रॉबर्ट बॉयल.. किमयागार

रॉबर्ट बॉयल.. किमयागार
मानवाच्या इतिहासात जेव्हा सोने हा क्रय धातू झाला.. तेव्हापासून मानवाला त्याचा हव्यास. मिळेल तो धातू सोने कसे करता येईल यासाठी मानवाने प्रचंड प्रयत्न केले... जगभरात लाखो किमयागार इतर धातूपासून सोने बनवण्याचा प्रयत्न करत होते.. प्रयोगांच्या अपयशासोबत अनेक दंतकथा जन्माला येत होत्या..मात्र रसायनांवर वारंवार प्रयोग करण्यातून मानवाला वैज्ञानिक दृष्टिकोन समजत गेला आणि रसायनशास्त्र विकसित होऊ लागले..  या शास्त्राचा जनक समजला जातो रॉबर्ट बॉयल.

रॉबर्ट बॉयलचा जन्म अगदी अलीकडचा.. सतराव्या शतकात. त्याआधीच मानवाने रसायनांचा वापर करून वस्तू तसेच औषध निर्मितीमध्ये मोठी मजल मारली होती. भारतात नागार्जुन यांनी लिहलेले रसायनशास्त्र विषयावरील ग्रंथ जगभर अनुवादित करून वाचले जात होते. मात्र तर्क, प्रयोग, निरीक्षण, अनुमान आणि पुनप्रचीती या वैज्ञानिक दृष्टिकोनातील अंगभूत बाबींचा केलेला वापर पाहता गॅलिलिओ हाच "सर्व आधुनिक विज्ञानाचा जनक" मानला जातो. रसायनशास्त्रासाठी हा मान
गॅलीलिओचा एकलव्य शिष्य रॉबर्ट बॉयल याला मिळतो.

२५ जानेवारी १६२७ रोजी आयर्लंड मध्ये रॉबर्ट चा जन्म झाला.. त्यावेळी इंग्लंड मधील सर्वात श्रीमंत असलेल्या व्यक्तीच्या घरात... त्या व्यक्तीचे चौदावे अपत्य म्हणून... याच्या नंतर पण एक झाले बर का.. पंधरा भावंडात बारा जगली.. त्यात पाच पोरं आणि सात पोरी... त्यात याच्या वडिलांची सवय काय तर पोरं भक्कम बनली पाहिजेत यासाठी त्यांना गरीब घरात लहानाचे मोठे करायचे...🤔 (हे बरं आहे.. जन्माला घालायचं आणि लोकांना सांभाळायला द्यायचं🙊) 

तर आपला हा गंगा शक्ती कपूर च्या घरात नाही.. गरीब शिवाजी साटम च्या घरात मोठा होऊ लागला.. त्याच्या बोलण्यात तीतरेपणा निर्माण झाला होता...  तीन वर्षाचा झाला होता तेव्हा अजून एक बहिण जन्माला घालून याची आई वारली.. (एवढी बाळंतपण. जणू काही यंत्र आहे😔) मग वडिलांनी सगळी पोर घरी आणली आणि घरातच त्यांची शाळा सुरू झाली.. लॅटीन, ग्रीक आणि फ्रेंच भाषा शिकवल्या गेल्या.

आठ वर्षाचा रॉबर्ट मोठ्या भावासोबत "इटोन" या प्रसिद्ध शाळेत दाखल झाला. बडे बाप का लडका... जॉन हॅरिसन या मुख्याध्यापकांनी दोघांना स्वतच्या घरातच ठेऊन घेतले. त्यांचे रॉबर्ट कडे विशेष लक्ष होते.. त्यामुळे शिक्षण व्यवस्थित सुरू होते. मात्र तीन वर्षांनी हॅरिसन निवृत्त झाले आणि नवीन शिस्तप्रिय मुख्याध्यापक आले.. रॉबर्टला त्यांच्या शिस्तिशी जुळवून घेता येईना.. मग.. मग काय..  रॉबर्टने शाळा सोडली.. पुन्हा शिक्षक बोलावून घरीच शिकवणी सुरु..

रॉबर्ट बारा वर्षाचा असताना त्याच्या वडिलांनी त्याला मोठा भाऊ आणि शिक्षका सोबत युरोप टूर साठी पाठवले. किमान तीन वर्ष वेगवेगळ्या देशात राहून तेथील संस्कृती, शिष्टाचार शिकणे हा हेतू. १६४२ मध्ये आयर्लंड मध्ये बंड सुरू झाले, भाऊ मायदेशी परतला मात्र रॉबर्ट ने इटली मध्येच राहणे पसंद केले.. १६४२ वर्ष माहीत का..🤔 होय जानेवारी मध्ये गॅलिलिओ मेला आणि डिसेंबर मध्ये न्यूटन जन्माला आला तेच वर्ष...

गॅलिलिओ ज्या शहरात राहत होता तिथेच रॉबर्ट पण होता.. गॅलिलिओच्या मृत्यूनंतर त्याच्या कामावर खूप चर्चा व्हायला लागल्या.. रॉबर्ट त्या प्रभावात आला. मनोमन गॅलिलिओला गुरू मानले. आणि विज्ञानाच्या जोपासणे मध्येच आयुष्य घालवायचा निश्चय केला. गॅलिलिओने रॉबर्ट बॉयलला प्रेरणा दिली.. आणि रॉबर्ट बॉयलने आयझॅक न्यूटनला..❤️

सतरा वर्षांचा रॉबर्ट इंग्लंडला परत आला. वडील भरपूर इस्टेट मागे ठेवून ऑफ झालेले... त्याकाळात इंग्लंडमध्ये राजा आणि धर्मसंसद यांचा तिढा सुरू होता.. लवकरच धर्मसंसद राजापेक्षा मोठी झाली..  धर्माचे ठेकेदार असलेल्यांनी ख्रिसमस साजरा करण्यावर देखील बंदी आणली होती (त्यांच्या मते ख्रिसमस साजरा करणे बायबल विरोधी होते. इंग्लंड मध्ये तेरा वर्ष बंदी होती तर अमेरिकेत काही वसाहती मध्ये १८० वर्ष😬)

पापभिरू धार्मिक असलेल्या रॉबर्टला अर्थात सामाजिक बदलाशी घेणे देणे नव्हते... आयर्लंडचे बंड असो किंवा धर्माने जनतेच्या जीवनावर केलेले अतिक्रमण... आपण भले, आपली इस्टेट भली असे कातडीबचाऊ धोरण रॉबर्टचे... कोणत्याही बॉलरशी पंगा ना घेणारा vvs लक्ष्मण होता जणू काही...😔  नाही म्हणायला एकच धाडसाचे काम त्याने केले.. गॅलिलिओचे साहित्य बाळगायला बंदी असताना व्हाया स्विजरलंड त्याने हे साहित्य चोरून मिळवले आणि अभ्यास सुरू केला.

इंग्लंडमध्ये धर्मसंसद प्रबळ झाल्यावरचा काळ सर्वाधिक अंधश्रद्धेचा होता. १६४४ ते १६४७ या तीन वर्षात तीनशेपेक्षा जास्त महिलांना चेटकीण असल्याच्या संशयावरून जाळण्यात आले होते. चेटकीण शोधण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा होती. त्यातील " स्वयंघोषित जनरल" खूप आनंदाने संशयित बायकांना पकडून जिवंत जाळत असे. मात्र मरणाऱ्या स्त्रीने मृत्यूपूर्वी आणखी एका स्त्रीवर संशय व्यक्त करायचा.. की मग काही दिवसांनी तिलापण जाळणार.. आणि तिच्याकडून पण एक नाव.. क्रुरतेचे चक्र अव्याहतपणे सुरूच.. धर्माची एवढी दहशत होती, त्यात रॉबर्टचे गुळणी धरून बसणे आपण समजून घेऊ शकतो.
तेव्हा अंधश्रद्धा आणि  रसायनशास्त्राचे पण नाते होते.. कारण याचा वापर मुख्यतः तांबे किंवा इतर धातू यांच्या पासून सोने मिळवण्याचा प्रयत्न करताना होत होता. केमिस्ट्री मधला केमी शब्द आला आहे इजिप्त च्या केमि (काळा) या नावावरून. नाईल नदीच्या चिखलामुळे त्याचा किनारा  काळा दिसतो म्हणून त्याचे नाव ‘केमि’ या देशात धातू कला विकसित झाली होती, म्हणून धतुकलेला अल किमया असे नाव तर त्यातील कारागिरांना किमयागार नाव पडले. भारतात हे नाव जसेच्या तसे स्वीकारले गेले..  किमयाला गूढ वलय प्राप्त झाले.. आता तर किमया हा शब्द जादू, नवल यासाठी आपण वापरतो. अरबी भाषेतील alchemy आणि अल्केमिस्ट हा शब्द इंग्लिश मध्ये पण रुळला. 
आज विषयांतर खूप होते आहे.. रॉबर्टचे आयुष्य तसेही खूप एकसुरी आहे.. त्यात रंजकता नाहीच.. ना प्रेमात पडला, ना लग्न केले, ना कधी संघर्ष केला. ज्या संस्थेचा संस्थापक सदस्य होता अश्या जगप्रसिद्ध रॉयल सोसायटीचे अध्यक्ष पद स्वीकारायला नकार दिला.. कारण त्या संस्थेचे ब्रीदवाक्य होते " Nullus in verba" म्हणजे शब्दप्रामाण्य मानणार नाही, थोडक्यात "बायबलला आव्हान" .. भाऊ वादापासुन चार हात लांबच  राहणे पसंद करणार😬

बॉयल मायदेशी परतला आणि  अभ्यास आणि प्रयोग सुरू केले. आठ वर्ष त्याने स्वतःला अगदी झापडबंद करून संशोधनाला वाहून घेतले. १६५२ मध्ये तो आयर्लंड मध्ये आपल्या गावी शिफ्ट झाला मात्र रसायनांचे प्रयोग करायला अनुकूल वातावरण नसल्याने दोन वर्षात पुन्हा इंग्लंड मध्ये परतला. आता त्याने जय्यत प्रयोगशाळा थाटली.  रॉबर्ट हूक हा संशोधक त्याला मदत करण्यास मिळाला. हूकने १६५५ ते १६६२ अशी आठ वर्ष बॉइलचा पगारी साहाय्यक म्हणून काम केले. जगप्रसिद्ध "बॉयल लॉ" चा प्रयोग करताना आवश्यक पंप हूकनेच तयार करून दिला होता. 
"हवेचा दाब हा त्या हवेला उपलब्ध असलेल्या आकार मानाच्या व्यस्त प्रमाणात बदलतो" या नियमाला मान्यता मिळाली आणि रॉबर्ट बॉयलचे नाव प्रसिद्ध झाले. या प्रयोगाला बॉयल ने गॅलिलिओस समर्पित केले होते. बॉयलने निर्वात पोकळीवर अनेक प्रयोग केले. निर्वात पोकळीतून ध्वनी पास होऊ शकत नाही. मात्र प्रकाश आणि चुंबकीय क्षेत्र मात्र पास होते हे त्याने शोधून काढले.

आपल्याकडे जसे आयुर्वेदात कफ, पित्त आणि वात प्रकृती सांगितली जाते, तसे इंग्लंड मध्ये जल, वायू आणि अग्नी ही तत्वे आणि त्यांची मीठ, पारा आणि गंधक ही रूपके वापरण्यात येत होती. या तीनच रसायनाचा वापर  रक्तद्वारे किंवा उलटीमार्गे करून  इलाज करणे त्याकाळात प्रचलित होते. याला रॉबर्ट बॉयल यांनी कडाडून विरोध केला. त्यांनी इलाज करण्यासाठी इतर रसायनाचा वापर सुरू केला..त्यात साथ दिली त्यांच्या बहिणीने... इतिहासाने अनुल्लेख केलेल्या कॅथरीन जोन्स या शास्त्रज्ञीचा (शब्द भारी आहे हा🤔) उल्लेख केल्याशिवाय रॉबर्ट बॉयलची माहिती पूर्ण होणार नाही. 
कॅथरीन ही रॉबर्ट पेक्षा बारा वर्षांनी मोठी. रॉबर्ट चा जन्म व्हायच्या आधी भरपूर हुंडा (आजच्या काळातील चार कोटी रुपये)  देऊन नऊ वर्षाच्या कॅथरीनचे कल्याणम उरकले पण होते. मात्र सासरच्या लोकांची हाव वाढत गेली.. शेवटी पप्पांनी तिला घरी आणली. कॅथरीन पंधरा वर्षांची झाल्यावर दुसरे लग्न करून जोन्स घरात पडली.. चार पोरं झाली. मात्र तिचा हा नवरा बाहेर ख्याली होता. १६४१ चा काळ होता.. आयरिश बंड सुरु असताना मोठ्या मुश्किलीने  कॅथरीन इंग्लंड मध्ये आली.. तिने रसायनी प्रयोगशाळा तयार केली ज्यामध्ये रॉबर्ट ची इतर भावंडे संशोधन करत असत. 

रॉबर्ट १६६८ मध्ये कॅथरीन सोबतच काम करू लागला ते अगदी दोघांच्या मृत्यूपर्यंत... मात्र १६४४-१६६८ या मध्यल्या चोवीस वर्षात त्यांचा मोठा पत्रव्यवहार झाला आहे ज्यातून आपण म्हणू शकतो की रॉबर्ट च्या सगळ्या संशोधनामध्ये कॅथरीनची मदत आहे. अर्थात त्या काळात बायकांनी असे काही प्रसिद्ध करायचे नसते.. त्यात ही परितकत्या. (हिनेच नवऱ्याला सोडले.. मात्र कायदेशीर घटस्फोट घेतला नव्हता) त्यामुळे कोणत्याही संशोधन प्रबंधावर तिचे नाव नाही. 😔

कॅथरीन आणि रॉबर्ट यांनी मुडदुसावर केलेले उपचार उल्लेखनीय समजले जातात. ड जीवनसत्व अभावी हा आजार होतो हे आपल्याला माहीत. या आजारावर अमोनियम सॉल्ट आणि त्यांब्या पासून बनवलेले कॉलकोथर यांचं मिश्रण गुणकारी ठरू लागले.. आणि मौखिक प्रसिध्दी होऊन दूरदूरचे लोक रुग्ण घेऊन त्यांच्याकडे यायला लागले. सर्व रुग्णांची माहिती, निरीक्षणे, परिणाम यासर्वांची व्यवस्थित माहिती गोळा केली त्यांनी ( आता त्यांच्याकडे सहायक टीम खूप मोठी होती) 

या दोघांनी आधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोन वापरत तेवीस वर्ष सोबत भरपूर काम केले.. आणि विशेष म्हणजे मारताना देखील दोघांत केवळ सात दिवसांचे अंतर राहिले.७५ वर्षाची कॅथरीन मेल्यानंतर सातच दिवसात ६३ वर्षाचा रॉबर्ट देखील हृदय विकाराचा झटका येऊन मेला. रॉबर्ट चे नाव जगात अजरामर झाले आहे. मात्र कॅथरीनचे योगदान विसरून चालणार नाही.🙏

रॉबर्टचे अपूर्ण प्रयोग पण बरेच आहेत. काडेपेटीचा शोध त्याच्याकडून लागता लागता राहिला. नुकताच फॉस्फरसचा शोध लागला होता. एकदा त्याच्याकडे असलेल्या फॉस्फरसच्या शीटवर रॉबर्ट ने सहज सल्फरमध्ये बसवलेली लाकडी काडी घासली आणि काडी पेटली देखील. पण दुर्दैवाने रॉबर्टने यातून कोणताही उपयुक्त निष्कर्ष काढला नाही.😭 १८०५ मध्ये काडेपेटी बनवायचे श्रेय जीन चांसल यांना जाते.

निर्वात पोकळीत आग लागू शकत नाही हे रॉबर्ट ने शोधून काढले. म्हणजे वस्तूच्या ज्वलनाला हवा आवश्यक असते हे त्याने शोधले  मात्र तोवर ओक्सिजन चा शोध लागला नव्हता.. इथे देखील रॉबर्ट ला संधी होती. तांबे सोने चांदी ही मूलद्रव्ये नसून संयुगे आहेत अशी चुकीची मांडणी रॉबर्ट करायचा.. रॉबर्ट नंतर १०० वर्षांनी सिद्ध झाले की ही मूलद्रव्येच आहेत. 

रॉबर्ट स्वत एक अजब मिश्रण होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांपैकी तो एक होता. धर्म प्रसारासाठी त्याने भरपूर पैसे दिले. काही लोकं आजारावर मात करण्यासाठी रत्ने वापरत.. त्यांची तो खिल्ली उडवायचा.. खडे, रत्ने यांचा वापर केवळ संमोहन करण्यासाठी होतो असे तो म्हणायचा. हजारो रुग्णांची चिकित्सा अतिशय वैज्ञानिक पद्धतीने करणारा हा बाबा देवाची चिकित्सा मात्र करायला घाबरायचा. (कदाचित कळत्या वयात लादलेले धर्माचे अवडंबर त्याच्या अंतर्मनात जाऊन बसले असेल).

त्याचे मृत्युपत्र हे खूप खास होते बर का.. आणि त्यात त्याने ज्या अपूर्ण इच्छा व्यक्त केल्या त्या वाचनीय आहेत. उडण्याची कला शिकणे, अतिशय बळकट तरीही हलके असे चिलखत बनवणे, कधी न विझनारा दिवा बनवणे, मानवी आयुष्य वाढविणे, कधी न बुडणारे जहाज बनवणे जे कितीही वादळात देखील तग धरेल, गोड स्वप्ने, बिनघोर झोप आणि वेदना कमी करणारे औषध बनवणे यासारख्या २४ इच्छा त्याने व्यक्त केल्या.. ज्यातील बहुतेक बाबी आता पूर्ण पण झाल्या आहेत. मानवाने स्वप्न पाहिली, त्याचा पाठपुरावा केला म्हणून तर हे शक्य झाले आहे.. 

स्वप्न बघत जा.. आजची स्वप्न .. त्याचा वैज्ञानिक पद्धतीने केलेला पाठपुरावा हेच उद्याचे वास्तव असेल..  सो कीप ड्रीमींग ❤️

#richyabhau
#Robert Boyle

आपला ब्लॉग https://richyabhau.blogspot.com/

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव