रक्ताचा कर्करोग.
पुरोगामी जनगर्जना दिवाळी अंकासाठी कथा लिहिली आहे.
======
रक्ताचा कर्करोग.
सन २०४७...भारताला स्वातंत्र्य मिळून आज शंभर वर्षं झाली. ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान आपलं ऐतिहासिक भाषण करत आहेत. आपल्या भाषणात ते सांगतात की, “या देशाच्या महान परंपरेचा गौरव अधिक वाढवण्यासाठी भारतीय संशोधन आणि उपचार नियंत्रण संस्थेचं बजेट दुप्पट करण्यात येत आहे. नकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या लोकांना शोधण्यासाठी आणि त्यांचं शुद्धीकरण करण्यासाठी प्रज्ञा संरक्षण यंत्रणा विभागाचे अधिकार अधिक वाढवण्यात येत आहेत.
“ऊर्जा हा शब्द एखाद्या चलनी नाण्याप्रमाणं झाला आहे ना!” भाकरीचा तुकडा मोडताना चिन्मय म्हणतो.
“मग काय!! आता तर म्हणे प्रत्येक गावात एक विशेष ऊर्जामंदिर देखील स्थापन करणार आहेत.” नाकावरचा चष्मा थोडा खाली घेत भार्गवी उत्तरते. बऱ्याच वेळाने चिन्मय काहीतरी बोलला याचंच तिला समाधान वाटलं होतं.
आर्यशीला गावातील प्रसिद्ध कुलकर्णी वाड्याच्या खिडकीत बसून चिन्मय न्याहारी करत होता. एकेकाळचा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा हा रोबोटिक्स संशोधक अनेक वर्षं अमेरिकेत राहून आला होता. ४८ वर्षांच्या चिन्मयची दाढी आणि केस खूप वाढले होते, त्यात आता क्वचितच काही काळया बटा उरल्या होत्या. दिवसभर त्याच खिडकीत बसुन, जाड फ्रेमच्या चष्म्यामधून, तो बाहेर उदास नजरेनं पाहत असे. पूर्वी तो या खिडकीत बसुन किमान पुस्तकं तरी वाचत असे, मात्र हल्ली केवळ बाहेरची फुलं न्याहाळत त्याची तंद्री लागत असे. त्याच्या पत्नीला, भार्गवीला वाटत असे की तो आपलं ज्ञान वाया घालवत आहे, अर्थात चिन्मयनं आपलं ज्ञान वापरायचं ठरवलं असतं तरी त्याला संधी होती कुठं? आता संगणकाचा वापर केवळ संरक्षण, संदेशवहन आणि दळणवळण क्षेत्रात होत होता. बाकी सर्व ठिकाणी भारतीय ज्ञान पद्धतीचा वापर होत होता.
भार्गवी देखील ४८ वर्षाचीच. मात्र ती चिन्मयपेक्षा खूप तरुण दिसायची. सुंदर चेहरा आणि आकर्षक बांधा असलेली भार्गवी एक जीवरसायनशास्त्रज्ञ होती. महाविद्यालात असल्यापासून रक्ताचा कर्करोग हा तिच्या संशोधनाचा विषय होता. मात्र गेल्या दीड दशकात जीवरसायनशास्त्र हा विषय खूप बदलला होता. रुग्णालयांतून शस्त्रक्रिया नाहीशा झाल्या होत्या, त्याजागी “चक्र उपचार” आले होते. आयआयटीमध्ये आता फिजिक्सऐवजी “ऊर्जा संतुलन” शिकवलं जात होतं. या देशामध्ये परकीय ब्रँड सोबत परकीय ज्ञानदेखील हद्दपार झालं होतं. अशा वातावरणात भार्गवीचा जीवरसायनशास्त्र हा विषय कालबाह्य झाला होता. तरीही ती लपुनछपून आपल्या तळघरात संशोधन करत असे. लवकरच आपण कर्करोग प्रतिबंधक लस शोधून काढू याबाबत तिला विश्वास होता. चिन्मयची न्याहारी झाली की ती निश्चिंतपणे खाली तळघरात जाऊन संशोधन करायला मोकळी होणार होती. तोवर टीव्हीवर सुरू असलेलं भाषण ऐकणं क्रमप्राप्त होतं.
चिन्मयचे आईबाबा, नचिकेतराव आणि अनघाताई, टीव्हीसमोर बसले होते. पंतप्रधान ही त्यांची या जगातील आवडती व्यक्ती असल्यामुळं कानांचे द्रोण करून प्रत्येक शब्द व्यवस्थित रिचवून घेत होते. दोघेही ऐंशीच्या जवळ असल्यामुळं तशीही त्यांची श्रवणशक्ती कमी झाली होती, त्यामुळे एकाग्र होऊन मोठ्या आवाजात ऐकणं त्यांना क्रमप्राप्त होतं. भाषण संपल्यावर त्यांना वाटलं की हा देश एवढा बदलतोय, मात्र आपला लेक आणि सून त्यात काहीच योगदान देत नाही. प्रज्ञा संरक्षण यंत्रणा विभागाचे प्रमुख डॉ. नाडकर्णी आपल्या ओळखीचे आहेत, चिनूला तिथं मोठ्या पगाराची नोकरी सहज मिळू शकेल. मात्र हा असा डिप्रेशनमध्ये जाऊन बसला आहे. त्याला भारतात परत बोलवायलाच नव्हतं पाहिजे का?
ऊर्जा मंदिराबाबत भार्गवीचं वाक्य त्यांना कुत्सित वाटलं. न राहवून नचिकेतराव म्हणाले, “काय हरकत आहे प्रत्येक गावात ऊर्जा मंदिरं झाली तर? आज भारत विश्वगुरु झाला तो कशामुळं.. या अध्यात्मिक ऊर्जेमुळंच ना?”
भार्गवी उलट काही बोलल्यावर त्यांना राग येतो हे माहीत असल्यामुळं चिन्मय स्वतः बोलला,“हा देश मधली काही वर्षे ज्ञानविज्ञानाच्या प्रकाशात चमकून विश्वगुरु होण्याच्या मार्गावर होता. तेव्हा जगातील पाचवी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनलेला हा देश आता मात्र गरीब झाला आहे बाबा.”
“अरे, भारताची आर्थिक शक्ती कमी झाली असली तरी अध्यात्मिक शक्ती मात्र किती वाढली आहे पहा की.. आज लक्षावधी परदेशी नागरिक या देशात केवळ अध्यात्मिक ऊर्जा मिळवण्यासाठी येत आहेत. त्यासाठी या देशातील ड्रेस कोडचं देखील पालन करत आहेत, ते काय उगाच?”
“एका डॉलर्समध्ये २०० रुपये मिळत असल्यानं त्यांना या देशात राहायला खूपच परवडतं. म्हणून परदेशात नोकरी करून नंतरच निवृत आयुष्य जगायला ते इकडं येतात बाबा.”
“मग त्यातून मोठं अर्थकारण उभं राहतच की?”
“हो, होतं ना, पण देशाला लागणारं अन्नधान्य तसेच गोशाळेसाठी लागणारा चारादेखील आपल्याला शेजारील देशांमधून आयात करायला लागत आहे. ज्यांच्याकडं शेतजमीन होती, त्यांनी ती ९९ वर्षाच्या करारानं सरकारला वापरायला दिली, याबदल्यात सरकार त्यांना प्रतिवर्ष एकरी दोन लाख रुपये देते. त्यावरच ते जगतात. आता केवळ १० टक्के भूभागावर शेती होते आहे बाबा.”
“अरे आज आपला देश पूर्ण जगभर दूध निर्यात करत आहे.”
“हो, आयात करून आणलेला चारा खायला घालून दूध विकतो आहे आणि गोमुत्र, शेणावर संशोधन करत आहे.”
“मग नको का करायला, गोमूत्र आणि शेणावर आज कितीतरी महत्त्वाचं संशोधन होत आहे.”
“हो, आणि इस्रोला २०६९ रोजी शंभर वर्षे पूर्ण होतील, तोवर संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित पुष्पक विमानदेखील तयार झालं असेल. आणि त्यासाठी शास्त्रज्ञ आठवड्यातील ७० तास झटून काम करत आहेत, वैदिक पोथ्या वाचून काढत त्यातील शक्यता तपासून पाहत आहेत. रब्बिश!!”
“महागड्या पाश्चात्य तंत्रज्ञानापेक्षा, स्वस्त देशी तंत्रज्ञावर संशोधन करणं कसं काय रब्बीश असेल?” अनघाताई मध्ये आल्या, ”या भारतभूमीला आता प्राचीन काळातील पावित्र्य पुन्हा प्राप्त झालं आहे. वीस पंचवीस वर्षे म्लेंच्छमुक्त भारत करण्याचं सरकारी धोरण यशस्वी राबविलं असल्यानं या देशामध्ये आता केवळ सनातन वैदिक धर्म उरला आहे. देशाची आध्यमिक ऊर्जा अत्युच्च पातळीवर आहे.”
भार्गवीला समजलं की आता हे खूप वेळ चालणार आहे, आपल्या सासू-सासर्यांचं कधीच ब्रेन वॉश झालं आहे आणि गेली अनेक दशकं ते केवळ अंधभक्तीमध्ये लीन आहेत. इथं आपली अधिक ऊर्जा वाया न घालवता तळघरात गेलेलं बरं. तसंही आता चिन्मयचं खाऊन झालं होतं, दुपारपर्यंत त्याच्याकडं नाही पाहिलं तरी चालेल. अडीच वाजता केन शाळेतून येईल, तेव्हा एकत्र जेवता येईल. तोवर काल तयार केलेल्या कल्चरमध्ये काय बदल झाले आहेत हे पाहू. विचार करत करत भार्गवी तळघरात गेली.
तिनं चिन्मयची मदत घेत आपल्याला हवी तशी तळघराची रचना करून घेतली होती, या सुसज्ज प्रयोगशाळेचा ठावठिकाणा बाहेरच्या लोकांना लागणार नाही याची सर्व काळजी घेतली होती. इथं येऊन एकदा ती कामात मग्न झाली की तिला वेळेचं भान राहत नसे. मात्र शाळेतून आल्यावर केनला त्याची आई हवी असायची. खिडकीत बसलेला बाबा फार काही बोलत नाही. आजी आजोबा तर कायम संस्कार देण्याच्या मूडमध्ये असतात. शाळेतील शिक्षकदेखील त्यांच्याप्रमाणेच बोर करतात, कसलाही आधार नसलेल्या गोष्टी ठासून सांगतात. आईनं तर त्याला शिकवलं होतं की आपण आपल्यासमोर येणाऱ्या पुस्तकांची, माहितीची चिकित्सा केली पाहिजे. मात्र शाळेत काही चिकित्सक प्रश्न विचारले की प्रिन्सी मॅमसमोर उभं केलं जातं. त्यामुळे शाळेत त्याची घुसमट व्हायची. कधी एकदा घरी येऊन आईसोबत बोलतो असे त्याला झालेलं असायचं.
रक्ताच्या कर्करोगावर पेशींमध्ये स्वदोष दुरुस्त करणाऱ्या मेसेंजर आरएनएवर भार्गवी काम करत होती. मात्र नव्या भारतात कर्करोगाकडं देखील वेगळ्या भावनेनं पाहिलं जात होते. व्यक्तीच्या मागील जन्माचं पाप म्हणून तिला असे आजार होतात. त्यावर गोमूत्र प्राशन आणि गोमय सेवन हा उपाय आपल्या शास्त्रात सांगितलेला असताना पाश्चात्य पद्धतीनं उपचार करण्याची गरजच काय? ज्यांच्यासाठी स्वतः देवानं मरण पाठवलं असेल, त्यांना वाचवणं म्हणजे देवाच्या अस्तित्वावर, क्षमतेवर शंका घेणं असेल असं भारत सरकारच्या प्रज्ञा मंत्रालयाचंच धोरण होतं. म्हणूनच उपचार केंद्रांमध्ये बायोप्सी करण्याऐवजी गायीच्या शेणाचा लेप लावला जात होता, श्वासांमधून प्राण आणि आयुष्य दोन्हीचं नियंत्रण होतं, म्हणून प्राणायाममधूनच हृदयविकाराचं निदान केलं जात होतं..
रात्री जेवताना चिन्मय भार्गवीकडं शांतपणे पाहतो. ती नेहमीपेक्षा थकलेली दिसते, पण आज तिच्या डोळ्यांत वेगळीच चमक आहे. नक्कीच तिला प्रयोगशाळेत काहीतरी वेगळं सापडलं असावं. तो विचारतो, "आज काहीतरी वेगळं झालेलं दिसतंय?" ती थोडा वेळ थांबते. मग शांतपणे उत्तरते, "हो. काही निर्णायक परिणाम मिळाले आहेत, मात्र पण त्याची पुष्टी करण्यासाठी अँडरसन लुकेमिया सेंटरशी संपर्क साधावा लागेल." त्याच वेळी घसा खाकरत नचिकेतराव त्यांच्याजवळ येतात. त्यांच्या चेहऱ्यावर तिरस्कार स्पष्ट दिसत होता, म्हणजे त्यांनी सर्व ऐकलं असावं. एरवी श्रवणशक्ती कमी असली तरी अशा गोष्टी त्यांना नेमक्या ऐकू येतात.
"तुला एवढं काय पडलं आहे संशोधनाचं? उद्या जर सरकारला हे समजलं तर तुझी प्रयोगशाळा तर जाईलच पण हा वाडा देखील उध्वस्त करतील ते."
“पण बाबा तुम्ही लहानपणापासून शाखेत जाऊन आजवर देशाची सेवा केली, त्याचं काही ठेवणार नाहीत का?” इति चिन्मय.
“अरे म्हणून किमान आपला जीव तरी वाचेल. पण भार्गवी जे करते आहे, ते अतिशय चुकीचं आहे आणि अनावश्यक देखील. अरे, एवढी जोखीम घेताना किमान कन्हैय्याचा तरी विचार करायचा ना!
“हे बघा बाबा, केनच्या पिढीचं नुकसान होऊ नये म्हणूनच तर हे सारं करते आहे. उद्या आपल्यापैकी कोणाला ब्लड कॅन्सर झाला तर त्यावर कसे उपचार करणार?
भविष्यात केनला उच्च शिक्षण घ्यायचं असेल, तरी जगातील कोणताही देश त्याला किंवा कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याला स्वीकारणार नाही. मी कॉलेजमध्ये शिकत असताना गुरुकुलमध्ये शिकलेल्या मुलांना थेट आयआयटीमध्ये प्रवेश देणं सुरू झालं होतं. आता तर सर्व आयआयटीचंच गुरुकुल करून टाकलं आहे. हे जसं अभियांत्रिकी विषयाचं तसेच मेडिकलचं देखील आहे. देशाचा नुसता गोठा करून टाकला आहे.”
कधी नाही ते भार्गवी बाबांना उलट बोलली.. कदाचित त्यांचा इगो दुखावला असावा. “लवकरच घराचं आणि इथल्या सर्व माणसांचं शुद्धीकरण करावं लागणार आहे.” असं म्हणत नचिकेतराव रागानं निघून जातात.
चिन्मय भार्गवीला सांगतो की तू टेन्शन घेऊ नकोस. आपण डार्क वेबचा वापर करून अँडरसन लुकेमिया सेंटरशी संपर्क करू. ही गोष्ट प्रज्ञा संरक्षण यंत्रणा विभागाला समजण्याची शक्यता फारच कमी आहे. दोघं जण ठरवतात त्याप्रमाणे इमेल पाठवला जातो. आणि काही क्षणातच, डार्क वेबवरच प्रज्ञा संरक्षण यंत्रणा विभागाचा संदेश येतो की “सरकारच्या धोरणाविरुद्ध तुम्ही संशोधन करत आहात. तुमच्या कुटुंबीयांनी आजवर देशासाठी दिलेलं योगदान पाहता ही तुम्हाला शेवटची वॉर्निंग देण्यात येत आहे, आपण करत असलेला उद्योग थांबवा.” चिन्मयला प्रश्न पडतो की आपला आयपी लगेच ट्रेस कसा झाला. आपल्या आयपीची माहिती सरकारला आधीच होती का? भार्गवी मात्र हा संदेश पाहून अजिबात विचलित होत नाही. गोष्टी कोणत्याही थराला जातील याची कदाचित तिनं मानसिक तयार केली असावी.
आपल्या बेडरूममध्ये तावातावानं गेलेल्या नचिकेतरावांनी लगेचच नाडकर्णी यांना संदेश पाठवला होता की सावध रहा. चिन्मयच्या संगणकाचा आयपी ऍड्रेस आधीच निरीक्षणाखाली होता आणि डार्क वेब वापरून त्यानं कधीही पहिला इमेल पाठवला, तर त्याला वरीलप्रमाणं ऑटोरिप्लाय देखील येईल अशी व्यवस्था केली होती. नाडकर्णी जेव्हा चिन्मयनं पाठवलेला ईमेल नीट वाचतात तेव्हा त्यांना या गोष्टीचं गांभीर्य लक्षात येतं. ते त्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना देतात आणि त्याप्रमाणे यंत्रणा कामाला लागते. एक उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक तातडीने आयोजित केली जाते.
भारत सरकारनं दहा वर्षापूर्वी "राष्ट्रीय गोवैद्य चिकित्सा अभियान" सुरू केलं होतं. तेव्हा या अभियानाचे प्रमुख असलेल्या अभिलाष गुप्ता यांनी आपल्या भाषणात सांगितलं होतं, "रक्ताचा कर्करोग हा रोग नसून, ही तुमच्या कर्माची परीक्षा आहे. काही पापांची किंमत या जन्मात, तर काही पापांची किंमत पुढच्या जन्मात मोजायला लागते. कर्करोग हा तुमच्या या किंवा मागील जन्मातील पापांचं प्रतीक आहे. या पृथ्वीतलावर पुण्ण्य मिळवण्याचा गोपूजा हा एकमेव मार्ग आहे तिचं मूत्र, तिचं शेण, आणि तिचे आशीर्वाद घेऊन तुम्ही तुमच्या पुण्ण्याचा बॅलन्स वाढवू शकता. सरकार आजपासून सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये गोचिकित्सा उपचार पद्धती लागू करत आहे. या विषयासंदर्भात पाश्चात्य ज्ञानावर आधारित कोणतंही वेगळं संशोधन आणि उपचार आता देशद्रोह ठरेल.”
याच काळात मुलांची लसीकरण मोहीम बंद करण्यात आली होती, आणि त्याऐवजी मुलांना गोमूत्रासोबत काकडीच्या रसाचा काढा पाजण्यात येत होता. सर्व आजारांवर गोमूत्र प्राशन आणि गोमय सेवन हाच एकमेव उपाय सुचवला गेला. या निर्णयांना जनतेचा थोडा विरोध झाला, मात्र प्रसारमाध्यमं आणि पोलीसबळ वापरून हा विरोध दडपण्यात आला. तसेही पंचवीस वर्षांपूर्वी सरकारी निर्णयांना विरोध, निदर्शनं आणि आंदोलन करणारी डावी चळवळ आणि तिची पिलावळ आता नामशेष झाली होती. वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे, मात्र सरकारशी लढण्याची हिंमत नसणाऱ्यांनी वाऱ्याची दिशा ओळखून पाठ फिरवली होती. तरीही कोणी सरकार विरोधी विचार मांडेल, त्याच्यावर आता लगेच कार्यवाही करण्यात येत होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी नचिकेतराव प्राचीन नाडीशास्त्र वाचत बसलेले असतात. अनघाताईंची देवपूजा नुकतीच आटोपली, आता त्या गजाजन महाराज विजय ग्रंथाचं पारायण सुरू करतील. रोज एक अध्याय वाचला की त्यांचा दिवस छान जातो. मात्र अचानक दारात चार गाड्या येऊन उभ्या राहतात आणि दार वाजवलं जातं. दारात पोलिस आणि प्रज्ञा संरक्षण यंत्रणा विभागाचे अधिकारी असतात. दार उघडल्यावर ते डायरेक्ट आत घुसतात. महिला शिपाई भार्गवीला पकडतात, तर काही लोक थेट तळघरात जाऊन तिथल्या वस्तू ताब्यात घेतात. चिन्मय थोडा प्रतिकार करू पाहतो, मात्र त्याला दोन शिपाई पकडून ठेवतात.. भार्गवी ओरडते, “मला न्यायचे तर न्या, पण प्रयोगशाळेला धक्का लावू नका.”
नाडकर्णी म्हणतात,“ तू नशीब समज, की आम्ही तुझ्या घरावर बुलडोझर आणला नाही. नचिकेतरावांचं देशासाठीचं आजवरचं योगदान पाहता आम्ही केवळ तुला आणि तुझ्या अपवित्र प्रयोग साहित्याला घेऊन चाललो आहोत. तुला आता किमान तीन महिने शुद्धीकरण करून घ्यावं लागेल.” भार्गवीला घेऊन ही सर्व मंडळी निघून जातात. ते निघुन गेल्यावर बघ्यांची जमलेली गर्दी पांगते. काल जेव्हा नाडकर्णींनी भार्गवीनं पाठवलेला मेल पाहिला, तेव्हा त्यांनी रात्रीच प्रज्ञा संरक्षण यंत्रणा विभागाची उच्चस्तरीय बैठक बोलावलेली असते. नाडकर्णी आपला अहवाल समितीपुढे मांडतात आणि ठामपणे सांगतात, “ती रक्ताच्या पेशींचा नवा नमुना तयार करत आहे. तिला थांबवायला लागेल आणि तिचं शुद्धीकरण देखील करायला लागेल.” बैठकीत ठरल्याप्रमाणे सकाळी ही कारवाई झालेली असते.
चिन्मय त्यांच्या गाड्यांच्या मागे जात नाही. कारण त्याला माहित असतं की प्रज्ञा संरक्षण यंत्रणा विभागानं एकदा काही ठरवलं असेल तर त्यात कोणीच बदल करू शकत नाही. भार्गवी चिन्मयला सांगायची की “या पेशी फक्त शरीर नाही, विचारही बदलतात. आज आपण रोगावर इलाज म्हणून पाहतो आहे, ते संशोधन एक समाज बदलाचं माध्यम होऊ शकेल.” हे ऐकताना त्याला भीती वाटत असते, की जे आपल्यासोबत पाच वर्षांपुर्वी झालं, तेच भार्गवीसोबत नको व्हायला!! त्याला हे देखील ठाऊक असतं की संशोधन केल्याशिवाय भार्गवी जगू शकणार नाही. म्हणून शक्य ती मदत करत तो तिला आजवर वाचवत आलेला असतो. मात्र तो आज हतबल झालेला असतो.. असाच हतबल तो पाच वर्षांपूर्वी झाला होता, जेव्हा रोबोटिक्सवर संशोधन केलं म्हणून त्याचं शुद्धीकरण झालं होतं.
नचिकेतराव आणि अनघाताई टीव्ही समोर बसलेल्या असतात. “८२-अ कलमाअंतर्गत प्रतिबंधित जैवतंत्रज्ञानात्मक संशोधन केल्यामुळे भार्गवी कुलकर्णी यांना प्रज्ञा संरक्षण यंत्रणा विभागाकडून अटक करण्यात येत आहे. त्यांच्यावर तीन महिने शुद्धीकरण प्रक्रिया केली जाईल.” अशी बातमी ते वाचतात. आपल्या ऐतिहासिक वाड्याची काही तोडफोड झाली नाही याचा त्यांना आनंद झालेला असतो. आपण वेळीच बातमी दिली नसती तर कदाचित आपण सरकारी कृपेस पात्र ठरलो नसतो, याची त्यांना जाणीव असते. दुपारी जेव्हा केन शाळेतून येतो तेव्हा त्याला सांगितलं जातं की त्याची आई महत्त्वाचं काम करण्यासाठी परगावी गेली आहे. मात्र तळघरातून गोमुत्राचा वास का येत आहे हे केनला कळत नाही.
तीन महिन्यांनी भार्गवी परत येते. ओळखू येणार नाही इतपत ती बदलेली असते. तिच्या डोळ्यातील चमक पूर्ण निघून गेलेली असते. शुद्धीकरणाच्या नावाखाली तिच्या मनावर तीन महिने रोज बलात्कार झालेला असतो. दोन दिवस चिन्मय आणि ती, दोघेही खिडकीत बसुन राहतात. केन बोलायला येतो, मात्र ती त्याच्याशी काहीच बोलत नाही. आपल्या आईला काय झाले हे केनला समजत नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी केन शाळेत जायला उठतो, तेव्हा त्याला दिसतं की आई वडील दोघेही मेलेले आहेत. त्यांनी रात्री विषप्राशन केलं आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी केवळ एकच वाक्य लिहून ठेवलं आहे. "शरीर मरू दे, विचार तरी जिवंत राहोत.”
केनने फोडलेला टाहो ऐकून आजीआजोबा तिथं येतात. झालेला प्रकार पाहून आजोबा शांतपणे झोपाळ्यावर जाऊन बसतात. भगवद्गीता हातात घेऊन अनघाताईंना वाचून दाखवतात, “नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः। न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥”
केनला हा त्यांचा दांभिकपणा सहन होत नाही, तो म्हणतो, “ बस करा आजी आजोबा.. आज तुमच्यामुळं माझे आईवडील मेले आहेत, माझी आई रक्ताच्या कर्करोगावर उपाय शोधत होती, पण खरं सांगू का.. रक्ताचा कर्करोग तुम्हाला झाला आहे. अंधश्रद्धा आणि अंधभक्ती तुमच्या रक्तात एवढी भिनली आहे की त्यापुढं तुम्हाला रक्ताच्या नात्यांचं देखील काही पडलं नाही. बाबांना देखील तुम्हीच अडकवलं आणि शुद्धीकरणाला पाठवलं होतं. तिथून परत आल्यावर बाबा हा पूर्वीचा बाबा राहिला नव्हता. एवढं करून तुमचा समाधान झालं नाही, आता तुम्ही त्या दोघांचा बळी घेऊनच थांबलात. भविष्यात माझा देखील बळी घ्याल.. तुम्ही कसाई आहात कसाई..”
कसा बोलतो आहे हा. पंधरा वर्षाच्या या मुलावर आपण काहीच संस्कार करू शकलो नाही, याची नचिकेतराव आणि अनघाताई दोघांनाही खंत वाटते. नचिकेतराव नाडकर्णींना मेसेज पाठवतात, “आमच्या कन्हैयावर त्याच्या आई-वडिलांचा खूप पगडा आहे, तो देखील अनावश्यक चिकित्सक आहे. अशी मुलं मोठी झाल्यावर देशाची परंपरा मातीत घालतील म्हणून त्याचंदेखील शुद्धीकरण करून घ्यावं म्हणतो.” केनला शुद्धीकरण केंद्रात न्यायला लोक येतात. यावेळी केवळ दोन माणसं आणि एकच गाडी पुरेशी असते!!
जुन्या संशोधन संस्थांचं रूपांतर आता शुद्धीकरण शिबिरांमध्ये झालेलं असतं. विज्ञानवादी, संशयवादी, अथवा अध्यात्मविरोधी विचार करणाऱ्या नागरिकांमध्ये शुद्ध सनातन विचारसंहितेची पुनःस्थापन करण्यासाठी शुद्धीकरण प्रक्रियेची रचना केलेली असते. अशा व्यक्तींची हिस्ट्री पाहून तिचा शुद्धीकरण स्तर ठरवला जातो.. गोमूत्राच्या धुराने भरलेली खोलीमध्ये शिबिरार्थींना दिवसभर वैदिक मंत्रांचं रेकॉर्डिंग ऐकावं लागतं. सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस, तीन तास सर्व शरीराला शेणाचा लेप लावून बसावं लागतं. खाण्यापिण्यात देखील शेण, गोमूत्र यांचा सढळ वापर असतो. रात्री झोपताना मात्र दूध प्यायला मिळतं तेव्हा शिबिरार्थींना बरं वाटतं. ठराविक मुदत पूर्ण झाल्यावर शिबिरार्थींना “शुद्धीकरण प्रमाणपत्र” दिलं जातं.
भार्गवी विचारदोष पातळी ५ वर होती, त्यामुळे तिला शुद्धीकरण प्रक्रियेमधून तीन महिने जावं लागलं होतं. केनची विचारदोष पातळी ३ असते, त्यामुळे त्याला केवळ एक महिना शुद्धीकरण शिबिराचा अनुभव घ्यावा लागला. एक महिन्यांनी केन घरी परत आला. आता कुलकर्णी वाड्याच्या भिंतीवर तीन शुद्धीकरण प्रमाणपत्रं टांगलेली दिसतात आणि खिडकीमध्ये केन बसलेला दिसतो !! तासन् तास.. तंद्री लावून!!!
==== समाप्त====
Comments
Post a Comment