सत्येंद्रनाथ बोस : phd नसलेला नॅशनल प्रोफेसर
सत्येंद्रनाथ बोस : phd नसलेला नॅशनल प्रोफेसर
ह्या विश्वाची निर्मिती कशी झाली याचे कोडे मानवाला पहिल्यापासून पडलेले.. ते सोडवण्याचा त्याचा ध्यास अनादी कालापासून सुरू होता, ज्याला या दशकात यश आले.CERN द्वारे २०१३ साली फ्रान्स आणि स्वित्झर्लंड यांच्या सीमेवर भूगर्भात उभारण्यात आलेल्या वीस किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून विरुद्धभार असलेल्या प्रोटॉनना एकमेकांच्या विरुद्ध दिशेने फिरवून टक्कर घडवून आणण्यात आली. या टकरीतून ‘बिग बँग’सदृश स्थिती निर्माण होऊन मूलकण मिळाले. अणुरेणू असो किंवा संपूर्ण विश्वात निर्माण झालेली कोणतीही वस्तू... तिच्या निर्मितीचे स्पष्टीकरण देता येईल असे एकच मुलतत्व असले पाहिजे असा विश्वास वैज्ञानिकांमध्ये फार पूर्वीपासून होता. विश्वाच्या निर्मितीचे कोडे सोडवेल अश्या या कणाला, गॉड पार्टिकलला बोसॉन असे नाव देण्यात आले... सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावावरून...
एका कवितेत देशबंधू चित्तरंजन दास म्हणतात “बंगालचे पाणी आणि बंगालच्या जमिनीत एक अखंड सत्य आहे”. हेच सत्यतत्व घेवून विज्ञानाची उपासना करणारा संशोधक म्हणजे सत्येंद्रनाथ बोस... बंगालची सुपीक माती, जीला इतर प्रदेशापेक्षा इंग्रजी राजवटीचा फायदा लवकर झाला, आणि समाज सुधारणा असो किंवा संशोधन, बोंगाली बाबूंनी आघाडी घेतली. अनेक रत्ने जन्माला आली.. त्यातील एका खास रत्नाचा आज वाढदिवस आहे.. एक असे रत्न जे एक भौतिकशास्त्रज्ञ, संगीतकार, तत्वज्ञान, चित्रकला, मूर्तिकला, स्थापत्यकला, साहित्य या सर्वांचा आनंद घेणारा नॅशनल प्रोफेसर. आज जन्मदिवशी त्यांच्या आठवणीला उजाळा.
सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म १ जानेवारी १८९४ रोजी कोलकाता येथे झाला. बोस कुटुंबाचे मूळ गाव नाडिया जिल्ह्यातील एक लहानसे, मात्र संस्कृत पंडीतांसाठी प्रसिद्ध असलेले खेडे.. घरात तीन पिढ्या आधी इंग्रजी शिक्षणाची गंगा आली होती. आजोबा अंबिकाचरण हे ब्रिटिश आमदनीत लेखापाल होते. त्यांचा मोठा मुलगा सुरेंद्रनाथ बोस आपल्या सत्तीबाबूचे पप्पा होते. बिचारे लहान असतानाच त्यांचे वडील वारले... त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडून सुरेंद्रनाथ बोस लवकर कामाला लागले होते. शिक्षण अर्धवट झाल्याची खंत त्यांना होती..गणित, विज्ञान आणि तत्वज्ञानाची आवड असलेल्या बाबांनी ती कसर पोरांना शिकवून काढली..❤️
त्या काळात बंगालमध्ये सामाजिक, राजकीय घडामोडी वेगाने होत होत्या, ब्राम्हो समाज, रामकृष्ण मिशन, आर्य समाज या सर्वांकडून सुशिक्षित पांढरपेशा समाज ढवळला जात होता. यातूनच सुरेंद्रनाथ यांची चिकित्सक वृत्ती वाढीस लागली होती. आईचे नाव अमोदिनी कोलकात्यातील श्रीमंत वकिलाची पोरगी. वंदे मातरम् लिहिणाऱ्या बंकिमचंद्र चटर्जी यांची ती वर्गभगिनी. तिचे शिकण जास्त झाले नव्हते, मात्र त्या काळातील आदर्श स्त्रीप्रमाणे घरातील सर्व व्यवस्थित पाहत होती.. घरात माणसे काय थोडी होती... सत्तीबाबूच्या पाठीवर सहा बहिणी झाल्या होत्या.. याशिवाय सत्तीच्या चुलते चुलत्या, त्यांची खंडीभर पोरं... एवढी लोकं घरात की रोजच जत्रा भरायची... 😂
मोठ्या एकुलता एक मुलगा म्हणून सत्तीबाबू एकदम लाडाचा. (सत्तीबाबू हे काही त्यांचे टोपणनाव नाही.. पण रवी तेजाचा एक सिनेमा.. रावडी राठोड ज्यावर आधारित आहे.. मला लयं आवडतो.. म्हणून त्या पात्राचे नाव वापर आहे🙏) सुरेंद्रनाथ रेल्वे खात्यात अकाँटंट होते. १९०३ मध्ये स्वदेशी चळवळीत भाग घेताना त्यांनी स्वतची औषध कंपनी सुरू केली होती. आसाम वगैरे निसर्गरम्य भागात कामानिमित्त जाताना सत्तीबाबुला देखीलसोबत फिरायला चांस मिळत असे. याशिवाय बाप आणि पोराचे एक रोजचे काम होते.. रोज कामाला जाताना बाबांनी एक गणित फरशीवर लिहायचे द्यायचे आणि सत्तीने ते बाबा कामावरून यायच्या आधी सोडवायचे..❤️
एवढी नेट प्रॅक्टिस झाल्यावर खेळाडू का नाही तयार होणार.. पाचव्या वर्षी सत्तीची शाळा सुरू झाली. लहानपणापासूनच वर्गात पहिला क्रमांक मिळवण्याचा जणू सत्तीचाच हक्क होता. गोबागान गावातील न्यू इंडियन स्कूलमधील त्याच्या वर्गातील बाकीचे विद्यार्थी त्यांचा दुसरा नंबर कसा येईल याचीच चिंता करायचे. 🤔 त्यांनी कधीच पहिल्या नंबरवरून दावा सोडला होता.😁 शाळेत असतांना एकदा गणिताच्या परिक्षेत उपेंद्रनाथ बक्षी या टीचरने खुश होऊन या बाबुला १०० पैकी ११० गुण देऊन टाकले कारण बाबुने सगळी गणिते एकापेक्षा अधिक पद्धतीने आणि अचूक सोडविली होती. शिक्षक तेव्हाच म्हणायचे, "पोरगा मोठा गणितज्ञ बनणार" मॅट्रिकला असताना शाळा बदलली आणि हिंदू स्कूल मध्ये प्रवेश घेतला. पंधराव्या वर्षी बोर्डात पाचवा येऊन मॅट्रिक पास झाला.
लहानपणापासूनच सत्तीची दृष्टी काहीशी अधू होती, तरीपण मिळेल ते पुस्तक वाचणार एवढी आवड. रस तर सर्वच विषयांमध्ये.. विज्ञान, गणित असो वा साहित्य.. बंगाली, इंग्रजी, संस्कृत, फ्रेंच, इटालियन आणि जर्मन अशा सहा भाषांवर सत्तीबाबूचे प्रभुत्व होते.❤️ शालेय शिक्षण सुरू असतानाच लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली, दंगलीचा रोळ उठला. त्यावेळी हिंदू मुस्लिम तेढ कमी व्हावी यासाठी सत्तीबाबूने शाळेत रक्षाबंधन कार्यक्रम राबवला..
पुढे कॉलेज जीवनात देखील त्यांचे क्रांतिकारकांशी जवळचे संबंध राहिले.. एकुलता एक,आणि त्यातही घरातील सर्वात मोठा मुलगा असल्याने त्याला राजकारणात भाग घ्यायला वडिलांनी सक्त मनाई केली होती. अनेक गुणी तरुण देशप्रेमापाई स्वतच्या आयुष्याची होळी करून घेत होते. मात्र सत्तीबाबूला कौटुंबिक जबाबदारीची जाणीव होती. तरीही मानवेंद्र रॉय आणि अबानी मुखर्जी यांना जमेल तेवढी मदत सत्तीबाबूने केली. कष्टकरी विद्यार्थ्यांसाठी रात्रशाळा चालविण्यात देखील त्याचा सहभाग होता. मात्र स्वदेशीचा पुरस्कार करताना इंग्रजी शिक्षणाचा बहिष्कार करणे त्याला चुकीचे वाटत होते. इंग्रजी साम्राज्याचा बीमोड करताना इंग्रजी शिक्षण हेच महत्वाचे असेल यावर त्याची निष्ठा होती.
शाळेतील अभ्यासाची दादागिरी कॉलेज मध्ये पण सुरू राहिली.१९१५ साली कोलकात्यातील प्रेसीडेन्सी कॉलेज मध्ये गणितीय भौतिकी या विषयात ९२ टक्के गुण मिळून एम.एस्सी. पदवी मिळवली. यावेळी त्यांनी विद्यापिठात पहिला क्रमांक मिळवला होता, आणि दुसरे आले होते त्यांचे मित्र मेघनाद साहा. खरंतर त्या काळात विज्ञान शाखेला आजच्या सारखी चलती नव्हती. वकील होणे हा सर्वात बेस्ट अशीच मानसिकता असायची. विज्ञान शाखेत पुढे संशोधन करायचे म्हणले तरी अनेक अडचणी. पहिल्या महायुद्धाचे वातावरण होतं त्यामुळे युरोपातील अद्ययावत माहिती जर्नल्स द्वारे भारतात पोचणे थांबले होते. भविष्यात उज्ज्वल वगैरे असे काही दिसत नव्हते. जगदीशचंद्र बोस आणि प्रफुल्लचंद्र रॉय या परदेशात नाव गाजवून भारतात परतलेल्या संशोधकांना देखील तुटपुंजा पगार आणि भिकार प्रयोगशाळा यावर भागवून घ्यायला लागत होते. 😔
Bsc आणि Msc याच्या मध्येच भाऊने अजून एक परीक्षा दिली. लयच अवघड... सत्तीबाबूचे लग्न ठरले. इथे भाऊचे भविष्य अंधारात आणि आईच्या डोक्यात याचे चार हात करून देणे. आईच्या हट्टापुढे सत्तीबाबूचे काही चालले नाही.. लग्न तर झालेच.. पोरगा २० वर्षाचा, तर पोरगी ११. मुलगी अतिशय श्रीमंत घरातील. लोकांना वाटले ह्याची लाईफ सेटल झाली, सासुरवाडी कडून पैसे घेऊन हा परदेशी जाणार शिकायला. पण सत्तीबाबू खूप स्वाभिमानी होता, त्याने परदेशी जायला सासऱ्याची मदत तर घेतली नाहीच... पण त्या काळात प्रचलित असताना हुंडा देखील घेतला नाही.😍 सत्येंद्रनाथ आणि उषाबती या जोडप्याला नऊ पोरं झाली. (त्याकाळात देव खूप दयाळू असावा😂)
Phd साठी सत्तीबाबूने विद्यापीठातील प्राध्यापक गणेश प्रसाद यांच्याकडे प्रयत्न केले.. मात्र त्यांच्या संवादाच्या तारा कधी जुळल्या नाहीत. शेवटी पीएचडी करायची राहिली, ती राहूनच गेली... भाऊने विषयच सोडून दिला. हवामान खात्यात तसेच आणखी एका ठिकाणी शिक्षक म्हणून अर्ज केला मात्र "ओव्हर क्वालिफाईड" असणे आड आले.😭 मेघनाद साहाची पण तीच अवस्था होती. शेवटी दोघांनी खासगी शिकवण्या घेणे सुरू केले. पैसे मिळायला लागले पण मजा येत नव्हती. संशोधन करायचे म्हणून विज्ञान शाखा निवडली आणि आता करतोय काय.😬 प्रसिद्ध गणितज्ञ आशुतोष मुखर्जी यांनी ही कोंडी फोडली..
आशुतोष मुखर्जी यांनी भारतीय तरुणांनी विज्ञानात मूलभूत संशोधन करावे यासाठी १९१५ मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्सची स्थापना केली. विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता संशोधन करावे, संशोधन करताना आर्थिक चणचण भासू नये हा आशुतोष मुखर्जी यांचा उदात्त हेतू होता. त्यासाठी आपल्या वकील मित्रांकडून भरपूर निधी उभा केला होता. सी. व्ही. रामन आणि प्रफुल्लचंद्र रॉय यांना प्राध्यापक म्हणून तर मेघनाद सहा आणि सत्येंद्रनाथ बोस यांना अधिव्याख्याता म्हणून जोडून घेतले.बोस-साहा युतीने संशोधनात भरीव काम केले. १९१८मधे 'बोस अँड साहा इक्वेशन ऑफ स्टेट ऑफ गॅसेस' हा त्यांनी कायनॅटीक थियरी ऑफ गॅसेसच्या विषयातील लिहिलेला शोधनिबंध प्रसिद्ध झाला. याशिवाय पुढील दोन वर्षात चार शोधनिबंध प्रसिद्ध केले.
आशुतोष मुखर्जी यांनी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप तर दिलीच शिवाय आपली खाजगी लायब्ररी देखील त्यांनी उपलब्ध करून दिली होती. इतर कुठेही मिळणार नाहीत ती पुस्तके त्यांच्याकडे असायची. त्या काळात फ्रेंच आणि जर्मन शास्त्रज्ञ विज्ञानामध्ये आघाडीवर होते. त्यांनी केलेले काम समजणे विद्यार्थ्यांना शक्य व्हावे यासाठी बोस आणि साहा यांनी त्यांच्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करायला सुरुवात केली. लगेहाथ बोसबाबूंनी आइनस्टाइनच्या सापेक्षतावाद विषयावरच्या जर्मन भाषेतील लेखांचा इंग्रजीत अनुवाद करून टाकला. पण इथे एक लफडे झाले. या लेखांचा अनुवाद करण्याचे हक्क मॅथेन या ब्रिटिश व्यक्तीकडे होते. मॅथेनने कायदेशीर कारवाई करायची धमकी बोस यांना दिली. आइनस्टाइन भाऊला या मॅटरमध्ये मांडवली करायला लागली. आणि सत्येंद्रनाथांना ते लेख भारतात प्रसिद्ध करण्याची परवानगी मिळाली. यानिमित्ताने आइन्स्टाइन यांच्या नजरेत सत्येंद्रनाथ बोस आले.
युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्स संस्थेत पाच वर्षे व्याख्याता म्हणून काम केल्यानंतर सत्येन्द्रनाथांना ढाका विद्यापीठात रीडरची नोकरी चालून आली. १९२१मध्ये नुकतीच ढाका विश्वविद्यालयाची स्थापना झाली उपकुलपती डॉ. हार्टिग यांनी विज्ञान विभागाची चांगल्या प्रकारे स्थापना व्हावी, म्हणून बोस यांना बोलावून घेतले. बोस यांनी पुढची २५ वर्ष तिथे अनेक विद्यार्थी घडवले, भारताची पहिली महिला भौतिक शास्त्रज्ञ, पूर्णिमा सिन्हा ही त्यांचीच विद्यार्थिनी. १९२४ मध्ये मेघनाद साहा यांच्याशी ढाक्यात भेट झाली. तेव्हा त्यांच्यात मॅक्स प्लॅन्कच्या सिद्धांतावर चर्चा झाली. नंतर अनेक रात्री बोस झोपू शकले नाहीत.. त्यांना या सिद्धांतात त्रुटी जाणवत होत्या. एकच गणित अनेक पद्धतीने सोडवणारे बोस.. त्यांनी या सिद्धांताची मांडणी आपल्या शोधनिबंधात स्वत:च्या पद्धतीने केली. परंतु हा शोधनिबंध प्रसिद्ध करण्यास त्यांच्या नेहमीच्या मॅगझिन कडून नकार मिळाला. 😭
बोस यांना आपले काम तर्कशुद्ध असण्याचा विश्वास होता. त्यांनी हा शोधनिबंध डायरेक्ट आइनस्टाइनलाच पाठवला. आइनस्टाइनचे मोठेपण हे की तो त्याघडीला जरी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ झाला असला, तरी त्याने वेळ काढून हा शोधनिबंध वाचला. त्यांना या शोधनिबंधाचे महत्त्व पटले. त्यात थोड्या सुधारणा करून आणि भाषांतरीत करून प्रसिद्ध केला. बोस यांनी फोटॉन रेडिएशन हे पदार्थाची पाचवी अवस्था गाठू शकतात अशी मांडणी केली होती. आइनस्टाइन यांनी याचा विस्तार करून प्रत्यक्ष हेलियम कणांच्या, अणू अथवा रेणूवर संशोधन करण्यास उपयोग केला. म्हणूनच हा गॅसचा सिद्धांत "बोस आइनस्टाइन स्टॅटीस्टीक्स" नावाने प्रसिद्ध झाला. या घटनेमुळे सत्येंद्रनाथ बोस जगभरातील भौतिकशास्त्रज्ञांमध्ये मोठे नाव म्हणून गणले जाऊ लागले.
दोन वस्तू एकच जागा घेऊ शकतील का... साध्या भौतिकशास्त्राचे उत्तर असेल नाही.. पण क्वांटम भौतिकीत ते शक्य असते. दोन कण एकच जागा घेऊ शकतात, कारण त्यांचे वस्तुमान शून्य असते, ते उर्जेपासून तयार झालेले असून लहरींच्या स्वरुपात असतात. घन, द्रव, गॅस आणि प्लाझ्मा या पदार्थाच्या चार अवस्था आपल्याला माहीत. प्लाज्मा म्हणजे आयनीकृत गॅस. दीर्घिका, तारे स्पेसप्लाज्मामधून बनले आहेत, ब्रह्मांडात ९९.९९% प्लाज्माच असतो. पदार्थाची पाचवी अवस्था, ज्याला BEC (बोस-आइन्स्टाइन कंडेन्सेट) असेही म्हणतात.पृथ्वीवर ‘बीईसी’ ही पदार्थाची अवस्था केवळ काही मिलीसेकंदच टिकू शकते. त्यामुळे आपण या अवस्थेबाबत अनभिज्ञ होतो अवकाशात मात्र ही अवस्था एका सेकंदाहून अधिक काळ टिकत असल्याने शास्त्रज्ञांना निरीक्षण करण्यास वेळ मिळतो. शास्त्रज्ञांना अंतराळात पदार्थाच्या पाचव्या अवस्थेचे पुरावे देखील मिळाले आहेत. आता लवकरच ब्रह्मांड उत्पत्तीबाबत कोडे उलगडेल.
बोस यांना आता यावर अजून संशोधन करायचे होते, ज्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा आवश्यक होती. ढाका विश्वविद्यालयात अर्ज करून युरोपमध्ये शोधकार्याचा अनुभव घेण्यासाठी दोन वर्षांची रजा मागितली होती. मात्र रजा मंजूर अशी सहजसहजी कधी कुणाची झाली आहे का.... आइनस्टाइनने बोस यांना एक पोस्टकार्ड पाठवले होते. ते कार्ड दाखवले तर विद्यापीठात रजा पण मंजूर झाली, शिवाय जर्मन वकीलातीने एक पैसा फी ना घेता व्हिसा पण मंजूर केला.❤️
१८ ऑक्टोबर १९२४ रोजी पॅरिस शहरात बोसबाबू पोचले. मादाम मेरी क्युरीच्या लॅबमध्ये त्यांना काम करायचे होते. बोस यांना लॅंगेविन यांनी शिफारसपत्र दिले होते, मेरीची पोस्ट वाचली असेल त्यांना माहीत असेल की लॅंगेविनने शिफारस केली तर मेरी नाही म्हणू शकणार नाही. तरी ती बोलली की माझ्या इथे काम करायचे असेल तर फ्रेंच भाषा आली पाहिजे. आता खर तर बोसबाबू अस्लखित फ्रेंच बोलू शकत होते.. पण मेरी मॅडम पुढे ह्याचा कॉन्फिडन्स डाऊन झाला.. काहीच ना बोलता बाहेर आला.😭 दुसऱ्या प्रयोगशाळेत काम करू लागला. (तेव्हा गणपत बोलला असता तर मेरीचा सहायक म्हणून कदाचित तिथेच सेट झाला असता.. बरे झाले गणपत बोलला नाय😁)
कालांतराने मेरीच्या लॅबचे दरवाजे देखील त्यांना उघडे झाले. पण खुद्द मेरी सोबत काम करायची संधी मिळाली नाही. पॅरीस मध्ये १० महिने काम करून बोसबाबू जर्मनीला आले. आइन्स्टाईन, लिझ माईटनर, ओट्टो हान, मॅक्स प्लांक, एर्विन श्रोडिंजर, वोल्फगांग पॉली, वर्नर हायझेनबर्ग सगळे एकापेक्षा एक दिग्गज. आइन्स्टाइनशी नाव जोडले गेल्याने भाऊची सगळे इज्जत करायचे. तिथे हर्मन मार्क यांच्या प्रयोगशाळेत वर्षभर एक्स रे क्रिस्टलोग्राफी विषयावर संशोधन केले, याकाळात लिझ - हान जोडीचे किरणत्सर्ग विषयावरील काम पाहिले, गट्टींगणमध्ये जाऊन मॅक्स बोर्नचे काम पाहिले.
युरोपातून परत येताना आपल्या विद्यापीठात देखील कशी प्रयोगशाळा असावी याचा आराखडा मनात तयार होता. लवकरच ढाका विद्यापीठाची प्रयोगशाळा अतिशय सुसज्ज झाली. १९२६ साली जेव्हा ते ढाक्याला परत आले तेव्हा विद्यापीठात प्राध्यापक पदाची जागा रिकामी होती. भाऊने अर्ज केला, मात्र phd केलेली नसल्याने त्या जागेवर डी एम घोष यांची निवड झाली. घोषबाबू यांना स्वतः जॉईन व्हायचे नव्हते, तरी नकार कळवायला एक वर्ष घेतले. त्यानंतर बोस यांची निवड प्राध्यापक पदावर व भौतिक शास्त्र विभागप्रमुख झाली. लवकरच शास्त्र शाखेचे डीन म्हणून देखील बोस विराजमान झाले.
आता तुमच्या डोळ्यापुढे प्राध्यापकी आयुष्य आले असेल तसे बोस यांचे पाट्याटाकू आयुष्य नव्हते. बोस यांचा कॉलेजमधील दिवस सकाळी ७ वाजता वाजता सुरू व्हायचा तर रात्री उशिरा पर्यंत. मध्ये पंधरा मिनिटे जेवणाची सुट्टी वगळता दिवसभर व्यस्त. त्यांच्या दालनात मार्गदर्शन घ्यायला आलेल्या विद्यार्थ्यांची तोबा गर्दी असायची. व्याख्याने, प्रयोग सांभाळून विद्यार्थ्यांचे संशोधन कसे सुरू आहे यावर त्यांचे बारीक लक्ष असायचे. शिक्षक उत्साही असेल तर विद्यार्थी चांगलेच घडतात. संशोधनासाठी खूप चांगले पोषक वातावरण विद्यापीठात तयार झाले. त्यामुळेच १९३८ साली कोलकाता विद्यापीठातून ऑफर आली तरी बोस यांनी ती नाकारली.
पण दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्याची चाहूल लागली, आणि देशात फाळणीचे वारे वाहू लागले. ऑगस्ट ४६ मध्ये मुस्लिम लीगने सलग तीन दिवस प्रत्यक्ष कृती दिन अमलात आणला. Divide or distroy India असा नारा जीना यांनी दिला होता. संपूर्ण बंगाल प्रांतात प्रचंड रक्तपात झाला. त्यात ढाका विद्यापीठ म्हणजे अगदी शहराच्या मध्यवस्तीत होते, दंग्यांच्या केंद्रभागी. काम करणे अवघड व्हायला लागले, त्यातच काही विद्यार्थी देखील निघृणपणे मारले गेले. म्हणून नाईलाजास्तव त्यांनी ढाका सोडले. आयुष्यातील उमेदीची २५ वर्ष जिथे काढली त्या प्रियभूमीला व्यथित अंतःकरणाने निरोप दिला.. आणि लवकरच ती भूमी परदेश देखील झाली.😔 कोलकाता विद्यापीठामधे पुढील १० वर्ष प्राध्यापकी केली.
लवकरच देश स्वतंत्र झाला. पहिले पंतप्रधान वैज्ञानिक दृष्टी असलेले होते. " केवळ विज्ञानच मानवाच्या भुकेचे उत्तर देऊ शकेल" असे मानणारे होते. त्यांनी देशभरातील नामांकित वैज्ञानिकांना बोलावून एक परिषद बनवली, जी देशाची विज्ञान विषयक धोरणे ठरवेल. १९४८ मध्ये बोस यांना राष्ट्रीय विज्ञान संस्थेचे अध्यक्षपद देण्यात आले. १९५४ साली बोस यांना पद्मविभूषण सन्मानाने गौरवण्यात आले, राज्यसभेची खासदारकी देखील देण्यात आली. तर १९५९ साली नॅशनल प्रोफेसर या संशोधकांसाठी असलेल्या सर्वोच्च पदाने भूषवण्यात आले. त्याच वर्षी लंडनच्या रॉयल सोसायटीने त्यांना सदस्यत्व देऊन सन्मानित केले.
१९५६ मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर शांतिनिकेतनचा भाग असलेल्या विश्वभारती विद्यापीठाचे उपकुलपती म्हणून त्यांची नेमणूक झाली. विश्वभारती हे केंद्रीय विद्यापीठ असून पंतप्रधान हे त्याचे पदसिद्ध प्रमुख असतात. अपारंपारिक शिक्षण देताना उच्च जीवनमूल्ये रुजवण्यासाठी विश्वभारतीची निर्मिती झाली होती. टागोर यांचा मानवता दृष्टिकोन देशाच्या सीमा पार करणारा, विश्वबंधुत्वचा नारा देणारा होता.❤️ (मागच्या आठवड्यात नॅशनल बहुरूपी, जो टागोर दिसण्यासाठी प्रयत्न केला तरी आसाराम दिसतो, त्याने भाषणात टागोर यांना चक्क राष्ट्रवादी करून टाकले राव.. अभ्यास नाही तरी काय पण फेकतो😭 )
विश्वभारतीमध्ये बोस जास्त काम करू शकले नाहीत.जसे स्वतः गांधींपेक्षा जास्त गांधी आम्हाला समजला आहे, असा दावा गांधीवादी करतात मात्र त्यांना गांधी "घंटा" कळलेला नसतो. अगदी तसेच विश्वभारतीमध्ये देखील व्हायला लागले. तेथील पदाधिकारी लोक "रवींद्रनाथ टागोर हे कसे विज्ञान विरोधी होते, विज्ञान हेच चंगळवादाचे मूळ आहे असे सांगत त्यांनी तंत्रज्ञानाला कसा विरोध केला होता" हे ठासून सांगायला लागले. खर तर रविंद्रनाथ टागोर यांनी विज्ञानावर लिहिलेले 'विश्व परिचय' नावाचे पुस्तक त्यांनी बोस यांना समर्पित केले होते. असो... अश्या वातावरणात बोस काम करणे शक्य नव्हते त्यांनी राजीनामा देऊन टाकला.
नंतरचे सगळे आयुष्य जनसामान्यासाठी विज्ञान सोपे करण्यात, बंगाली भाषेत उपलब्ध करून देण्यात घालवले. बंगाल सायन्स असोसिएशनची स्थापना केली. तसेच ज्ञान-विज्ञान नावाचे एक मासिक सुरू केले. आणि एक.. संगीत आणि भौतिकशास्त्र यांचे नाते इथे पण आहे बरं का... व्हायोलीनच्या कुळातील एसराज नावाचे वाद्य ते अतिशय उत्तमपणे वाजवु शकत.. मित्रांच्या घरी लग्न समारंभाला यांच्या एसराज वादनाचा कार्यक्रम असे. ( कदाचीत आइन्स्टाइन किंवा मॅक्स प्लांक सोबत पण मैफिली झाल्या असाव्यात राव.. मी शोधले पण मला नाही सापडले)
१ जानेवारी १९७४.. बोस सरांचा ८० वा वाढदिवस, त्याच वेळी बोस आइन्स्टाइन सांख्यिकी सिद्धांताचा सुवर्ण महोत्सव. वाढदिवस साजरा करायला देश विदेशातील शास्त्रज्ञ आले होते. अतिशय धामधुमीत समारंभ साजरा झाला... त्या वेळी बोलताना आनंदाने भाऊक होऊन बोस म्हणाले.. "सगळे भरून पावलो.. आता मला अजून जगायची इच्छा नाही." आणि त्यानंतर एकाच महिन्यात ४ फेब्रुवारी १९७४ रोजी हृदयविकाराच्या आजाराने त्यांचा श्वास थांबला.
बोस यांना चार वेळा नोबेल साठी नामांकन मिळाले होते, त्यांनी मांडलेल्या सिद्धांतावर पुढे संशोधन कडून अनेक शास्त्रज्ञांना नोबेल मिळाले, मात्र यांना नोबेल नाही भेटले. प्रसिद्ध संशोधक जयंत नारळीकर म्हणतात, "बोस यांचे प्रकाश कणांवरील संशोधन म्हणजे विसाव्या शतकातील पहिल्या दहा सर्वोत्तम संशोधनापैकी आहे की जे नोबेलसाठी पात्र आहे" अर्थात बोस स्वतः मात्र याबाबत तक्रार करत नाहीत. "माझ्या योग्यतेनुसार माझी ओळख निर्माण झाली आहे, मला अजून काही नको". विज्ञान नम्र असते याचा हा पुरावा. फळे लगडलेली झाडेच वाकलेली असतात... या नम्र स्वभावामुळेच phd नसलेला हा शास्त्रज्ञ नॅशनल प्रोफेसर पदासाठी उचित ठरतो. संशोधन करताना डिग्री लागत नसते, लागते विषयाची प्रचंड आवड, निष्ठा, नम्रपणा, संयम आणि मानवतेवर अढळ प्रेम.❤️
जय विज्ञान जय मानवता✊🏾✊🏾
#richyabhau
#सत्येंद्रनाथ बोस
खूप छान माहिती
ReplyDelete❤️🙏🏾✊
Delete