"द अमेझिंग" जेम्स रँडी

"द अमेझिंग" जेम्स रँडी
"आज कुछ तुफानी करते है.." मनुष्य स्वभावातील साहसवेडाला साद घालून आपले प्रोडक्ट विकताना अनेक ब्रँड पाहिले आहेत.. जेम्स रँडी हा व्यक्ती नसून एक ब्रँडच .. नायगारा फॉल वर "खाली डोके वर पाय" करून टांगलेल्या, हात बांधलेल्या अवस्थेतून स्वतची सुटका करून घेणारा प्रयोग असो.. किंवा युरी गेलर, पिटर पॉपऑफ यांसारख्या भोंदूविरुद्ध दिलेला चिवट लढा... रँडीचे आयुष्य रोजच तुफानी होते... आपल्या ब्रँडपॉवरचा उपयोग करून त्यांनी भोंदूगिरीवर चांगला चाप बसवला.. 

विसावे शतक... जसे नव्यानव्या वैज्ञानिक शोधांनी गाजले त्याच वेळी पारलौकिक शक्तीचा दावा करणाऱ्या भोंदू बाबांचे देखील जगभर पेव फुटले होते.. दैवी उपचारांचा दावा, हातचलाखी किंवा विज्ञानाचा वापर करून लोकांची सर्रास फसवणूक होत होती. जगभरचे विवेकवादी याविरुद्ध लढा देऊ लागले.. या चळवळीत सुरुवातीच्या अब्राहम कोवूर, बी प्रेमानंद यांसारख्या शिलेदारांमध्ये जेम्स रँडी यांचे पण नाव घ्यायला लागेल. (पांढरी दाढी ही तिघांची पण ओळख.. 😀)

एकाच वेळी ब्रँडपण आणि विचारवंत पण..... होय "द अमेझिंग" रँडी भाऊचे सगळेच अमेझिंग.. कॅनडा मधील टोरांटो या शहरात सात ऑगस्ट १९२८ रोजी मारी आणि जॉर्ज रँडल झ्वींजे या दाम्पत्याच्या पोटी जन्म घेतला. जेम्सनंतर अजून एक भाऊ आणि बहीण पण कुटुंबात सामील झाले. जरी अभ्यासात रस नसला तरी जेम्स खूप बुद्धिमान होता (वॉशिंग्टन पोस्ट नुसार त्याचा iq १६८ होता) रँडी गमतीने म्हणतो की माझे वडील संपूर्ण आयुष्यात दोनच वेळा माझ्याशी बोलले.. आणि गम्मत म्हणजे दोन्ही वेळेस विषय माझ्या अभ्यासाचा होता😀
हे अद्भुत बालक पक्क शंकासुर होत... रविवारी चर्च मध्ये बायबल सांगितले जात असताना उभा राहून मोठ्याने "पण हे खरं कशावरून" असे बिंदास विचारणारा हा आपला भिडू.. शाळेत पण हा शंकासुर असेच करत असावा.. कारण त्याला वर्षभर शाळेत न येता डायरेक्ट परीक्षेला बसण्याची विशेष सवलत होती😜 मग काय.. हा इकडे तिकडे उंडगायला मोकळा..

बारा वर्षाचा असताना भिडू जादूचे प्रयोग बघायला गेला.. हॅरी ब्लॅकस्टोन या प्रसिद्ध जादुगाराचा शो होता.. जादुगाराची इंट्री, तिचे प्रेक्षकांनी केलेले स्वागत, झगमगते पोशाख, लाईट हे सगळे पाहून जेम्स खूपच प्रभावित झाला.. आणि त्याने त्याच दिवशी ठरवले .. येहीच लाईफ मंगता अपून को... ❤️ नंतर सायकलवरून पडला तेव्हा दीड वर्ष पाय मोडला होता.. या काळात त्याने मनाच्या एकाग्रतेचे अनेक प्रयोग शिकून घेतले... स्वतचं स्वतः बरं का..

त्यांच्या भागातील चर्चचा पास्टर लोकांचे आजार ओळखण्याचा जाहीर कार्यक्रम करायचा. लोकांनी आपले आजार लिफाफ्यामध्ये लिहून द्यायचे आणि पास्टर ते जाहीरपणे ओळखणार (अंनिस कार्यकर्ते कानाने चिठ्या वाचतात तोच प्रयोग) १५ वर्षाच्या जेम्सने पास्टरचे बिंग ओळखले.. आणि परिसरातील लोकांना जमा करून हा प्रयोग करू लागला..🤪 पास्टरच्या बायकोने पोलिसात तक्रार दिली की हा देवाची टिंगल उडवतो..😭 पोलिसांनी त्याला समज (?) देण्यासाठी चार तास कोठडीत बसवले.. पण हे तर कुत्र्याचे शेपूट.. सरळ थोडी होणार.. पप्पांनी पण पोराचे पाय पाळण्यात ओळखले होते.. जेम्सला काय ना बोलता सोडवून नेले...

सतरा वर्षाचा जेम्स शिक्षणाला कंटाळला..त्याला त्याचा ड्रीम जॉब खुणावत होता.. शेवटी घर सोडले आणि कार्निव्हलमध्ये भाग घेण्यासाठी निघून गेला. तिथे आधी तो "मनाचे प्रयोग" करायचा.. मात्र लवकरच साखळदंड, दोरखंड यांनी बांधले असताना पेटाऱ्यातून सुटका करून घेण्याची कला त्याने शिकली.. नंतर तो त्यात मास्टर पण झाला.. १९४६ साली त्याने स्वतः स्टेज कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. आधी तो त्याचे संपूर्ण नाव वापरायचा.. जेम्स रँडल झ्वींजे.. मात्र क्युबेक जेल मध्ये त्याने केलेल्या प्रयोगामुळे त्याला अमेझींग रँडी हे बिरूद पहिल्यांदा चिकटले...  ते कायमचेच.. नंतर त्याने सर्व कार्यक्रम द अमेझिंग रँडी या नावाने केले
रँडीला प्रसिध्दी हवी होती.. म्हणून त्याने आव्हान दिले.. कुप्रसिद्ध क्युबेक जेल मधुन गायब होऊन दाखवण्याचा.. कार्यक्रमाची भरपूर प्रसिद्धी केली गेली. प्रसारमाध्यम झाडून आली होती प्रयोग पाहायला.. रँडीची पूर्ण तपासणी करण्यात आली.. अगदी बुटाच्या टाचेत काही लपवले नाही ना याचीपण.. त्याचे कपडे काढून जेलचे कपडे घालण्यास देण्यात आले. जूने कपडे लॉकरमध्ये कुलूपबंद.. नंतर त्याला एका खिडकी नसलेल्या कोठडीत नेऊन बेड्या घालण्यात आल्या व खुर्चीत बसवून बांधून ठेवण्यात आले. कोठडीच दार बाहेरून लावण्यात आले. दर पाच मिनिटांनी त्याच्याशी वॉकीटॉकीवर बोलण्यात येणार होते. 

पाच मिनिटांनंतर जेलरने विचारले "रँडी कसा आहेस." उत्तर आले "ठीक". दहा मिनिटांनी पुन्हा विचारले "कसा आहेस".. उत्तर आले "ठीक". पंधरा मिनिटांनी पुन्हा विचारले "कसा आहेस".. आणि सायरन वाजायला लागला... कोठडी उघडून पाहिले तर रँडी गायब.. लॉकर रूममधून कपडे पण गायब... सायरनचा आवाज जेल बाहेरून येत होता... एका गाडीतून... ज्यात रँडी सायरन वाजवत निवांत बसला होता... ज्यांनी हा प्रयोग अनुभवला त्यांना रँडी भूत असल्याचेच वाटले. रँडी खूप प्रसिद्ध झाला..रँडी या शोमन युगाची ही सुरुवात होती.
याच काळात चिकित्सा करताना त्याला जोतिषशास्त्रामधील फोलपणा आढळून आला.. मग काय.. त्याने पण भविष्य सांगायला सुरुवात केली. वर्तमान पत्राचे जूने अंक काढायचे.. त्यातील या राशीचे भविष्य त्या राशीला लटकावून द्यायचे..👻 झोरान या टोपण नावाने त्याने वर्तमानपत्रासाठी भविष्य लेखन (?) केले😀 छद्मविज्ञान म्हणजे अनैतिक अविवेकीपणा आहे असे रँडी नेहमी म्हणायचा.
प्रयोग करताना रँडीने दोन विश्वविक्रम केले आहेत. १९५६ साली धातूच्या एका हवा बंद पेटीत त्याला हातपाय बांधून बसवले.. आणि पेटी पाण्यात ठेवली.. लाईव्ह प्रक्षेपण सुरू होते बरं का.. १०४ मिनिटांनंतर तो जिवंत बाहेर आला (आधीचे रेकॉर्ड ९३ मिनिटांचे होते) असेच रेकॉर्ड त्याने बर्फामध्ये केले आहे.. ५५ मिनिटे.. त्याचे सादरीकरण अफलातून असायचे.. किंबहुना ते अफलातूनच असावे यासाठी तो कायम दक्ष असायचा... नायगारा फॉलवर त्याने केलेल्या प्रयोगाचा व्हिडिओ पाहताना आपले डोळे गरगरतात. लिंक देतो. 

https://youtu.be/-0H0r2Xqlgs
एलिस कूपर या जगप्रसिद्ध बँड मध्ये लाईव्ह परफॉर्म करण्यासाठी रँडीला बोलावण्यात आले. जिलेटीनमध्ये मुंडके कापण्याचा रँडीचा प्रयोग बँड परफॉर्मन्समध्ये खतरनाक रंग भरत असे. आता अमेझिंग रँडी हा एक ब्रँड झाला होता. अनेक रेडिओ आणि टीव्ही शो मध्ये त्याला मागणी होती. त्याची विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा आणि शांतपणा चाहत्यांची संख्या  वाढवत होता.. मध्येच "येशू ख्रिस्त म्हणजे एक धर्मवेडा" अशी बेधडक विधाने करून त्याने वाद देखील ओढवून घेतले. असो.. अनेक सेलिब्रिटीची ही कहाणी असू शकते.. मात्र रँडीवर रीच्याने पोस्ट लिहिण्याचे कारण इथून पुढे सुरू होते.

सत्तरीच्या दशकात खगोलशास्त्रज्ञ कार्ल सेगन, विज्ञानलेखक आयझॅक असिमोव्ह, मार्टिन गार्डनर यांच्यासोबत  CSICOP (Committee for Scientific Investigation of Claims of the Paranormal ) समितीची स्थापना केली जिचा उद्देश पारलौकिक दाव्यांची तपासणी आणि विज्ञानाचा प्रसार होता. या समितीमध्ये मुख्य काम रँडीलाच करायचे होते. त्याने जगभर भाषणाचा सपाटा लावला .. विवेकवादी चळवळीला जागतिक पातळीवर पोचवण्यात रँडीला भरपूर यश आले. 
अब्राहम कोवूर यांनी चमत्कार दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा असे आव्हान १९६३ मध्ये देऊन नवे वादळ उठवले होते..  आता केवळ अतींद्रिय शक्ती असल्याचा दावा करून भागणार नव्हते.. त्याच्या शास्त्रीय चाचणीला देखील सामोरे जावे लागणार होते.. रँडीने देखील १९६४ साली एका रेडिओ शो मध्ये घोषणा केली की पारलौकिक शक्ती सिद्ध करा.. आणि एक हजार डॉलर्स मिळवा (कोवुर आणि रँडी या दोघांची रक्कम वाढत जाऊन आता प्रत्येकी १० लाख डॉलर्स एवढी झाली आहे.. शिवाय महाअनिस, अभाअनिस, पंजाब मधील तर्कशील सोसायटी यांचे आव्हान आहे ते वेगळेच.. कुणी असेल तर सांगा.. लयं पैसे आहेत राव 😄😄)

challenge@randi.org हा ईमेल आहे... दावा करायचा असेल तर आधी माहिती पाठवावी लागते. दरवर्षी डझनभर लोक या पुरस्कारावर दावा करतात परंतु कोणीही परीक्षेत उत्तीर्ण होत नाही. रँडी म्हणायचा आजवर तरी सब घोडे बारा टक्के याप्रमाणे बालिश लोकांनीच सहभाग घेतला आहे.. आणि दावे पण असे केले.. ज्या ट्रिक मी लहानपणी करायचो😜 हे बक्षीस कोणी जिंकले तर मला दुःख नाही होणार.. त्यातून मी वेगळे काही शिकेल .. आणि कदाचित नोबेल पारितोषिक मिळवेल🤪 
रँडी कोणताही दावा लगेच अमान्य करायचा नाही.. मात्र तो मी तपासून बघेल असे म्हणायचा.. यात त्याची विनम्रता दिसून येते. त्याने १९९६ साली जेम्स रँडी एज्युकेशनल फाउंडेशनची स्थापना केली. विज्ञानाची भाषा वापरून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या   स्यूडोसायन्सविरूद्ध लढाई, चिकित्सा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास, वैज्ञानिक संमेलनांची वाढ इत्यादी बाबीवर फाउंडेशन काम करत आहे. 

सत्तरीच्या दशकात युरी गेलर नावाचा इस्रायली तरुण आपल्या अतींद्रिय शक्तीने चमचे वाकवायचा कार्यक्रम करायचा.. अनेक अर्धवट शास्त्रज्ञांनी त्याच्या प्रयोगाला मान्यता दिली होती (असे शास्त्रज्ञ, संस्था जगभर असतातच😬)  या युरी गेलरचा बाजार रँडीने असा उठवला की शेन वॉर्नला जसा स्वप्नात सचिन दिसायचा तसा गेलरला रँडी दिसत असेल. गेलर करायचा ते सगळे प्रयोग रँडी पण करायचा.. गेलर म्हणायचा "रँडी तू कबुल कर तू पण माझ्याप्रमाणे अतींद्रिय शक्ती वापरून हे करतो." रँडी म्हणायचा "गेलर तू हे कबुल कर की तूपण माझ्यासारखी हातचलाखी करून हे करतो.... 
आपण सुरुवात कशी झाली हे पाहू... झाले असे की १९७२ साली प्रसिद्ध कार्सन शो मध्ये युरी गेलर येणार होता. कार्सनने रँडीकडे मदत मागितली.. रँडी बोलला एक काम कर.. तो यायच्या आधीच चमचे आणि इतर साहित्य टेबलवर ठेव.. त्याचे साहित्य वापरू नको.. कार्सनने तसेच केले.. अर्थात गेलरची लाईव्ह कार्यक्रमात चांगलीच फजिती झाली. पण भाऊ शहाणा झाला नाही.. रँडीच्या मागे हात धुवून लागला. 😬
नाद करावा पण आमचा कुठ.. रँडीने युरी गेलरच्या भोंदुपणावर पुस्तकचं लिहिले. काही दिवस कन्हत कन्हत युरी बोलला "माझी फुकटची प्रसिद्धी होते".. पण धंदा बंद पडायला लागला तेव्हा त्याने रँडीवर तीनवेळा दावा ठोकला.. आणि तिन्ही वेळा दावा रँडीच्या बाजूने लागला.. शिवाय खटल्याचा खर्च देखील गेलरकडून वसूल करण्यात आला. शेवटी १९८७ मध्ये त्याचे दिवाळे निघाले..

८० च्या दशकात उगवलेल्या पिटर पॉपऑफची तऱ्हा निराळी.. दैवी उपचार करायची त्याची खासियत (हे ढोंग अजूनही काही ठिकाणी चालूच असते चर्चमध्ये, मात्र याला महाराष्ट्रात कायद्याने बंदी आहे.) पॉपऑफ मात्र जमलेल्या हजारो भक्त (रुग्नच म्हणले पाहिजे खरे तर) लोकांचे नाव, पत्ता आणि आजार त्याच्या दैवी शक्तीने सांगायचा.. लोक विस्मयाने वेडी व्हायची.. आनंदाने उड्या मारत पुढे यायची.. हा त्यांच्या डोक्याला हात लावून बेशुद्ध पाडायचा.. हालेलुया😜 शुद्धीवर आल्यावर लोकांना आजार बरे झाले आहे असे वाटायचे..

ह्याची गेम तर रँडीच्या टीमने फुल प्लॅनिंगने वाजवली... आधी त्याच्या अनेक प्रार्थना सभांना हजेरी लावली. तेव्हा लक्षात आले की त्याच्या कानात काही डिव्हाईस आहे. लोकांना प्रार्थना सभेचे बुकिंग करताना नाव पत्ता आजार याची माहिती घेतलेली असायची.. तीच पॉपऑफला पुरवली जात होती... मग त्याची फजिती करण्यासाठी प्रेक्षकांत आपले माणसे पेरणे सुरू केले. स्त्रीच्या वेशात गेलेला पुरुष सहकारी, ज्याचा स्त्रीविषयक आजार पॉप ऑफने आपल्या दैवी शक्तीने ओळखला😜 याने स्त्रीवेश उतरवला.. आणि देवाला स्त्री पुरुष कळत नाही का विचारले.. मात्र पॉपऑफ भक्तांना समोर करून वेळ मारून गेला.

रँडीने एका रेडिओ तंत्रज्ञानाला गाठीशी धरले.. त्याला सिक्युरिटीचा पोशाख चढवून कार्यक्रम स्थळी घुसवले. सगळे साहित्य घेऊन सहकारी जेव्हा इमारतीमध्ये फिरला.. तेव्हा पॉपऑफची बायको त्याला लोकांनी आधी दिलेली माहिती वाचून दाखवत असल्याचे कळले.. जाहीर भांडाफोड झाला, पॉपऑफला कबुल करावे लागले की तो अशी मदत घेत होता.. मात्र त्याने हे पण जोडले की असे तो कधी कधीच करायचा (गीरे तो भी टांग  ऊपर😜) लोकांची संख्या कमी झाली तरी कार्यक्रम पूर्ण बंद पडला नाही.. मग रँडीने आपल्या बॉयफ्रेंडला (चकित होऊ नका, पुढे येईल विषय) देखील पॉपऑफ करतो तसे कार्यक्रम करायला लावून कार्यक्रम झाल्यावर त्यामागची क्लृप्ती सांगणे सुरू केले.
त्या काळात नवीनच झालेल्या मॅकडोनाल्ड पारलौकिक संशोधन संस्थेमध्ये देखील आपले दोन शिष्य पेरून प्रॉजेक्ट अल्फा राबवला. सदर संस्था नकली दावे करत असल्याचे टीव्हीसमोर उघडकीला आणले. होमिओपॅथी आणि जिवंत पाणी (मेमरी असलेले पाणी) याचादेखील भांडाफोड रँडीने केला. रँडी म्हणायचा की "झापडबंद भक्त त्यांच्या आस्थेवर प्रश्न उपस्थित करनाऱ्या मुद्द्याकडे कधीच पाहत नाहीत". (आपल्याला माहीत आहेच भक्त म्हणजे काय)  त्याला झापडबंद भक्तांचा आयुष्यभर विरोध झाला.. मात्र "दूध का दूध आणि पाणी का पाणी" करायचे त्याने व्रतच घेतले होते जणू.. 
वयाच्या साठाव्या वर्षी जादूगार म्हणून त्याने निवृत्ती घेतली. एका टीव्ही शोची तयारी करताना दुधाच्या कॅनमधून सुटका करून घेण्याचा प्रयोग होता.. मात्र तो करत असताना जवळजवळ मरणाच्या दारात जाऊन आला रँडी.. तेव्हा त्याने समजून घेतले 'आपली चपळता पूर्वी सारखी राहिली नाही'.. त्याने पुढचा सगळा वेळ लिखाण, प्रचार यासाठीच दिला. जादुगारांच्या अनेक संस्थांवर तो सभासद होता.  जादू, भांडाफोड, विवेकीविचार या विषयावर त्याने दहा पुस्तके लिहिली आहेत.

त्याने अंधश्रद्धा आणि मुर्खता यासाठी पिगासस पुरस्कार देणे सुरू केले. पिगासस म्हणजे उडता डुक्कर (पुराण वगळता कधी उडू शकणार नाही..😜) कधीही ना घडू शकणारे दावे करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांना हा पुरस्कार देण्यात येतो...  एप्रिल फुल च्या दिवशी हे पुरस्कार जाहीर करण्यात येतात. अर्थात तो घ्यायला कोणी पुढे येत नाही😭 Ig Nobel प्रमाणे इथे पण भारतीयांना चांगला स्कोप आहे😜
आधी हा पुरस्कार चार विभागात देण्यात यायचा.. त्या वर्षात दैवी शक्ती बाबत सर्वात मूर्ख विधान केलेला शास्त्रज्ञ, दैवी शक्तीवर संशोधन करण्या निधी देणाऱ्या संस्था, अश्या मूर्खपणा ला प्रसिद्धी देणारा मीडिया, आणि कमीत कमी मेहनत घेऊन जास्तीत जास्त लोकांना मूर्ख बनवणारा व्यक्ती (हे तर शेट लाच) असे चार विभाग होते. २००५ पासून नवीन विभाग सुरू केला आहे... एखादी बाब स्पष्ट दिसत असताना नाकारणारी व्यक्ती.. (निर्मला आत्या इथे बसेल😂) विजेत्याला देण्यासाठी खास युरी ट्रॉफी बनविण्यात आली आहे. (युरी लयच डोक्यात गेला भाऊच्या.. अंतिम इच्छा लिहून ठेवली आहे.. मेल्यावर मला जाळा.. आणि त्याची राख युरीच्या डोळ्यात टाका.. कदाचित त्याने त्याचे डोळे उघडतील😂)

शालेय शिक्षण देखील पूर्ण न केलेला रँडी, मात्र त्याला १९८६ मध्ये प्रतिष्ठेची मॅकआर्थर फेलोशिप भेटली आहे. एकेकाळी कॉपी पेस्ट करून भविष्य लिहणाऱ्या रँडीचे नाव १९८१ मध्ये सापडलेल्या छोट्या ग्रहाला देण्यात आले आहे. ज्याच्या घरात घड्याळ उलटे चालते, (खास बनवून घेतले आहे बरं का.. काटे उलटे फिरतात) त्या रँडीला जगात अनेक मानसन्मान मिळाले आहेत. रिचर्ड डॉकिंस फाउंडेशनने जेव्हा "विवेक आणि चिकित्सा" क्षेत्रात पुरस्कार सुरू केला तेव्हा सर्वात पहिल्या पुरस्काराचा मानकरी आपला भाऊ अमेझिंग रँडी हाच होता❤️

आता त्याच्या वैयक्तिक आयुष्या बद्दल.. २०१० साली त्याने तो "गे" असल्याचे जाहीर केले. तसेच २०१३ साली समलैंगिक लग्नास मान्यता मिळाली तेव्हा लगेच त्याचा २५ वर्षापासूनचा जोडीदार "डेवी पेना" यासोबत लग्न केले.. डेवी पेना मुळचा व्हेनेझुएलाचा नागरिक..  गे असल्यामुळे जीवाला धोका होता त्याला तिथे.. म्हणून कॅनडामध्ये खोटी ओळख आणि कागदपत्रे घेऊन राहत होता.. 
त्याचे हे बेकायदेशीर कृत्य रँडीला माहीत होते.. मात्र त्याच्यावर ओढवलेला प्रसंग ओळखून त्याने डेवीची साथ दिली..अगदी नंतर त्याचे उघडकीला आले, खटला, शिक्षा झाली तरी रँडी त्याच्यासोबत होता... या सर्व प्रकरणाची कबुली त्याने त्याच्या जीवनावर बनवण्यात आलेल्या An honest lair या डॉक्युमेंटरी मध्ये दिली आहे. दीड तासाची ही डॉक्युमेंट्री पाहिली तर 
रँडीचा संपूर्ण जीवनपट लक्षात येतो. लिंक देतो
https://watchdocumentaries.com/an-honest-liar/

चाळीशी मध्येच त्याची दाढी संपूर्ण पांढरी होती.. कदाचित प्रयोगामध्ये वजन पाडायला भेदक डोळ्यासोबत उपयोगी पडत असावी.. त्यामुळे जूने ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ मध्ये असलेले त्याचे रूप आणि काल परवाचे व्हिडिओ... जास्त अंतर दिसत नाही (ए के हंगल नाही का जुन्या नव्या कोणत्याही चित्रपटात सेम दिसायचे😂) मागच्या आठवड्यात २० तारखेला ९२ वर्षाचा हा जादूगार काळाच्या पडद्याआड गेला. पण असे वाटते काही जादू करून पुन्हा स्टेजवर येऊन आपल्या सर्वांच्या टाळ्या मिळवतील😔

भाऊचे सगळे ग्रँड होते म्हणून तर भाऊ एक ब्रँड होते. "द अमेझिंग रँडी"..  त्या ब्रँडचा वापर त्यांनी कार्यकारणभावाच्या प्रसारासाठी करून खूप मोठे काम करून ठेवले आहे.. त्यांना मानवंदना देताना हेच म्हणावेसे वाटते.. "लब्यू रँडी.. यू वॉज सो अमेझिंग" ❤️❤️

#richyabhau
#Randi



Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव