अधिक महिना + लिप वर्ष ~

अधिक महिना + लिप वर्ष ~

"यावर्षी कोरोना मुळे नवरात्र पण साजरी झाली नाही वाटत.. अजून पेपरला फोटो आले नाहीत बायकांचे" आमच्या आईचे निरीक्षण... तिला बोललो "अग नवरात्र सुरू व्हायचे आहे" "अरे पण पितर पाक तर संपला की"  तिला सांगितले " यावर्षी अधिक महिना आला आहे." आई वैतागली... "अरे देवा, दुष्काळात तेरावा महिना का?" या टोनमध्ये बोलली जणू काही अधिक महिना आल्याने कोरोना त्याचा मुक्काम वाढवणार आहे 😀.. पण हा अधिक महिना येतो कुठून.. 

जगामध्ये सर्वच संस्कृतीमध्ये कालगणना करताना ऋतुंची सांगड घालण्यात आली आहे. आदीम अवस्थेत ऋतु मोजायला सूर्य मावळताना पूर्वेकडे उगवणारे नक्षत्र पाहिले जायचे.. तर तिथी मोजायला सर्वात सोपी बाब होती चंद्रकला पाहायचे. (चंद्रकला म्हणले की पिंजराच आठवतो राव❤️) चंद्राच्या कलेच्या अनुषंगाने मानवाने चांद्रमास बनवले.. २९.५ दिवसांचे मासिक चक्र मानवाच्या सर्वच संस्कृतीमध्ये वापरले जाऊ लागले..

सूर्याचे (खर तर पृथ्वीचे) ३६५ दिवसांचे चक्र मानवाच्या लक्षात आले..  एका दिवसात किती तास असावेत आणि त्या तासात किती मिनिट असावेत हे आपण ठरवू शकत होतो, मानवाला वाटले म्हणून त्याच्या सोयीने दिवसाचे २४ तास आणि तासाचे पुन्हा ६०x६० भाग केले. मात्र एका वर्षात किती दिवस असावेत हे सूर्यच आणि एका महिन्यात किती दिवस असावेत हे चंद्र ठरवणार होता..

२९.५ दिवसांचे १२ महिने केले तर त्याचे एकूण ३५४ दिवस होतात.. आणि वर्ष तर ३६५ दिवसांचे.. हे दोन्ही एकाच कॅलेंडर मध्ये बसवले तरच ऋतु आणि सणांची सांगड घालता येणार.. (नायतर दिवाळी यायची उन्हाळ्यात, पावसाळ्यात कधीही.. मग भिजलेली वात पेटली नाही तर ओरडा😂 ) सणांचे उत्सवांचे तर मानवाला खूप कौतुक.. मग सुरू झाली गणिताची सांगड घालायची पराकाष्ठा.. ( इस्लाम मध्ये ही सांगड घातली नाय तर रमजान महिना कोणत्याही ऋतूत येतो... 😔)

चंद्राचे बारा महिने आणि सौर वर्ष यांच्यात ११ दिवसांचा फरक पडत असतो. यावर उपाय म्हणून चीन, जपान मध्ये एक महिना वाढवून घ्यायची पद्धत होती... त्या वर्षी कायद्याने तेरा महिने...  आपल्याकडे मात्र महिन्यांचे नावे नक्षत्रांशी निगडीत आहेत..(नक्षत्र यावर एक स्वतंत्र पोस्ट लिहायला पाहिजे) त्यामुळे तेराव्या महिन्याला वेगळे नाव द्यायला नको म्हणून अधिक महिना संकल्पना आली.

इ.स.पूर्व ४३३ मध्ये "मेटोन" या गणितज्ञाने सौरवर्ष आणि चांद्रमास यांचे गणिती नाते शोधून काढले. त्यानुसार १९ वर्ष x ३६५ दिवस आणि २३५ महिने x २९.५ चांद्रमासाचे दिवस यांचे उत्तर साधारण एकसारखे येते. (केवळ अडीच दिवसाचा फरक) याचा अर्थ असा की १९ वर्षांमध्ये २३५ महिने आले तर हे चंद्र सूर्याचे गणित जुळणार होते ( शाळेत शिकताना लसावी मसावी का शिकवला असा प्रश्न ज्यांना पडला आहे त्यांच्या साठी हे उत्तर आहे🥳)

गणित सुटले .. १९ वर्षात x१२ प्रमाणे २२८ महिने येतात.. आपल्याला पाहिजे २३५.. म्हणजे १९ वर्षात ७ अधिक महिने आले पाहिजेत. म्हणजेच ३२ महीने १६ दिवसांनी हा अधिक मास येणार. अधिक मास कधी येणार याचे सोपे गणित आहे... ज्यावर्षी माघ अमावस्या इंग्रजी महिन्याच्या १४ ते २४ या तारखेत येते... त्याच्या पुढच्या वर्षी अधिक महिना असतो.. असे का.. चला पाहू..
सूर्य दर महिन्याला एका राशीत प्रवेश करत असतो. (म्हणजे त्या राशीच्या बॅकग्राऊंड वर दिसतो.. या राशी अनेक प्रकाश वर्ष लांब आहेत..) सुर्य एका राशीत प्रवेश करणे याला "संक्रांत" म्हणले जाते.. जसे १४/१५ जानेवारीला त्याने मकर राशीत प्रवेश केला तर मकरसंक्रांत येते..  तसे इतर अकरा राशीत देखील सूर्यसंक्रांतीचे गणित फिक्स असते. जेव्हा एखाद्या चांद्रमासादरम्यान एकही सुर्य संक्रांत येत नाही. तेव्हा तो महिना अधिक चा पकडला जातो..

बहुतांश वेळा अधिक महिना चैत्र ते अश्विन या ७ महीन्यात येतो. फाल्गुन महिन्यात कधीतरी अधिक येऊ शकतो. यामागे पण गणित आहे. प्रत्येक ४ जुलै रोजी सूर्य आणि पृथ्वी यामध्ये अंतर कमाल असते. या काळात सौरमास मोठा असतो.( दोन संक्रांती दरम्यान ३१.५ दिवसांचे अंतर असते.. त्याच्या पोटात २९.५ दिवसाचा चांद्रमास बसण्याची शक्यता जास्त) त्यामुळे या काळात येणारे ज्येष्ठ, आषाढ़, श्रावण, भाद्रपद यांना अधिक बनायचा मान जास्त वेळा मिळतो. 

आपल्याकडे गणित आणि विज्ञान आधी येते आणि नंतर त्यांना पुराणात घुसवले जाते..😀 अधिक महिन्याची कहाणी पण अशीच... पुराणानुसार हिरण्यकष्यपू ने जेव्हा "सो called वरदान" मागितले होते की... माणूस नाही अन् प्राणी नाही अश्या कडून... दिवस नाही आणि रात्रही नाही अश्या वेळी.. आत नाही आणि बाहेर नाही अश्या ठिकाणी त्याला मृत्यू यावा.. त्यात अशी पण अट घातली होती की वर्षाच्या बारा महिन्यात त्याचा मृत्यू न व्हावा😀  म्हणून नरसिंहने दाराच्या उंबऱ्यावर संधिकालात जेव्हा हिरण्यकष्यपूचा गेम केला... तेव्हा अधिक महिना होता म्हणे.. कसल्या टिंग्या टाकतात राव😂😂
खरं तर अधिक महिना ही केवळ खगोलीय आणि गणितीय बाब... मात्र तरीही त्याचा वापर केला जातो.. याकाळात भटजीला दान धर्म करणे, असत्यनारायणाची पूजा घालणे इत्याही मूर्खपणा करायची अजिबात गरज नाही... या महिन्यात जावयाला देखील विष्णु चे रुप मानून त्याचा सत्कार करण्यात येतो.. (आपल्या कडक लक्ष्मी पोरीसोबत नांदल्याबद्दल उत्तेजनार्थ पुरस्कार😀😀) ही बाबपण आता विकृत आणि महागडे रूप घ्यायला लागली आहे.. मार्केटिंग करणारे या गोष्टीचा फायदा घेऊन आपली प्रोडकट्स खपवतात.. आणि मुलीचा बाप ऋण काढून हा सन साजरा करतो..😔
अधिक मासाचा विषय आधी घेतला असला तरी त्यावर अधिक वेळ ना घालवता आपण लीप वर्षावर उडी मारू... लीप म्हणजे उडी मारणे.. दर चार वर्षांनी फेब्रुवारी महिन्यात २९ तारीख उगवते हे आपल्या सगळ्यांना लहान पणापासून माहीत असते.. त्यात जर कुणा मित्रमैत्रिणींचा वाढदिवस २९ फेब ला असेल तर त्याची गम्मत पण करतो... पण तुम्हाला माहीत आहे का हे लीप वर्ष कधी आणि का सुरू झाले..
सूर्याच्या ३६५ दिवसांच्या चक्राचे मापन सर्वात आधी इजिप्त मधील लोकांनी केले.. सुमारे ५००० वर्षांपूर्वी..  हे त्यांनी शोधून काढले मृग नक्षत्र मधील व्याध (sirius) या ताऱ्यावरून.तुम्ही मृगशीर्ष नक्षत्र पाहिले आहे का.. जे चार पाय आहेत त्याच्या वर एक तारा आहे पुसटसा...ते आहे मृगशीर्ष..  हरणाच्या चार पाय आणि पोटातील तीन बाणामुळे लगेच ओळखू येतो. हा पोटातील बाण मारला तो तारा म्हणजे आकाशातील सर्वात तेजस्वी तारा व्याध (शिकारी).. आपल्या पृथ्वी पासून साडे आठ प्रकाश वर्ष दूर.. अगदी ठसठशीत दिसणारा.. 
हा तारा गायब झाला की लवकरच पाऊस येणार. नाईल नदीला पूर येऊन तिचा सुपीक गाळ दोन्ही काठावर पसरणार. त्यामुळे या व्याधाच्या ताऱ्याचे महत्त्व होते.. त्यांना समजले की एकदा हा तारा गायब झाला आणि नंतर पुन्हा प्रकट होतो.. आणि नंतर पुन्हा गायब होतो. या  दोन अंतर्धानदिनाच्या मध्ये बरोबर ३६५ दिवसांचे अंतर असते... यावरून त्यांनी ३६५ दिवसांचे वर्ष सुरू केले.. ३० दिवसांचे ११ महिने आणि शेवटच्या महिन्यात ५ दिवस जास्त.. अशी सुटसुटीत मांडणी...

३६५ दिवसांचे वर्ष मोजले तरी काही दिवसांनी ऋतु सुरू होण्या मध्ये फरक पडू लागला.. आणि गणित अधिक अचूक रित्या सोडवण्याची गरज निर्माण झाली.. खरं तर सूर्याचे चक्र अगदी ३६५ दिवसात पूर्ण होत नाही.. तर ३६५ दिवस ५ तास आणि ४८ मिनिटे आणि ४६ सेकंद हा अचूक कालावधी आहे... म्हणजे सुमारे सहा तास मोजायला कमी पडत होते.

सहा तास एका वर्षाचे या प्रमाणे चार वर्षात एक दिवस पूर्ण होईल याचा विचार करून इसवीसन पूर्व २०० साली इजिप्तचा राजा प्लोटेमी याने चार वर्षांनी एक दिवस अधिक असावा असे फर्मान काढले.  ज्युलियस सीझरने दरबारात असलेला सोसिजिंसच्या सल्ल्यानुसार आधीचा अनुशेष भरून काढण्यासाठी इसवी सन पूर्व ४६ हे वर्ष ४४५ दिवसांचे जाहीर केले. आणि तिथून पुढे इसवीसन पूर्व ४५ सालापासून चार वर्षांनी एक लीप वर्ष असलेल्या ज्युलियन कॅलेंडरची सुरुवात झाली... (सगळ्यात मोठे वर्ष .. इसवी सन पूर्व ४६.. ४४५ दिवस..  लक्षात ठेवा बरका)

तरीही पुढच्या सोळाशे वर्षात वसंत ऋतु सुरू होण्याच्या तारखेत दहा दिवसांचा फरक पडला होता.. का🤔🤔 कारण ३६५ दिवसांच्या पुढे असलेल्या ५ तास आणि ४९ मिनिटे याचे राऊंड अप करताना ६ तास केले होते.. म्हणजे अकरा मिनिटे (आणि १४ सेकंद) वाढवून दिली होती प्रत्येक वर्षाला... पाच दहा वर्षाच्या कालावधीत फरक पडत नाही.. पण हजारो वर्ष मोठा कालावधी असतो ना.. यावर उपाय काढला पोप ग्रेगरी यांनी... 
गणित अधिक अचूक तेव्हाच होईल जेव्हा ४०० वर्षात केवळ ९७ लीप वर्ष येतील.. इतके दिवस १०० घेतले गेले होते.. त्यामुळे घोटाळा झाला.. मग दर ४०० वर्षातील तीन वर्ष काढण्यात आली.. नियम सोपा व्हावा म्हणून जर वर्ष संख्येला १०० ने भाग जात असेल तर ४०० ने पण जायला हवा असा नियम काढला.. 

म्हणजे चार ने भाग जातो या नियमा प्रमाणे १८९२, १८९६ ही लीप वर्ष असतील मात्र नंतर १९०० नाही येणार डायरेक्ट १९०४, १९०८ याप्रमाणे लीप वर्ष  गणली जातात. १६००, २००० ही लीप वर्ष असतील मात्र १७००, १८००, २१००, २२०० ही लीप वर्ष असणार नाहीत.

आता गणित अधिक अचूक झाले.. पण अनुशेष भरून काढायला हवा ना.. सीझर च्या वेळी आधी कमी मोजले म्हणून दिवस वाढवावे लागले होते वर्षात .. मात्र आता जास्त मोजल्यामुळे दिवस कमी करणे भाग होते.. आणि त्यामुळे असा एक महिना उजाडला जिथे ४ तारीख नंतर डायरेक्ट १५ तारीख होती १५८२ सालाच्या ऑक्टोबर महिन्यात... आणि ही सुधारणा केली पोप ग्रेगरी याने... ( लक्षात ठेवा.. सगळ्यात छोटे वर्ष १५८२.. ३५५ दिवस)
पोप ग्रेगरी (तेरावा) हा चिकित्सक, उदार मतवादी आणि काहीसा बंडखोर वृत्तीचा होता... त्याने अनेक लोकांचा रोष पत्करून त्याने हा उपाय सुचवला.. आणि सुरू झाले ग्रेगरीयन कॅलेंडर (जे आपण सध्या वापरतो) आता वर्षाचे ऋतु ठराविक त्याच दिवशी येणार होते.. पण कोणत्याही सुधारणेला विरोध होतो तसा याला पण झाला.. रशिया ने तर १९१८ साला पर्यंत हे कॅलेंडर स्वीकारले नव्हते.

अधिक महिना असो किंवा लीप वर्ष.. इथे मानवाची नम्रता आणि शोधक वृत्ती दिसते.. नवीन तथ्य समोर आले तर स्वीकारण्याची तयारी दिसते... विज्ञान हे नम्रच असते.. कोणी व्यक्ती म्हणतो म्हणून..कोणत्या पुस्तकात लिहिलंय म्हणून..  इतके दिवस करतोय म्हणून.. किंवा बहुसंख्य लोक करतात म्हणून एखादी बाब खरी होत नसते.. त्या बाबीची चिकित्सा झाली.. आणि सत्याच्या कसोटीवर ती टिकली तरच तिचा स्वीकार केला पाहिजे... अन् आमचे धर्म, धर्मग्रंथ आम्हाला चिकित्सा करायला मनाई करतात😔.. शेवटी त्यांना आपले म्हणणे ऐकावे लागेलच.. कारण त्यांच्याकडे केवळ अंध विश्वास, अंधानुकरण आहे तर आपल्याकडे आहे सत्य आणि तथ्याचा प्रकाश.. ✊🏾✊🏾✊🏾

#richyabhau
#अधिकमास, लीप वर्ष 


आपला ब्लॉग 
https://richyabhau.blogspot.com/

Comments

  1. रंजक मांडणी त्यामुळे वाचायला मज्जा आली .

    ReplyDelete
  2. अतिशय माहितीपूर्ण लेख!!

    ReplyDelete
  3. खूप अभ्यासपूर्ण लेखन तेही साध्या सोप्या आणि विनोदी भाषेमध्ये केल्यामुळे खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद सर.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव