कृमीविवर.. अवकाशातील बोगदा

 कृमीविवर.. अवकाशातील बोगदा


रुमालाची घडी घालून ज्या पद्धतीनं आपण त्याची दोन टोकं एकत्र किंवा जवळ आणू शकतो, तसं अंतराळात शक्य आहे का? अवकाशातील अंतरं प्रचंड मोठी आहेत. अगदी आपल्या दीर्घिकेच्या म्हणजे आकाशगंगेच्या दोन टोकांमध्ये एवढे अंतर आहे की ते पार करण्यास प्रकाशाला पंचवीस हजार वर्षे लागतात. आणि अश्या अब्जावधी दीर्घिका अवकाशात आहेत. हे अंतर मानवाला कधीच पार करता येणार नाही का या प्रश्नानं शास्त्रज्ञांना भेडसावलं आहे, मात्र त्यावर कदाचित कृमीविवर हे उत्तर असेल. कृमीविवर म्हणजे अवकाशातील बोगदा!! 

ज्याप्रमाणं एखादा किलोमिटरचा बोगदा काढला तर वीस पंचवीस किलोमिटरचा घाटरस्ता टाळता येतो, तसंच इथंदेखील होऊ शकतं. बांद्रा ते वरळी हे अंतर निम्मं करण्यासाठी ज्या पद्धतीनं आता नवीन सागरीसेतू तयार केला आहे, तसंच वर्महोल अर्थात कृमीविवर असेल अशी कल्पना शास्त्रज्ञ गेल्या शंभर वर्षांपासून करत आहेत. अल्बर्ट आईन्स्टाईन आणि नॅथन रोजेन यांनी अश्या सेतूची कल्पना मांडली. म्हणूनच या सेतूला आइन्स्टाइन- रोजेन ब्रिज असं नाव देण्यात आलं आहे. 

ल्युडविग फ्लॅम यांनी कृमीविवराची संकल्पना सर्वप्रथम मांडली, त्यानं याला श्वेतविवर असं नाव दिलं होतं. लांबी, रुंदी आणि उंची असलेलं आपल्या भोवतालचं त्रिमितीय विश्व आपल्याला ठाऊक असतं. सापेक्षता सिद्धांतात याला अवकाशकाळ ही मिती देखील जोडली जाते. या चतुर्मितीय विश्वात कुठंही दोन स्वतंत्र सपाट प्रदेश किंवा दोन द्विमितीय प्रतलं असतील तर त्यातील एका प्रतलावरून दुसऱ्या प्रतलावर जाण्यासाठी खूप मोठा वळसा घालण्याची गरज नाही. ही दोन्ही प्रतलं बोगद्यासारख्या बाबीनं एकमेकांशी जोडली, तर हे अंतर कमी होऊ शकतं अशी भन्नाट संकल्पना फ्लॅम यांनी मांडली. त्यानंतर शास्त्रज्ञांना या संकल्पनेमध्ये अमर्याद शक्यता दिसू लागल्या. 


एका विश्वातून दुसऱ्या विश्वात तसेच एकाच विश्वातील वेगवेगळ्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या काळात तसेच एका विश्वातून दुसऱ्या विश्वातील दुसऱ्या काळात जाता येईल का याची सर्वांना उत्सुकता वाटू लागली. कार्ल श्वार्झशिल्ड या शास्त्रज्ञानं आइन्स्टाइनच्या सापेक्षता सिद्धांताचा अधिक विस्तार करत अशी मांडणी केली की गुरुत्वाकर्षणामुळं वस्तुमान एका बिंदुपाशी मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतं. याचा रेटा एवढा मोठा असतो की एका मर्यादेनंतर ते अवकाशकाळाला वक्र करून टाकतं आणि त्यामुळे तिथं आइन्स्टाइनचं समीकरण काम करत नाही. पुढं अनेक प्रयोगातून सिद्ध झालं की अंतराळ हे वक्र असतं. ज्याप्रमाणं एका पर्वतशिखरावरून दुसऱ्या शिखरावर जाताना आपल्याला आधी एक शिखर उतरावं लागतं आणि नंतर दुसरं चढावं लागतं. मात्र त्या दोन शिखरातील थेट हवाई अंतर कमी असतं, पक्षी काही क्षणात ते अंतर पार करू शकतात. त्याचप्रकारे थेट गेल्यावर आपल्याला अंतराळातील दोन वळ्यांमधील अंतर लवकर कापता येऊ शकेल. 

मात्र त्यासाठी आपल्याला या अंतराळातील वळ्या शोधाव्या लागतील. अशी काही ठिकाणं या अंतराळात आहेत का? याचा शोध शास्त्रज्ञ गेली काही दशकं घेत आहेत, मात्र अद्याप तरी कृमीविवर ही संकल्पना केवळ गृहितकाच्या पातळीवर आहे. अजून कोणतेही कृमीविवर मानवाला सापडलं नाही. मात्र विज्ञान तसेच गणितीय पातळीवर कृमीविवरचं अस्तित्व असणं शक्य आहे. २०१५ मध्ये एक लहान कृत्रिम चुंबकीय कृमीविवर बनवण्यात शास्त्रज्ञांना यश देखील आल आहे. कृमीविवराचे शक्य प्रकार किती असतील? यावर शास्त्रज्ञांचा खल सुरू आहे. त्यांनी प्रवासाचा प्रकार, ठिकाण या बाबींचा विचार करून सहा प्रकारच्या कृमीविवरांची कल्पना केली आहे. 

ट्रॅव्हर्सेबल वर्महोल्स म्हणजे प्रवासक्षम प्रकारात मानवाला या विश्वातील एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत जाता येईल. नॉन ट्रॅव्हर्सेबल वर्महोलमध्ये केवळ प्रवेश असेल, बाहेर पडता येणार नाही, कृमीविवराच्या आत गेलेली व्यक्ती किंवा वस्तू नष्ट होईल. वन-वे वर्महोल म्हणजे वन-वे रस्ता असेल, तुम्हाला त्यातून जाता येईल मात्र परतताना दुसरा रस्ता वापरावा लागेल. टू-वे वर्महोल मधून तुम्ही गेलेल्या रस्त्याने परत येऊ शकता. इंट्रा-युनिव्हर्स वर्महोल्स म्हणजे लोकल ट्रेन.. त्यातून केवळ व्यक्तीला स्वतःच्या विश्वात प्रवास करता येईल तर इंटरसिटी रेल्वे ज्याप्रमाणे दोन शहर जोडते तशी इंटर-युनिव्हर्स वर्महोल्स हे दोन वेगवेगळ्या, समांतर विश्वांना एकमेकांशी जोडेल. या सहा प्रकारातील कोणतं कृमीविवर शास्त्रज्ञांना सर्वात आधी सापडतं हे पाहणं रंजक असेल. 

रामायणात किष्किंधाकांडामध्ये कृमीविवराचं वर्णन असल्याचं अनेकजण सांगतात. मात्र किष्किंधाकांडामधील ५० ते ५२ या सर्गामध्ये रिक्ष गुहेचं वर्णन कृमीविवरापेक्षा अद्भुत मायानगरी असल्याबाबत आहे. गुहेतून बाहेर पडणे अशक्य होतं, विशेष उपायांचा वापर करून वानर जेव्हा बाहेर पडतात तेव्हा ते भलत्याच ठिकाणी पोचतात याच दोन बाबी कृमीविवराशी काहीशी मिळत्याजुळत्या आहेत. तसेच बाहेर पडण्यासाठी जो विशेष उपाय सांगितला तो मात्र विज्ञानाशी जुळत नाही. अर्थात ही हजारो वर्षांपूर्वीची कविकल्पना आहे, अवघ्या दहा वर्षापूर्वी आलेल्या इंटरस्टेलर सिनेमात देखील अनेक अतार्किक आणि अवैज्ञानिक गोष्टी सापडतात. 

या सिनेमातील कथानक कृमीविवराच्या वापरातून पुढं जातं. पृथ्वीवरील जीवसृष्टी धोक्यात आली असताना शास्त्रज्ञ शनिजवळील एका कृमीविवराचा वापर करून दुसऱ्या सूर्यमालेतील एका ग्रहावर जातात. मात्र या सिनेमातील कथानकात शास्त्रज्ञांनी या प्रवासासाठी वापरलेलं वाहन तर अशक्य पातळीवरील आहेच, याशिवाय एवढ्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाचा परिणाम व्यक्तींवर झालेला दाखवलेला नाही. शास्त्रज्ञ असं म्हणतात की तिथं असलेल्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे प्रत्येक माणसाच्या शरीराचा आकार एखाद्या शेवईसारखा होऊन जाईल.  

शास्त्रज्ञांनी भविष्यात एखादं कृमीविवर शोधून काढलं आणि त्यामध्ये त्यामध्ये प्रवेश केला, प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे त्यांच्या शरीराची शेवई झाली नाही तरी त्यातून बाहेर पडणार कसं? बाहेर पडण्याची व्यवस्था आधीच केली असेल तरी कधी आणि कुठे बाहेर पडणार हे सारे अनिश्चित असेल..अर्थात कधीकाळी अशक्य आणि अनिश्चित वाटणाऱ्या अनेक गोष्टी आज विज्ञानानं वास्तवात उतरवून दाखवल्या आहेत. त्यामुळे भविष्यात अवकाशातील बोगद्याचा वापर करून कालप्रवास करण्याची तसेच ब्रह्मांडाची भ्रमंती करायची असेल तर ते देखील शक्य झालं असेल!!

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके

ऑनलाईन गणित शिकवणी

दृष्टी तशी सृष्टी