धम्मचक्रपरिवर्तनाची चौसष्ठ वर्षे

धम्मचक्रपरिवर्तनाची चौसष्ठ वर्षे

कोणते आकाश हे? तू आम्हा नेले कुठे?
तू दिलेले पंख हे.. पिंजरे गेले कुठे?
या भरार्‍या आमुच्या.. ही पाखरांची वंदना!

कालचे सारे मुके आज बोलू लागले
अन् तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले
हे वसंता, घे मनांच्या मोहरांची वंदना!

तू उभा सुर्यापरी राहिली कोठे निशा
एवढे आम्हा कळे ही तुझी आहे दिशा
मायबापा घे उद्याच्या अंकुरांची वंदना!

धम्मच्रकाची तुझ्या वाढवू आम्ही गती
हा तुझा झेंडा अम्ही घेतलेला सोबती
ऐक येणार्‍या युगांच्या आदरांची वंदना!
-सुरेश भट


पिढ्यापिढ्याच्या गुलामगिरीच्या जोखडाला झुगारून लाखो मानवांना बाबासाहेबांनी धम्माचा.. मुक्तीचा रस्ता दाखवला त्या घटनेला आज अशोकविजयादशमीला चौसष्ठ वर्ष पूर्ण होतील. खरं तर मी १४ तारखेचा आग्रही आहे, अश्विन शुद्ध दशमी या तिथीबाबत नाही.. मात्र या तिथीला सम्राट अशोकने धम्म स्वीकारला होता, म्हणून बाबासाहेबांनी हाच दिवस मुद्दाम निवडला होता असं अनुयायांचे म्हणणं आहे.. असो....  या वर्षी कोरोना मुळे दीक्षाभूमीवर लाखो लोकांचा समुदाय धम्मचक्रप्रवर्तनाचा दिवस साजरा करण्यापासून वंचित राहणार आहे.

हा दिवस क्रांतीचा... युगायुगाचा अंधार कापत मुक्तीचा सूर्य उगवला होता. धम्मचक्रपरिवर्तनाची ही घटना मनुवादावर मारलेली जबरदस्त लाथ होती. गेंड्याच्या कातडीच्या हिंदू धर्मावर मारलेली सणसणीत चपराक होती. "आम्ही काहीही करणार आणि तुम्ही निमूटपणे सहन केले पाहिजे " या पिढ्यानं पिढ्या जोपासलेल्या मुजोर वृत्तीला दिलेले चोख उत्तर होते.
धर्माच्या ठेकेदारांना तेव्हा बाबासाहेबांचे हे कृत्य आततायीपणाचे, अविचारी वाटले होते. हिंदू महासभेने थयथयाट केला होता.. मात्र त्यांना आधी आपल्या चुकीचे परिमार्जन करण्यासाठी पुरेशी संधी मिळाली होती मात्र त्यांनी ती दवडली. बाबासाहेबांनी त्यांची प्रसिद्ध " मी हिंदू म्हणून जन्माला  हिंदू म्हणून मरणार नाही"  ही घोषणा १९३५ साली केली आणि १९५६ मध्ये धम्म स्वीकारला यामधला काळ लक्षात घेणे गरजेचे आहे. यामधल्या २१ वर्षाच्या काळात बाबासाहेबांनी जगभरातील सर्व धर्मांचा अभ्यास केला आणि त्यांना अपेक्षित मानवतेला सर्वात जवळचा बुद्धाचा धम्म स्वीकारला आहे.

म्हणजे बाबासाहेबांनी सखोल विचारांती हे पाऊल उचललेले होते. धम्माचा स्वीकार हा नवीन क्रांतीचे विचार घेऊन येणार होता, अंधश्रद्धा, कर्मकांडे, जाती- पोटजातींमधील भेद संपून सर्व जनता गुण्यागोविंदाने, नैतिकतेने नांदेल असे स्वप्न बाबासाहेबांनी पहिले होते. आज चौसष्ट वर्षांनंतर हे स्वप्न पूर्ण झालंय का?
बाबासाहेबांनी अनुयायांना उघड्या डोळ्याचा बुद्ध  दिला आहे. हा बुद्ध स्वतः चिकित्सा करतो आणि इतरांनादेखील करायला शिकवतो. "मी म्हणतो म्हणून विश्वास ठेवू नका, स्वतः तपासून बघा" असे सांगणारा तथागत गौतम बुद्धासारखा धर्मसंस्थापक विरळाच. (इतर ठिकाणी मी सांगेल तोच शेवटचा शब्द असाच प्रकार🤕) मात्र बुद्धाने सांगितलेला  चिकित्सेचा भाग अनुयायांना समजला नाही, त्यांची उपासनापद्धती चालूच राहिली फक्त समोरची मूर्ती बदलली.

एका पिढीने देव नदीत बुडवले मात्र पुढच्या पिढीने परत आणले आणि कर्मकांडाला आळा बसला नाही. दीक्षाभूमीला जाणारी जनता जवळ पडते म्हणून डोके टेकवायला शेगावला देखील जाताना दिसते. सत्यनारायणाच्या पत्रिकेवर गौतम बुद्ध आणि बाबासाहेब दिसायला लागलेत. अश्या वर्गाला खडसावून त्यांचे डोळे उघडतील, प्रसंगी वाईटपणा घेतील असे लोक कमी पडयतायत असे नाईलाजाने म्हणावे लागेल. आता खरा धम्म आणि बाबासाहेबांचे स्वप्न लोकांपर्यंत पोचवण्याचे, फक्त पोचवण्याचेच नाही तर त्यांच्या रक्तात भिनवायचे काम चळवळी,  आणि विहारांना करावे लागणार आहे.

विहारात सातत्याने दर रविवारी उपक्रम घेतले जातात. त्यातील सातात्याबद्दल नक्कीच कौतुक आहे, मात्र तो केवळ एक उपचार बनू पाहतो आहे का असा संशय येतो. विशेषतः भीमस्तूती ऐकताना खरंच म्हणावं वाटते...  "कुठे नेऊन ठेवला आहे भीम माझा" 😡 एखाद्या व्यक्तीचे दैवती करण झाले की  त्याचे अनुकरण थांबते आणि भक्ती सुरु होते हे किमान तिथे उपस्थित जुन्या खोंडांना कळत नाही का.. मग  इतके वर्ष चळवळीत राहून काय घंटा समजली तुम्हाला चळवळ..🤬

समजण्याचा विषय सुरु म्हणून सांगतो.. अनेक वेळा विहारात व्याख्यानाला बोलावले जाते. तेव्हा भाषणाची सुरुवात होण्यापूर्वी त्रिशरण, पंचशील होणे आलेच. सगळ्यांना पाठ असते बरका..  मी नंतर व्याख्यानात पूढे बोलावून पंचशीलाचा अर्थ सांगायला लावतो तेव्हा अनेक लोक ज्यांना पाठ असते,  त्यांना अर्थ सांगता येत नाही. 😕

मग ही घोकंपट्टी कशासाठी.. आधीच्या धर्मात ब्राम्हण काय मंत्र म्हणायचा कळत नव्हते..  आता भन्ते काय बोलतात कळत नाही. नवीन धम्मात प्रतीक वापारायचा सोपस्कार आलाच.. फक्त प्रतीके बदलली. साडी, मंगळसूत्र यांचा रंग बदलला.. चिसौका ची उपासिका झाली, आणि कैलासवासीचा बुद्धवासी 🤣 सगळी वरवरची रंगसफेदी झाली.. आतला माणूस तसाच... ना दैववादातून बाहेर पडला ना जातीवादातून🤬 

जातीपातीच्या पाशातून मुक्त होऊन माणूस म्हणून जगावे हा धम्मचक्रपरिवर्तनाचा मुख्य उद्देश होता. मात्र धम्माचा स्वीकार केला तरी जातींमधली, पोटजातींमधली तेढ गेली नाही. ज्या जातिप्रथेने हजारो वर्षे समाजाचे शोषण केले त्याचा त्याग करायचा सोडून स्वतःची पोटजात कशी इतर पोटजातीपेक्षा श्रेष्ठ हेच सिद्ध करण्याची अहमिहिका चालू असलेली दिसून येते. पोटजातींमधीलच विस्तव जर जाणार नसेल तर जातींबद्दल न बोललेले बरे. गंगाधर पानतावणे आणि यशवंत मनोहर यांच्यामधील वादालासुद्धा पोटजातींमधील अस्मितेच्या तराजूवर तोलले गेले. 

आजही नागपूरमधली बौद्ध मुलगी पश्चिम महाराष्ट्रातील बौद्ध मुलाशी लग्न करू इच्छित असेल तर पोटजातीय अस्मिता आडव्या येतात. कासरा जळाला तरी त्याचा पीळ मात्र तसाच..   पोटजातींतर्गत बेटीव्यवहारावर जर अजून बंधने येत असतील तर जातीअंताची लढाई किती अवघड आणि दीर्घपल्ल्याची आहे याची कल्पना येते.☹️

याच जाती- पोटजातीतील बेगडी भेदभावाचा फायदा आजही मनुवादी विचारधारा जोपासनारे घेत आहेत. तुमच्या अस्मितेवर फुंकर घालत पेटलेल्या विस्तवावर   स्वतःची पोळी भाजत आहे. निळ्या झेंड्याच्या विस्ताराला शह देण्यासाठी पिवळ्या झेंड्याला बळ दिले जात आहे. कोंबडे झुंजवून त्यांची मजा पाहण्याचा त्यांचा उद्देश सफल होत आहे. या मनुवाद्यांना पराभूत करण्यासाठी बाबासाहेबांनी संदेश दिला होता. शिका संघटित व्हा संघर्ष करा...  मात्र आज संघटित होऊन आपल्याआपल्या मध्येच संघर्ष करण्यात ऊर्जा वाया जात आहे..   
 
बाबासाहेबांनी शासनकर्ती जमात होण्याचा देखील संदेश दिला होता, त्यावेळेस बाबासाहेबांना संघर्षशील बुद्ध अपेक्षित होता. प्रवाहपतित ना होणारा असा  सरकारी अधिकारी, जो आपल्या बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करेल मात्र त्याच वेळेस आपले नैतिक आचरण बुद्धाने सांगितलेल्या पंचशीलावर आधारित असेल. खरा आंबेडकरवादी कधीच भ्रष्टाचार करणार नाही, व्यभिचार करणार नाही. मद्यपान, चोरी, निंदा करणे यापासून तो स्वतःला अलिप्त ठेवेल. स्वतःच्या अधिकाराचा गैरवापर करणार नाही. समोरच्या व्यक्तीची माणूस म्हणून प्रतिष्ठा जपेल. 

वर चर्चा केलेल्या अंधश्रद्धा, जातिप्रथा कर्मकांडे यातून नवबौद्धांना बाहेर काढायचे असेल तर खरे आंबेडकरवादी कार्यकर्ते, सरकारी अधिकारी यांची एक पिढी देशाला हवी आहे. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी  सभोवतालचा अंधार बाजूला सारून "अत्त दीप भव" स्वयंप्रकाशी होणाऱ्या, प्रवाहाविरुद्ध पोहत जाऊन खरा धम्म जनतेपर्यंत पोचवण्याचे काम खऱ्या आंबेडकरवाद्याला करावे लागणार आहे. शांताराम नांदगावकर म्हणतात त्याप्रमाणे 

कोसळोत वर्षा, उठूदे झंजावात
आसूड विजेचे, घेऊनिया निमिषात
धावूदे दिशांना, करुनिया आकांत
पण निश्चल असुदे, ज्योत तुझ्या हातात
तू अविश्रांत सामर्थ्य उरी घे, सूर्याचे रूप हो... तू स्वयं दीप हो
अत्त-दीप-भव, स्वयंदीप हो

स्वतःचे नैतिक आचरण शुद्ध ठेवून बोधिसत्वापर्यंत पोहचू शकेल असाच कार्यकर्ता आंबेडकरांचा वारसा सांगण्याच्या योग्यतेचा असेल. आणि अश्या कार्यकर्त्यांची पिढी तयार झाली तर खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा धम्मचक्रपरिवर्तन होईल. आणि ते होणारच..  कारण.... अनेक ठिकाणी खूप आशादायक काम सुरु आहे. बदलावर विश्वास असणारी नवी पिढी जोमाने काम करू पाहत आहे, अश्या वेळी जेष्ठ मंडळींनी स्वतः बाजूला सरून जागा तयार करुन दिली पाहिजे. तुमच्या गाफिल पिढीमुळे धम्मचक्र उलटे फिरावयाचा प्रयत्न मनुवादी करू शकले..  
तर साथींनो.  आज मन मोकळे करावेसे वाटले म्हणून बोलतो आहे..  एखादा शब्द कडक वाटला असेल, टोचला असेल तर वाईट नका वाटून घेऊ.. विचार मात्र नक्की करा.. धम्मचक्राची गती वाढवायची असेल तर त्याच्या वाटेमधील दगड बाजूला करावे लागतील.. प्रसंगी नांगर लावावा लागेल. विहाराची केंद्रे केवळ एक दिवस कर्मकांडाची नवी ठिकाणे न बनता क्रांतीची केंद्रे बनतील तेव्हाच बाबासाहेब आंबेडकर यांनी पाहिलेले बुद्धमय भारताचे स्वप्न साकार होण्याची आशा असेल.

#richyabhau
#धम्मचक्रपरिवर्तन

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव