होमी भाभा : भारतीय अणुऊर्जेचे जनक

 होमी भाभा : भारतीय अणुऊर्जेचे जनक

मार्च २०२६..हा महिना सुरू झाला तो इराण विरुद्ध इस्रायल आणि अमेरिका यांनी सुरू केलेल्या लढाईपासून. इराण दोन दिवसांमध्ये शरण येईल असं अमेरिका आणि इस्रायलला वाटलं होतं. मात्र हल्ल्यामध्ये प्रमुख नेत्यांची सर्व फळी मेल्यानंतर देखील इराणनं चिवट प्रतिकार करत अमेरिका आणि इस्रायलच्या नाकी नऊ आणले. हे युद्ध सुरू झालं कशावरून? अर्थातच तेल हे त्यामागचं महत्त्वाचं कारण असलं, तरी ते उघडपणे सांगता येत नाही. त्यामुळं इराण हा अण्वस्त्र सज्ज होण्याची तयारी करत आहे, ज्याचा जगाला धोका आहे असा नेहमीचा कांगावा अमेरिकेनं केला. असाच कांगावा करून त्यांनी इराण आणि इराकवर याआधी देखील हल्ले केले आहेत. मात्र आजपर्यंत या देशांचं कोणतंही अण्वस्त्र अमेरिकेला दाखवता आलं नाही. किंबहुना या देशांकडं अण्वस्त्र असतं, तर कदाचित अमेरिकेनं हल्ला देखील केला नसता. कारण उत्तर कोरियामध्ये किम जोंग कॅमेऱ्यासमोर अण्वस्त्र दाखवत अमेरिकेला खिजवतो, मात्र त्याच्याविरुद्ध काही कारवाई करण्याची हिंमत अमेरिका करत नाही. 

यावरून आपण समजून घेऊ शकतो की एखाद्या देशाकडं अण्वस्त्र असणं किती महत्त्वाचं झालं आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंधरा वर्षांमध्येच त्याला चीनच्या आक्रमणाचा सामना करावा लागला. या युद्धात नामुष्की पत्करल्यानंतर भारतानं धडा घेतला की आपण सक्षम असलं पाहिजे. तिकडं जर चीन अणुसज्ज होण्याचा प्रयत्न करत असेल, तर भारतानं देखील अणुसज्ज झालं पाहिजे. मात्र या कल्पनेला विरोध देखील झाला. प्रचंड गरिबी असलेल्या या देशात अण्वस्त्र ही जणू काही चैनीची गोष्ट आहे अशी मांडणी झाली. ज्या देशाच्या अन्न आणि वस्त्र या मूलभूत गरजा भागल्या नाहीत, त्या देशाला अण्वस्त्राची गरज काय? असा मोठा आक्षेप घेण्यात आला. मात्र एक व्यक्ती होती, जी भारत अण्वस्त्रसज्ज झाला पाहिजे यासाठी सर्वात जास्त आग्रही होती. तिनं केवळ आग्रह धरला नाही तर भारतामध्ये अणुकार्यक्रम प्रत्यक्षात सुरू केला. ती व्यक्ती म्हणजे भारतीय अणुऊर्जेचे जनक होमी भाभा. 

मुंबईमधील एका श्रीमंत पारशी कुटुंबात होमीचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी झाला. जहांगीर भाभा यांच्या दोन मुलांपैकी होमी हा मोठा तर जमशेद हा धाकटा. होमीचं नाव त्याच्या आजोबांच्या नावावरून ठेवलं आहे. होमरुसजी भाभा हे मैसूर संस्थानात शिक्षणाधिकारी होते. होमीनं केंब्रिज विद्यापीठामध्ये शिकताना “होमरुस” ऐवजी “होमी” हे नाव बदलून घेतलं. बोलताना “होमी” हेच खूप गोड वाटतं. म्हणून आपण हेच नाव लहानपणापासून वापरु. होमीचे वडील, जहांगीर, ऑक्सफर्डमध्ये शिकून बॅरिस्टर होऊन भारतात आले होते. टाटा ग्रुपचे ते कायदेशीर सल्लागार होते आणि टाटांनी स्थापन केलेल्या बहुतेक कंपन्यांमध्ये ते संचालक मंडळात देखील होते. त्यांची बहीण, मेहरबाई ही जमशेदजी टाटांची सून होती. टाटा उद्योगांचं साम्राज्य स्थापन करणाऱ्या जमशेदजी टाटांच्या दोराबजी या थोरल्या मुलाची मेहरबाई पत्नी होती. होमीच्या आईचं नाव देखील मेहरबाई होतं, ती देखील पेटिट या श्रीमंत घराण्यातील आली होती. 

सुशिक्षित आणि सुसंस्कृत मेहरबाई भाभा यांना पाश्चात्य संगीत खूप आवडायचं. पियानोवर तिची हुकूमत होती. संगीताची ही आवड होमीमध्ये देखील रुजली. तान्हा असताना होमी खूपच रडका होता. त्याची झोप खूपच कमी होती, तो रात्रंदिवस रडत बसायचा. त्यामुळं घरचे सगळे चिंतित होते की या मुलाला नक्की काय होतंय? त्यांनी बाळाला प्रसिद्ध युरोपियन बालरोगतज्ञाला दाखवलं, त्यानं सांगितलेल्या सर्व चाचण्या केल्या. डॉक्टरांनी सांगितलं की “बाळाला काहीही झालेलं नाही. याचा मेंदू थोडा जास्त ऍक्टिव्ह असल्यामुळं त्याला झोप कमी आहे. मला असं वाटतं की त्याला संगीताची समज देखील आहे. त्यामुळं एक काम करा, तुम्ही या बाळाला संगीत ऐकवत जा. बाळ शांत झोपत जाईल.” डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे उपाय करून पाहिला आणि खरंच बाळ शांत झोपू लागलं. म्हणजे एकाच दगडात दोन पक्षी! बाळ झोपत देखील होतं आणि त्याच्या कानावर संगीताचे संस्कार होत होते. 

होमीचं सुरुवातीचं शिक्षण दक्षिण मुंबईतील फोर्ट भागातील कॅथेड्रल स्कूल आणि जॉन कोनॉन स्कूल इथं झालं.‌ या दोन्ही शाळा अतिशय श्रीमंत लोकांसाठीच होत्या. इथं युरोपियन लोकांची मुलं बहुतांश असायची. जे श्रीमंत भारतीय युरोपियन लोकांचा स्टॅंडर्ड मॅच करतील, अशाच मुलांना इथं प्रवेश मिळायचा. राहणीमानाच्या बाबतीत भाभा कुटुंब पूर्णपणे अंग्लाळलेलं होतं. या शाळेत शिक्षणाव्यतिरिक्त खेळ आणि इतर अनेक गोष्टींची तयारी करून घेतली जायची. होमी प्रत्येक शालाबाह्य गोष्टीमध्ये रस घ्यायचा आणि त्यावेळी देखील वर्गामध्ये तो टॉपर असायचा. त्याला चित्रकला शिकवण्यासाठी घरी एक खास शिक्षक नेमले होते. होमी चित्रकलेत एवढा तयार झाला की त्यानं स्वतःच काढलेलं चित्र (सेल्फ पोर्ट्रेट) बॉम्बे आर्ट सोसायटीमध्ये बक्षीसपात्र ठरलं.‌ याशिवाय त्याची मावशी त्याला आणि जमशेदला संगीत शिकवत होती. बीथोवन, मोझार्ट आणि इतर सर्व पाश्चात्य संगीतकारांची त्याला बालपणीच ओळख झाली. 

भाभा यांच्या मलबार हिलवरील दुमजली घरात एक मोठी लायब्ररी होती. भाभा कुटुंबानं पिढ्यानपिढ्या जगभरातून पुस्तकं गोळा केली होती.‌ ज्ञान, विज्ञान, साहित्य, चित्रकला सर्वच विषय त्यामध्ये होते.‌ गणित आणि विज्ञान हे त्याचे आवडते विषय होतेच, मात्र झाडं, फुलं आणि बागांची पुस्तकं वाचून होमीला देखील त्यांची आवड लागली.‌ होमीची आत्या मेहरबाई टाटा यांना स्वतःचं मूलं नसल्यामुळं त्यांचं होमीवर विशेष प्रेम होतं. त्यांचं घर होमीच्या शाळेच्या जवळ होतं, त्यामुळं होमी दुपारच्या जेवणापासून खेळण्यापर्यंत आत्याच्या घरीच असायचा. त्यांच्या घरात असलेली लायब्ररी देखील होमीसाठी उपलब्ध होती.‌ ही लायब्ररी भाभांच्या लायब्ररीपेक्षा सुसज्ज होती.‌ आत्याच्या घरी देशातील प्रमुख नेत्यांचे येणं जाणं असायचं.‌ त्यामुळं महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू यांसारख्या दिग्गज लोकांशी होमीची लहानपणी बालपणातच झाली.‌ नुकताच जमशेदपूरमध्ये पोलाद उद्योग सुरू झाला होता, त्यामुळं त्या विषयाच्या चर्चा घरात सुरू असायच्या. 

होमीनं बालपणी विज्ञानाची एवढी पुस्तकं वाचली की अवघा पंधरा वर्षाचा असताना त्याला आईन्स्टाईननं मांडलेला सापेक्षता नियम समजला होता.‌ पंधरा वर्षाचा असतानाच त्यानं केंब्रिजसाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र एवढ्या कमी वयाच्या मुलाला तिथं ऍडमिशन मिळणं शक्य नव्हतं. मग त्यानं मुंबईतील एलफिस्टन कॉलेजमध्ये गणित आणि विज्ञानाचं शिक्षण घेतलं. अठरा वर्षाचा झाल्यावर त्यानं रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश मिळवला. इथं त्याला शिकवायला नोबेल पारितोषिक विजेते आर्थर कॉम्प्टन होते. इथंच होमीनं कॉस्मिक किरणं हा शब्द पहिल्यांदा ऐकला, जो पुढं त्याच्या संशोधनाचा विषय झाला. पुढच्या वर्षी तो केंब्रिजमध्ये आला. त्याचा आत्याचा नवरा सर दोराबजी यानं इथंच शिक्षण घेतलं होतं. त्याच्याप्रमाणे होमीनं धातुशास्त्र शिकावं आणि जमशेदपूर प्रकल्प सांभाळावा अशी सगळ्यांची इच्छा होती. 

मात्र होमी जेव्हा केंब्रिजमध्ये आला तेव्हा तिथं सगळं भौतिकशास्त्राचं वातावरण होतं. क्वांटम फिजिक्स हा सर्वात जास्त चर्चेचा विषय होता. व्हर्नर हायझेनबर्ग, नील्स बोहर, वोल्फगांग पाउली, एर्विन श्रोडिंगर आणि पॉल डिरॅक यांनी नुकतेच मोठे शोध लावले होते. त्यामुळं केंब्रिज विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागात, विशेषतः कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत, खूप उत्साही आणि सर्जनशील वातावरण निर्माण झालं होतं. अर्नेस्ट रदरफोर्ड आणि पॉल डिरॅक

त्यावेळी केंब्रिजमध्ये दोन मोठे डॉन मानले जात होते. होमीनं केंब्रिजमध्ये पहिल्याच वर्षी डिरॅक यांच्या व्याख्यानांना उपस्थिती लावली. आणि त्यांनी ठरवलं की “अपुन को भी क्वांटम फिजिक्स सिखने का हे.” थ्री इडीयट्स मध्ये फरहान (माधवन) जसं वडिलांना इमोशनल करतो की, “मी इंजिनिअरिंग झालो तरी खूप साधा इंजिनियर होईल, त्यापेक्षा मी वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होतो, ज्यामध्ये मी बेस्ट करेल.” 

अगदी त्याच पद्धतीनं होमी भाभानं देखील त्याच्या बाबांना पत्र पाठवून सांगितलं की, “मला इंजिनिअरिंग शिकण्यामध्ये काहीच रस नाही. इंजिनिअरिंग हे माझ्या स्वभावाच्या अगदी उलट आहे. मी गणित आणि भौतिकशास्त्र शिकेल, कारण इथं काय करायचं आहे हे मला ठाऊक आहे. शास्त्रज्ञ होण्याऐवजी कोणत्याही मोठ्या कंपनीचा संचालक व्हायला मला आवडणार नाही. मला यशस्वी व्यक्तीपेक्षा हुशार व्यक्ती म्हणून ओळख मिळवायची आहे. पॅशन आणि प्रोफेशन मॅच झालं तरच ती व्यक्ती आयुष्यात खूप काही करू शकते. मी संशोधन करण्यासाठी खूप उत्सुक आहे. सॉक्रेटिस किंवा बीथोवन यांना जर मारून मुटकून इंजिनियर व्हायला लावलं असतं तर आज आपल्याला त्यांचं नाव देखील ठाऊक नसतं. तरी मला गणित आणि भौतिकशास्त्र शिकू द्या.” 

बॅरिस्टर असलेले वडील तरुण मुलाच्या युक्तीवादामुळे निरुत्तर झाले. मात्र त्यांनी अट घातली की तू तुझे बेस्ट दिले पाहिजे. अर्थातच होमीला ही अट मान्य होती. त्यानं गणिताची ट्रायपॉस परीक्षा पहिल्या श्रेणीत पास केली. अभ्यास करताना त्यानं खेळात तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये देखील भाग घेतला. त्याच्या चित्रांचं लंडनमध्ये प्रदर्शन भरलं, ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानं नाटकाच्या प्रयोगासाठी पडदे रंगवले, कॉलेजचे नियतकालिक संपादित केलं. सर्व क्षेत्रांमध्ये तो अव्वल असल्याचं इतर सगळ्यांना नवल वाटायचं.‌ न्युट्रॉनचा शोध लावून नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या जेम्स चॅडविक यांना सिद्धांतिक मांडणी करू शकेल अशा एका सहाय्यकाची आवश्यकता होती. होमी त्याला भेटायला गेला, मात्र जेम्स होमीची प्रतिमा पाहून एवढा चकित झाला की एवढा गुणी माणूस आपल्याला सहाय्यक नको असं त्याला वाटलं. त्याला कोणताही कच्चा घडा मिळाला असता तर चाललं असतं, तयार मडकं नको होतं.‌

होमीला १९३३ मध्ये तीन वर्षासाठी आयझॅक न्यूटन स्कॉलरशिप मिळाली. या काळात होमीनं एन्रिको फर्मी यांच्यासोबत रोममधील भौतिकशास्त्र संस्थेत कॉस्मिक किरणांवर संशोधन केलं. १९३२ मध्ये पॉझिट्रॉन या कणाचा शोध लागला आणि पॉल डिरॅक यांनी त्याच्या गुणधर्मांचे स्पष्टीकरण देण्यासाठी होल सिद्धांत मांडला. यामुळं उच्च-ऊर्जा भौतिकशास्त्र या नवीन शाखेचा जन्म झाला. होमीनं हेच आपल्या आयुष्याच्या संशोधनाचं मुख्य क्षेत्र म्हणून निवडलं. आकाशातून गॅमा किरण पृथ्वीच्या वातावरणात येतात आणि एखाद्या मूलद्रव्याच्या अणुवर आदळतात. त्यातून इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन तयार होतात जे पुन्हा दुसऱ्या अणुवर आदळतात. ही साखळी क्रिया कशी होते हे समजावणारा शोधनिबंध होमीनं लिहिला. हा त्याचा पहिला रिसर्च पेपर होता. 

पुढं त्यानं या विषयात पन्नासपेक्षा जास्त शोधनिबंध लिहिले आहेत.‌ पीएचडीसाठी देखील होमीनं कॉस्मिक किरणं हाच विषय निवडला होता. खूप ऊर्जायुक्त गॅमा किरण अणुकेंद्राजवळ गेली की तिच्या ऊर्जेतून एक इलेक्ट्रॉन आणि एक पॉझिट्रॉन अशी कणांची जोडी तयार होते. हे इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन पुढं जाऊन नवीन गॅमा किरणं तयार करतात आणि एक साखळी प्रक्रिया तयार होते. होमीनं हे देखील शोधून काढलं की इलेक्ट्रॉन आणि पॉझिट्रॉन एकमेकांना भेटतात, तेव्हा ते एकमेकांचा नाश करतात आणि त्यांची ऊर्जा गॅमा किरणांच्या रूपात बाहेर पडते. या सिद्धांताला “भाभा स्कॅटरिंग” असं ओळखलं जातं.‌ या सिद्धांतामुळं उच्च-ऊर्जा भौतिकशास्त्र क्षेत्राला मोठी दिशा आणि गती मिळाली. तर आपल्या होमीला डॉक्टरेट पदवी मिळाली.

डॉ. होमी जहांगीर भाभा हे नाव आता विज्ञान वर्तुळात महत्त्वाचं झालं होतं. अनेक प्रयोगशाळा आणि अनेक वैज्ञानिक हे त्यांना आपल्यासोबत काम करण्यासाठी बोलवत होते.‌ त्यांना १९३६ मध्ये पुन्हा तीन वर्षाची स्कॉलरशिप मिळाली, ज्यामध्ये त्यांनी केंब्रिजमधील गॉनव्हिल अँड कीज कॉलेजमध्ये आपलं संशोधन सुरू ठेवलं. १९३९ मध्ये ते कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आले. त्यानंतर त्यांना मँचेस्टर प्रयोगशाळेमध्ये संशोधन करण्यासाठी रॉयल सोसायटीची ग्रँट मिळाली होती.‌ मात्र त्यांना लंडनला जाता आलं नाही. कारण महायुद्ध सुरू झालं होतं. किती इच्छा असली तरी त्यांना तिकडे जाणं शक्य नव्हतं आणि आर्थिक रसद कमी पडल्यामुळं तिकडच्या प्रयोगशाळा देखील परदेशी शास्त्रज्ञांना बोलवू शकत नव्हत्या.

अतिशय लॅवीश जगण्याची सवय असलेल्या भाभांना आता संशोधनासाठी भारतातील प्रयोगशाळा निवडणं भाग होतं. सी. व्ही. रमण संचालक असलेल्या, बेंगलोरमधील, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये ते जॉईन झाले. घरच्याच टाटा ग्रुपने त्यांना कॉस्मिक किरणांवर पुढील संशोधन करण्यासाठी ग्रॅंट दिली. बेंगलोरमध्ये ते अतिशय महागड्या वेस्टएन्ड हॉटेलमध्ये राहत होते. सकाळी अगदी उशिरा उठणार, दुपारपर्यंत आवरून कामावर जाणार आणि नंतर रात्री उशिरापर्यंत काम करणार अशी त्यांची जीवनशैली होती. १९४१ मध्ये भाभांना रॉयल सोसायटी ऑफ लंडननं फेलोशिप देऊ केली. याच वर्षी त्यांना ॲडम प्राइज देखील मिळालं. इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सचं त्यांना सदस्य मिळालंच, शिवाय त्यांना भौतिकशास्त्र विभागाचे अध्यक्ष देखील करण्यात आलं‌. 

त्यांनी जरी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्राध्यापकी स्वीकारली असली, तरी त्यांचा एक पाय अजूनसुद्धा इंग्लंडमध्ये होता. कधी एकदा तिकडं जाऊन संशोधन करेल असं त्यांना झालं होतं. ते युद्ध थांबण्याची आतुरतेनं वाट पाहत होते.‌ मात्र इथं त्यांना विक्रम साराभाई नावाचे गांधीवादी युवा शास्त्रज्ञ भेटले. ज्यामुळं भाभांचा सर्व गोष्टींकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. विक्रम साराभाई देखील अतिशय श्रीमंत कुटुंबातले असले, तरी त्यांची राहणी अतिशय साधी होती. त्यांची विज्ञानाप्रती असलेली तळमळ आणि देशाप्रती असलेली निष्ठा पाहून भाभांनी देखील निश्चय केला की “आपण भारतातच राहायचं. आपण भारतामध्येच केंब्रिज किंवा पॅरिसप्रमाणे वातावरण तयार करू. म्हणजे सर्व परदेशी गेलेल्या भारतीय शास्त्रज्ञांना इथे यावसं वाटेल, देशासाठी संशोधन करावंसं वाटेल.‌” 

त्यांनी टाटांची आर्थिक मदत घेऊन भारतामध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था आपल्याच राहत्या घरात सुरू केली. भाभा यांचा जन्म ज्या खोलीमध्ये झाला होता, तीच खोली त्यांचं ऑफिस बनलं. मात्र शास्त्रज्ञांसाठी तिथं सर्व सुखसोयी होत्या. देशामधला सर्वात पहिला कॉम्प्युटर या संस्थेमध्ये आला. यावरून आपण विचार करू शकतो की, ही संस्था अद्ययावत ठेवण्याचा किती प्रयत्न भाभा यांनी केला असेल. लवकरच या संस्थेला मोठी जागा मिळाली आणि अतिशय उत्तम वास्तू तयार झाली. भाभा यांनी स्वतःचं संशोधन काही काळ थांबवलं, मात्र प्रशासकीय बाबींमध्ये लक्ष घालून या संस्थेचा विस्तार केला. मोठमोठ्या लोकांशी ओळख आणि स्वतःचं प्रभावी व्यक्तिमत्व यामुळं भाभांना शासकीय मंजुरी किंवा कुणाचे अर्थसहाय्य मिळवताना अडचण येत नसे. 

देश स्वतंत्र झाला आणि भाभा ज्याला अरेतुरे म्हणायचे, असा “जवाहर” पंतप्रधान झाला. देशाचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू हे स्वतः उच्चशिक्षित आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार करणारे असल्यामुळं त्यांनी भाभा तसेच इतर सर्व शास्त्रज्ञांचं महत्त्व ओळखून त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. भारतामध्ये अणुऊर्जा आयोग स्थापन होऊन त्याचं अध्यक्षपद भाभांकडे आलं. कामाचा धडाका लावण्याची कार्यपद्धती असल्यामुळं अप्सरा, सायरस यासारख्या अनेक अणुभट्ट्या भारतात स्थापन झाल्या. अणुभट्ट्या सुरू करण्यासाठी लागणारं आवश्यक साहित्य विकत घेण्यासाठी भाभा यांनी अनेक देशांमधून नाममात्र व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिलं. इंटरनॅशनल ऍटोमिक एनर्जी एजन्सीचे जाचक नियम शिथील करण्यासाठी त्यांनी जगभर लॉबींग केली. वकिलाचा मुलगा असल्याचा परिणाम असावा, भाभा जेव्हा ठामपणे युक्तिवाद करत तेव्हा समोरचे अवाक होऊन जात!!

सप्टेंबर १९५६ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांनी ठामपणे मांडले की, “शांततापूर्ण ऊर्जानिर्मितीच्या कार्यक्रमांसाठी आवश्यक असलेले किरणोत्सारी पदार्थ तयार करणे आणि स्वतःकडे ठेवणे हा प्रत्येक देशाचा हक्क आहे, तो कुणालाही हिरावता येणार नाही.” खरंतर भारतानं देखील अणुबॉम्ब बनवावा असं भाभांचं मत होतं. मात्र अणुऊर्जा ही केवळ शांततेसाठी असेल असं पंडित नेहरू आणि विक्रम साराभाईसारख्या अनेक शास्त्रज्ञांचं मत होतं. भाभा म्हणत की, “त्यांच्यावर गांधीजींच्या अहिंसावादाचा अतिरिक्त आणि अनावश्यक पगडा आहे. आपण अणुबॉम्ब बनवला पाहिजे, भले आपण तो कधी टाकणार नाही. मात्र शेळीच्या अहिंसेला कोणी महत्त्व देत नाही, वाघ अहिंसक असेल तर त्याचं कौतुक होतं. त्याच पद्धतीनं आपण अण्वस्त्र सज्ज असलं पाहिजे.“

१९६२ मध्ये चीनकडून भारतानं सपाटून मार खाल्ला. त्यातच चीननं अणुचाचणी देखील घेतली. अशावेळी भारताला मागं जाऊन चालणार नव्हतं. चीननं अणुचाचणी घेतल्यानंतर सातच दिवसांमध्ये भाभा यांनी आकाशवाणीवर एक मुलाखत दिली, ज्यामध्ये भारताला कमी खर्चामध्ये अणुबॉम्ब बनवणं शक्य आहे असं सांगितलं. “प्लुटोनियम बॉम्ब निर्माण करण्याची भारताची क्षमता आहे, तीस लाख रुपयांमध्ये दोन मेगाटन क्षमतेचा अणुबाँब भारत दीड वर्षात बनवेल” असं भाभा जाहीरपणे बोलू लागले. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्रानं भारतामध्ये एक सर्वे घेतला, त्यामध्ये बहुतांश लोकांना भाभांचा हा दावा खरा वाटत होता. मात्र १९६५ मध्ये भाभा म्हणाले की पाच वर्षांमध्ये भारतानं अणुबॉम्ब बनवलेला असेल. 

लालबहादूर शास्त्री अणुबॉम्ब बनवण्याच्या विरुद्ध होते. त्यांनी अणुबॉम्ब बनवण्याचा खर्च किती असेल याची इतर देशांकडं विचारणा केली. ब्रिटननं सांगितलं की तीस लाख रुपयांमध्ये अणुबॉम्ब बनणं शक्यच नाही, किमान चाळीस ते पन्नास कोटी रुपये खर्च येईल. शास्त्रीजींनी हा मुद्दा संसदेमध्ये उचलला आणि शेवटी खर्च आणि तांत्रिक अडचणींबद्दल अनिश्चितता असल्यामुळ अण्वस्त्रं तयार करावीत की नाही याचा निर्णय पुढे ढकलला. त्याऐवजी तंत्रज्ञान आणि कौशल्य विकसित करण्यावर भर देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर अण्वस्त्रप्रसारबंदी करार देखील झाला. त्यामुळं अणुसज्ज होण्याचं भाभांचं स्वप्न त्यांच्या हयातीमध्ये पूर्ण होऊ शकलं नाही. १९६६ मध्ये त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण केलं आणि १९७४ मध्ये पोखरणमध्ये चाचणी घेऊन भारत अण्वस्त्रधारी देशांच्या मालिकेत जाऊन पोहोचला.

भाभा यांचा मृत्यू अतिशय रहस्यमय पद्धतीनं झाला. ११ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा ताश्कंदमध्ये संशयास्पद मृत्यू झाला. त्याला दोन आठवडे पूर्ण होत नाही तोच भाभांचा अपघाती मृत्यू झाला. २४ जानेवारी १९६६ रोजी इंटरनॅशनल ॲटोमिक एनर्जी एजन्सीच्या मीटिंगसाठी भाभा व्हिएन्नाला चालले होते. ते ज्या एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करत होते, ते विमान फ्रान्समधील आल्प्स पर्वतांतील एका शिखरावर आदळलं आणि विमानातील सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले. काही पत्रकार असा दावा करतात की “शास्त्री आणि भाभा या दोघांच्या मृत्यूमध्ये अमेरिकन गुप्तहेर संस्था सीआयएचा हात होता, त्यांनी विमानाच्या मालवाहू भागात बाँब ठेवला होता आणि त्यामुळे विमानाचा हवेतच स्फोट झाला. बॉम्बस्फोट करण्यासाठी मुद्दाम अशी वेळ निवडली की विमान पर्वतराजीमध्ये असेल.” भाभांचा अपघात होता की घातपात हे इतिहासात दडलेलं कोडं राहिलं आहे. 

भाभांचा असा अकस्मात मृत्यू देशासाठी खूप मोठा धक्का होता. मात्र त्यांच्या साथीदारांनी त्यांचं काम पुढं सुरू ठेवून आपल्या या नेत्याला मानवंदना दिली. भाभा केवळ अणुसंशोधन या एका विषयासाठी अजिबात मर्यादित नव्हते. इस्रोसारखी संस्था निर्माण करण्यामध्ये देखील त्यांचं महत्वाचं योगदान होतं. इलेक्ट्रॉनिक्स, अवकाशविज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, रेडिओ खगोलशास्त्र या सर्वच विषयांना भारतामध्ये गती देण्याचं काम त्यांनी केलं. भाभांच्या मार्गदर्शनाखाली अणुऊर्जा विभागाकडून अनेक संस्थांना सुरुवातीचा निधी मिळाला, ज्यातून टाटा मेमोरियल हॉस्पिटल, इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर, साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यांसारख्या अनेक संस्था निर्माण झाल्या. ते मंत्रिमंडळाच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे सदस्य होते. सरकारी लालफितीच्या कारभारातून आपलं काम कसं काढायचं याचं कौशल्य त्यांना होतं, त्यामुळे ते एवढ्या संस्था उभ्या करू शकले.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेसाठी भाभांनी चक्क भारतीय नौदलाकडून जमीन मिळवली.‌ ही संस्था सुरू करण्यासाठी तत्कालीन मुंबई राज्य सरकारनं जमीन देऊ केली होती, मात्र ती खूप लहान होती.‌ भाभांचं पहिल्यापासून एक ठरलेलं असायचं. करायचं तर ग्रँड करायचं!! त्यांनी मुंबई सरकारची जमीन नाकारली. आणि दक्षिण मुंबईतील अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असलेली अगदी मोक्याची जमीन नौदलाकडं मागितली. सैन्यदलाकडून कोणतीही जमीन मिळवणं किती कटकटीचं असतं हे आपल्या सगळ्यांना ठाऊक असेलच. मात्र भाभांची चिकाटी कामी आली. नौदलानं आधी त्यांना नकार दिला. मग भाभा थेट पंतप्रधानाकडे गेले.‌ पंडित नेहरू म्हणाले की तिन्ही दलाचे प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींनी आदेश काढला तर काम होऊ शकेल. राजेंद्रप्रसाद यांच्याकडे जाऊन आपली मागणी कशी योग्य आहे हे पटवण्यामध्ये भाभा यशस्वी झाले आणि आज आपण पाहतोय ती इमारत उभी राहिली. 

डॉ. होमी भाभांचा उल्लेख करताना सी. व्ही. रमण म्हणायचे की “भाभा हे आधुनिक लिओनार्डो दा विंची आहेत, कारण विज्ञानासोबत अनेक कला त्यांच्यामध्ये आहेत.‌” हे वाक्य अनेक अर्थानं खरं आहे. लिओनार्डोप्रमाणे भाभांच्या अंगात देखील अनेक कला होत्या. याशिवाय आपल्या व्यक्तिमत्त्वाचा फायदा करून घेऊन राजशक्तीकडून आपल्याला हवे तसे निर्णय घेण्याची भाभांची क्षमता देखील लिओनार्डोप्रमाणे होती.‌ डोक्यामध्ये विचार आला की लगेच प्रयोग करून पाहण्याची वृत्तीदेखील सारखीच आणि लॅवीश जीवनशैली देखील! भारताच्या या लिओनार्डो दा विंचीच्या आयुष्यावर २०२२ मध्ये “रॉकेट बॉईज” नावाची शिवी झाली होती, ज्यामध्ये भाभा, विक्रम साराभाई आणि अब्दुल कलाम यांची कहाणी रंगवली आहे.

भौतिकशास्त्र आणि संगीत याचं काही नातं असावं, जे अनेक शास्त्रज्ञांची कहाणी वाचताना आपल्या लक्षात येतं. होमी भाभांसाठी दोन्ही अगदी जिव्हाळ्याच्या बाबी होत्या. अगदी अणुऊर्जेच्या बैठकीला जरी गेले, तरी भाभा जवळपासच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना आवर्जून जात असत.‌ कलेकडं ते फक्त करमणूक किंवा विरंगुळा म्हणून पहात नसत. त्यांच्यासाठी कला ही जीवनातील अत्यंत गंभीर आणि महत्त्वाची गोष्ट होती. १९४७ साली मुंबईत स्थापन झालेल्या “प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप” या कलाकारांच्या गटाला त्यांनी पाठिंबा दिला होता. याच गटातून तय्यब मेहता, एम. एफ. हुसेन यांसारखे दिग्गज पुढं प्रसिद्धीस आले. उमेदीच्या काळात या कलाकारांची चित्रं विकत घेऊन भाभांनी त्यांना मदत केली होती. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये आपण भाभांनी त्यावेळेस विकत घेतलेल्या शेकडो चित्रांचा संग्रह पाहू शकतो. 

प्रत्येक व्यक्तीला मर्यादित आयुष्य मिळालेलं असतं. त्या आयुष्याचा तो कसा उपयोग करतो हे महत्त्वाचं. भाभांना अवघं ५७ वर्षांचं आयुष्य लाभलं. मात्र त्यांनी ज्या संस्था भारतामध्ये निर्माण केल्या आहेत, त्यामुळे त्यांचं नाव अजरामर झालं आहे. त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांच्या नावानं काही संस्था सुरू झाल्या आहेत. होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट आणि होमी भाभा फेलोशिप कन्सिल या संस्थांमधून होमी भाभा आजही जिवंत आहेत‌. देशातील सर्वोच्च सत्तेच्या अतिशय जवळ राहून देखील स्वतःसाठी काही न करता देशासाठी सर्व काही करणारा, त्यासा

ठी आपली प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या या अवलियाला सलाम!! 

Comments

Popular posts from this blog

गोमू आणि गोमाजीराव

डॉ. येल्लाप्रगडा सुब्बाराव : छोटा डॉक्टर बडा धमाका

दहावीचे व्हाट्सअप ग्रुप