युरेनस आणि नेपच्यून.. सौरकुलातील नकुल सहदेव


युरेनस आणि नेपच्यून.. सौरकुलातील नकुल सहदेव

महाभारतात जसे नकुल सहदेव हे कायम साईडला टाकलेली पात्रे... तसेच काहीसे युरेनस आणि नेपच्यून याबाबत म्हणावे लागेल.. गुरू शनी यांचे ते भाऊ आहेत बस.... बाकी त्यांना काहीच रोल नाही. बरे एकट्याला अशी काय किंमत नाहीच.. नाव आले तर दोघांचे जोडीनेच येते.. वाटल्यास आता गूगल करून पाहा... एकाचे नाव टाकून.. पाच पोस्ट त्याच्या असल्या तर सहावी लगेच जोडीदाराची.... म्हणून मी पण त्या दोघांची ओळख एकत्रच करून देणार....

द्रौपदीने कधी नकुल सहदेव वर प्रेम केले असेल असे वाटत नाही.. केले असेल तर ते केवळ उपकारापुरते... युरेनस आणि नेपच्यूनवर पण कधी खास अंतरीक्ष मोहीम काढली गेली नाही.. सुर्यमालेच्या शेवटपर्यंत पाठवलेले व्होयाजर यानानेच पुढे जाताना यांचा अभ्यास केला आहे ... आणि तसाही या दोघांचा सूर्यमालेतील घटनांवर विशेष प्रभाव पडत नाही.. विनोद मेहरा चित्रपटात असला काय अन् नसला काय, फरक पडत नाही. तसेच यांचे पण काहीसे...😬

लयच मार्केट डाऊन केले का दोघांचे..😬 जाऊ द्या आपण विषय बदलू..... समजा तुम्हाला एखादे असे ठिकाण सांगितले ... जिथे हिऱ्यांचा पाऊस पडतो तर....🤔 लगेच पोते घेऊन धावाल का...🕺🏾 मग जा युरेनस नेपच्यून वर..🥶 हो, तिथे हिऱ्यांचा पाऊस पडतो.. या ग्रहांच्या पोटातील, म्हणजे भूगर्भातील, हवेचे प्रेशर इतके प्रचंड आहे की त्यामुळे हायड्रोजन व कार्बनचे बंध तुटतात. परिणामी येथे भूगर्भात हिर्‍यांचा पाऊस पडतो. गेली हजारो वर्षे या ग्रहांच्या बर्फमय पृष्ठभागावर हिरे जमा होत आहेत. किती हिरे असतील तिथे.. 🤔 अहो नेपच्यूनचे वस्तुमान आपल्या पृथ्वीपेक्षा १७ पट तर युरेनसचे १५ पट आहे. म्हणजे त्यांच्या पोटात हिरेच हिरे.. 👻

वजन जरी जास्त असले तरी नेपच्यूनचा आकार युरेनसपेक्षा थोडासा कमी आहे. आपल्या सुर्यकुळातील ग्रहांचे वर्गीकरण करताना खडकाळ आणि वायूचे असे दोन प्रकार असतात.. बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ हे  खडकाचे ग्रह आहेत. आणि त्यात सर्वात मोठी आपली पृथ्वी आहे. गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे वायूचे बनलेले आहेत त्यात सर्वात लहान नेपच्यून आहे. मात्र तरीही त्याचा व्यास पृथ्वीपेक्षा चौपट जास्त आहे.

उघड्या डोळ्यांनी आकाशात पाच ग्रह दिसतात... त्यामुळे त्यांचे निरीक्षण हजारो वर्षे सुरू आहे. सगळ्या संस्कृती मध्ये देव दानव अशी यांची रूपे कल्पली आहेत. युरेनस नेपच्यून हे दोघे तर दुर्बीणचा शोध लागल्यावर आपले आहेत हे समजले.. जसे हिंदी सिनेमा मध्ये अचानक हीरोला कळते की अरे हा आपला भाऊ आहे... तसेच.. युरेनस तरी दुर्भिन नसली तरी तीक्ष्ण नजरेने, आणि अभ्यास असेल दिसू शकतो.. नेपच्यून अजिबात नाही..(सध्या युरेनस मेष राशीत दिसत आहे.. मेष राशीच चित्र घेऊन तुलना केली तर सापडेल.)

युरेनसपण एवढं पुसट पुसट दिसतो की त्यामुळे त्याच्यावर कुणाची नजर गेली नाही. सिंधू, चिनी, बॅबिलोनियन, ईजिप्शियन, ग्रीक, रोमन, माया, ईंका यापैकी कोणत्याच संस्कृतीला युरेनस व नेपच्यूनची माहिती नसावी, कारण कुठेच त्यांची नोंद नाही. अर्थात भक्त लोक ज्यांचा पुराणातील पुष्पक विमानावर विश्वास आहे, ते छातीठोक सांगतात की महाभारतात व्यासांनी यांचा उल्लेख श्वेत आणि  शाम ग्रह म्हणून केला आहे🤣🤣🤣 जाऊ द्या बोलू द्या.. अश्या लोकांचे लोक प्रतिनिधी तर इंटरनेट पण होते म्हणतात..🤣 त्यांच्यापुढे आपली सुमडी बरी😬😬😬🤣

भारतात युरेनस नेपच्यून यांना अनुक्रमे अरुण वरुण असे म्हणतात. मला तर ती नावे "जीवघेणी सभ्य" वाटतात (विजय बोले तो बिग बी, राहुल बोले तो शाहरुख वैसे अरुण बोले तो अमोल पालेकर)🥳 इंग्रजी नावे भारी आहेत.. युरेनस म्हणजे आकाशाचा देव तर नेपच्यून म्हणजे समुद्राचा देव..एका अर्थाने "अरुण वरुण" मॅच होते इथे.. (सुर्य आणि अरुण वेगळा झाला.. आमच्या बाईंनी तर हे समानार्थी शब्द शिकवले होते😬) अर्थात ही नावे गेल्या काही शतकात दिली गेली आहेत.. हे ग्रह महत्त्वाचे नसले तरी या ग्रहांचे शोध कसे मानवाने विज्ञानाच्या साह्याने कसे लावले हे  पाहणे महत्त्वाचे आहे. न्यूटनचे गणित असे सांगत होते की शनीच्या पलीकडे काही तरी आहे.. ज्याचा  प्रभाव शनीच्या गतीवर आहे.. नक्की काय ते मात्र माहीत नव्हते..  ते शोधून काढले हर्षेल ने..

सर विल्यम हर्षेल हा संगीतकार.. आणि हौशी आकाश निरिक्षक..  अवकाशातील मिथुन राशीजवळ डोळ्यांना अगदी जेमतेम दिसू शकेल अशी एक वस्तू भटकी असल्याचे त्याला दिसले.. इथे शक्यता होती की हा धूमकेतू किंवा ग्रह असावा. दिवस होता  १३ मार्च १७८१.. इंग्लंडच्या सोमरसेट मध्ये जिथे आता खगोलशास्त्राचे हर्शल संग्रहालय केले आहे.. ती हर्षेलच्या घराची बाग होती. तिथे हर्षेल आपल्या बहिणीसोबत आकाश निरीक्षण करत असे.. त्याने आधी धूमकेतू असल्याबाबत नोंद केली.

मात्र धूमकेतू असल्याची लक्षण त्याला पुढच्या काळात दिसली नाही तेव्हा त्याच्या लक्षात आले की हा तर ग्रह आहे..आपण हा धूमकेतू असल्या बाबत उगाच पूर्वग्रह बाळगला.😀 धूमकेतु सूर्याकडे जसाजसा जवळ येतो तशी त्याची तेजस्विता वाढत जाते आणि शेपूट लांब होत जाते. तसे इथे झाले नाही.. नक्कीच हा ग्रह असणार.. आपल्या सौरकुळात एक सातवा भाऊ सामील झाला.

ह्या नव्या ग्रहाचे नाव तेव्हाचा ब्रिटिश बादशहा तिसरा जॉर्ज याच्या नावावरून जॉर्जियम सायडस असावे असा प्रस्ताव हर्षेलने मांडला. पण आजवर ग्रहांना प्राचीन देवतांचे नाव देण्यात आले होते.. त्याचप्रकारे या ग्रहाचे नाव आकाशाचा देव युरेनस असे ठेवण्यात आले.  विज्ञान प्रेमी राजा तिसरा जॉर्जने हर्षेलची शाही खगोलशास्त्रज्ञ म्हणून नियुक्ती केली, राहायला बंगला दिला. आर्थिक चणचण गेली, संगीत थांबवून पूर्ण वेळ अवकाशाचा अभ्यास करून हर्षेलने खूप महत्त्वाच्या नोंदी केल्या आहेत. त्याने तयार केलेली २५०० खगोलीय वस्तूंची सूची खगोलशास्त्रज्ञ अजूनही उपयोग करतात.

हर्षेलने युरेनस शोधला आणि त्यानंतर १८४६ मध्ये लव्हेरेला नेपच्यूनचा शोध लागला असला तरी सुमारे दोनशे वर्ष आधी गॅलिलिओने गुरुच्या संशोधनाच्यावेळी आखलेल्या चित्रांकनांतील एका बिंदूत नेपच्यूनची कक्षा आढळते.. म्हणजे युरेनसआधी पुढच्या नेपच्यूनचा शोध लागला असता.. पण राहून गेला. युरेनस चा शोध लागल्यावर देखील न्यूटनचे गणित पूर्ण होत नव्हते.. म्हणजे पुढे अजून काही तरी असण्याची शक्यता होती. मात्र नेपच्यूनचा शोध लागला.. आणि न्यूटनबाबा खरे सांगत होता हे सिद्ध झाले.

न्यूटनच्या नियमानुसार गणित मांडून गुरू, शनि आणि सर्व ग्रहांच्या कक्षा आधीच ठरविल्या गेल्या होत्या. आणि त्याप्रमाणे कोणत्या वेळी गुरू किंवा शनि कोठे सापडेल ते अचूकपणे सांगता येत होते. पण युरेनस मात्र भलतीकडेच सापडायचा. गणित आणि नियम तर अचूक होता, मग चूक काय.. कोंडी निर्माण झाली.. जी फोडली जॉन अॅडम्स आणि जोसेफ लेव्हेरिए या गणितज्ञांनी..  दोघांनी अनेक वर्षे संशोधन करून निष्कर्ष काढला की युरेनसाला कोणीतरी खेचत असणार..  इथे कहाणीमध्ये ट्विस्ट आहे..

जॉन अॅडम्स हा ब्रिटिश अाणि लेव्हेरिए हा फ्रेंच होता. दोघे एकमेकांना ओळखत पण नव्हते आणि आपल्या प्रमाणे या विषयावर दुसरे कोणी काम करतंय याची कल्पना पण नव्हती.. (त्या काळात सोशल मीडिया पण नव्हता म्हणा😀) लेव्हेरिएचे गणित जमले.. मात्र फ्रान्स मधील खगोल शास्त्रज्ञांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मग त्यांनी जर्मनीच्या बर्लिन वेधशाळेकडे हे निष्कर्ष पाठवले. तिथे खगोलशास्त्रज्ञ जॉन गॉल यांनी दुर्भिण आकाशाकडे रोखल्यावर काही तासातच नवा ग्रह सापडला. न्यूटनबाबा जिंदाबाद..लेव्हेरिएची चिकाटी झिंदाबाद👍🏼

खरं तर जॉन अॅडम्सने लेव्हेरिएच्या एक वर्ष आधी गणित सोडवून भाकीत केले होते.. पण चिकाटी कमी पडली... त्याने आपले निष्कर्ष केंब्रिज वेधशाळेकडे पाठवले होते.. तिथे ह्याच्यापण निष्कर्षाना केराची टोपली दाखवली होती. लेव्हेरीएला जेव्हा ग्रह शोधण्याचा मान मिळाला तेव्हा अॅडम्सने थयथयाट केला.. त्याचे पण बरोबर.. अनेक वर्षांची मेहनत मातीत गेली..  हा फ्रेंचांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध मिळवलेला विजय आहे असे चित्र वर्तमानपत्रात जेव्हा निर्माण केले तेव्हा ब्रिटिश अस्मिता जागी झाली.. श्रेयवादाची निष्फळ रस्सीखेच झाली. मात्र पुढच्या पिढीतल्या शास्त्रज्ञांनी एडमच्या शोधाला श्रेय द्यायला हवे हे मानले.😍

अरुण वरुणच्या शोधांचा रोमांचक इतिहास आपण पाहिला.. आता एकेकाची माहिती घेऊ..युरेनस हा शनी प्रमाणे देखणी कडी असलेला ग्रह.. गुरू आणि नेपच्यूनला देखील धूसर कड्या आहेत बर का.. २७ उपग्रह असलेल्या युरेनसला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला ८४ वर्ष लागतात. बाकीचे सगळे ग्रह घड्याळाच्या उलट दिशेने फिरतात.. मात्र युरेनस एकटाच घड्याळाच्या दिशेने फिरतो.. युरेनस सव्वा सतरा तासात स्वतः भोवती आपली एक फेरी पूर्ण करतो.. 

खर तर त्याला फिरणे म्हणणे चूक.. बाकीचे ग्रह भोवऱ्या प्रमाणे फिरतात.. मात्र युरेनस हा लाडू सारखा गडगडतो. सोबतच्या चित्रात आपण सर्व ग्रहांचे फिरण्याचे अक्ष पाहू शकतो. आपली पृथ्वी अक्षाशी २३.४° कललेली आहे तर युरेनस ९८° ..  हा एकटाच गाडीच्या टायर प्रमाणे उभा फिरतो.. त्यामुळे त्याच्या ध्रुवीय भागात एक दिवस ४२ वर्षाचा असतो. सूर्यापासून हा २.९ अब्ज किमी लांब..

युरेनस हा प्रामुख्याने वायुने बनलेला आहे. याच्या वातावरणात ८३% हायड्रोजन, १५% हेलियम, २% मिथेन आहे.  बाकीचे घटक नगण्य.. किमान तापमान उणे २२४° सेल्सिअस आहे. व्हॉएजर २ हे अंतराळयान युरेनसपासून ८१८०० किलोमीटर  इतक्या अंतरावर २४ जानेवारी १९८६ रोजी पोहोचले त्यावेळी युरेनसचे हजारो फोटो काढण्यात  आले आहेत. त्याचे उपग्रह, भोवतालचे कडे, वातावरण, तसेच युरेनसभोवती असलेले चुंबकीय वातावरण ह्या सर्व गोष्टींबद्दल आपल्याला व्हॉएजर २ कडून माहिती मिळाली आहे.

व्होयाजर २ युरेनसला फ्लाइंग कीस देऊन तीन वर्षांनी नेपच्यून पर्यंत पोचले.नेपच्यून सूर्यापासून ४.५ अब्ज किमी दूर.. त्यामुळे त्याला सूर्याभोवती फिरायला तब्बल १६५ वर्ष लागतात.. तर स्वतःभोवती मात्र १६ तासात एक फेरी पूर्ण करतो.  नेपच्यून पहायचा असेल तर सध्या सुर्य मावळला की तुम्हाला तो पूर्वेकडे उगवताना दिसेल.. मात्र यासाठी तुमच्याकडे किमान २०० पट मोठे चित्र दाखवणारी दूर्भिण पाहिजे. (गॅलिलिओची केवळ ३२ पट चित्र दाखवणारी दूर्भिण असताना त्याने नेपच्यूनच्या नोंदी घेणे... simply great😘😘  किती एकाग्रता असेल) आकारमानाचा विचार केला तर नेपच्यून हा युरेनसचा जुळा भाऊ.. थोडाच लहान त्याच्यापेक्षा...

सूर्यापासून अतिशय दूर अंतरावर असल्याने तेथे कमालीची थंडी असणे साहजिक आहे.. मात्र युरेनसपेक्षा दीड अब्ज दूर असला तरी युरेनस एवढंच तापमान त्यावर असते साधारण उणे २१८°. कारण तेथील वातावरण मिथेन या हरितगृह वायूचे बनलेले आहे. हरितगृह वायू तापमान अडवून ठेवतात. नेपच्यूनचे  एकूण १४ उपग्रह सापडले आहेत. नेपच्यूनला देखील चुंबकीय क्षेत्र आहे. गुरूवर जसे लाल वादळ आहे तसे इथे पण प्रचंड मोठे वादळ सुरु असते... त्या वादळाच्या पोटात आपली अख्खी पृथ्वी बसेल एवढे मोठे... आणि वादळाचा स्पीड असतो २२०० किमी प्रतीतास.. आपल्या पृथ्वी वर १९७५ साली आलेले "निना" वादळ, ज्याची गती २५० किमी प्रतीतास पेक्षा कमी होती... त्याने सव्वा दोन लाख लोकांचा बळी घेतला होता.. कल्पना करा इथे काय होईल..

युरेनस मात्र शांत... त्याच्या चित्रपटात क्लायमॅक्स नाही.. रोली पोली खेळत फिरणे बस.. त्याला बोरिंग ग्रह सुद्धा म्हणतात.. (इथे पण अरूण नावाचे कनेक्शन जुळते राव) जून्या काळात युरेनस नेपच्यून यांची माहिती नव्हती म्हणून कुंडलीत जागा नव्हती त्यांना... आता आता जोतीषी घुसावयाला लागले आहेत कुंडलीत..कदाचित त्यांचा पण बाजार होईल.. आणि मूर्ख लोक त्याला पण बळी पडतील... खगोलशास्त्राच्या वृक्षावरील जोतिष शास्त्र हे बांडगुळ आहे.. 

शास्त्र बनते प्रयोग, निरीक्षण, अनुमान आणि प्रचिती याने... नेपच्यूनचा १८४६ शोध लागला तिथे तो पुन्हा एकदाच २०११ येऊ शकला आहे.. १६५ वर्षाचा फेरा करून... इथे प्रचिती तत्वाला उघड उघड हरताळ फासत आहेत जोतिशी.. प्रचिती म्हणजे काय हे आपल्याला न्युटन चे गणित शिकवते... युरेनस आणि नेपच्यून यांची माहिती रंजक नसली तरी त्यांचा शोध घेणं हे विज्ञानाचे, गणिताचे यश आहे..

जय न्यूटन, जय विज्ञान, जय गणित... ✊🏾 आणि आपल्या नकुल सहदेवाचा पण कधी तरी करा की राव जयजयकार... 😀😀

#richyabhau
#युरेनस, नेपच्यून

आपला ब्लॉग
 https://richyabhau.blogspot.com/

Comments

  1. खूप सुंदर आणि सोप्या भाषेत माहिती.. मी मुलांना सध्या याबद्दल च सांगतेय.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद.. मुलांपर्यंत माहिती पोचली तर जास्तच आनंद होतो

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव