मेरी क्युरी.. प्रेरणेचा किरणोत्सार करणारं व्यक्तिमत्व.

  मेरी क्युरी.. प्रेरणेचा किरणोत्सार करणारं व्यक्तिमत्व.


महिला सक्षमीकरणाचे आदर्श उदाहरण म्हणजे मेरी क्युरी. दोन नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली व्यक्ती, दोन वेगळ्या विषयात नोबेल मिळवणारी पहिली व्यक्ती, विज्ञान विषयात डॉक्टरेट मिळवणारी पहिली महिला, युरोपीय विद्यापीठातील पहिली महिला प्राध्यापक....  ते अगदी शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या फ्रान्सच्या पँथिऑन राष्ट्रीय स्मारकात दफन करण्यात आलेली पहिली महिला.. शिकायला बंदी असलेल्या देशात जन्मलेल्या मुलीचा हा थक्क करणारा प्रवास... 


मेरीचे मूळ नाव मारिया स्क्लोडोव्ह्स्का (हे आडनाव एकदाच बरं का.. लय अवघड टाईप करायला).. ७ नोव्हेंबर १८६७ साली पोलंड देशाची राजधानी वॉर्सामध्ये एक कृश बाळ जन्माला आले. आधीची चार पोरं असलेल्या शिक्षक दाम्पत्याच्या पोटी जन्मलेले हे शेंडेफळ. किरट्या अंगाचे.. अगदीच नाजूक. तिचा बालपणीचा काळ पोलंड मध्ये रशिया विरोधी धामधूमीचा होता... रस्त्यावर कधीही  हिंसाचार सुरु व्हायचा .. हिने त्याची एवढी धास्ती घेतली होती की कधी भावंडं खेळत असतील तर त्यांना सामील झाली नाही.. नुसती घरकोंबडी झाली होती मारिया.


मग घरात बसून काय करणार.. तर पुस्तके चाळत बसायची. वयाच्या चौथ्या वर्षीच तिला अगदी छान वाचता येत होते. तिच्या आईला क्षयरोग झाला होता. लहान मारियाला तेव्हा समजले नाही की आई मला जवळ घेऊन लाड का नाही करत.. ही दहा वर्षाची असताना आई मेली पण. 😔  शेवटी तिला प्रेम, माया ममता मिळाली पुस्तकं आणि मोठी बहीण ब्रोनीस्लाव्हा हिच्याकडून.  


मारिया शाळेत हुशार होती. अभ्यासक्रम झपाट्याने पूर्ण करत  तिच्यापेक्षा दोन वर्षे मोठ्या असलेल्या मुलींच्या वर्गात सामील झाली. वयाच्या सोळाव्या वर्षी तिने शाळेत गोल्ड मेडल जिंकलं. मात्र पुढे काय.. कारण पोलंडमध्ये महिलांना महाविद्यालयात प्रवेश नव्हता.. आणि आपल्या मारियाचा जन्म काही चारचौघीसारख शिवणकाम, भरतकाम करण्यासाठी झाला नव्हता.. स्वप्न  साकार करायची तर संघर्ष अटळ.. 


पोलंडमध्ये बंदी असली तरी शेजारचा देश फ्रान्समध्ये जाऊन पुढचं शिक्षण घेता आलं असतं; पण मारियाकडे तेवढे पैसे नव्हते.

रशियन राजवटीविरुद्ध राष्ट्रीय उठावामध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून मारियाच्या कुटुंबास आपली सगळी संपत्ती गमवावी लागली होती. अगदी हातावर पोट  असल्यागत परिस्थिती झाली होती.. बापाची नोकरी गेली. पैसे आणायचे कुठून. पण म्हणतात ना.. इच्छा तेथे मार्ग..   मारियाने मार्ग शोधला. 


मारियाचा जीव की प्राण असलेली मोठी बहीण, ब्रोनीला देखील वैद्यकीय उच्चशिक्षण घ्यायचं होतं. दोघींनी आपापसात ठरवल की पहिल्यांदा मोठ्या बहिणीने परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचं आणि मारियाने मिळेल ते काम करून त्याचा खर्च  उचलायचा.. पाच वर्षांमध्ये मोठी बहीण शिक्षण पूर्ण करेल आणि धाकट्या बहिणीलाही तिकडे बोलून घेईल. आणि तिच्या शिक्षणाचा ही खर्च उचलेल.


ठरल्याप्रमाणे मारिया एका वकिलांच्या मुलांना शिकवण्याचे काम करत आपल्या बहिणीला पॅरिसला पैसे पाठवत. गव्हर्नेसचे काम करताना मारीयाच्या आयुष्यातील पहिले प्रेम, पहिला ब्रेकअप तिथेच.. एवढेच नाही त्यामुळे तिला कामावरून देखील काढून टाकल. मात्र खचेल ती मारिया कसली..  मिळेल त्या नोकऱ्या करून पैसे जमवले आणि बहिणीला डॉक्टर केलंच. त्यानंतर स्वतः १८९१ मध्ये फ्रान्सला गेली. स्वतःला शिकायची इच्छा असताना लहान बहिणीने मोठ्या भावंडांना शिकवण्याचे उदाहरण तसे दुर्मिळच.. 


मारिया महाविद्यालयात दाखल झाली.. मारिया ची "मेरी" झाली ती तिथेच. मेरीची बहीण आता विवाहित होती. त्यामुळे तिच्याकडे राहण्यापेक्षा वसतिगृहात राहणे मेरीने पसंद केले. पैश्याचाबाबत मेरी अतिशय काटकसरी होती.. एवढी की ती स्वतःची उपजीविका चहा ब्रेड, बटर एवढेच खाऊन भागवत होती. आधीच बारीक शरीर.. त्यात असले खाणे.. पार मातेरे झाले शरीराचे.. मात्र उत्साह मात्र तसाच दांडगा ... रोज रात्री एक वाजेपर्यंत काम केले तरी पहाटे पाच वाजता दिवस सुरू व्हायचाच. 


१८९३ साली फ्रान्समधील सोरबॉन विद्यापीठाची भौतिक शास्त्राची पदवी मेरीने मिळवली. बहिणीने तिचं वचन पूर्ण केले, तिची जबाबदारी आता संपली होती. तिला अधिक त्रास देणे मेरीला नको होते. ती पोलंडला परतली. वर्साव मध्ये नोकरी शोधू लागली पण तिच्या योग्यतेचे काम काही तिला मिळाले नाही. पुन्हा एकदा तिच्या पदरी निराशा.


त्याच दरम्यान परदेशी गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेली फेलोशिप मेरीला देण्यात आली. मेरी पुन्हा पॅरिसला आली. मात्र तिला मॅग्नेटिझम प्रॉपर्टीज अँड केमिकल कंपोझिशन यावर संशोधन करण्यासाठी प्रयोगशाळा लागणार होती. त्यासाठी शोधाशोध सुरू असतानाच तिची ओळख झाली पिएर क्युरी याच्याशी.. फक्त संशोधनातील साथी नाही तर जीवनसाथी सापडला मेरीला.


तेव्हा रोंटेजन याने एक्स-रे चा शोध नुकताच लावला होता. हेन्री बेक्वरेल ने युरेनियम मधून काही अज्ञात किरण बाहेर पडतात हे शोधले होते. पिएर क्युरी यांनी रेडिएशन मोजण्यासाठी क्युरी स्केल नावाची मोजमापपट्टीही तयार केली. (रेडिएशन मोजण्यासाठी आजही क्युरी हेच एकक वापरतात) मेरीने देखील या विषयात रस घेतला.


मेरीने संशोधनासाठी पिचब्लेंड नावाच खनिज घेतलं. तोवर असा समज होता की पिचब्लेंडमध्ये युरेनियम आणि ऑक्सिजन हे दोनच घटक असतात. पण मेरीने तर्क केला पिचब्लेंडमधून रेडिएशन्स बाहेर पडतात याचा अर्थ काही न शोधलेली मुलद्रव्य त्यात असणार. मेरीने पोलोनिअम (पोलंड या तिच्या देशाच्या नावावर हे नाव ठेवले आहे) आणि रेडिअम या दोन किरणोत्सारी मूलद्रव्यांचा शोध लावला.


१९०३ मध्ये मेरीला या संशोधनासाठी डॉक्टरेट मिळाली. संशोधनादरम्यान तब्बल ३२ रिसर्च पेपर तिने प्रसिद्ध केले होते.  (आपल्याकडे कॉपी पेस्ट करून किंवा दुसऱ्याकडून लिहून घेऊन दोन रिसर्च पेपरची अट बरेच संशोधक पूर्ण करत असतात😂)   त्याच वर्षी मेरीला पिएर आणि बेक्वरेल यांच्याबरोबर रेडिओऍक्टिव्हिटीसाठी नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आलं. तिच्या कामाची दखल संपूर्ण जगाने घ्यायची वेळ आली.


मात्र गुणवत्ता असूनही पुन्हा तिच्या वाट्याला नाकारलेपण आले. कारण काय तर तीचे स्त्रीत्व. इतर शास्त्रज्ञानाही तोपर्यंत महिला शास्त्रज्ञ असल्याचं पचत नव्हत. नोबेल समितीने पिएर आणि बेक्वरेल या दोघांचीच नाव पुढं केली होती. पिएरने नोबेल समितीला ठणकावून सांगितल की हे मूळ काम मेरीचेच आहे.. खंबीरपणे तिच्या पाठीशी होता तिचा जोडीदार.. मेरीचे नाव त्यामुळेच जगभर चमकू शकले..


मेरी आणि पिअर चे सहजीवन आदर्शवत म्हणावे असे होते. दोघांचा ध्यास एक, श्वास एक. पिएर तिच्यासाठी काहीही करायला तयार असायचा..  लाजाळू तर एवढा की नोबेल पारितोषिक घेताना खूप लोकांना सामोरे जायला लागेल म्हणून भित होता. सगळे छान सुरू असताना १९०६ साली पिएर क्युरीचा (घोडागाडी धडकल्याने)अपघाती मृत्यू झाला. जीवापाड प्रेम करत असलेला साथी हरपल्यामुळे मेरी एकटी पडली.. पदरी दोन मुली होत्या. मात्र मातृत्व आणि संशोधन या दोन्ही आघाड्यांवर चांगले तोंड देत मेरीने स्वतःला सिद्ध करून दाखवले. १९११ साली रसायनशास्त्रातील नोबेलदेखील पटकावले. दोन दोन नोबेल मिळवणारी मेरी. (डबल हिंदकेसरी पेक्षा पण भारी हाये हे बरं)


आता मात्र मेरीचे यश पाहून अनेक लोकांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला. आणि समोर स्त्री असेल तर मग काम सोपे.. चारित्र्यावर शिंतोडे उडवले की झाले. विधवा मेरी आणि तिचा प्रयोगशाळेतील सहकारी लांगेविनच प्रेम प्रकरण आहे अशी काही पत्रकं प्रसिद्ध करण्यात आली. तिच्याबद्दल लोकांच्या मनात प्रचंड द्वेष निर्माण तयार केला गेला.😔 


यातून बाहेर पडण्यासाठी मुलींना घेऊन मेरी पुन्हा पोलंडला गेली.  पहिल्या महायुद्धाच्या काळात युद्ध जखमींसाठी क्ष-किरण व्हॅन उभारली, पोर्टेबल क्ष-किरण यंत्र  पुरवली तसेच क्ष-किरण यंत्र वापरू शकणारे शेकडो तंत्रज्ञ प्रशिक्षित केले. मात्र यादरम्यान तिची तब्येत कमालीची ढासळली... 


कर्करोगाच्या आजारावर काम करण्यासाठी मेरीने रेडियम संशोधन संस्था उभारली होती.ज्यावेळेस मेरी रेडिएशन वर काम करत होती त्यावेळेस त्याचे दुष्परिणाम कोणालाच माहीत नव्हते. मेरी तर बिंदास  मूलद्रव्यांच्या टेस्टट्यूब ओव्हरकोटच्या खिशात घेऊन फिरायची. मेरीच्या अंगावर चट्टे उठले.. त्याची आगाग व्हायला लागली (कुणी कॅन्सरसाठी रेडिएशन घेतलेला ओळखीचा असेल तर त्याला विचारा काय अवस्था होते.) शेवटी त्यात ती १९३४ साली मरण पावली. डॉक्टरने ज्ञात नसलेला आजार मेरीला झाला होता असं निदान केलं.


आज तिच्यावर टीका करणाऱ्यांची नावे इतिहासाला माहीत नाहीत. मेरीचे नाव मात्र अजरामर झाले आहे. अल्बर्ट आईनस्टाईन मेरीचे कौतुक करताना म्हणतो. "मेरी अशी एक व्यक्ती आहे जी कधीही प्रसिद्धीमुळे भ्रष्टाचारी झाली नाही, तिच्यामुळे विज्ञानाचीही प्रतिमा बदलेल.."


विज्ञानाची प्रतिमा बदलण्याचा मेरीचा ध्यास होताच..  विज्ञानात सौदर्य पाहणारी स्त्री ती.  संशोधनाचा उपयोग अधिकाधिक मानव जातीला झाला पाहिजे हा तिचा अट्टाहास.. त्यामुळेच तिने कधी कोणत्या शोधाचे पेटंट घेतले नाही. विज्ञान तिने स्वतच्या घरात असे रुजवले की नंतर मोठी मुलगी, मोठा आणि लहान दोन्ही जावई या सर्वांनी नोबेल मिळवले आहे. मेरी आणि पिएर यांचे मिळून एकाच कुटुंबात पाच नोबेल पुरस्कार.. (इथे नेपोटिजम नसतो बर का.. जे काही मिळवायचे ते स्वतःच्या मेहनतीवर)


जोतिबानंतर सुरू असलेले काम सावित्रीमाईने बंद पडू दिले नाही.. आणि प्लेग निवारण करताना लागण होऊन त्यांचा मृत्यू झाला.. मेरीचे पण अगदी तसेच म्हणावे लागेल.. झोकून देऊन मानव हितासाठी काम करताना मृत्यू येणे.. फ्रेंच सरकारने मेरीच्या या त्यागाची योग्य दखल घेतली.. १९९५ साली तत्कालीन फ्रेंच अध्यक्षांच्या विनंती वरून मेरी आणि पिएर यांचे अवशेष फ्रान्सच्या पँथिऑन राष्ट्रीय स्मारकात दफन करण्यात आले जिथे शेकडो वर्षांपासून केवळ राजघराणे आणि अतिमहत्त्वाच्या पुरुषांनाच स्थान होते.


स्वतः नास्तिक असलेल्या मेरी मानववंशासाठी फार उपकार करून गेल्या आहेत. आज कर्करोग बाधित लाखो लोक किमो थेरपी आणि रेडिएशन चा वापर करून रोगमुक्त झाले आहेत त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तसेच संपूर्ण मानववंशाने मेरीला धन्यवाद दिले पाहिजेत..  अशी ही प्रेरणेचा किरणोत्सार करणारी मुलगी मेरी.. इच्छा तिथे मार्ग याचे बेस्ट उदाहरण... आवडले तर शेअर करतालच🙏🙏


#richyabhau

#मेरी क्युरी

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव