अलेक्झांडर फ्लेमिंग.. संजीवनी दाता

अलेक्झांडर फ्लेमिंग.. संजीवनी दाता
उत्क्रांती प्रक्रियेमध्ये मानव आणि जंतू (यात जीवाणू विषाणू सगळे आले बरं का.. शेवट पर्यंत हाच अर्थ घ्यावा) यांचा संघर्ष अविरत सुरू आहे. कोरोना विषाणूशी सुरू असलेला लढा आजच्या पिढी समोर आहे.. मात्र त्याआधीदेखील अनेक रोग आणि त्याचे जंतू यावर मानवाने विजय मिळवला आहे.. आजही जेव्हा आपले अंतरीक्ष यात्री पृथ्वीवर परतल्यावर त्यांची कसून तपासणी केली जाते.. नकळत आपल्याला माहीत नसलेला जंतू या पृथ्वीवर यायला नको म्हणून.. कारण असा जंतू आजार पसरायला लागला तर आपल्याकडे उत्तर नसेल..  

मानवाचा इतिहास हा प्रश्न पडणे आणि त्यावर उत्तर शोधायचा इतिहास आहे.. आजवर जे काही साध्य केले आहे ते चिकिस्तक वृत्तीच्या जोरावर....परिकथा किंवा पुराणकथांमधील चमत्कार केवळ घटकाभर करमणूक करू शकतात.. मात्र मानवाचे सुख दुःख, आजार यावर मानवालाच काम करावे लागले आहे.. आजवर, आणि पुढे ही..कोणताही देव धाऊन आला नाही. एकेकाळी जंतूसंसर्ग झाल्याने लाखो लोक मरत होते. त्यांच्यासाठी संजीवनी बुटी ज्याने आणली...तो अलेक्झांडर फ्लेमिंग हाच मानवासाठी देव.. 

स्कॉटलंड मध्ये एका छोट्या खेड्यात एका शेतकऱ्याच्या घरात ६ ऑगस्ट १८८१ रोजी अलेक्सने जन्म घेताना टाहो फोडला.. कदाचित हा माणूस आयुष्यात तेव्हाच एकदा रडला असेल.. कारण नंतर आयुष्यात कधीही न कुरकुरत आधी शिक्षण पूर्ण करून सैन्यात जाऊन देशाची सेवा केली.. आणि युद्ध संपल्यावर विज्ञानाला वाहून घेतले .. संपूर्ण मानवजातीला अशी देणगी देऊन गेला की पिढ्यान् पिढ्या त्याच्या ऋणी राहतील... अर्थात याने केलेल्या कामाची जाणीव असली तर...

अलेक्स.. एका शेतकऱ्याला दुसऱ्या बायको पासून झालेल्या चार पोरातला हा एक... पहिल्या बायकोपासून आधीच चार पोर होती.. आता एकूण आठ झाली..😬 घरात गरिबी पाचवीला पुजलेली.. शेजारीच असलेल्या आईच्या माहेरी पण तीच दैन्यावस्था..😔 (म्हणून तर २७ वर्षाची पोरगी ५९ वर्षाच्या बिजवराला दिली होती.. ३२ वर्षांचे अंतर होते राव त्यांच्यात😬) अलेक्स सात वर्षाचा असताना ७० वर्षाचे पप्पा "ऑफ" झाले.. आणि आई घराचा गाडा रेटू लागली..

श्रीमंत घरात जन्म घेतला तर अनेक बाबी उपलब्ध असतात.. गरीबाला मात्र  प्रत्येक बाबीत संघर्ष अटळ... अलेक्सला शिकत असताना शेतात काम करणे क्रमप्राप्त होते.. आई शिक्षणाबाबत आग्रही होती.. चांगले शिकायचे तर लंडनला गेले पाहिजे... आपल्या हुशारीच्या जोरावर १३ व्या वर्षी स्कॉलरशिप मिळवून अलेक्सने "डॉक्टर बनू पाहणाऱ्या मोठ्या भावासोबत" लंडन गाठले.. (एक दंतकथा पसरली आहे की विन्स्टन चर्चिल बुडत असताना अलेक्सने/ त्याच्या बापाने चर्चिल चा जीव वाचवला म्हणून चर्चिलच्या वडिलांनी अलेक्सला स्कॉलरशिप मिळवून दिली.. पण चर्चिल हा अलेक्सपेक्षा सात वर्षाने मोठा, तसेच अलेक्स चा बाप खूप आधी ऑफ.... त्यामुळे या दंतकथेला आधार नाही)

पुरेसे पैसे जमा करून पुढचे शिक्षण घ्यायचे होते, लंडनमध्ये शिकत असताना चार वर्ष शिपिंग ऑफिसमध्ये काम केले त्यात चुलत्याने मरताना अलेक्ससाठी काही पैसे सोडले...त्यामुळे चणचण मिटली.. मोठा भाऊ डॉक्टर झाला होता, म्हणून अलेक्सने तीच वाट धरली.. भाऊ जरी फिजिशियन असला तरी अलेक्सला मात्र सर्जन म्हणजे शल्यचिकित्सक व्हावयाचे होते.. १९०६ मध्ये सेंट मेरी वैद्यकीय महाविद्यालयामधून २५ वर्षाचा एमबीबीएस डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग पदवी घेऊन बाहेर पडला.. 🎓

पण त्याचे असे बाहेर पडणे  त्याच्या टीमच्या कॅप्टनला मंजूर नव्हते.. अलेक्झांडर हा मेडिकल कॉलेजमधील रायफल क्लबचा खेळाडू होता आणि क्लबच्या कॅप्टनला त्याला अजिबात सोडायचे नव्हते.... त्याने उपाय सुचवला.. की जर तू पुढे संशोधन करत इथेच राहिला तर तुला कॉलेज टीममधून खेळता येईल... तेव्हा त्यांच्या कॉलेजच्या रोगप्रतिबंधक विभागात 'अल्मरोथ राइट' हे शास्त्रज्ञ प्रतिकारक्षमता आणि जीवाणूशास्त्र यावर संशोधन करत होते.  "लस आणि रोगनिवारण" यावर त्यांचे काम पाहून अलेक्झांडरची खात्री झाली की जीवाणुशास्त्राच्या या नवीन क्षेत्रात जबरदस्त करीयर होऊ शकते.. 📕

पुढील दोन वर्षात विद्यापीठात पहिला येऊन, बेस्ट स्टूडेंटचे सुवर्ण पदक पटकावून अलेक्झांडरने जीवाणूशास्त्र विषयात पदवी पूर्ण केली.. परिणामी त्याला पुढे सहा वर्ष (पहिले महायुध्द सुरू होईपर्यंत) त्याच महाविद्यालयात शिकवण्याची संधी मिळाली.. शिकवत असताना आणि रोग्यांवर उपचार करत असताना अलेक्झांडरला असे आढळले की, कित्येक रोगी औषधोपचार सुरू नसताना देखील बरे होत असतात. म्हणजेच माणसाच्या शरीरात काही नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती असते.. ती कशात असावी याचे कोडे सोडवायचा प्रयत्न सुरू झाला..  लोकांचे लाळ, शेंबूड यांचे नमुने घेणे सुरू झाले😀😀😀


त्याने "जखमा बऱ्या करण्यासाठी अँटीसेप्टिकचा वापर" यावर प्रयोग केले. जखमा धुण्यासाठी सलाईन द्रव्याचा वापर करायला सुचवले. १९१४ साली पहिले महायुद्ध झाले आणि त्याची नेमणूक लेफ्टनंट पदावर सैन्यात करण्यात आली..तिथं सैनिकांवर उपचार करताना त्याचे संशोधन देखील सुरूच होते.. १९१७ साली त्याची कॅप्टन पदावर पदोन्नती झाली... १९१८ साली युद्ध संपले आणि अलेक्झांडर सेंट मेरी वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा व्याख्याता म्हणून रुजू झाला.


युध्दकाळात त्याला आढळले की जखमी सैन्य सेप्टिक होऊन जेवढे मरतात त्यापेक्षा जास्त अँटीसेप्टिकचा वापर झाल्याने मरतात. त्या काळात अँटीसेप्टिक म्हणून बोरिक अॅसिड पावडर, कार्बॉलिक अाम्ल, हायड्रोजन पेरॉक्साईड ही रसायने मोठ्या प्रमाणात वापरली जायची. जखमावर ही साधने टाकली की आजूबाजूच्या पांढऱ्या पेशीदेखील( सैनिकांच्या सैनिक पेशी 🤔) मारल्या जायच्या. त्यामुळे सैनिकांची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन मृत्यु ओढवला जायचा. म्हणून या पांढऱ्या पेशींसारख्या घटकांवर दुष्परिणाम न करता केवळ जीवाणू नष्ट करतील अशा घटकांचा शोध अलेक्झांडरने सुरू केला. 

सर्दी झालेल्या व्यक्तीच्या नाकातील स्रावात असलेला "मायक्रोकॉकस ल्युटस" हा जीवाणू अलेक्झांडरने प्रयोगशाळेत एका बशीत वाढवला. या बशीतील जीवाणूंच्या वाढीचे निरीक्षण करत असताना एक दिवस अलेक्झांडरच्या नाकातील शेंबूड त्यात पडला. (मला माहित आहे त्याने मुद्दाम पाडला..😂) मात्र जिथे शेंबूड पडला तिथे बशीमधील जीवाणूंच्या वसाहती  नष्ट झाल्या. याला पण युरेकाछाप आनंद वगैरे झाला. मात्र इथेच न थांबता त्याने रक्तद्रव्य, लाळ, अश्रू यांच्यावर देखील प्रयोग करून पाहिले. 

बशीत ज्या ठिकाणी या स्रावांचा थेंब पडत असे तिथे जीवाणूंची वाढ रोखली जात असल्याचे आढळून आले. रक्त, अश्रू, शेंबूड, लाळ या सर्व प्रकारच्या स्रावांमधे एक समाईक घटक आढळला. तो घटक म्हणजे "लायसोझाईम" नावाचे संप्रेरक. काही आजारावर उपयोगी होत असले तरी लवकरच या संप्रेरकाच्या मर्यादा अलेक्झांडरच्या लक्षात आल्या..(मर्यादा समजणे आणि मान्य करणे हाच तर विज्ञानाचा मोठेपणा.. अध्यात्माला मर्यादा मान्य नसतात..  "विज्ञान आणि अध्यात्म" या आगामी प्रकाशित न होणाऱ्या पुस्तकातून😂) अनेक प्रकारचे जीवाणू लायसोझाइम सोबतची लढाई जिंकत होते.. प्रयोग जरी केवळ अंशतःच यशस्वी झाला असला तरी पुढील संशोधनाला दिशा मिळाली होती.
१९२८ साली पदोन्नती होऊन फ्लेमिंग सर आता प्राध्यापक झाले होते. फ्लेमिंगने एकदा एका बशीत जीवाणूंचे कल्चर तयार केले होते. मात्र घरी जातांना ती बशी धुवायचे राहून गेले. (आजकाल जे काही शोध लागले त्यामागे आळस हीच आदिम प्रेरणा होती.. माझ्या बायकोला कुणी सांगा हे.. 😬😀) तिथून फ्लेमिंग थेट स्कॉटलंडला गेले होते सुट्टी घालवायला.... परतल्यावर त्यांची नजर त्या बशीवर गेली. तिला बुरशी लागली होती. त्यांना दिसले की बशीच्या ज्या भागात बुरशी होती त्याच्याभोवताली जीवाणू अजिबात दिसत नव्हते. इतरत्र मात्र ते मोठ्या संख्येने होते. याचा अर्थ स्पष्ट होता. त्या बुरशीतून जे काही बाहेर पडत होते त्यामुळे त्याच्या बाजूचे जीवाणू मारले जात होते.

बुरशीतल्या ज्या घटकांमुळे "स्टॅफिलोकॉकस ऑरास" या जीवाणूच्या पेशी नष्ट झाल्या होत्या त्याला "Penicillium" अर्थात "रंगकामाचा ब्रश" असे नाव दिले. पेनिसिलीन शुद्ध स्वरूपात मिळवण्यासाठी तसेच त्याचे गुणधर्म टिकून रहावेत यासाठी फ्लेमिंगने खूप अयशस्वी प्रयोग केले. वाटते तितके हे काम सोपे नव्हते. त्यासाठी फ्लेमिंग तब्बल १२ वर्षे झटत होते. नंतर त्यांना कळून चुकले एकट्याचे काम नाही.. मदत घ्यावी लागेल..

फ्लेमिंगनी हे निरीक्षण आपल्या सहकाऱ्यांना दाखवले, पण त्यांना अगदीच थंड प्रतिसाद मिळाला. कारण त्याआधी "लायसोझाईमचा शो" फ्लॉप झाला होता.. मात्र ऑक्सफर्ड विद्यापीठातील हॉवर्ड फ्लोरी नावाचा वल्ली संशोधक होता.१९३८ मध्ये त्यांच्या वाचनात फ्लेमिंगचे संशोधन आले आणि त्यांनी ते पुढे नेण्याचा चंग बांधला. एर्न्स्ट चेन आणि हिटली हे त्यांचे सहकारी.. या तिघांनी त्यांच्या इतर सहकार्यासोबत पेनिसिलीन शुद्ध स्वरूपात मिळवण्यात यश मिळवले.. अमेरिकेच्या रॉकफेलर फाउंडेशनने यासाठी आर्थिक मदत केली होती.

कुठलेही औषध, लस बाजारात आणायचे असेल तर आधी चाचण्या घ्याव्या लागतात हे आपल्याला ठाऊक.. पेनिसिलीनची चाचणी अनेक वेळा विविध प्राण्यांवर अयशस्वी झाली.. मात्र जेव्हा जंतुसंसर्ग झालेल्या उंदरांवर करण्यात आली तेव्हा यश मिळाले.. आता मानव वंशावर चाचणी करण्यात हरकत नव्हती. आणि गम्मत म्हणजे मानवावर केलेली पहिली चाचणी यशस्वी झाली मात्र रुग्ण मेला..🤔 रुग्ण मेला कारण सर्व तयार पेनिसिलीन संपले होते..

त्या काळात जंतुसंसर्गावर कुठलेही खात्रीशीर औषध नव्हते.. त्यामुळे दाढी करताना खरचटणे, धडपडणे किंवा काटा टोचून झालेल्या जखमेत सुद्धा जंतुसंसर्ग होऊन माणसे दगावायची. १९४० च्या सप्टेंबर मध्ये चाचणीसाठी पहिला रुग्ण मिळाला. एका पोलिसाला गुलाबांच्या काट्यांमुळे चेहऱ्याला जोरात खरचटले. त्या जखमेतून  जंतुसंसर्ग होऊन डोळे व डोक्याच्या त्वचेपर्यंत पसरला.. संसर्ग अधिक वाढत जाऊन रुग्णाच्या डोळे, फुफ्फुस व खांद्यामध्ये सेप्टिक झाले होते. ही केस आली तेव्हा संशोधकांकडे थोडेसेच शुद्ध पेनिसिलिन इंजेक्शनच्या रुपात उपलब्ध होते. ५ दिवस ही इंजेक्शन्स दिल्यावर तो सुधारू लागला. पण दुर्दैवाने पेनिसिलिन संपले. त्यामुळे ही चाचणी थोडी यशस्वी होऊनही तो रुग्ण मरण पावला. 

पेनिसिलीनची उपयुक्तता लक्षात आली .. मात्र उत्पादकतेचे काय. ज्या बुरशीच्या जातीपासून  पेनिसिलिन मिळवले होते,ती जात मोठ्या प्रमाणात हे औषध देऊ शकत नव्हती. यावेळी कामाला आले टरबूज..🍉 (मामु नाय हो.. तो काहीच कामाचा नाही) झाले असे की या टीमची सहायक एक भलेमोठे टरबूज बाजारातून घेऊन आली होती दुपारी खायला. आधी टरबूजाच्या आकारावरून पांचट हास्यविनोद झाले. आणि अचानक टरबूजाला लागलेली सोनेरी रंगाची बुरशी दिसली..  मग काय, टरबूज ठेवले बाजूला..  आणि वेळ🕙 ना दवडता सर्व संशोधकवाघांनी काम हातात 👋🏽  घेतले.🥳 प्रयोगांती असे दिसले की बुरशीची ही वेगळी जात थोडे जनुकीय बदल करून पहिल्या जातीपेक्षा १००० पट जास्त पेनिसिलिन देऊ शकत होती. आता जगाचा इतिहास बदलणार होता.. 

असे म्हणतात की अमेरिकेने अणुबॉम्ब टाकून महायुद्ध संपवले. मात्र जर्मनीला हात टेकायला लावण्यात पेनिसिलीनची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. फ्रान्सच्या किनाऱ्यावर फौजा उतरवण्यापूर्वी ब्रिटिशांनी पेनिसिलिनचा भरपूर साठा करून ठेवलेला होता.  जर्मनीतल्या वाढत्या नाझीवादास कंटाळून पळून आलेले एर्न्स्ट चेन हेच जर्मनीच्या नाशाला कारणीभूत ठरले..😍 जर्मनीचा पाडाव होण्यापूर्वी पेनिसिलिनने हजारो ब्रिटिश सैनिकांचे प्राण वाचवले.

केवळ सैनिक नाही तर सर्वच मानव वंशाचे सरासरी आयुष्य वाढवण्यामागे प्रतिजैविकांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रतिजैविक येण्याआधी सरासरी आयुष्य ५० वर्षांपेक्षा कमी होते. जे आता प्रतिजैविकांचा वापर सुरू झाल्यानंतर सत्तरच्या वर गेले आहे. लहान मोठी कुठलीही शस्त्रक्रिया करताना झालेल्या जखमेत जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून प्रतिजैविके आवश्यक आहेत. त्यामुळे जेव्हा कधी ऑपरेशन किंवा अँटीबायोटिक हे शब्द ऐकताल तेव्हा फ्लेमिंग, फ्लॉरी, चेन आणि त्यांच्या हिटली नावाच्या सहकाऱ्याला देखील धन्यवाद द्या...  

१९४५ साली फ्लेमिंग, फ्लॉरी आणि चेन या तिघांना नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. नोबेल साठी तीनच नावे असतात नाहीतर हिटली देखील तेवढाच लायक होता. नोबेल स्वीकारताना फ्लेमिंगने केलेले भाषण किती दूरदर्शी होते याचा आज प्रत्यय येतो. प्रतिजैविकाचा अतिवापर झाल्यास संबंधित जंतूमध्ये जनुकीय बदल होऊ लागतात आणि मग त्यांच्या पुढच्या पिढ्या या औषधाला दाद देइनाश्या होतात.. प्रतिजैविकांचा अनावश्यक मारा चालू राहिला तर असा जंतू तयार होईल ज्याचा इलाज आपल्याकडे नसेल हे फ्लेमिंगने आधीच सांगितले होते.

आपण अधिक strong प्रती जैविक बनवली तर जंतूंची पण अधिक strong पिढी जन्माला येते... हा उत्क्रांतीचा सिद्धांत आहे. त्यांच्या पण अस्तित्वाची लढाई असते म्हणा. अगदी कोरोनाचा विषाणू देखील सहा महिन्यात रूप बदलताना आपण पाहिला आहे. पेनिसिलीनची मर्यादा दहा वर्षातच दिसून आली होती. एका विशिष्ठ प्रकारचे जंतू पेनिसिलिनला अजिबात दाद देत नव्हते म्हणून त्यांचा अभ्यास करण्यात आला. तेव्हा असे दिसले की ते जंतू पेनिसिलिनला नष्ट करणारे संप्रेरक सोडत होते... मग लगेच गरज बनली अधिक strong प्रतिजैविक बनवायची.. हेच चक्र सुरू आहे.. सुरूच राहणार... आपले आणि जंतूचे नाते कायम असेच🥶

आपल्याला अभिमानाची गोष्ट म्हणजे टेट्रासाइकलिन गटातील प्रतिजैविक भारतीय शास्त्रज्ञ डॉ. येल्लप्रगडा सुब्बारावांनी शोधून काढली. टेट्रासाइकलिन ही पेनिसिलिनपेक्षा बहुआयामी तर होतीच, पण अनेक प्रकारच्या रोगांवर जालीम उपाय म्हणून वापरता येऊ लागली. बाकी भारतात गरिबांना परवडणारी प्रतिजैविके बनवणारी हिंदुस्तान अँटीबायोटिक ही कंपनी पंडित नेहरूंच्या काळात स्थापन झाली होती.. तिची अलीकडच्या शासनकर्त्या लोकांनी वाट लावली आहे. आतातर आपण गोमूत्र आणि शेन यापलिकडे संशोधन करत आहे की नाही असा संशय येतो. (नाही म्हणायला सिरम ही खासगी कंपनी देशाची लाज  पाहत आहे.) "राजा कालस्य कारणम"  जसे शासन कर्ते.. तसा समाज घडतो.

फ्लेमिंगने तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिलचा जीव म्हातारपणी देखील वाचवला अशी अफवा आहे.. खर तर चर्चिलला न्युमोनिया झाला होता, फ्लेमिंगचा काही संबंध आला नाही. चर्चिलने फ्लेमिंगच्या कामाचा आदर राखत यथोचित सन्मान केला.. सर पदवी देखील फ्लेमिंगला प्रदान करण्यात आली.. मात्र प्रसिध्दी किंवा संपत्तीचा फ्लेमिंगला कधीच सोस नव्हता. तब्बल तीस यूरोपीय आणि अमेरिकन विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट दिली आहे.  अमेरिकेत फ्लेमिंगला दिलेली १ लाख डॉलरची गौरवरक्कम त्यांनी सेंट मेरी वैद्यकीय महाविद्यालयाला जशीच्या तशी देऊन टाकली होती.😍
आयुष्यभर जंतुमध्ये राहिलेले फ्लेमिंग सदैव हसरे.. १९१५ मध्ये सहकारी नर्स "सारा" सोबत लग्न झाले.. एकुलता एक मुलगा "रॉबर्ट" डॉक्टर झाला.. उतारवयात बायको मेली त्यामुळे ७२ व्या वर्षी ४१ वर्षाच्या सहकारी डॉ. अमालीयासोबत दुसरे लग्न केले.(मात्र बापाप्रमाने पोरांची गॅंग नव्हती ह्याची) तरीही त्यांचे वैयक्तिक आयुष्य अतिशय चाकोरीबद्ध... कुठे वादात पडायचे नाही.. शिकवायचे, संशोधन करायचे आणि आनंदी राहायचे बस... मज्जानू लाईफ😀😀 

लाखो लोकांचे प्राण वाचवून आणि ७४ वर्षाचे कृतार्थ आयुष्य जगून १९५५ हा संजीवनी दाता काळात विलीन झाला.. शेवट पर्यंत संशोधन आणि लिखाण सुरूच होते त्यांचे.. मला त्यांच्यात एक आदर्श शास्त्रज्ञ दिसतो... कारण त्यांना स्वतच्या मर्यादा माहीत होत्या.. त्यांच्यात नम्रता होती अट्टाहास नव्हता... या विज्ञानाच्या उपासकाला सलाम..जग जिंकायला निघालेल्या अलेक्झांडर ला लोक विसरतील कदाचित पण अलेक्झांडर फ्लेमिंग हे नाव अजरामर राहिल..

#richyabhau
#fleming

आपला ब्लॉग http://richyabhau.blogspot.com/

Comments

  1. सुंदर माहिती

    ReplyDelete
  2. This is an amazing blog and excellent information. Fantastic work, tons of thanks to you... Keep it up

    ReplyDelete
  3. " याला पण युरेकाछाप आनंद वगैरे झाला" --
    हे कसं काय जमतं बुआ तुम्हाला?
    पहिले तर लेख अतिशय आवडला. माहितीपूर्ण आणि रंजक.
    शिवाय ज्या पद्धतीने तुम्ही मांडला आहे तेही मजेशीर आणि छान .
    अजून एक म्हणजे मराठी भाषा वापरली आहे.. उत्तम !

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks 😍🙏 लिखाणातील भाषेबद्दल बोलाल तर ती माझी नैसर्गिक शैली आहे.. त्यामुळे ताकद पण तीच आहे आणि मर्यादा पण☺️

      Delete
  4. जितका हा इतिहास वैभवशाली आहे तितकीच लिखाणाची शैली देखील वैभवशाली आहे. मस्त जमतंय भाऊ. असाच चालू दे.

    ReplyDelete
  5. रिच्या भाऊ, लेख एक नंबर! अजून अनेक शास्त्रज्ञ वाट पहात आहेत. तुम्ही त्यांच्यावर कधी लेख लिहितेय याची.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव