नक्षत्रांचे देणे...

नक्षत्रांचे देणे
कॅलेंडरमध्ये अनेक गमतीशीर बाबी असतात.. पण लहानपणापासून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत येतो... कारण त्या बाबी महत्त्वाच्या वाटत नाहीत.. मात्र कधी घरात धार्मिक कार्य करायचे असेल त्यावेळी मात्र तिथी पाहिली जाते.. या महिन्यात १ ऑक्टोबर २०२० रोजी पौर्णिमा होती जी मध्यरात्रीनंतर २.३४ वाजता संपली..   तुम्हाला प्रश्न पडला असेल की पौर्णिमेचा चंद्र तर सकाळी मावळनार मग पौर्णिमा आधीच कशी संपते... 

तिथी आणि सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त याचा काही संबंध नसतो.. तिथी हे तर नक्षत्रांचे देणे.. केवळ हेच नाही तर मराठी बारा महिन्याला मिळालेली नावे ही पण नक्षत्रांची देणं.. याशिवाय आपल्या ओळखीची कोणी अश्विनी,  रोहिणी, आश्लेषा, फाल्गुनी, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, रेवती असेल तर तिचे नाव हे पण नक्षत्रांची देणं....😀😀

आकाशात अब्जावधी तारे तारका आहेत.. मात्र आपला चंद्र, सुर्य ( खर तर पृथ्वी) आणि इतर ग्रह यांचे फिरणे एका विशिष्ठ पट्ट्यातून होते..जमिनीवरून झोपून पाहिले.. तर दिसणाऱ्या अवकाशाचे उत्तर ते दक्षिण क्षितिज असे १८०° मध्ये विभागणी केली असता मध्यबिंदू पासून + - ८° ( ८२° ते ९८°) असा हा पट्टा... या पट्ट्याचे आपण २७ भाग केले आणि त्यांना नावे देऊन नक्षत्र असे संबोधले..

सुमारे ३००० वर्षांपूर्वी या पट्ट्याचे बाबिलोयिन संस्कृतीत १२ भाग पाडून त्यांना राशींची नावे देण्यात आली. संपूर्ण अवकाशात ८९ तारका समूह (constellation) शोधले गेले होते.. त्यापैकी आपल्या पट्ट्यात आलेल्या तारका समूहातून बारा राशींची कल्पना करण्यात आली.. त्यांना देण्यात आलेली नावे (मेष ते मीन) आपल्याला माहीत आहेतच.. या बारा राशी व्यतिरिक्त इतर राशी देखील मानवाला दिशा दर्शक म्हणून उपयोगी पडतात बरका.. ध्रुव तारा माहीत नसेल तरी जेव्हा आकाशात सप्तर्षी असतात.. तेव्हा त्यातील पहिल्या दोन ताऱ्यांपासून सरळ रेष काढायची क्षितिजापर्यंत.. तिथे तुम्हाला दिसेल ध्रुव तारा. 
सप्तर्षी तुम्हाला माहीत असेलच.. नसेल तरी शोधणे खूप सोपे आहे. २१ मार्च ते २१ सप्टेंबर या काळात तुम्हाला चित्रात दाखवल्या प्रमाणे सात तारे दिसले तर ते असतील सप्तर्षी.. क्रतु, पुलह, पुलस्त्य, अत्रि, अंगिरस, वाशिष्ठ आणि भृगू ही त्यांची नावे...  ग्रामीण भागात याला "म्हातारीचा बाज आणि तीन चोर सुद्धा म्हणतात.. " म्हणजे काही लोकांना जे ऋषी वाटतात तेच काही लोकांना चोर 🥳🥳 काही देशात याला पतंग समजतात.. मुळात सप्तर्षी आहेत "उर्सा मेजर" या तारकासमुहातील बिग डीपर भाग... 
असे ८९ तारकासमुह असले तरी चंद्र, सुर्य आणि इतर ग्रहांचा संबंध येतो पट्ट्यातील १२ तारका समूहाशी.. या बारा भागाचे आपल्याकडे २७ भाग केले आहेत.. चंद्राच्या २९.५ दिवसाच्या चांद्रमासाच्या गणीताशी जुळवून घेण्यासाठी. म्हणजे राशी झाल्या १२ आणि नक्षत्रे झाली २७.. २७÷१२= २.२५...  पुढे वाटणे सोपे व्हावे म्हणून प्रत्येक नक्षत्राचे पुन्हा केले चार चरण... आणि मग सव्वा दोन नक्षत्रांची सांगड राशींशी घालून कुंडलीचे जाळे विणले.. जोतिषातील थोतांड वर आपण नंतर विस्ताराने बोलू.. सध्या फोकस करू नक्षत्रावर.. 

तर आकाशात २७ नक्षत्रांची कल्पना करण्यात आली. चंद्र रोज एका नक्षत्रात असतो. चंद्राचे एका नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात प्रवेश करणे यावर तिथी अवलंबून असते (दिवसभरात.. २४ तासात कधीही तिथी सुरू किंवा संपू शकते.) २७ दिवस आठ तासात चंद्राचा पृथ्वीभोवती एक फेरा पूर्ण होतो.. मात्र महिना तेव्हाच पूर्ण होत नाही..🤔 अजून पुढे चंद्र जेव्हा दोन दिवस (आणि दोन नक्षत्र) मार्गक्रमण करतो.. तेव्हा २९.५ दिवसात चांद्रमास पूर्ण होतो... अवघड वाटते आहे का.. उदाहरण घेऊ म्हणजे सोपे होईल.. त्याआधी २७ नक्षत्रांची नावे घेऊ क्रमानुसार... 

अश्विनी • भरणी • कृत्तिका • रोहिणी • मृग/मृगशिर्ष • आर्द्रा • पुनर्वसु • पुष्य • अाश्लेषा • मघा • पूर्वाफाल्गुनी • उत्तराफाल्गुनी • हस्त • चित्रा • स्वाती • विशाखा • अनुराधा • ज्येष्ठा • मूल • पूर्वाषाढ़ा • उत्तराषाढा • श्रवण • धनिष्ठा • शततारका • पूर्वाभाद्रपद • उत्तराभाद्रपद • रेवती 

तर चैत्र महिन्यात चंद्र जर चित्रा नक्षत्रात असेल तर २७ दिवस आणि ८ तासांनी पुन्हा तिथेच येईल.. मात्र दोन दिवसांनी जेव्हा विशाखा नक्षत्रात तो प्रवेश करेल तेव्हा महिना पूर्ण होईल आणि तेव्हा दिवस असेल वैशाख पौर्णिमा.. एव्हाना तुमच्या लक्षात आले असेल की चित्रा - चैत्र, विशाखा - वैशाख याप्रमाणे नक्षत्र आणि महिन्याच्या नावाचा संबंध आहे.. हो.. आहेच मुळी.. दर महिन्याला पौर्णिमेच्या दिवशी चंद्र त्या महिन्याचा नावाशी संबंधित नक्षत्रात असतो...  कारण तो पौर्णिमेला तिथे असतो म्हणूनच त्या महिन्याला त्या नक्षत्राचे नाव देण्यात आले आहे.. पण लिंग का बदलले काय माहीत😀😀

चित्राचा झाला चैत्र, विशाखाचा वैशाख, ज्येष्ठा - ज्येष्ठ, - आषाढ, श्रवणचा श्रावण, अश्विनी चा अश्विन, कृत्तिकाचा कार्तिक,  मृगशीर्षचा मार्गशीर्ष, पुष्यचा पौष तर मघा चा झाला माघ. बाकी आषाढ, भाद्रपद, फाल्गुन यांची नावे तर स्पष्ट आहेत.. ते पण पूर्व आणि उत्तर दोन वेळा.. (पूर्व आणि उत्तर हे विरुद्धार्थी शब्द कसे काय होऊ शकतात..😡 पूर्वार्धशी पश्चिमार्ध जोडला पाहिजे ना.. 😀) 

आधी कदाचित चोविसच नक्षत्रांची कल्पना केली गेली असेल.. मात्र चंद्राच्या भ्रमणकाळास मॅच करण्यासाठी फाल्गुनी, आषाढा व भाद्रपदा यांचे पूर्वा व उत्तरा असे दोन भाग पाडून संख्या २७ केली गेली असावी. म्हणून नवी नावे नाही शोधत बसले.. ( नक्कीच सरकारी अधिकारी बसला असेल हे करायला.. त्यांना बरोबर जमते😂)

चीन मध्ये देखील आधी २४ नक्षत्रांची कल्पना करण्यात आली होती. आपल्या प्रमाणेच त्याच पट्ट्यातील २४ तारे त्यांनी इ. स. पू. २३०० च्या सुमारास निवडले. चोविसात मागाहून विशाखा, श्रवण व भरणी यांतील चार तारे घातले. म्हणून चिनी नक्षत्रेही २४ ची २८ झाली. चिनी पद्धतीत राशीचक्र आपल्या कुंभ राशीपासून सुरु होते व  उलट दिशेने मीन पर्यंत येते. मात्र त्यांना या राशीत वेगळे प्राणी दिसले😀  उंदीर (कुंभ), बैल (मकर), वाघ (धनु), ससा (वृश्चिक), राक्षस (तुला), सर्प (कन्या), अश्व (सिंह), एडका (कर्क), माकड (मिथुन), कोंबडा (वृषभ), श्वान (मेष), वराह (मीन). 🤔 तीच नक्षत्रे त्यात कुणाला घोडा दिसतो तर कुणाला सिंह 😀😀😀 दृष्टी तशी सृष्टी हेच खरे.

आपल्याकडे तरी महिन्याला छान नाव देण्यात आली. जी आपण अजून वापरतो... चिनी, जपानी मात्र पहिला महिना दुसरा महिना असेच म्हणतात.. सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तरी काय.. त्या काळातील लोकांनी (दहा महिन्यांचे वर्ष होते तिकडे तेव्हा) ७,८,९,१० वरच बोळवण केली आहे या महिन्यांची.. मात्र प्राचीन काळात चीन जपान येथे महिन्याला नावे होती.. त्या महिन्यात शेतात काय स्थिती असेल त्यावर ही नावे.. पेरणी, लावणी, कोंब येणे, खुरपणी, सुगीचा महिना या टाईप. म्हणजे एका अर्थाने ते आपल्यापेक्षा जवळ होते निसर्गाच्या..🤔 ते मातीशी निगडीत होते आणि आपण नक्षत्रांच्या...

"नक्षत्र" शब्दाच्या अनेक व्युत्पत्त्या आहेत त्यापैकी क्षत्र म्हणजे बलवान आणि म्हणून “न क्षत्राणि”  म्हणजे बलवान नाहीत ती नक्षत्रे असा एक अर्थ... हे कायतरीच पचपचीत आहे..😂 पाणिनी म्हणतो ‘न क्षरन्ति’ – जी झडत नाहीत, पडत नाहीत, क्षय अगर नाश पावत नाहीत ती नक्षत्रे.. हे पटते पण आणि छान पण वाटते ऐकायला😀

आदीम काळापासून मानवाला वाटत आले की ग्रेट व्यक्ती मेल्यानंतर आकाशात जाऊन राहतात. काही संस्कृतीत असा समज होता की नक्षत्रे ही देवांची मंदिरे आहेत. नक्षत्रे म्हणजे देवाने  पृथ्वीवरील प्राणिमात्रांची काढलेली चित्रे आहेत, असे उल्लेख आपल्या वेदामध्ये आहेत. "चंद्राच्या उत्पत्तीच्या वेळी जे तुषार म्हणजे अश्रू उडाले ती नक्षत्रे बनली. चंद्राच्या प्रकाशामुळे नक्षत्रे प्रकाशित होतात" असे शतपथ ब्राह्मण हा ग्रंथ शपथ घेऊन सांगतो. आणि वेदांना वेड्यात काढतो😀😀

आहे का एकाचा दुसऱ्याला मेळ.. तरी या धर्मग्रंथा वर विश्वास ठेवायचा..🤪 आणि अश्या अनेक कहाण्या आहेत आपल्याकडे.. तुम्हाला तर आपल्या चंद्राचा स्वभाव माहीत.. २७ नक्षत्रे या प्रजापती दक्षाच्या कन्या असून त्या त्याने "एकवर सव्वीस फ्री" या ऑफरने चंद्राशी लग्न करून दिल्या आहेत. चंद्राचा हनिमून सुरू झाला.. दररोज एकेकीच्या घरी मुक्काम करून सर्वपत्नी समभाव असा मुखवटा घेतला..  

आता सवतीसवती गुण्यागोविंदाने नांदल्या असे जगात कधी झाले नाही.. मग ढगात कसे होईल😀 (गणोबा कसे मॅनेज करतो रिद्धी सिद्धीचे त्यालाच माहीत😉)  रोहिणी तर चंद्राची एक नंबर आवडती.. रोहिणीच्या मागे मृग लागतो मग मृगाला मारायची सुपारी दिली जाते.  व्याध येतो आणि बाण मारतो. खोटे नाय बोलत राव त्याने मारलेला बाण अजून दिसतो आहे.. (मागच्या पोस्ट मध्ये फोटो पण टाकला आहे😁)

सोमनाथ नावामध्ये या कथेचा सिक्वेल आहे. जेव्हा मृगचा गेम आणि त्यामागे चंद्र रोहिणी अतीप्रेमाची पार्श्वभूमी दक्ष प्रजापतीला समजली तर त्याची सटकली.. त्याने शाप दिला "आजवर लयं शायनिंग मारली.. आता तुझे तेज रोज कमी होत जाईल" आणि झाले ना राव तसे.. चंद्राने घाबरून शंकराची पूजा सुरू केली.. शिवरात्री दिवशी शंकर प्रसन्न झाले.. मॅटर ऐकुन घेतला.. आणि बोलले तू जसा बारीक होत आला आहे तसा पुन्हा मोठा पण होत जाशील... असे चक्र सुरू झाले पौर्णिमा अमावस्याचे.. 😀😀😀 अर्थातच कहाणी खोटी आहे.. पण शंकराला सोमनाथ नाव देऊन गेली. 

या २७ बहिणींना एक भाऊ पण होता बर का...आपल्याकडे अभिजित तार्‍याला देखील काही काळ नक्षत्र मानण्यात आले. तेव्हा एकूण नक्षत्र संख्या २८ झाली.. परंतु हे नक्षत्र आपल्या पट्ट्यापासून फार लांब असल्याने वगळण्यात आले. तसेही पोरीत पोरगा लांडोरा  होताच..😀  नक्षत्र ठरवताना केवळ एका दिवसात चंद्र किती अंतर कापेल हाच संदर्भ पकडला गेला.. त्यामुळे नक्षत्रात ताऱ्यांची संख्या समान आढळत नाही.. चित्रा-स्वातीसारखी एकच तारा असलेली पण नक्षत्रे आहेत किंवा आश्लेषा, मघा यांसारखे ताऱ्यांचे गट देखील.

स्वातीच्या नक्षत्रात जो पाऊस पडतो त्याने मोती तयार होतात अशी आख्यायिका आहे. (मोठ्या भावाला बारावी मध्ये होती त्याची गोष्ट..) या कथेत देवाला प्रसन्न करून सगळा पाऊस स्वाती नक्षत्रामधेच पाडायला सांगितले..   देव तर आपल्या शेट च्या पण पुढचा....  नेहमी अश्या स्टूपिड कल्पना लगेच ऐकतो.. मग त्या वर्षी केवळ मोत्याचे पीक आले.. मोतीच मोती.. जिथे पहावे तिथे मोती... पण दुर्दैव की हे मोती माणूस खाऊ शकत नव्हता😔 

मागच्या पोस्ट मध्ये आपण पाहिले की मुळात कालगणना सुरू होण्याचे कारण शेती विषयक होते.. चंद्राचा नक्षत्र प्रवेश जसा तिथी ठरवतो तसे सूर्याचा नक्षत्र प्रवेश हा ऋतु ठरवतो.. ३६५÷ २७ अशी साधारण १३.५ दिवसाचे त्याचे प्रवेश असतात.. आपण कॅलेंडर मध्ये पाहिले असेल सूर्याचा अमुक प्रवेश वाहन अमुक तमुक... मजा वाटायची वाचायला.. 


काही लोक हस्त नक्षत्राला हत्तीचा पाऊस म्हणतात.. पण हस्त हा शब्द हस्तिदंत प्रमाणे हत्तीशी संबंधित नाही, हस्ते मधील हाताशी संबंधित आहे.. सोबतच्या चित्रात (चित्रात चित्रा पण आहे 😁) पाहिले की समजेल  हाताची तीन बोटे आणि अंगठा याची कल्पना कशी केली आहे. आपल्याकडे मृग ते हस्त या नऊ नक्षत्रांत सूर्य असताना पाऊस पडतो.

 २७-९ = ० असे अकबर बिरबलच्या कहाणीत तुम्ही हे ऐकले असेल.. ही नऊ नक्षत्रे जर कोरडी गेली तर शून्यच राहते.. मात्र हीच गोष्ट एका मास्तरांनी वर्गात सांगितली तेव्हा एक मुलगा म्हणाला मास्तर उत्तर चूक आहे.. शून्य नाही राहत.. सत्तावीसमधून नऊ गेले की मागे उरते आत्महत्या, दुष्काळ आणि माती😔

आत्महत्येच कारण जेवढं आस्मानी आहे तेवढंच सुलतानी..😔 आता तर चांगले पीक आले तरी त्याचा भाव निर्धारित करणारे उद्योगपती शेतकऱ्यांना सुखाचा घास देतील.. जगाचे पोट भरणारा अन्नदाता स्वतः पोटभर खाऊ शकेल का.. त्याने केवळ स्वतच्या कुटुंबाच्या पोटापुरते पिकवायचे ठरवले तर शहरातील लोक मोती खाऊन जिवंत राहू शकणार नाही हे नक्की👍🏼

#richyabhau
#नक्षत्रे

https://richyabhau.blogspot.com/

Comments

  1. छानच रे रिच्या !!

    ReplyDelete
  2. खुप छान चित्रे दिलीत रिच्याभाऊ !

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद.. सगळी इंटरनेट वरूनच उचलली आहेत.. आवश्यक तेवढे शब्द टाकले आहेत

      Delete
  3. व्वा !! सुस्पष्ट, सखोल माहिती मिळाली. माहिती देणारा उपयुक्त लेख. उत्कृष्ट 👌 कार्य.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव