डॉ. अब्दुस सलाम : सीमेपलीकडचा वैज्ञानिक
डॉ. अब्दुस सलाम : सीमेपलीकडचा वैज्ञानिक
“विज्ञानाला कोणताही धर्म नसतो, देशांची सीमा नसते” असं सांगणारा एक शास्त्रज्ञ, ज्याला नोबेल पारितोषिक मिळालं तरीदेखील त्याच्या देशानं “तो केवळ वेगळ्या पंथाचा आहे” म्हणून त्याला स्वीकारलं नाही. विज्ञानामध्ये नोबेल मिळवणारा पहिला मुस्लिम शास्त्रज्ञ, ज्याच्या देशामध्ये त्याला तो अहमदिया पंथाचा आहे म्हणून मुस्लिम धर्मातून बहिष्कृत करण्यात आलं आणि दुय्यम दर्जाचा नागरिक ठरवण्यात आलं. पाकिस्तानला आजवर केवळ दोन नोबेल पुरस्कार मिळाले आहेत, ज्यातील एक पुरस्कार मलाला युसूफजाईला शांततेसाठी मिळाला असला तरी तिच्या कैक दशकं आधी पाकिस्तानला विज्ञानासाठी नोबेल पुरस्कार मिळाला होता. मात्र या करंट्या या देशानं पुरस्काराची आणि तो मिळवणाऱ्या डॉ. अब्दुस सलाम यांची किंमत ओळखली नाही.
डॉ. अब्दुस सलाम यांचा जन्म २९ जानेवारी १९२६ रोजी आज मध्य पाकिस्तानात असलेल्या झांग शहरामध्ये झाला. वडील मोहम्मद हुसेन हे त्यांचा पिढीजात हकीमीचा धंदा सांभाळत एका शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करत होते. मोठे चुलते हे शिक्षण खात्यात मोठे अधिकारी होते. मोहम्मद हुसेन यांची पहिली बायको सईदा बेगम पहिल्या बाळंतपणात मसुदा नावाची मुलगी जन्माला घालून वारली होती. नंतर मोहम्मद हुसेन यांनी हाजरा बेगम यांच्याशी लग्न केलं. आपला अब्दुस हा या जोडप्याचा सर्वात मोठा मुलगा. याच्या पाठीवर महाप्रचंड वेगानं एकापाठोपाठ एक सहा भाऊ आणि एक बहीण असा मोठा परिवार तयार झाला. मात्र नऊ भावंडांमध्ये अब्दुस हा सर्वात लाडका होता, ज्याला घेऊन वडील सायकलवर फिरायचे. अब्दुस दोन वर्षाचा असताना त्यानं आयुष्यातील पहिलं बक्षीस जिंकलं होतं. डबल हाडाचा असलेला अब्दुल हा शहरातील सर्वात गुटगुटीत बालक ठरला होता. नंतर आयुष्यात मिळवलेल्या शेकडो पुरस्कारांची सुरुवात अशी झाली होती.
खाली दोन खोल्या आणि वर दोन खोल्या असं त्यांचं छोटसं घर होतं, अंगणात गाय आणि म्हैस, दोन शेळ्या आणि कोंबड्या देखील पाळलेल्या होत्या. घरात वीज आणि पाणी नव्हतंच. मात्र या सर्व गर्दीमध्ये अब्दुसला अभ्यासासाठी एक कोपरा दिला होता, त्याच्या अभ्यासात खंड पडू नये म्हणून त्याची छोटी भावंडं दिवा साफ करून त्यात तेल ओतण्याचं काम स्वतःहून करायचे. हमीदा बेगम ही बहीण अशा कामांमध्ये आघाडीवर असायची. अभ्यासामध्ये अब्दुल एवढा गढून जायचा, की त्याला कसलंच भान नसायचं. पैशाची चणचण असल्यामुळं घरामध्ये क्वचितच मांस शिजवलं जायचं आणि प्रत्येक भावंडाच्या वाट्याला अगदी एक एकच तुकडा यायचा. मात्र विचारांमध्ये मग्न असलेल्या अब्दुसला आपल्या हातातील मांसाचा तुकडा कधी गळून पडला आहे, हे देखील कळलं नाही. त्यांच्या कोंबडीनं तो तुकडा लगेच मटकावून देखील टाकला.
आपल्या मुलामध्ये प्रतिभा आहे, हे शिक्षक असलेल्या वडिलांच्या लवकरच लक्षात आलं. तीन वर्षाचा असताना अब्दुसला शाळेत टाकावं असं वडिलांना वाटत होतं. मात्र बाकीची मुलं सहा वर्षाची असणार, ती या छोट्या मुलाला मारतील ही भीती होती. म्हणून सहा वर्षाचा झाल्यावर अब्दुसला शाळेमध्ये टाकलं. जेव्हा इतर मुलांचे केवळ दहापर्यंत पाढे पाठ होते, तेव्हा अब्दुस पन्नासपर्यंत पाढे म्हणू शकायचा. वाचनामध्ये देखील त्याची प्रगती उत्तम होती. म्हणून प्राथमिक शाळेमध्ये केवळ दोनच वर्षे ठेवून त्याला लगेच मिडलस्कूल मध्ये देखील दाखल करण्यात आलं. आता त्याला त्याच्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी मोठे असलेल्या मुलांसोबत स्पर्धा करायची होती. या शाळेत शिकत असतानाच अब्दुसनं रेल्वे इंजिन, मोटर सायकल, पिठाची गिरणी कशी चालते हे शिकून घेतलं. मातीची धरणं बनवून, त्यांना दरवाजाची व्यवस्था करून त्याद्वारे कॅनलमध्ये पाणी सोडणं हा त्याचा आवडता खेळ होता.
मोहम्मद हुसेन यांना वाटत होतं की अब्दुसला लाहोरमधील सेंट्रल मॉडेल स्कूलमध्ये ऍडमिशन मिळावं, म्हणजे त्याचं इंग्रजी अतिशय उत्तम होईल. अब्दुस आणि त्याचे वडील नेहमी पंजाबी पद्धतीची पगडी बांधायचे, मात्र ऍडमिशन घ्यायला जाताना हुसेन यांना वाटलं की आपल्या मुलगा स्टायलिश दिसला पाहिजे. यासाठी त्यांनी अब्दुसला तुर्की पद्धतीची फेज कॅप घालायला सांगितलं. मात्र दशक भरापूर्वी तुर्कस्तानमध्ये केमाल पाशाचा उदय झाला होता आणि त्यानं अनेक बदल घडवले होते. तेव्हापासून फेज कॅप हे गावंढळपणाचं लक्षण मानलं जाऊ लागलं होतं. झांगसारख्या छोट्या शहरात राहणाऱ्या पितापुत्राला हे ठाऊक नव्हतं. अब्दुसनं घातलेल्या फेज कॅपचं सेंट्रल मॉडेल स्कूलच्या मुख्याध्यापकांवर बॅड इंप्रेशन पडलं आणि त्याला प्रवेश नाकारला गेला. लहान शहरातील या लहानग्या मुलाची लाहोरमध्ये खूप थट्टा उडवली जाईल असं कदाचित मुख्याध्यापकांना वाटलं असावं.
नाराज झालेले हुसेन मुलाला घेऊन पुन्हा झांग शहरी परतले आणि तिथल्या सरकारी विद्यालयामध्ये प्रवेश घेतला. आपल्या मुलानं असं काही करून दाखवावं की त्या मुख्याध्यापकांना आपल्या निर्णयाचा पश्चाताप झाला पाहिजे असं हुसेन यांना वाटत होतं. त्यासाठी अब्दुस कोणत्या गोष्टींमध्ये कमी आहे याचा शोध ते घेऊ लागले. त्यांच्या लक्षात आलं की अब्दुसचं अक्षर खूपच गिचमिड आहे. त्यामुळे त्यानं योग्य उत्तर लिहीलं तरीदेखील परीक्षकाची नजर कमजोर असेल तर त्यांना अब्दुसचं उत्तर वाचता येणार नाही. बोर्डच्या परीक्षेत तेव्हा केवळ हिंदू सनातम धर्म आणि आर्य शाळांमधील विद्यार्थ्यांचं वर्चस्व असायचं, अब्दुसनं त्यांच्यापेक्षा पुढं असावं यासाठी अब्दुसच्या हस्ताक्षरासोबतच प्रॅक्टिकल सायन्स, भूमिती आणि अरबी भाषेच्या अभ्यासावर देखील भर देण्यात आला.
मॅट्रिक परीक्षेच्या निकालाचा दिवस उजाडला. लाहोरमधून जोपर्यंत वर्तमानपत्रं झांग रेल्वे स्टेशनवर पोहोचत नाहीत, तोपर्यंत निकाल समजणार नव्हता. चौदा वर्षाचा अब्दुस आपल्या वडिलांच्या कार्यालयात निकालाची वाट बघत थांबला होता. मात्र निकाल येण्याआधीच अभिनंदनच्या तारा येऊ लागल्या. अब्दुस परीक्षेत जिल्ह्यामध्ये पहिला तर प्रांतामध्ये पाचवा क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाला होत्या. निकाल ऐकून खुश झालेला सायकलला टांग मारून घराकडे निघाला. दुपारची वेळ होती, एरवी त्याच्या वस्तीमधील सर्व हिंदू दुकानदार दुपारी दुकान बंद करून घरी जाऊन झोपत असत. मात्र आज सर्व दुकानं सुरू होती आणि सर्वजण अब्दुसची वाट पाहत होते. त्याच्या वस्तीमध्ये त्याचं जोरदार कौतुक झालं. पुढील शिक्षणासाठी सरकारकडून दोन रुपये स्कॉलरशिप देखील मिळाली.
जुनियर कॉलेजमधील शिक्षणासाठी लाहोरला जाण्यापेक्षा त्यानं झांगमध्येच शिकावं असा निर्णय हुसेन यांनी घेतला. जुनिअर कॉलेजची दोन वर्षे अब्दुसनं गाजवली. त्याला क्लास लायब्ररीचा प्रमुख करण्यात आलं, तसेच कॉलेजमधून निघणाऱ्या “चिनाब” या नियतकालिकाचा संपादक म्हणून देखील नेमण्यात आलं. इथल्या शिक्षकांनी त्याचे सर्व विषय पक्के करून घेतले, ज्याबद्दल तो पुढं आयुष्यभर कृतज्ञता व्यक्त करत असे. इंग्रजी सुधारण्यासाठी अब्दुस खूप झटत होता. यासाठी त्यानं अवघड अवघड शब्द वापरण्याचा चंग बांधला. शिक्षकांनी सांगितलं की अशी अवघड भाषा, कोट्स वापरू नको, मात्र अब्दुसनं ऐकलं नाही. जेव्हा सहामाही परीक्षेमध्ये त्याच्या प्रत्येक चुकीच्या शब्दासाठी पाच गुण कापले गेले, तेव्हा अब्दुसला आपली चूक लक्षात आली. इंग्रजीसोबतच अरेबिक आणि पर्शियन भाषा तो शिकला, याशिवाय गणित आणि विज्ञान हे त्याचे आवडीचे विषय सोबत होतेच.
अब्दुस एक आठवण सांगतो, “आमच्या विज्ञान शिक्षकानं न्यूटन आणि गुरुत्वाकर्षण शक्तीबद्दल सांगितलं, ज्यामुळं पृथ्वी, चंद्र आणि ग्रहांना त्यांच्या कक्षेत नियंत्रित केलं जातं. नंतर चुंबकत्वाबद्दल सांगताना शिक्षकांनी आम्हाला एक चुंबक दाखवला. मग ते म्हणाले ‘विद्युतशक्ती ही एक अशी शक्ती आहे, जी झांगमध्ये उपलब्ध नाही, ती पाहायला तुम्हाला लाहोरला जावं लागेल. मात्र आण्विकशक्ती पाहायची असेल तर तुम्हाला थेट युरोपमध्येच जावं लागेल.” या शिक्षकानं जणू काही अब्दुसचा रोडमॅप आखून दिला होता. दोन वर्षात अब्दुस फॅकल्टी ऑफ आर्ट्स परीक्षेमध्ये पूर्ण पंजाब प्रांतामध्ये रेकॉर्डब्रेक गुण मिळवत पहिला आला. यामुळे त्याची शिष्यवृत्ती ६० रुपयांपर्यंत वाढली. आता पुढील शिक्षण घेण्यासाठी लाहोरला जाणं अनिवार्य होते, आता त्याला विद्युतशक्ती पाहायला मिळणार होती.
लाहोरच्या शासकीय महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेऊन तो हॉस्टेलवर दाखल झाला. घरापासून आणि वडिलांच्या शिस्तीपासून पहिल्यांदाच तो दूर गेला होता. शिंग फूटण्याच्या या वयात त्याला बुद्धिबळ खेळाचा नाद लागला. मात्र याची कुणकुण त्याच्या वडिलांना लागली आणि त्यांनी अब्दुसची कानउघाडणी करणारं एक खरमरीत पत्र पाठवलं आणि अब्दुसची गाडी पुन्हा अभ्यासाच्या रुळावर आली. लाहोरसारख्या मोठ्या शहरामध्ये अब्दुसचं भवताल देखील विस्तारलं गेलं. भारतीय उपखंडात पहिलं नोबेल मिळवणारे रामन यांची तसेच रामानुजन यांनी विलायतेमध्ये मिळवलेल्या प्रसिद्धीची माहिती त्याला मिळाली. लाहोर महाविद्यालयातील गणित विभागाचे प्रमुख होते प्रा. चावला, जे केंब्रिजमधून शिक्षण घेऊन परतले होते. रामानुजनसारखा हिरा ज्यांनी जगापुढं आणला होता, ते प्रा. हार्डी हेच चावला यांचेदेखील गुरू होते. ३०० पेक्षा जास्त संशोधन पेपर प्रकाशित करणारे चावला अब्दुससाठी प्रेरणास्थान ठरले.
चावला यांनी रामानुजननं सोडवलेलं गणित अब्दुसला सोडवायला दिलं. अब्दुसनं रामानुजनपेक्षा सोप्या, वेगळ्या पद्धतीनं आणि कमी वेळामध्ये हे गणित सोडवलं. चकित झालेल्या चावलांनी अब्दुसची पद्धत गणितविषयक नियतकालिकामध्ये प्रकाशित केली आणि १७ वर्षाचा अब्दुस गणितीय जगासमोर नवीन तारा म्हणून झळकला.
एक्सचा वर्ग = ए + वाय,
वायचा वर्ग = ए + झेड आणि
झेडचा वर्ग = ए + एक्स
हे गणित सोडवताना अब्दुसनं द्विवर्ग समीकरण पद्धत वापरली होती. समजा की एक्स, वाय, झेड आणि ए हे द्विवर्ग समीकरणाची वर्गमुळं आहेत अशी युक्ती वापरून अब्दुसनं हे गणित अतिशय सोपं केलं होतं.
मॅट्रिक आणि इंटरप्रमाणेच पदवीमध्ये देखील रेकॉर्ड ब्रेक गुण मिळवत अब्दुस पूर्ण पंजाबमध्ये पहिला आला. अठरा वर्षाच्या अब्दुसनं गणितासोबत इंग्रजीमध्येदेखील स्वतंत्र पदवी मिळवली आणि हे देखील एक रेकॉर्ड होतं. हुसेन यांना वाटत होतं की अब्दुसनं आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरी स्वीकारावी. मात्र १९४४ मध्ये दुसरं महायुद्ध सुरू असल्यामुळं आयसीएसची परीक्षा प्रलंबित होती. अब्दुसनं रेल्वेची लेखी परीक्षा पास केली, मात्र कमजोर नजर असल्यामुळं त्याला नोकरी मिळू शकली नाही. अर्थात ही गोष्ट पथ्यावरच पडली म्हणायची! गणित आणि इंग्रजी विषयांच्या स्वतंत्र पदव्या असल्यामुळे पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी त्याच्याकडे दोन ऑप्शन होते, शेवटी विजय गणिताचा झाला. १२० रुपयांची भरभक्कम स्कॉलरशिप मिळवत त्याचं पदव्युत्तर शिक्षण सुरू झालं.
महाविद्यालयात केवळ अभ्यास नाही तर इतर गोष्टींमध्ये देखील अब्दुस आघाडीवर होता. तो विद्यार्थी संघटनेचा प्रमुख होता, तसेच महाविद्यालयातून निघणाऱ्या “रावी” या नियतकालिकाचा तो संपादक होता. इथं त्याला अनेक मित्र मिळाले, रामप्रकाश बांबाह हे त्यापैकी एक. पुढे पंजाब विद्यापीठाचे उपकूलपती झालेले रामप्रकाश आठवण सांगतात की कॉलेज जीवनामध्ये जेव्हा ते आजारी होते, तेव्हा अब्दुसनं सलग ४८ तास, एक क्षण देखील न झोपता त्यांची सेवासुश्रुषा केली होती तसेच हास्यविनोद करत खोलीमधील वातावरण खेळीमेळीचं ठेवलं होतं. ते म्हणतात की डॉक्टरपेक्षा कदाचित अब्दुसमुळं मी लवकर बरा झालो असेल. दोस्ती आणि दुनियादारी करताना अब्दुसचा अभ्यास अजिबात मागं पडला नाही. १९४६ मध्ये गणितामध्ये एमएची पदवी मिळवताना त्याने ६०० पैकी ५७३ गुण मिळवत आपला पहिला क्रमांक कायम ठेवला.
पुढील शिक्षणासाठी अब्दुस ऑगस्ट १९४६ मध्ये केंब्रिजमध्ये दाखल झाला. कधीकाळी जगाची राजधानी असलेलं त्याच्या कल्पनेतील लंडन शहर महायुद्धामुळं बकाल अवस्थेला पोचलं होतं. सर्व जीवनावश्यक वस्तू रेशनवर मिळत होत्या. हमाल असो अथवा प्राध्यापक, सर्वांचे कपडे सारखे झाले होते. इथं अब्दुसनं गणित विषयामध्ये पुन्हा पदवी मिळवली. त्याला सेंट जॉन कॉलेजची स्कॉलरशिप मिळाली होती. त्यानं गणित विषयातील अवघड अशी ट्रायपॉस परीक्षा उत्तीर्ण केली. गणिताशिवाय भौतिकशास्त्र अपूर्ण असतं असं सांगणाऱ्या पॉल डिरॅक यांच्या प्रभावाखाली येऊन, गणिताचा वापर करून भौतिकशास्त्रातील प्रश्न सोडवणं अब्दुसला आव्हानात्मक आणि मजेशीर वाटू लागलं. त्यामुळे तो भौतिकशास्त्राकडं वळला. त्यानं गणित सोडलं नाही, ते भौतिकशास्त्रासाठी वापरलं. त्यानं जो प्रि-डॉक्टरल प्रबंध लिहिला, त्याला १९५० मध्ये स्मिथ पारितोषिक मिळालं.
त्याचे मार्गदर्शक त्याला लगेचच पीएचडी करण्यासाठी सांगत होते, मात्र त्याची शिष्यवृत्ती संपली होती. अब्दुस काही महिन्यासाठी नव्याने निर्माण झालेल्या पाकिस्तानमध्ये परतला. त्यानं शिष्यवृत्तीचं नूतनीकरण करून घेतलं आणि लगेहात लग्न देखील उरकून पुन्हा इंग्लंडमध्ये परतला. “इलेक्ट्रॉन आणि फोटॉन यांच्यातील परस्परक्रिया आणि क्वांटम विद्युतचुंबकीय सिद्धांतामधील गणितीय अडचणी” हा त्याच्या पीएचडीचा विषय होता. म्हणजेच सूक्ष्म कणांमध्ये विद्युतचुंबकीय बल नेमकं कसं काम करतं, हे गणिती अचूकतेनं समजावून सांगणं हा त्याच्या पीएचडीचा उद्देश होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय गाजलेल्या त्याच्या या प्रबंधाला प्रतिष्ठेचं ॲडम पारितोषिक मिळालं होतं.
पीएचडी करताना त्याच्या मार्गदर्शकांनी त्याला आव्हान दिलं होतं की पॉल डिरॅक आणि रिचर्ड फाइनमन या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांनी मांडलेल्या प्रश्नांचं उत्तर अब्दुसनं एक वर्षात शोधावं. मात्र या प्रश्नांचे उत्तर सहा महिन्यांमध्येच शोधून अब्दुसनं आपली क्षमता दाखवली आणि ओपनहायमर सारख्या शास्त्रज्ञाचं लक्ष आपल्याकडं वेधून घेतलं. १९५१ मध्ये, म्हणजे अवघ्या पंचविसाव्या वर्षी त्यानं पीएचडी पदवी मिळवली. पदवी मिळवून डॉ. सलाम पाकिस्तानमध्ये परतले. महाविद्यालयामध्ये त्यांनी प्राध्यापकी सुरू केली. मात्र सरकारी अनावस्था आणि अत्यंत अपुऱ्या संशोधन सुविधा यामुळं इथं त्यांची घुसमट होऊ लागली. त्यातच लाहोरमध्ये अहमदिया पंथीयांवर हल्ले होऊ लागले आणि दंगल उसळली. या काळात सलाम आपल्या कुटुंबाला घेऊन गुप्त ठिकाणी लपून बसले आणि दंगल थांबल्यानंतर पुन्हा युरोपमध्ये परतले.
त्यांनी इंग्लंड तसेच इटलीमध्ये प्राध्यापकी केली. ते प्रत्येक गणिताचे उत्तर वेगवेगळ्या पद्धतीने काढण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करायचे, म्हणून विद्यार्थ्यांमध्ये ते विशेष लोकप्रिय झाले. त्यांच्या नावाबद्दल युरोपमध्ये खूप गोंधळ उडायचा. काही लोक त्यांना मि. सलाम म्हणायचे. ते म्हणायचे सलाम म्हणजे अल्लाह, मी अल्लाह नाही. मग लोक म्हणायचे की तुम्हाला मि. अब्दुस म्हणू का, त्यावर ते म्हणायचे की अब्द म्हणजे दास. मी तुमचा दास नाही. आपल्याकडे जसे अंबादास, देविदास, भानुदास वगैरे नावे असतात याचा अर्थ असतो की अंबेचा दास, देवीचा दास, भानूचा दास त्याचप्रमाणे अब्दुस सलाम हे एकच नाव आहे याचा अर्थ होतो की अल्लाहचा सेवक. त्यामुळे सलाम आग्रह धरायचे की मला माझ्या पूर्ण नावाने हाक मारत जा!!
सलाम यांनी पुढाकार घेऊन इटलीमधील ट्रीएस्ट शहरात स्थापन केलेली इंटरनॅशनल सेंटर फॉर थिएरोटिकल फिजिक्स (ICTP) ही संस्था विकसनशील देशांमधील संशोधकांसाठी अतिशय महत्त्वाची ठरली आहे. भारत, आफ्रिका, लॅटिन अमेरिका येथील अनेक संशोधकांना इथं संशोधनाची संधी मिळाली. इथं प्रवेश मिळवताना “विद्यार्थी कोणत्या देशाचा आहे” हे महत्त्वाचं नसायचं, केवळ त्याची हुशारी पाहिली जायची. “सायन्स हॅज नो पासपोर्ट” असं सलाम यांचे वाक्य प्रसिद्ध आहे. भाभा यांनी जशी भारतामध्ये टाटा इन्स्टिट्यूट फॉर फंडामेंटल रिसर्च (TIFR) ही संस्था स्थापन केली होती, तिचाच आदर्श ठेऊन सलाम यांनी ICTP स्थापन केली होती. सलाम म्हणायचे, “भाभांना हे पक्के माहित आहे की देशाची प्रगती ही विज्ञानातील गुंतवणुकीशिवाय अशक्य आहे.”
भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर तणाव असतानादेखील त्यांनी भारतीय वैज्ञानिकांशी संबंध तोडले नाहीत. राजा रामण्णा आणि सलाम यांच्यात अनेक वैज्ञानिक परिषदांत चर्चा झाली. एकदा अणुऊर्जेवर चर्चा रंगली असताना सलाम म्हणाले होते की, “आपण भौतिकशास्त्रज्ञ मंडळी केवळ भौतिकशास्त्राबद्दल बोलू या, राजकारणावर बोलायला राजकीय नेते असतातच.” अनेक भारतीय वैज्ञानिक म्हणायचे की, “सलाम आमच्याशी बोलताना पाकिस्तानी नसतात, केवळ वैज्ञानिक असतात.” एकदा एक विद्यार्थी संकोच करत म्हणाला की मी खूप गरीब देशातून येतो, तेव्हा सलाम त्याला म्हणाले की, “म्हणजेच या संस्थेवर तुझा सर्वात जास्त हक्क आहे.” अशोक सेन, राजा रामन, जोगेश पाटी असे अनेक भारतीय शास्त्रज्ञ ICTP मध्ये घडले आहेत. जयंत नारळीकर, पद्मनाभन, उन्नीकृष्णन, सुदर्शन यांसारख्या शास्त्रज्ञासोबत सलाम यांनी ज्ञानाची देवाण-घेवाण केली आहे.
सत्तरीच्या दशकात त्यांच्याकडं पाकिस्तानमध्ये महत्त्वाची जबाबदारी आली. ते पाकिस्तानचे मुख्य विज्ञान सल्लागार म्हणून रुजू झाले. या काळात इस्रोप्रमाणे पाकिस्तानमध्ये सुपार्को ही संस्था नासाच्या मदतीनं स्थापन झाली. सलाम यांच्याकडे पाकिस्तान अणुऊर्जा आयोगाची (PAEC) धुरा देखील सोपवण्यात आली. जगभरातील आपले संपर्क वापरून सलाम पाकिस्तानला विज्ञानामध्ये आघाडीवर आणू पाहत होते. त्यांच्या पुढाकाराने पाकिस्तानमध्ये प्लुटोनियम शुद्धीकरणाचा प्लांट देखील सुरू झाला. मात्र पाकिस्तानमध्ये असलेल्या अस्थिर राजकीय नेतृत्व आणि धोरणांचा फटका त्यांना बसत होता. शेवटी त्यांनी आपल्या वैयक्तिक संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित केले, ज्यातून इलेक्ट्रोविक सिमेट्री सिद्धांताची मांडणी झाली.
विद्युतचुंबकीय बल आणि कमकुवत अणुबल हे दोन्ही एकाच मूलभूत बलाची रूपं आहेत अशी मांडणी गणितीय पातळीवर सिद्ध करून दाखवली म्हणून सलाम यांना नोबेल मिळालं आहे. या विश्वात गुरुत्वबल, विद्युतचुंबकीयबल, प्रखर अणुबल आणि कमकुवत अणुबल अशी चार प्रकारची बलं कार्यरत असतात अशी मांडणी यापूर्वी व्हायची. मात्र सलाम यांच्या गणितातून विद्युतचुंबकीय बल आणि कमकुवत अणुबल हे एकच असल्याचं पुढं आलं. “मॅक्सवेलच्या सिद्धांतानुसार सममिती राखण्यासाठी फोटॉनचं वस्तुमान शून्य असतं, हे आपण समजू शकतो, मात्र न्यूट्रिनोचं वस्तुमान शून्य का असतं? अणुकेंद्रकात हिग्ज फील्ड सर्वत्र असते, मात्र काही कण अधिक सक्रिय तर काही कमी सक्रिय का असतात? ” या प्रश्नांचा त्यांनी मागोवा घेतला आणि त्यांचं संशोधन नोबेल पारितोषिकासाठी पात्र ठरलं.
हिग्ज फील्डमध्ये नेमकं काय होतं हे आपण उदाहरण घेऊन पाहू. जर तुम्ही गर्दी असलेल्या कार्यक्रमाला गेलात, आणि तुम्ही प्रसिद्ध व्यक्ती असाल तर तुमच्याभोवती जास्त मोठा गराडा पडतो आणि तुमची हालचाल अतिशय कमी वेगानं होते, इच्छित स्थानी पोहोचण्यासाठी तुम्हाला खूप वेळ लागू शकतो, जर तुम्ही अल्पपरिचित असाल तर केवळ दोन-चार लोकांना हाय हॅलो करून तुम्ही तुमच्या इच्छित स्थानी जाऊ शकता, तुम्हाला कोणीच ओळखत नसेल तर तुम्ही विनाअडथळा तुमच्या इच्छित स्थानी पोहोचता. याचप्रमाणे अणूमधील मूलकणांमध्ये जे कण अधिक कमकुवत असतात, त्यामध्ये विद्युत चुंबकीय हालचाली वेगानं होतात. म्हणजेच विद्युत चुंबकीय बल आणि कमकुवत बल हे वेगळे नाहीत.
या इलेक्ट्रोविक सिमेट्री सिद्धांताच्या मांडणीसाठी सलाम यांना शिल्डन ग्लाशो आणि स्टीवन विनबर्ग या त्यांच्या सहकाऱ्यांसोबत नोबेल पारितोषिक मिळालं आहे. सत्तरीच्या दशकामध्ये त्यांनी मिळून या सिद्धांताची मांडणी केली होती. अर्थात कोणत्याही नव्या मांडणीला विरोध होतो तसा या मांडणीला देखील झाला. सलाम यांनी आपली मांडणी वूल्फगॅंग पाऊली यांना पाठवली. त्याकाळात भौतिकशास्त्रातील सर्वात ज्येष्ठ शास्त्रज्ञ समजले जाणारे पाऊली तेव्हा म्हणाले की “माझ्या लेकरा, तुझा वेळ वाया घालू नको, दुसऱ्या गोष्टीमध्ये संशोधन कर.” मात्र सलाम बरोबर बोलत होते, पाऊली चुकीचे होते हे पुढील दशकात जगाला समजलं. सर्न प्रयोगशाळेमध्ये W आणि Z बोसॉन कणांचा शोध लागला, तेव्हा सलाम यांची मांडणी योग्य आणि काळाच्या पुढं होती हे सिद्ध झालं. १९७९ मध्ये सलाम यांना नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आलं.
नोबेल पारितोषिक स्वीकारताना ते मुद्दाम आपल्या वडिलांप्रमाणे वेशभूषा करत, पंजाबी पगडी डोक्यावर बांधून पुरस्कारासाठी उपस्थित राहिले होते. जिथून आपण आलो, त्या आपल्या मुळांशी नाळ जोडण्याचा प्रयत्न त्यांनी नेहमीच केला. सलाम यांना नोबेल मिळणं ही खूप मोठी गोष्ट होती, कारण यातून विकसनशील देशातील शास्त्रज्ञांना मोठी प्रेरणा मिळाली. सलाम यांनी जोगेश पाटी यांच्यासोबत क्वार्क्सवर देखील महत्त्वाचे संशोधन केलं आहे. प्रोटॉन क्वार्क्सचे बनलेले असतात, परंतु इलेक्ट्रोविक सिद्धांत केवळ इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रिनोशी संबंधित होता. जर निसर्गातील सर्व घटक एका नवीन सममितीमध्ये एकत्र आणले गेले, तर ते या कणांच्या विविध वैशिष्ट्यांचं आणि त्यांच्यावर कार्य करणाऱ्या बलांचं कारण उघड करू शकेल अशी मांडणी त्यांनी केली. यातूनच पुंजभौतिकशास्त्रात पाटी-सलाम मॉडेलचा विकास झाला.
त्यांनी जोगेशसारखे अनेक संशोधक घडवले आणि त्याचसोबत स्वतःचे २७५ शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. नोबेल मिळाल्यानंतर काही दिवसातच ते पुन्हा वर्गामध्ये शिकवण्यासाठी रुजू देखील झाले. ते म्हणायचे, “गणित सोडवणं हे महत्त्वाचे आहे, पुरस्कार काय मिळतील किंवा न मिळतील.” एकदा वर्गात शिकवत असताना त्यांनी एक अतिशय अवघड गणित फळ्यावर सोडवलं. मात्र तास झाल्यानंतर त्यांनी ते नेहमीच्या सवयीप्रमाणं फळा पुसला. त्यांचे विद्यार्थी म्हणाले की, “पुसण्याच्या आधी कागदावर उतरवून का नाही घेतलं, आता पुन्हा जर हे गणित तुम्हाला जमलं नाही तर?” त्यावर सलाम म्हणाले होते की, “जर पुन्हा योग्य पायऱ्या केल्या, तर पुन्हा योग्य उत्तर येणारच! आपला आपल्या गणितावर विश्वास असायला हवा.”
१९७४ मध्ये भारताने जेव्हा अणुचाचणी केली, तेव्हा सत्तेवर असलेले भुट्टो म्हणाले की “पाकिस्तान एक वेळ गवत खाऊन जगेल पण अणुबॉम्ब बनवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.” मात्र ही घोषणा जे शास्त्रज्ञ साकार करू शकत होते, अशा सलाम यांना अडगळीमध्ये टाकण्याची प्रक्रिया देखील समांतर पातळीवर सुरू होती. १९७१ पासून सलाम यांनी अमेरिकेत जाऊन मॅनहॅटन प्रकल्प तसेच अणुबॉम्ब संदर्भात अनेक महत्त्वाची कागदपत्रं जमा केली होती, अनेक गुप्त मीटिंग घेतल्या होत्या. मात्र घर फिरलं की वासेदेखील फिरतात, त्याप्रमाणं सलाम यांचं नशीब फिरलं. अगदी सलाम यांनी नोबेल मिळवलं तरीही ते पाकिस्तानचे दुय्यम नागरिक राहिले. याचं कारण १९७४ मध्ये पाकिस्तानमध्ये इस्लाममधून बाहेर काढत अहमदिया पंथाला दुय्यम नागरिकत्व देण्याचा कायदा मंजूर झाला होता.
अहमदिया पंथ नक्की का वेगळा आहे, हे जरा समजावून घेऊ. १८७६ मध्ये मिर्झा गुलाम अहमद यांनी घोषित केलं की ते प्रेषित आहेत आणि त्यांना इस्लाममध्ये सुधारणा करण्याचा आदेश प्रत्यक्ष अल्लानं दिला आहे. याच काळात हिंदू धर्माचे आर्य समाजामार्फत शुद्धीकरण चाललं होतं, हिंदू धर्मात सर्वसमावेशकता येऊ लागली होती, शीख लोकांना त्यांची हिंदू पाळेमुळे पटवून देण्यात येत होती. ख्रिस्ती मिशनऱ्यांचा प्रभाव देखील वाढत होता. या पार्श्वभूमीवर अनेक मुस्लिमांना असं वाटलं की मिर्झा गुलाम अहमद हे इस्लामसाठी नवसंजीवनी घेऊन आले आहेत. भारतापासून अगदी पश्चिम आफ्रिकेपर्यंत अहमदिया पंथ मोठ्या प्रमाणात वाढू लागला आणि त्यात सुशिक्षित मुस्लिम सामील होऊ लागले. जेव्हा पाकिस्तानची साक्षरता ५० टक्के होती, तेव्हा अहमदिया पंथ १००% साक्षर होता.
मात्र अहमदिया पंथाची मूलभूत मांडणी इस्लाम विरुद्ध होती. कारण इस्लाममध्ये मोहम्मद पैगंबराला शेवटचा प्रेषित मानण्यात येतं. त्यामुळे जेव्हा पाकिस्तान स्वतंत्र झाला, इस्लामिक देश झाला, तेव्हापासून अहमदिया पंथ इस्लामचा भाग नाही, त्यांना दुय्यम नागरिकत्व देण्यात यावं यासाठी आंदोलनं होत होती. अब्दुस सलाम यांचे मोठे चुलते अहमदिया पंथाचे होते, त्यामुळे मोहम्मद हुसेन यांनी देखील हा पंथ स्वीकारला होता. अब्दुस सलाम यांची आई जरी इस्लामिक होती, मामा आफ्रिकेमध्ये इस्लामचे प्रचारक म्हणून काम करत होते, तरी अतिशय धार्मिक असलेल्या, इस्लामचे पालन करणाऱ्या, अब्दुस सलाम यांना इस्लाममधून बाहेर काढण्यात आलं. अब्दुस सलाम यांनी भुट्टो यांच्याकडे मदत मागितली, मात्र भुट्टो यांनी ती नाकारली. अखेर अब्दुस सलाम यांना देश सोडावा लागला.
गंमत पहा, अहमदिया पंथाचे जे लोक फाळणीनंतर भारतात आले, त्यांना कोणतीही तुच्छतेची वागणूक देण्यात आली नाही. जसे इस्लामचे इतर पंथ आहेत, तसेच अहमदियांना समजण्यात येतं. मात्र सलाम यांचं कुटुंब फाळणीमध्ये भारतात स्थलांतरित झालं नव्हतं. पाकिस्तान वेगळा होण्याच्या आधी अखंड भारतामध्ये देखील पंजाब किंवा बंगाल प्रांतात अहमदियांना कोणतीही वेगळी वागणूक दिली जात नव्हती. त्याकाळात हिंदू, मुस्लिम आणि शीख यांच्यातच आपापसात धर्मावरून झगडे होत होते. मात्र फाळणी झाली, पंजाब आणि बंगाल प्रांताचे तुकडे होऊन पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान तयार झाला. पश्चिम पाकिस्तानमध्ये इतर धर्मीय खूपच अल्पसंख्य होते. त्यामुळे धर्मांधांची नजर अहमदिया लोकांवर पडली आणि ते टार्गेट होऊ लागले. अगदी जागतिक कीर्तीचा शास्त्रज्ञ देश सोडून चालला असेल, तरीदेखील या या धर्मांधांना तमा नव्हती.
व्यक्तिगत आयुष्यामध्ये धार्मिक असले तरी सलाम हे विज्ञानामध्ये धर्माची सरमिसळ करत नव्हते. वंश, धर्म आणि देश यांच्या सीमादेखील त्यांना मान्य नव्हत्या. १९८१ मध्ये जेव्हा त्यांना समजलं की आपले शिक्षक, अनिलेंद्र गांगुली हे आजारी आहेत, त्यावेळी ते त्यांना भेटायला कोलकात्यामध्ये आले. आपलं नोबेल पारितोषिक आपल्या गुरुच्या हातात देऊन ते म्हणाले की “हे नोबेल तुमचं आहे, तुम्ही जर मला गणिताची गोडी लावली नसती तर मी ही मजल मारू शकलो नसतो.” असे विनयशील असलेल्या सलाम यांचं व्यक्तिगत आयुष्य खूप खासगी राहिलं. अम्तुल हफीज या पहिल्या पत्नीपासून त्यांना तीन मुली आणि एक मुलगा झाला. नंतर त्यांनी लुईस जॉन्सन या जीवभौतिकी शाखेच्या प्राध्यापिकेसोबत विवाह केला. या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी झाली.
१९७४ मध्ये पाकिस्तान सोडल्यावर सलाम यांनी ICTP हेच आपले जीवन कार्य मानलं आणि पूर्णवेळ संस्थेसाठी तसेच संशोधकांच्या मार्गदर्शनासाठी दिला. १९८१ मध्ये युनेस्कोच्या विज्ञान सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याची संधी सलाम यांना होती. मात्र अर्थातच त्यासाठी मायदेश म्हणजे पाकिस्तानमधून समर्थन आवश्यक होते. ऑस्ट्रेलिया वगळता इतर सर्व खंडांमधून सलाम यांना समर्थन होतं, मात्र पाकिस्तान त्यांच्या बाजूनं उभा राहिला नाही. काही वर्षांनी त्यांना पार्किसनचा आजार जडला. बोलणं, हालचाल हळूहळू कठीण होत गेली. तरीही ते संशोधन, व्याख्यानं देत राहिले, ICTP मध्ये मार्गदर्शन करत राहिले.
अखेर २१ नोव्हेंबर १९९६ रोजी, वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं पार्थिव पाकिस्तानमध्ये आणण्यात आलं, आणि दारूल झियाफत इथं अंत्यदर्शनाला ठेवण्यात आलं. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सुमारे ३०००० नागरिक जमले होते. अहमदिया लोकांसाठी निर्माण करण्यात आलेल्या बहिष्ती मकबरा या कब्रस्तानात त्यांना दफन करण्यात आलं. त्यांच्या कबरीवर “अब्दुस सलाम: नोबेल पारितोषिक विजेता पहिला मुस्लिम” अशी पाटी लावली होती मात्र तिलादेखील आक्षेप घेण्यात आला आणि त्या पाटीवर केवळ अब्दुस सलाम एवढंच ठेवण्यात आलं. द्वेष करण्याची ही शेवटची संधी देखील धर्मांधांनी सोडली नाही. त्यांच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी पाकिस्तानने त्यांच्या नावाचा स्टॅम्प काढला, ज्यावर “अब्दुस सलाम: पाकिस्तानी शास्त्रज्ञ” एवढं लिहिलं आहे. धर्माचं जाऊ द्या, किमान देशाचं नागरिक असल्याचं तरी शेवटी पाकिस्तानला मान्य करावं लागंलच. हेच जर सलाम हयात असताना केलं असतं तर?
सत्ताधीशांना जेव्हा विज्ञानापेक्षा धर्म प्रिय होतो, वैज्ञानिकांपेक्षा धार्मिक नेते लाडके होतात तेव्हा देशाचा पाकिस्तान होतो. होय ना???


.jpeg)
.jpeg)


Comments
Post a Comment