फ्रेडी मर्क्युरी : द डार्लिंग रॉकस्टार
😍 फ्रेडी मर्क्युरी : द डार्लिंग रॉकस्टार 😍
टीव्ही पाहत असताना अचानक किटकॅटची जाहिरात लागते. त्यामध्ये दैनंदिन कामाला वैतागलेला एक माणूस बाकावर बसतो, खिशातून चॉकलेट काढून खातो आणि बॅकग्राऊंडला गाणं सुरू होतं “आय वॉन्ट टू ब्रेक फ्री.” नकळत आपला पाय देखील जाहिरातीमधील संगीताचा ठेका पकडतो. 🕺हेच गाणं वापरून प्राणीहक्कांची संरक्षक असलेल्या पेटा या संस्थेनं देखील जाहिरात केली होती. १९८४ मध्ये निर्माण झालेलं हे गाणं आपल्याला आजही ताजं वाटतं. हेच नाही तर क्वीन बँडचं कोणतंही गाणं आपल्याला आजही एकदम फ्रेश वाटतं. ही जादू आहे फ्रेडी मर्क्युरी या अवलियाची!! त्याचं बोहेमियन रॅप्सोडी हे गाणं तर यूट्यूबवर तब्बल दोनशे कोटी लोकांनी पाहिलं आहे.🥺 आपल्या संगीतातून श्रोत्यांना खुळं करून सोडणारा फ्रेडी आपल्या लहानशा आयुष्यात खूप मोठा चाहतावर्ग मागे सोडून गेला आहे.🥳
जाहीर कार्यक्रमात कधी स्त्रियांचा वेश, कधी पुरुषांचा, तर कधी बनियान वरच गाणं म्हणणार. जणू सांधे अकडले आहेत असा याचा स्टेजवर वावर. त्याचे पुतळे देखील अश्याच पोजमधे बनवले आहेत. 🕺मुळात एखाद्या रॉकस्टारचे पुतळे उभे राहणे हीच मोठी गोष्ट आहे. 👋त्याच्या मृत्युनंतर त्याच्या वस्तूंचा लिलाव करायचा आणि ते पैसे एड्स बाबतच्या जागृतीसाठी वापरायचं ठरलं होतं. या लिलावात तब्बल दीड लाख लोकांनी सहभाग घेतला आणि त्यातून चारशे कोटी रुपये उभे राहिले यावरून त्याच्या लोकप्रियतेचा तुम्हाला अंदाज येऊ शकेल. ❣️ जेव्हा समलैंगिकतेला कायद्यानं गुन्हा मानला जात होतं, त्या काळात त्यानं आपलं बायसेक्स्चुअल असणं जाहीरपणे सांगितलं होतं. पुढे जेव्हा तो एचआयव्हीने संक्रमित झाला तेव्हा देखील आपल्या आजाराबद्दल जाहीरपणे सांगताना तो मागे हटला नाही.✊ आपल्या आयुष्यात जगाला फाट्यावर मारणाऱ्या तसेच आपल्या गाण्यातून विद्रोह करणार्या या बंडखोराची, फ्रेडी मर्क्युरी या डार्लिंग रॉकस्टारची ओळख करून घेऊ या. 🙏
फ्रेडी मर्क्युरीचे मूळ नाव फारोख बुलसारा. ५ सप्टेंबर १९४६ रोजी त्याचा जन्म पूर्व आफ्रिकेतील झांझिबार या शहरात एका पारशी कुटुंबात झाला. भारतातील, गुजरातमधील वलसाड (इंग्रजीत bulsara) शहरात त्याचे पूर्वज राहायचे, त्यामुळे त्यांना बुलसारा हे आडनाव पडलं होतं, जे फ्रेडीनं क्वीन बँड सुरु झाल्यावर सोडलं आणि आपल्या गाण्यातील “मामा मर्क्युरी” शब्द घेऊन तो “फ्रेडी मर्क्युरी” झाला.😎 फारोखचा फ्रेडी हा शाळेतील बँड तयार झाला तेव्हाच झाला होता. फारोखचे वडील बोमी हे ब्रिटिश प्रशासनामध्ये अकाउंटंट म्हणून नोकरी करत होते. त्यांची बदली पूर्व आफ्रिकेत झाली. बोमी आणि जेर बुलसारा हे दाम्पत्य झांझिबारमध्ये आलं आणि इथंच त्यांचा संसार फुलला. फारोख या मोठ्या मुलाच्या पाठीवर सहा वर्षांनी त्यांना काश्मिरा नावाची गोड मुलगी देखील झाली. 💏
पाच सहा वर्षांचं अंतर असेल तर भावाबहिणींचं चांगलं पटतं. फारोख तर लहानपणापासूनच काश्मिरावर जीव ओवाळून टाकायचा. फारोखला ती एक लहान बाहुली वाटायची. तो तिला झोपवण्यासाठी छान गाणी म्हणायचा. त्याचं रॉकस्टार होण्याचं बीज इथं रोवल गेलं असावं. ❤️ एकदा काश्मिराच्या पायात काटा टोचला आणि ती मोठ्यानं रडू लागली. फारोख तर एवढा घाबरला की त्याला वाटलं आता आपली बहीण जगत नाही. त्यानं मोठमोठ्यानं हाका मारत आईला बोलवलं, “आई पळ पटकन, कशुला काहीतरी झालंय, वाचव तिला.” 😰आईनं जेव्हा जवळ येऊन पाहिलं, तेव्हा तिला हसायला आलं आणि भावा बहिणीमधील प्रेम पाहून भरून देखील आलं! भावाबहिणीचं हे नातं आयुष्यभर असंच प्रेमळ राहीलं.❣️
नऊ वर्षांचा असताना फारोखला शिक्षणासाठी भारतात पाठवण्यात आलं. पाचगणीमधील सेंट पीटर स्कूल या बोर्डिंग स्कूलमध्ये त्याला ऍडमिशन मिळालं. छोट्या फारोखला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. घरात रेडिओवर वाजणाऱ्या गाण्यांबरोबर तो हमखास गात असे. मात्र घरी वडिलांची करडी शिस्त असायची, इथं त्याला एकदम बंधमुक्त झाल्यासारखं वाटलं.💃 बोर्डिंग स्कूलची देखील शिस्त कडक असली तरी त्यानं इथल्या नियमांना जणू काही फाट्यावर मारायचंच ठरवलं होतं. 🥳 रात्रीबेरात्री पियानो वाजवणं हे त्याचं आवडतं काम. रेडिओवर जे ऐकेल, ते तो लगेच पियानोवर वाजवू शकायचा. टेबल टेनिस, बॉक्सिंग, क्रिकेट या सर्व खेळात तो पारंगत असला तरी संगीत हे त्याचं विशेष आवडतं क्षेत्र होतं.❤️
एकदा शालेय कार्यक्रमात पियानो वाजवणारा मुलगा अचानक आजारी पडला. फारोखचं पियानोवरचं प्रेम ठाऊक असल्यानं शिक्षकांनी त्याला विचारलं,“तू वाजवशील का?” तो आधी घाबरला, पण पियानोवर बसताच त्याची बोटं आपोआप चालायला लागली.
✊हा शो इतका अफलातून झाला की कार्यक्रमानंतर शिक्षकांनीच त्याला बँड तयार करण्याचा सल्ला दिला. मग काय, एकेक नग त्याला भेटत गेले आणि “हेक्टिक बँड” तयार देखील झाला. या बँडमध्येच त्याला “फ्रेडी” हे टोपणनाव मिळालं. ❤️ या बँडमध्ये फारोख "फ्रेडी" बुलसारा हा पियानो वाजवायचा. ब्रुस “मेलोडियस” मरे हा मुख्य गायक तर डेरिक “रॉकी” ब्रँचे हा गिटारवर असायचा. फरांग इराणी बास गिटार तर विजय राणा ड्रमवर असायचा. ते प्रामुख्यानं त्या काळातील रॉक 'एन' रोल, जॅझ आणि बॉलीवूड गाणी वाजवायचे. 😎
हा बँड विद्यार्थ्यांमध्ये खूपच लोकप्रिय झाला. यातूनच फ्रेडीचा स्टेज कॉन्फिडन्स, पियानोवरची पकड, म्युझिक अरेंजमेंटची समज पक्की होत गेली. 😍 त्याला चित्रकलेची देखील खूप आवड होती. त्याच्या प्रत्येक मित्राच्या वाढदिवसाला त्यानं त्या मित्राचं हातानं काढलेलं पोर्ट्रेट भेट दिलं आहे. चित्रकलेतील त्याचं कौशल्य पाहून त्याला शिक्षकांनी आर्ट शिष्यवृत्तीही दिली होती.🥳 “स्टाईल मे रहने का” हा त्याचा आवडीचा भाग. शाळेच्या युनिफॉर्मवर तो रंगीत रुमाल, वेगळे बेल्ट किंवा चकाकणारे शूज घालून यायचा. वार्डन त्याला वारंवार पकडून रुमाल काढायला सांगायचे. मात्र ऐकेल तो फ्रेडी कसला? काहीतरी वेगळं करून लक्ष वेधून घेतलं म्हणजे त्याचा आत्मविश्वास वाढत असे. 😂शाळेत सर्वांनी पॉलिश केलेले काळे बूट घालणं अनिवार्य होतं. फ्रेडीनं मात्र एकदा चकाकणारे पांढरे लेदर शूज घातले होते. वार्डनने विचारलं, “हे कुठून आणलेस?” त्यावर फ्रेडीनं उत्तर दिलं होतं, “डार्लिंग, भविष्यातून आणले आहेत!” डार्लिंग हा त्याचा आवडता शब्द, हा शब्द वापरताना तो समोरच्या व्यक्तीच्या वय, लिंग,पद या कशाचा विचार करत नसे. ❤️
कोणतीही कला सादर करताना समयसुचकता अतिशय महत्वाची असते. शाळेच्या एका नाटकात फ्रेडीनं एका म्हाताऱ्या माणसाची भूमिका केली होती. त्यासाठी कापूस आणि डिंक लावून दाढी तयार केली होती. नाटकामधे एक संवाद बोलताना कापसाचा तुकडा त्याच्या तोंडात गेला. मात्र त्यानं तत्परता दाखवत तो गिळून टाकला. 🥺वेगळ्या एका कार्यक्रमात तो पियानो वाजवत होता. अचानक वीज गेली. माईक बंद, दिवे बंद, पूर्ण अंधार पडला. मात्र फ्रेडीने इथंदेखील समयसूचकता दाखवत पियानोवर पुढचा म्युझिक पीस वाजवला. 😌 धुळीपासून वाचण्यासाठी पियानो झाकून ठेवलेला त्याला आवडत नसे. तो म्हणायचा की पियानो देखील जिवंत आहे, त्याला श्वास घ्यायला मिळाला पाहिजे.👍 मित्रांची हेअर स्टाईल करणे हे त्याचे आवडते काम!! रोज नाश्त्याला येणे आधी तो मित्रांचे केस सेट करून देत असे.👼
फ्रेडीच्या पालकांनी त्याला १९६२ साली झांझिबार मध्ये परत बोलावून घेतलं आणि हेक्टिक बँड बंद पडला.😰 झांझिबारचं वातावरण त्याच्या पाचगणीच्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असलेल्या आयुष्यापेक्षा वेगळं होतं. संगीतापासून दूर राहणं आणि कडक शिस्तीचं पालन करत जगणं त्याला अवघड जात होतं. मात्र त्याच्या सुदैवानं झांझिबारमध्ये राजकीय वातावरण अस्थिर होऊ लागलं. अरब शासनाविरुद्ध तणाव वाढत चालला होता, आंदोलनं सुरू झाली होती. १२ जानेवारी १९६४ रोजी झांझिबार क्रांती झाली. 🎉त्यादिवशी संपूर्ण झांझिबारमध्ये हिंसाचार सुरू झाला. त्यामुळे फ्रेडीच्या आई-वडिलांना असुरक्षित वाटू लागलं, त्यांनी घाईघाईत, सर्व सामान मागे ठेऊन, झांझिबार सोडण्याचा निर्णय घेतला आणि इंग्लंडला स्थलांतर केलं. 😌
बुलसारा कुटुंब इंग्लंडमधील मिडलसेक्स प्रांतातील फेल्थॅम शहरात स्थायिक झालं आणि इथं आपल्या भाऊच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट भेटला. ईलिंग आर्ट कॉलेजमध्ये त्यानं प्रवेश घेतला आणि विविध बँड्समध्ये परफॉर्म करू लागला. ❤️एकदा त्याच्या शिक्षकांनी सेल्फ पोट्रेट अर्थात स्वतःचं चित्र काढायचं काम सर्व विद्यार्थ्यांना दिलं होतं. इतर विद्यार्थी स्वतःचं साधं वास्तववादी चित्र काढत होते. फ्रेडीने मात्र स्वतःचं मोठे डोळे, वाकडे ओठ, तिरपे केस असं सगळ्यांच्या नजरा खेचणारे चित्र काढलं. शिक्षकांनी याबद्दल त्याला विचारलं असता तो म्हणाला, “मी स्वतःला सामान्य व्यक्ती समजत नाही.” 😎आपण वेगळं दिसावं याची हौस फ्रेडीनं इथंदेखील जोपासली होती. कॉलेजचे ड्रेस, मार्केटमधील जुने कपडे यातून तो नवे डिझाईन बनवायचा. एकदा तो एकदम झगमगीत गोल्डन जॅकेट घालून आला, जे पाहून सगळे चकित झाले. एक मित्र म्हणाला,“काय रे, हे कुठून आणलं?” त्यावर फ्रेडी हसत म्हणाला होता, “डार्लिंग, मी स्वतः बनवलं आहे!”🥳
इंग्लंडमध्ये स्थायिक झाल्यापासून त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळली होती. शिक्षणाचा खर्च हे मोठं आव्हान फ्रेडीपुढं उभं राहिलं होतं. तो रॉजर टेलर या मित्रासोबत केन्सिंग्टन मार्केटमध्ये जुने दागिने आणि कपडे विकण्याचं काम करायचा. ✊प्रत्येक दागिना विकताना फ्रेडी छान स्टोरी बनवायचा. हे ब्रेसलेट अमुकअमुक राजकुमारीनं घातलं होतं वगैरे गोष्टी रंगवून सांगायचा. अर्थात समोरच्या ग्राहकाला समजायचं की हा टेपा टाकतोय.. मात्र ते देखील हसत हसत त्याच्या थापा ऐकायचे आणि शेवटी एखादा दागिना घेऊन जायचे. 😂तो जसा वेगळे कपडे घालून लक्ष वेधून घ्यायचा, तसाच तो नाचताना देखील आपली वेगळी स्टाईल दाखवायचा. त्याचा नाच पाहून एकदा एक मुलगी त्याला म्हणाली होती की “तू तर स्टेजवर असायला हवा.” तेव्हा तो फिल्मी स्टाईलमध्ये म्हटला होता की, “जानी.. एक दिवस मी स्टेजवर असेल आणि तो स्टेज खूप मोठा असेल!” 🥳
क्वीन बँडची स्थापना झाल्यानंतर त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले. रॉजर टेलर हा त्याचा मित्र स्माईल नावाच्या बँडमध्ये ड्रम वाजवायचा. फ्रेडीला या बँडचं सादरीकरण आवडायचं, मात्र तो म्हणायचा की, “तुमचं सादरीकरण कानाला खूप गोड वाटतं, मात्र ते डोळ्याला देखील छान दिसायला हवं.” 😎या बँडमधून जेव्हा टिम स्टाफेल हा गायक बाहेर पडला. यावेळी मोकळी झालेली जागा भरून काढण्याची इच्छा फ्रेडीनंं व्यक्त केली. रॉजर आणि बँडचा गिटारिस्ट ब्रायन मे यांना हाताशी धरून त्यानं नवीन बँडची, क्वीनची स्थापना केली.❤️ पियानो आणि गायन याची जबाबदारी फ्रेडीची होती. याशिवाय बँडमध्ये गिटार, ड्रम्स वाजवणारे होते, फक्त बासिस्ट हवा होता. यासाठी ऑडिशन घेण्यात आली आणि वीस उमेदवारांमधून जॉन डिकन या शांत, सोज्वळ दिसणाऱ्या कलाकाराची निवड झाली. या चौघांची जन्मरास लक्षात घेऊन क्वीन बँडचा, आता जगप्रसिद्ध झालेला, लोगोदेखील फ्रेडीनं तयार केला.🥳
कॉर्नवॉल शहरात, १९७० मध्ये, या बँडचं पहिलं सादरीकरण झालं. पहिल्या शोचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना आपण कोणत्या वादळाला आमंत्रित केलं आहे याची जाणीव नसावी! फ्रेडीनं पहिलीच उडी मारली आणि माइक स्टॅन्ड तुटला. मग तो तुटका माइक स्टॅन्ड हातात घेऊन त्यानं गाणं सादर केलं. तुटका माइक हे नंतर त्याची स्टाईल बनलं. 😂अवघ्या पन्नास प्रेक्षकांसमोर फ्रेडीनं कला सादर करताना एवढी ऊर्जा वापरली होती जणू काही लाखो लोक समोर आहेत. इथपासून क्वीन बँडची घौडदौड सुरू झाली.😎 त्यांचा क्वीन हा पहिला अल्बम १९७३ मध्ये आला, पाठोपाठ १९७४ मध्ये क्वीन II आणि इतर अल्बम आले, जे लोकप्रिय देखील झाले. मात्र १९७५ मधे आलेल्या बोहेमियन रॅप्सोडी या अल्बमनं जगभरात अक्षरशः धुमाकूळ घातला. या अल्बममुळं बँडचा प्रचंड मोठा चाहता वर्ग तयार झाला. ❤️
बोहेमियन रॅप्सोडी या ट्रॅकमधील संगीत आणि शब्द सर्व काही अद्भुत होतं. संगीताचं एक नवीन पर्व सुरू झालं होतं. मात्र या गाण्याची निर्मिती प्रचंड वेळकाढू ठरली होती. सहा आठवड्यामध्ये १८० व्होकल ट्रॅक रेकॉर्ड करण्यात आले.🥺 फ्रेडी, रॉजर आणि ब्रायन यांनी गॅलेलियो हा शब्द १०० वेळा रेकॉर्ड केला. ब्रायनचे गिटार १६ वेळा लेयर केलं गेलं. मात्र एवढी मेहनत करून तयार केलेलं गाणं बँड मेंबर्ससोडून इतर कोणालाही समजत नव्हतं.😬 स्टुडिओ मॅनेजरने विचारलं देखील, “हे नेमकं आहे तरी काय? ऑपेरा? रॉक? नाटक?” त्यावर फ्रेडी म्हणाला होता,“हे बोहेमियन रॅप्सोडी आहे डार्लिंग, तुला आता नाही समजणार.”😎 हे गाणं संगीत क्षेत्रामधला विद्रोह होता. कुठल्याही नियमात न बसणारे असे हे गाणे!! (आजवर ऐकलं नसेल तर नक्की ऐका)🥳
या गाण्यातला तरुण “बोहेमियन” म्हणजे बंडखोर माणूस आहे, ज्याचं अंतर्मन त्याला विचारतं की समाज त्याला स्वीकारेल का? कदाचित फ्रेडीच्या मनामध्ये चाललेले द्वंद्व या निमित्तानं बाहेर पडलं असावं. 👍बॉब मार्ले प्रमाणे तो राजकीय व्यवस्थेविरुद्ध बंडखोरी करत नव्हता. समाजानं त्याच्यावर लादलेल्या नियमांविरुद्ध, लैंगिक ओळख लपवण्याच्या दबावाविरुद्ध, संगीत व्यवसायातील नियमांविरुद्ध तसेच पारंपरिक गाण्यांच्या फॉर्मॅटविरुद्ध तो बंड करत होता. स्वतःला जगापुढं निर्भीडपणे मांडण्याची धडपड त्यानं या गाण्यातून केली आहे. ✊इतर गाण्यांमधून देखील तो हेच सांगू इच्छितो की माझे नियम मी स्वतः बनवणार, तुमचे नियम मी मानणार नाही. “डोन्ट स्टॉप मी नाऊ” या गाण्यात तो सांगतो की, “तुम्ही किंवा जगातील कोणतीही गोष्ट मला थांबवू शकत नाही!” “आय वॉन्ट इट ऑल” या गाण्यात देखील तो म्हणतो “मला सर्व हवंय! ही माझी वेळ आली आहे, मला कुणी रोखू शकत नाही”😎
“आय वॉन्ट टू ब्रेक फ्री” या गाण्यात “समाज काय म्हणतो” या चौकटीत राहून जगण्यास नकार द्या असं सांगताना “स्वतःची ओळख लपवू नका” हा संदेश तो देतो. या गाण्याचं सादरीकरण करताना त्याने वापरलेला स्त्री-वेष लैंगिकतेसंदर्भातील सर्व टॅबू फाट्यावर मारणारा आहे.❤️ “वी विल रॉक यू” या गाण्यातला ठेका आणि “आम्ही तुला दाखवून देऊ” हा आत्मविश्वास जबरदस्त आहे. हे गाणं आणि त्याचंच “वी आर द चॅम्पियन्स” हे गाणं स्टेडियममध्ये वेगवेगळ्या खेळांच्या दरम्यान आपण ऐकत असतो.🥳 त्याला एचआयव्हीचं निदान झाल्यानंतर “द शो मस्ट गो ऑन” हे गाणं त्यानं निर्माण केलं. यावेळी तो अतिशय अशक्त झाला होता. मात्र त्याच्या मनातील आग तशीच प्रखर होती. एकाच वेळी अतिशय उत्कट आणि शांत असा अनुभव तो या गाण्यातून देतो. “जगणं सुटतंय, पण मी थांबणार नाही. संवेदना पुसट होत आहेत तरी माझा आवाज थांबणार नाही.” असं तो सांगतो.. 😎
मेरी ऑस्टिन ही त्याची गर्लफ्रेंड. सुंदर, शांत, लाजरी, अतिशय साधी अशी मेरी एका कपड्याच्या दुकानात काम करायची. तिला पहिल्यांदा पाहतानाच फ्रेडी तिच्या प्रेमात पडला.❤️ मात्र ती फ्रेडीपेक्षा खूपच उंच होती. तिची उंची गाठण्यासाठी फ्रेडीनं लगेच उंच बूट घालायला सुरुवात केली. त्यानं नाना प्रकारे तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची डाळ शिजत नव्हती. फुल, भेटकार्ड, चित्र सर्व गिफ्ट देऊन झालं, मात्र शेवटी संगीत उपयोगी आलं. एकदा भर रस्त्यामध्ये गिटार वाजवत, गाणे म्हणत त्यानं तिला प्रपोज केलं आणि बात बन गई. 😍दोघांनी एकत्र राहायला सुरुवात केली. एक छोटी खोली, एक स्टोव्ह आणि एक गादी एवढाच त्यांचा संसार! मात्र मेरीला देखील फ्रेडीप्रमाणे विश्वास होता की तो एक दिवस मोठा सुपरस्टार बनणार आहे. 👍
फ्रेडी सुपरस्टार झाला खरा, मात्र या काळात फ्रेडीला स्वतःच्या ओळखीबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले. तो खूप गोंधळलेला होता. एक दिवस त्याने मनाचा हिय्या करुन मेरीला सांगितले की तो उभयलिंगी आहे. 🥺 तो क्षण दोघांसाठी खूप अवघड होता. मात्र मेरीनं मन खंबीर करत फ्रेडीचा हात धरून त्याला सांगितलं की “आपण आयुष्यभर सोबत राहू, कदाचित हे सोबत राहणं जगापेक्षा वेगळं असेल.” 😍त्यानंतर देखील मेरीनं एखाद्या पत्नीप्रमाणं फ्रेडीच्या आयुष्यात साथ दिली. या “सोलमेट” साठीच फ्रेडीनं “लव ऑफ माय लाईफ” हे गाणं लिहिलं आहे. ❤️फ्रेडीच्या शेवटच्या दिवसांत औषधपाणी, खाणंपिणं, कपडे आणि देखभाल या सर्व गोष्टी तिनं आणि फ्रेडीचा बॉयफ्रेंड “जिम हटन” यानं व्यवस्थित सांभाळल्या होत्या. जिम हटन यानं फ्रेडीसोबतच्या त्याच्या नात्यावर “मर्क्युरी अँड मी” नावाचं पुस्तक लिहिलं आहे. 🥳
या दोघांशिवाय फ्रेडीला मांजरांनी देखील खूप प्रेम दिलं आहे. फ्रेडीच्या घरात एक-दोन नाही तर एकावेळी ९ मांजरी होत्या! 🥺त्यांच्यासाठी वेगळ्या खोल्या, खेळणी, बेड्स अशी एकदम व्हीआयपी ट्रीटमेंट होती. फ्रेडी म्हणायचा की ही माझी मुलं आहेत. जगाच्या पाठीवर तो कुठं जरी गेला असेल, तरी फोन करून मांजरांशी बोलत असे. ❤️त्याच्या या कॉलमध्ये घरच्या माणसांपेक्षा मांजरांशी बोलणं जास्त होत असे. फोनवर तो म्हणायचा, “पुट द कॅट ऑन” आणि घरचे लोक फोन मांजरांच्या कानाजवळ धरायचे. मग तो या त्याच्या मुलांना सूचना द्यायचा की “त्याच्या अनुपस्थितीमध्ये घरामध्ये त्रास देऊ नये, शहाण्या मुलांसारखं राहावं.” 🥳त्यानं टी-शर्ट वर देखील मांजराचं छान चित्र प्रिंट करून घेतलं होतं. डेलिया या आपल्या सर्वात जास्त लाडक्या मांजरावर त्यानं गाणं लिहिलं आहे.😎 नाताळाच्या सणाच्या वेळी तो या मांजरांसाठी गिफ्ट घ्यायचा. तो म्हणायचा की, “माणूस दुकानात जाऊन हवे ते विकत घेऊ शकतो, मांजरांना आपणच दिलं पाहिजे.” शोसाठी जगभर फिरताना तो मांजरांसाठी आवर्जून गिफ्ट घ्यायचा.😍
त्यांच्या बँडनं ७०० पेक्षा अधिक कार्यक्रम केले. त्यांना जगभर प्रेम मिळालं, मात्र दक्षिण अमेरिकेत या बँडला खूपच लोकप्रियता मिळाली. ❤️त्यांच्या एका शोला तीन लाख प्रेक्षक आले होते! तेव्हा फ्रेडी स्टेजवरून म्हणाला होता की मला असं वाटतं आहे की आज अर्धे जग माझ्यासमोर उपस्थित आहे, त्यांच्यापुढं मी गात आहे. 😍बँड नुकताच सुरू झाला होता तेव्हाच्या एका शोमध्ये परफॉर्म करत असताना फ्रेडीनं उडी मारली आणि त्याच क्षणी त्याची पॅन्ट फाटली. प्रेक्षक हसू लागले मात्र प्रसंगावधान राखत फ्रेडी म्हणाला की हा शो अधिक सुंदर झाला आहे. त्यानं त्याचं सादरीकरण सुरूच ठेवलं. 😂 एकदा शो सुरु असताना गिटारचा ऍम्प्लिफायर जळाला. तेव्हा भाऊ बोलला की बघा जाळ आणि धूर संगटच!! त्या शोमध्ये पब्लिक अक्षरश: वेडी झाली होती. 🥳एक शोमध्ये साऊंड सिस्टीम अचानक बंद झाली आणि बँड थांबला. पण फ्रेडी तेव्हा देखील थांबला नाही. तो माइकशिवाय मोठ्यानं गायला लागला. समोरच्या हजारो प्रेक्षकांनीही आपला आवाज मिसळून गाणं उचलून धरलं. ❤️
प्रेक्षकांशी संवाद आणि त्यांना गाण्यात सहभागी करून घेणं हे फ्रेडीचं वैशिष्ट्य! तो “Day-O” म्हणायचा. त्याला प्रतिसाद देत हजारो लोक परत “Day-O” म्हणायचे. वेम्बली स्टेडियममध्ये तर एवढा आवाज झाला की कॅमेरामन मंडळींच्या कानठळ्या बसल्या. 😬रेडिओ गागा या त्याच्या गाण्याला लाखो लोकांनी हात उंच करून एकसाथ टाळ्या टाळ्या वाजवत साथ दिली होती. संपूर्ण स्टेडियममध्ये एकच ठेका पकडला गेला होता हे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालं होतं. ❤️१९८५ मधे इथियोपिया देशाच्या मदतीसाठी एक मोठा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये जगभरातील नामवंत कलाकार सहभागी होणार होते. यामध्ये वीस मिनिटं आपली गाणी करण्याची संधी क्वीन बँडला भेटली होती. या कार्यक्रमात जगातील इतर सर्व दिग्गज कलावंतांना जेवढा प्रतिसाद मिळाला नाही, तेवढा प्रतिसाद क्वीनला मिळाला. क्वीनच्या इतिहासातील सर्वोत्तम परफॉर्मन्स करून हा बँड अजरामर झाला.😍
९ ऑगस्ट १९८६ रोजी फ्रेडीनं शेवटचा लाईव्ह कार्यक्रम केला. तोवर त्याच्या एचआयव्हीनं डोकं वर काढलं होतं आणि त्याला अशक्तपणा आला होता. 😞जेव्हा फ्रेडीनं पहिल्यांदा जाहीर केलं,“हो, मला एड्स झाला आहे.” तेव्हा जगभरात धक्का बसला होता. फ्रेडी हा पहिला रॉकस्टार होता, ज्यानं हे जाहीर करायचं धाडस दाखवलं. ✊त्यानं आयुष्याचे शेवटचे दिवस त्याची आवडती माणसं, मांजरं आणि संगीत यांच्या सहवासात लंडनमधील घरातच काढले. त्याची दृष्टी कमजोर होत गेली, शेवटी त्यानं औषध घेण्याचं नाकारलं, तो केवळ वेदनाशामक घेत राहीला.. अखेरीस २४ नोव्हेंबर १९९१ रोजी फ्रेडीचं आयुष्य शांतपणे संपलं. 😒फ्रेडीचे आई आणि वडील दोघांना दीर्घायुष्य लाभलं. दोघांनीही नव्वदी पार केली, मात्र त्यांचा मुलगा केवळ ४५ वर्षे जगू शकला. 😓
फ्रेडीला धर्मापेक्षा क्रिएटिव्हिटी आणि मानवी भावना जास्त महत्त्वाच्या वाटत असतं. ❤️मात्र तो प्रत्यक्ष धार्मिक नव्हता तरी त्याच्या मृत्यूनंतर पारशी झोराष्ट्रियन पद्धतीने अंत्यसंस्कार झाले. रॉक अँड रोल हॉल ऑफ फेममध्ये फ्रेडीला मरणोपरांत स्थान मिळालं आहे. सेलिब्रिटीअसून आपल्या लैंगिकतेबद्दल आणि आजाराबद्दल जाहीर कबूली देणं ही गोष्ट देखील फ्रेडीचं महत्व वाढवते. ✊यामधून जगभरातील एड्स चॅरिटी संस्थांना प्रेरणा मिळाली आहे. पारलैंगिक समुदायाच्या इतिहासात देखील त्याला महत्वाचं स्थान आहे. ❤️ बीबीसीने जेव्हा १०० सर्वात जास्त लोकप्रिय ब्रिटिश लोकांची निवड करण्यासाठी मतदान घेतलं, तेव्हा त्यात आपला डार्लिंग फ्रेडी मर्क्युरी ५८ व्या स्थानावर होता. 😍
त्याच्या जीवनावर २०१८ मध्ये “बोहेमियन रॅप्सोडी” नावानं चित्रपट आला होता. ज्यात त्याचं पात्र “रामी मलेक” या कलाकारानं अतिशय उत्कृष्टरित्या साकारलं आहे. ❤️यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता गटामध्ये ऑस्कर सोबतच बाफ्टा, गोल्डन ग्लोब आणि स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड यांसारखे जगातील प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. हॉटस्टार आणि प्राईमवर हा सिनेमा आहे. नक्की पाहा. 🙏रामी मलेकने फ्रेडी मर्क्युरीचा आत्मा बरोबर पकडला आहे. बायोपिक मध्ये व्यक्तीचा आत्मा पकडणं गरजेचं असतं, ते इथं शिकावं.👍 नाहीतर काय, विवेक ओबेरॉय देखील मोदीचं पात्र करतोच की, पण त्याला आत्मा कुठं सापडलेला असतो? किंवा असं असेल का, की मोदींना आत्माच नसेल??😂😂😂




Comments
Post a Comment