वार आणि वॉरियर्स..
वार आणि वॉरियर्स...
आधी रविवार म्हंटले की त्याचा काय रुबाब असायचा.. सहा दिवस वाट पाहायला लावायचा.. उशिरा उठणे.. निवांत पेपर वाचत आणि चहा वर चहा ढोसत सकाळ जायची.. बालपण सरले तरी 'भोलानाथ खर सांग एकदा, आठवड्यातून रविवार येतील कारे तीन दा' ची भोळी आशा सरली नव्हती.. मात्र कोरोना आला आणि रविवारचा माज उतरवला.. रोजच निवांत..😴 रोजच आराम.. आज कोणता वार आहे याचा विसर पडला.. पण खरच वारच नसते तर ????.. किती मजा आली असती ना.
वार नव्हते तरी लोक जगत होतेच ना.. पण हे वार सुरू झाले आणि खात्या पित्या समृध्द घरात पण उपासमारी सुरू झाली.. ( वार लावून जेवणार्यांची मात्र सोय झाली) ज्यांना आठवड्याचे ठराविक दिवस उपवास असतात त्यांना विचारले की तुम्ही का उपवास पकडला आहे तर ते त्यात्या विशिष्ठ देवतेचे नाव सांगतात. मात्र जर त्यांना विचारले की हे वार या देवतेला कधी मिळाले, वार आधी की तुमचा देव? तर याचे उत्तर त्यांना माहीत नसते. (हे कोंबडी आधी की अंडे सारखे अवघड आहे)
वारांची कल्पना भारतात येण्याच्या घटनेची कालमर्यादा ठरवताना अभ्यासक इसवी सनाच्या तिसरे ते सहावे शतक हा काळ समजतात. वेदांमध्ये कोणतेही वार नाहीत... मात्र वराह मीहिराने सहाव्या शतकात लिहिलेल्या सूर्यसिद्धान्तात वारांचे उल्लेख आहेत, तर काही अभ्यासक वराहमिहिरचाच समकालीन "आर्यभट" यांनी आठवड्याच्या वारांची बारसे केली असे सांगतात😁
म्हणजे पंधराशे सोळाशे वर्ष आधी आपल्याकडे आठवड्याचे वार नव्हते.. होत्या त्या केवळ तिथी. पृथ्वीच्या परिभ्रमण काळाचे अध्ययन करून त्या ३६५ दिवसांची सांगड चंद्राच्या परिभ्रमण काळाच्या २९.५ दिवसांशी व्यवस्थित घातला गेला होता. म्हणजे त्या आधी उपवास असले (?) तर केवळ तिथीचे असतील बर का.. वारांचे नाहीत.
मात्र आपल्या आधी ग्रीक लोकांनी सात दिवसाचा आठवडा करून वारांचे नामकरण केले होते. आकाशातील ग्रह गोलांची नावे पश्चिम आशियातील खाल्डियन लोकांनी प्रथम प्रसृत केली. खाल्डियन संस्कृतीचे केंद्र बगदाद असल्यामुळे नंतर अरबी लोकांनीही हीच पद्धती स्वीकारली. सात दिवसांचा आठवडा हे कालावधीचे एकक म्हणून स्वीकारण्यात ग्रीक, हिंदू, ईजिप्शीय ज्यू व पर्शियन लोकांनी पुढाकार घेतला. इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या पुढेमागे आठवड्याच्या सात दिवसांची नावे आणि त्यांचा क्रम निर्माण झाला.
तुम्हाला कदाचित माहीत नसेल त्यांच्याकडे आधी ८ दिवसाचा आठवडा ( नऊवडा म्हणायचे का?🤣) होता.. आणि ३८ आठवड्याचे वर्ष. चाणाक्ष वाचक लगेच गुणाकार करून म्हणतील म्हणजे काय केवळ ३०४ दिवस होते का वर्षात.. नाही... वर्ष ३६५ दिवसाचेच होते तरी बाकीचे ६१ दिवस हे चक्क सोडून दिलेले असायचे .. RBI ने जसे विजय मल्ल्याने घेतलेले कर्ज नाही सोडले का.. तसेच 🤣🤣. कडाक्याच्या थंडीचे दोन महिने हिशोबात पकडत नसत..वसंत सुरू झाला की सुरू नवे वर्ष.. आपल्या चैत्री पाडव्या सारखे.
सात दिवसांचे सात प्रभारी ही संकल्पना सिल्क रूट मार्गाने भारतात आली. (त्या काळात भारत रेशीम साठी प्रसिद्ध होता. व्यापाराच्या रस्त्याला पण सिल्क रुट म्हणायचे) लॅटिन भाषेतील सात वारांची नावे भारतीय उपखंडातील सात वारांची नावे यात तंतोतंत साम्य आहे. त्यांनी देखील उघड्या डोळ्यांनी दिसणारा एक उपग्रह, पाच ग्रह आणि एक तारा यांची नावे वापरली आणि आपण पण.
जरी आपल्या सुर्य कुटुंबात आठ ग्रह असले तरी युरेनस नेपच्यून हे उघड्या डोळ्यांनी दिसत नाहीत. दूर्भिनचा शोध लागे पर्यंत आणि सूर्यकेंद्री सिद्धांत प्रस्थापित होई पर्यंत मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी सोबत चंद्र आणि सूर्याला पण पृथ्वी भोवती फिरणारे ग्रह मानले जायचे. सात वार साठी सात नावे भेटली.
ग्रहांच्या नावाने वार ओळखायची रीत भारतीयांनी आणि युरोपियन लोकांनी (ब्रिटिश आणि पोर्तुगिज वगळता) हजारो वर्षे चालवलेली आहे. इटालियन, स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच या वेगवेगळ्या भाषांमध्ये नावे जरा वेगवेगळी असली तरी त्यांचा अर्थ तोच आहे. या सर्वांची मुळ भाषा "लॅटिन" मध्ये रविवार पासून अनुक्रमे Dies Solis, Dies Lunae, Dies Martis, Dies Mercurii, Dies Iouis, Dies Veneris, Dies Saturni अशी नावे आहेत.... ती त्यांनी तशीच संस्कारित केली आहेत. ही अनुक्रमे सुर्य चंद्र मंगळ बुध गुरू शुक्र शनी यांची नावे आहेत.
पोर्तुगिज लोकांनी मात्र रविवार साठी सूर्याचे डोमिंगो हे खास विशेषण देऊन पुढे सोमवार ते शुक्रवार दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा दिवस अशीच नावे दिली.. शनिवार परत सबाथ ( ज्यू लोकांचा मेजवानीचा दिवस) असे वारांच्या बारश्याचे शॉर्ट कट मध्ये आटोपले आहे. नक्कीच आळशी तरी असतील किंवा अरसिक तरी..🤣 काय पैसे लागणार होते का नावे द्यायला.. फ्री डी कॉस्टा होते ना🤣 चीनी आणि अरबी भाषेत सुद्धा पोर्तुगीज प्रमाणे पहिला दिवस दुसरा दिवस असेच म्हंटले जायचे. अरब भाषेत जुममा म्हणजे एकत्र यायचा दिवस असा केवळ शुक्रवार वेगळा संबोधला आहे.
जपानने वारांचे नामकरण करताना निसर्ग पुजला आहे. तिकडे 'वार' ला 'योबि' म्हणतात. 'निचियोबि' - रविवार मधला 'निचि' म्हणजे सूर्य तर 'गेचु़योबि' - सोमवार मधला 'गेचु़' म्हणजे चन्द्र आहे. पुढे 'कायोबि' - मंगळवार मधला 'का' म्हणजे अग्नि तर 'सुइयोबि'- बुधवार मधला 'सुइ' म्हणजे पाणि आहे. 'मोकुयोबि'- गुरुवार मधला 'मोकु' म्हणजे लाकूड तर 'किनयोबि' - शुक्रवार मधला 'किन्' म्हणजे सोनं आहे. शेवटचा दिवस त्यांनी या पृथ्वी ला दिला आहे. दोयोबी - शनिवार मधला 'दो़' म्हणजे माती.. आपल्याकडे वेगळी पंचमहाभूते.. त्यांच्याकडे वेगळी👻
ब्रिटिशांनी मात्र आपले वेगळेपण जपले आहे. त्यांनी रुजवलेले संडे मंडेच आता जगभर चालते. फ्रेंच क्रांतीनंतर फ्रेंच लोकांनी आपले काही वैशिष्ट्य दाखवावे म्हणून प्राचीन ईजिप्तमध्ये होता तसा दहा दिवसांचा आठवडा केला. पण ही प्रथा टिकली नाही.. कारण तोवर इंग्लिश साम्राज्य आणि मापन पद्धती जगभर पोचली होती.
इंग्लिश भाषेत असलेल्या शनिवार रविवार आणि सोमवार यांच्या नावामध्ये नी अर्थामध्ये इतर भाषांशी साम्य आहे. मात्र मंगळाऐवजी Tiw, बुधाऐवजी Woden, गुरुऐवजी Thor आणि शुक्राऐवजी Fria ही नावे वापरली आहेत ती नोर्स पुराणकथा मधील अँग्लो सॅक्सन, वायकींग टोळ्यांच्या देवतांची नावे आहेत.
सोम म्हणजे चंद्र हे काही माहीत नव्हते आधी शाळा शिकत असताना. सोमरस म्हणजे देव पितात ती दारू.. म्हणजे हा देवाचा दारू प्यायचा दिवस असेल अशी माझी लहानपणाची भाबडी कल्पना..🤣🤣 आपल्याकडे उचापती करणारा चंद्र हा ग्रीक संस्कृतीत सूर्याचा भाऊ, गुड बॉय मानला गेला आहे. रोमन संस्कृतीत तर त्याला स्त्रीत्व दिले गेले. तिला लूना हा शब्द बहाल केला. सोमवार हा तिचा म्हणजे लूनाचा दिवस मानला जातो.
आपल्याकडे मंगळ म्हणजे देवांचा सेनापती, तसेच रोमन संस्कृतीत मार्स ला युध्दाचा देव मानण्यात येते. नॉर्स कथेनुसार देखील Tiw हा युध्दाचा देवता आहे.. सोबतच्या चित्रात दिसत असेल एक हात कोल्ह्याने खाल्लेला.... त्याला हा दिवस देण्यात आला आहे... टिवचा दिवस म्हणजे टिवज डे.. ( mon हा मौन पाळायचा तर हा टिव टिव करायचा दिवस😂)
लहानपणी Wednesday च्या स्पेलिंग ने छळले होते.. पण आता समजतंय की लय खतरनाक देवाला तो दिवस दिला आहे. वोडेन नावाचा देव किती डेंजर आहे हे Viking पाहिले आहे त्याला समजते🤣🤣त्यामानाने चंद्राचा अनैतिक पोरगा "बुध" असो की देवांचा दुत "मर्क्युरी".. या प्रतिमा वोडेन पुढे "पाणी कम" आहेत.. लयच राडा करणारा देव...फ्रेया त्याची बायको आणि थॉर पोरगा... हा वोडेन बुधवारी मेला होता म्हणे.. वोडेंस डे चे पुढे Wednesday झाले.
गुरुवार म्हणजे थॉर्स डे.. आता अवेंजर मधून घरा घरात पोचलेले नाव म्हणजे थॉर.. अन् त्याचा हातोडा.. लॅटिन भाषेत गुरुवार साठी शब्द असलेला zeus आणि नॉर्स कथेनुसार थॉर दोघेपण देवांचे देव. हातात हातोडा.. ज्यातून वीज सोडतात. एकाच छापतून दोन्ही देव काढले आहेत.😀चित्रात बसलाय कसा थाटात.... आपल्याकडे मात्र गुरु म्हणजे देवांचा गुरु. ज्याच्या विना नाही दुजा आधार 🤣( हल्ली गुरुवार गल्लोगल्ली उगवणाऱ्या ब्रम्हांड नायक बाबांना आधार झाला आहे 😬)
शुक्र ग्रहाचे खूपच कौतुक.. मराठी भाषेत ग्रह असून तारा म्हणवून घेत मिरवणारा..पुराणात जरी "शुक्राचार्य" म्हणून बदनाम असला तरी कवींनी मात्र त्याला प्रेमात चिंब बुडवून काढला.. व्हिनस ही पण प्रेमाची देवता.. आणि फ्रेया ही पण.. नॉर्स कथेनुसार लग्न आणि संतती ची देवता असलेल्या फ्रेया चा दिवस फ्राय डे (मला वाटायचे चिकन फ्राय करायचा दिवस 🤣) काही पोरी लग्न जुळण्यासाठी शुक्रवारचे उपवास करतात.. ते हीलाच पोचत असावे🤣🤣 सात वार असले तरी महिला देवतेला एकच दिवस मिळाला आहे हक्काचा. चंद्राचे काय खरे नाही, कुठे पुरुष तर कुठे स्त्री😀
चित्रात शेवटचा soctere हा माणूस आहे त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला पण नाही भेटली.. कुणाला माहीत असेल तर सांगा.. तसेही त्याला शनिवार मध्ये स्थान दिले नाहीच. ’ईश्वराने सहा दिवसांमध्ये स्वर्ग, पृथ्वी, महासागर आणि त्यातील सर्व सजीव-निर्जीव गोष्टी निर्माण केल्या🤣🤣 आणि सातव्या दिवशी त्याने विश्रान्ति घेतली.😴 त्या दिवसाला ईश्वराने ’सब्बाथ’ असे नाव दिले.
ख्रिस्ती लोकांसाठी रविवार तर ज्यू धर्मात शनिवार सब्बाथला दिले गेले. गम्मत म्हणजे आपल्याकडे देखील शनिवार हा वार काम करायचा टाळला आहे. "न कर्त्याचा वार शनिवार". बरोबर आहे.. एक दिवस तरी हक्काचा पाहिजे ना.तसेही स्पेलिंग मध्येच sat आहे.. बसून राहायचे निवांत🥳🥳
तर अशी ही सात वारांची साठा उत्तराची कहाणी सुफळ संपन्न...😀🙏🏽
#richyabhau
#सात_वार_कुठून_आले
Comments
Post a Comment