युजीन लॅझोव्स्की आणि खोटी महामारी

 युजीन लॅझोव्स्की आणि खोटी महामारी



एखादा व्यक्ती गावामध्ये साथीचा आजार मुद्दाम पसरवत असेल, आणि त्यामुळे गावातील शेकडो लोक आजारी पडत असतील, त्यामुळं गावातील लोकांनी एकत्र यायला बंदी होत असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही काय म्हणाल? नक्कीच तो एक समाजकंटक आहे असं तुम्हाला वाटलं असेल ना! पण अशी खोटी महामारी पसरवणाऱ्या युजीन लॅझोव्स्कीचं नाव आज आदरानं घेतलं जात आहे. त्याला मानवतेचा रक्षक समजलं जात आहे. त्याला वेगवेगळे सन्मान मिळत आहेत. वर्तमानपत्रात त्याच्याविषयी लिहून येत आहे. एवढंच नाही, तर त्यानं दुसऱ्या महायुद्धात नाझींच्या छळवणुकीतून ८००० पेक्षा जास्त ज्यू लोकांचा जीव वाचवला आहे असं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युजीन लॅझोव्स्की यानं खोटी महामारी पसरवून शेकडो लोकांचे जीव वाचवले ही गोष्ट खरी असली तरी त्यानं आठ हजार लोक आणि तेही ज्यू लोक वाचवले ही गोष्ट तद्दन खोटी आहे. 

दुसऱ्या महायुद्धात ज्यू लोकांचा झालेला भीषण नरसंहार जगाला ठाऊक आहे. मात्र त्या काळात झालेल्या वाईट कृत्यांना काही प्रसारमाध्यमं वास्तवापेक्षा जास्त भडक करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी खोट्या गोष्टी, खोट्या नायकांची खोटी कथानकं रचली जातात. त्यामुळेच २००१ मध्ये शिकागो सन्सटाईम सारखं वर्तमानपत्र “८००० ज्यू लोकांचा जीव वाचवणारा शिकागो शहराचा ऑस्कर शिंडलर” असं म्हणत युजीन लॅझोव्स्कीला जगासमोर आणतं. या बातमीची शहानिशा न करता भोळे मानवतावादी ही बातमी व्हायरल करतात. वयाच्या ८८ व्या वर्षी मिळणाऱ्या या फुकटच्या प्रसिद्धीचा मोह स्वतः युजीन लॅझोव्स्की यांना देखील होतो, आणि ते देखील ही बातमी खोडून काढत नाहीत. मात्र तेव्हा नक्की काय झालं होतं? चला आपण समजून घेऊया.‌

युजीनचा जन्म सन १९१३ मध्ये पोलंडमधील चेस्टोचोवा शहरात झाला. त्याची जन्मतारीख नक्की ठाऊक नाही. मुळात तो प्रसिद्धीत आला तो २००१ मध्ये. त्यानं आत्मचरित्रामध्ये देखील केवळ वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतरच्या आठवणी लिहिल्या आहेत. त्याचे वडील काझीमीर्झ आणि आई झोफिया यांचा उल्लेख “ज्यू धर्माचे नसलेले, मात्र दुसऱ्या महायुद्धकाळात ज्यू लोकांचे जीव वाचवणारे” अशा लोकांच्या यादीमध्ये आहे. रोमन कॅथॉलिक असलेल्या या जोडप्यानं आपल्या घरामध्ये सहा लोकांना नाझी लोकांपासून दडवून त्यांचा जीव वाचवला होता. काझीमीर्झचे वडील एडवर्ड आपला वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी सायबेरियामधून पोलंडला आले होते, तेव्हापासून हे कुटुंब इथे स्थायिक झालं होतं. चेस्टोचोवा शहरात जन्म झाला असला तरी युजीन लहानाचा मोठा वॉर्सा शहरामध्ये झाला. त्याचे सर्व शिक्षण देखील या शहरात झालं

त्याचा जन्म झाला तेव्हा आईला वाटायचं बाळाचं नाव युजीन ठेवू. वडिलांना मात्र हे नाव पसंत नव्हतं. त्यांनी स्लावोमिर हे नाव सुचवलं. बाप्तिस्मा करायला आलेले धर्मगुरू म्हणाले, “स्लावोमिर नावाचा कोणताही संत आपल्याकडे होऊन गेला नाही.” त्यावर युजीनचे वडील म्हणाले, “कदाचित माझा मुलगा या नावाचा पहिला संत असेल. बघा कसा तेजपुंज दिसतोय.” त्याला बघायला धर्मगुरू वाकले आणि बालयुजीननं त्यांच्या नाकावर एक लाथ मारली. त्यांचा चष्मा खाली पडला. वैतागून त्यांनी बाळाचं युजीन स्लावोमिर असं नामकरण करून टाकलं. युजीन लहान असताना दारावर आलेल्या एका जिप्सी बाईनं झोफियाला सांगितलं होतं की हा मुलगा मोठा होणार नाही, अल्पायुषी ठरेल. मात्र तो तब्बल ९३ वर्षे जगला. युजीनची बायको मुरका मात्र त्याला म्हणायची की “जिप्सी म्हणाली तेच खरं झालं आहे. तू बुद्धीनं अजून लहानच राहिला आहेस. तू प्रौढासारखं वागायला कधी शिकणार?” 

युजीनचे शालेय शिक्षण मिकेव्हिच हायस्कूलमध्ये सुरू झालं. इथं त्यानं आपल्यासारख्या खोडकर मित्रांची एक टीमच बनवली. या टीममध्ये तो गिएनिक या नावानं ओळखला जायचा. आपल्याकडं जसं घनश्याम,गजानन या नावांचे शॉर्टकट शाम्या, गजा असे होतात, तसं पोलिश भाषेत युजीनचं गिएनिक होतं. गिएनिक फुटबॉल, तलवारबाजी, नेमबाजी आणि घोडेस्वारी या सर्व मैदानी खेळात तरबेज होता. इतर मुलांना तबेल्यामध्ये घाण वास यायचा मात्र गिएनिक तबेल्यामध्ये तासनतास रमायचा, घोड्यांची गप्पा मारायचा. त्याच्या या सगळ्या आवडींना एसपीएसमध्ये वाव मिळाला. एसपीएस अर्थात आर्मी मेडिकल कॅडेट स्कूल ही पोलिश लष्कराची अधिकारी प्रशिक्षण शाळा होती. इथंच लष्करासाठी डॉक्टर आणि फार्मासिस्ट तयार केले जात. 

वॉर्सा विद्यापीठाशी करार असल्यामुळं वैद्यकीय आणि औषधनिर्माण शिक्षण विद्यापीठातच होत असे. शिक्षणाचा सर्व खर्च लष्कर करत असे. त्याबदल्यात पोलिश लष्करात ३ वर्षे सेवा करणं बंधनकारक होतं. भविष्यात जरी डॉक्टर होणार असला तरी सैन्यातील इतर सैनिकांप्रमाणे सर्व गोष्टी येणं सक्तीचं होतं. अगदी डोळे बंद करून रायफल उघडणं आणि पुन्हा जोडणंदेखील युजीन शिकला. त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की एखाद्या मुलीप्रमाणे रायफलवरवर प्रेम करा. मग काय, रोज कापूस, सळई आणि व्हॅसलीन घेऊन रायफलची सेवा केली जायची. पण लवकरच त्यांना समजलं की रायफल गोळी झाडण्यासाठी नसून फक्त स्वच्छ करण्यासाठीच असते. अतिशय खडतर असलेले मूलभूत सैनिकी प्रशिक्षण आणि २१ व्या वर्षी झेंड्यापुढं देशसेवेची शपथ घेऊन हे सैनिक तयार झाले. 

आता वैद्यकीय शिक्षण पूर्ण करायचं होतं. कॉलेजमध्ये आपल्या गणवेशात थाटात मिरवणाऱ्या या लष्करी मुलांची खूप हवा असायची. दंतशास्त्र शाखेतील मुली यांच्यावर जीव ओवाळून टाकायच्या. मात्र कॅप्टनचा दर्जा मिळेपर्यंत कोणालाही लग्न करण्याची परवानगी नव्हती. कॉलेजमध्ये असताना देखील यांना घोडेस्वारी, तलवारबाजी, बॉक्सिंग, नेमबाजी, पोहणे आणि स्कीईंग हे खेळ खेळणं सक्तीचं होतं. यातील बॉक्सिंग वगळता इतर सर्व खेळ युजीनला फार आवडायचे. विशेषतः चर्नोहोरा पर्वतरांगेत स्कीईंग करणं त्याला फार आवडायचं. पिस्तूल नेमबाजीमध्ये देखील तो अतिशय कुशल होता. १०० टक्के गुण मिळवत त्यानं शाळेमध्ये विक्रम केला. मात्र प्रत्यक्ष स्पर्धांमध्ये त्याला ही कामगिरी पुन्हा करता आली नाही. तिथं त्याला तिसरा किंवा चौथा क्रमांक मिळत असे. 

युजीनच्या आत असलेल्या मानवतेची चुणूक तलवारबाजीच्या स्पर्धेमध्ये दिसली होती. सेना अजिंक्यपद स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू होती. त्याची लढत एका लेफ्टनंटसोबत होती. पहिल्या दोन फेऱ्यांनंतर युजीन दोन गुणांनी आघाडीवर होता. तिसऱ्या फेरीत त्याचा एक फटका लेफ्टनंटच्या कोपरावर बसला. हा आघात एवढा जोरात होता की लेफ्टनंटच्या हातून तलवार गळून पडली. कदाचित हाड मोडल असावं. युजीननं लेफ्टनंटला तलवार उचलून दिली. पंचानं लेफ्टनंटला विचारलं की तो पुढं लढू शकतो का? त्यानं लढण्याची हिंमत दाखवली. मात्र अशा घायाळ प्रतिस्पर्ध्यावर युजीन पुन्हा तलवार चालवू शकला नाही. लेफ्टनंटने मोठ्या कष्टानं आपली तलवार उचलली. एकामागून एक गुण मिळवले मात्र युजीननं तलवार चालवली नाही. हे काही युद्ध नव्हतं, एक क्रीडा स्पर्धा होती. अशावेळी जखमी प्रतिस्पर्ध्यावर कसा घाव करणार असा विचार युजीन करत होता. त्यावेळी प्रेक्षकात बसलेले त्याचे वडील मात्र “माझा हा मुलगा किती भोळसट आहे” असा विचार करत होते. 

अभ्यास आणि खेळांचं वेळापत्रक फुल असल्यामुळं दिवसात मोकळा वेळ खूप कमी असे. इथं फोटोग्राफी विभागात त्याची ओळख स्टाशेक माटुलेविचशी झाली, जो नंतर युद्धकाळामध्ये सोबत होता. यानेच ती लस बनवली होती, ज्यामुळे खोटी महामारी तयार करता आली. तो कॉलेजला असल्यापासून सायंटिस्ट खोपडी होता. त्याला वस्तूंशी खेळायला आवडायचं. त्याचे हात कायम मित्रांची घड्याळं किंवा कॅमेरे दुरुस्त करण्यात गुंतलेले असत. कॉलेज चालू असताना यांचा जीवन सुखी असायचं. मात्र सुट्ट्यांमध्ये त्यांना त्यांच्या पलटणीत यावं लागायचं.‌ मग दिवसभराच्या व्यायामानं थकून गेल्यावर एखाद्या लहान मुलाप्रमाणं गाढ झोपायचं. मात्र पहाटे पाच वाजता लाथा घालून जागं करण्यात येणारच..‌ रोज… रोज.‌ 

या सैनिकांना समाजामध्ये मोठा सन्मान मिळायचा, त्यांना पार्ट्यांमध्ये आमंत्रित केलं जायचं. अशाच एका पार्टीमध्ये युजीनलादेखील आमंत्रित केलं होतं, जिथं राष्ट्राचे संस्थापक मार्शल पिल्सुद्स्की यांची मुलगी वांडा येणार होती, ११ मे १९३५ ची ती रम्य संध्याकाळ होती. वांडा आणि तिची मैत्रीण मुरका आल्या. वांडाला पाहताच युजीन तिच्या प्रेमात पडला. तिचं बोलणं, चालणं, हसणं, वागणं सगळं काही त्याला खूप आवडलं. पण एवढ्या मोठ्या माणसाच्या मुलीसोबत लग्न होऊ शकणार नाही म्हणून तो व्यथित देखील झाला. मात्र इथं क्लायमॅक्समध्ये यू टर्न होता. “अंदाज अपना अपना” सिनेमामध्ये जसं रवीना आणि करिश्मानं लोकांचा प्रामाणिकपणा पाहण्यासाठी आपापलं नाव अदलाबदली केलं होतं. तसंच इथं झालं होतं. जिला तो वांडा समजला, ती वांडाची मैत्रीण, एक सामान्य घरातील मुलगी मुरका होती. म्हणजे भाऊच्या प्रेमात आता काही आडकाठी नसणार होती!! अर्थात त्यांची पुढची भेट अनेक वर्षांनी झाली आणि मग पुढं प्रेमकथा फुलली.

आपला भाऊ तर प्रामाणिक खूपच होता. त्याचा त्याला प्रेमामध्ये देखील फायदा झाला आणि शिकताना देखील. एकदा त्यांच्या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना एका पेशंटचं हृदय आणि यकृत यांच्या सीमा तपासायला सांगितलं. दोन विद्यार्थ्यांनी हृदय आणि यकृत यांच्या सीमा शोधल्या. आपल्या युजीनला मात्र काहीच सापडलं नाही. थोडं इकडंतिकडं, खालीवर केलं तरीही काहीच सापडलं नाही. युजीननं हार मानली आणि प्राध्यापकांपुढं कबूल केलं की कदाचित त्याला अधिक सराव करावा लागेल. यावर प्राध्यापक म्हणाले “प्रामाणिकपणा ही डॉक्टरची पहिली जबाबदारी आहे. तुमच्यापैकी फक्त एकजण प्रामाणिक होता. ही व्यक्ती सायटस इन्व्हर्ससचं उदाहरण आहे. अशा रुग्णाचं हृदय शरीराच्या उजव्या बाजूला आणि यकृत डाव्या बाजूला असतं.”

वैद्यकीय पदवी मिळवण्यासाठी ७ गटांमध्ये विभागलेल्या विषयांच्या २३ परीक्षा द्याव्या लागायच्या. त्यातील पहिल्या चार गटातील ११ परीक्षा युजीननं उत्तीर्ण केल्या. मात्र पाचव्या गटात त्याची गाडी अनेक महिने अडकली. परीक्षकांना त्याचा एप्रोच खूप कॅज्युअल वाटायचा. पहिल्यांदा त्यांच्यासमोर जाताना युजीननं कयाकिंगचं साहित्य सोबत ठेवलं असल्यामुळं त्यांना तसं वाटलं असेल. त्यामुळे ते युजीनला पास करत नव्हते. पाचवा गट पास झाल्याशिवाय सहाव्या गटात जाता येत नव्हतं. अखेर तीन महिन्यांनी त्याची गाडी पाचव्या गटातून सहाव्या गटात गेली. सहावा गट देखील लगेच पास केला. आता सातवा गट पास केला की झालं… मुरकाशी पुन्हा भेट झाली होती आणि त्यांचे दोघांचे मनोमिलन देखील झालं होतं. आता पदवी मिळाली की मस्त लग्न करायचं आणि त्यांचा संसार सुरू होणार होता. 

मात्र त्याचवेळी युद्धाला तोंड फुटलं. १ सप्टेंबर १९३९ रोजी पहाटे जर्मनीनं उत्तर, दक्षिण आणि पश्चिम अशा तीनही दिशांनी एकाच वेळी पोलंडवर हल्ला केला. राष्ट्रपतींनी युद्धाची घोषणा आणि मदतीचं आवाहन केलं. युजीन सैन्यात दाखल झाला. रुग्णवाहक रेल्वे क्रमांक ९५ मध्ये त्याची नियुक्ती झाली. युद्धातील जखमी सैनिक बारानोविचे येथील लष्करी रुग्णालयात पोहोचवण्याचं काम त्याच्यावर सोपवण्यात आलं. पाचशे जखमींपेक्षा जास्त रुग्णांना नेणाऱ्या या रेल्वेच्या प्रत्येक डब्याच्या छतावर जिनेव्हा करारानुसार पांढऱ्या पार्श्वभूमीवर मोठा लाल क्रॉस रंगवलेला होता. मात्र तरीही जर्मन विमानं या ट्रेनवर हवाई हल्ले करत होते. एक वेळ अशी आली की ट्रेन ना पुढे जाऊ शकत होती, ना मागे. उपासमार होण्याची वेळ आली. ट्रेनमधून बाहेर उतरून युजीन अन्नाच्या शोधासाठी खूप फिरला. मात्र त्याला मोकळ्या हातानं परत यावं लागलं. 

याचवेळी त्यांना रेडिओवर बातमी ऐकायला मिळाली की जर्मन सैन्याला मागं ढकलत रशियन सैन्य पोलंडची सीमा ओलांडून पुढं येत आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांचा सोव्हिएत लष्कराशी थेट सामना झाला. मात्र क्षमता असताना देखील पोलीश सैन्यानं रशियन सैन्याचा पुरेसा प्रतिकार केला नाही. त्या सर्वांना युद्धकैदी म्हणून गाडीमध्ये कोंबण्यात आलं. वॉर्सा, ल्व्हिव्ह आणि क्रॅकोव्ह अशा वेगवेगळ्या शहरांसाठी जाणाऱ्या वेगवेगळ्या गाड्या होत्या. वॉर्सासाठी असलेल्या गाडीत युजीन बसला. ४० क्षमता असलेल्या डब्यामध्ये दुपटीपेक्षा जास्त माणसं भरली गेली. इतर डब्यांचे दरवाजे पॅक झाले, मात्र युजीन बसलेल्या डब्याचे दार काही लागेना. शेवटी वैतागून रशियन सैनिक दोन दारांमध्ये तारा बांधून पुढे निघून गेला. ट्रेन सुरू झाल्यानंतर सर्वांच्या लक्षात आलं की ट्रेन पोलंडच्या दिशेनं नाही, रशियाच्या दिशेनं जात आहे. म्हणजे आपल्याला तिकडं नेऊन गुलाम करण्यात येणार आहे. युजीन आणि एका कॉर्पोरलने दरवाज्याला बांधलेल्या तारा कापल्या आणि चालू गाडीमधून उडी मारून पळ काढला. 

मजल दरमजल करत युजीन पुन्हा पोलंडच्या सीमेमध्ये आला. जवळच चेल्म शहरात त्याचा चुलतभाऊ संगीत शिक्षक म्हणून काम करत होता. युजीन त्याच्याकडं पोचला, प्रवासात मळलेले आणि फाटलेले लष्करी कपडे बदलले आणि वॉर्साकडे निघाला. जर्मन सैन्याची गाठ पडू नये म्हणून तो आडवाटेनं जात होता मात्र तरीही त्याला जर्मन सैन्यानं गाठलंच. त्याला उचलून एका ट्रकमध्ये टाकलं. आता त्याला त्याचं भविष्य दिसू लागलं. लुब्लिन शहरात असलेल्या कारखान्यात आता त्याला वेठबिगारी करावी लागणारी होती. जेव्हा ट्रक कॅम्पमध्ये पोहोचला आणि नोंदणी सुरू झाली, त्यावेळेसच युजीनच्या लक्षात आलं की आपण इथून पळून जाऊ शकतो. जिथं विटांची भिंत संपत होती आणि काटेरी तारेचे कुंपण सुरू होत होतं, त्या काटेरी तारांमध्ये एक लहानशी फट होती. 

फक्त दहा बारा फुटांची भिंत चढायची होती. सैन्यामध्ये असताना त्याला अशा भिंती चढून जाण्याची सवय होती. जोरात धावत आलं तर भिंतीवर दोन मोठी पावलं टाकून टोकापर्यंत पोहोचता येणं शक्य होतं. सुरक्षारक्षकांचा डोळा चुकून युजीननं यशस्वी पलायन केलं. रशियन सैनिकांनी तरी त्याला खूप वेळ अडवून ठेवलं होतं, जर्मन सैनिकांच्या तावडीतून तो केवळ दोन तासात सुटला होता. यावेळी त्यांनी मागच्या वेळीसारखी चूक केली नाही. तो घरी व्यवस्थित पोचला. त्याला समजलं की मुरका बॉम्बस्फोटाच्या काळात त्याच्या घरच्यांची काळजी घेत होती. याशिवाय फील्ड हॉस्पिटलमध्ये जखमी सैनिकांना मदत करत होती. मुरकासोबत लग्न झाल्यावर आपण नक्की सुखी होणार याची त्याला खात्री पटली. 

युजीन नर्सिंग शाळेतील रुग्णालयाच्या शस्त्रक्रिया विभागात काम करू लागला. इथं त्याचा मित्र डायग्नोस्टिक लॅबोरेटरीचा प्रमुख म्हणून होता. त्यानं सांगितलं की लॅब सहाय्यक म्हणून कुणीतरी हवं आहे. मुरकानं ही नोकरी केली तर एकत्र काम करता येईल असं युजीनला वाटलं. हॉस्पिटलमध्ये सुट्टी घेऊन तो लग्न करून लॅब सहाय्यक आणण्यासाठी घरी आला. घरातलेच, त्यातल्या त्यात ठीक कपडे घालून मुरका आणि युजीन पालकांसोबत चर्चमध्ये गेले. फादरनं युजीनकडं कागदपत्रं मागितली. जन्मदाखला वगळता युजीनकडं काहीच नव्हतं, कारण रशियन हल्ल्याच्या वेळी त्यानं आपली सर्व कागदपत्रं जाळली होती. “तुझं याआधी लग्न झालं नसेल कशावरून?” अशी शंका उपस्थित करत फादरनं लग्न लावायला नकार दिला. 

युजीनचे आईवडील, मुरकाची आई सर्वजण रदबदली करत होते, जबाबदारी घेत होते, मात्र पाद्री काही ऐकेना. वैतागून मुरकाची आई म्हणाली, “चला रे पोरांनो, तुमचं लग्न मी लावते.” फादर घाबरला, म्हणाला की हे पाप असेल. त्यावर मुरकाची आई म्हणाली की देवाला माहित आहे की मी काही चूक करत नाही. यावर फादर म्हणाला की “अजून दोन जामीनदार आणा, मग मी लग्न लावतो.” ही अट पूर्ण केली गेली आणि दोघांचे लग्न लागलं. फादरनं लग्नाचा दाखला देताना स्पेलिंग मिस्टेक केली होती, जिच्यामुळं नंतर, वीस वर्षांनी, जेव्हा अमेरिकन व्हिसा पाहिजे होता तेव्हा अडचण आली होती. असो! फायनली १४ नोव्हेंबर, १९३९ रोजी लग्न लागलं. पैश्याची चणचण असल्यामुळं त्यांनी आपल्या आवडत्या नदीच्या काठी कॅम्पिंग करत हनिमून साजरा केला. 

लग्नानंतर दीड दोन महिनेच झाले असतील, युजीन पुन्हा एकदा जर्मन सैनिकांच्या तावडीतून वाचला. एका सकाळी त्यांच्या घरासमोर एक ट्रक थांबला. काही क्षणात जर्मन सैनिकांनी संपूर्ण इमारत वेढली. युजीनच्या आईनं सांगितलं “आजारी असल्यासारखं वाग.” युजीननं बिछान्यात उडी घेतली आणि काही क्षणात त्याच्या बेडवर मुरकानं औषधंदेखील पोचवली. बंदूक ताणून सहा सैनिक घरात घुसले तेव्हा युजीन वेदनेने कळवळत होता. सैनिकांना पाहताच तो आक्रोश करू लागला की प्लीज मला गोळी घाला. मुरका आणि आई लांब उभ्या राहून जागीच थरथरत होत्या. अशा आजारी माणसाचा जर्मन लोकांना गुलाम म्हणून वापर करता येणार नव्हता. आणि जो मरतोच आहे, त्यावर गोळी का वाया घालवा असा व्यावहारीक विचार करून जर्मन सैनिक परतले. युजीनचा अभिनय पाहून मुरका आणि त्याची आई थक्क झाल्या होत्या. 

राहिलेली सातव्या गटाची परीक्षा पास करून युजीन १९४० च्या सुरुवातीला डॉक्टर झाला, मात्र इंटर्नशिप झाल्याशिवाय प्रॅक्टिस करण्याचा परवाना मिळणार नव्हता. त्यावेळी पोलंड जर्मनीच्या ताब्यात होता आणि हिटलरचा आदेश होता की “ज्यू लोकांवर फक्त ज्यू डॉक्टर उपचार करतील. ज्यू नसलेल्या डॉक्टरांनी ज्यू लोकांवर उपचार करणं देहदंडास पात्र असेल.” युजीन आणि मुरका दोघांनी नर्सिंग हॉस्पिटलमध्ये काम सुरू केलं. यावेळी पोलंडमध्ये एक भूमिगत संघटना कार्यरत होती, जी युजीनच्या संपर्कात होती. लवकरच जर्मनी आणि फ्रान्सची लढाई होणार आहे आणि त्यात कदाचित फ्रान्स जिंकण्याची शक्यता आहे या आशेवर ही संघटना काम करत होती. युजीनने त्यांना शक्य ती मदत करण्याचे वचन दिलं होतं. मात्र एक दिवस दोन गेस्टापो सकाळी सकाळी युजीनच्या घरी आले आणि त्याला अटक करून नेण्यात आलं. आपला युजीन कन्फ्युज की नक्की काय घडतंय?

त्याला कुणी काही सांगितलं नाही की विचारलं नाही. फक्त एका कोठडीत बंदिस्त केलं. इथून निसटण्याच्या काही शक्यता आहेत का याची युजीननं नेहमीप्रमाणं चाचपणी देखील केली. मात्र इथून पळून जाता येणार नव्हतं. थोड्यावेळाने त्याच्या कोठडीमध्ये आणखी एक कैदी टाकण्यात आला. हा कैदी जर्मन सैनिकांना खूप शिव्या देत होता. त्यानं युजीनला सांगायला सुरुवात केली की, “या नाझी माकडांना धडा शिकवण्याची गरज निर्माण झालेली आहे. हा आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, आपण गुप्त लढा उभारला पाहिजे.” युजीननं त्याला नीट न्याहाळलं. एवढा उसळत आहे तरी त्याच्या अंगावर मारहाणीची एकदेखील निशाणी नव्हती. युजीनच्या लक्षात आलं की हा जर्मन लोकांचा एजंट आहे. युजीननं शांतपणे त्याला सांगितलं की, “टॅंक आणि तोफा असलेली आपली मिलिटरी जर पराभूत झाली असेल, तर आपण सामान्य माणसं काहीच करू शकणार नाही.” काही तासातच युजीनला सोडण्यात आलं. आपला नवरा चक्क जिवंत बाहेर आला याचं मुरकाला खूप विशेष वाटलं होतं. 

युजीनच्या मित्रानं, स्टाशेक माटुलेविचनं पत्र पाठवून त्याला विचारलं की रोझवाडेव परिसरात डॉक्टरची गरज आहे, येतोस का? युजीननं तत्काळ होकार दिला आणि मुरकाला घेऊन तिकडे गेला. तिकडं त्यांना जे घर मिळालं, त्याच्या मागचं कुंपण युजीननं तोडून ठेवलं जेणेकरून वेळप्रसंगी तिथून पळ काढता येईल. मात्र एक दिवस तिथून आवाज आला, “डॉक्टर प्लीज मदत करा” एक ज्यू रुग्ण महिला मदत मागत होती. तिला मदत केली तर आणखी पेशंट यायला लागले. ज्यू लोकांवर उपचार म्हणजे जीवावर बेतणं. मग एक मार्ग काढला गेला. कोणत्या रुग्णाला मदत हवी असेल तर त्यानं त्या कुंपणावर एक फडकं टाकायचं. मग योग्य संधी पाहून युजीन कुंपणाच्या पलीकडं जाऊन उपचार करून यायचा. कधीकधी तिकडं रुग्णांची मोठी रांग असायची, मात्र युजीन त्यांना रेड क्रॉसच्या माध्यमातून आलेली औषधं पुरवायचा. 

एकदा युजीनच्या घरी दोन जर्मन सैनिक कापडात गुंडाळलेल्या एका छोट्या बाळाला घेऊन आले. त्याच्या आईवडिलांनी त्याला सोडून दिलं होतं. बाळाचं वय आणि धर्म ठरवणं गरजेचं होतं. बाळ ज्यू असेल तर त्याच्या जीवाला धोका होता. त्यातही बाळ जर मुलगा असेल तर ज्यू प्रथेप्रमाणे त्याचा सुंता केलेला असायचा. त्यामुळे त्याचा धर्म लगेच समजून जायचा. मात्र सुदैवानं या सैनिकांना सापडलेलं बाळ मुलगी होतं. युजीननं बाळाच्या डोक्याचं माप घेण्याचं नाटक केलं आणि सांगितलं की बाळाचा मेंदू मोठा आहे, याचा अर्थ ते नक्कीच आर्यन वंशाचं आहे, ज्यू नाही. सैनिक म्हणाले की हे लेखी द्यावं लागेल. युजीननं लेखी अहवाल दिला आणि बाळाचा जीव वाचला. सैनिकांनी ते बाळ स्थानिक हॉटेल मालकाला सांभाळायला दिलं. बाळाचे खरे आईवडील ज्यू धर्मीय होते. आपण मेलो तरी आपलं बाळ वाचलं पाहिजे यासाठी त्यांनी बाळ रस्त्यावर सोडलं होतं. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे बाळ वाचलं!!

एक दिवस स्टाशेक माटुलेविच युजीनकडं धावत आला. घराच्या मागे केलेल्या प्रयोगशाळेत संशोधन करताना त्याला काहीतरी अपघातानं सापडलं होतं. प्रोटीयस OX19 नावाचा पूर्णपणे निरुपद्रवी जीवाणू एखाद्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात टोचला आणि नंतर त्या व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले तर त्याच्या तपासणीमध्ये त्या व्यक्तीला टायफस आजार झाला आहे असं निदर्शनास येतं हे त्याच्या लक्षात आलं होतं. टायफस या आजाराची तेव्हा खूप दहशत होती. पहिल्या महायुद्धात लक्षावधी रुग्णांचा बळी या संसर्गजन्य आजारानं घेतला होता. टायफसची तपासणी करण्यासाठी वेल आणि फेलिक्स या शास्त्रज्ञांनी १९१९ मध्ये शोधलेली वेल-फेलिक्स चाचणी ही तेव्हा विश्वासार्ह मानली जायची. टायफस झाल्यावर शरीरात प्रतिपिंडं (अँटीबॉडीज) तयार होतात. ही प्रतिपिंडं काही प्रोटीयस जीवाणूंशी क्रॉस-रिअ‍ॅक्ट होतात. रक्तात ही प्रतिक्रिया दिसली तर चाचणी पॉझिटिव्ह मानली जाते. या चाचणीमधील लूपहोल माटुलेविचनं शोधून काढलं होतं. आता हव्या त्या व्यक्तीला प्रोटीयस OX19 जीवाणू टोचून टायफस पॉझिटिव्ह दाखवणं शक्य झालं होतं. 

नाझी सैन्यात असलेल्या टायफसच्या भितीचा फायदा घ्यायचं या मित्रांनी ठरवलं. त्याकाळात काम करू शकतील अशा पोलिश जनतेला नाझी सैनिक उचलून नेत असत आणि आपल्या कारखान्यात गुलाम म्हणून वापरत असत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, अपुरे अन्न आणि प्रचंड मेहनत यामुळं हे गुलाम मरत असत. मात्र त्यांची जागा घ्यायला नवीन गुलामांचा पुरवठा होत असे. पण जर एखाद्या गावात टायफसची साथ असेल तर तिथल्या लोकांची यातून सुटका होत असे. कारण त्या गावाचं विलगीकरण केलं जायचं. म्हणून गावामध्ये कृत्रिम साथ आणायचं या मित्रांनी ठरवलं. मात्र या योजनेत जे लाभार्थी असणार होते, त्या सामान्य लोकांना देखील या गोष्टीची खबर लागुन उपयोग नव्हता. कारण चुकून जरी नाझी सैनिकांना हे समजलं असतं, त्यांनी या दोघांना हालहाल करून मारलं असतं. 

दोघांनीही याबाबत एवढी गुप्तता पाळली की आपल्या बायकांना देखील या योजनेबद्दल सांगितलं नाही. सर्दी, डोकेदुखी असे साधे आजार घेऊन कुणीही व्यक्ती आला तरी युजीन त्याला टायफस झाला आहे असं सांगत असे आणि प्रोटीयस OX19 जीवाणू टोचून पाठवत असे. अशी फेक पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्यावर नाझी लोकांनी त्या गावात यायचं थांबवलं. महामारी घोषित करून गावातील सर्व सार्वजनिक व्यवहार थांबवले. लोकदेखील घाबरले पण डॉक्टरांनी त्यांना सांगितले की, “भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्हाला मरून देणार नाही.” दहा लोकांना बरं वाटत नाही, तोवर डॉक्टर वीस नवे रुग्ण तयार करून ठेवले जाऊ लागले. नाझींनी स्वतः काही रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासायला नेले. ते सर्व पॉझिटिव्ह आले, त्यामुळे संशयाला जागाच नव्हती. हळूहळू ही महामारी शेजारच्या गावांमध्ये देखील पसरू लागली. 

जेव्हा या महामारीची तपासणी करण्यासाठी आयोग नेमला गेला, तेव्हा या आयोगासमोर ब्लँकेटमध्ये गुंडाळलेले, तापानं फणफणलेले, जर्जर रुग्ण सादर केले गेले, त्या भागातील सर्वात घाणेरडी घरं दाखवली गेली. त्यामुळं आयोगाची देखील खात्री पटली की इथं महामारी आहे. आकडेवारी देताना देखील या डॉक्टर जोडीनं ही काळजी घेतली होती की आकडे खोटे वाटणार नाहीत. दरवर्षी हिवाळ्यामध्ये जगभरातील पेशंट वाढतात, त्यावेळेस यांचे आकडे वाढायचे आणि उन्हाळ्यामध्ये पेशंट कमी होतात, तेव्हा यांचे आकडे कमी व्हायचे. तब्बल तीन वर्षे त्यांनी पंचक्रोशीमधील शेकडो लोकांना या आजाराची लागण करून त्यांच्या हालअपेष्टा, नरकयातना वाचवल्या. १९४४ मध्ये पूर्वेकडून सोव्हिएत सैन्य पुढं येत गेलं आणि नाझी सैन्याने माघार घेतली. मग खोटी महामारी थांबवता आली. त्यानंतर ही महामारी कोणाच्या लक्षात देखील राहिली नाही. युद्ध संपल्यावर युजीन अमेरिकेला गेला आणि तिकडेच शिकागोमध्ये प्राध्यापकी करू लागला. त्यानं प्राध्यापकी करताना शंभरपेक्षा जास्त शोधनिबंध लिहिले आहेत. 

सन २००० मध्ये युजीनला नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आणि त्याचं नाव प्रसिद्धीत आलं. २००१ मध्ये शिकागो सन्सटाईमनं त्याला “शिकागोचा ऑस्कर शिंडलर” म्हणून प्रसिद्धी दिली आणि मग खऱ्या अर्थाने तो जगासमोर आला. मात्र शिकागो सन्सटाईमने आठ हजार ज्यूंचा रक्षक असं त्याला अतिरंजित प्रोजेक्ट केलं होतं. वास्तविक पाहता त्यानं केवळ काहीशे पोलिश लोकांचं जीवन बदललं होतं. अर्थात हे कामदेखील त्यानं स्वतःच्या जीवावर उदार होऊन अतिशय हिमतीनं आणि अतिशय कल्पकतेनं केलं होतं, त्यामुळं मानवतेच्या रक्षणात त्याची भूमिका निर्विवाद आहे. आपल्याकडे एखाद्या मोठ्या व्यक्तीला अधिक महान दाखवण्यासाठी त्याच्या मृत्यूनंतर खोटंनाटं लिहिलं जातं. युजीन जिवंत असतानाच त्याच्याबद्दल अतिशयोक्तीयुक्त लिहिलं गेलं, जे युजीननं उघडपणे नाकारलं नाही. युजीनची मुलगी म्हणते की कदाचित माझ्या वडिलांना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात मिळणाऱ्या या खोट्या प्रसिद्धीचा मोह झाला असावा. 

२००६ मध्ये युजीनचा मृत्यू झाला. त्याला इस्राएलचा राईटियस अमंग द नेशन्स हा सन्मान मिळाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर देखील त्याच्या विषयी केलेल्या खोट्या दाव्याची चलती राहिली. अखेरीस २०१९ मध्ये एक माहितीपट प्रदर्शित झाला, ज्यामध्ये पत्रकार बार्बरा नेकेक हिनं “८००० ज्यू वाचवले” या दाव्याची चिकित्सा केली. तेव्हा तिच्या लक्षात आलं की ज्यू लोकांमध्ये ही महामारी पसरली असती तर नाझी लोकांनी त्यांचे विलगीकरण करण्याऐवजी त्यांना गोळ्या घातल्या असत्या. म्हणजे जीव वाचवला ती सगळी पोलीश जनता होती. शिकागो सन्सटाइम्सच्या त्या पत्रकाराला देखील तिनं विचारलं की, “तुला ही माहिती कुठून मिळाली?” यावर त्यानं सांगितलं की, “माझ्या संपादकाकडे ही चूक केली आहे. मला पोलीश भाषा येत नाही आणि माझ्याकडे कोणताही डाटा नाही.” 

युजीननं केलेलं काम खूप महत्त्वाचं आहे, मानवतावादी आहे. मात्र आपण मानवतावादी, विवेकवादी लोक ज्याप्रमाणे धर्मांध लोकांच्या पोस्ट तपासून पाहतो, त्यांची चिकित्सा करतो तशीच एखादी मानवतावादी पोस्ट आली तर तिची सत्यता तपासायला नको का? फॅक्ट ही फॅक्ट असते आणि अफवा ही अफवा. अफवा केवळ सोयीची आहे, मानवतावादी आहे म्हणून तिची चिकित्सा न करणं हे वैज्ञानिक दृष्टिकोनात बसणार नाही. आणि स्तुती करण्यासाठी अनेक कारणं असताना खोटी कारणं निर्माण करणे, ही वृत्तीदेखील चुकीची असते, त्या व्यक्तीवर अन्याय करणारी असते. नाही का?

Comments

Popular posts from this blog

गोमू आणि गोमाजीराव

डॉ. येल्लाप्रगडा सुब्बाराव : छोटा डॉक्टर बडा धमाका

दहावीचे व्हाट्सअप ग्रुप