निसेफोर नीप्स : फोटोग्राफीचा जनक

  निसेफोर नीप्स : फोटोग्राफीचा जनक



फोटो काढणं एवढं सोप्प झालं आहे, की आज प्रत्येकाला असं वाटतं की तो एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. उत्कृष्ट फोटोग्राफर होण्यासाठी एकेकाळी आवश्यक असलेल्या एक्सपोजर, शटर स्पीड या गोष्टींचा गंध नसला तरी देखील व्यक्ती बऱ्यापैकी फोटो काढू शकते. एकेकाळी घरात फोटो असणे हे श्रीमंतीचे लक्षण होते. फोटोग्राफरला घरी बोलवून, त्याच्याकडून ब्लॅक अँड व्हाईट फोटो काढून मस्त फ्रेममध्ये लावून ठेवलेले असायचे. नंतरच्या काळात फोटोग्राफी थोडी स्वस्त झाली आणि सर्वसामान्य व्यक्तीचे लग्नाआधी उमेदवार म्हणून तसेच प्रत्यक्ष लग्नामध्ये फोटो निघू लागले. नंतरच्या काळात स्टुडिओमध्ये फोटो काढण्याची टूम निघाली आणि स्टुडिओमध्ये असलेल्या निसर्गरम्य सिनच्या पडद्यासमोर उभं राहून व्यक्ती फोटो काढू लागल्या आणि अशा अनेक फोटोंचा काचेच्या फ्रेममध्ये कोलाज करून, लोकांना दिसेल अशा ठिकाणी ही फ्रेम लटकली जाऊ लागली. 


मधल्या काळामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये कोडॅकचे कॅमेरे दिसू लागले. मग एकदा रोल टाकला की तो पूर्ण संपेपर्यंत फोटो काढत राहणं सक्तीचं असायचं. अर्थात त्यातही फोटो काढताना रेशनिंग केलं जायचं. तुझे तीन फोटो झाले, तू हो बाजूला, माझा एकच फोटो झालाय फक्त, आता माझा काढू दे अशी भांडाभांडी असायची. त्यातही एखाद्या रोलमध्ये ३६ ऐवजी चुकून ३७ किंवा ३८ फोटो निघाले तर तो बोनस समजला जायचा. फोटोचा अल्बम दाखवणं हे तर लोकांचं आवडीचं काम. एकेकाळी केवळ लग्नाच्या फोटोंचा अल्बम असायचा, आता प्रत्येक ट्रिप, प्रत्येक समारंभाचा वेगळा अल्बम तयार होऊ लागला. फोटो पाहायला कोणी बकरा सापडला की त्याच्यावर अशा दहा-बारा अल्बमचा भडिमार सुरू झाला. फक्त अल्बम हातात देऊन थोडी समाधान मिळत असते, प्रत्येक फोटोची कहाणी ऐकवत एकेक अल्बम अर्धाअर्धा तास घोळवला जाऊ लागला. 

मोबाईलमध्ये फोटो काढण्याची सुविधा आली आणि चित्र पूर्णपणे बदलू लागलं. सुरवातीच्या काळात ०.११ मेगापिक्सल कॅमेरा पुरवून १९९९ मध्ये मोबाईलमध्ये फोटो काढण्याची सुविधा दिली गेली. नंतर त्यापेक्षा भारी अर्थात ०.३ मेगापिक्सल अर्थात VGA (व्हिडिओ ग्राफिक ॲरे) कॅमेरा असलेले मोबाईल आले. अर्थात तेव्हा मोबाईलच्या किंमती आणि कॉलचे चार्जेस एवढे महाग होते की ते केवळ अतिश्रीमंतांना परवडायचे. नंतरच्या काळात १.३, २, ३.२ मेगापिक्सल कॅमेरा असलेले मोबाईल त्यांच्या फोटोच्या क्लॅरिटीसाठी विकत घेतले गेले. तोवर मोबाईलचे तसेच कॉलिंगचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले. इनकमिंगसाठी लाईफ टाईम व्हॅलिडीटीचे गाजर दाखवून मोबाईल कंपन्यांनी पैसे छापून घेतले आणि याकाळात ग्राहकांची संख्या देखील प्रचंड वाढली. पुढील काळात मोबाईलमधील कॅमेरा अधिकाधिक अद्ययावत होऊ लागला, आता तर त्याला एआयची जोड दिली असल्यामुळे फोटो काढणं अतिशय सोपं झालं आहे. 

मात्र आता नवी पिढी एवढे फोटो काढते, की स्वतः काढलेले फोटोदेखील स्वतः परत पाहत नाही. मोबाईल अद्ययावत होत असताना त्यातील इंटर्नल मेमरी देखील वाढत गेली. मात्र त्यामुळे फोटोची किंमत कमी होत गेली. एक फोटो काढण्याऐवजी पाच-सहा फोटो काढले जातात. आणि गंमत म्हणजे अनावश्यक असलेले फोटो डिलीट करण्याचे देखील कोणी कष्ट घेत नाही. कॅमेऱ्याची क्लॅरिटी वाढल्यामुळं प्रत्येक फोटोची साईज देखील मोठी असते. या अनावश्यक डाटामुळे इंटर्नल मेमरी फुल होते आणि व्यक्ती अधिक अद्ययावत मोबाईल घेण्याचा विचार करते. या पार्श्वभूमीवर आज जर कुणाला सांगितलं की जगातील सर्वात पहिला फोटो जेव्हा दोनशे वर्षांपूर्वी, १८२४ मध्ये काढला होता, त्यावेळेस एका फोटोसाठी आठ तास लागले होते, तर या पिढीला विश्वास बसणार नाही. जुन्या काळी पोट्रेट चित्र काढताना व्यक्तीला चित्रकारासमोर तासनतास एकाच स्थितीत स्थिर बसावं लागत असे, फोटोग्राफीची सुरुवात झाली तेव्हा देखील स्थिरता हीच अट असायची. 

आज आपण त्याला फोटोग्राफी अर्थात छायाचित्र म्हणत असू, तरी पहिला फोटो जेव्हा निर्माण केला तेव्हा त्याच्या निर्मात्याने त्याला हेलिओग्राफ अर्थात सौरचित्र असं नाव दिलं होतं. निसेफोर नीप्स हे जगातील पहिल्या छायाचित्राचा जनकाचं नाव. निसेफोर हा खऱ्या अर्थानं सायंटिस्ट खोपडी म्हणावी लागेल, कारण त्यानं इंटर्नल कंबशन इंजिनचा देखील प्रयोग केला होता. म्हणजे दोन अगदी वेगवेगळे, मात्र मूलभूत शोध लावण्यामध्ये या भाऊचा हात होता. फक्त हात नाहीतर पाय, डोकं, डोळे सगळंच होत म्हणा की! त्याचा जन्म ७ मार्च १७६५ रोजी पूर्व फ्रान्समधील सॉन नदीकाठी वसलेल्या एका निसर्गरम्य शहरामध्ये झाला. निसर्गरम्य ठिकाणी लहानपण जाणं आणि त्यातून दिग्गज व्यक्तीमत्त्व साकार होणं याचा काहीतरी सहसंबंध असावा राव! कुणीतरी शोध घेतला पाहिजे.

जोसफ निसेफोर नीप्स असं त्याचं जन्मनाव. त्याचे वडील क्लॉड हे प्रसिद्ध वकील असल्यामुळं घरामध्ये बऱ्यापैकी श्रीमंती होती. मुलांनी साहित्य, संगीत तसेच इतर कलांचं शिक्षण घ्यावं असं वातावरण होतं. क्लॉड आणि रोझ या जोडप्याच्या चार मुलांपैकी जोसफ हा दोन नंबरचा मुलगा. त्याला दोन भाऊ आणि एक बहीण. त्याच्यापेक्षा मोठा असलेला भाऊ क्लॉड (जूनियर) हा देखील अतिशय उचापती होता. या दोघा भावांनी मिळून अनेक खटपटी केल्या. मात्र या भावाला दीर्घायुष्य लाभलं नाही. जोसेफला लहानपणापासून प्रकाशाच्या झरोक्यासोबत खेळायला आवडायचं. आईला त्याची आवड लक्षात आली आणि तिनं त्याला एक गोलाकार आरसा दिला, ज्याच्या साह्यानं जोसेफ अंधाऱ्या भागामध्ये गोलाकार प्रकाश पाडू लागला. त्याला याची खूप गंमत वाटायची. तो म्हणायचा की आरश्याचा वापर करून सूर्य आपलं चित्र काढत आहे.  

घरातील वस्तू खोलून पाहणं हा क्लॉड आणि त्याचा आवडता छंद होता. वडील कडक शिस्तीचे असले तरीदेखील ते या भावांच्या उद्योगांना प्रोत्साहन देत असत. एकदा ते दुपारी घरी आले आणि पाहतात तर काय जोसेफनं घड्याळ खोललं आहे. वडिलांनी दरडावून विचारलं की काय करतोस? यावर निरागस जोसेफ म्हणाला की “घड्याळामधल्या कोणत्या पार्टमध्ये वेळ ठेवलेली असते हे मी शोधत आहे.” वडिलांना त्याचं उत्तर आवडलं आणि त्यानंतर घरामध्ये अडगळीत असलेली, बिघडलेली अनेक यंत्रं या मुलांना खेळण्यासाठी दिली गेली. मात्र बिघडलेल्या यंत्रांमध्ये ही मुलं जास्त रमली नाहीत. हे भाऊ म्हणायचे की “बिघडलेली यंत्र उघडून आम्हाला कसं समजणार की यंत्र कशी चालतात? त्यासाठी चालू स्थितीत असलेली यंत्रं उघडून पाहिली पाहिजेत ना!”

क्लॉड आणि जोसेफ या भावंडांनी घराच्या मागं एक छोटी प्रयोगशाळा निर्माण केली. नकाशे, भिंगं, गणिताची पुस्तकं, भौतिकशास्त्राची उपकरणं अशी त्यांची सुसज्ज प्रयोगशाळा होती. मातीची भांडी, काचेच्या बाटल्या कमी पडल्या तर अगदी आईच्या स्वयंपाकघरातील भांडीही ते पळवत असत. एकदा त्यांनी आईची तांब्याचं मोठं भांडं लंपास केलं आणि त्यामध्ये काहीतरी उकळवलं. त्यानंतर ते भांडं इतकं काळं पडलं की, ते नंतर घासून देखील निघालं नाही. यासाठी आईचा मार बसणारच होता, मात्र वडिलांनी त्यांना वाचवलं. दोन भावांपैकी क्लॉडला रसायनांचे प्रयोग आवडत असत तर जोसेफला प्रकाशाचे. छोट्या काचेच्या प्रिझममधून इंद्रधनुष्यासारखे रंग बाहेर पडताना पाहून तो भारावून जात असे.

ही भावंडं लहान असताना त्यांच्या गावामध्ये एक चित्रकार आला. त्याच्याकडे कॅमेरा ऑबस्क्युरा होता. इ.स. १०२० मध्ये एका अरब संशोधकानं कॅमेरा ऑबस्क्युरा तयार करून त्याची शास्त्रीय माहिती आपल्या पुस्तकात दिली होती. आजच्या होमो सेपियन सेपियन आणि आदिमानव यांचं जे नातं आहे, तसं आपण आजचा कॅमेरा आणि कॅमेरा ऑबस्क्युरा यांच्याबाबत म्हणू शकतो. एक अंधारी पेटी ज्याला एक छिद्र आहे, ज्यात प्रकाश जाऊन आपल्याला उलटी प्रतिमा पाहायला मिळते. हे यंत्र वापरून लिओनार्डो दा विंचीनं काही चित्रं काढली आहेत. पुढे या यंत्राला लेन्स बसवून क्षमता वाढवली, त्याला फोटो प्लेट जोडून पहिली फोटोग्राफी झाली, फिल्म जोडून फोटो काढायला सुरुवात झाली आणि अखेरीस डिजिटल सेन्सर स्मार्टफोन कॅमेरे तयार झाले आहेत. तंत्रज्ञान अध्ययवत झाला असता तरी त्या मागील मूलभूत विज्ञान तेच आहे. कॅमेरा ऑबस्क्युरा पाहून जोसेफच्या विचारांना अधिकच चालना मिळाली.

वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये केवळ प्रयोगांना महत्त्व नसतं तर त्याचं व्यवस्थित निरीक्षण करून त्याचं योग्य अनुमान काढणं देखील गरजेचं असतं. यामध्ये निसेफोरचं काम उल्लेखनीय म्हणावं लागेल. प्रकाश ज्या दिशेनं असेल, त्या दिशेने येणाऱ्या रेषा, सावल्या, कोन, आकार तपासून त्या सर्वांच्या नोंदी त्यानं लहानपणापासून अगदी पद्धतशीर ठेवल्या आहेत. सूर्य ढगात जाईल तेव्हा रंग कसे बदलतात, फुलांच्या पाकळ्यांवर प्रकाश पडल्यावर त्यांचा पोत कसा दिसतो, सावलीची लांबी वेळेनुसार का बदलते? अशा प्रश्नांमागं त्यानं भरपूर वेळ घालवला आहे. शिक्षकांना त्याच्या नोटबुकमध्ये नेहमी सुंदर रेखाचित्रं आढळत असत. निसेफोर वैज्ञानिक लेख वाचायचा आणि त्याच्यादेखील नोंदी काढायचा. मोठा झाल्यावर त्यानं आपलं पाळण्यातील जोसेफ हे नाव सोडून पुढं केवळ निसेफोर नीप्स असंच नाव धारण केलं होतं.

निसेफोरचं प्राथमिक शिक्षण गावातील छोट्या शाळेमध्ये झालं. फ्रेंच भाषा, गणित, चित्रकला आणि धार्मिक शिक्षणाचे प्राथमिक धडे त्याला या शाळेमध्ये मिळाले. पुढील शिक्षणासाठी त्याला अँजर्स शहरातील “कॉलेज डे लोराटोअर” या प्रतिष्ठित महाविद्यालयामध्ये शिकण्यासाठी पाठवण्यात आलं. इथं त्यानं तर्कशास्त्र, विज्ञान, संगीत, लॅटिन भाषा आणि तांत्रिक विषयांचे शिक्षण घेतलं. इथं तो छान बासरी वाजवायला शिकला. पुढील प्रगत शिक्षणासाठी तो लिऑन शहरात दाखल झाला. मात्र इथल्या महाविद्यालयात प्रॅक्टिकलपेक्षा थियरीवर तसंच नवीन काही शोधण्यापेक्षा जुन्या नियमांचे पाठांतर करण्यावर भर होता. म्हणून त्याचं मन इथं रमलं नाही. निसेफोरच्या आईवडिलांना वाटत होतं की त्यानं शिक्षण पूर्ण केल्यानंतर न्यायव्यवस्था किंवा प्रशासन या क्षेत्रांमध्ये करिअर करावं. परंतु त्याला फक्त यंत्रं, प्रकाश आणि रसायनं यातच रमायला आवडत असे. लहानपणापासून सुरू असलेले त्याचे प्रयोग मोठेपणी देखील सुरूच राहिले. 

निसेफोरचे मोठा होत होता, तेव्हा फ्रान्समध्ये राज्यक्रांतीचं वारं वाहू लागलं होतं. नेपोलियनचा उदय होत होता आणि मोठ्या प्रमाणात सैन्यभरती होत होती. वडील निसेफोरला म्हणायचे की किमान सैन्यामध्ये तरी भरती हो. अशातच वडिलांचा मृत्यू झाला आणि कुटुंबाची जबाबदारी उचलण्याची वेळ आली. निसेफोरला देखील सैन्यामध्ये उज्वल संधी दिसत होती. म्हणून तो नेपोलियनच्या क्रांतीसेनेतील नौदलामध्ये सामील झाला. त्याचं गणित आणि यांत्रिकी ज्ञान चांगलं असल्यामुळं त्याला तांत्रिक जबाबदारी सोपवली गेली. इथं त्यानं जहाजांचं यंत्र नेव्हिगेशन, नकाशे बनवणे या सर्व गोष्टीत रस घेतला. या अनुभवातून त्याची तांत्रिक बुद्धिमत्ता वाढली. मात्र युद्धातील दगदग त्याला सहन झाली नसावी. त्याची प्रकृती ढासळली. अशातच त्याला इटलीमध्ये जाण्याची ऑर्डर आली. मग इटलीला जाण्यापेक्षा तो नोकरी सोडून घरी परतला. 

परत आल्यावर त्यानं मोठ्या भावासोबत संशोधनामध्ये वेळ दिला. या दोघांनी मिळून “पायरोलोफोर” हे इंटर्नल कंबशन इंजिन बनवलं. त्याआधी मानवाचं श्रम कमी करण्यासाठी वाफेचं इंजिन दिमतीला आलं होतं. पाण्याची वाफ करून तिच्या दाबानं पिस्टनला गती देणं असं वाफेच्या इंजिनचं तत्व होतं. या इंजिनला अर्थातच खूप मर्यादा होत्या. आज आपण जे इंजिन वापरतो, त्यामध्ये जे तत्व वापरलं आहे, अगदी त्याच तत्वावर नीप्स बंधूंनी इंजिन तयार केलं. १८०७ मध्ये नद्यांवर बोटी चालवण्यासाठी त्यांच्या इंजिनची चाचणी देखील झाली. कोळसा/तेल/राळ यांसारख्या ज्वलनशील पदार्थांचं कंबशन चेंबरमध्ये ज्वलन करताना लहान-लहान स्फोटांतून तयार होणाऱ्या दाबाच्या साह्यानं पिस्टनला गती दिली जायची. यातून पुढं पंप करणं, पॅडल फिरवणे, शाफ्ट ढकलणं या क्रिया केल्या जायच्या. प्रवाहाच्या विरुद्ध कैक किलोमीटर या इंजिनची बोट चालू शकत होती. 

निसेफोर जरी बुद्धिमान वैज्ञानिक म्हणून ओळखला जाऊ लागला, तरी वैयक्तिक आयुष्यामध्ये तो अतिशय अबोल, भावुक आणि सज्जन माणूस होता. त्याच्या आयुष्यात अग्नेसच्या रूपाने चांगली मुलगी आली होती. १७९४ मध्ये त्यांचं लग्न झालं. पुढच्याच वर्षी इसिदोर नावाचा मुलगा झाला, जे त्यांचं एकमेव अपत्य होतं. मात्र बायकोकडे त्याचं खूप दुर्लक्ष व्हायचं. त्याची बायको म्हणायची देखील की तुझं माझ्यापेक्षा जास्त लक्ष सूर्यप्रकाशाकडं असतं. अग्नेस आजारी पडल्यावर मात्र निसेफोरला जाणीव होऊ लागली की आपण तिच्याकडं खूप दुर्लक्ष केलं आहे. मग त्यानं प्रयोग बाजूला ठेवून तिच्या पलंगाजवळ बसणं निवडलं. तिच्या खोकल्याचा आवाज ऐकून तो अस्वस्थ होत असे. तिला बरं करण्यासाठी त्यानं अनेक औषधी वनस्पतींचे प्रयोगही केले. मात्र तो तिला वाचवू शकला नाही. तिच्या मृत्यूनंतर त्याने स्वतःचं आयुष्य पूर्ण संशोधनाने वाहून दिले. 

तत्पूर्वी त्याचा आवडता भाऊ देखील मृत्यू पावला होता. क्लॉड मानसिक आजारी झाला होता. डोक्यामध्ये रात्रंदिवस प्रयोगाचे विषय, अतिशय अपुरी झोप आणि प्रयोग अपयशी झाल्यावर त्यातून निर्माण होणारी चिंता या सर्वांनी क्लॉड मानसिकरित्या प्रचंड खचला. वेड्यासारखा वागू लागल्यामुळं त्याला उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र लवकरच तो मृत्यूमुखी पडला. क्लॉड आणि निसेफोरनं हेलिओग्राफ काढण्याचं स्वप्न पाहिलं होतं, त्यासाठी अनेक वर्षे दिली होती, मात्र यश हाती लागलं नव्हतं. मोठ्या काचेवर सूर्यप्रकाश टाकून काय परिणाम होतो ते पाहणं, धातूच्या प्लेटवर तूप, मेण, तेल, पॉलिश, चांदीचे मीठ लावून तपासणं, आरशांचा वापर करून प्रकाश वेगवेगळ्या प्लेट्सवर फेकणं असे शेकडो प्रयोग करून झाले होते. क्लॉडच्या मृत्यूनंतर निसेफोरनं ठरवलं की भावाचं स्वप्न पूर्ण करायचं! 



१८२६ मध्ये हे स्वप्न साकार झालं! वर्षानुवर्षांच्या चाचण्यांनंतर, निसेफोरनं त्याच्या कॅमेऱ्यात प्लेट ठेवली आणि तिला आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्याच्या खिडकीजवळ ठेवलं. त्या प्लेटवर सूर्यप्रकाश ८ तास पडत राहिला. कधी ढग, कधी एखादा सावलीचा कोन! प्रकाशानं प्लेटला लावलेला बिटुमेन अर्थात डांबर हा पदार्थ घट्ट झाला, त्यावर प्रतिमा उमटली आणि जगातला सर्वात पहिला फोटो निर्माण झाला. “View from the Window at Le Gras” हे जगातील सर्वात पहिलं छायाचित्र साकार झालं होतं. ही प्रतिमा स्पष्ट नव्हती, मात्र ती मानवजातीच्या इतिहासातील क्रांती होती. आठ तासांमध्ये सूर्यानं पुष्कळ अंतर पार केलं असल्यानं इथं इमारतीच्या दोन्ही भागांवर प्रकाश असलेला दिसतो, जी खरंतर वैज्ञानिक चूक आहे.  


निसेफोरनं रस्त्याचे, गोदामांचे,घरांचे आणि अंगणाचे अनेक फोटो काढले. त्याची किर्ती ऐकून लुई डॅगेर नावाचा जादूगार त्याला पॅरिसवरून भेटायला आला. प्रकाश आणि सावल्यांवर जबरदस्त पकड असलेला डॅगेर ऑप्टिकल इल्युजन मधला बादशहा समाजला जायचा. तो मोठ्या उत्सुकतेनं निसेफोरला भेटायला आला होता. मात्र धूसर फोटो पाहून त्याची निराशा झाली. त्यानं तसं बोलून दाखवल्यावर निसेफोर दुखावला गेला. तो या सगळ्या गोष्टींकडे कला आणि प्रयोग म्हणून पाहत होता. मात्र डॅगेरचा दृष्टिकोन अतिशय व्यावसायिक होता. लोक भरपूर पैसे देऊन प्रतिमा विकत घेतील असं तंत्र त्याला अपेक्षित होते. दोघांचा दृष्टिकोन वेगळा असला तरी निसेफोरकडं कला होती आणि त्याला पैसे हवे होते. गडगंज श्रीमंत असलेला डॅगेर त्याच्यासाठी पूरक होता. डॅगेरच्या प्रसिद्धीमुळं आपलं तंत्र जगात पोहोचू शकतं याची जाणीव देखील निसेफोरला झाली आणि दोघांनी सोबत काम करायचं ठरवलं. 


१८२९ मध्ये त्यांच्यामध्ये करार झाला. प्रकाश, रसायनं आणि प्रोजेक्शन यांची काळजी डॅगेर घेणार होता तर तांत्रिक स्थिरता निसेफोरनं पहायची होती. प्लेट स्थिर करणं, एक्सपोजर कमी करणं, नवीन रासायनिक प्रक्रिया शोधणं यासाठी प्रयोग सुरू झाले. चांदीच्या प्लेटचा वापर सुरू झाला. आयोडीन आणि वाफेचा वापर करून चकाकीदार, स्पष्ट आणि टिकाऊ प्रतिमा निर्माण होऊ लागल्या. मात्र या दरम्यान निसेफोरची तब्येत अतिशय खालावली. लहानपणापासून वेगवेगळ्या रसायनांमध्ये कोणतीही काळजी न घेता केलेलं काम त्याला भोवलं असावं. १८३३ मध्ये फोटोग्राफीचा हा जनक मरण पावला. डॅगेरशी झालेल्या करारानुसार त्याचा मुलगा इसिदोर हा वारस म्हणून भागीदार होणं अपेक्षित होतं. मात्र डॅगेरची नियत बदलली. १८३९ मध्ये जेव्हा डॅगेरोटाइप यंत्र तयार झाल त्यावेळी निसेफोरचं श्रेय डावललं गेलं होतं.

मात्र काळाच्या ओघात निसेफोर नीप्सचं योगदान जगाला समजलं. डॅगेरोटाइप यंत्राच्या निर्मितीत दोघांचं योगदान असल्याचं मान्य झालं. आज चंद्रावरील एका खळग्याला निसेफोर नीप्सचं नाव देण्यात आलं आहे. त्यानं काढलेली छायाचित्रं आज जगभरातील संग्रहालयामध्ये जपून ठेवलेली आहेत. फ्रान्समधील त्याच्या जन्मगावात त्याच्या नावानं एक फोटोग्राफी विषयाला वाहिलेलं संग्रहालय आहे. इथं त्याचा पहिला कॅमेरा ऑबस्क्युरा, त्यानं वापरलेल्या हेलियोग्राफी प्लेट्स, त्याच्या हस्तलिखित डायर्‍या आणि पायरोलोफोर इंजिनचं मॉडेल जतन करून ठेवलं आहे. फोटोग्राफी आणि ऑटोमोबाईल या दोन्ही आघाडीच्या क्षेत्रासाठी त्याचं काम पायाभूत ठरलं आहे. आपल्या आजी-आजोबा, पणजी-पणजोबाला आज आपण फोटोमध्ये पाहू शकतो, तो केवळ त्याच्यामुळे!!

व्हाट्सअपवर एक मेसेज आला होता की जिवंत आहात तोपर्यंत रोज डीपीवरचा फोटो बदला, मेल्यानंतर तुमचा एकच फोटो भिंतीला टांगला जाणार आहे. मात्र हा मेसेज वाचून देखील काही लोक वर्षानुवर्षे डीपी बदलत नाही. त्यांना फोटो काढायला आवडत नसेल तर त्यांनी आपल्या प्रधानसेवकाचा आदर्श घ्यावा. त्यांच्यापेक्षा उत्तम कॅमेरासेन्स असलेली व्यक्ती मला तरी ठाऊक नाही. काही कूचके लोक म्हणतात की या बाबाचं काम कमी आणि फोटो जास्त. पण त्या माणसाला फोटो काढण्याची किती हौस आहे हे पहा की! वेगवेगळ्या गेटअपमध्ये त्यांनी जेवढे फोटो काढले आहेत, तेवढे जगात कोणीच काढलेत असावेत, अगदी राजाबाबू सिनेमा मधील गोविंदाने देखील नाही! कदाचित याबाबतचा विक्रम देखील आपल्या शेठच्या नावावर होऊ शकेल. त्यामुळं इतर कोणी नाही, तरी शेठनं तरी निसेफोर नीप्सचे उपकार मानले पाहिजेत! अर्थात उपकार हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत असला तर! 




Comments

Popular posts from this blog

गोमू आणि गोमाजीराव

आपली पुस्तके