डॉ. वाल्देमार हापकिन: मानवजातीचा रक्षक
डॉ. वाल्देमार हापकिन: मानवजातीचा रक्षक
जानेवारी २०२५मध्ये जीबीएस आजाराचे रुग्ण आढळले आणि कोविडमध्ये दीड वर्षे होरपळलेल्या जनतेला पुन्हा एखादी नवीन महामारी आली की काय याचा धसका बसला. मात्र सुदैवाने जीबीएसचा प्रसार महामारी म्हणावी एवढा झाला नाही. आधुनिक वैद्यकशास्त्र जसजसं विकसित होत गेलं तसतसा मानवजातीचा अनेक महामारींशी लढा सुरू झाला. अर्थात त्यापूर्वी देखील या महामारी होत्याच, मात्र या आजारांचे कारण माहीत नसल्यामुळं त्यांना दैविकोप असं नाव दिलं गेलं. रेबीज, प्लेग, टायफॉइड, मलेरिया, कॉलरा, पिवळा ताप आणि गुप्तरोग यांनी आजवर जगभरात अब्जावधी लोकांचे बळी घेतले आहेत. हे आजार जंतूंमुळे होतात हे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं आणि मानवजातीच्या रक्षणाचा लढा त्या दिशेनं सुरू झाला.
या लढाईमधील सर्वात मोठा योद्धा असं आपण डॉ. वाल्देमार हापकिन यांना म्हणू शकतो. याच महा योद्ध्याने प्लेग आणि कॉलरा या शत्रुगोटातील प्रबळ महारथींना पराभूत केलं होतं म्हणून वाल्देमार हापकिन हे मानवजातीचे रक्षक ठरतात. डोंगराएवढे काम केलेल्या या माणसाला आज समाज विसरला आहे. त्याच्या मायदेशात अगदी त्याच्या जन्मगावी देखील त्याचे नाव विस्मृतीत गेले आहे.. आपले काम करताना हा माणूस आयुष्यभर प्रेमाला पारखा राहिला, आणि मेल्यावर उपेक्षित. मात्र त्याच्या जन्मगावापासून हजारो मैल दूर असलेल्या मुंबईमध्ये आज त्याच्या नावाने संस्था सुरू आहे यातच त्याच्या कामाचे महत्व अधोरेखित होते. अर्थात आपल्या एका माजी आरोग्यमंत्र्याला हापकिन माणूस आहे, का कंपनी आहे, का अजून काय आहे हे काहीही माहित नव्हतं!!
व्लादिमीर हे त्याचं जन्मनाव, मात्र पश्चिम देशांमध्ये त्याचा वाल्देमार असा अपभ्रंश झाला आणि तेच नाव पुढं चिकटलं. आज युक्रेनमध्ये असलेल्या ओडेसा या शहरात १५ मार्च १८६० रोजी व्लादिमीरचा जन्म झाला. त्याचा जन्म झाला तेव्हा त्याचं शहर रशियाचा भाग होता. रशियात तेव्हा झारशाही सुरू होती. काळया समुद्रावर असलेल्या ओडेसा बंदरातून तेव्हा मोठा व्यापार चालायचा. व्यापाऱ्याची परंपरा असलेल्या ज्यू घरात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील आरोन हे देखील व्यापारी होते. तीन मोठ्या भावंडांच्या पाठीवर हा जन्माला आला होता. याच्या पाठीवर एक भावंड जन्माला घालून आई रोजाली हापकिन वारली. सतत फिरतीवर असलेल्या वडिलांनी या पोरांना आजोळी, म्हणजे बर्डीनाक शहरांमध्ये ठेवलं. वयाच्या पाचव्या वर्षी आई-वडिलांच्या मायला पारखा झाला. त्याचे आजोबा शिक्षक होते त्यामुळे या पोरांचे होम स्कूलिंग सुरू झालं. दहाव्या वर्षी व्लादिमीर स्थानिक शाळेत जाऊ लागला. त्याला शाळेच्या मागच्या अंगणात किडे, बेडूक, आणि मुंग्या पकडून त्यांचा अभ्यास करायला फार आवडायचं. तो सुई आणि बाटलीत लहान जीव ठेवून पाहायचा, “ते पाणी न देता किती दिवस जगतात” आणि नंतर त्याची वहीत “वैज्ञानिक नोंद” ठेवायचा!
जर्मन आणि रशियन भाषा शिकणाऱ्या व्लादिमीरने एकोणिसाव्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण केलं. मात्र पुढे शिकायला कुणाकडेच पैसे नव्हते. आजोबा आणि वडील दोघेही कफल्लक झालेले असल्यामुळे पैसे मागणार कुणाकडे हा प्रश्न होता. मात्र यावर मार्ग निघाला. मोठ्या भावानं पुढाकार घेत, दर महिन्याला दहा रुबल देत पाठबळ दिलं. ही तुटपुंजी स्कॉलरशिप घेऊन व्लादिमीर उच्च शिक्षणासाठी ओडेसा शहरात परतला. त्याने गणित भौतिकशास्त्र आणि प्राणी शास्त्र हे विषय शिकायला सुरुवात केली.तो ओडेसा शहरातल्या सार्वजनिक ग्रंथालयात नेहमी पहिला यायचा आणि शेवटचा जायचा. एकदा ग्रंथपालाने त्याला विचारलं, “घरी जावसं वाटत नाही का?” त्यावर तो म्हणाला होता. “घरी गेलो तर झोप लागेल, पण इथे थांबलो तर डोकं सुरू राहतं.”
इथेच त्याची ओळख प्राणिशास्त्र विभागाचे प्राध्यापक असलेल्या एली मेचनिकॉफ सरांसोबत झाली आणि त्याच्या आयुष्याला नवीन वळण लागलं. मेचनिकॉफ सरांच्या परीसस्पर्षामुळे व्लादिमीरच्या आयुष्याचं सोनं झालं. आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी रोगप्रतिकारचं काम करतात हे शोधून काढणाऱ्या एली मेचनिकॉफ यांना “जन्मजात प्रतिकारशक्ती संकल्पनेचे जनक” समजलं जातं. त्यांनी आखलेल्या अभ्यासदौऱ्यामध्ये व्लादिमीर सहभागी झाला, आणि जेव्हा तो परतला तेव्हा त्याचं नक्की झालं होतं की आपल्याला प्राणिशास्त्रज्ञ व्हायचं आहे. पुढील चार वर्षात शिक्षण पूर्ण झालं, मात्र पदवी मिळताना त्याला अडचण झाली. त्याचा चळवळ्या स्वभाव हे त्यामागचं कारण! पीपल्स व्हॉलंटियर्स या क्रांतिकारी गटाशी व्लादिमीर संलग्न होता. त्यामुळे विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्याला तीन वेळा अटक झाली, तर दोन वेळा त्याला विद्यापीठातून काढून टाकण्यात आलं. मेचनिकॉफ यांनी मध्यस्थी केल्यामुळं तो प्रत्येक प्रसंगातून सहीसलामत सुटत होता. मात्र पीपल्स व्हॉलंटियर्स गटाने झारशाही मधील एका अधिकाऱ्याची हत्या केली तेव्हापासून व्लादिमीर ने त्यांच्याशी संबंध तोडले. त्याचा हिंसेला कायम विरोध होता.
रशियातील वातावरण अतिशय गढूळ झालं होतं. १८८१ मध्ये झार अलेक्झांडर दुसरा याची हत्या झाली होती. या हत्येनंतर सरकारनं संशयित व्यक्तींवर कठोर कारवाई सुरू केली. बुद्धिवाद्यांवर देखील दडपशाही वाढली. मेचनिकॉफ यांना जेव्हा राजीनामा देण्यास भाग पाडलं, तेव्हा विद्यार्थी आंदोलनाचा भडका उडाला. मेचनिकॉफ यांना पाठिंबा देणारं एक खुले पत्र प्रसिद्ध झालं. हे पत्र प्रसिद्ध करण्यात व्लादिमीरचा सक्रिय सहभाग होता. साहजिकच सरकारचा त्याच्यावर रोष होता. दीर्घ प्रशासकीय संघर्षानंतर १८८४ मध्ये त्याला “डॉक्टर ऑफ सायन्स” ही पदवी मिळाली खरी मात्र तो रशियामध्ये केवळ कागदाचा तुकडा ठरणार होता. व्लादिमीर आणि इतर सहा विद्यार्थ्यांना “वुल्फ टिकीट्स” देण्यात आलं होतं. म्हणजेच त्यांना कोणत्याही शासकीय संस्थेमध्ये प्राध्यापकी तसेच संशोधन करण्यावर बंदी होती.
पात्रता असूनही त्याला मायदेशामध्ये प्राध्यापकी करायला बंदी होती म्हणून परदेशामध्ये संधी शोधणे भाग होते. मेचनिकॉफ सर आता स्विझरलँड मध्ये स्थलांतरित झाले होते. त्यांनी जिनिव्हा विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी व्लादिमीर जाऊन पोहोचला. पुढे मेचनिकॉफ जेव्हा पॅरिसमधील पाश्चर इन्स्टिट्यूट मध्ये आले तेव्हा आपल्या सोबत व्लादिमीरला देखील मदतीला घेऊन आले. अर्थात इथे त्यासाठी प्राध्यापकाचे कोणतही पद रिक्त नव्हतं. मात्र संशोधन करायला मिळत आहे याचा त्याला आनंद होता. म्हणून १८८९ मध्ये सहायक ग्रंथपाल हे पद स्वीकारून इथे वाल्देमार जीवाणूंवरील संशोधनात रमला. लुई पाश्चर यांनी रेबीज आणि अँथ्रॅक्सपासून संरक्षणासाठी लसी विकसित केल्या होत्या, त्यांच्यापासून प्रेरणा घेत त्यानं काम सुरू केलं. सुरुवातीला त्यानं टायफॉईड ताप निर्माण करणाऱ्या जिवाणूंवर प्रयोग केले. कृत्रिम परिस्थितीत जिवाणू वाढवण्याचा आणि त्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला.
तीनच वर्षात व्लादिमीरनं कॉलराची लस शोधून काढली. या लसीची कोंबडा आणि गिनिपिगवर यशस्वी चाचणी घेतल्यानंतर त्यानं स्वतःला देखील ही लस टोचून घेतली. ही लस काम करते आहे हे लक्षात आलं आणि त्यानं आपलं संशोधन जगजाहीर केलं. एकोणिसाव्या शतकात कॉलराच्या पाचवेळा मोठ्या साथी आल्या आणि त्यात जगभरात किमान तीन कोटी लोकसंख्या मृत्युमुखी पडली होती. कॉलरा आतड्यातील जंतूंमुळे होतो हे १८८३ मध्ये लक्षात आले होते. वाल्देमारने या जंतूंचा नायनाट कसा करावा याचा उपाय शोधून काढला. एका ठराविक अंतरानं दोन इंजेक्शन्स घेऊन या जंतूंपासून मुक्तता मिळवता येते. अर्थातच कोणत्याही नव्या संशोधनाला जसा जगभर विरोध होतो तसा इथे देखील झाला.
पाश्चर, मेचनिकॉफ यांच्यापासून इतर शास्त्रज्ञांना हे संशोधन लगेच मान्य झालं नाही. दंडावर सुई घेऊन आतड्यातील जंतू कसा नष्ट होईल हे वाल्देमारला सिद्ध करून द्यावं लागलं. कॉलरा झालेल्या रुग्णांसाठी व्लादिमीर नावाचा हनुमान संजीवनी घेऊन आला होता. आणि लवकरच त्याला आपल्या प्रयोगशाळेसाठी खूप मोठी प्रयोगशाळा भेटली.. ही प्रयोगशाळा होती भारताची…भारताचा माजी व्हाईसरॉय असलेला लॉर्ड डफरीन त्याला पॅरिस मध्ये भेटला. तेव्हा पॅरिसमध्ये ब्रिटिश राजदूत हे पद सांभाळत असलेल्या लॉर्ड डफरीनने सांगितलं की, “तू भारतात गेलास तर तुला तुझ्या संशोधनाचा अधिक चांगला वापर करता येईल तिथे कॉलराची साथ चालू आहे. लक्षावधी लोकं तिथं मरत आहेत, तुझ्या उपचारांची तिथे जास्त गरज आहे.” अशा रीतीने हापकिन नावाचा माणूस भारतात आला.
१८९३ मध्ये डॉ. हापकिन भारतात आले. इथं त्यांना कॉलरा लसीची प्रत्यक्ष चाचणी करण्याची संधी होती. बंगाल प्रांतामधील कॉलऱ्याच्या साथीनं जोर पकडला होता. या साथीविरूद्ध हापकिननं आपल्या लसीच्या माध्यमातून लढा लढवला आणि जिंकलादेखील. अर्थात सुई टोचून घेण्यासाठी भारतीय जनता घाबरत होती, त्यावेळी त्यांनी सर्वांच्या समोर स्वतः इंजेक्शन घेतलं. त्यानंतर लस घेण्यासाठी सैन्यामधील दहा हजार स्वयंसेवक तयार करण्यात आले. चहाच्या मळ्यातील मजुरांना तसेच कैद्यांना देखील ही लस टोचण्यात आली. इंजेक्शनचा काही दुष्परिणाम होत नाही हे पाहून जनता लस घेण्यास तयार झाली आणि साथ आटोक्यात आली. लवकरच दोन इंजेक्शन ऐवजी एक इंजेक्शन बस होईल अशी लस देखील शोधण्यात आली. ज्या रशियन सरकारने त्याला प्राध्यापकी करण्यास बंदी घातली होती, त्या देशाला देखील ही लस हवी होती. १८९८ मध्ये काही रशियन शास्त्रज्ञ भारतात आले आणि लस बनवण्याचा फॉर्मुला घेऊन गेले.
कॉलरा उर्फ पटकी हा आजार व्हिब्रिओ कॉलरा नावाच्या जिवाणूमुळे होतो. हा जीवाणू मानवाच्या आतड्यांमध्ये प्रवेश करून आपली संख्या वाढवतो. हा जीवाणू शरीरातील पाणी आणि क्षार बाहेर टाकण्यास प्रवृत्त करतो आणि त्यामुळे तीव्र जुलाब आणि पाण्यासारखी उलटी होऊ लागते. शरीरातील पाण्याचे प्रमाण घटून परिणामी व्यक्तीचा मृत्यू देखील ओढवतो. लस निर्माण करताना प्रयोगशाळेत या जीवाणूवर संशोधन करण्यात आलं. वेगवेगळ्या तापमानाला या जीवाणूंची निर्मिती करून सर्वात कमकुवत जीवाणू तयार करण्यात आला. लस देताना हाच कमकुवत जीवाणू शरीरात सोडला जातो. यावर शरीरातील पांढऱ्या पेशी हल्ला करताना अँटीबॉडीज तयार होतात. या तयार झालेल्या अँटीबॉडीज पुढील संभाव्य संसर्गाविरुद्ध संरक्षण करतात, सशक्त जीवाणूवर देखील मात करतात आणि लसीकरण झालेल्या व्यक्तीला व्हिब्रिओ कॉलरा पासून मुक्तता मिळते.
लसीकरण करण्यासाठी हापकिननं जणू पायाला भिंगरी बांधली होती. इथं आणखी एक गंमत होती. लसीचा पहिला डोस घेतलेले लोक दुसरा डोस घेण्यासाठी उपलब्ध असतीलच असे नाही, त्यांना शोधावं लागायचं. प्रचंड चिकाटी दाखवत हापकिननं लसीकरण करण्यासाठी बंगाल प्रांत पूर्ण पिंजून काढला. या सर्व प्रवासात बदलत्या हवामानासोबत ठिकाणचे अन्न आणि पाणी याचा परिणाम हपकिंच्या रोगप्रतिकारक शक्तीवर झाला त्यातच त्याला मलेरियाचा प्रादुर्भाव झाला आणि मग तो उपचार करण्यासाठी तो काही काळ युरोपमध्ये जाऊन आला. तिथल्या शास्त्रज्ञांच्या भेटी घेऊन तो भारतात परतला. हापकिनला खरं तर कॉलरा लसीवरच पुढचं संशोधन करायचं होतं, पण त्याला प्लेगला सामोरे जावे लागले.
तो भारतात आला तेव्हा प्लेगची साथ जोरात होती. मुंबई पुण्यात माणसं शब्दशः उंदरासारखी मरत होती. भारतात पोचण्यापूर्वी प्लेगनं मागील सत्तर वर्षात दीड कोटी लोकांचे बळी घेतले होते. हॉंगकॉंग मधील एका जहाजामधून भारतामध्ये प्लेगच्या आजाराने प्रवेश केला होता. मुंबईच्या गव्हर्नरने प्लेगवर मात करण्यासाठी हापकिनची मदत मागितली. हापकिनने कंबर कसली आणि प्लेग विरूद्ध लढाई सुरू केली. १८९६ मध्ये भायखळ्यात जेजे रुग्णालयात प्लेग प्रयोगशाळा सुरू झाली. हीच प्रयोगशाळा पुढं परळमध्ये स्थलांतरित झाली आहे, जिला आज आपण हापकिन प्रयोगशाळा म्हणून ओळखतो. जानेवारी १८९७ मध्ये प्लेगवर लस तयार झाली. हापकिन यांनी पहिली लस स्वतःलाच देऊन पाहिली. त्यानंतर भायखळा जेलमधील कैद्यांवर या लसीची चाचणी झाली. लस दिलेल्या शेकडो कैद्यांपैकी सात कैदी मृत्यू पावले. या लसीचे काही साईड इफेक्ट तर नाही ना याची याची पुन्हा चाचणी करण्यात आली. ही लस सुरक्षित आहे याची खात्री झाल्यावर ती जनतेला देण्यात आली आणि पुणे मुंबईमधला प्लेग आटोक्यात आला.
प्लेग हा आजार येर्सिनिया पेस्टिस या जिवाणूमुळे होतो. १८९४ मध्ये येर्सिन या शास्त्रज्ञाने हा जीवाणू शोधून काढला, म्हणून त्याचे नाव या जीवाणूला देण्यात आले. २८-३० अंश तापमानाला या जीवाणूंची वाढ झपाट्याने होते. यावर लस बनवताना देखील हापकिन यांनी कमकुवत जीवाणू हेच सूत्र वापरले. त्यांनी संवर्धन केलेल्या जीवाणूंना ६०° तापमानावर गरम करून त्यांची विषाणूजन्यता कमी केली. ही लस दिल्यामुळे शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज प्लेगपासून मुक्तता देण्यासाठी उपयुक्त ठरत असे. अर्थात हापकिन यांच्या लसीची परिणामकारकता सुमारे ५० टक्के एवढीच होती. त्यामुळे लागण झालेल्या रुग्णाचे विलगीकरण करणं भागच असायचं. मात्र तरीही महामारी सुरू असताना ५० टक्के यश ही देखील मोठी उपयुक्त कामगिरी समजली गेली.
मात्र प्लेगच्या लसीकरणामध्ये एक वाईट घटना घडली आणि हापकिनचं आयुष्य बदलून गेलं. १९०२-०३ पर्यंत भारतात ५ लाख लोकांना ही लस देऊन झाली होती. कुठंच काही अनुचित प्रकार घडला नव्हता. मात्र ३० ऑक्टोबर १९०२ रोजी, पंजाबमधील मुल्कोवाल या ठिकाणी लसीकरण केलेल्या १०७ लोकांपैकी १९ जण मरण पावले. त्यांना धनुर्वात झाला होता. मुल्कोवाल दुर्घटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दुर्घटनेचे पडसाद अगदी ब्रिटिश संसदेमध्ये देखील उमटले होते. धनुर्वातावर नंतरच्या काळात लस शोधली गेली असली तरी १९०२ मध्ये त्यावर उपाय नव्हता. त्यामुळे प्लेगची ही लस प्राणघातक आहे असा मोठा ओरडा त्याकाळात झाला. या घटनेची चौकशी होऊन हापकिन यांना निलंबित करण्यात आलं. मात्र ही दुर्घटना नेमकी कशी घडली होती?
लस ठेवण्यात आलेल्या बाटलीला अस्वच्छ झाकण लावल्यामुळं हा प्रकार घडला होता. झाकणाचं निर्जंतुकीकरण योग्य प्रकारे झालं नव्हतं. या घटनेत हापकिन यांचा काहीच दोष नव्हता मात्र हे सिद्ध करण्यासाठी त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. डॉक्टर नसलेला एक रशियन, ज्यू आपल्याला अक्कल शिकवतो याचा त्याकाळातील ब्रिटिश डॉक्टर मंडळींना राग असावा. त्यात गव्हर्नर लॉर्ड सँडहर्स्ट यानं मुंबईच्या गव्हर्नरांचा भव्य महाल हापकिनच्या स्वाधीन केला होता, हे देखील अनेकांच्या पोटदुखीचे कारण होतं. त्यांनी या घटनेचे भरपूर भांडवल केलं. आयोगासमोर साक्ष सुरू झाली. हापकिन यांनी आपला बचाव करताना अतिशय तर्कशुद्ध मुद्दे मांडले.
१) लसीच्या बाटलीत आधीच दूषित द्रव्य असतं तर त्याची दुर्गंधी आली असती. २) त्या बाटलीत टाकलेलं द्रव्य फ्लास्क नं. 63 N मध्ये तयार झालं होतं, त्या फ्लास्क मधून पाच बाटल्या तयार झाल्या. मात्र इतर बाटल्या दूषित नाहीत. ३) जर जंतू आधीच बाटलीत आले असतील, तर ते सहज वाढू शकले असते, म्हणजेच लस दिलेला व्यक्तींचा मृत्यू एका दिवसात व्हायला हवा, मात्र ते सर्व सात दिवसानंतर मरण पावले आहेत. ४) ब्रिटिश डॉक्टर इलियट यानं लसीकरण करताना बाटलीचं रबर झाकण जमिनीवर ठेवलं आणि पुन्हा बाटलीवर बसवलं होतं. त्यामुळं बाटलीत माती आणि टेटनस जंतू गेले असण्याची शक्यता जास्त होती. मात्र आयोगानं या सर्व मुद्द्याकडं दुर्लक्ष करत तर्कशुद्ध न्यायाऐवजी लोकप्रिय अर्थात ब्रिटिश अधिकाऱ्यांना आवडेल असा न्याय दिला.
हापकिन यांना मुंबईमधून काढून कोलकाता मधल्या जैविक प्रयोगशाळेचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं. मात्र इथं त्यांना लसनिर्मिती करायची नव्हती. केवळ प्रशासकीय कारभार पाहायचा होता. साहजिकच त्यांची इथं चिडचिड सुरू झाली. मानसिक आजारांनी त्यांना त्रस्त केलं. १९१५ मध्ये पुन्हा मलेरिया झाल्यामुळं त्यांना फ्रान्सला परताव लागलं. वयाच्या ५५ व्या वर्षीच त्यांना निवृत्ती देण्यात आली. १९१८ मध्ये जेव्हा भारतामध्ये स्पॅनिश फ्लूची साथ आली, तेव्हा सर्वांना हापकिन यांची आठवण झाली. मात्र तेव्हा ते जगाच्या नजरेआड एकांतवासामध्ये जगत होते ते कुठे आहेत याची कुणालाच खबर नव्हती. त्यांना अशी गायब होण्याची सवय होतीच. मुल्कोवाल दुर्घटनेची चौकशी झाल्यानंतर १९०४ मध्ये ते भारतातून गायब झाले आणि १९०७ मध्ये इंग्लंडमध्ये प्रकट झाले. पुन्हा १९१५ मध्ये ते गायब झाले आणि तब्बल दहा वर्षांनंतर पुन्हा जगासमोर आले होते.
महायुद्ध सुरू असताना, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अगदी जवळ असणाऱ्या शास्त्रज्ञाचं असं गायब होणं हा जगासाठी चिंतेचा विषय होता. ते जैविक अस्त्रे बनवतील का, ते नक्की कुणाच्या गोटात असतील यासारख्या शंका उपस्थित झाल्या होत्या. मात्र निवृत्तीनंतरचं आयुष्य कसं जगावं हे त्यांनी आधीच ठरवलं होतं. हे आयुष्य त्यांनी चिंतन, मनन आणि लेखन यांमध्ये व्यतीत केलं. पुढे ते वैज्ञानिक दृष्टिकोनापासून फारकत घेत अधिक धार्मीक आणि अधिक कर्मठ होत गेले. त्यांनी त्यांच्या आयुष्यात ना प्रेम केलं ना लग्न केले. पूर्णवेळ केवळ संशोधन आणि ते देखील विषाणू सारख्या बोरिंग सब्जेक्ट वर. मोकळा वेळ असेल तेव्हा व्हायोलिन वाजवणे एवढाच काय तो विरंगुळा त्यांच्या आयुष्यामध्ये होता. संगीत व गणित यांच्यातील साम्य त्यांनी ओळखलं होतं. ते म्हणायचे, “संगीतात ताल आणि विज्ञानात सामायिक सूत्र आहे दोन्हीमध्ये संतुलन हवं असतं.”
काही लेखक त्यांना महात्मा असं संबोधन लावतात, या नावानं त्यांचावर एक पुस्तक देखील आहे. आपण मात्र त्यांना मानवजातीचे रक्षक असंच संबोधन देऊया.. त्यांना “मानवतेचे रक्षक” हे संबोधन सर्वात पहिल्यांदा लॉर्ड जोसेफ लिस्टर यांनी दिलं होतं. कॉलरा आणि प्लेग पासून मानव जातीचे रक्षण करणारा हा शास्त्रज्ञ २६ ऑक्टोबर १९३० रोजी या जगाचा निरोप घेऊन कायमचा शांत झाला. १९६४ मध्ये भारतीय टपाल सेवेने हापकिन यांच्यावर एक विशेष स्टॅम्प देखील काढला होता. हापकिन यांनी मुंबईमध्ये स्थापन केलेल्या संस्थेचे १९२५ मध्ये नाव बदलून हापकिन इन्स्टिट्यूट असं करण्यात आलं होतं. आता इथे एक वस्तुसंग्रहालय देखील निर्माण करण्यात आले आहे.
हापकिन असो किंवा एडवर्ड जेन्नर, अलेक्झांडर फ्लेमिंग, लुई पाश्चर.. वेगवेगळ्या लसी शोधून मानवाचं आयुष्यमान वाढविण्यात आपलं योगदान देणारे सर्वच मानवजातीचे रक्षक आहेत… त्यांच्या शोधांमुळं आपण आज श्वास घेत आहोत, तर त्यांच्याप्रती कृतज्ञ असलंच पाहिजे..
Comments
Post a Comment