मेघनाद साहा : ताऱ्यांचे अंतरंग उघडणारा शास्त्रज्ञ

 मेघनाद साहा : ताऱ्यांचे अंतरंग उघडणारा शास्त्रज्ञ 



भारतातील एक शास्त्रज्ञ, ज्याला सात वेळा नोबेल पारितोषिकासाठी नामांकन मिळालं. मात्र नोबेल मिळू नाही शकलं. अर्थात लहानपणापासून उपेक्षा आणि संघर्ष याची सवय असलेल्या या शास्त्रज्ञाला त्याचा काही फरक पडला नाही. गरिबी आणि जातीव्यवस्थेचे चटके खात लहानाचं मोठ होणं, ब्रिटिशांविरोधी आंदोलनामध्ये भाग घेतल्यामुळं शाळेतून काढलं जाणं, मोठ्या संघर्षानंतर शिक्षण पूर्ण करण्याची संधी मिळणं.. मात्र त्यानंतरही सरकारी नोकरीमध्ये प्रवेश नाकारला जाणं हे सर्व काही त्याने सहन केले. आपत्ती मधून संधी शोधताना ही व्यक्ती संशोधनाकडं वळाली आणि भौतिकशास्त्रातील महत्त्वाचे शोध लावले. जगभरात उच्च पगाराची नोकरी मिळत असताना ही व्यक्ती भारतामध्ये येऊन आपलं योगदान देते. पुढे देश स्वतंत्र झाल्यावर अगदी खासदार होऊन संसदेत गरिबांचे प्रश्न मांडते. उणंपुरं ६३ वर्षांचं आयुष्य लाभलेले, आणि तरीही प्रचंड घडामोडीचं आयुष्य असलेले हे शास्त्रज्ञ म्हणजे मेघनाद साहा…

मेघनाद साहा यांचं नाव कदाचित आपल्यापर्यंत आलं असेल ते केवळ शास्त्रज्ञ म्हणून.. मात्र स्वतंत्र भारताला दिशा देणारी जी महान व्यक्तिमत्वं होती, त्यामध्ये साहा यांचे नाव आघाडीवर असेल. त्यांनी अनेक संशोधन संस्था सुरू केल्या, देशात वैज्ञानिक वातावरणाची निर्मिती केली आणि त्यासोबत वैज्ञानिकांची नवी पिढी तयार केली. त्यांनी नियोजन आयोगाच्या महत्त्वाच्या समितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. ते म्हणायचे की “जर देशातील ९०% जनता दारिद्र्यात असेल, आणि या जनतेला दारिद्र्यातून बाहेर काढून एक नवा सशक्त समाज घडवायचा असेल तर आपल्याला नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करावा लागेल आणि त्यामध्ये ज्ञान हे सर्वात महत्त्वाचं नैसर्गिक संसाधन असेल.” ज्ञानाला महत्वाचं संसाधन मानणाऱ्या या शास्त्रज्ञाचे वेगवेगळे पैलू जाणून घेऊया.

एकोणिसावे शतक सरत आले होते. बांगलादेशची राजधानी ढाकाजवळील शेवराताली गावात जगन्नाथ साहा आणि त्यांची पत्नी भुवनेश्वरी देवी रहात होते. किराणा मालाचे छोटेसे दुकान चालवून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करत होते. या जोडप्याला झालेल्या आठ मुलांपैकी पाचवा नंबर मेघनादचा. पाच पांडव आणि त्यांना तीन बहिणी. ६ ऑक्टोबर १८९३ रोजी मेघनाद जन्माला आला. घरात परिस्थिती हलाखीची असली तरी भुवनेश्वरी अतिशय कुशलतेने संसाराचा गाडा हाकत होत्या त्यामुळे मुलांची खाण्यापिण्याची आबाळ झाली नाही. मात्र एवढ्या सगळ्या मुलांना शिकवायचं कसं हा प्रश्न होता. त्यापेक्षा व्यवहारापुरतं गणित शिकून मेघनादनं दुकान सांभाळावं अशी आई-वडिलांची इच्छा होती. त्यांनी मोठा मुलगा हायस्कूल पर्यंत कसाबसा पोहोचवला होता. त्यामुळे अजून एखादा मुलगा शिकवता येईल अशी घरची मानसिकता देखील नव्हती आणि आर्थिक परिस्थिती देखील. 

याशिवाय सामाजिक परिस्थिती देखील प्रतिकूल होती. बंगालमध्ये ब्राह्मण, वैद्य आणि कायस्थ या तीन उच्चवर्णीय जाती मानल्या जात होत्या. साहा कुटुंब हे वैश्य होते, जी तुलनेने खालची जात मानली जात होती. त्यामुळे मेघनादला अनेक वेळा जातीव्यवस्थेचे चटके बसले. शाळेत सरस्वती पूजा करत असताना त्याला बाजूला काढण्यात आलं. त्यामुळेच लहानपणापासून मेघनादच्या मनात जातीव्यवस्थेबद्दल चीड निर्माण झाली. पुढं मोठा झाल्यावर त्याचा सामाजिक स्तर सुधारला, आणि त्याला अनेकवेळा मुंजीच्या कार्यक्रमाचं आमंत्रण मिळालं. मात्र मुंज हा संस्कार केवळ विशिष्ट जातीसाठी आहे आणि या संस्कारांमधूनच “आपली जात ही इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे” असा कुसंस्कार मुलांच्या मनावर होत असतो हे लक्षात घेऊन मेघनाद कधीच कोणत्याच उपनयन संस्काराला हजर राहिला नाही. 

मेघनादचं प्राथमिक शिक्षण गावातील छोट्या शाळेत झालं. लहानपणी शाळेतून आलं की बाकीची मुलं खेळायला जात असतील. मात्र मेघनादला दुकान सांभाळावं लागायचं. शाळा आणि दुकान यामध्ये मेघनादचं आयुष्य खूप व्यग्र होतं. दुकानात थांबायला त्याला अजिबात आवडत नसायचं. मग वडिलांचा डोळा चुकून तो पोहण्यासाठी वेळ काढायचा. मेघनादचा सर्वात मोठा भाऊ जयनाथनं हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्याला चांगली नोकरी लागली नव्हती. त्यामुळे मेघनादला पुढं शिकवण्याची गरज नाही असं आई-वडिलांना वाटायचं. मात्र प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी मेघनादची हुशारी ओळखली होती आणि त्यांनी सांगितलं की हा मुलगा तुमचं नाव काढेल, याला हायस्कूलला जाऊ द्या. त्याला स्कॉलरशिप मिळून शिक्षण पूर्ण होऊन जाईल. मेघनादपेक्षा तेरा वर्षांनी मोठा असलेला जयनाथ म्हणाला की किमान त्याला मिडलस्कूलला तरी टाका, मी जमेल तेवढी मदत करेल.

शेवरातालीपासून सर्वात जवळचं मिडलस्कूल देखील बारा किलोमीटर लांब, सिमुलिया गावात, होतं. म्हणजेच रोज चोवीस किलोमीटरची पायपीट केली तरच पुढच्या शिक्षण घेता येणार होतं. त्यामुळे पप्पा म्हणाले “नो म्हणजे नो.” मात्र यावेळी आईदेखील भावाच्या मदतीला धावून आली आणि मेघनाद मिडल स्कूलमध्ये दाखल झाला. रोजची पायपीट आणि जाण्यायेण्यामध्ये लागणारे पाचसहा तास यामुळे मेघनाद थकून जायचा. म्हणून जयनाथनं सिमुलिया गावातील डॉ. अनंतकुमार दास यांच्याकडं मेघनादची राहण्याची आणि जेवणाची सोय केली. या प्रसंगाची जाणीव मेघनादनं आयुष्यभर ठेवली आणि जेव्हा तो मोठी व्यक्ती झाला, तेव्हा त्याच्या अलाहाबाद (प्रयागराज) आणि कोलकाता या दोन्ही ठिकाणच्या घरी नेहमी वेगवेगळ्या भागातील गरजू, होतकरू विद्यार्थी शिकण्यासाठी राहायला येत होते. घरामध्ये साहा कुटुंबीय, गरजू विद्यार्थी यांच्यासोबत युवा शास्त्रज्ञ देखील आपलं बस्तान मांडून असत. खूप पुढे गेलो का? परत मागे येऊ.‌..

मिडलस्कूल परीक्षेमध्ये आपला मेघनाद पूर्ण जिल्ह्यामध्ये पहिला आला आणि त्याला स्कॉलरशिप मिळाली. १९०५ मध्ये तो पुढील शिक्षणासाठी ढाका कॉलेजिएट शाळेत दाखल झाला. इथं त्याला फी तर भरायची नव्हतीच, शिवाय वरखर्चासाठी स्कॉलरशिप देखील होती. वंगभंग चळवळीचा तो काळ होता. लॉर्ड कर्झननं बंगालची फाळणी केली होती, ज्याचा निषेध म्हणून पूर्ण प्रांतामध्ये आंदोलनं सुरू होती. विद्यार्थ्यांनी अनुपस्थित राहून शाळा आणि महाविद्यालयं बंद पाडली होती. नवीन तयार झालेल्या पूर्व बंगाल प्रांतामध्ये गव्हर्नर फुलर यानं दौरा काढला होता, मात्र त्याला ढाका कॉलेजिएट शाळा आंदोलनामध्ये सहभागी असल्याचं आढळलं. आंदोलनात सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांवर आणि मेघनादवर देखील कठोर कारवाई झाली. मेघनादची स्कॉलरशिप तर काढून घेण्यात आलीच, शिवाय त्याला शाळेतून देखील काढण्यात आलं. नंतर कोणीच त्याला शाळेमध्ये ऍडमिशन देत नव्हतं. 

मात्र मेघनाद सारख्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी किशोरीलाल जुबीली स्कूल पुढं आलं. मेघनादला इथं ऍडमिशन देखील मिळालं आणि स्कॉलरशिप देखील. शिक्षण सुरू झालं आणि अवांतर वाचनाचा देखील सपाटा सुरू झाला. मेघनादनं वेगवेगळ्या धर्म, संस्कृती, इतिहास या सर्व बाबतीत मिळेल ती पुस्तकं वाचून काढण्याचा फडशा लावला. हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध, जैन अशा सर्व धर्मांचा त्यानं अभ्यास केला. अशातच बाप्टिस्ट मिशननं बायबलवर आधारित एक स्पर्धा आयोजित केली होती. मेघनादनं या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि सर्व ख्रिस्ती मुलांना मागं टाकून त्यानं पूर्ण बंगाल प्रांतात पहिला क्रमांक पटकावला आणि शंभर रुपये बक्षीस देखील मिळवले. तोवर मोठा भाऊ जयनाथ स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मेघनादला थोडीफार आर्थिक मदत करायचा. मात्र आता या मदतीची गरज नव्हती, कारण शंभर सव्वाशे वर्षांपूर्वी शंभर रुपये ही खूप मोठी रक्कम होती. त्यावेळी सरकारी हायस्कूल मधील शिक्षकांना पन्नास रुपये पगार मिळायचा, यावरून आपण तुलना करू शकतो! 

सन १९०९ मध्ये शालांत परीक्षेमध्ये मेघनाद पूर्ण बंगाल प्रांतामध्ये पहिला आला. इंग्रजी, बंगाली आणि संस्कृत या भाषांसोबत गणित या विषयात त्यानं पूर्ण प्रांतामध्ये पहिला क्रमांक पटकावला. पुढील शिक्षण विज्ञान क्षेत्रामध्ये घ्यायचं आहे हे मेघनादचं आधीच ठरलं होत. त्यानं ढाका कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि जर्मन भाषा शिकायला सुरुवात केली. त्या काळामध्ये जर्मनी हा देश विज्ञानामध्ये आणि तंत्रज्ञानामध्ये खूप अग्रेसर होता आणि बहुतेक शोधनिबंध हे जर्मन भाषेमध्ये असायचे. त्यामुळे जर्मन शिकणं अनिवार्य झालं होतं. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जर्मन अशी मेघनादची चौफेर घौडदौड सुरू झाली. शिकण्याची भूक आणि विनम्रता या गुणांमुळे तो शिक्षकांचा आवडता विद्यार्थी होता. शिक्षक त्याला भरभरून देत होते. गणित आणि रसायनशास्त्र या विषयात पहिला येत त्यानं इंटरमिजिएट परिक्षा उत्तीर्ण केली. 

गणित विषयात बीएससी ऑनर्स पदवी मिळवण्यासाठी मेघनाद कोलकातामधील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये आला. इथं शिकताना त्याला अफलातून सोबती मिळाले. प्रेसिडेन्सी कॉलेज अनेक दिग्गज त्याच्या सोबत आणि पुढंमागं शिकत होते. महालनोबीस हे त्याला सिनियर होते तर नेताजी सुभाषचंद्र बोस हे तीन वर्षे ज्युनिअर. सत्येंद्रनाथ बोस हे तर डायरेक्ट बॅचमेट होते. त्यांना शिकवायला कोण असेल?? भौतिकशास्त्र शिकवायला जगदीशचंद्र बोस आणि रसायनशास्त्र शिकवायला प्रफुलचंद्र राय यांसारखे दिग्गज!! मात्र इथल्या ईडन हॉस्टेलमध्ये राहत असताना मेघनादला पुन्हा जातीभेदाचा सामना करावा लागला. ब्राह्मण आणि इतर उच्चवर्णीय विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलमध्ये वेगळे जेवणाचे व्यवस्थापन होते. या भेदभावामुळे मेघनाद आणि त्यांच्या काही मित्रांनी हे वसतिगृह सोडून दुसऱ्या ठिकाणी राहायला सुरुवात केली.

या काळामध्ये अनेक क्रांतिकारक मेघनादचे मित्र होते. पुलीनदास आणि यतीन बाघ यांची नावं आवर्जून घ्यावी लागतील. पुलीनदास हे एक व्यायाम शाळा चालवायचे. इथं युवकांना शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण मिळे. मेघनादनं देखील इथं काठी आणि कट्यार चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं. या व्यायामशाळेवर ब्रिटिश अधिकाऱ्यांची करडी नजर होती. यतीन बाघ यांचं मूळ नाव यतीन मुखर्जी असं होतं मात्र यतीननं वाघाशी झुंज करून त्याला केवळ एका कट्यारीच्या साह्यानं ठार मारलं होतं, तेव्हापासून त्यांचं नाव यतीन बाघ असं प्रसिद्ध झालं होतं. ते ब्रिटिशांसोबत लढताना शहीद झाले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आणि मेघनादचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. किंबहुना १९३९ मध्ये जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींविरुद्ध बंड करून काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा लढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा देखील या दोघांची मसलत झाली होती.

असे क्रांतिकारक मित्र असले तरी मेघनादला स्वातंत्र्य चळवळीत उतरता येणं शक्य नव्हतं. त्याच्यावर तीन धाकट्या भावंडांची जबाबदारी होती. म्हणून त्यानं अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. मेघनादला बीएससी आणि एम एस सी या दोन्ही परीक्षेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. दोन्ही वेळेस पहिला क्रमांक सत्येंद्रनाथ बोस यांनी पटकावला होता. सन १९१५ मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याचा मेघनादचा विचार होता. मात्र क्रांतिकारकांशी असलेले संबंध आड आले आणि त्याला प्रशासकीय सेवेसाठी अपात्र ठरविण्यात आलं. मेघनादने ठरवलं की नोकरी मिळत नाही तर हरकत नाही, आपण संशोधन करायचं आणि त्यासाठी श्रीमंत मुलांच्या खाजगी शिकवण्या घेऊन पैसे मिळवायचे. कोलकात्यामधील वेगवेगळ्या भागात असलेल्या तीन विद्यार्थ्यांची शिकवणी सुरू झाली आणि त्यासाठी मेघनादची सायकल एक वर्ष फिरली.  

पुढच्या वर्षी मेघनादला विद्यापीठामध्ये गणित विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून जागा मिळाली. मात्र गणित विभागाचे प्रमुख असलेल्या प्रा. गणेश प्रसाद यांच्याशी त्याचं पटलं नाही आणि त्याला भौतिकशास्त्र विभागात पाठवण्यात आलं. तो भौतिकशास्त्र शिकला असला तरी ऑनर्ससाठी गणित विषय होता. त्यामुळे इथं विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी त्यानं भौतिकशास्त्राचा कसून अभ्यास केला. जगदीशचंद्र बोस यांचं मार्गदर्शन होतंच. स्वतः शिकत असताना मेघनाद अतिशय विनयशील होता व शिक्षकांशी अतिशय प्रेमानं, अदबीने बोलायचा आणि हेच प्रेम जेव्हा तो स्वतः प्राध्यापक झाला तेव्हा त्याला विद्यार्थ्यांकडून मिळालं. जर्मन भाषा शिकली असल्यामुळे तो विद्यार्थ्यांना अशी माहिती देऊ शकायचा, जी इतर कोणी शिक्षक देऊ शकत नाही. मूळ जर्मन भाषेत असलेला आईन्स्टाईनचा सापेक्षता सिद्धांत त्यानं इंग्रजी भाषेत अनुवादित केला, जो कोलकाता विद्यापीठानं छापून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केला.

आईन्स्टाईननं आपल्या सिद्धांतात सांगितलं होतं की प्रकाशाला वस्तुमान असतं, त्यामुळे प्रकाशावर देखील गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होऊ शकतो. यावर काही संशोधक शंका उपस्थित करायचे की आपण बॅटरीचा प्रकाशझोत एखाद्या शिखरावर मारला, तर प्रकाश खाली पडत नाही, तो टोकावर कसा जातो. मग तेव्हा आईन्स्टाईनचा सिद्धांत काम करत नाही का? प्रकाशाचा वेग हा साधारणता एका सेकंदाला तीन लाख किलोमीटर असतो, त्यामुळे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण त्यावर परिणाम करू शकत नाही. मात्र सूर्याचे गुरुत्वाकर्षण नक्कीच त्यावर परिणाम करू शकेल असं आईन्स्टाईनचं म्हणणं होतं. अर्थात आकाशात सूर्य असताना इतर कोणताही प्रकाश आपल्याला दिसत नाही मग हा सिद्धांत तपासायचा कसा? यावर उत्तर होतं की सूर्यग्रहणाच्या वेळेस आपल्याला तपासता येईल. १९१९ मध्ये जेव्हा खग्रास सूर्यग्रहण झालं त्यावेळेस सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे इतर ताऱ्यांचा प्रकाश वाकलेला दिसला आणि आईन्स्टाईनचा नियम देखील सिद्ध झाला. हा सिद्धांत समजावून सांगितला म्हणून मेघनादची बुद्धिमत्ता कलकत्ता विद्यापीठामध्ये सगळ्यांच्या लक्षात आली.  

१९१९ मध्ये मेघनाद साहा यांना कलकत्ता विद्यापीठानं स्कॉलरशिप देऊन युरोपमध्ये पाठवले. लंडनमधील इम्पेरियल कॉलेजमध्ये प्रा. फाउलर यांच्यासोबत ते काम करू लागले. इथंच त्यांनी ताऱ्यांच्या वातावरणातील तापमान, दाब आणि रासायनिक परिस्थिती यांवरून त्यांचे स्पेक्ट्रम स्पष्ट करण्याचा सिद्धांत मांडला. अर्थात या सिद्धांताची पडताळणी करण्यासाठी आवश्यक उपकरण त्यांच्याकडे नव्हतं. मात्र फाउलर यांनी आपल्या साहा या सहायकाच्या मदतीसाठी जगभरातील प्रयोगशाळाशी संपर्क साधला. जर्मनीमधील मॅकलेनन या संशोधकानं आपल्या उपकरणांमध्ये साहा यांचा सिद्धांत तपासांच्या प्रयत्न केला, मात्र त्याला अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत त्यामुळे साहा यांचा सिद्धांत चुकीचा आहे असा निष्कर्ष त्यानं काढला. ही गोष्ट जेव्हा साहा यांना समजली, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मॅकलेनन यानं आवश्यक तेवढी उष्णता निर्माण केली नव्हती. किंबहुना अणूंचं आयनीकरण होईल एवढी उष्णता प्रयोगशाळेत निर्माण करता देखील येणार नाही. 

साहा यांचा सिद्धांत स्पष्ट करतो की उष्णतेमुळे अणूंचं आयनीकरण होते. त्या काळात वैज्ञानिकांना ताऱ्यांच्या प्रकाशातील स्पेक्ट्रम समजत नव्हते. विशेषतः सूर्य आणि इतर ताऱ्यांच्या स्पेक्ट्रममध्ये काही गोष्टी गूढ वाटत होत्या. मेघनाद साहा यांनी अभिनव कल्पना मांडली की ताऱ्यांच्या स्पेक्ट्रममधील फरक त्यांच्या रासायनिक रचनेमुळे नसून, त्या ताऱ्यांमधील तापमानामुळे अणू किती उत्तेजित झाले आहेत आणि किती आयनीकरण झालं आहे यावर अवलंबून असतो. त्यांनी तापमान, दाब, आयनीकरण ऊर्जा आणि अणूंच्या विविध आयनीकरण अवस्थांचं प्रमाण यांच्यातील संबंध दाखवणारं गणिती सूत्र मांडलं. हे सूत्र १९२० मध्ये फिलॉसॉफिकल मॅगझिन या जर्नलमध्ये प्रकाशित झाले आणि २७ वर्षाचा हा शास्त्रज्ञ जगप्रसिद्ध झाला. याबाबत त्यांना पीएचडी देखील मिळाली. त्यांच्या सिद्धांतामध्ये नंतर वेळोवेळी सुधारणा झाल्या असल्या तरी हा सिद्धांत त्या काळात एक नवी दिशा खुली करणारा होता. “ताऱ्यांच्या अभ्यासातील बारा महान शोधांपैकी एक” असं या सिद्धांताला गणलं गेलं. या सिद्धांताचा उपयोग फक्त ताऱ्यांपुरता मर्यादित राहिला नाही. ज्वालांमधील विद्युतप्रवाह, इलेक्ट्रिक आर्क तयार होणे, पृथ्वीच्या वरच्या वातावरणातील आयनोस्पेअर तयार होणे या गोष्टी समजून घेण्यासाठीही हा सिद्धांत वापरला गेला. 

परदेशात उत्तम पगार घेऊन संशोधन करण्याची चांगली संधी डॉ. साहा यांना होती. मात्र त्यांनी भारतात परतणं पसंत केलं. परत आल्यावर त्यांनी अलाहाबाद आणि कलकत्त्यामध्ये प्राध्यापकी केली. त्यांनी केवळ प्राध्यापकी आणि संशोधनच केलं नाही, तर भारतात विज्ञानाची पायाभरणी करण्यासाठी काही महत्त्वाच्या संस्था स्थापन करण्यात मोठी भूमिका बजावली. इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ऑफ इंडिया या संस्थांची त्यांनी स्थापना केली. तसंच कलकत्ता विद्यापीठामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्सचं एक केंद्र उघडलं. याशिवाय महेंद्रलाल सरकार यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ सायन्स या संस्थेचं त्यांनी पुनरुज्जीवन केलं. अणुभौतिकशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्राच्या संशोधनासाठी सक्षम संस्था निर्माण झाल्यामुळे भारत या क्षेत्रामध्ये आज अग्रेसर दिसतो. 

हे सगळं करताना डॉ. साहा यांचं संसाराकडं दुर्लक्ष झालं होतं. मुलं कोणत्या वर्गात आहेत किंवा काय शिकत आहेत हे देखील साहा यांना ठाऊक नसायचं. मात्र त्यांच्या पत्नीनं संसाराचा गाडा नेटानं हाकला. १९१८ मध्ये त्यांनी आपला संसार सुरू केला. २६ वर्षाचा हा तरुण प्राध्यापक मुलगी बघायला गेला. १४ वर्षाची राणी देवी समोर आली. या बहाद्दरानं पोरीला बंकिमचंद्र चटर्जी यांच्या कादंबऱ्या बाबतचे प्रश्न विचारले आणि त्यांची समाधानकारक उत्तरं मिळाली म्हणून त्यांचं लग्न झालं. या दोघांना सात मुलं झाली. मेघनाद हे आयुष्यभर कट्टर नास्तिक राहिले तर राणी देवी या आस्तिक होत्या. त्या टिपिकल मनमिळावू टाईप आदर्श पत्नी, आदर्श आई होत्या. प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या वडिलांचा नास्तिक विचार आईच्या धार्मिकतेपेक्षा मुलांवर जास्त प्रभावी ठरला. त्या काळी जवळजवळ प्रत्येक भारतीय घरात देवघर असायचं. पण साहा यांच्या घरी असं वेगळे देवघर नव्हतं. राणी देवी रोज आंघोळीनंतर खोलीच्या एका कोपऱ्यात बसून थोडा वेळ शांतपणे प्रार्थना करत असायच्या.

पोहणे हा दोघांचाही आवडीचा विषय. त्यात कोलकाता आणि अलाहाबाद अशा मोठी नदी असलेल्या ठिकाणी राहणं, त्यामुळे मोकळा वेळ असेल तर हे जोडपं पोहायला जायचं. त्यांनी आपल्या सर्व मुलांना देखील नदीमध्ये पोहायला शिकवलं. छोडो भारत चळवळ सुरू असताना त्यांनी आपल्या मुलांना काठी आणि कट्यार चालवण्याचं प्रशिक्षण देखील एका प्रशिक्षकाकडून मिळवून दिलं. मोकळा वेळ असेल तेव्हा ते आपल्या मुलांशी केवळ साहित्याच्या गप्पा मारत. देशभक्ती, ज्ञान विज्ञान आणि सामाजिक जाणीव देणारी पुस्तकं ते मुलांसाठी उपलब्ध करत असतं. आपल्या मुलांनी कोणतंही पुस्तक अगदी मनापासून वाचावं आणि त्यावर बोलावं अशी त्यांची अपेक्षा असायची. वेळ असेल तेव्हा साहा कुटुंबामध्ये पुस्तकांचं सामूहिक वाचन व्हायचं. संगीतात फारसा रस नसला तरी मेघनाद साहा यांना कादंबऱ्या आणि कविता वाचायला आवडत असे. तरुणपणी त्यांनी काही कविता लिहिल्याही होत्या.

प्रफुल्लचंद्र राय हे साहा यांचे शिक्षक, मार्गदर्शक.. मात्र या दोघांची देखील कधीकधी जुगलबंदी व्हायची. राय यांनी जसे अनेक संशोधक घडविले, तसे अनेक उद्योजक देखील घडवले होते. बंगाल केमिकल्ससारख्या अनेक कंपन्या त्यांच्या प्रेरणेतून सुरू झाल्या, ज्यातून स्वदेशी चळवळ अधिक बळकट झाली. मात्र राय हे गांधीजींच्या कुटीरोद्योग संकल्पनेचे समर्थक होते. साहा यांना मोठ्या औद्योगिक संस्था अपेक्षित होत्या, त्याशिवाय आपण जगाशी स्पर्धा करू शकणार नाही असं त्यांचं मत होतं. कोलकात्यात त्यांच्या घरी जेव्हा राय एक-दोन आठवडे राहायला येत असत तेव्हा दोघांमध्ये या विषयावर खूप तीव्र वादविवाद होत असत. एकदा वाद संपल्यानंतर आचार्य रे यांनी साहांना सांगितलं, “लवकर जा आणि गाडी घेऊन ये, नाहीतर माझी ट्रेन चुकणार.” तेव्हा साहांनी अगदी गंभीर चेहऱ्यानं विचारलं, “ स्टेशनला जाण्यासाठी तुम्हाला बैलगाडी हवी असेल ना?”

एकदा मेघनाद साहा यांच्याकडे काही मुलं सरस्वती पूजेची वर्गणी मागायला आली. लहानपणीचा सरस्वती पूजेचा घाव अद्यापही साहा यांच्या काळजावर होताच. मात्र त्यांनी मुलांना विचारलं की तुम्ही सरस्वती पूजा कशी साजरी करता? मुलांना प्रश्न पडला की “हा विद्वान म्हणवला जाणारा माणूस असून त्याला सरस्वती पूजा माहित नाही?” मग त्यांनी पुढे सांगितलं की, “आम्ही सरस्वती देवीची मूर्ती बनवली आहे, आम्ही भटजी बोलावून तिची पूजा करणार, साउंड लावणार,ज्यावर एक गाण्याचा कार्यक्रम देखील आहे आणि एक नाटक देखील आहे.” यावर हसून साहा म्हणाले, “माझ्यासोबत वरच्या मजल्यावर चला, मग तुमच्या लक्षात येईल मी सरस्वती पूजा कशी करतो.” वर काय पाहायला मिळेल याची उत्कंठा असलेली तरुण गॅंग वर गेली आणि त्यांना साहा यांची हजारो पुस्तके पाहायला मिळाली. इंग्रजी, जर्मन, फ्रेंच आणि संस्कृत अशा वेगवेगळ्या भाषांमधील साहित्य तिथं उपलब्ध होतं. धर्म, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, विज्ञान हे सर्व विषय तिथं हजर होते. चकित झालेल्या मुलांना साहा म्हणाले की “अभ्यास हीच खरी सरस्वतीची पूजा!!”

साहा यांच्या एका मुलीचा प्रेमविवाह ठरला होता. मात्र त्यांचा होणारा जावई हा एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याच्या आई-वडिलांना लग्नाचे विधी करायचे होते. त्याचे आई-वडील हे ब्राम्हो समाजाचे अनुयायी होते आणि लग्न देखील त्याच पद्धतीनं व्हावं असं त्यांना वाटत होतं. नास्तिक वडील याला परवानगी देणार नाही असं साहांच्या मुलीच्या मनात येत होतं. मात्र साहा यांनी ही गोष्ट अतिशय सहजतेनं घेतली. ते मुलाच्या आईवडिलांना म्हणाले की,

“३३ कोटी देवांपैकी तुम्ही सगळे देव नाकारले, फक्त एकच ठेवला आहे. (ब्राम्हो समाज एकेश्वरवादी आहे) आणि मी तो एक देव देखील नाकारला आहे. म्हणजे गणितीय दृष्ट्या आपल्या दोघांमध्ये जास्त फरक नाही.” ते जरी नास्तिक असले तरी मुलीच्या सुखासाठी त्यांनी एक पाऊल मागं घेऊन ब्राम्हो समाजाच्या पद्धतीनं लग्नविधी होऊ दिला आणि त्यामध्ये भाग देखील घेतला.

त्यांचं विज्ञानातील योगदान अतिशय महत्त्वाचं होतं, मात्र नोबेल पारितोषिकच काय, रॉयल सोसायटी ऑफ इंग्लंडचे फेलो होण्याचा मान वगळता इतर कोणतेच महत्त्वाचे पुरस्कार त्यांना मिळाले नाहीत. कदाचित नेहमी विरोधात उभं राहण्याची त्यांची भूमिका त्यांना त्रासदायक ठरली असावी. आयुष्याच्या शेवटच्या काळात ते राजकारणात सक्रिय झाले. लहानपणापासूनच त्यांच्या मनात देशाला ब्रिटिश सत्तेतून मुक्त करण्याची भावना होती. नंतर जेव्हा ते स्वतंत्र झाला, तेव्हा सरकारला जाब विचारणं हे सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे हे त्यांना ठाऊक होतं. म्हणून ते कायम विरोधामध्ये राहिले. पंडित नेहरूंची त्यांची विशेष मैत्री होती, नेहरू त्यांच्या घरी जेवायला देखील यायचे. मात्र तरीही नेहरू यांना प्रश्न विचारण्यासाठी ते कधी कचरले नाहीत. १९५२ मध्ये ते अपक्ष म्हणून उभे राहिले आणि डाव्या पक्षांच्या पाठिंब्यानं प्रचंड बहुमतानं निवडून देखील आले आणि संसदेत गेले. शास्त्रज्ञ असण्यासोबतच डॉ. साहा हे सर्वसामान्यांमध्येही लोकप्रिय होते याची ही पावती म्हणावी लागेल!

आज भारताचे सरकारी कामकाज ज्या दिनदर्शिकेनुसार सुरू आहे, ती राष्ट्रीय दिनदर्शिका तयार करण्यातही साहा यांचं महत्वाचं योगदान आहे. राष्ट्रीय दिनदर्शिका ही साहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेली आणि केंद्र सरकारने अधिकृतरीत्या स्वीकारलेली दिनदर्शिका आहे. ती खगोलशास्त्रावर आधारित असून ऋतुचक्र, भौगोलिक परिस्थिती आणि अनेक घटकांचा सखोल विचार करून तयार करण्यात आली आहे. साहा यांनी नेहरूंसोबत राष्ट्रीय नियोजन समितीवर काम केलं. १६ फेब्रुवारी १९५६ रोजी साहा हे नियोजन आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती भवनाकडं जात असताना अचानक ते कोसळले आणि हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. वयाच्या अवघ्या ६३ वर्षात त्यांनी विज्ञानासाठी आणि देशासाठी जे योगदान दिलं आहे हे पाहता ते विज्ञानाच्या क्षेत्रातील अढळ तारा झाले आहेत. 

मेघनाद सहा यांच्या जीवनातून आपण पाहू शकतो की इच्छा तिथे मार्ग असतोच. गरीबी तसेच जातीव्यवस्थेचे चटके सहन करत एका छोट्या गावातील एक हुशार मुलगा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा शास्त्रज्ञ होतो आणि संशोधन करण्यासाठी प्रत्येक वेळी मोठी प्रयोगशाळा असली पाहिजे या मताला देखील छेद देतो ही बाब नक्कीच अनेकांना प्रेरक ठरेल. 


Comments

Popular posts from this blog

गोमू आणि गोमाजीराव

डॉ. येल्लाप्रगडा सुब्बाराव : छोटा डॉक्टर बडा धमाका

दहावीचे व्हाट्सअप ग्रुप