लिझ माइटनर - नोबेल पुरस्काराच्या पुढे असलेली "नोबेल" व्यक्ती

लिझ माइटनर - नोबेल पुरस्काराच्या पुढे असलेली "नोबेल" व्यक्ती 
एखाद्या व्यक्तीला तब्बल ४८ वेळा नोबेल पुरस्काराचे नामांकन मिळाले असेल, मात्र एकदा सुद्धा पुरस्कार मिळाला नसेल, त्या व्यक्तीला तुम्ही काय म्हणाल.. जेव्हा ती व्यक्ती स्वतः केलेल्या संशोधनासाठी आपल्याच सहकाऱ्याला नोबेल घेताना पाहते.... आणि तरी ते शांतपणे त्याचे कौतुक करते. समोरचा व्यक्ती त्या पुरस्कारातील रक्कम देऊ करतो तेव्हा ती रक्कम जशीच्या तशी दान करून टाकते...❤️  काही व्यक्ती पुरस्कारापेक्षा मोठी असतात.. आणि त्या व्यक्तींना आपण मिळावे एवढे कदाचित त्या पुरस्काराचे भाग्य नसते... अश्या व्यक्तींपैकी एक लिझ माइटनर.. नोबेल पुरस्काराच्या पुढे असलेली "नोबेल" व्यक्ती 

लिझ माइटनर.. किरणोत्सर्ग आणि अणुगर्भ विज्ञानात पायाभूत संशोधन करणारी भौतिक शास्त्रज्ञ... "अणुबॉम्बची माता" असे तिला ना आवडणारे बिरूद अनेकवेळा तिला चिटकवले जाते.. मात्र "मला बॉम्ब बनवण्यामध्ये रस नाही" असे सांगून तिने मॅनहॅटन प्रकल्पात काम करायची संधी नाकारली होती. "विज्ञानाचा वापर विधायक कामासाठी झाला पाहिजे, विध्वंसक कामासाठी नाही" या तत्वाशी प्रामाणिक राहणारी.. स्वतः लिंगभेद आणि वंशभेदाची बळी असून देखील मनात कधीच कोणती कटुता ना बाळगणारी... सदैव मानवतेची पाईक असलेली सदाफुली म्हणजे लिझ माइटनर..
 
१८७८ साली ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना इथे एका श्रीमंत आणि सुसंस्कृत ज्यू कुटुंबात "लिझ" उर्फ "एलीसा" माइटनरचा जन्म झाला. एकूण आठ भावंड.. पैकी हीचा नंबर तिसरा. तिच्या जन्मदाखल्यावर १७ नोव्हेंबर तारीख असली तरी नंतरच्या सगळ्या कागदपत्रांवर ७ नोव्हेंबर तारीख आहे... (म्हणजे मेरी क्युरी आणि लिझाचा वाढदिवस एकच) दोन जन्मतारीख असणे कदाचित मोठे व्यक्तिमत्व होण्याचे लक्षण असावे (माझ्या पण दोन आहेत म्हणून आपले उगाच🤪) 

लिझची आई संगीततज्ञ आणि पप्पा "फिलिप" हे चेस मास्टर.. म्हणजे कला आणि क्रीडा यांचा वारसा लिझला घरातून मिळाला.  घरात भरपूर सुबत्ता... फिलिप हे ज्यू धर्मातील मोजक्या वकीलांपैकी एक.. अर्थात ते काय धर्म बिर्म मानत नव्हते. म्हणजेच धर्म मानत नसलेले ज्यू असे त्यांचे कुटुंब.. (लिझने तर नंतर ख्रिस्ती धर्मातील मार्टिन ल्यूथर यांनी काढलेल्या विद्रोही पंथाची दीक्षा घेतली होती. एकाच घरात काही मेंबर ज्यू, काही कॅथलीक ख्रिचन तर काही ल्युथेरीयन पंथाचे😀😀)

तिने स्वतचं एलिसा नावाचे "लिझ" हे लघुरुपांतर  केले. "मुलीचे" पाय पाळण्यात दिसतात (दर वेळेस काय मुलाचे😉) त्याप्रमाणे लिझची संशोधक वृत्ती अगदी आठव्या वर्षी जागृत असलेली दिसून येते. वेगवेगळे अडथळे वापरून प्रकाशाची गम्मत पाहणे, आणि त्याची अगदी शास्त्रीय प्रयोगाप्रमाणे नोंद ठेवणे हा तिचा छंद❤️  लिझचे बरे होते, तिच्या पप्पांनी पोरांना प्रायव्हेट ट्युशन पण लावली होती. अभ्यासासोबत अवांतर वाचन तसेच पियानो वाजवणे याची तिला आवड होती. "आईवडिलांचे ऐकावे, मात्र बरेवाईट याचा विचार स्वतचं करावा" असे सांगणारी आई लाभली हे माझे भाग्य असे लिझ म्हणत असे.

१८९७ सालापर्यंत व्हिएन्ना मध्ये स्त्रियांना उच्च शिक्षणाची सोय नव्हती. मुलींना वयाच्या केवळ चौदाव्या वर्षापर्यंत शिकता येई. लिझ पप्पांच्या मागे लागली की मला पुढे शास्त्र शिकायचे आहे.. यात तिच्या पप्पांच्या हातात तरी काय होते.. पप्पा बोलले की आधी शिक्षिका हो.(त्याकाळातील स्त्रियांना एकमेव करीयर) तिने शिक्षिकेचा अभ्यासक्रम पूर्ण केला.. काही दिवस शिकवण्या पण घेतल्या.. पण त्यात तिला रस नव्हताच. 

१८९७ मध्ये नवीन नियम आले.. विद्यापीठात स्त्रियांना परवानगी मिळाली. पप्पांनी शिकवणी लावून लिझची विद्यापीठ प्रवेशपरिक्षेची तयारी करून घेतली. १९०१ मध्ये लिझ व्हिएन्ना विद्यापीठात दाखल झाली. १९०५ मध्ये सर्वोच्च श्रेणी मिळवून लिझ पदवीधर झाली तर १९०६ मध्ये तिने डॉक्टरेट मिळवली सुद्धा..  रसायन शास्त्र, वनस्पती शास्त्र यांचा अभ्यास लिझने पदवीसाठी केला असला तरी भौतिकशास्त्राची तिला गोडी लागली. विद्यापीठातील प्रोफेसर एक्सनर आणि प्रोफेसर बोल्ट्झमन ह्या दोन शिक्षकांमुळे. त्यात बोल्ट्झमन हे तिच्या बेस्ट फ्रेंडचे वडील. (शिक्षक चांगले असले तर दिशा बदलते जीवनाची..👍) व्हिएन्ना विद्यापीठातून भौतिकशास्त्राची डॉक्टरेट मिळवणारी लिझ ही केवळ दुसरी स्त्री होती बरं का.

शिक्षण झाले आता पुढे काय.. लिझने तिची आदर्श "मॅडम मेरी क्युरी" यांना पत्र पाठवून "काही काम आहे का" विचारले.. तिथे काही काम मिळाले नाही. एक छोटे काम मिळाले..  झाले असेकी शास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांच्या प्रकाश परावर्तनासंबंधी यशस्वी प्रयोग केला.. पण त्याची सिद्धांतीक मांडणी त्यांना जमेना. लिझने या प्रयोगाचे स्पष्टिकरण देणारे संशोधनात्मक लिखाण करून दिले. त्यानंतर बोल्ट्झमन यांचे सहकारी स्टिफन मेयरच्या मार्गदर्शनाखाली किरणोत्सर्गविषयक अध्ययन आणि संशोधन काम चालू ठेवले. या काळात तिने अल्फा किरणांवर केलेल्या अभ्यासाबाबत संशोधन निबंध प्रसिद्ध केला. आतापावोत गरुडाला त्याचा क्षमतेची जाणीव झाली होती... लिझने भरारी घ्यायचे ठरवले. ऑस्ट्रिया सोडून जर्मनीला यायचे ठरले.   

१९०७ साली जर्मनीमधील बर्लीन विद्यापीठात लिझ आली खरी.. पण आगीतून फुफाट्यात... जर्मनीतील समाज अजूनही स्त्रियांच्या शिक्षणाबाबत मागासच होता. महिलांच्या उच्च शिक्षणाला बंदी, लिझला तर शिकायचे आहे.. लिझने "मॅक्स प्लँक" या शास्त्रज्ञाला भेटून त्याच्या व्याख्यानाला बसून देण्याची विनंती केली. पुंजसिद्धांताविषयी अधिक माहिती मिळवु लागली. पप्पा न चुकता पैसे पाठवून हिच्या सपोर्टला होतेच. (अगदी पुण्यात येऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या पिढीच्या पालकांप्रमाणे✊🏾) मॅक्स प्लँकने तिला जर्मनी मधील इतर भौतिक शास्त्रज्ञांची ओळख करून दिली. तिथच पुढची दिशा खुली झाली
इथे तिची भेट झाली "ओट्टो हान" सोबत. "रेडिओथोरियम" हे किरणोत्सर्गी द्रव्य शोधणारा हान हा रसायनशास्त्रज्ञ रूदर फोर्ड यांचा शिष्य... त्याला पुढील संशोधनात जोड हवी होती एका भौतिकशात्रज्ञाची. म्हणजे हाडळीला नव्हता नवरा आणि खैसाला नव्हती बायको..🤪 दोघांची एकमेकांना गरज होती.. एक रेडिओ-फिजिसिस्ट आणि एक रेडिओ-केमिस्ट यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे होते. पण एक अडचण होती.

हानची स्वतःची प्रयोगशाळा नव्हती. तो एमिल फिशर यांच्या संस्थेत आपले काम करायचा. जुन्या विचारांच्या फिशरने आपल्या संस्थेत स्त्रीला प्रवेश द्यायला नकार दिला. पण लिझ आणि हान यांनी खूप बोलबच्चन टाकले आणि सशर्त परवानगी मिळाली. लिझने इतर कुठेही पाऊल न टाकता संस्थेच्या एका लाकडी फळ्यांच्या खोलीत काम करायचे, कोणत्या पुरुषाच्या नजरेस पडायचे नाही. उगाच त्यांचे संशोधन करताना चित्त विचलित व्हायला नको. हान जरी इमारती मधील प्रयोगशाळेत काम करत असेल तरी हिने खालीच थांबायचे..

काम करताना गैरसोय झाली तरी ठीक, पण "राईट टू पी"चे काय..  लाकडी खोलीला टॉयलेटची सोय देखील नव्हती.  निसर्गाची हाक आली तर लिझने रस्त्यापलिकडे असलेल्या हॉटेलमधील टॉयलेटचा वापर करायचा होता😔 लिझचे काम पाहून फिशरने कालांतराने प्रयोगशाळा वापरायची परवानगी दिली. मात्र  तेथील संशोधकांनी तिचा भरपूर मानसिक छळ केला. (कसा केला असेल हे सांगायची गरज नाही. कोळसा उगळावा तेव्हडा काळाच.. ) पाच वर्षांनी लिझ सोडून गेली, तोवर महिला संशोधकांची संख्या वाढली म्हणून फिशरने लेडीज टॉयलेटची सोय केली तेव्हा पण पुरुष संशोधकांनी विरोध केला होता. (याला काय म्हणावे, ह्यांच्या बापाचे काय जाणार होते का.. निव्वळ नीचपणा😡)  

मात्र त्या परिस्थितीत देखील लिझने हानसोबत जबरदस्त काम केले. हानची आणि तिची भागीदारी छान फुलली.  किरणोत्सर्गविषयक नऊ रिसर्च पेपर प्रकाशित केले. हान सोबत "ॲक्टीनियम" हे समस्थानिक शोधून काढले. तसेच किरणोत्सर्ग तपासणीसाठी "रेडिओ अ‍ॅक्टिव रिकॉइल" पद्धत शोधली. हा शोध खूप महत्त्वाचा होता. याने तिला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली. मात्र अजूनही आर्थिक बाबतीत "पप्पा" हेच समीकरण सुरू होते.

१९१२ मध्ये जर्मनी मध्ये नव्याने "कैसर विल्यम इन्स्टिट्युट" होत होती. हानला तिथे चांगला पगार मिळणार होता.. लिझलादेखील तिथे बोलावण्यात आलं. परंतू "स्त्री" लिझने तेथे "बिनपगारी फुल्ल अधिकारी" म्हणुन काम करायचे होते. एक वर्ष तसे काम केल्यावर हानच्या समदर्जाचं पद मिळाले. पण वेतन?????  हानला मिळायचे त्याच्या फक्त एक पंचमांश !! याच वेळी पहिल्या महायुद्धाचे रणशिंग फुंकले होते. जर्मन सैन्याला मदत करायला हान आणि इतर शास्त्रज्ञ मैदानात उतरले. लिझ देखील क्ष-किरण तंत्रज्ञ परिचारिका म्हणुन ऑस्ट्रियन सैन्यात रुजु झाली. गम्मत म्हणजे लिझची आदर्श मेरी क्युरीदेखील त्यावेळी हेच काम करत होती.. मात्र विरोधी आघाडी कडून.. 

युद्धाला लिझचा नेहमीच विरोध होता. मात्र जखमी सैन्याच्या मदतीसाठी तिने हे काम पत्करले होते. कैसर विल्यम संस्था केवळ युद्धोपयोगी संशोधनाचे काम करत असल्याचे लक्षात आल्यावर तिने संस्था सोडायचा निर्णय घेतला.. तिला भरघोस पगारवाढ वगैरे अमिषे दाखवण्यात आली.. मात्र तत्वापुढे बाकी कशाची फिकीर तिला नव्हती. तिने पुन्हा फिशरकडे येणे पसंद केले.  फिशरने देखील यावेळी तिचे सन्मानाने स्वागत केले. प्रयोगशाळेचे दोन भाग केले आणि लिझला स्वतंत्र भौतिकशास्त्र विभाग सुरु करुन दिला.

१९१७ साली हानसोबत लिझने "प्रॉक्टानियम" हे समस्थनिक शोधून काढले. त्याचा पण खूप गाजावाजा झाला. तिला बर्लिन अकादमी कडून लाईबनिझ मेडल मिळाले. त्यांनतर कैसर विल्यम संस्थेत "संचालक" पदावर नोकरी सुद्धा. काही काळ प्राध्यापकीपण केली (जर्मनीमधील भौतिकशास्त्राची पहिली प्राध्यापिका) जर्मनीमधील सर्वात आघाडीची संशोधक म्हणून लिझ ओळखली जाऊ लागली. आइन्स्टाइन तर तिला कौतुकाने "आपल्या जर्मनीची मेरी क्युरी" असे संबोधायचा.❤️

१९३२ मध्ये जेम्स चॅडविकने न्यूट्रॉनचा शोध लावला. आणि जगभरातील संशोधकांमध्ये अणुचे विभाजन करण्याची चुरस निर्माण झाली. एकाच वेळी इंग्लंड मध्ये रुदरफोर्ड, डेन्मार्क मध्ये निल्स बोहर, फ्रान्समध्ये मेरीची पोरगी आयरीन क्यूरी आणि तिचा नवरा, रशिया मध्ये फ्रेंकेल, इटलीमध्ये फर्मी आणि जर्मनीत लिझ- हान जोडी.. अणुबॉम्ब बनवण्याचा उद्देश कोणाचा नसेल, उत्सुकता होती अल्केमीची.. ज्यासाठी रसायनशास्त्र जन्माला आले होते.. मूलद्रव्य बदलता येईल याच्या शक्यतेची..

१९३३ मध्ये जर्मनीवर एडॉल्फ हिटलरची हुकूमशाही सुरू झाली. नाझी माकडांचा धिंगाणा सुरू झाला. ज्यू संशोधकांना बडतर्फ केले गेले किंवा राजीनामा देण्यास भाग पाडले गेले. लिझला वाटले आपण तर ज्यू धर्म सोडून कधीच ख्रिस्ती धर्मातील लुथेरियन पंथाची दीक्षा घेतली आहे, आपण पहिल्या महायुद्धात देशाची सेवा केली आहे शिवाय आपण ऑस्ट्रियन नागरिक...  आपल्यावर ही वेळ नाही यायची. बाकीचे तिचे नातलग, इतर संशोधक देश सोडून गेले तरी ती संशोधनात मग्न राहिली.  पण माकडे नशेमध्ये चुर झाली होती. ऑस्ट्रिया जर्मनीने गिळंकृत केल्यावर साहजिक लिझ पण जर्मन नागरिक ठरली होती. आता लिझच्या जीवावर कधीही बेतले जाणार होते. 
गोची अशी होती की आता नवीन कायद्यानुसार संशोधक लोकांना देश सोडून जाता येत नव्हते. हानच्या मदतीने अगदी चित्रपटात शोभेल अशा गुप्त पद्घतीने तिने जर्मनी सोडली. खर तर इंग्लंड, अमेरिका सगळीकडे तिचे स्वागत झाले असते, मात्र तिचे इंग्लिश कच्चे होते. म्हणून साठ वर्षाची ही संशोधक स्टॉकहोम, स्वीडन इथे पोचली होती. तिथे "सीगबान" या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाच्या प्रयोगशाळेत काम स्वीकारले. मात्र सीगबान हा स्त्रियांच्या बाबतीत अतिशय पूर्वग्रह दूषित. तिथे पण खूप खरखर झाली. इथे निल्स बोहरसोबत काम करण्याची संधी लिझला मिळाली.

आता संशोधनात लिझला नवीन जोडीदार मिळाला होता. तिचा भाचा ओट्टो फ्रिश्च.. जो जर्मनीमधून पळून इंग्लंडमध्ये गेला होता, आता त्याच्या मावशीच्या मदतीला स्वीडनमध्ये आला होता. जर्मनीमध्ये हानने युरेनियमवर न्युट्रोनचा मारा करून बेरियम हे मूलद्रव्य मिळवलं होते. पण त्यामागचे गणित त्याला सुटत नव्हते. त्याने पाठवलेल्या निष्कर्षावर लिझ आणि फ्रिश्चने काम सुरू केले. आणि त्यांना त्यामागचे कोडे सुटले.. आणि अणुशक्तीचा शोध लागला.. आइन्स्टाईनचे e=mc^2  समीकरण उपयोगात येणार होते..
युरेनियमवर न्यूट्रॉन कणांचा मारा केल्यावर त्याच्या अणुचे केंद्र विभाजित होते... त्यातून बेरियम आणि क्रिप्टोन ही दोन मूलद्रव्ये तयार होतात. मात्र या सर्वात युरेनियमच्या अणुकेंद्रातून तीन न्यूट्रॉन आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा बाहेर पडते. अणु केंद्रातून निघालेले न्यूट्रॉन मग पुन्हा तीन नव्या अणु केंद्रांचे विभाजन करतात, पुन्हा ऊर्जा मुक्त होते आणि नवे नऊ न्यूट्रॉन बाहेर पडतात. ही साखळी सुरूच राहते जोवर युरेनियमच्या शेवटच्या अणुचे विभाजन होत नाही..  या प्रक्रियेतून प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण होते.

प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा हिशोब लागला... ऊर्जा किती तयार होते याचे पण समीकरण जुळले.. लिझने ही बाब हान याला तर फ्रिश्चने निल्स बोहर याला कळवले. मात्र याबाबतचा रिसर्च पेपर प्रसिद्ध होण्याआधी ही बातमी बाहेर फुटली... हानने त्याचा रिसर्च पेपर पब्लिश केला होता मात्र त्यात लिझ आणि फ्रिश्चचे नाव नव्हते (कदाचित लिझला पळून जाण्यात मदत केल्याबद्दल आपल्यावर आळ येईल ही भीती हानला असावी..) हानने नंतर मात्र लिझचे योगदान कधीच अमान्य केले नाही. त्यामुळे या सगळ्यामागे लिझ आहे हे जगाला समजले.. लिझला अमेरिकेत मॅनहॅटन प्रकल्पात काम करायला बोलावण्यात आले. मात्र तिने बॉम्ब बनवायला येणार नाही हे निक्षून सांगितले. ती पुढील संशोधनात व्यस्त राहिली.

१९४४ मध्ये हानचे नाव आण्विक विभाजनसाठी नोबेल पारितोषिकसाठी पुढे आले. अनेक शास्त्रज्ञांनी लिझ देखील तेवढीच हक्कदार आहे यासाठी आवाज उठवला.. मात्र त्यावेळी नोबेल समितीवर होते लिझबद्दल पूर्वग्रह दूषित "सीगबान".. त्यांनी तिचे नाव पद्धतशीर डावलले. हानने नोबेल भाषणात लिझचा उल्लेख केला तसेच पारितोषिक रक्कमेतून निम्मा वाटा लिझला देऊ केला. लिझने तो लगेच दान करून टाकला.
 
झाल्या प्रकाराचे लिझला वाईट वाटले असले तरी हान आणि लिझ मध्ये कटुता आली नाही. त्यांनी एकमेकांसाठी भरपूर केले होते आयुष्यात..(अगदी पळून जाताना लिझला कुणाला लाच द्यावी लागेल म्हणून स्वतच्या आईची अंगठी हानने लिझला दिली होती.) लिझला केवळ संशोधनात रस होता. खरी कर्मयोगी होती ती. संशोधनात अडथळा नको म्हणून लग्न, पोरं सगळे टाळले होते तिने. ना तिला प्रसिध्दी पाहिजे होती ना पैश्याचा हव्यास... मनाने श्रीमंत असणारी लिझ आठ वर्ष कोणत्याही समारंभाला एकच ड्रेस घालून जात होती. तिची आवड केवळ संगीत आणि मोकळ्या रस्त्यावर चालणे...❤️

हिरोशिमा नागासाकीवर बोंब पडला आणि लिझचे नाव "बॉम्बची जननी" म्हणून जगापुढे आले. अमेरिकेत तर ती सेलिब्रिटी झाली. त्यात तिचा ज्यू धर्म देखील पुन्हापुन्हा अधोरेखित करण्यात येऊ लागला मात्र ज्यू धर्माशी घेणे होते ना बॉम्ब शी..( इथे एखादीने प्रसिद्धी कॅश करायचे ठरवलं असतं तर ती भरपूर करू शकली असती)  रेडीओवर तीचा इंटरव्यू घेण्यात आला तेव्हा तिने आवर्जून सांगितले "आण्विक शक्तीचा वापर विचारपूर्वक आणि शांततामय कामासाठीच झाला पाहिजे." तिच्यावर अतिरंजित फिल्म बनवण्यासाठी उत्सुक असलेल्या टीमला तर तिने कोर्टात खेचायची धमकी दिली.. त्याबाबत जागरूक होती ती.

इथे एक गोष्ट आवर्जून सांगितले पाहिजे की चूक मेरी क्युरी आणि तिच्या मुलीने केली होती ती लिझने केली नाही. किरणोत्सारी मूलद्रव्यांना हाताळणे धोक्याचे असते याची जाणीव तिला होती. रुदरफोर्डकडून हान साठीचे येणारे किरणोत्सारी पदार्थाचे पार्सल घेऊन येणाऱ्या पोस्टमनलादेखील तिने आवश्यक काळजी घ्यायला शिकवले होते. त्यामुळेच वयाच्या ८२ व्या वर्षापर्यंत ती काम करू शकली.. आणि ८९ वर्षाचे सुखी समाधानी आयुष्य जगली.. 
तिच्या मृत्यूनंतर तिच्या थडग्यावर जी समाधीशीला लावली आहे त्यावर लिहिले आहे.. ‘Lise Meitner : A physicist who never lost her humanity’  तिचा भाचा आणि सहकारी फ्रिचने निवडलेली ही समाधीशीला अगदी यथायोग्य आहे. शेवटपर्यंत आपली माणुसकी, नाती जपणारी लिझ माइटनर म्हणजे मानवतेचा, प्रेमाचा निर्मळ झरा.. द्वेषाचा, अहंकाराचा दर्प ना होता, ना आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या जखमा तिने भळभळत ठेवल्या.. ना सुडाचा विचार केला...  केवळ प्रेमाचा वर्षाव करणारी,  स्वतः फुलून दुसऱ्याचे आयुष्य फुलवणारी सदाफुली...
जर्मनीने तिला त्यांच्या देशातील सर्वोच्च पुरस्कार देऊन (भारतरत्न सारखा) या सदाफुलीचा गौरव केला आहे. याशिवाय तिला शेकडो महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत. मात्र १९ वेळा रसायन शास्त्र आणि २९ वेळा भौतिक शास्त्रसाठी नामांकन मिळूनदेखील नोबेल पुरस्काराने मात्र तिला हुल दिली... आजवर अनेक गांधीवाद्यांना नोबेल भेटला, मात्र प्रत्यक्ष गांधींना नाही.. तसेच रोझ लींड फ्रँकलिन आणि लिझ माइटनर यांच्याबाबत म्हणावे लागेल. त्यांच्या सोबत काम करणारे आणि त्यांचे शिष्य यांना नोबेल भेटला..

१९८२ साली पीटर आर्मब्रूस्टर या जर्मन शास्त्रज्ञाने एका नव्या मूलद्रव्याचा शोध लावला. लिझ माइटनरच्या सन्मानार्थ त्याने या १०९ व्या मूलद्रव्याचे नाव "माइटनरीयम" असे ठेवण्यात आले. पीटर म्हणतो- ”लिझ माइटनर चा सन्मान देशातील सर्वात महत्त्वाची शास्त्रज्ञ म्हणून केला पाहिजे."
जाताजाता एवढे सांगतो आजवर ९३० लोकांना नोबेल भेटले आहे. त्यातील पहिले काही, मागील वर्षातील काही आणि आपल्या भारतातील यांच्या व्यतिरिक्त इतर  लोकांची नावे माहीत असणे आपल्याला अवघड असते.. मात्र आवर्तसारणी मध्ये केवळ ११८ मूलद्रव्ये आहेत... त्यात लिझला मिळालेला मान अगदी मोठ्या मोठ्या नोबेल विजेत्यांना मिळाला नाही. लिझ ही तिथे ध्रुव ताऱ्यासारखी अढळ झाली आहे.. अमर झाली आहे...नोबेल पुरस्कार पेक्षा पुढे असलेली ही लिझ खरे नोबेल आयुष्य जगली..  जीवनाचा खरा अर्थ सापडलेल्या या सदाफुलीला 😘❤️❤️

#richyabhau
#लिझ माइटनर

Comments

  1. जिवनाचा खरा अर्थ सापडलेली,
    लिझ माइनस्टर,भोतिकशास्र वाचताना
    मोठे शास्रज्ञ कसे झाले वाचणे आनंद
    दायक,अपले धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. आपला प्रतिसाद लेखणीला बळ देणारा आहे😍🙏✊✊

      Delete
  2. प्रेरणादायी...👌👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव