अलेक्झांडर ग्रॅहम बेल: संवाददाता, ऊर्जादाता

अलेक्झांडर ग्रॅहम बेल: संवाददाता


काही शोध असे असतात की शोध लागताना त्याचे पुरेपूर महत्त्व संशोधकाला देखील कळले नसते, मात्र या शोधामुळे पुढील शतकाची दिशा बदलणार असते. टेलीफोनचा शोध असाच एक... टेलीफोनचा शोध लागला तेव्हा बेलला देखील वाटले नसेल की पुढे फोन हा व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य हिस्सा होईल.. त्याच्या एवढ्या आवृत्त्या येतील आणि येड्या गबाळ्या लोकांना पण स्मार्ट बनवतील. आज तुम्ही पोस्ट वाचणाऱ्यापैकी क्वचित एखादा कॉम्पुटरवर वाचत असेल.. बाकी मोबाईलफोन हेच आपल्या संवादाचे साधन... 

बेलचा प्रतिस्पर्धी असलेला एलिश ग्रे म्हणाला होता.. "फोन हे केवळ एक वैज्ञानिक खेळणे असेल, त्याचा जास्त फायदा होणार नाही". बेलदेखील केवळ आपल्या बहिऱ्या आई आणि बायकोशी संवाद साधता असा उद्देश ठेवून संशोधन करत होता, ज्यातून जगाशी संवाद साधायचा मार्ग मोकळा झाला. ग्रॅहम बेल आणि टेलिफोन हे नाते आपल्याला शाळेपासून माहीत असते. मात्र केवळ बेलचे कार्य "टेलिफोनचा शोध" एवढ्या पुरते मर्यादित नाही. आज अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा तीनही देश म्हणतात की "बेल आमचा सुपुत्र आहे.." कारण बेलने त्याचे संपूर्ण जीवन संशोधनाला वाहून घेतले होते.

अलेक्झांडर ग्रॅहम बेल अर्थात आपल्या ॲलेक्सचा जन्म एडिनबर्ग या स्कॉटलंडमधील विद्येचे माहेरघर असलेल्या शहरात झाला. दिवस होता ३ मार्च १८४७. घरात केवळ एक मोठा आणि एक छोटा भाऊ. त्याकाळच्या मानाने छोटे कुटुंब, सुखी कुटुंब. घरात प्रत्येक पिढीत एक सिकंदर... म्हणजे अलेक्झांडर.. वडिलांचे नाव अलेक्झांडर मेलविल बेल, आजोबांचे नाव देखील अलेक्झांडर बेल.. जेव्हा ॲलेक्स ११ वर्षाचा झाला तेव्हा त्याने पप्पांना विचारून मधले नाव "ग्रॅहम' जोडुन घेतले.. पप्पांच्या लाडक्या विद्यार्थ्यांचे.. (तो पण सिकंदर.. अलेक्झांडर ग्रॅहम त्याचे नाव..😁)  आणि अलेक्झांडर बेलचा झाला अलेक्झांडर ग्रॅहम बेल..

घरात भैरवनाथाची भक्ती करण्याची परंपरा.. बहिरेपणावर मात कशी करता येईल या संशोधनात आजोबा, वडील आणि मोठा भाऊ सगळे गर्क होते हो.😀 घरातील सगळ्यांचा मूक-बधिरांच्या शिक्षणाशी संबंध, सगळे उच्चारशास्त्राचे प्राध्यापक.. ॲलेक्सचे शिक्षण घरातच आईवडिलांकडून सुरू झाले. मात्र तो बारा वर्षाचा असताना आईची श्रवणशक्ती कमी होऊ लागली. आईला समजेल असे उच्चार आणि खुणा करण्याचे त्याचे प्रयोग तिथून सुरूच झाले. मात्र पुढील शिक्षणासाठी शाळेत जावे लागले.

त्याला रॉयल हायस्कूल, एडीनबर्ग येथे दाखल केले, मात्र शाळेला दांड्या मारण्यात हा वस्ताद.. तेव्हा त्याला जीवशास्त्र वगळता इतर विषयात रस नव्हता.  केवळ वेगवेगळे प्राणी आणि वनस्पती यांचे नमुने जमा करून त्यावर प्रयोग करायचा त्याचा छंद. साहजिक इतर विषयात कायम काठावर पास होणारा... पप्पांची दहशत होती म्हणून त्याचे किमान शालेय शिक्षण पूर्ण झाले.. पंधरा वर्षांचा ॲलेक्स शालेय शिक्षण पूर्ण करून बाहेर पडला आणि आजोबांसोबत त्याचे प्रशिक्षण सुरू झाले..

अगदी लहान असल्यापासूनच ॲलेक्स म्हणजे एकदम सायंटिस्ट खोपडी. हुशार पोरामागे फिरणारा एक ठोंब्या मित्र असतोच..  तसा ॲलेक्सचा एक मित्र होता बेन हर्डमन. गहू सडायची त्यांची गिरणी होती. गव्हाच्या लोंब्या एका बाजूने टाकायच्या.. दुसऱ्या बाजूने गहू आणि भूसा वेगवेगळा होऊन बाहेर पडणार...  बारा वर्षाच्या ॲलेक्सने त्यांच्या यंत्रात अशी सुधारणा करून दिली की काम दुप्पट वेगाने व्हायला लागले. दोस्ताचा बाप "जॉन हर्डमन" तर चकितच झाला. (दोस्तांचे लगेच होतात राव.. स्वतचा नाय होत लवकर😔) जॉनने ॲलेक्स आणि बेन यांना प्रयोग करण्यासाठी एक वर्कशॉप बनवून दिले होते.

ॲलेक्सची आई "एलिझा" पियानो छान वाजवायची.. बहिरेपणावर मात करत तिने हे कौशल्य स्वतः आत्मसात केले होते आणि ॲलेक्सलादेखील शिकवले होते. शालेय शिक्षण पूर्ण करून ॲलेक्स आजोबांकडे लंडनला गेला. आजोबांनी एका वर्षात पठ्ठा तयार केला. सोळा वर्षांचा ॲलेक्स आता संगीत आणि उच्चारशास्त्राचा शिक्षक म्हणून तयार झाला होता. "वेस्टन हाऊस अकॅडमी" मध्ये त्याचे शिकणे आणि शिकवणे एकाच वेळी सुरू होते. आणि त्याचवेळी सुरू होते प्रयोग कृत्रिम आवाज निर्माण करण्याचे...

"पप्पा बेल" यांनी ॲलेक्स आणि त्याच्या मोठ्या भावाच्या डोक्यात किडा सोडला होता.. कृत्रिम आवाज काढेल असे यंत्र तयार करायचे.ॲलेक्सने नकली मानवी कवटी बनवली.. जीच्यातून केवळ आवाज येऊ शकतं होता... मामा.. पाइप मधून कवटीत हवा सोडली की ओठांची हालचाल होणार आणि आवाज येणार ..मामाsss. हा आवाज एवढा हुबेहूब होता की शेजारी बघायला आला यांच्याकडे कोणते बाळ आले आहे😀 अर्थात हे उपकरण गम्मत म्हणून ठीक असले तरी व्यवहारात त्याचा उपयोग नव्हता.

यावर पुढील संशोधन करून अनेक स्वर कसे निघू शकतील यावर विचार करत ॲलेक्सने आपले लक्ष ट्युनिंग फोर्ककडे केंद्रित केले. ॲलेक्स स्वतःला एखाद्या विषयावर काम करत असेल तर त्याचा त्यावर पूर्ण फोकस असायचा.. त्याचेच एक वाक्य आहे.. "भिंग घेऊन सुर्यकिरणे केंद्रित नाही केली तर सुर्य देखील आग लावू शकत नाही". याशिवाय ॲलेक्सचे प्राण्यांवर प्रयोग सुरू होते. त्याच्या पाळीव कुत्र्याला ट्रेन केले आणि तो "हु आ ओ गा मा मा" असे भुंकायला शिकला.. ॲलेक्स म्हणायचा, कुत्रा म्हणत आहे "हाऊ आर यू ग्रँडमा" विशेष म्हणजे जमलेल्या लोकांना ते पटायचे पण🤪 पुल यांच्या पाळीव प्राणी मध्ये नाही का शिवमहिम्नस्तोत्र ऐकु यायचे, तसेच असेल😀😀

१८७० हे वर्ष बेल कुटुंबासाठी अतिशय खराब गेले ॲलेक्सचे दोन्ही भाऊ मेल्विल जेम्स बेल आणि एडवर्ड चार्ल्स बेल हे क्षयरोगाने मेले. पप्पा आणि ॲलेक्सचीपण तब्येत बिघडली. शेवटी प्रकृती स्वास्थ्याकरिता सगळे विकाविक करून (ॲलेक्सला ब्रेकअपपण करायला लागले😔) पप्पा, मम्मी, ॲलेक्स आणि मेल्विलची विधवा बायको असे उरलेले कुटुंब कॅनडामध्ये निर्वासित झाले. दहा एकर जागा घेऊन एका गावात राहू लागले. पुढच्या वर्षी ॲलेक्स अमेरिकेत बोस्टन विद्यापीठात उच्चारशास्त्र, स्वरयंत्राचे कार्यशास्त्र शिकविण्यासाठी आला. 

तेथेच त्याने कर्णबधीरांसाठी यंत्र तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले. तसेच जन्मजात कर्णबधीर व्यक्तींना बोलावयास शिकवण्यासाठी प्रयोग सुरू झाले.ॲलेक्सने "बहिऱ्यांच्या शिक्षकांना" प्रशिक्षण देण्यासाठी बोस्टन येथे विद्यालय देखील काढले. आपण  टीव्हीवर पाहिले असेल.. "कानाने बहिरा, मुका परी नाही. शिकविता भाषा बोले कसा पाही" जन्मजात बहिरा असलेला व्यक्ती पाहून पाहून बोलायला शिकू शकतो👍🏼 बेलचे मुख्य काम ते.
 
इथेच त्याची ओळख झाली. "माबेल हबर्ड" नावाच्या कर्णबधिर मुलीशी.. जी भविष्यात त्याची जीवनसाथी होणार होती.माबेल अतिशय हुशार, नाकेली, देखणी, खूप श्रीमंत घरातली होती. वयाच्या पाचव्या वर्षी तिला बधिरत्व आले होते. नॅशनल जॉग्रॅफिक सोसायटी (ज्याचा चॅनल आपण टीव्ही वर पाहतो.. नॅशनल जॉग्राफिक चॅनल) चे पहिले अध्यक्ष गार्डिनर हबर्ड यांच्या सहा पोरांपैकी एक. हिला अपंगत्व असल्याने विशेष लाडकी.. ॲलेक्सला ती आवडत होती मात्र प्रपोज करायला हिम्मत नाही.. बडे बापकी लडकी. तिच्या बापासमोर आपल्या भाऊची हवा टाईट. 🙊
पुढे जेव्हा टेलिफोनचा शोध लागला.. आणि ॲलेक्स फेमस वगैरे झाला.. तेव्हा त्याच्यात हिम्मत आली. मोरासारखा छाती काढून तिच्या बापासमोर उभा राहिला😀 लवकरच दोनाचे चार हात झाले... पुढे खरच दोनाचे चार झाले.. दोन मुले दोन मुली असे चार😀 मात्र दोन्ही मुले अल्पजीवी ठरली. माबेलने ॲलेक्सला स्वानुभववरून सांगितले की "यंत्र वगैरे राहू दे बाजूला, ओठांची हालचाल वाचणे हाच बधिरांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे".
माणसाचा आवाज तारेद्वारे दूर पोचवायचा ॲलेक्सचा प्रयत्न सुरू होता. त्याने या कामात थॉमस वॉटसन याची मदत घ्यावी असे ॲलेक्सच्या मित्रांनी सुचवले. वॉटसन खूप मेहनती शास्त्रज्ञ होता. वॉटसन ट्रान्समीटरबाबत ॲलेक्सला मदत करणार होता. एक दिवस दोघे आपापल्या खोलीत काम करत असताना वॉटसनच्या हाताच्या धक्याने ट्रान्समीटर थरथरला, तो लहान आवाज इकडे ॲलेक्सला स्पष्ट ऐकू आला. खुश झालेल्या ॲलेक्सने लगेच आपल्या ट्रान्समीटरचा उपयोग करून संदेश पाठवला.. "मि. वॉटसन, लवकर इकडे या, मला तुमची गरज आहे"
हा आवाज तिकडे वॉटसनच्या रिसीवरवर आला देखील.. जगातला पहिला कॉल झाला होता. सल्फ्युरिक आम्लयुक्त पाण्यात कंपीत होणा-या सुईमधून ध्वनीसंक्रमण करण्यात यश येऊन त्याचे रूपांतर विद्युतप्रवाहनिर्मितीत झाले होते. "ये चीज काम कर रही हैं" याची खात्री पटल्यानंतर ॲलेक्स आणि वॉटसन आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी अर्ज दाखल केला. दिवस होता १५-०२-१८७६. त्या दिवशी अशाच प्रकारच्या प्रयोगासाठी आधीच अनेक अर्ज पेटंट कार्यालयात पडून होते.😬
टेलिफोनचा शोध कोणी लावला हा वादाचा मुद्दा आहे.. यात इतर स्पर्धक शास्त्रज्ञांनी ॲलेक्सवर वशिलेबाजीचा आरोप केला आहे. "ज्याचा वशिला त्याचे कुत्रे पण काशीला..." खरेखोटे हे याबाबत काळेपांढरे या दोनच रंगात पाहता येणार नाही...इथे सत्याला ग्रे शेड असावी. "एलिषा ग्रे" या शात्रज्ञाने देखील त्याचदिवशी तसाच प्रयोग, तसेच यंत्र यासाठी अर्ज दाखल केला होता. दोघांनी एकमेकावर आपले डिजाइन चोरल्याचा आरोप केला. हे पेटंटयुद्ध बराच काळ सुरू राहिले,  "काही तास आधी" अर्ज दाखल केल्याचा फायदा म्हणून  अलेक्झांडर बेल आणि थॉमस वॉटसन यांनाच मार्च १८७६ मध्ये दूरध्वनी यंत्राचे पेटंट मिळाले.

आंतोनियो मेउच्ची या शास्त्रज्ञाने विद्युतचुंबकीय शक्तीवर चालणारे यंत्र बनवले होते. १८७१ मध्ये त्याने हे यंत्र पेटंट करण्यासाठी अर्ज दाखल केला होता परंतु त्याच्या संशोधन अर्जामध्ये विद्युतचुंबकाचा उल्लेख नसल्यामुळे ह्या पेटंटला फारसे वजन मिळाले नाही. फिलिप राईश या जर्मन शास्त्रज्ञाने देखील याबाबत पेटंट अर्ज खूप आधी दाखल केला होता. या दोघांची यंत्रे खूप वेगळी होती. मात्र ग्रे आणि बेल यांची यंत्रेपण हुबेहूब.. त्यामुळे वाद खूप पेटला. अगदी अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात गेला. अनेक शास्त्रज्ञांनी व प्रतिष्ठित व्यक्तिंनी बेलच्या बाजूने साक्ष दिल्यावर  १८९३ मध्ये अमेरिकेने सर्वोच्च न्यायालयाने पेटंटवर बेल वॉटसन जोडीचा हक्क मान्य केला.

बेल वॉटसन यांनी हे दूरध्वनीचे पेटंट वेस्टर्न युनियन कंपनीला १ लक्ष डॉलर्स मध्ये विकण्याची ऑफर दिली. त्यांना तेव्हा याचे महत्व कळले नाही.. त्यांनी ऑफर सपशेल नाकारली. पेटंटचे काय आता लोणचे घालणार..😟  सासरे गार्डीनर हबर्ड जावयाच्या मदतीला धावून आले. त्यांनी स्पॉन्सर केले आणि बेल टेलिफोन कंपनी स्थापन झाली. तिचेच रुपांतर पुढे AT&T कंपनीत झाले आहे.. ज्यात आजमितीला अडीच लाख लोक काम करत आहेत. बर्लिन शहरापासून या कंपनीचे नेटवर्क सुरू झाले..लोकांना "तार पाठविणे" यापेक्षा सुगम, जलद पर्याय सापडला होता. दोनच वर्षांनंतर वेस्टर्न युनियन कंपनीला उपरती झाली. मात्र आता त्यांना पेटंटचे हक्क खरेदी करायला २५ दश लक्ष डॉलर्स मोजावे लागले😀
आज केवळ टेलिफोनसाठी आपण बेलला ओळखत असू तरी त्याने अनेक गोष्टींमध्ये संशोधन केले आहे. कर्णबधीर व्यक्तींसाठी त्याने ऑडियोमीटर तयार केला आहे. त्याने समुद्रातील पाण्याखालील हिमनग शोधणारे उपकरण बनवले आहे. त्याने बनवलेल्या आगबोटीने ११२ किमी/तास गतीचा विक्रम केला होता.. जो पुढे दहा वर्ष अबाधित होता. राईट बंधूंचे विमान उडण्याआधी बेलने पतंग सदृश हवाई वाहन बनवायचे प्रयत्न केले होते. प्रकाशाला आवाजामध्ये परावर्तीत करणारे फोटोफोन हा बेलच्यामते त्याच्या सर्वात भारी शोध होता. १८८० मध्ये विनातार (आपल्या मोबाईल प्रमाणे) संदेश पाठविण्यात आला. लक्षात घ्या.. तोवर रेडिओ चा शोध लागला नव्हता बरं..
आपण आता मॉल, विमानतळ येथे जे मेटल डिटेक्टर पाहतो त्याचे श्रेय देखील बेलला जाईल. अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफिल्ड यांच्यावर १८८१ मध्ये गोळीबार झाला होता. शरिरात गोळी कुठे आहे हे  इलेक्ट्रोमॅग्नेट मशिन वापरून बेलने सांगितले होते. अर्थात तेव्हा गारफिल्ड वाचले नाही.. नाहीतर तेव्हापण बेल खूप मोठा हीरो झाला असता....  स्वतःच्या नवजात बाळाच्या मृत्यूनंतर बेलने मेटल व्हॅक्क्यूम जॅकेट तयार केले. यातच सुधारणा होत आज कृत्रिम फुफ्फुस तयार करण्यात आली आहेत..  विषबाधा झालेल्या किंवा पोलिओच्या रुग्णांना श्वसनासाठी अडथळा येत असेल तेव्हा या उपकरणाची मदत होते.

१९१५ मध्ये जेव्हा सुमारे ३५०० किमी तार टाकून अमेरिकेतील पूर्व आणि पश्चिम किनारे समुद्रातून जोडणारी टेलिफोन सेवा पहिल्यांदा सुरू झाली तेव्हा पहिला कॉल करायचा मान बेललाच दिला. त्यावेळीही न्यूयॉर्क मधून बेलने सँन फ्रान्सिस्को येथील वॉट्सनला फोन करून तेच प्रसिद्ध वाक्य म्हंटले, "मि. वॉटसन, लवकर इकडे या, मला तुमची गरज आहे" दुसर्‍या टोकावरून वॉटसन हसून म्हणाला, ‘‘महोदय मला क्षमा करा! मी लवकर येऊ शकत नाही. कारण आता लगेच मी निघालो, तरी तुमच्यापर्यंत पोहोचायला मला एक आठवडा लागेल!’’

बेलने स्वतच्या अभ्यासिकेत कधीच फोन बसवून घेतला नाही बरं का.. त्याला वाचताना डिस्टर्ब नको असायचे. बेलने अनेक शास्त्रीय व्याख्याने दिली आणि आनुवांशिक बहिरेपणा व अन्य विषयांवर शंभराहून अधिक निबंध व लेख लिहिले. "बहिऱ्या व्यक्तीने बहिऱ्या व्यक्तीशी विवाह करणे टाळावे.. अन्यथा होणाऱ्या संतती मध्ये देखील संवादाअभावी बहिरेपणा येऊ शकतो" असे तो सांगायचा. संजीवकुमारचा कोशिश ज्यांनी पाहिला असेल त्यांच्या डोळ्यापुढे चित्र आले असेल. 

फ्रान्स सरकारने वॉल्टा पारितोषिक आणि ५०००० फ्रँकस देऊन १८७७ मध्ये त्याचा सन्मान केला. तेव्हा त्याला स्वतःला जरी आर्थिक चणचण होती तरी त्याने ती रक्कम वॉल्टा लॅब ला देणगी दिली. सन १८८३ मध्ये बेलने सासऱ्यांसोबत  "सायन्स" हे नियतकालिक सुरू केले. विज्ञानाचा प्रसार करणारे हे नियतकालिक आठ वर्षे पदरमोड करून बेलने जगवले. पुढे अमेरिकन असोसिएशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे अधिकृत नियतकालिक म्हणून गणले जाऊ लागले.

सासऱ्यानंतर नॅशनल जिऑग्रॉफिक सोसायटीचे अध्यक्षपद बेलकडेच चालून आले. गम्मत म्हणजे त्याच्यानंतर त्याचा जावई "ग्रॉसव्हेनोर" अध्यक्ष झाले. ग्रॉसव्हेनोर सहसंपादक म्हणून रुजू झाले आणि त्यांनी भरपूर नवे सभासद सोसायटीला मिळवून दिले. बेलचा सहा वर्षात तसा काही फार उपयोग सोसायटीला झाला नाही..म्हणून बेल स्वतचं बाजूला झाले आणि ग्रॉसव्हेनोर सोसायटीचे झाले. आज आपल्याला केवळ नॅशनल जॉग्रफिक चॅनेल माहीत असेल. मात्र त्यावरील कार्यक्रमाची गुणवत्ता पाहून देखील संस्थेचे कार्य आपल्या लक्षात येऊ शकेल. 
बेलच्या स्मरणार्थ ध्वनीच्या तीव्रता पातळीच्या एककाला बेलचे नाव दिले गेले आहे. आपण डेसिबेल म्हणतो त्या decibel मध्ये बेल आहे.या एककाची मात्र गम्मत असते बर का. डेसिबेल (डीबी) हे घातांकित एकक असून दर १० डीबी आवाजाची तीव्रता दसपटीने वाढते. म्हणजे २० डीबी आवाज १० डीबीच्या आवाजापेक्षा १० पट असतो तर ३० डीबीचा आवाज १० डीबी आवाजाच्या १०x१०= १०० पट असतो.मानवाचा कान ८० डीबी आवाज सहन करू शकतो.. त्यापेक्षा जास्त असेल तर त्याला त्रास होतो.. (जसा मला आता फटाक्याच्या आवाजाने होतो आहे)

पेटंटचा किस्सा सोडला तर बेल नंतर वादात कधी पडलाच नाही..  त्याचा वादापेक्षा संवादावर भर होता.. आयुष्यभर प्रयोगशील राहिलेला बेल २ ऑगस्ट १९२२ या दिवशी वयाच्या ७५ वर्षी मधुमेहाने मृत्यू पावला. त्याला श्रद्धांजली म्हणून अमेरिका आणि कॅनडा मधील सर्व दूरध्वनी संच एक मिनीट बंद ठेवण्यात आले होते. त्याच्या प्रयोगशाळेतील वैज्ञानिक आणि सहवैज्ञानिक यांनी पतंग सदृश्य हवाई वाहनाच्या वेळी वापरलेले रेशीम वापरून शवपेटी तयार केली. माबेलने आधीच विनंती केली होती त्याप्रमाणे अंत्ययात्रेत कुणीही काळे वस्त्र परिधान केले नव्हते.. जगावेगळ्या व्यक्तीची  जगावेगळी अंत्ययात्रा.... 
"जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा दुसरा दरवाजा उघडलेला असतो.  मात्र आपण आपला वेळ बंद दरवाज्यावर नाराज होण्यात घालवतो.. उघडलेला दरवाजा आपल्याला कधीच दिसत नाही." बेलच्या कबर शिलेवर हे वाक्य.. सदैव आशावादी आणि सकारात्मक असलेला बेल हा देव धर्म याबाबत अज्ञेयवादी होता... आणि त्याच्या दृष्टीने देव हा भीतीचा नाही तर प्रीतीचा विषय होता.. जवळच्या दोन भाऊ आणि दोन मुले यांचे अवकाळी मृत्यू पचवून पण तो खचला नाही.. त्याच्या संशोधनावर नकारात्मक परिणाम झाला नाही..उलट आईचे बहिरेपणा, मुलांचा मृत्यू यातून त्याने यावर मात कशी करायची याचाच विचार केला... हेलन केलर यांना देखील प्रेरणा देण्याचे श्रेय बेलला जाते..
आयुष्यात ऊर्जा पेरणारी माणसे हवीत... मात्र नसतील तर स्वतचं स्वतची ऊर्जा झाली पाहिजे.. अत्त दीप भव... आपणच आपला उजेड होऊ🙏

#richyabhau
#ग्रॅहम बेल

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव