कृमीविवर.. अवकाशातील बोगदा

कृमीविवर.. अवकाशातील बोगदा रुमालाची घडी घालून ज्या पद्धतीनं आपण त्याची दोन टोकं एकत्र किंवा जवळ आणू शकतो, तसं अंतराळात शक्य आहे का? अवकाशातील अंतरं प्रचंड मोठी आहेत. अगदी आपल्या दीर्घिकेच्या म्हणजे आकाशगंगेच्या दोन टोकांमध्ये एवढे अंतर आहे की ते पार करण्यास प्रकाशाला पंचवीस हजार वर्षे लागतात. आणि अश्या अब्जावधी दीर्घिका अवकाशात आहेत. हे अंतर मानवाला कधीच पार करता येणार नाही का या प्रश्नानं शास्त्रज्ञांना भेडसावलं आहे, मात्र त्यावर कदाचित कृमीविवर हे उत्तर असेल. कृमीविवर म्हणजे अवकाशातील बोगदा!! ज्याप्रमाणं एखादा किलोमिटरचा बोगदा काढला तर वीस पंचवीस किलोमिटरचा घाटरस्ता टाळता येतो, तसंच इथंदेखील होऊ शकतं. बांद्रा ते वरळी हे अंतर निम्मं करण्यासाठी ज्या पद्धतीनं आता नवीन सागरीसेतू तयार केला आहे, तसंच वर्महोल अर्थात कृमीविवर असेल अशी कल्पना शास्त्रज्ञ गेल्या शंभर वर्षांपासून करत आहेत. अल्बर्ट आईन्स्टाईन आणि नॅथन रोजेन यांनी अश्या सेतूची कल्पना मांडली. म्हणूनच या सेतूला आइन्स्टाइन- रोजेन ब्रिज असं नाव देण्यात आलं आहे. ल्युडविग फ्लॅम यांनी कृमीविवराची संकल्पना सर्वप्रथम मांडल...