बेंजामिन फ्रँकलिन... द फौंडींग फादर ऑफ अमेरिका.

  बेंजामिन फ्रँकलिन... द फौंडींग फादर ऑफ अमेरिका.


अमेरिका स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर असलेली, अमेरिकन घटना निर्मितीत प्रमुख आणि अमेरिकन डॉलर वर ज्याचा चेहरा आहे अशी व्यक्ती म्हणजे बेंजामिन फ्रँकलिन. अमेरिकन लोक त्यांना अमेरिकेचा आत्मा, पहिला अमेरिकन म्हणून पण संबोधतात. अमेरिकेच्या founding father पैकी एक. मात्र केवळ राजकारणी, मुत्सद्दी किंवा स्वातंत्र्य सैनिक ही त्यांची ओळख खूप अपुरी राहील. लेखक, मुद्रक, प्रकाशक, संशोधक आणि थोर मानवता वादी असलेला हा बेंजामिन फ्रँकलिन नुकत्याच स्वतंत्र झालेल्या अमेरिकेच्या विकासाची भक्कम पायाभरणी करून गेला होता. 


बेंजामिन फ्रँकलिन (लाडाचे नाव बेन) याचा जन्म १७ जानेवारी १७०६ साली त्या बापाच्या पोटी झाला... ज्याला सतरा पोरं होती.... 😷 आणि परिस्थिती पण गरीब..  साबण मेणबत्या बनवून विकायचा घरचा  धंदा. मग साहजिक आहे शिक्षण काय घंटा मिळणार.. दोन वर्ष शाळा मिळाली नंतर बेन्याला वयाच्या दहाव्या वर्षी झक मारत घरच्या धंद्यात उतरावे लागले. मात्र या शाळेच्या दोन वर्षात त्याला वाचायची एवढी आवड लागली की शिकवायच्या आधी त्याने पुस्तक वाचलेलं असायचे.. जमेल तेवढं वेळ शाळेत लायब्ररीत वाचन...  परत घरी आल्यावर बापाने आणलेली धार्मिक पुस्तके.. नुसता सपाटा लावला. 


"व्यक्तीचा जन्म तेच करण्यासाठी नसतो झाला जे याआधी त्याच्या वाडवडिलांनी केले आहे" असे पुढे मोठा झाल्यावर म्हणणारा बेन या धंद्यात अजिबात रमत नव्हता. त्याला समुद्राच्या पलीकडे जायचे त्याचे स्वप्न आणि त्याची विलक्षण कल्पनाशक्ती त्याला अस्वस्थ करत होती. मात्र मिळेल तो कागद वाचणे हे या काळात त्याचे सुरूच होते. त्याची वाचायची आवड बघून बापाने त्याला भावाच्या मुद्रण व्यवसायात अडकवले.


वयाच्या बाराव्या वर्षी मोठा भाऊ जेम्स याच्या प्रेस मध्ये हा उमेदवारी करू लागला. करारानुसार वयाच्या एकवीस वर्षापर्यंत ही उमेदवारी असणार होती. पडेल ती कामे करत आणि मिळेल त्या वेळात पुस्तके वाचत बेन नोकरीचा आनंद घेत होता. त्याची ही वाचनाची आवड अॅडम नावाच्या माणसाला भावली. त्याने आपली घरची लायब्ररी बेनला उपलब्ध करून दिली.. पर्वत महम्मद पाशी आला म्हणाल्यावर आता महम्मद सोडत असतो का.. बेन ला दिवसाचे चोवीस तास कमी वाटायला लागले. त्याने तेव्हापासून दिनक्रमाचे काटेकोर नियोजन आणि अमल बजावणी  करायला सुरु केली जी त्याने मरे पर्यंत कटाक्षाने पाळली. 


ह्याला एक भिडू भेटला होता.. कॉलिन्स नावाचा.. त्यांच्याच घराजवळ राहायचा. या दोघांना नाद काय तर वाद घालायचे. कॉलिन्स चा अभ्यास दांडगा.. आणि मुद्देसूद वाद घालायचा. त्यामुळे बेनची चांगली तयारी झाली. त्याला लहानपनीच कळून चुकले की मुद्दा योग्य असो किंवा अयोग्य.. समोरचा माणूस कधी आपली चूक कबूल करत नाही. त्यामुळे समोरच्याला हरवण्यात नाही तर दोघांना पटेल असे अनुमान काढण्यात शहाणपणा असतो. हाच मुत्सद्दीपणा नंतर त्याला आयुष्यभर कामाला आला.


शरीराप्रमाणे बुद्धीची भूक महत्त्वाची असते हे त्याला बालवयातच समजले. कामाचे पैसे मिळाले की शक्य त्या रकमेची पुस्तके विकत घ्यायचा बेन. भावाने द न्यू इंग्लंड करंट या नावाने वर्तमान पत्र सुरू केले. त्यात ह्याने संपादनाचे काम मागितले.. पंधरा वर्षाच्या पोराला कोण देणार.. मग पठ्ठ्याने काय करावे. सायलेन्स डॉगुड या टोपण नावाने लिखाण सुरू केले. असे भासवले की ही मध्यमवयीन महिला आहे. या सायलेन्स बाईचे विज्ञान, महिला हक्क, स्वतंत्र मुक्त विचारांचे लेख प्रसिद्ध होऊ लागले. त्यावर चर्चा होऊ लागल्या. मात्र कुणाला माहीत नाही ही बाई कोण. ( टोपण नावा चा लय फायदा असतो राव.. तुम्ही उगाच रीच्याला खरे नाव विचारता.) 


एकदा गवर्नर विरोधी लिखाण केले म्हणून भावाला तीन आठवडे शिक्षा झाली तेव्हा या सोळा वर्षाच्या पोराने वर्तमानपत्राची संपूर्ण जबाबदारी सांभाळली. मात्र मत्सरी भाऊ खूप मारहाण करू लागला. बापाकडे तक्रार केली तर भाऊ त्याला पण दाद देईना. मग बेनची पण सटकली. एवढे ज्ञान आणि एवढा आत्मविश्वास असलेला अठरा वर्षाचा पोरगा काय शांत बसणार का. घर सोडून निघाला गडी. जे बोस्टन मधून निघाला तो मजल दरमजल करत फिलाफेलडीयाला पोचला. अब अपना पंची आझाद हो गया.. अब कोण रोकेगा उस्को.


आपल्या बोलबच्चन च्या जोरावर अनोळखी भागात ह्याने बघता बघता आपले बस्तान बसवले पण. एवढे की पार तिथल्या गवर्नर च्या नजरेत भरला. पेनिसिल्विनिया चा गवर्नर विल्यम  किथ ह्याच्या प्रेमातच पडला. एवढा लहान पोरगा आणि किती आत्मविश्वास. त्याने बेन ला मुद्रण कलेतील बारकावे शिकण्यासाठी लंडनला पाठवले. तिथे त्यांच्यावर सुसंस्कृतपणाचे देखील संस्कार झाले. 


लंडनवरून आल्यावर बेनने मुद्रण व्यवसाय सुरू केला. प्रामाणिकपणा आणि चोख व्यवहार यामुळे धंद्यात लवकरच नावारूपाला आला. मग याने  जिंतो नावाचा ग्रुप सुरू केला ज्यात वेगवेगळ्या व्यवसायातील लोक एकत्र येऊन नवकल्पनावर चर्चा करतील. ह्याचे गारूड सगळ्या लोकांवर असायचे त्यामुळे लीडर हाच असायचा.


१७३० मध्ये त्याने स्वतचं पेनीसिल्विनिया गॅझेट हे वर्तमानपत्र सुरू केले.  पुढच्या वर्षी त्याने मित्रांना मदतीला घेऊन लायब्ररी सुरू केली आज अमेरिकेतील पहिली सार्वजनिक लायब्ररी म्हणून ओळखली जाते. आज त्या लायब्ररीमध्ये पाच लाखापेक्षा जास्त पुस्तक आहेत. अमेरिकेतील सर्वात पहिले अग्निशामक दल आणि आणि हॉस्पिटल सुरू करण्याचा मान देखील बेंजामिन फ्रेंक्लिन यांनाच आहे. 


याच काळात डेबोरा सोबत लग्न पण झाले. सात वर्षांपूर्वी तिच्या घरांमध्ये पेईंग गेस्ट म्हणून बेन राहायचा. तेव्हा त्याने तिला प्रपोज केले होते मात्र तेव्हा ती  भाऊला नाही म्हणाली होती. नंतर जेव्हा बेंजामिन इंग्लंडला गेला तेव्हा तिचे लग्न देखील झाले  होते आणि घटस्फोट पण. परत आल्यावर बेनशी लग्न झाले आणि तिने व्यवहार पाहायला सुरुवात केली. बेंजामिन वसुलीच्या बाबत ढिला होता ती कसर डेबोरा ने भरून काढली. 


'अज्ञानी असणे लाजिरवाण नाही मात्र शिकायची इच्छा नसणे हे लाजिरवाणे आहे" असे म्हणणारा बेंजामिन इंग्लिश व्यतिरिक्त अजून चार भाषा शिकला. सामाजिक क्षेत्रांमध्ये त्याचे महत्व दिवसोदिवस वाढत होते. "जॉईन ऑर डाय" हे जगातील सर्वात पहिले राजकीय व्यंगचित्र बनवण्याचा मान देखील बेंजामिनलाच जातो.  


मात्र बेंजामिन हे जगाच्या नजरेत आला त्यांच्या पतंगाच्या प्रयोगानंतर. विजेचा शोध कोणी लावला हे आपल्याला शाळेत शिकवले असते.. विद्युत प्रवाह हा धन प्रभारापासून ऋण प्रभारकडे वाहतो हे त्याने पतंग आणि धातूचा मांजा यांचा साह्याने सिद्ध केले. यामुळे विजविरोधी तारा लावून घरे विजेपासून सुरक्षित करण्याचा उपाय सापडला. 


त्याला स्वतःला दोन चष्मे होते. एकाने जवळचे पाहायच, एकाने लांबचे. यावर उपाय म्हणून बायफोकल म्हणजे डबल भिंगाचा चष्मा देखील यानेच शोधून काढला.काच आणि रेशीम वापरून वीज बॅटरी बनवण्याचा देखील त्याने प्रयत्न केला. Flexible urinari cath किंवा विद्युत उपचारासाठी केलेले विद्युत स्नान उपकरण, फ्रेंक्लिन स्टोव्ह ही त्याने शोधलेली काही उपकरणे. 


इतर गृहोपयोगी बारीक सारीक बाबी, वैद्यकीय उपकरणे, सागर अभ्यासकांसाठी किती वस्तू  बनवल्या त्याची तर गणना नाही. अर्थात यापैकी कशाचीच पेटंट बेंजामिन ने घेतले नाही कारण पेटंट घेण्याच्या संकल्पने विरुद्ध तो होता. संशोधन हे सगळ्या मानवजातीच्या हितासाठी असावे असे त्याला वाटायचे. संशोधन क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीमुळे जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठांने या दोन वर्ष शाळा शिकलेल्या बेंजमिनला डॉक्टरेट पदवी दिली. 


ब्रिटिश सत्तेशी अतिशय प्रामाणिक असलेला बेंजामिन त्याच्या योग्यतेनुसार शासकीय तसेच राजकीय पदावर बढती मिळवत गेला. मात्र जेव्हा ब्रिटिश सरकारने स्टॅम्प कायदा पास केला. तेव्हा अमेरिकन जनतेने केलेल्या विरोधाचे नेतृत्व बेंजामिनने केले. हा लढा यशस्वी झाला, कायदा मागे घेण्यात आला आणि बेंजामीन वरती नेतृत्वाचा शिक्का बसला. 


अमेरिकन स्वातंत्र्यलढ्यात बेंजामिन फ्रेंक्लिन यांनी बजावलेली भूमिका आपल्या सगळ्यांना ज्ञात आहेच. यावेळी स्वतःचा मुलगा विल्यम फ्रांकलीन (तेव्हा विल्यम न्यू जर्सीचा गव्हर्नर होता) हा या लढ्याच्या विरोधी होता म्हणून त्याच्याशी संबंध तोडून टाकले कायमचे.. अगदी नंतर जेव्हा विल्यमची गच्छंती जेलमध्ये झाली तेव्हा देखील त्याला भेटायला गेले नाही.  


अमेरिकन स्वातंत्र्यलढ्यात जॉर्ज वॉशिंग्टन ने रणांगणात बजावलेली भूमिका जेवढी महत्वाची आहे तेवढेच फ्रांकलीन यांनी फ्रान्स कडून मिळवलेल्या मदतीचे महत्त्व आहे. स्वातंत्र्याचा जाहीरनामा, अमेरिकेची घटना तसेच फ्रांसशी करार या सगळ्या महत्वाच्या कागदपत्रांवर बेंजामिन फ्रँकलिन यांची सही आहे यावरून त्यांचे महत्त्व लक्षात येते.


बेंजामिन फ्रँकलिन यांचे एक वाक्य आहे " आयुष्यात असे लिहा जे वाचन्यालायक असेल किंवा असे करा जे लिहण्यालायक" त्यांनी स्वतः जीवनभर खूप लिहण्यासारखे काम केले आणि वाचण्या सारखे लिहिले. अजून खूप काही आहे सांगण्या सारखे.. त्यांची संगीताची आवड, नवीन वाद्य शोधून काढणे, बुद्धिबळ खेळातील त्यांची प्रसिद्धी.. खूप काही आहे. बेंजामिन फ्रँकलिन चा हा जीवनप्रवास नक्कीच आपल्या सगळ्यांना प्रेरणादायक आहे. पोस्ट आवडली आणि इतरांना देखील प्रेरक होईल असे वाटले तर शेअर करा नक्की🙏


#richyabhau

#benjamin franklin

Comments

  1. बेंजों वाद्य काय फ्रेंकलीननेच शोधुन काढले का?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव