शनि आणि साडेसाती

शनि आणि साडेसाती.
सूर्यमालेतील सूर्यापासून सहावा आणि आकाशातील उघड्या डोळ्यांनी दिसणारा सर्वात दूरचा ग्रह.. भोवती असलेल्या कड्यांमुळे दुर्बिणीतून अतिशय सुंदर दिसतो, मात्र त्याला जेवढं बदनाम केलं आहे, तेव्हढ इतर कुणालाच नाही. गब्बर, मोग्यांबो, शाकाल, जगिरा या सर्वांची दहशत एकत्र केली तरी एका शनि पुढं फिकी होऊन जाते. त्यात त्याला काळा रंग जोडून अंधारयात्री करून टाकलं आहे. आणि तमराज किल्विष म्हणतो तसं "अंधेरा कायम रहे" हा मंत्र काही लोकांच्या फायद्याचा ठरतं असतो. 🦹🏽‍♂️ आजवर शनिदेवावर जेवढे सिनेमे, मालिका आल्या, तिथं शनि काळे कपडे, काळा गंध लावूनच दिसला आहे. फोटोमध्ये पण पाहा ना.. कावळ्यावर बसलेल्या या शनिदेवला प्रसन्न करण्यासाठी काय काय लागतं.. काळे तीळ, काळे कापड, काळे उडीद... मी तर त्याला प्रसन्न करायला रीबनचा काळा गॉगल पण दिला आहे.😂 पण मुळात शनि आणि काळा हा संबंध आला कसा?? मला वाटतं की शिंगणापूरची शिळा काळी आहे म्हणून तर शनिला ब्लॅक लिस्टेड केलं नाही ना...की काळी आहे म्हणून तिला तिथं बसवली.. कुणी तरी शोधा राव.. खर तर आकाशातील शनि ग्रहाचा आणि शिंगणापूरच्या शनि म्हणवला जाणाऱ्या दगडाचा काहीच संबंध नाही.. शनि हा आपल्या सौरकुलातील सर्वात सुंदर ग्रह.. त्याच्याभोवती असलेल्या विलोभनीय कड्यांमुळे हा ग्रह भूगोलाच्या पुस्तकातील आकर्षण असतो. वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये शनिचं वेगवेगळं महत्त्व आहे. बाबिलोयीन संस्कृतीत त्याला शेतीच्या देवतेचं प्रतीक मानलं तर चीन आणि जपानमध्ये तेथील पंचमहाभूत प्रणालीतील पृथ्वीतत्वाचा देव मानलं आहे. हा हायड्रोजन आणि हेलियम या वायुंचा बनलेला आहे. रागीट म्हणून बदनाम केलं असले तरी अतिशय थंड स्वभाव आहे याचा.. इथं सरासरी तापमान उणे १७८° असतं. शनिची घनता एवढी कमी आहे की तो आपल्या समुद्रात फेकला तर तरंगेल.. डुबनार नाही.. (फक्त उदाहरण दिलंय.. लगेच विचार करू नका फेकायचा.. आपल्या पृथ्वीपेक्षा त्याचा व्यास दहापट आहे. घनफळाचा विचार करता ७५० पृथ्वी त्याच्या पोटात बसतील) त्याच्या भोवती फिरणारी कडी पाणी आणि धुलिकणांची बनलेली आहे. गॅलिलिओला सर्वप्रथम ही कडी दिसली होती. ❤️ आता तर शनिने सर्वात जास्त चंद्र असल्याचा "मूनकिंग" चा किताब गुरूकडून हिसकवून घेतला आहे. गुरूच्या ७९ उपग्रहांच्या तुलनेत शनिचे ८२ उपग्रह नोंदवले गेले आहेत. त्याचा सर्वात मोठा उपग्रह टायटन हा जवळजवळ संपूर्ण नायट्रोजनपासून बनलेला आहे. या टायटनबद्दल अनेक शास्त्रज्ञांना जीवसृष्टी असल्याचा संशय होता. मात्र आजवर नासाने पाठवलेल्या पायोनियर ११ आणि व्हॉएजर १ आणि २ या तीनही अंतराळयानांनी तसेच कासिनी या उपग्रहाने नोंदवलेल्या निरीक्षणातून तिथं जीवसृष्टी असल्याचे पुरावे सापडले नाहीत. अंतराळाच्या अनंताचा शोध घेत पायोनियर ११ ने अंतराळात १५ अब्ज किमी अंतर कापले असून त्याच्यानंतर सोडलेल्या व्हॉएजर १ आणि २ हे अनुक्रमे २३ अब्ज आणि १९ अब्ज किमी अंतर कापून त्याला ओव्हरटेक केलं आहे. नासाने १९९७ मध्ये कासिनी हा उपग्रह शनिच्या दिशेने सोडला होता. याचं मुख्य काम होतं ते शनि ग्रह आणि त्याची एकूण प्रणाली, त्याचे उपग्रह आणि शनिचा कडांचा अभ्यास करणं. शनिचे बाह्य आणि वातावरण याबाबत आपल्याला त्याने आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवली आहे. कासिनीने शनिच्या नव्या सहा उपग्रहांचा शोध घेतला आहे. शनिच्या उपग्रहांपैकी आकाराने सहाव्या क्रमांकावर असलेल्या उपग्रहावर पाणी असून तिथं जीवसृष्टी असण्याची शक्यता कासिनीने नोंदवली आहे. कासिनी शनिच्या कक्षेत २००४ साली पोचला, पुढं जवळजवळ १३ वर्ष तो त्याच्याभोवती फिरत काम करत होता. २०१७ मध्ये त्याचं इंधन संपल्यानं त्याची आणि टायटनची धडक व्हायची शक्यता होती. ही धडक टाळण्यासाठी त्याला शनिच्या पृष्ठभागावर कोसळवून नष्ट करण्यात आलं. प्रकाशाचा वेग सुमारे ३ लाख किमी प्रती सेकंद असतो.. या वेगाने शनिवरील या स्फोटाचा प्रकाश ८३ मिनिटे घेऊन पृथ्वीवर पोचला होता, तेव्हा त्याच्या स्फोटाची नोंद नासाच्या शास्त्रज्ञांना करता आली…म्हणजे इथं बसून नासाचे शास्त्रज्ञ तिकडे शनिवर सोडलेला उपग्रह नियंत्रित करत होते. 😍 नासाने काय पण करू द्या.. आम्हाला मात्र एकच शनि माहित आहे. आज आहे शनिवार.. शनि मंदिरात जाऊन काळे उडीद टाकण्याचा वार. आणि लाईनमध्ये अगदी शिकलेले आय टी मध्ये काम करणारे तरुण देखील ऐटीत उभे असतात.. एवढी अक्कल चालवत नाहीत की शनि हा आपल्यापासून सरासरी १३० कोटी किमी लांब आहे.. तो आपल्याला काय करणार आहे. सोबतच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे शनि काय हातात दुर्बीण घेऊन बसला आहे का? जनमानसात या शनिची एवढी दहशत का.. हे पाहणे गरजेचे आहे. पुराणकथांमध्ये शनि हा जरी सूर्याचा मुलगा मानले जात असले तरी त्याचे आणि सूर्याचे वाकडे आहे. शनि हा सूर्य आणि छाया यांचा मुलगा. असे म्हणतात की छाया आणि सूर्य एकांतात असताना "भरात" आलेल्या सूर्याचं तेज सहन न झाल्याने छायाने डोळे झाकून घेतले. त्यामुळे जन्माला आलेलं बाळ सावळं झालं. (पांडू, धृतराष्ट्रची पण अशीच कहाणी सांगतात राव.. फलनाच्या वेळी आईने अमुक केलं, आणि बाळ असं झाल.. 🤣) हे सावळं बाळ माझं असू शकत नाही… सूर्याने हात वर केले.. छायाने सूर्याशी संबंध तोडले. सूर्य उपस्थित असेल त्या जागेवरून ती निघून जाऊ लागली. तिने एकटीने शनि वाढवला.. आणि मोठ्या झालेल्या शनिने सूर्याशी खुन्नस धरली. तो खूप डेंजर झाला🤣🤣 शनिने शंकराची तपश्चर्या केली. भोलेबाबा बोलले काय पाहिजे.. शनि बोलला माझ्या आईचा बदला मला पूर्ण करायचा आहे. भोलेबाबाने त्याला वरदान दिले की तुला एवढी शक्ती असेल की सर्वच देवदानव तुला घाबरतील.. देवदानव जाऊ द्या.. पण भारतातल्या लोकांना शनिची भीती असते कारण त्यांच्या कुंडलीत शनिची साडेसाती लागलेली असते.. जे लोक कुंडलीवर विश्वास ठेवतात, त्यांना दर तीस वर्षाने साडेसात वर्ष साडेसाती असते.. जे विश्वास नाही ठेवत त्यांना नाही लागत😂😂😂😂 मुळात साडेसाती लागते कशी हे आपण पाहू. शनिला त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षणा पूर्ण करण्यासाठी साधारण तीस वर्षे लागतात. म्हणजेच शनि एका राशीमध्ये अडीच वर्ष असतो. आता समजा आज शनि हा वृषभ राशीत असेल तर वृषभ, त्याच्या आधीची मेष आणि त्याच्यानंतरची मिथुन असे तीन राशींना शनिची साडेसाती असते असं ज्योतिषी सांगतात. म्हणजेच शनि जेव्हा मेष राशीत आला असेल ती अडीच वर्ष, वृषभ राशीमध्ये असेल ती अडीच वर्ष, आणि मिथुन राशि मध्ये असेल ती अडीच वर्ष अशी टोटल साडेसात वर्षे साडेसाती ही वृषभ राशीला असते. शनि बिचारा सूर्याभोवती फिरत राहतो आणि साडेसातीच्या कचाट्यात पुढची राशी येत राहते.. शनि बिचारा आपल्या कक्षेत फिरत राहतो आणि इकडे ज्योतिषांचा धंदा चालूच राहतो.🤭 आजच्या धकाधकीच्या जीवनात ना नोकरी मिळते, ना छोकरी.. बरं या मिळाल्या तरी टिकतील याची गॅरंटी नाही.. मग ज्याला आपल्या प्रश्नावर सोपं उत्तर हवं असतं.. त्यासाठी ते ज्योतिषाकडे जातात.. आणि तो बरोबर त्यांना गाडतो. साडे सात वर्ष हे खरचं खूप मोठा काळ आहे. या काळात अनेक उलथा पालथी होणे शक्य असते. चांगल्या गोष्टी देखील घडू शकतात, आणि वाईट देखील.. मात्र त्याचा संबंध लोक साडेसातीशी लावतात. डोक्यात एकदा भीती बसली की तर्क काम करत नाही. शनिच्या आड दडून ज्योतिषी त्यांचीच लुबाडणूक करतो, ज्यांचा जोतिष्यावर विश्वास आहे. किती वाईट ना.. 😭😭 कुणाला घाबरायचे असेल त्याने घाबरा..आपल्याला तर शनि ग्रह आवडतो.. तो काय आपले वाकडे करणार नाही आपल्याला माहीत.. रिच्या लव्ह यू शन्या😘😘 कालच्या पोस्ट मध्ये गुरू शुक्र शनि यांना आकाशात कसे ओळखायचे हे सांगितले आहे. आज शनि ला एक फ्लायिंग किस नक्की फेका.. 😘 बाकी मिलिंद गुणाजीला शनिदेवच्या रोलमध्ये बघून वाईट वाटलं होतं. जसं सयाजी शिंदे यांना गजानन बाबाच्या आणि मोहन जोशी यांना स्वामीच्या रोल मध्ये पाहून... पोटासाठी काय काय करावं लागतं बाबा लोकांना.. 😬😬 गरिबी लय वाईट ..😔😔 पोस्ट आवडली तर शेअर करा.. सात ठिकाणी शेअर केली तर साडेसाती पासून कायमची सुटका😂😂 #richyabhau #साडेसाती आपला ब्लॉग : https://richyabhau.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव