जगदीशचंद्र बोस: जीव जाणणारा भौतिकशास्त्रज्ञ

 जगदीशचंद्र बोस: जीव जाणणारा भौतिकशास्त्रज्ञ 



कुंभमेळ्याचं आयोजन करण्यासाठी नाशिक मधल्या तपोवनमध्ये हजार वृक्ष छाटले जाणार आहेत. पर्यावरणाच्या या ऱ्हासाला देशभरातील पुरोगामी लोक विरोध करत आहेतच, त्यासोबत या वृक्षतोडीला हिंदुत्ववादी संघटनांचा देखील विरोध आहे. मात्र या शासनाचा आजवरचा कारभार पाहता त्यांना हवी ती गोष्ट ते रेटून नेतीलच, आणि कुंभमेळ्याचा उत्सव कॅश करण्यासाठी तपोवन आणि तेथील जैवविविधता नष्ट करून व्हीआयपी लोकांसाठी तंबू उभारले जातील. हजारो झाडांचा हा खून असेल. मात्र ओरडू शकणाऱ्या माणसांच्या जीवाची जिथं किंमत नाही, तिथं या मुक्या झाडांची आरोळी कोण ऐकणार? मात्र ही झाडं किंचाळतात, त्यांनाही वेदना होतात आणि त्यांनाही भावना असतात असं सव्वाशे वर्षापूर्वी सिद्ध झालं आहे. जगदीशचंद्र बोस यांनी हे शोधून काढलं होतं, आज त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांची सविस्तर माहिती घेऊया. 


आज बांगलादेशमध्ये असलेल्या मुंसिगंज या शहराजवळच्या एका खेड्यात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचा जन्म झाला. बामसुंदरी आणि भगवानचंद्र बोस हे त्याचे आईवडील. पाच बहिणींच्या पाठीवर झालेला असल्यामुळं हा आईचा विशेष लाडका. त्याचा भाऊ लहानपणीच वारला असल्यामुळं हा बोस कुटुंबातला एकमेव मुलगा. मात्र वडिलांनी त्याचे जास्त लाड न करता बहिणींसोबत त्याला देखील बंगाली शाळेमध्ये टाकले. वास्तविक पाहता भगवानचंद्र हे ब्रिटिश आमदनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करत होते, ते आपल्या मुलांना इंग्लिश मीडियमच्या शाळेमध्ये टाकू शकत होते. मात्र ब्राह्मो समाजाचे अनुयायी असलेले भगवानचंद्र हे अतिशय पुरोगामी विचाराचे होते आणि प्राथमिक शिक्षण हे मायबोलीमध्ये झालं पाहिजे यासाठी आग्रही होते. त्यांनी फरीदपुरमध्ये एक शाळा देखील सुरू केली होती. याच शाळेत जगदीश आणि त्याच्या बहिणींचं शिक्षण झालं.


या शाळेत जगदीशसोबत शेतकऱ्यांची, कोळ्यांची तसेच श्रमिकांची मुलं देखील शिकत होती. त्यामुळं जगदीशचं बालपण अगदी अनुभव संपन्न झालं होतं. घरात ब्राह्मो समाजाचं वातावरण असल्यामुळं मैत्री करताना, सोबत डबा खाताना आणि दिवसभर उंडारताना जगदीशला जाती आणि धर्माच्या अडसरांचा सामना करावा लागला नाही. जगदीशच्या एका बाजूला मुस्लिम मुलगा बसायचा तर दुसऱ्या बाजूला एक कोळी मुलगा! त्याच्या या मित्रांना जगदीश जेव्हा घरी घेऊन यायचा तेव्हा त्याची आईदेखील सर्व मुलांचे लाड करायची आणि त्यांना खाऊ पिऊ घालायची. आपल्या या मित्रांसोबत जंगल, नद्या, तळ्यांच्या काठावर दिवसभर ठाण मांडून बसायचं आणि पक्ष्यांचे आवाज, पानांची हालचाल, वेलींची आधार घेण्याची धडपड, कोळ्याचं जाळं यांचं निरीक्षण करायचं हा जगदीशचा उद्योग. वेगवेगळ्या पक्षांचे आवाज तो ओळखू लागला. 


एकदा त्याच्या मित्रानं त्याला प्रश्न विचारला की पानांचा सळसळ असा आवाज का होतो? त्यावर आठ वर्षाचा जगदीश म्हणाला होता की “वारा आल्यामुळं झाडं आनंदी होत असतील आणि तो आनंद सळसळ आवाज करून व्यक्त करत असतील.” पुढं मोठा झाल्यावर त्यानं झाडांची भावना व्यक्त करण्याची भाषा शिकलीच. जगदीशनं वेगवेगळ्या झाडाच्या पानांचं बढिया कलेक्शन केलं होतं. झाडांची पानं हिरवी असतात, मात्र त्या हिरवेपणात देखील किती वेगवेगळ्या छटा असतात, पानांचे आकार किती भिन्न असतात, शिवाय त्यांची मुळं, शिरा देखील वेगळी! वेगवेगळ्या पानांचं निरीक्षण करून जगदीश अगदी तज्ञ झाला होता. त्याचे मित्र त्याची परीक्षा बघण्यासाठी वेगवेगळी पानं घेऊन यायचे आणि तो कोणत्या झाडाची पानं आहेत हे अचूकपणे सांगायचा. 


एकदा बोस, त्यांचे काका आणि काही मुलं शेजारच्या गावातील जत्रेला चालत चालले होते. वाटेत त्यांना एक घाट पार करायचा होता. मात्र डोंगरावर ते पाहतात की रस्त्यामध्येच एक नागांचं जोडपं मिथुनअवस्थेमध्ये बसलं आहे. जगदीश वगळता इतर सगळे घाबरले आणि पुढं कसं जायचं हा प्रश्न निर्माण झाला. नाग नागिन प्रेमामध्ये एवढे दंग झाले होते की त्यांना आपल्याजवळ माणसं आली आहेत याची जाणीव देखील नव्हती. जगदीश म्हणाला आपण आवाज न करता कडेकडेने गेलो तर त्यांच्या लक्षात येणार नाही. या दहा वर्षाच्या जगदीशला ठाऊक होतं की सापांचे लक्ष वेधून घेण्यासाठी व्हायब्रेशन हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो. आणखी एक घटना त्याची धाडसी वृत्ती दाखवते. एकदा त्यांच्या गावात पूर आला होता आणि त्यामुळं तयार झालेल्या दलदलीत दोन मुलं अडकली होती. तेव्हा बारा वर्षांच्या जगदीशनं त्यांचा जीव वाचवला होता. 


तर्क, निरीक्षण, प्रयोग, अनुमान, प्रचिती या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या सर्व घटकांचा अंगीकार त्यानं लहानपणापासून केला होता. लहान जगदीशला एकदा प्रश्न पडला की एवढे लहान पंख असलेल्या किडा कसा काय उडू शकतो? त्यांनी हा प्रश्न आपल्या आईला विचारला. अर्थातच आईला उत्तर माहित नव्हतं! जगदीशनं किडा पकडून त्याचे पंख, पाय आणि त्यांच्या हालचाली यांचं निरीक्षण केलं आणि त्याची नोंद देखील केली. झुरळ हा निशाचर कीटक. जेव्हा रात्री सगळे झोपतात तेव्हा झुरळ आपलं काम करत असतं. या झुरळाचा अभ्यास करायचा जगदीश प्रयत्न करत होता. मात्र रात्री नेहमीचा दिवा लावला, तर झुरळ पळून जाणार. या समस्येवर मात करण्यासाठी त्यानं एक अनोखा दिवा बनवला. एक छोटी काच, त्याच्या वरच्या बाजूला कागद लावला आणि त्यात एक काजवा सोडला. झुरळाला जगदीशची ही आयडिया अर्थातच समजणार नव्हतीच!  


प्राथमिक शिक्षण गावातच पूर्ण केल्यानंतर अकरा वर्षाचा जगदीश पुढील शिक्षणासाठी कोलकातामध्ये आला. १८६९ मध्ये त्याने हेअर स्कूल मध्ये प्रवेश घेतला. कलकत्त्यामधील ही सर्वात जुनी शाळा डेव्हिड हेअर यांनी १८१८ मध्ये सुरू केली होती. इथं जगदीशनं इंग्रजी, विज्ञान आणि गणित यांचं शिक्षण आधुनिक पद्धतीनं घेतलं. इथली सुसज्ज लायब्ररी जगदीशला खूप आवडली. विज्ञान, भूगोल, वनस्पती, प्राणीशास्त्र या विषयांची पुस्तकं वाचत तो तासंतास ग्रंथालयात बसलेला दिसायचा. त्याची ज्ञानाची ही भूक त्याच्या शिक्षकांच्या लक्षात आली आणि त्यांनी जगदीशच्या जिज्ञासेला उत्तेजन दिलं. पुढं महाविद्यालयीन शिक्षणासाठी जगदीश सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये दाखल झाला, जिथं त्याला फादर युजीन लाफोंते सारखे विज्ञानप्रेमी शिक्षक मिळाले. 


फादर लाफोंते यांनीच भारतामधील सर्वात पहिली भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राची प्रयोगशाळा उभारली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक भारतीय शास्त्रज्ञ तयार झाले आहेत, जगदीशचंद्र बोस हे त्यापैकी एक. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जगदीशने ढाका विद्यापीठाची पदवी मिळवली. पुढं वडिलांप्रमाणे सरकारी नोकरी करावी असा जगदीशचा विचार होता, मात्र वडिलांनी त्याला परावृत्त केलं. चिकित्सक बुद्धीच्या आपल्या मुलाची प्रशासकीय सेवेमध्ये कुचंबना होणार हे त्यांना ठाऊक होतं म्हणून त्यांनी मुलाला विज्ञानाच्या क्षेत्रामध्येच काम करावं अस सुचवलं. जगदीशचा मोठा मेव्हणा आनंदमोहन बोस हा केंब्रिज विद्यापीठामध्ये शिकलेला पहिला भारतीय रँग्लर. त्याच्याप्रमाणं जगदीशनं देखील केंब्रिजमध्ये शिकावं असं त्याच्या वडिलांना वाटत होतं. लाफोंते यांनी जगदीशला केंब्रिजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी मार्गदर्शन केलं. अर्ज कसा करायचा, कोणता विषय निवडायचा इथपासून अगदी शिफारसपत्रं मिळवून देण्याची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडली. 


केंब्रिज विद्यापीठात जगदीशला लॉर्ड रेलीसारखे नोबेल पारितोषिक विजेते दिग्गज शिक्षक लाभले आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी पैलू पडले. तिथं ब्रिटिश विद्यार्थी तसेच काही कर्मचारी भारतीय वंशाचा म्हणून त्याच्याशी भेदभाव करण्याचा प्रयत्न करत. एकदा त्याला प्रयोगशाळेत प्रवेश नाकारला गेला. तेव्हा तो शांतपणे म्हणाला होता,“ तुम्ही आत्ता जरी माझ्यासाठी प्रवेश नाकारत असला तरी लक्षात घ्या, प्रकाश कोणी कोंडू शकत नाही. मी ज्ञान मिळवण्यासाठी आलो आहे आणि ज्ञान मिळवूनच जाणार.” दुसऱ्या प्रयोगशाळेमध्ये प्रयोग करून जगदीशनं पदवीचं शिक्षण पूर्ण केले. बाहेर बर्फ पडत असो किंवा पाऊस, जगदीश अगदी वीस तीस किलोमीटर सायकल मारत आपली संशोधनाची भूक भागवत असे. 


लंडनमध्ये शिकत असताना त्यानं हर्ट्झच्या लहरी कशा प्रवास करतात यावर प्रयोग केले. धातूंच्या छोट्या स्पंदनांचे मोजमाप केले. पाणी, ऑक्सिजन, प्रकाश यांच्या प्रतिक्रियेत वनस्पतींचे बदल अभ्यासले. इंग्लंडमध्ये शिकताना जगदीशकडे पैसे फारच कमी असत. पैशाची बचत करण्यासाठी तो दिवसातून एकदाच जेवायचा. कधीकधी चहात भिजवलेला ब्रेड हा त्याचा पूर्ण दिवसाचा आहार होता. मात्र लंडनमध्ये जगदीश हा काही पोटाची भूक भागवण्यासाठी नाही, ज्ञानाची भूक भागवण्यासाठी गेला होता. लंडनमधली हवा जगदीशला अजिबात मानवत नव्हती. तो पुन्हा पुन्हा आजारी पडत होता. त्याचा अस्थमा बळावला होता. मात्र या सर्व समस्यांवर त्याने मात केली. “विज्ञानाची वाट अडचणींनी भरलेली असली तरी न थांबता जो चालतो, त्यालाच शोधदृष्टी मिळते” असं जगदीशचं वाक्य प्रसिद्ध आहे.


लंडनमधून पदवी घेऊन जगदीश भारतात परतला. आता त्याचं लग्नाचं वय झालं होतं.‌ मात्र लग्नासाठी मुलगी बघण्याची तसदी जगदीशनं घरच्यांना दिली नाही. स्त्रीशिक्षणासाठी आणि विधवांच्या पुनर्रचनासाठी काम करणारी स्त्रीवादी कार्यकर्ती अबला दास हिच्या प्रेमात जगदीश पडला आणि त्या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. जगदीश कायस्थ जातीतील तर अबला ब्राह्मण, त्यामुळं दीडशे वर्षांपूर्वीचा समाज किती हादरून गेला असेल याची कल्पना आपण करू शकतो. याशिवाय अबला ही प्रखर स्त्रीवादी, अशी बंडखोर मुलगी सून म्हणून कुणाला हवी असते? मात्र घरच्यांचा विरोध बाजूला ठेवून जगदीश आणि अबला यांनी १८८७ मधे आंतरजातीय विवाह केला आणि नंतर एकमेकाची अतिशय सुंदर साथ दिली. त्यांना स्वतःचं मूल झालं नसलं तरी या दाम्पत्यानी विद्यार्थ्यांना मातापित्याची माया दिली.  


तत्पूर्वी भारतात परतल्यानंतर, १८८५ मधे जगदीशचंद्र बोस कलकत्ता प्रेसीडेंसी कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पगार देताना ब्रिटिश प्राध्यापकांना जास्त पगार, मात्र बोस यांना कमी असा जातीय भेदभाव ब्रिटिश अधिकार्‍यांनी केला होता. तसेच बोस यांना प्रयोगशाळेची सोय देखील मिळत नव्हती. याचा निषेध करत बोस यांनी तीन वर्षे पगार स्वीकारलाच नाही! या काळात त्यांचं लग्न झालं होतं, मात्र त्यांनी आपला लढा चिकाटीने लढला आणि कॉलेजला नमते घेऊन त्यांना ब्रिटिश प्राध्यापकासमान वेतन द्यावं लागलं. या संघर्षाच्या काळात त्यांना भगिनी निवेदिता यांची देखील महत्त्वाची मदत झाली. जगदीशचंद्र बोस यांच्यापेक्षा वयाने नऊ वर्षांनी लहान असल्या, तरी भगिनी निवेदिता त्यांना आपला मुलगा मानायच्या. 


त्यांनी जगदीशचंद्र बोस यांना वेळोवेळी प्रोत्साहन तर दिलंच याशिवाय आर्थिक मदत देखील केली. जगदीशचंद्र बोस हे नाव जगप्रसिद्ध होण्याआधी त्यांच्यातील क्षमता ओळखून भगिनी निवेदिता यांनी त्यांना भक्कम पाठबळ दिलं. बोस यांनी “सजीव आणि निर्जीव वस्तूंच्या मधील सीमारेषा” या विषयावर संशोधन केलं. मात्र या भारतीय शास्त्रज्ञाचे संशोधन पेपर्स पब्लिश होण्यात अडचणी येत होत्या. त्याबाबत देखील भगिनी निवेदिता यांनी मदत केली. १८९९ मध्ये जेव्हा पॅरिसमध्ये बोस आपलं संशोधन आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेमध्ये मांडत होते तेव्हा त्यांच्यासोबत स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता दोघंही उपस्थित होते. युरोपमध्ये आजारी पडल्यावर जगदीशचंद्र बोस यांना भगिनी निवेदिता यांच्या आईचं घर हे आराम करण्याचं हक्काचं ठिकाण होतं. 


भगिनी निवेदिता यांनी कोलकातामध्ये मुलींची शाळा सुरू केली होती, त्या शाळेत जगदीशचंद्र यांची बहीण लावण्यप्रभा तसेच पत्नी अबला या शिकवत असत. (लावण्यप्रभा या लेखिका म्हणून देखील प्रसिद्ध आहेत) भगिनी निवेदिता आणि जगदीशचंद्र बोस हे एकत्र मिळून लिखाण करत असत. १७, बोसपारा लेन हे भगिनी निवेदिता यांचं घर हा त्यांच्या एकत्रित लिखाणाचा अड्डा असायचा.‌ भारतात एक विज्ञानाची अद्ययावत संस्था असावी असं भगिनी निवेदिता यांचं स्वप्न होतं, जे त्यांच्या मृत्यूनंतर सहा वर्षांनी बोस यांनी पूर्ण केलं. या संस्थेसाठी भगिनी निवेदिता यांनी भरपूर निधी गोळा केला होता. भगिनी निवेदिता यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बहिणीला बोस यांनी पत्र लिहिलं होतं, ज्यामध्ये ते म्हणतात की “भगिनी निवेदिता या मर्त्य मानवाप्रमाणे नव्हत्या, त्या एक शुद्ध आत्मा होत्या.”


जगदीशचंद्र बोस यांनी कॉलेजमध्ये शिकवताना अनेक विद्यार्थी घडवले.‌ त्यांच्या व्याख्यानामध्ये प्रयोग, विनोद आणि गोष्टी या सर्वांचे मिश्रण असल्यामुळं ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते.‌ हे विद्यार्थी त्यांच्या घरीदेखील प्रयोग करण्यासाठी येऊ शकत असत. त्यांचं घर म्हणजे सर्व सामान कसंही, कुठंही पडलेली एक प्रयोगशाळाच होती.‌ तारा, कॉइल, बॅटऱ्या, मेटल प्लेट्स यांच्या ढिगांमधून वाट काढत पुढं जावं लागत असे.‌ याच कचऱ्यामध्ये संशोधन करत बोस यांनी त्यांचा जगप्रसिद्ध शोध लावला. एका रात्री ते वनस्पतीच्या विद्युत स्पंदन प्रतिक्रियेचा अभ्यास करत होते. अचानक क्रेस्कोग्राफच्या स्केलवर थरथराट झाला. त्यासोबत बोस देखील ओरडले, “ही वनस्पती जखमी झाली म्हणून किंचाळत आहे!” हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असावा!


बॉस यांनी क्रेस्कोग्राफ हे यंत्र बनवलं होतं, ज्यामध्ये वनस्पतीची एका इंचाच्या दहा हजाराव्या भागापर्यंतची सूक्ष्म हालचाल नोंदवता येत होती. बोस यांनी काही धातूवर प्रयोग केले, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं होतं की तापवणं, थंड होणं या गोष्टीला निर्जीव धातू देखील प्रतिसाद देतात.‌ मग जिवंत वनस्पती का नाही देणार? तोवर वनस्पतींना संवेदना नसते, त्या निर्जीव असतात असाच लोकांचा समज होता. मात्र बोस यांनी वनस्पतीला उष्णता, थंड करणं, इजा करणं, उपचार करणं, इलेक्ट्रिक शॉक देणं, मद्य, अफू, विष तसेच क्लोरल हायड्रेट, ब्रोमाइड यांसारखी रसायनं पुरवणं असे प्रयोग करून पाहिले, तेव्हा वनस्पती या सर्व घटकांना वेगवेगळ्या पद्धतीनं प्रतिसाद देतात हे बोस यांच्या लक्षात आलं. 


उष्णतेनं त्यांच्यामध्ये “कंप” येतो. विष देल्यावर “शॉक वेव” निर्माण होते आणि हालचाल थांबते, क्लोरोफॉर्म दिल्यावर त्या झोपतात आणि पुरवठा थांबवल्यानंतर त्या पुनः जागृत होतात. तीक्ष्ण जखम केल्यावर देखील त्यांच्यामध्ये “शॉक वेव” तयार होतात हे सर्व निष्कर्ष अगदी थक्क करणारे होते. वनस्पतींना प्राण्यांप्रमाणेच संवेदना असते, प्राण्यांप्रमाणे चेतासंस्था नसली तरी विद्युत स्पंदनातून त्यांचा भावनेचा व्यवहार चालतो हे त्यांनी १९०२ मध्ये सिद्ध केले. मात्र त्यांनी हा शोध जेव्हा रॉयल सोसायटीमध्ये मे महिन्यात पाठवला तेव्हा तो नोव्हेंबर महिन्याच्या पत्रिकेमध्ये एका भलत्या शास्त्रज्ञाच्या नावानं छापून आला.‌ याबद्दल जगदीशचंद्र बोस रवींद्रनाथ टागोर यांना लिहितात, “झालेल्या प्रकरणामुळं मी खूपच निराश झालो आहे. आता मी भारतात परत येतो. कदाचित भारतीय धुळीचा स्पर्श झाल्यावर मला पुन्हा काम करावंसं वाटेल.”   


मात्र भविष्यामध्ये त्यांना त्यांच्या या शोधाचं श्रेय मिळालं. रेडिओचा शोध हा आज मार्कोनी नावाच्या शास्त्रज्ञाचा आहे असं सांगितलं जात असलं तरी हा शोधदेखील जगदीशचंद्र बोस यांचा आहे. आपल्या शोधाचं पेटंट घ्यायला त्यांनी नकार दिला. या गोष्टीचा फायदा उचलत मार्कोनीनं हा शोध स्वतःच्या नावावर करून घेतला आहे. बोस यांनी पेटंट न घेण्याचा निर्णय घेतला कारण “शोध हा मानवजातीच्या कल्याणासाठी असतो, मालकीसाठी नव्हे.” असं त्यांचं मत होतं. बोस यांनी प्रथम मायक्रोवेव्ह आणि रेडिओवेव्ह यांचा वापर करून दूरवर संदेश पाठवण्याचे प्रयोग केले. कलकत्त्यातील टाउन हॉलमध्ये त्यांनी वायरलेस सिग्नल पाठवून एक घंटा वाजवली. तसंच रिमोटचा वापर करून दूर असलेल्या गन पावडरचा स्फोट घडवून दाखवला होता. आज संपूर्ण जग जगदीशचंद्र बोस यांना “वायरलेस तंत्रज्ञानाचा जनक” म्हणून ओळखतं. 


वर उल्लेख केलेली बोस इन्स्टिट्यूटची १९१७ मधील स्थापना हा देखील जगदीशचंद्रांच्या आयुष्यातील महत्त्वाचा मैलाचा टप्पा म्हणावा लागेल. हे भारतातील पहिलं आधुनिक, स्वतंत्र वैज्ञानिक संशोधन केंद्र होतं. स्वतःच्या नावावर संस्था स्थापन करणारे जगातील एका अगदी मोजक्या वैज्ञानिकांपैकी जगदीशचंद्र बोस हे एक म्हणावे लागतील. त्यांच्या सत्येंद्रनाथ बोस, मेघनाथ साहा, प्रफुल्लचंद्र रे यांसारख्या विद्यार्थ्यांनी विज्ञानामध्ये आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. भौतिकशास्त्र आणि संगीत यांचे मिश्रण आपल्याला बोस यांच्यामध्ये देखील दिसतं. त्यांना बासरी तसेच तबला वाजवायला तसंच बंगाली गाणी ऐकायला आवडायची. जगदीशचंद्र बोस हे त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत संशोधन करत होते. २३ नोव्हेंबर १९३७ रोजी कोलकातामध्ये त्यांचं निधन झालं आणि त्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच बोस इन्स्टिट्यूटमध्ये झाले.


जगदीशचंद्र बोस यांना त्यांच्या हयातीत आणि मृत्यूनंतर अनेक पुरस्कार मिळाले. त्यांना ब्रिटिश शासनाकडून सर (नाईटहुड) तसेच कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर या पदव्या प्रदान करण्यात आलेल्या आहेत. रॉयल सोसायटी, लंडनची सदस्यता मिळवणारे ते पहिले भारतीय जीववैज्ञानिक व भौतिकशास्त्रज्ञ आहेत. याशिवाय जगातील अनेक वैज्ञानिक संस्थांचे मानद सदस्यत्व त्यांना मिळालं आहे. जगभरातील अनेक विद्यापीठांकडून त्यांना सन्माननीय डॉक्टरेट देण्यात आली आहे. इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये त्यांनी १९२३ मध्ये अध्यक्षपद भूषवलं आहे. १९७७ मध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ सर नेव्हील मोट म्हणतात की, “जगदीशचंद्र बोस हे काळाच्या खूप पुढं होते. सेमीकंडक्टरच्या ज्या गोष्टी आज आम्हाला समजत आहेत, त्याची मांडणी त्यांनी साठ वर्षापूर्वी केली होती.”


असा हा काळाच्या पुढे असलेला वैज्ञानिक! निसर्गातील प्रत्येक गोष्ट जिवंत आहे हा एक अतिशय नवा दृष्टिकोन आचार्य जगदीश चंद्र बोस यांनी जगाला दिला आहे. या निसर्गाची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.. तपोवनचं प्रकरण असो अथवा पर्यावरण संबंधित इतर कोणत्याही बाबीचं.. आपण सर्वांनी एकत्र येऊन विरोध केला पाहिजे!! 




Comments

Popular posts from this blog

गोमू आणि गोमाजीराव

आपली पुस्तके