशास्त्रचा अभ्यास करताना नोंदवलेली निरीक्षणे आजही आकृती, चित्र आणि सूत्र रुपात उपलब्ध आहेत.
पर्फेक्षण चा एवढा आग्रही की आपल्या अमीर खानचा पणजा जणू. असे म्हणतात की केवळ द लास्ट सपर या चित्रासाठी येशू चा आवश्यक समर्पक चेहरा शोधण्यासाठी त्याने दोन वर्ष ज्यू वस्तीत भटकंती केली... लोकांची तोंड पाहत. अगदी दिवस भर एखाद्याचा पाठलाग केला😂
त्याची बरीच चित्रे धार्मिक आहेत. त्या काळातील समाज रचनेशी सुसंगत. मला मात्र तो बंडखोर वाटतो. ज्या काळात स्त्रियांना केस मोकळे सोडण्याची मुभा नव्हती त्या काळात त्याने मोनालिसा चे चित्र रेखाटले आहे. त्याच्या चौफेर ज्ञानापुढे त्याची बंडखोरी मान्य केली गेली आहे असेच वाटते. कारण शासनाला त्याची गरज होती.
होय.. मधल्या काळात शासक बदलले, मात्र विंच्याचे स्थान अबाधित राहिले. रोमचा राजा फ्रान्सिस l तर आपल्या वींच्याला घेवून असा मिरावयचा.. जसा काही बच्चन भेटल्यावर त्याला सूनवायचे आहे.. मेरे पास लिओनार्डो द विंची हैं😃
हा विंची मात्र कायम मनमौजी राहिला. एकदा राजाने त्याला घोड्यावर बसलेल्या राजाचे शिल्प बनवायला सांगितले तेव्हा याने एवढ्या स्लो काम केले की राजाला शब्दश घोडा लावला. लढाई झाली, दुसरा राजा जिंकला आणि त्याने या घोड्याच्या शिल्पासाठी आणलेले लोखंड जे वर्षानुवर्षे तसेच होते.. त्याला वितळवून तोफेचे गोळे बनवले. त्याच्या अर्धवट कामाची यादी भली मोठी आहे.
चंचल स्वभाव हीच त्याची ताकद पण होती आणि मर्यादा पण. सोबतच्या कार्टून मध्ये दाखवल्या प्रमाणे त्याचे चित्त एकाच वेळी शव विच्छेदन करताना कुठे बाहेर parachute कस बनवू इकडे धावेल नायतर मध्येच त्याला चित्र काढावे वाटेल. आपल्या राहुल द्रविड वानी फोकस्ड अस्त ना तर पोरग अजून लय पुढं गेलं अस्त.. मग कदाचित शंभर दीडशे वर्षानंतर आलेल्या न्यूटन ला भाव नसता मिळाला.
विंची मुक्या प्राण्यांच्या बाबत अतिशय संवेदनशील होता, तो स्वतः शाकाहारी होताच पण त्याला पिंजऱ्यातील पशू पक्षी पाहवत नसायचे. जवळचे सगळे पैसे तो हे पशू पक्षी विकत घेण्यासाठी खर्च करायचा आणि त्यांना मुक्त करायचा. ह्याला म्हणतात लाईफ यार. तसेही ह्याला बायकपोर कोण नाही.. कमावून नंतर मरताना कुणाच्या मढ्यावर घालायचे...😂
ऑईल पेंट ने चित्र काढायची सुरुवात यानेच केली आणि आपण आता वापरतो त्या कात्री चा शोध पण याने लावला. हा थ्री इडियट मधील व्हायरस सारखे एकावेळी दोन्ही हाताने लिहू शकत होताच.. पण पुढे जाऊन एका हाताने लिखाण आणि दुसऱ्या हाताने चित्र देखील रेखाटू शकत होता. त्याला अजून एक किडा होता.. त्याने केलेले बहुतांश लिखाण हे उलटे आहे.. जे वाचायला तुम्हाला ते आरश्या पुढे धरायला लागणार.. ( डोक्याला शॉट आहे राव हा) येड दर अर्धा तासा नंतर दहा मिनिट झोपायचे म्हणे. दमत पण असेल म्हणा त्याचा मेंदू तेवढा.
असे म्हणतात की वींच्याच्या कामात चूक सापडत नाही कधी.. एक सोडून.. लास्ट सपर या चित्रात येशू च्या प्लेट मध्ये संत्र दाखवले आहे. ( संत्र हे फळ येशूच्या काळात युरोप मध्ये नव्हतं) वसारी याने लिहलेले विंची चे आत्मवृत्त १५५० साली प्रसिद्ध झाले आहे. हेच विंची बद्दलच्या एकमेव माहितीचा स्त्रोत आहे. जे विंची च्या मृत्युनंतर ३० वर्षाने लिहला आहे. विंची मेला तेव्हा वसारी केवळ आठ वर्षाचा होता. त्यामुळे कथा, किस्से हे ऐकीव माहितीमुळे अतिरंजित असण्याची शक्यता आहे. मात्र विंची ने केलेलं लिखाण, आकृत्या, चित्रे हे त्याचे मोठेपण दर्शविण्यासाठी पुरेसे आहेत.
हरहुन्नरी अश्या या अवलियाची ओळख केवळ मोनालिसा पुरती राहू नये म्हणून ही पोस्ट. वींच्याला रिच्याचा सलाम. पोस्ट आवडली तर शेअर करायला विसरू नका. 🙏🏽
#richyabhau
#Leonardo Da Vinci
Comments
Post a Comment