कितने तेजस्वी तारे है हमारे पास!

 कितने तेजस्वी तारे है हमारे पास!



उगवत्या किंवा मावळत्या सूर्याला पाहणे हा सुंदर अनुभव असतो, मात्र आपल्याकडं उगवत्या सूर्याला अधिक महत्त्व दिलं आहे. “उगवत्या सूर्याला दंडवत” असा मराठीत वाक्प्रचारदेखील आहे. मात्र आपण जो सूर्य पाहत असतो तो साडेआठ मिनिटं शिळा असतो! तुम्ही म्हणाल की असं कसं? प्रकाशाचा वेग एका सेकंदाला सुमारे ३ लाख किलोमीटर असतो. या वेगाने सूर्य ते पृथ्वी हे अंतर पार करण्यास प्रकाशकिरणांना साडेआठ मिनिटं लागतात. एखादी गोष्ट आपल्याला दिसते, याचा अर्थ त्या वस्तूपासून निघालेला प्रकाश आपल्यापर्यंत पोचतो. जेव्हा आपण आकाशात व्याधाचा तारा पाहत असतो, तेव्हा आपण सुमारे साडेआठ वर्ष जुना तारा पाहत असतो. त्याच्यापासून निघालेला प्रकाश आपल्याला ८.६ वर्षांनी दिसतो कारण तो पृथ्वीपासून ८.६ प्रकाशवर्ष दूर आहे. 

प्रकाशवर्ष हे कालमापनाचं नाही तर अंतर मोजायचं एकक आहे बरं का! अंतराळातील दोन ताऱ्यातील अंतरं खूपच जास्त असतात. सूर्याला सर्वात जवळ असलेला दुसरा तारा म्हणजे अल्फा सेंटोरी हा ३७८०० अब्ज किलोमीटर दूर आहे. इतर अंतरं त्याहून कैकपटीने अधिक आहेत. ही अंतरं सोप्या पद्धतीनं मांडण्यासाठी प्रकाशाचा वेग वापरला जातो. प्रकाश एका वर्षात सुमारे साडे नऊहजार अब्ज किलोमीटर प्रवास करतो, या अंतराला एक प्रकाशवर्ष असं नाव दिलं आहे. सूर्यापासून अल्फा सेंटोरी हा ४.३ प्रकाशवर्ष दूर आहे. तुम्ही भूगोलाच्या पुस्तकामध्ये जिलेबीसारखं दिसणारं आकाशगंगेचं चित्र पाहिलं असेल. आपलं सूर्यकुटुंब असलेल्या या दीर्घिकेला इंग्रजीत मिल्की आणि मराठीत आकाशगंगा असं नाव दिलं आहे. आकाशगंगेचा व्यास सुमारे एक लाख प्रकाशवर्ष आहे, ज्यामध्ये आपल्या सूर्यासारखे १०० ते ४०० अब्ज तारे असावेत असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. 

आकाशगंगेच्या केंद्रबिंदूपासून आपलं सूर्यकुटुंब सुमारे सव्वीस हजार प्रकाशवर्षे दूर आहे. आपला सूर्य या केंद्राभोवती आपली एक फेरी २५ कोटी वर्षात पूर्ण करतो. आकाशगंगेपासून सर्वात जवळ असलेली अँड्रोमेडा ही दीर्घिका २५ लाख प्रकाशवर्षे दूर आहे. मराठीत आपण तिला “देवयानी” असं सुंदर नाव दिलं आहे. अवकाशात अशा दोनशे अब्ज दीर्घिका आहेत. त्यामुळे या अफाट विश्वाची लांबी मोजण्यासाठी प्रकाशवर्ष हे एकच देखील कमी पडते. म्हणून पार्सेक, किलोपार्सेक, मेगापार्सेक, गिगापार्सेक ही एकके वापरली जातात. एक पार्सेक म्हणजे ३.२६ प्रकाशवर्षे. किलो, मेगा आणि गिगापार्सेक ही एकके अनुक्रमे आणि प्रत्येकी हजार पटीने वाढत जातात. म्हणजेच एका गिगापार्सेकमध्ये सुमारे ३२६ कोटी प्रकाशवर्षे सामावलेली असतात. सध्या ज्ञात असलेल्या ब्रम्हांडाचा व्यास सुमारे २८.५ गिगापार्सेक म्हणजेच ९३ अब्ज प्रकाशवर्षे मोठा आहे. 

या अफाट, अथांग विश्वाचा ठाव घेत असतानाच आपण आजही अंधश्रद्धांच्या जाळ्यामध्ये अडकलो आहोत. आपल्याकडे बाळ जन्माला आले की त्याची कुंडली पाहिली जाते. त्यादिवशी चंद्र कोणत्या राशीत असेल ती रास जात आणि धर्माप्रमाणे त्या बाळाला आयुष्यभर चिकटते. मात्र या राशी आणि चंद्र यांचा काही संबंध नसतो. या राशी आपल्या पृथ्वीपासून अनेक प्रकाशवर्षे दूर असतात. खरं तर या राशीसमुहामध्ये देखील अनेक तारे समाविष्ट असतात, जे एकमेकांपासून शेकडो प्रकाशवर्षे दूर असू शकतात, ते केवळ आपल्याला शेजारी दिसतात. मेष राशीतील अश्विनी नक्षत्रात असलेला सर्वात तेजस्वी “हमल” हा तारा पृथ्वीपासून ६६ प्रकाशवर्षे दूर आहे. वृषभ राशीत असलेला सर्वात तेजस्वी तारा अल्डेबारन म्हणजेच रोहिणी नक्षत्र हे पृथ्वीपासून ६५ प्रकाशवर्षे दूर आहे. आर्द्रा नक्षत्र म्हणजेच बिटलजुस हा मिथुन राशीजवळ असणारा तारा आकाशातील सर्वात तेजस्वी ताऱ्यांमध्ये दुसरा क्रमांक पटकावतो. हा तारा आपल्यापासून चौतीस प्रकाशवर्षे दूर आहे.

कर्क रास आणि त्यातील पुष्यनक्षत्र आपल्यापासून सुमारे तीनशे प्रकाशवर्ष दूर आहे. पुढच्या गुरुवारी, २२ तारखेला कॅलेंडरमध्ये गुरुपुष्यामृतयोग सांगितला आहे. चंद्र दररोज एका नक्षत्रात असतो. म्हणजेच तो प्रत्येक महिन्यात एक दिवस पुष्य नक्षत्रासमोर दिसतो. मात्र जर तो दिवस गुरुवार असेल तर गुरुपुष्यामृतयोग आहे, हा मुहूर्त सोन्याच्या खरेदीसाठी चांगला आहे असं सांगितलं जातं. हा योग खूप दुर्मिळ आहे असंदेखील सांगितलं जाते. दुर्मिळ वगैरे काही नाही, या एकाच वर्षात हा योग पाचवेळा येणार आहे! अंतराची तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की गुरुपुष्यामृतयोग या मुहूर्तामध्ये काहीच तथ्य नाही. पुष्य नक्षत्रातील सर्वात तेजस्वी असलेला बीटा कॅंक्री तारा आपल्यापासून २९० प्रकाशवर्षे दूर आहे आणि चंद्र आपल्यापासून केवळ सव्वा सेकंद दूर आहे. म्हणजेच या गुरुपुष्यामृतयोगात काही गूढ नाही. हा योग केवळ सोन्याची विक्री करणाऱ्यांसाठीच खात्रीने लाभदायक ठरतो!! 

वरील राशींप्रमाणेच सिंह राशीतील मघा नक्षत्राचा रेगुलस तारा ७९ प्रकाशवर्षे, तसेच कन्या राशीत असलेल्या हस्त नक्षत्रात मनगटाची भूमिका बजावणारा बीटा कॉर्वी हा तारा दीडशे प्रकाशवर्षे दूर आहे. तूळ राशीत सर्वात तेजस्वी असलेला चित्रा नक्षत्राचा तारा २५० तर जेष्ठा नक्षत्र म्हणजे वृश्चिक राशीतील अँटारेस हा तारा आपल्यापासून ५५० प्रकाशवर्षे दूर आहे. धनु राशीतील मूळ नक्षत्र आणि त्याचा नुंकी तारा २२८ तर मकर राशीत असलेल्या श्रवण नक्षत्रातील अल्टेअर हा सर्वात तेजस्वी तारा अवघा सतरा प्रकाशवर्षे दूर आहे. “शततारका” या नावातच शंभर तारे असले तरी कुंभ राशीतील या नक्षत्राचा सर्वात तेजस्वी अल्फा ॲक्वारीस हा तारा ५२० प्रकाशवर्षे दूर आहे. मीन राशीतील रेवती नक्षत्राचा एटा पिश्युम हा तारादेखील ३५० प्रकाशवर्षे दूर आहे. 

म्हणजेच ही सर्व नक्षत्रं आपल्यापासून किमान सतरा तर कमाल ५५० प्रकाशवर्षे दूर आहेत. कल्पनाशक्तीचा वेग प्रकाशापेक्षा जास्त असल्याने आपल्या पूर्वजांनी ही राशी आणि नक्षत्रं तुमच्या कुंडलीत बसवली होती. मात्र आता आपल्याला समजलं आहे की या राशी आणि नक्षत्रं आपल्या आयुष्यात चांगला किंवा वाईट काहीच बदल घडवू शकत नाहीत. आतातरी यांची भीती सोडली पाहिजे ना राव!!

 निसर्गाने सजीवांना जश्या काही क्षमता दिल्या आहेत, तश्या काही मर्यादा देखील दिल्या आहेत. मानव मात्र या नैसर्गिक मर्यादांवर मात करण्याचा प्रयत्न सातत्याने करतो आहे. यंत्रांचा, अवजारांचा, उपकरणांचा वापर करून मानवाने स्वतःची शक्ती आणि कार्यक्षमता वाढवली आहे. दृष्टीची क्षमता देखील वाढविण्याचे सातत्याने प्रयत्न झाले आहेत. उघड्या डोळ्यांनी आपण ०.१ मिलिमीटर पाहू शकत होतो. आपल्या केसाचा व्यास साधारण एवढा असतो. प्रकाशाधारीत सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने आपण त्याच्या दोनशे पट अधिक सूक्ष्म म्हणजे ५०० नॅनोमीटर एवढा लहान आकार पाहू शकत होतो. (एक मीटर म्हणजे एक अब्ज नॅनोमीटर) आता इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने ०.१ नॅनोमीटर ही क्षमता गाठता आली आहे. दूरदृष्टी असलेला व्यक्ती असे कौतुकार्थी विशेषण अनेकवेळा वापरले जाते. दूरवरचे डोंगर, पर्वत आपण पाहू शकतो, मात्र साधारणतः एक किलोमीटर अंतरावर असलेला माणूस आपल्याला स्पष्ट दिसत नाही. 

दृष्टीची क्षमता वाढविण्यासाठी चष्मे आणि दुर्बिणीचा शोध लावण्यात आला. कमजोर झालेल्या नजरेला दुरुस्त करणारा पहिला चष्मा १२९० मध्ये तयार करण्यात आला तर डबल भिंगाचा पहिला चष्मा बेंजामिन फ्रँकलिनने १७८४ मध्ये तयार केला. १६०८ मध्ये हान्स लिपर्शे याने अंतर्वक्र आणि बहिर्वक्र भिंगे वापरून पहिली दुर्बिण बनवली जी तीन पट मोठी प्रतिमा दाखवू शकत होती. दुर्बिणीचा उपयोग मुख्यतः दूरवर सुरू असलेल्या सैन्यदलाच्या हालचाली टिपण्यासाठी होणार होता. मात्र गॅलिलिओने ही दुर्बिण आकाशाकडे रोखली. त्याने १६०९ मध्ये बनवलेली दुर्बिण आठपट मोठे चित्र दाखवत चंद्रावरील खड्डे पाहू शकत होती. त्याने ३० पट मोठे चित्र दाखवण्यापर्यंत दुर्बिणीच्या क्षमतेला वाढवले. 

१६११ मध्ये फक्त बहिर्वक्र भिंगे असलेल्या दुर्बिणीचा वापर करत केपलर याने ग्रहांच्या गती आणि कक्षेविषयक तीन नियम मांडले. १६६८ मध्ये आयझॅक न्यूटन याने तत्कालीन दुर्बिणीमध्ये सुधारणा केली. त्यानंतर दुर्बिणीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तिच्या परावर्तक आरशांवर वेगवेगळ्या पदार्थांचे लेप देण्याचे प्रयोग शेकडो वर्षे सुरू राहिले. १९३२ मध्ये या आरशांवर अल्युमिनियमचे कोटिंग चढले. ६० इंच व्यासाची माउंट विल्सन, १०० इंच व्यासाची हुकर, २०० इंच व्यासाची हेल तर ४०० इंच म्हणजे १० मीटर व्यासाची केक टेलिस्कोप अश्या दुर्बिणीच्या सुधारित आवृत्त्या येत गेल्या आणि अवकाश लहान होऊ लागले. 

हबल दुर्बिणीने तेरा अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या एरेंडेल या ताऱ्याच्या वेध घेतला होता. दोन वर्षांपूर्वी अवकाशात सोडलेली जेम्स वेब टेलिस्कोपची क्षमता हबलपेक्षा जास्त असल्याने तिला या एरेंडेलचे रंग आणि तरंगलांबी देखील मोजता आली आहे. एकेकाळी आपण केवळ १६३०८ प्रकाश वर्षे दूर असलेला व्ही ७६२ कॅसीओपिया हा तारा पाहू शकत होतो, मात्र आता आपण अब्जावधी वर्षापूर्वी जन्माला येणारा तारा पाहू शकत आहोत, वेगवेगळ्या दीर्घिका कशा तयार होत आहेत ते पाहू शकत आहोत. तिथून तेव्हा निघालेला प्रकाश जेम्स वेब टेलिस्कोपमधील तंत्रज्ञानाच्या साह्याने आज पाहू शकत आहे, अगदी बिग बँगच्या क्षणाजवळ आपण जाऊन पोचलो आहोत. 

आकाशात जेव्हा आपण उघड्या डोळ्यांनी ग्रह पाहतो, तेव्हा शुक्र सर्वात तेजस्वी दिसतो. जर तुम्ही तेजस्वितेची आकडेवारी पहिल्यांदा पाहायला जाल तर ती तुम्हाला गोंधळात टाकेल. कारण इथे जेवढा तेजस्वी तारा त्याची त्याचे मॅग्नीट्युड तेवढे कमी असते. एका बिंदूनंतर हा आकडा ऋणात्मक असतो. दोन ताऱ्यांच्या मॅग्नीट्युडमध्ये ५ चा फरक असेल तर याचा अर्थ एक तारा दुसऱ्यापेक्षा १०० पट अधिक तेजस्वी आहे. मॅग्नीट्युड अर्थात तेजस्विता ही स्थानसापेक्ष भासते, चंद्र हा बुधापेक्षा निस्तेज असला तरी पृथ्वीपासून जवळ असल्याने तो अधिक तेजस्वी दिसतो. म्हणून मोजताना मूळ आणि पृथ्वीवरून दिसणारी अश्या दोन पद्धतीने तेजस्विता मोजली जाते. 

आपल्या सूर्याचे मॅग्नीट्युड -२६.८ तर चंद्राचे -१२.७ आहे. सूर्यमालेतील ग्रहांचे मॅग्नीट्युड त्यांच्या सूर्याभोवती फिरताना लंबवर्तुळाकार कक्षेतील सूर्यापासून असलेल्या अंतरावर अवलंबून असते. ग्रहांमध्ये सर्वात तेजस्वी दिसणाऱ्या शुक्राचे -४.६, गुरूचे -२.७, मंगळाचे -२.३ बुधचे -२.२ आणि शनीचे मॅग्नीट्युड -०.४ आहे. युरेनसचे मॅग्नीट्युड +५.७ आणि नेपच्यून चे +७.९ आहे. आपण उघड्या डोळ्यांनी +६ मॅग्नीट्युड पर्यंतचे तारे पाहू शकतो. त्यामुळे प्रयत्न केला तर उघड्या डोळ्यांनी आपण युरेनस पाहू शकू, मात्र नेपच्यून आपल्याला दिसू शकणार नाहीत. 

एखादा तारा जर निळसर दिसत असेल त्यापेक्षा लालसर दिसणाऱ्या ताऱ्यांपेक्षा उष्ण असेल की थंड? तुम्ही थंड हा पर्याय निवडला असेल तर तुमचे उत्तर चुकलेले आहे. तुम्ही गॅस कटिंग उपकरणातील ज्योतीचे निरीक्षण केले तरी तुमच्या लक्षात येईल की उष्णता वाढली की ज्योत निळी होत जाते. ताऱ्यांचे रंग, त्यावरील तापमान, त्यांचे तेज आणि आकार यावरून विविध प्रकार पडतात. आपला सूर्य “जी” प्रकारचा मध्यम आकाराचा तारा आहे, या प्रकारचे तारे पिवळ्या रंगाचे असतात. के प्रकारापेक्षा हे तारे उष्ण असतात, त्यांच्यावर पाच ते सहा हजार केल्विन एवढे तापमान असते. 

मध्यम तापमान असलेले “के” प्रकारचे तारे पिवळ्यानारंगी रंगाचे दिसतात, त्यांच्यावर साडेतीन ते पाच हजार केल्विन एवढे तापमान असते. सर्वात थंड असलेले “एम” प्रकारचे तारे आकाराने लहान आणि रंगाने तांबडे तपकिरी असतात. त्यांचे तापमान तीन हजार केल्विनच्या जवळ असते. सर्व ताऱ्यांमध्ये वॉल्फ रॉयट उर्फ “डबल्यू” प्रकारचे तारे सर्वात उष्ण असतात, त्यांचे तापमान तीस हजार ते दोन लाख केल्विन इतके असते आणि ते निळ्याजांभळ्या रंगाचे असतात. पृथ्वीवरील जीवसृष्टीला जीवन देणाऱ्या आपल्या सूर्याला आपण कृतज्ञतेने वंदन करत आलो आहोत.. मात्र ब्रम्हांडात अब्जावधी तारे आपल्या सूर्यापेक्षा प्रचंड मोठे आहेत.. एक नमस्कार त्यांनादेखील घालुया का??

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके

ऑनलाईन गणित शिकवणी

दृष्टी तशी सृष्टी