दृष्टी तशी सृष्टी

दृष्टी तशी सृष्टी 




सूर्यग्रहण, चंद्रग्रहण का घडतात यामागचं कारण ठाऊक होत असल्यानं या खगोलीय घटनांमागची भीती कमी होत चालली आहे. विशेषतः सूर्यग्रहणामधील वेगवेगळ्या अवस्था पाहण्याचा आनंद आज सामान्य जनता देखील मोठ्या प्रमाणावर घेत आहे. आपल्याकडं असलेला एकुलता एक चंद्र, पृथ्वी आणि सूर्य आले तर ग्रहणं होतात. मग या सूर्यमालेत इतर ग्रहांना एकापेक्षा जास्त चंद्र आहेत, तिथं ग्रहण घडत असतील का? चला “हा खेळ सावल्यांचा” समजून घेऊ आपला शेजारचा मंगळ, त्याला दोन उपग्रह आहेत. त्यातील फोबोस तर मंगळाभोवती आपली प्रदक्षिणा अर्ध्या दिवसात पूर्ण करतो. दिवसातून दोन वेळा उगवतो, दोन वेळा मावळतो. मात्र त्याचा व्यास अवघा बावीस किलोमीटर असल्यामुळं, आपण जर मंगळावर असु तर केवळ कंकणाकृती सूर्यग्रहण पाहू शकू. 

वर म्हणल्याप्रमाणं त्याला उगवायची आणि मावळायची घाई असल्यामुळं हे ग्रहण अवघं तीस सेकंद टिकतं. त्याचा आकार लहान असल्यामुळं ग्रहण होण्याची शक्यता देखील कमी होत जाते. डीमोस हा मंगळाचा दुसरा उपग्रह तर खूपच लहान आहे, आणि तो दुरून फेरी मारत असल्यामुळं तो जरी सूर्याच्या आणि मंगळाच्या मध्ये आला तरी मंगळावरील अभ्यासकाला केवळ सूर्यामध्ये एक काळा ठिपका असल्याचं दिसेल. गुरूचे उपग्रह मात्र भरपूर मोठे आहेत. एकूण ९५ उपग्रह असलेल्या गुरूचे पाच उपग्रह एवढे मोठे आहेत की गुरुवरून पाहताना ते सूर्यबिंब पूर्णतः झाकू शकतील. 

१४६ उपग्रह असलेल्या शनिवर रोजच अनेक ग्रहणं पाहायला मिळू शकतील. शनिवर एकेक ऋतू सात वर्षांचा असतो. यातील विशिष्ठ ऋतुमध्ये ही ग्रहणं घडतात. शनिच्या पुढं असलेला युरेनस हा सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करताना फिरत नसतो, तर गडगडत असतो. त्याचा अक्ष ९८° ने कललेला आहे. त्यामुळे २८ उपग्रह असले तरी तिथं ग्रहण होण्याचा योग दुर्मिळ असतो. दर ४२ वर्षांनी जेव्हा तो संपात बिंदू अर्थात युनिनॉक्सपाशी असतो, तेव्हा तिथे ग्रहण घडू शकतं. २००८ मध्ये युरेनस या बिंदुपाशी येऊन गेला आहे, आता विरुद्ध बाजूच्या युनिनॉक्सपाशी २०५० मध्ये येईल. 

युरेनसचे बारा उपग्रह खग्रास सूर्यग्रहण करण्याएवढे मोठे आहेत. युरेनसच्या पुढे असलेला नेपच्यून सूर्यापासून खूपच दूर आहे. त्यातही त्याचा सर्वात मोठा उपग्रह, ट्रीटॉनची नेपच्यूनच्या भोवती फिरण्याची कक्षा २८° मध्ये झुकलेली आहे. म्हणून तो क्वचितच कधीतरी सूर्यबिंब ग्रासू शकतो. बुध आणि शुक्र यांना एकही उपग्रह नाही. त्यामुळं तिथं ग्रहण होत नाही. मात्र लाखो वर्षातून एकदा बुध, शुक्र आणि सूर्य हे अगदी अचुकरित्या एका रेषेत येतात आणि बुधची सावली शुक्रावर पडते आणि तिथं ग्रहण घडतं. पुराणकथांमध्ये शनि हा सूर्य आणि छायेचा मुलगा आहे. या मुलाच्या रंगावरूनच त्या दोघांचे भांडण झालं. तेव्हापासून सूर्य असेल तिथून छाया दूर जाऊ लागली. व्यक्ती जिथं जातो, त्याची सावली त्याच्या मागेमागे येते. आपण आपल्या सावलीपासून सुटका मिळवू शकत नाही. या विषयावर अनेक गाणी आणि अनेक म्हणी जन्माला आल्या आहेत.

जेव्हा आपण एखादी गोष्ट पाहतो, तेव्हा त्या गोष्टी निघालेला प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचलेला असतो. या प्रकाशामध्ये असलेल्या विविध तरंगलांबींसाठी आपल्या डोळ्यात विविध रिसेप्टर्स कार्यरत असतात, जे न्युरॉन्सच्या माध्यमातून आपल्या मेंदूला त्या वस्तूच्या आकाराची आणि रंगाची जाणीव करून देतात. मानवाला लाल, निळा आणि पिवळा तसेच या रंगातून तयार होणारे उपरंग आणि त्यांच्या छटा दिसतात. अनेक प्राण्यांना लाल किंवा इतर काही रंग दिसत नाही. आजमितीला अश्या अनेक प्रजाती आहेत, ज्यांना अजिबात दृष्टी नसते तरीही त्या सृष्टीत आपले अस्तित्व टिकवून राहिल्या आहेत.

मानवाच्या डोळ्यामध्ये मागील बाजूस रेटिना नावाचा एक पडदा असतो. त्यामध्ये न्युरॉन्सचे जाळे असते, जे समोरील चित्र मेंदूपर्यंत पोचवतात. चित्र साकारण्याचे काम रेटिनामधील रॉड आणि कोन या पेशी करत असतात. नावाप्रमाणे कोन पेशी शंकूच्या आकाराच्या तर रॉड पेशी दंडूक्याच्या आकाराच्या असतात. या दोन्ही पेशी प्रकाश आणि रंगांबाबत संवेदनशील असतात, मात्र रॉड पेशी प्रकाश तर कोन पेशी रंगांबाबत अधिक संवेदनशील असतात. दृष्टी पूर्ण होण्यासाठी या दोन्ही प्रकारच्या पेशी आवश्यक असतात. कोनपेशी केवळ उजेडात काम करू शकतात, म्हणूनच रात्रीच्या अंधारात आपल्याला रंग समजत नाहीत. रॉड पेशींची संख्या कोन पेशींपेक्षा जास्त असते, आणि या रात्रीदेखील काम करू शकतात. 

एका डोळ्यात ६० ते ७० लाख कोन पेशी असतात. रेटिनाच्या मध्यभागी या पेशींची घनता अधिक असते. रॉड पेशींची संख्या कोन पेशींपेक्षा पंधरापट अधिक असते. रेटिनाच्या परिघावर त्यांची संख्या जास्त असते. रंगांच्या विविध तरंगलांबीमुळे रंगांचे ज्ञान आपल्याला होतं. ही तरंगलांबी म्हणजे दोन तरंगांमध्ये असलेले अंतर. हे नॅनोमीटर या एककात मोजतात. नॅनोमीटर म्हणजे एका मीटरचा एक अब्जावा भाग! प्रकाशाची तरंगलांबी ३८० ते ७०० नॅनोमीटर असते. या प्रकाशात असलेले तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, पारवा, निळा आणि जांभळा हे सात रंग आपण प्रिझमच्या साह्याने किंवा इंद्रधनुष्यात पाहिले असतील. लाल रंगापेक्षा जास्त तरंगलांबी अवरक्त (इन्फ्रारेड) तर जांभळ्या रंगापेक्षा कमी तरंगलांबी असलेले रंग अतिनील (अल्ट्रा व्हायलेट) म्हणून ओळखले जातात. 

लाल रंगाची तरंगलांबी मोठी, ५६० नॅनोमीटरपेक्षा जास्त असते. हिरव्या रंगाची तरंगलांबी मध्यम, सुमारे ५३० नॅनोमीटर असते तर निळ्या रंगाची तरंगलांबी कमी ४३९ नॅनोमीटर असते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी प्रकाशकिरण अधिकाधिक अंतर पार करून आपल्यापर्यंत येत असतात, या प्रवासात कमी तरंगलांबी असलेले रंग विखुरले जातात, मात्र लाल रंगाची तरंगलांबी जास्त असते, त्यामुळेच सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी सूर्य आणि त्याच्या भवतालचे आकाश लालतांबडे दिसते. तरंगलांबी कमी असल्यामुळे निळ्या रंगाचे विखुरले जाण्याचे प्रमाण इतर रंगांपेक्षा सोळा पट अधिक असते, म्हणून आकाश तसेच समुद्राचे पाणी निळे दिसते. प्रकाशाच्या विकिरणावर संशोधन करून सी व्ही रामन यांनी रिसर्च पेपर प्रसिद्ध केला आणि त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. हा पेपर २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाला होता म्हणून हा दिवस भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. 

निळ्या, हिरव्या आणि लाल रंगांना प्रतिसाद देण्यासाठी अनुक्रमे स्मॉल, मिडीयम आणि लार्ज अश्या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या कोनपेशी असतात. म्हणजेच मानवाची रंगदृष्टी ट्रायक्रोमेटिक असते. अनेक प्राण्यांमध्ये केवळ डायक्रोमॅटिक रंगदृष्टी असते. तीनपैकी कोणत्याही एका प्रकारची कोनपेशी नसेल तर व्यक्ती त्या रंगाबाबत रंगांधळी असते.

रातांधळेपणा हा आजार मात्र व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे, मोतीबिंदू किंवा रक्तातील साखर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे होतो. पेशींमध्ये असलेल्या ऑपसीन या प्रथिनामुळे आपल्याला रंगांचे ज्ञान होते. एकाच वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या कोन पेशी त्यांचे काम करत असतात म्हणून आपल्याला या रंगांच्या विविध छटांचे देखील आकलन होते. 

अनेक चित्रपटांमध्ये असं दाखवलं जातं की लाल रंग पाहून बैल, रेडा इत्यादी प्राणी चवताळतात आणि हल्ला करण्यासाठी धावून येतात. मात्र त्यांना लाल रंग समजत नाही. केवळ कापडाची हालचाल त्यांना हल्ला करण्यास उद्युक्त करत असते. अनेक शहरांमधील इमारतींच्या जिन्यावर, किंवा प्रवेशद्वारापाशी लाल रंगाचे पाणी भरून बाटली ठेवलेली दिसते. याबद्दल विचारले असता “यामुळे कुत्री येत नाहीत” असे उत्तर मिळते. मात्र कुत्रांनादेखील लाल रंग समजत नाही, त्यासाठी आवश्यक असलेल्या कोनपेशी कुत्री, मांजरं यांना लाभलेली नसतात. 

फुलपाखरू आणि मधमाशा यांना अधिकाधिक परागकण मिळण्यासाठी, पक्षांना त्यांचे भक्ष्य मिळवण्यासाठी विशेष दृष्टी लाभली आहे ज्यामध्ये अतिनील तरंगलांबीतील रंग ते ओळखू शकतात. काही फुलपाखरांना तर सहा प्रकारचे रिसेप्टर्स लाभलेले असतात. कसले भारी ना!!

रंगाच्या बाबतीमध्ये स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक सक्षम असतात. मी साडीच्या रंगांबद्दल म्हणत नाहीये, तिथे तर चिंतामणी, अबोली, पिस्ता असे कधी न ऐकलेले रंग कानावर पडतात आणि पुरुषांना न्यूनगंड देऊन जातात. निसर्गाने स्त्रियांना पुरुषापेक्षा रंगांधळेपणाचा धोका कमी दिला आहे. एक्स गुणसूत्रात झालेल्या बिघाडामुळे रंगांधळेपणाचा आजार होऊ शकतो. पुरुषांमध्ये एक तर स्त्रियांमध्ये दोन एक्स गुणसूत्रे असतात, त्यामुळे एका गुणसूत्रात बिघाड झाला तरी स्त्रियांना दुसऱ्या गुणसूत्रामुळे रंगांधळेपणा टाळता येतो. पुरुषांकडे मात्र पर्याय नसतो. 

रंगांधळेपणाचा आजार असलेल्या पुरुषाकडून पुढच्या पिढीतील पुरुषाला हा आजार संक्रमित होत नाही, पुढच्या पिढीतील स्त्रियांमध्ये या आजाराचा केवळ कॅरिअर जात असतो, त्यांना आजार होत नाही. मात्र या स्त्रियांची पुढची पिढी जेव्हा जन्माला येते तेव्हा होणारे बाळ पुरुष असेल तर त्याला आईकडून मिळणारे एक्स गुणसूत्र रंगांधळेपणाचे कॅरिअर असण्याची आणि त्यामुळे आजार होण्याची शक्यता ५० टक्के असते. होणारे बाळ स्त्री असेल तर ती फक्त कॅरिअर होण्याची शक्यता ५० टक्के असते, तिला हा आजार टाळता येतो. म्हणूनच आज बारापैकी एका पुरुषाला रंगांधळेपणाशी लढावे लागत असताना स्त्रियांमध्ये हे प्रमाण दोनशेपैकी एक एवढे कमी आहे. 

म्हणजे निसर्गाने इथे स्त्रियांना झुकते माप दिले आहे. फक्त इथेच नाही तर आज माकडाच्या काही प्रजातीमधील नर डायक्रोमॅटिक असले तरी माद्या मात्र ट्रायक्रोमेटिक असतात. म्हणजे माद्यांना फळांचे अधिक रंग समजतात. निसर्गाने असा भेद केला आहे म्हणजे नक्कीच त्यामागे काही कारण असावे, कदाचित हा त्याचा मास्टरस्ट्रोक असावा!! 

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके

ऑनलाईन गणित शिकवणी