चार्ल्स डार्विन.. माकडाशी नाते जोडणारा सेपियन.

चार्ल्स डार्विन.. माकडाशी नाते जोडणारा सेपियन. 
मानवाची बुद्धी जेव्हा विकसित होऊ लागली तेव्हा त्याला प्रश्न पडू लागले... एवढा अचूक मनुष्यदेह बनवणारा निर्मीक किती कुशल कारागीर असेल.. देव संकल्पनेचा जन्म तिथे झाला.. नंतर अनेक संस्कृती आल्या.. काळाच्या ओघात नष्ट झाल्या.. अनेक धर्म आले.. आणि त्यांचे धर्मग्रंथ आले, ज्यात देव आणि सृष्टीची निर्मिती हाच विषय प्रमुख होता...

हा जो निर्मीक आहे,  तो सुद्धा कुणाची तरी निर्मिती असेल असा प्रश्न उपस्थित झाला तर तो मात्र स्वयंभू असे सोयीस्कर उत्तर दिले जायचे. यावर शंका उपस्थित करायची तर पर्यायी सिद्धांत मांडावा लागणार..  जोवर प्रकाश नसतो तोवरच अंधार असतो.. चार्ल्स डार्विनने उत्क्रांती चा सिद्धांत मांडला... मानवाचा पूर्वज कोण होता, जीवसृष्टीची निर्मिती कशी झाली याचे कोडे सुटले.. आणि देव संकल्पनेची गरज राहिली नाही.. म्हणजे एका अर्थाने देवाला रिटायर करणारा माणूस म्हणजे चार्ल्स डार्विन..

चार्ल्सचा जन्म १२ फेब्रुवारी १८०९ रोजी इंग्लंडमध्ये शॉर्पशायर जवळच्या एका खेडेगावात सधन कुटुंबात झाला.  वडील नामांकित डाॅक्टर, आई पण श्रीमंत घरातून आलेली.. सगळीकडे सुबत्ता.. सहा भावंडापैकी चार्ल्सचा नंबर पाचवा.. वडिलांचे वडील तसेच आईचे वडील हे दोन्ही सामाजिक चळवळीत अग्रेसर.. गुलामांच्या व्यापाराविरुद्ध लढणारे, त्यामुळे वैचारिक वारसा तर लाभला होताच, शिवाय धार्मिक कर्मकांडे  करण्याची सक्ती नसल्याने बालपण मस्त उपभोगता आले चार्ल्सला... 🙂

वयाच्या आठव्या वर्षी आई वारली, मोठ्या बहिणीकडे घरातील सूत्रे गेली.. तिला काय हा जुमानेसा झाला.. शेजारी सफरचंद बागेमध्ये चोऱ्या करणे, घरातील वस्तूचे "टिकावूतून टाकावू मध्ये" रुपांतर करणे🤣 हे त्याचे उद्योग जोरात. शाळेत गेला तर वर्गात कमी आणि बाहेर फुले, कीडे शोधत फिरण्यात याची प्रसिद्धी. मास्तरचा डोळा चुकवून पळून जाणे आणि निसर्गात उंडारणे यात त्याचा हातखंडा..

वकिलाच्या पोरांनी वकील व्हावे आणि डॉक्टरच्या पोरांनी डॉक्टर.. हा जगाचा अलिखित नियम.( असा खेळ, ज्यात पालकांनी केलेली practice पोरांना उपयोगी पडते😀) चार्ल्सचा तर बाप आणि बापाचा बाप पण डॉक्टर.. त्यामुळे याच्याकडे पर्याय नव्हता...मोठा झाल्यावर वडिलांच्या दवाखान्यात मदत करायला लागला.. आणि नंतर त्याकाळच्या सर्वात भारी एडिनबर्ग विद्यापीठामध्ये मेडिकलसाठी एडमिशन पण घेतले.

पण आपला हा "फरहान"..  त्याची आवड वेगळी होती.. पाने, फुले, कीडे, पाखर याचा छंद असलेल्या चार्ल्सला मानवी रक्त पाहून मळमळ व्हायची. वडिलांच्या आग्रहाखातर वैद्यकीय शिक्षणाला प्रवेश घेतला खरा, पण सर्जरी करण्याचे प्रशिक्षण घेत असताना माणसाचे रक्तबंबाळ अवयव बघून तो बिथरला...  त्याने दुसऱ्याचं वर्षी वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडून दिले..🙄

सायन्स जमले नाही अश्यांचे कला शाखेत सहर्ष स्वागत असते..😜 चार्ल्सचे पण तसेच झाले.. कला शाखेत पदवी घ्यायला ख्राईस्ट कॉलेज मध्ये तो दाखल झाला.. तिथे त्याला एक तरुण नातलग "फॉक्स" भेटला, ज्याने फुलपाखरांचा संग्रह केला होता. त्याच्यापासून प्रेरणा घेत चार्ल्सने कीटक जमवणे सुरू केले. फॉक्समुळेच चार्ल्सची वनस्पतीशास्त्र प्राध्यापक हेन्सलोशी ओळख झाली. त्यांची एवढी गट्टी जमली की चार्ल्सला लोक "हेन स्लो - मंद कोंबडी सोबत फिरणारा माणूस म्हणून चिडवायला लागले.🙂

मेडिकल कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्याने "प्लीनियन सोसायटी" जॉईन केली जिथे प्रस्थापित धर्म विचारांना तर्क आणि विज्ञानाचा आधार घेऊन प्रश्न केले जात असत, चर्चा घडत असत. तिथे त्याने शिंपल्यावर असणारे काळे ठिपके म्हणजे जलजळूची अंडी आहेत याबाबत शोधनिबंध सादर केला होता. हेनस्लो मुळे चार्ल्सच्या संशोधनाला दिशा मिळत गेली.. छंद जोपासत असतानाच पदवी चांगल्या मार्कने पूर्ण करून (कला शाखेत अभ्यास केला नाही तरी चालते याचे उदाहरण😭) चार्ल्स १८३१ साली पदवीधर झाला.
पदवी घेऊन भाऊने मस्त सुट्टी एन्जॉय केली. घरी पोचला तर त्याच्या आधी हेनस्लोचे पत्र घरी पोचले होते. "बिगल" नावाचे जहाज दोन वर्ष दक्षिण अमेरिकेच्या दौऱ्यावर निघणार होते, नकाशे बनवणे हा मुख्य हेतू होता. हेनस्लोचे म्हणणे होते, चार्ल्सने या जहाजावर जावे आणि ठिकठिकाणी सापडणाऱ्या किटकांवर संशोधन करावे. चार्ल्सच्या वडिलांना अर्थातच हे भिकार धंदे वाटले.. चार्ल्सने जायचा हट्ट केला तर नेहमीचे तेच शत्र.. 😟 "जायचे तर जा पण मी पाच पैसे देणार नाही" बाहेर काढले. चार्ल्सने पडत्या फळाची आज्ञा मनावर घेत बोलला.. done pappa❤️ २७ डिसेंबर १८३१ रोजी चार्ल्स प्रवासाला निघाला.

गम्मत म्हणजे चार्ल्सला आधी या जहाजावर प्रवेश नाकारला.. कारण होते त्याचे नाक.. "वाकड्या नाकाच्या चार्ल्स चे थोबाड रोज पाहायला लागेल" बीगलच्या कप्तानाने त्याला हुसकले.. मात्र हेनस्लोने मध्यस्थी केली आणि चार्ल्सला बोटीवर निसर्गशास्त्रज्ञ  म्हणून "विनावेतन" नोकरी दिली.😀 त्यामुळे चार्ल्स चा बोटीवरील प्रवास विनामूल्य हो‌ऊ शकला. जेवणाचा खर्च चार्ल्स ने स्वतःच करायचा होता. त्याचा मामेभाऊ या खर्चासाठी उभा राहिला. (नंतर चार्ल्स त्याचा दाजीबा पण झाला😉)

बोटीचा हाच कप्तान नंतर चार्ल्सचे काम पाहून त्याचा फॅन झाला. मात्र प्रवास सोपा नव्हता.. त्यात चार्ल्स सारख्या "अमीर बाप की औलाद साठी." प्रवासात बोट लागून चार्ल्स चांगलाच आजारी पडला. मात्र वेळेचा सदुपयोग करत बेडवर झोपूनच चार्ल्सने "लायेल"चे भूगर्भशास्त्रावरचे पुस्तक वाचले. खंडांची निर्मिती कशी होत गेली हे वाचत असतानाच चार्ल्सच्या डोक्यात सजीवांच्या उत्क्रांतीची कल्पना आली. पुढे भूकवचाची हालचाल आणि सजीवांची उत्क्रांती यांची सांगड त्याने घातली.
दोन वर्षासाठी निघालेल्या जहाजाला परत यायला पाच वर्ष लागली. इ. स. १८३१–३६ या पाच वर्षांच्या काळात द. अमेरिका, अटलांटिक महासागरातील बेटे, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, गालॅपागस बेटे, केप ऑफ गुड होप, टास्मानिया, सेंट हेलेना इ. ठिकाणी केलेल्या प्रवासात चार्ल्सने तेथील प्राणी, वनस्पती व खडक यांचे निरीक्षण आणि नमुन्यांचा संग्रह केला. प्राणी आणि वनस्पती यांच्या विविध जातींतील फरक व "भिन्न नैसर्गिक परिस्थितींशी त्यांचे जुळवून घेणे" यांचे निरीक्षण करताना जंगलातून शेकडो मैल पायपीट केली होती.

एकदा डार्विनला एक खूप मोठं सूरनळीसारखे फूल दिसले, तेव्हा तो म्हणाला की - एवढी खोल जीभ असणारा कीटक सुद्धा नक्की असणार. तेव्हा असा कीटक कुणाला माहीत नव्हता. ज्या अर्धी या फुलाचे परागसिंचन होते त्याअर्थी कुणी कीटक असलाच पाहिजे हा तर्क बरोबर होता. डार्विन यांनी १८६२–८१ या अवधीत वनस्पती व प्राणी यांसंबंधीचे दहा उत्तम ग्रंथ लिहिले  त्यात त्याने या किटकाचा उल्लेख केला होता. डार्विनच्या मृत्यूनंतर पन्नासेक वर्षांनी त्या किटकाचा शोध लागलाच. तर्कशुध्द विचार असेल तर तो सिद्ध होणारच.✊🏾 
डार्विनचा सिद्धांत काय असे विचारले तर हमखास उत्तर मिळते "Survival Of The Fittest" मात्र बलवान तोच टिकतो हा डार्विनचा सिद्धांत नाही.. जो बदलत्या परिस्थितीत स्वतःला बदलून घेतो हा डार्विनचा सिद्धांत आहे. हर्बर्ट स्पेन्सर याने १८६४ ला “Survival of the fittest” ह्या वाक्याचा वापर पहिल्यांदा केला. पुढे १८६९ मध्ये डार्विनच्या ओरिजिन ऑफ स्पेसिज मध्ये हे वाक्य समाविष्ट करण्यात आले.

उत्क्रांतीचा सिद्धांत म्हटलं की डार्विन हे नाव आठवतं. मात्र उत्क्रांतीचा सिध्दांत पण उत्क्रांत होत गेला आहे बर का.. (आमच्या धर्मात नेहमीप्रमाणे अगदी स्पष्ट वर्णन आहेच..🙊 दशावतार हेच उत्क्रांतीचे रुप आहे.😁😭) डार्विनच्या हजार वर्षे सन ७७६ मध्ये इराकमधील मुस्लिम तत्वज्ञ अल्-जहिज यांनी उत्क्रांतीची कल्पना मांडली होती. 'नैसर्गिक निवडी'च्या प्रक्रियेद्वारे प्राण्यांमध्ये कसे बदल घडून येतात, हे समजावून देण्यासाठी अल्-जहिज यांनी एक पुस्तक लिहिलं होत. खुद्द डार्विनच्या डॉक्टर असलेल्या आजोबा इरासमस डार्विन यांनी देखील १०० वर्षापूर्वी झूनोमिया मध्ये वनस्पती आणि प्राणी उत्क्रांत होत जातात हे मांडले होते.
उत्क्रांती वादाचे जनकत्व डार्विनला मिळाले त्यात योगायोगाचा पण भाग आहे. दौरा करून १८३५ मध्ये डार्विन इंग्लंडला परत आला. १८४२ साली त्याचा उत्क्रांतिविषयक प्रबंध लिहून तयार केला. मात्र उत्क्रांती सिध्दांत म्हणजे बायबलचे पुस्तक रद्दीत काढण्यासारखे होते. बायबलमध्ये म्हटले होते की ख्रिस्तपूर्व ४००४ मध्ये ईश्वराने सहा दिवसांत अखिल सृष्टीची रचना केली.  'अॕडम आणि इव' यांच्या प्रायोगिक तत्वावरील संयोगातून😍 वाढलेला मानव वंश.. माकडाशी नाते सांगणे म्हणजे धर्मगुरूंच्या रोषाला सामोरे जाणे. स्वतः मेल्यावरच हा प्रबंध प्रसिद्ध होईल अशा खटाटोपात डार्विन होता. त्याने हे हस्तलिखित बायकोच्या सुपूर्द केले आणि सांगून ठेवले होते की मी मेल्यावर हे प्रसिद्ध कर.. एवढी दहशत होती धर्माची😡

मात्र सन १८५५ मध्ये त्याला एक पत्र मिळालं..  त्या पत्रात आल्फ्रेड वॉलेस या संशोधकाने डार्विन प्रमाणेच संशोधन करून उत्क्रांती सिद्धांत मांडला होता.. डार्विनचा याविषयी अभ्यास आहे हे माहीत असल्याने त्याने अभिप्रायासाठी पाठवला होता. डार्विनच्या पायाखालची वाळू सरकली. कारण मेहनत तर वॉलेसने देखील घेतली होती. त्याने देखील जहाज सफरीमध्ये जीव धोक्यात घालून नमुने गोळा केले होते आणि प्रदीर्घ संशोधन करून सिद्धांत मांडला होता.

१८५२ साली अमेरिकन मोहिमेमध्ये अमेझॉन च्या जंगलात स्थानिक रेड इंडियन लोकांमध्ये राहून वॉलेसने भरपूर नमुने गोळा केले होते.. मात्र जहाजाला आग लागली तेव्हा वॉलेसचे सर्व साहित्य भस्मसात झाले.. तरी न खचता वॉलेस नंतर १८५४ मध्ये पूर्वेकडील देशांत गेला. तिथे मात्र त्याने वॉलेस लाईन रेषा शोधून काढली. इंडोनेशियावरून त्याने अशी एक काल्पनिक रेषा ओढली की त्या रेषेच्या पूर्वेला ऑस्ट्रेलियातील प्राण्यांशी साधर्म्य दाखवणारे प्राणी सापडतात आणि पश्चिमेला आशियातील प्राण्यांशी साधर्म्य दाखवणारे प्राणी आढळतात. या काल्पनिक रेषेला 'वॉलेस लाईन' म्हणतात.
डार्विन व वॉलेस यांच्या सिद्धांतात कमालीचे साम्य होते. दोघांचेही विचार एकाच प्रकारचे होते. डार्विनने वॉलेसचा प्रबंध चार्ल्स लायेल आणि डॉ. हूकर यांना दाखवला. त्या दोघांनी वाद टाळण्यासाठी दोघांना मान्य होईल असा तोडगा काढला. डार्विनचा १८४२ चा शोधनिबंध आणि वॉलेसचा १८५५ चा शोधनिबंध दोन्ही १ जुलै १८५८ रोजी लिनिअस सोसायटी कडे एकाचवेळी एकत्रितरीत्या सादर केले. उत्क्रांतीच्या शोधाच्या इतिहासात वॉलेसला देखील डार्विनच्या बरोबरीने श्रेय दिले गेले. खरे तर यात दोघांचे मोठेपण दिसून येते.
डार्विन ने घाबरून १६ वर्ष वाया घालवली ती भीती व्यर्थ नव्हती. खरं तर डार्विनची पुस्तकातील भाषा ही अतिशय जबाबदारपूर्ण, संयमी आहे. देव नाही असं म्हणण्यापेक्षा, 'माहित नाही असू शकेल' अशी भूमिका डार्विनने घेतली आहे. तरीदेखील  चर्चने डार्विनविरोधात भूमिका घेतली. डार्विन हयात असताना त्याला प्रचंड तिरस्काराचा सामना करावा लागला. आता त्याचा मृत्यूच्या १२५ वर्षांनंतर चर्च ऑफ इंग्लंड ने पत्र काढून डार्विन बरोबर होता हे मान्य करत त्याचा केलेल्या अपमानाबद्दल जाहीर माफी मागीतली आहे. (तिकडे माफी मागण्याचा मोठेपणा तरी दाखवला.. आपल्याकडे सावित्रीमाई फुले यांची माफी मागतील का सनातनी 🤔)

सावित्रीमाई फुलेंची माफी मागणे जाऊ द्या.. (माय आहे, कधीच माफ केले असेल) आता तर आपल्याकडे डार्विन सिद्धांताला विरोध करणे सुरू आहे. भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्याच्या राज्यमंत्र्यांनी सभेत जाहीर विधान केले  ‘‘डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत शास्त्रीयदृष्टय़ा चुकीचा असल्यामुळे तो शाळा-कॉलेजातून शिकविणे बंद केले पाहिजे, पृथ्वीतलावर माणूस सुरुवातीपासून माणूस म्हणूनच वास्तव्य करून आहे. आपल्या पूर्वजांसह कोणीही, लिखित किंवा मौखिक रूपात माकडाचे रूपांतर माणसात होत असताना पाहिले नाही" हे मंत्री स्वतः रसायनशास्त्रात Msc आहेत. त्यांचा स्वतचा काय केमिकल लोच्या झाला आहे त्यांना कळेना😜

तर्क नसेल आयुष्यात तर त्याला काहीच अर्थ नाही.. आणि आयुष्यात प्रत्येक गोष्टीत तर्क वापरणे हाच खरा संस्कार.. डार्विनचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा विज्ञानाच्या व तर्काच्या चष्म्यातून असे. अगदी विवाहाबाबत देखील  त्याने फायदे आणि नुकसान याचे टिपण काढले होते..🤣 "फायद्यात" म्हातारपण आणि आजारपणात साथ यासारखा मुद्दा तर "नुकसान" मध्ये संशोधनाला वेळ कमी मिळणे, पुस्तक खरेदीला पैसे कमी पडणे इत्यादी बाबी मांडल्या होत्या🙄 असल्या येडपटला बाहेरची मुलगी कोण तयार होईल.. मामाची मुलगी होती म्हणून त्याचे दोनाचे चार हात झाले..  

एम्मा वेजवूड या त्याच्यापेक्षा नऊ महिन्याने मोठ्या असलेल्या धनवान मामेबहिणीशी त्याचा विवाह झाला. पोटापाण्याचा प्रश्न त्याला नव्हताच. कायम किड्यासोबत राहिल्यामुळे दौरा करून आल्यावर डार्विन खूप दिवस आजारी होता. त्याची सेवा करत एम्माने त्याला दहा पोरं दिली (इथे पण भाऊ काय संशोधन करत होता का.. काय माहीत 😀) डार्विन रोज तिच्याही अर्धा तास सारीपाट खेळायचा.. आणि कोण कसे जिंकले ते पण लिहून ठेवायचा.. किती विक्षिप्त ना.. खर तर त्याच्या विक्षिप्तपणाचे भरपूर किस्से प्रसिद्ध आहेत.

एकेकाळी रक्त पाहून मळमळ होणारा डार्विन मोहिमेवर असताना जवळ आढळणारे काहीच खाल्ल्यावाचून सोडत नव्हता. अगदी अनेक प्रकारचे कीटक, छोटे मोठे पक्षी- प्राणी यांचा त्यात समावेश होता.. अनुभवावरून तो म्हणतो की घुबड सोडून इतर काय पण खावा बिंदास.. एकदा त्याने घुबडाचे मांस खाल्ले होते त्यावेळी त्यांच्या तोंडाची चव दहा दिवस गेली नव्हती. भाऊ नुसता खात नव्हता तर खाल्लेल्या प्रत्येक प्राण्याच्या चवीची देखील त्याने नोंद करून ठेवली. हे सगळ्या गोष्टीच्या नोंदीचा विषय लयं हार्ड राव😀

डार्विन स्वतःला नास्तिक म्हणवत नसे, तो म्हणे मी अज्ञेयवादी आहे. मात्र चर्चमध्ये तो कधीच जात नसे. वैद्यकीय शिक्षण अर्धवट सोडलेल्या डार्विनला केंब्रिज विद्यापीठाची मानद डॉक्टरेट वयाच्या ६८ व्या वर्षी मिळाली. त्याने आयुष्यभर विपुल लेखन केले असले तरी अमेरिकेतून परतल्यापासून त्याची तब्येत कायम नाजूक राहिली... तिथे त्याला एक किडा चावला होता, ज्यामुळे हृदय विकार होतात. डार्विनच्या बायकोने त्याची उत्तम बडदास्त ठेवली म्हणून ७३ वर्षाचे आयुष्य तो जगू शकला. १९ एप्रिल १८८२ रोजी त्याने शेवटचा श्वास घेतला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे दफन इंग्लडच्या प्रसिद्ध वेस्टमिनिस्टर आबेच्या शेजारी करण्यात आले. आयझॅक न्यूटन आणि जॉन हर्षेल नंतर डार्विन हा तिसरा संशोधक होता ज्याला हा सन्मान मिळाला होता.

डार्विन बाबत गम्मत अशी की नाझी आणि साम्यवाद या परस्पर विरोधी बाबींच्या जन्मदात्यांना डार्विन आणि त्याचा सिद्धांत पटला. कार्ल मार्क्स डार्विनच्या कार्याने प्रभावित झाला होता. त्यांच्यात पत्रव्यवहार देखील होत होता. ( मार्क्सने दास कॅपिटल हे पुस्तक डार्विनला समर्पित केले ही मात्र अफवा आहे) हिटलरने डार्विनवादाचा सोयीस्कर वापर केला.. त्याने हे नाही समजून घेतले की सर्वांचा पूर्वज एक आहे.. "जे बळकट आहेत तेच टिकणार" याचा उलट अर्थ घेऊन स्वतःच दुबळ्या केलेल्या जनसमुदायाचा संहार केला. मानवाच्या आत वसलेली क्रूरता ही काही उत्क्रांती मध्ये त्याच्या शेपटी प्रमाणे गळून पडली नाही😔
आज तरी काय .. स्वतःला उत्क्रांत म्हणवून घेणाऱ्या मानवाने जगभर बलात्काराचे सत्रच चालवले आहे. इतर सजीवांवर तसेच मानव वंशावर सुद्धा..या वसुंधरेवर २० लाख सजिवांच्या जाती आहेत, त्यातील एकच सजीव मानव.. त्याने धर्म, जात, लिंग, वंश, प्रांत भाषा अशा हजारो भिंती तयार केल्यात. एक 'सोफिया' यंत्रमानव बनवली आहे आता.. मात्र भविष्यात प्रत्येक गटाची अशी यंत्रमानव सेना तयार होऊन एकमेकाला नष्ट करायची योजना करतील. आणि एक दिवस Survival of the fittest हा सिद्धांत खोटा ठरेल... सगळ्यात फिट्ट मानव वंश नष्ट होईल.. आणि दुसरी एखादी प्रजाती बुद्धिमान होऊन आपल्यावर संशोधन करेल..मानववंश का बरे नष्ट झाला.. 😔

#richyabhau
#Darwin

आपला ब्लॉग 
https://richyabhau.blogspot.com/

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव