⌛अपना टाइम आएगा..🕰️

⌛अपना टाइम आएगा..🕰️
"कालाय तस्मै नमः" आजवर  भर्तृहरीचे हे वचन आजवर केवळ "वक्त ने किया क्या हसिं सितम" चे रडगाणे ऐकावयाला वापरलेले पाहिले.. पण खरच त्यावर कधी जास्त विचार नव्हता केला.. कधी वर्गात बोअरिंग लेक्चर सुरू असेल तेव्हा वेळ जाता जात नाही.. मात्र खास व्यक्तीचे हात हातात घेऊन बसलो असलो तर वेळ कसा भूर्रर उडून जातो.. हा वेळ खरच खूप जादूगार आहे राव.. 

परवा एफबी साथी आरजे शीतल पाटील यांच्यासोबत घड्याळाची माहिती शेअर करताना वाटले  किती रंजक माहिती दडली आहे कालमापणाच्या इतिहासात.. आदीम काळापासून मानवाला वेळेची किंमत असणारच.. कारण सूर्यप्रकाश हाच प्रकाशाचा एकमेव स्त्रोत तेव्हा असणार.. मात्र तेव्हा त्या मानवाला भूक लागली की खायचे आणि झोप लागली की झोपायचे नाटक एवढेच काम ( पुलंच्या तुझे आहे तुजपाशी मधले काकाजी आठवले राव) तो एक काळ होता आणि आजचा हा काळ.. कालाय तस्मै नमः.. काळाला वंदन केलेच पाहिजे

घड्याळ हे आजमितीला मानवाच्या हाताला नाही तर नशिबाला बांधले आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.. त्यातही मुंबई पुण्यासारख्या महानगरात राहायचे म्हणले की आयुष्यभर घोड्या सारखे धावणे आलेच. इतर शहरे पण त्याच मार्गावर आहेत. पण मुंबईने तर मानवाचा यंत्रमानव करून सोडला आहे. मुंबई मध्ये १०.२३ म्हणजे १०.२३ असते.. एक मिनिट सुद्धा इकडे तिकडे नाही राव.. बाकी इतर ठिकाणी आम्ही इं स्टँ टा ची यथेच्छ खिल्ली उडवत तासाभरचा उशीर "जरासा" म्हणून ढकलत असतो😀😀

खरं तर घड्याळ आपल्या सर्वांच्या शरीरात देखील असते.. भूक, झोप या बाबी घरातले  घड्याळ बंद असले तरी वेळेवर होतात. घड्याळाचा गजर झाला नाही तरी पक्षी कुजनाने आपल्याला जाग येतेच (अर्थात उठायचे असेल तर) मात्र तरीही घड्याळाचा कर्कश्य गजर वयाच्या तिसऱ्या चौथ्या वर्षापासून सुरू होतो तो निवृत्त होई पर्यंत. सकाळी जोरात पळून लेट मार्क लावणारे घड्याळ ऑफिस सुटायच्या वेळी घडीयाल (मगर) बनते.. आणि सगळ्या स्टाफ ची नजर खेचनारी प्रेक्षणीय वस्तू😀

घड्याळासाठी असलेला क्लॉक हा शब्द लॅटीन शब्द "क्लोक्का" पासून घेतला आहे. त्याचा अर्थ होतो “घंटी” दर तासाला ते घंटी वाजवायचे म्हणून क्लोक्का.. आपल्या हिंदीत देखील घंटा हा शब्द असाच आला आहे. दिवस/रात्री या दोन चक्रांमध्ये २४ तास वाटले गेले.  घटिका पात्राचा उपयोग  करून घटिका मोजल्या जायच्या.. त्या घटिकेला कधी तासले काय माहित. मिनिट आणि सेकंदाला मात्र आपण दत्तक घेताना नाव नाही बदलले.

पृथ्वीचे स्वतः भोवती फिरणे २३ तास आणि ५६ मिनिटात पूर्ण होत आहे.. "होत आहे" म्हणजे या काळात.. जसजसे वय वाढत जाईल तसतसे तिला जास्त वेळ लागेल..अर्थात आपल्या हयाती मध्ये नाही कळणार.. लाखो वर्षांनी कळेल.. लाखो वर्ष आधी अर्थात कमी वेळ लागत होता... तेव्हा पोरं वयात होती.. आता वयात आली आहे.. नंतर म्हातारी होईल😁😁

एक तास ६० मिनिट.. ३६०० सेकंद हे आपल्याला माहीत. पण सर्वात आधी तास म्हणजे अमुक कालावधी हे ठरवण्यात आले. नंतर त्याचे ६०x६० तुकडे केले आहेत. तासाचा कालावधी सर्व प्रथम इजिप्तच्या लोकांनी निर्धारित केला. त्याकाळात दशमान पद्धत नव्हती तर १२ ला महत्त्व होते.. इजिप्त मध्ये १२ तासाचा दिवस आणि १२ तासाची रात्र असावी या हिशोबाने सूर्योदय ते पुढचा सूर्योदय हा कालावधी २४ भागांमध्ये विभागला.
आपल्या वेदात तर सगळे आधीच असते हे तुम्हाला माहीत😀 एकदा वैदिक व वैज्ञानिक आधारे कालगणना व त्याच्या विविध पैलूंवर चर्चा यावर परिषद भरली असता आपले लाडके एपीजे म्हणाले होते की वाल्मीकी रामायणातील स्थितीवर आधारित कालगणना अचूक होती आणि रामसेतूचे अस्तित्व हे अमेरिकेतील अनुसंधान केंद्र ‘नासा’ने देखील मान्य केले आहे. (अर्थात नासा ने हे नाकारले आहे😭) आपल्याकडे भागवत पुराणामध्ये कालगणना अतिशय  विनोदी दिली आहे. शकुंतलादेवीचा मेंदू हँग करेल एवढे मोठे आकडे... शब्दाचे बुडबुडे सोडायला काय जाते म्हणा.

मात्र वेदामध्ये एक छान कथा आहे.. आधी या पृथ्वीवर केवळ दिवसच होता, रात्र नव्हती. त्यामुळे दिवस संपायचा नाहीच कधी...एकदा  यमीचा भाऊ मेला.. यमी खूप रडली तिने असा टाहो फोडला की देवांचे जगणे मुश्किल झाले.. देव सांत्वन करायचे तर यमी म्हणायची.. आज माझा भाऊ मेला. रडू नको तर काय करू.  मग देवांनी विचार करून काळाचे लग्न दिशांसोबत लावले.. त्यामुळे रात्र तयार झाली. रात्रीमागून दिवस व दिवसांमागून रात्री गेल्या व यमी भावाचे दु:ख विसरली.😀 मात्र त्या दिवसापासून दुःख पण क्षणभंगुर झाले आणि सुख पण 🤔 हे चांगले झाले का वाईट.. काल्पनिक असली तरी ही कथा तत्वज्ञानाचा विषय आहे.
सूर्यप्रकाशात वस्तूची पडणारी लहान मोठी सावली कालमापन करण्यासाठी उपयोगात आणण्याची कल्पना मनुष्याला प्रथम किमान ५५०० वर्षांपूर्वी सुचली असावी. आहाझचें सन-डायल याचा उल्लेख जुन्या करारात असल्याचे दिसून येते.. . ईजिप्तमधील प्रख्यात पिरॅमिड मध्ये देखील सनडायल सदृश्य कालमापक यंत्र म्हणून वापरले आहे. पण सन-डायल च्या साह्याने अचूक कालमापन करण्याचे श्रेय खाल्डियन खगोलशास्त्रज्ञ बेरोसूस यांना जाते. ख्रि.पू. ५४० च्या सुमारास त्याने बनवलेली तबकडी बऱ्यापैकी अचूक कालमापन करत असे. भारतात देखील सुर्य तबकडी चा उपयोग केलेल्याचे पुरावे आहेत.
सूर्य तबकडीचा वापर करताना अर्थात मर्यादा होत्या..रात्री तिचा वापर करू शकत नव्हतो..खगोल शास्त्रज्ञ आकाशातील नक्षत्रांची स्थिती पाहून वेळ ठरवू लागले. इथे पण ढगाळ वातावरण मर्यादा घालत होते. मग पाण्यावरच घड्याळ शोधायचे प्रयत्न झाले.. जसे आपण वाळूचे घड्याळ पाहतो ना .. तसेच.. एका भांड्यात रेषा मारलेल्या असणार.. त्या भांड्याला एक सूक्ष्म छिद्र असणार ज्यातून थेंब थेंब पाणी पडणार.. पाण्याची जेवढी पातळी कमी झाली तेवढा वेळ झाला...असे सोपे...सर्वात जुने जलघड्याळ इजिप्तच्या प्रसिद्ध फारोहच्या कबरीमध्ये सापडले आहे ज्याचा काळ ३६०० वर्ष जुना आहे.🙄
विज्ञानाच्या प्रगतीत सर्वात मोठा टप्पा चाकाचा शोध हा आहे... मानवाचे काम खूप सुलभ झाले त्यामुळे.. गाडी, जाते, रहाट, चरखा अशा प्रकारच्या अनेक यंत्रांत फिरणाऱ्या चाकाचा उपयोग मानवाने केला. गियरची कल्पना विकसित झाल्यावर गती आणि दिशा दोन्ही बदलणे शक्य झाले. पाणी आणि गियर चा वापर करून चीन मध्ये घड्याळ तयार करण्यात आले.या आधी जलघड्याळ म्हणजे पाणी किती गळले यावर आधारित यंत्र..मात्र आठव्या शतकात चीनच्या यी झिंग या गणीतज्ञाने आठव्या शतकात गियरचा वापर करून असे घड्याळ बनवले जे २४ तासाचे चक्र अचूक सांगू शकेल.. पाण्याची धार सोन्याच्या गियर वर अश्या प्रमाणात सोडणार की  दर पंधरा मिनिटांनी ढोल वाजणार आणि दर एक तासाने बेल खणाननार..
बाराव्या शतकात झालेला संशोधक अल जहरी याने अनेक घड्याळे बनवली.. त्यातील हत्ती घड्याळ हे अतिशय कलात्मक आहे. हत्तीच्या डोक्यावर माहूत आणि अंबारी .. अंबारीत महाराज बसले आहेत. अंबारीवर एक पाण्याची छोटी टाकी ज्यातून पानी सापावर पडते.. ठराविक प्रमाण झाले की साप ते पाणी माहूत पर्यंत पोचवतो.. आणि माहूत ढोल वाजवतो तेव्हा अर्धा तास झालेला असतो... अद्भुत ना..

स्थितिज ऊर्जा आणि गियरचा वापर करून फिरणारे काटे बनवण्याची कल्पना एका अवलियाला सुचली.. सुमारे सातशे वर्षांपूर्वी....  हेनरी डि विक नावाच्या कारागिराने फ्रान्सचा राजा पाचवा हेनरी याच्याकरिता गियर चा वापर करून घड्याळ बनवले होते.(अर्थात विकने राजाला ते विकले की फुकट दिले काय माहीत 😂)

विकने बनवलेले हे घड्याळ १३६८ सालच्या सुमारास राजवाडयाच्या टॉवरवर बसविण्यात आले. या घड्याळात केवळ तास काटा होता बरं का.. हा काटा फिरवण्यासाठी सिलेंडरभोवती दोर गुंडाळून दोराच्या टोकाला जड वजन बांधले होते. खाली पडणाऱ्या वजनामुळे सिलेंडरची फिरण्याची गती वाढत होती. ही गती नियंत्रित करून त्याला बरोबर तासाच्या गणितात बसवण्यासाठी  गियर वापरले होते. सिलेंडरची गती गियर साखळ्यातून जाऊन तासकाटयाला मिळायची. त्यामुळे तासाचा काटा फिरत असे. रोज सकाळी तो दोरा एकदा गुंडाळला की दिवसभर हे घड्याळ चाले.
गियर साखळी चालताना येणाऱ्या आवाजामुळे घड्याळाची ‘टिकटिक’ सुरू झाली. आणि पुढे मानवाची कल्पकता...मिनिट काटा जोडला गेला, दर अर्ध्यातासाला टोले वाजवणारी घंटा पण बनवण्यात आली. कुणा रसिक संशोधकाने घंटेच्या काहीश्या कर्कश्य आवाजाला "कुकू" चा गोडवा दिला. मग तर काय आपल्या घरात पण कुकू क्लॉक पाहिजेच असा लाडिक बालहट्ट आणि स्त्री हट्ट सुरू झाला.. 😭

बालहट्ट मोडता येतो पण स्त्री हट्ट नाही😉.. लवकरच टिकटिक करणारी घड्याळे "दिखाने की चीज" म्हणून  प्रतिष्ठितांचे दिवाणखाने सजवू लागली. जर्मनीमध्ये अशी घड्याळे तयार करण्याचा ग्रामोद्योग भरभराटीला आला.  या घड्याळात कलाकुसर वाढली, सोने, हिरे यासारखी महागडी टॉप व्हर्जन येऊ लागली.. साहजिकच आजच्या काळात चार बांगड्यावाली गाडी (ऑडी हो..) घेणारे टाईप लोक भरपूर पैसे मोजून हा विकतचा मोठेपणा खरेदी करू लागली.😉
गॅलीलिओने सन १६०२ मध्ये लंबकाच्या आवर्तनांना नियम शोधून काढला.. लंबकाच्या साह्याने अचूक वेळ नोंदवता येऊ लागला सन १९३० पर्यंत गॅलिलिओने दिलेला हा पर्यायच सर्वात अचूक कालमापन करणारा होता. लंबकांच्या आवर्तनास ठराविकच वेळ लागतो या नियमाचा उपयोग करून अचूक वेळ दाखवणारी लंबकाची घड्याळे प्रचारात आली. आणि याच सुमारास अशी घटना घडली की माणसाचे आयुष्य या घड्याळाच्या काट्यावर नियंत्रित होणार होते.
याच काळात औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. आता प्रत्येक क्षणाचे महत्व वाढले होते. सर्वसामान्य लोकांना वेळ कळावी यासाठी गावोगावी क्लॉकटॉवर्स बांधण्यात आले. दर तासाला टोल पडायचे आणि सांगायचे चल बास .. किती आराम करतो ..उठ.. घड्याळ बसवलेली  इमारत एवढी उंच असे की गावाच्या कानाकोपऱ्यातून घड्याळाचे काटे दर्शन देणार.. कुणी म्हणू शकणार नाही आम्हाला माहीत नव्हते वेळ झालेला...

लंबकाच्या घड्याळात सुधारणा करताना ह्यूघेन्स फ्रेंच कारागिराने  हा लंबक पोलादी स्प्रिंगला जोडून टाकला. सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंत सर्व घड्याळात वसंत बहरला.. (spring टाकली) मात्र या स्प्रिंग घड्याळाची समर मध्ये वाट लागायची..तापमान वाढले/कमी झाले तर ही घड्याळे मागे पडायची.. कधी पुढे जायची. मात्र जेव्हा घड्याळात वीज आणि सेलचा वापर सुरू झाला तेव्हापासून घड्याळे अचूक वेळ पाळू लागली. घड्याळात विजेचा उपयोग करण्याचा प्रथम प्रयत्न अलेक्झांडर बेनने १८४० च्या दशकात केला. तेव्हापासून घड्याळाला चावी द्यायचे मानवाचे काम वाचले.. (राव मी १९९५ पर्यंत चावी चे घड्याळ वापरले .. चावी नाही दिली की मागे पडायचे.. मग रेडिओ वर जेव्हा "वेळ" सांगतील तेव्हा पुन्हा सेट करायचे)
भिंतीवरच्या घड्याळापेक्षा जास्त भाव मनगटी घड्याळांनी खाल्ला आहे. पहिले मनगटी घड्याळ राणी एलिझबेथ पहिली हिने १५७१ मध्ये वापरले असल्याची नोंद आहे. मात्र आज पाहायचे असेल तर सर्वात जूने मनगटी घड्याळ हे १८०६ मध्ये तयार झालेले उपलब्ध आहे.. त्या काळात मनगटी घड्याळ फक्त बायका वापरायच्या... पुरुष लोक साखळी बांधलेली घड्याळे खिश्यात घेऊन हिंडायचे...

भारतात तर मनगटी घड्याळ जणू सासऱ्यानेच घेऊन द्यायचे असा अलिखित नियम होता.. देणे घेणे मध्ये अविभाज्य भाग असायचा घड्याळ..अनेक लग्न मोडली राव... पण जसे वेळ दाखवायला मोबाईल आले आणि मनगटी घड्याळाचे कौतुक कमी झाले.. टायटन सारखी कंपनी नव्या तरुणाईला हवे तसे मॉडेल आणून तग धरून आहे... मात्र एंशी च्या दशकात ९०% मार्केट शेअर असलेली HMT आता कुणी वापरताना दिसत पण नाय... कालाय तस्मै नमः जसे लागू होते तसे राजा कालस्य कारणं हे पण इथे लागू होते..

भारत अभियांत्रिकी बाबतीत जास्तीत जास्त स्वावलंबी व्हावा म्हणून पंडित नेहरू यांनी स्थापन केलेली कंपनी हिंदुस्तान मशीन टूल्स अर्थात HMT.. २०१४ मध्ये सत्तेवर आल्यावर लगेच मोदी सरकार ने ही सरकारी कंपनी बंद करायचा निर्णय घेतला.. २०१६ मध्ये घड्याळ डिविजन बंद झाली... अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून सत्तेवर आले.. आणि त्यांच्या काळात केवळ मुठभर भांडवलदारांना अच्छे दिवस आले आहेत..😬

हे असे आहे तरी पण 
हे असे असणार नाही 
दिवस आमचा येत आहे
तो घरी बसणार नाही..

जितना तूने बोया है
तू उतना ही तो खायेगा
अपना टाईम आयेगा✊🏾✊🏾🕛

#richyabhau
#अपना टाईम आयेगा

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव