गुरु.. द बिग ब्रदर

 गुरु.. द बिग ब्रदर


आपल्या सौर कुळातला सर्वात मोठा भाऊ म्हणजे गुरु.. गुरु शब्दाचे मराठीत दोन अर्थ.. मोठा.. आणि शिक्षक. यातला पहिला अर्थ खलोगीय दृष्ट्या बरोबर आहे.. तर पौराणिक ग्रंथांमध्ये गुरूला देवांचे गुरुपण बहाल करण्यात आले आहे.. खरतर त्याच्या पेक्षा तेजस्वी शुक्र.. पण त्याला दैत्य गुरु आणि याला देवांचा गुरु का करण्यात आले काय माहीत. 


गुरू म्हणजेच बृहस्पती.. देवांचा गुरु. गुरुचरित्रात लिहल आहे की कलीने ब्रह्मदेवांना ‘गुरु’ शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला, की ‘ग’ कार म्हणजे सिध्द होय. ‘र’ कार म्हणजे पापाचे दहन करणारा. ‘उ’ कार म्हणजे विष्णूंचे अव्यक्त रूप.( मला तर काही लॉजिक वाटत नाही. उगाच शब्द गोल गोल फिरवले आहेत. पण माहिती असावी म्हणून टाकले आहे.. नायतर गुरूचरित्र माझे सगळ्यात नावडते पुस्तक आहे 😭)


बाबिलोनियन संस्कृतीमध्ये गुरू हा त्यांचा देव मार्दुक याचे प्रतीक मानला जात असे. रोमन संस्कृतीमध्ये ज्युपिटर देवाच्या नावावरून गुरूला ज्युपिटर हे नाव दिले गेले होते. ज्युपिटरच्या हातात एक वज्रास्त्र असते.. (जसे आपल्याकडं इंद्राच्या) जोव या नावानेसुद्धा ओळखला जाणारा हा देव रोमन संस्कृतीतील मुख्य देव होता. ग्रीक देवता झ्यूस तसेच नोर्स देवता Thor सुद्धा गुरूशी संबंधित आहे जे आपण आठवड्याचे वार आणि त्यांची नावे या पोस्ट मध्ये पाहिले.


"गुरुबिन कौन बतायें बाँट.." असे संत कबीर सांगून गेले.... हल्लीच्या काळात "गुरुबिन कौन लगाये बाँट.." असे पण म्हणतात🤣 नुसता गुरु नाही तर सतगुरु.. त्याचे खूपच प्रस्थ होते. 

ज्याने सद्गुरु नाही केला  | त्याचा जन्म वाया गेला.. 

आता हा काळ गेला.. मानवाची प्रगती होत गेली, आत्मविश्वास जागृत झाला आणि आता आपण म्हणू शकतो की

सतगुरु वाचून l सापडेल सोय l तोची जन्म होय l धन्य धन्य ll (विंदा)


जाऊद्या.. आपण भूलोकीचा गुरु देऊ सोडून.. आणि आकाशातील गुरुबाबत बोलू.  गुरु हा असा ग्रह आहे जो चुकून तारा व्हायचा राहिला... आता आहे त्या वस्तुमानापेक्षा १२ पट मोठा असता तर त्याला तपकिरी बटू तारा ( लिंबूटिंबु तारा) असे नाव मिळाले असते.. गुरूच्या वस्तुमानात जर अजून भर पडली तर गुरुत्वाकर्षणामुळे तो आकुंचन पावेल व तापमान प्रचंड वाढून त्याचे ताऱ्यात रूपांतर होईल. अवकाशी कचरा गिळंकृत करण्याची त्याची क्षमता पाहिली तर ही शक्यता नाकारता येत नाही.


जसे घरात मोठ्या भावाचे चालते तसे सूर्याभोवती फिरत असताना इतर सर्व ग्रहांच्या कक्षा निर्धारित करायचे काम गुरुची गुरुत्वाकर्षण शक्ती करते. गुरूने लावलेल्या शिस्तीत सगळे फिरत असतात. अपवाद फक्त बुधाचा ( घरात एक तरी असतेच आगावू) गुरूने सूर्यमालेत आजवर सफाई करण्याची भूमिका बजावली आहे..  अनेक छोटे मोठे अशनी (astroid) तसेच इतर कचरा त्याने स्वतः ओढून घेतला आहे. सुर्यानंतर सर्वात जास्त गुरुत्व शक्ती गुरुची आहे.... पृथ्वीच्या अडीच पट.( बाकी युरेनस, नेपच्यून शनी पृथ्वी च्या जवळपास तर बाकी बुध शुक्र मंगळ खूप कमी)


आपल्याला माहीत की सूर्यापासून क्रम लावला तर बुध शुक्र पृथ्वी आणि मंगळ हे आतले ग्रह.. जे खडकाचे बनले आहेत. नंतर आहे एक खूप मोठा मोकळा पट्टा.. ज्यात लाखो अशनी फिरत आहेत. नंतर गुरु शनि युरेनस आणि नेपच्यून हे बाहेरचे ग्रह.. हे बाहेरचे ग्रह वायूचे बनले आहेत. यांची घनता कमी आहे. गुरु पृथ्वी पेक्षा १३०० पट मोठा आहे..वजन मात्र केवळ ३१८ पट. म्हणजे त्याची घनता पृथ्वी पेक्षा चौपट कमी आहे.


मात्र गुरूचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग भयानक आहे.. आपल्या पेक्षा ११ पट अधिक व्यास असलेला हा ग्रह स्वतभोवती दहा तासात एक फेरी पूर्ण करतो.. ( स्पीड ४५००० किमी प्रती तास) एवढ्या जोरात फिरतो म्हणून त्याचे रूपांतर चपट्या गोलात झाले आहे.. मध्ये जास्त, तर ध्रुवीय भागात कमी..... आपल्या पृथ्वीचा वेग किती आहे माहीत आहे.. १६५० किमी/तास..  बुलेटट्रेन पेक्षा कितीतरी पट जास्त. गुरुत्व शक्ती आहे म्हणून हा वेग आपल्याला जाणवत नाही. पण तुम्ही गुरुत्व शक्ती पासून स्वतःला मुक्त करून कोलकाता मधून हवेत उडाला.. आणि एक तासाने खाली आला तर तुम्ही अहमदाबादला उतरताल..🤣 अर्थात गुरुत्व शक्ती पासून मुक्त होता येणार नाही.


गुरू ग्रह हा वायूचा बनलेला आहे. मात्र त्याला उभा कापला (कल्पनेत बर का) तर पृथ्वीप्रमाणे जड मूलद्रव्यांचा समावेश असलेला खडकाळ गाभा असणे शक्य आहे. ९० टक्के हायड्रोजन व आणि १० टक्के हेलियमने वातावरण बनलेल्या या ग्रहात बाकीचे घटक अगदी नगण्य आहेत. (अगदी सूर्य आणि इतर ताऱ्यांप्रमाने) गुरुला जेवढी उष्णता सूर्यापासून मिळते त्याच्यापेक्षा जास्त उष्णता तो उत्सर्जित करतो. यामुळे गुरू दर वर्षी काही मिलिमीटरने आकुंचन पावत आहे. पूर्वी जेव्हा तो जास्त गरम होता तेव्हा तो आजच्यापेक्षा कितीतरी मोठा होता.


गुरूच्या वातावरणात उंचीनुसार कमी जास्त दाबाचे पट्टे असतात त्यामुळे त्यांच्या सीमा रेषांवर मोठी वादळे होत असतात. सोबतच्या जुनो यानाने पाठवलेल्या चित्रामध्ये गुरूवर डोळ्या सारखा दिसणारा लाल डाग म्हणजे सतराव्या शतकापासून चालत आलेले एक मोठे वादळ आहे. शनीचे कडे प्रसिद्ध आहे मात्र गुरूला देखील धूलिकण आणि लहान मोठ्या दगडांचे बनलेले कडे आहे. धूलिकण व दगड गुरुत्वाकर्षणामुळे गुरफटून त्याच्याभोवती फिरू लागतात ज्याचे रूपांतर कड्यात झाले आहे.


गुरू ग्रहाला आजवर सापडलेले ७९ उपग्रह आहेत. यापैकी चार मोठ्या उपग्रहांचा शोध गॅलिलियोने १६१० मध्ये लावला होता. त्याने त्या काळात केलेल्या निरीक्षणाच्या नोंदी खालील लिंकवर उपलब्ध आहेत. 

https://www.nasa.gov/feature/410-years-ago-galileo-discovers-jupiter-s-moons


गॅनिमीड, कॅलिस्टो, युरोपा आणि आयो या गॅलिलिओ ने शोधलेल्या चार उपग्रहांना गॅलिलियन उपग्रह म्हटले जाते. गॅनिमिड हा गुरूचा सर्वात मोठा उपग्रह आहे.. बुध ग्रहापेक्षा मोठा...नंतरच्या काळात तंत्रज्ञान विकसित होत गेले. आणि इतर उपग्रहांचा शोध लागला. पायोनियर तसेच वोयाजर यानांनी गुरुजवळून प्रवास करताना त्याची माहिती गोळा करून पाठवली होती. मात्र १९९३ साली सोडलेल्या "गॅलिलियो" या यानाने गुरुच्या कक्षेत प्रवेश करून सात वर्ष त्याचा अभ्यास केला. हे यान दोन वर्षाचा प्रवास करून गुरूच्या कक्षेत पोहोचले होते. 


या यानावरून एक प्रोब गुरूच्या वातावरणात सोडण्यात आला. त्याने गुरूच्या वातावरणात १५० कि.मी.चा प्रवास केला, जवळपास एक तास महत्त्वाची माहिती गोळा करीत राहिला....  मात्र नंतर हा प्रोब गुरूच्या उच्च वातावरणीय दाबाखाली वितळला/त्याची वाफ झाली. नंतर २००३ रोजी यानाची आयो या गुरुच्या उपग्रहशी होणारी टक्कर टाळण्यासाठी गॅलिलियो यानाला गुरूच्या वातावरणात पाठवावे लागले तेव्हा हे यान देखील वरीलप्रमाणे गायब झाले.😬


कदाचित गुरूचा राग लय जबरी असावा.. पण या नाकावरच्या रागावर औषध म्हणून "जुनो" ला पाठवण्यात आले आहे. जुनो कोण??... अहो रोमन कथांनुसार  जुनो म्हणजे शनीची पोरगी, मंगळाची आई आणि गुरुची बायको.. आता बोला...चेक मेट डायरेक्ट🤣..  २०१६ साली गुरुच्या कक्षेत पोचलेले "जुनो" हे यान महत्त्वाची माहिती गोळा करत आहे. "अायो" या गुरुच्या उपग्रहावर सजीव सृष्टी आहे का याबाबत देखील संशोधन सुरू आहे.


भारतातला आपला पांडू मात्र अजून डोंगरावर....  उगाच कुंडलीत गुरूचा बाऊ करून ठेवला आहे त्याच्या बोकांडी. शनीची साडेसती एका वेळी ३/१२ लोकांना असते. मंगळाचा त्रास ५/१२ लोकांना.. मात्र गुरुची दशा ७/१२ लोकांनां.. म्हणजे बकरा पकडायला सगळ्यात जास्त शक्यता गुरुची दशा.... हे साले जोतिषी कुंडलीच्या जाळ्यात किती दिवस गंडवणार लोकांना काय माहित...  आपल्या कुणाला गुरुची दशा सांगितली असेल तर मी आहे..तुमची दशा गायब करतो... काही कोणत्या भटजीला दान द्यायची गरज नाही.


गुरूचा परिभ्रमणकाल जवळजवळ १२ वर्षां एवढा आहे (केवळ दीड महिना कमी) आहे. एका राशीत तेरा महिने असतो. आता धनु राशीत आहे. असाच फिरत जेव्हा तो सिंह राशीत जाईल.. आणि साऱ्या देशातील नागडे उघडे साधू कुंभमेळ्यासाठी नाशिकात येतील. कुंभमेळ्यावर एक विशेष पोस्ट टाकली आहे. नसेल वाचली आणि आवड असेल तर वाचा.


गुरुपौर्णिमा आणि गुरूचा काही संबंध नाही.. आषाढ पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा.. तसेच गुरुपुष्यामृतचा देखील गुरुशी काही संबंध नाही. चंद्र रोज एका नक्षत्रात दिसत असतो, दर महिन्याला एकदा पुष्य नक्षत्रात.. गॅमा, डेल्टा आणि बीटा cancri या नावाचे तारे पुष्य नक्षत्रात येतात. यातील बीटा cancri तारा आपल्यापासून ४५० प्रकाश वर्षे दूर आहे .. आणि चंद्र "एक सेकंद" प्रकाश वर्ष दूर..😬 म्हणजे एकमेकांचा एकमेकाशी काहीच संबंध नाही... मात्र चुकून त्यादिवशी गुरुवार असेल तर गुरुपुष्यामृत योग झाला. आता हा योग साधताना भाविकांनी सोने खरेदी करावे असे सांगतात. त्या दिवशी खरेदी केली तर फायदा होतो असे सांगतात... पण खर तर फायदा केवळ सोनारांचा होतो🤣 काही लोकांचा जन्मच झाला असतो गंडण्यासाठी.. त्याला आपण काय करणार😭 


हरौ रूष्टे गुरस्त्राता गुरौ रूष्टे न कश्चन। 

तस्मात् सर्व प्रयन्तेन गुरूं शरणं व्रजेत्॥

"एखादे वेळेस शंकर क्रोधीत झाला तर गुरु सांभाळून घेतात. परंतु गुरु क्रोधीत झाले तर शंकर सांभाळून घेत नाही. म्हणून गुरुला शरण जा"..अशी कुणी किती भीती घातली तरी सांगतो.. गुरुची चिकित्सा करा... गुरूवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका... कुंडलीतील आठवा गुरु तर तुमचे काहीच वाईट करू शकणार नाही... हा..पण जेव्हा कधी त्याने महाराष्ट्रातील "महागुरू" चा डान्स /अभिनय पाहिला किंवा गाणे ऐकले.. तर मात्र पृथ्वीवर गुरु गुरगुरल्याशिवाय राहणार नाही🕺

#richyabhau

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके

गोमू आणि गोमाजीराव

शेंडी जाणवे आणि दाढी टोपी