वर्गीस कुरियन.. द बेस्ट ऑफ इंडिया

 
वर्गीस कुरियन.. द बेस्ट ऑफ इंडिया❤️❤️❤️
समजा "क्ष" नावाच्या व्यक्तीचे स्वप्न असते काहीतरी.. मात्र त्याला घरचे नावडत्या क्षेत्रात टाकतात. परदेशातून शिकून आल्यावर त्याच्यावर एक वर्ष खेडेगावात काम करण्याची सक्ती करण्यात येते, जिथे तो दर महिन्याला राजीनामा देत असतो आणि राजीनामा नामंजूर होत असतो...सलग आठ महिने.. 😭 तर अशी व्यक्ती त्याला सोपवलेले काम किती प्रामाणिकपणे पार पाडेल? 🤔

"सहकारी संस्था" कश्या काम करतात हे आपल्याला माहीत आहेच. चेअरमनपद मिळवण्यासाठी कायकाय कुरापती केल्या जातात हे पण माहीत... पण केरळमध्ये जन्मलेली एक व्यक्ती गुजरात येथे स्थापन झालेल्या सहकारी संस्थेचा तब्बल तीस वर्ष चेअरमन बनते.. तेही बिनविरोध , एकमताने..😱 ही तीच "क्ष" नावाची व्यक्ती आहे.. कधीकाळी जिचा मारूनमुटकून "मारुती" केलेला.. "भारताचा मिल्कमन", ज्याचा जन्मदिवस "नॅशनल मिल्क डे" म्हणून साजरा केला जातो. ही व्यक्ती म्हणजे वर्गीस कुरियन.. ज्यांचे जन्मशताब्दी वर्ष आज पासून सुरु होत आहे.
"देवभूमी" केरळमधील कोळ्हिकोड गावात एका सीरियन ख्रिस्ती कुटुंबात २६ नोव्हेंबर १९२१ रोजी वर्गीसचा जन्म झाला. चार भावंडात याचा नंबर तिसरा. वडील इंग्रजी आमदनीमध्ये सरकारी नोकर,  सिव्हील सर्जन होते. आई  सुशिक्षित तर होतीच पण पियानोवर तिचा हात अफलातून चालायचा. वर्गीसच्या घरचे चांगले..  शिवाय काका, मामा सगळे श्रीमंत, सुस्थापित... थोडक्यात एक मोठ्या घरात त्याचा जन्म झाला... वर्गीसचे नाव देखील त्याच्या काकाच्या नावावरून पडले. काका "रावसाहेब वर्गीस" हे कोचीन मधील मोठे प्रस्थ. त्याचे नाव याला भेटले जे त्याने काकापेक्षा जास्त "रोशन" केले.

वडिलांची पोस्टिंग होती त्या इरोड जिह्यातील एका गावात (गावाचे नाव मराठीत लिहणे लयच अवघड😭.. आणि वाचताना तुमची जीभ वाकडी व्हायची..😂 नाव एवढे महत्वाच नाही. जाऊद्या..) डायमंड जुबिली हायस्कूलमध्ये त्याचे शालेय शिक्षण झाले. वर्गीस हा वर्गातील सर्वात हुशार मुलगा (वर्गचा वर्ग😀) त्यामुळे वयाच्या चौदाव्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण करून हा पठ्ठ्या चेन्नई मधील "लायोला" कॉलेजमध्ये दाखल झाला. वर्गातील सर्वात कमी वयाचा विद्यार्थी. साहजिक  "पडाखु"  समजल्या जाणाऱ्या वर्गीसपासून बाकीचे फटकून राहायचे. मात्र यामुळेच कोणावर अवलंबून न राहण्याची सवय वर्गीसला लागली.❤️ 

अभ्यासात हुशार असला तरी वर्गीस केवळ "किताबी कीडा" नव्हता .. उलट अभ्यासापेक्षा खेळात त्याला जास्त रस होता. कॉलेजच्या क्रिकेट, बॅडमिंटन, टेनिस आणि बॉक्सिंग टीममध्ये त्याचा सहभाग असायचा.त्या काळात "एनसीसी" नव्हते, मात्र त्याचसारखे "युओटीसी" म्हणजे "युनिव्हर्सिटी ऑफिसर्स ट्रेनिंग क्रोपस" होते.  वर्गीस त्यामध्ये सर्वात बेस्ट कॅडेट. तेव्हाच वर्गीसने निश्चय केला होता की शिक्षण पूर्ण करून सैन्यात जायचं. 

वयाच्या १९ व्या वर्षी वर्गीस भौतिकशास्त्रात पदवीधर झाला. त्यानंतर लगोलग बी.ई. (यंत्र अभियांत्रिकी) ही पदवी मिळवली. मात्र याकाळात त्याचे पप्पा निर्वतले, आणि वर्गीसचे स्वप्न त्यापासून दूर गेले.😟 आईने त्याला सैन्यात जायला प्रखर विरोध केला. वर्गीसचे काका टाटा स्टीलमध्ये संचालक मंडळावर होते.त्यांच्या आग्रहामुळे इच्छा नसताना "टाटा स्टील टेक्निकल इन्स्टिट्यूट, जमशेदपूर" येथे वर्गीस दाखल झाला. तिथली पदवी देखील मिळवली. आता काकाच्या मदतीने चांगली लठ्ठ पगाराची नोकरी देखील भेटली असती.. पण पंचविशीमध्ये आलेल्या वर्गीसने ठरवले... आता बास🖐🏾.. किती दिवस काकाच्या सावलीखाली राहायचे. 

घरी काय हातावर पोट नव्हतेच.. त्यामुळे नोकरी लगेच केली पाहिजे अशी स्थिती नव्हती. वर्गीसने पुढे  शिकायचे ठरवले. अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्यासाठी जायचा प्लॅन केला,  भारत सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. तेव्हा एक viva पण झाला. मुलाखतीत एका परिक्षकाने त्याला विचारले "पाश्‍चरीकरण म्हणजे काय?" भाऊने बरोबर उत्तर सांगितले.. मुलाखत घेणाऱ्याला वाटले पोराला दुधाचे लय ज्ञान....  तब्बल तीस हजार रुपयांची शिष्यवृत्ती मंजूर झाली..मात्र ती सशर्त होती... तिकडं जाऊन पाहिजे ते नाय शिकायचे...  दुग्ध विकास आणि दुग्ध उत्पादनाचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आणि नंतर भारतात परत येऊन सरकारी नोकरी स्वीकारायची. नोकरी नाय केली तर पैसे वसूल करण्यात येणार असा बाँड पण लिहून घेण्यात आला. 

आपल्या भाऊचा मामा "जॉन मथाई" म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वेमंत्री आणि दुसरे अर्थमंत्री बरं का.. पण हा मामा काय कामाचा नाही निघाला. मामाने वशिला लावायला नकार दिला. शेवटी बाँड करून झाल्यावर, बंगलोर येथे असलेल्या राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेत नऊ महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यानंतरच अमेरिकेला जायला परवानगी मिळाली. तिथे मिशिगन विद्यापीठात धातूशास्त्र आणि अणुशास्त्र यामध्ये मास्टर डिग्री मिळवून वर्गीस परत भारतात आला. संपूर्ण विद्यापीठात सातवा येणारा वर्गीस ज्याच्यासाठी आता भारतात अनेक कंपन्या पायघड्या घालून वाट पाहत असतील...

भारतात परतल्यावर तो शिक्षणखात्याच्या उपसचिव यांना भेटायला जातो तेव्हा त्याला समजते बाँडनुसार गुजरातमधील आणंद येथे त्याला नोकरी करायची आहे.. अर्थातच त्याला अश्या दुर्गम खेडेगावात जाणे मान्य नव्हते.. आणि त्याने आघावपणे तोंडावरच सपशेल नकार दिल्यावर सरकारी अधिकारी काय ऐकून घेतील काय..😭 दाखवला कचका.. कोर्ट केस करायची धमकी मिळाल्यावर वर्गीस हादरला..😬 विमान जमिनीवर आले.. परत मामाचा धावा केला.. मामाने परत हात वर केले. शेवटी मानायला लागले "आणंदच आनंद"...😭
"जो वादा किया निभाना पडेगा, लोन लिया तो इएमाय चुकाना पडेगा" २८ वर्षांचा वर्गीस सरकारी नोकरी करण्यासाठी गुजरातमधील "आणंद" येथे येऊन पोहचला... आणि शब्दश रडकुंडीला आला. हजारो रुपयांची दुसरी नोकरी उपलब्ध असताना केवळ २७५ रुपये दरमहा देणारी नोकरी पुढचे एक वर्ष त्याला करायची होती. एकतर आवड वेगळी, शिक्षण वेगळ, आणि आता काम अजून वेगळे... भौतिकशास्त्राची पदवी, धातूशास्त्रात डबल मास्टरपदवी, शिवाय मेकॅनिकल इंजिनिअर पदवी असलेल्या वर्गीसला काय काम करायचे होते.. तर सुटाबुटातील हा अधिकारी रोज अंगाला शेणामूताचा वास येणाऱ्या अडाणी ग्रामस्थांसमोर डोकेफोड करून घेणार होता. साय उत्पादक केंद्राचा कार्यभार त्याच्यावर सोपविण्यात आला होता, पोस्ट व्यवस्थापकीय संचालक अशी मोठी असली तरी डोकेदुखी खूप होती. 😭

एका छोट्या गॅरेजमध्ये राहायचे, तूटपुंजा पगार, कमी शिकलेले आणि पारंपरिक विचारसरणी असलेले सहकारी अवतीभोवती.. आणि रोजची डोईफोड..आणंद नामक एक मोठा गोठा, ज्यातील सर्वात दुःखी प्राणी म्हणजे वर्गीस😀.. त्याने दर महिन्याला नोकरीचा राजीनामा पाठवायचे सत्र सुरू केले.. अखेर आठ महिन्यांनी त्याचा राजीनामा मंजूर झाला.. खुशी खुशी तो तिथून जायला निघाला... पण हे होणे नव्हते.. आणंदशी त्यांचे नाते असे सहजासहजी संपणार नव्हते. 
आधी आपण आणंदबद्दल जरा माहिती घेऊ. आणंद हे"खेडा" जिल्ह्यात, जिथे त्रिभुवनदास पटेल या गांधीवादी नेत्यांचे काम जोरकस होते. खेडाचा शेतसारा सत्याग्रह तुम्हाला माहीत असेलच.. सरदार वल्लभभाई पटेल यांचे त्रिभुवनदास जवळचे साथीदार. सहकार आणि नवीन तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून ग्रामीण भारताचा विकास करणे हा सरदार पटेल यांचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्रिभुवनदास यांनी १९४६ मध्ये "खेडा जिल्हा सहकारी दुग्ध उत्पादक संघ मर्यादित " स्थापन केला होता. त्याआधी तिथे ब्रिटिश सरकारने स्थापन केलेली पोल्सन डेअरी आपल्या एकाधिकार शाहीच्या जोरावर गरीब शेतकऱ्यांची पिळवणूक करत होते. या कंपनीची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी खेडा जिल्ह्यातील दुग्ध उत्पादकांनी १५ दिवस आंदोलन करून अखेर पोल्सनच्या मग्रूर मालकाला वाकवले होते.

खेडामधील दूध रोज मुंबईला जात होते.. मागणीची अजिबात कमी नव्हती..  मिळणारा प्रचंड नफा पोल्सनच्या मालकाला जात होता. हाच नफा दूध उत्पादकाला मिळावा यासाठी त्रिभुवन दास यांच्या पुढाकाराने सहकारी संघ स्थापन झाला होता. वर्गीस कुरियन यांचे मात्र त्रिभुवनदास यांच्याशी काही पटेना.. "अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणली पाहिजे" हा कुरियन यांचा रेटा तर "आहे त्यात सुरुवातीला भागवून घ्या" असे त्रिभुवनदास यांचे म्हणणे... त्यांचे म्हणणे पण बरोबर होते.. केवळ ५०० लिटर दूध संकलन असलेल्या डेअरी मध्ये काय गुंतवणूक करणार.. मात्र कुरियन जेव्हा सोडून जायला निघाले तेव्हा त्रिभुवनदास यांनी माघार घेतली. त्यांना कुरियन यांना जाऊन द्यायचे नव्हते...(गुजराती दिमाग.. ऐसे ही नही छोडते हैं..😉) त्रिभुवनदास त्यांना बोलले काय मशिनरी मागवायची ती मागवा, सुरु करा.. आणि मग खुशाल जा😁
इथे कुरियन यांना "विनविन" पोझिशन आली.. त्यांचा एक वर्षाचा करार पण पूर्ण होणार, आणि त्यांना डेअरी साठी हवे तसे साहित्य पण येणार होते. मुंबईतील एल अँड टी कंपनीमधून पाश्चरायजर मशीन घेतली. अमेरिकेतून "दालाया" नावाच्या डेअरीतज्ञ मित्राला डेअरी सेटअप करायला बोलावून घेतले..  आणंद डेअरी उभी राहायला लागली. त्रिभुवनदास पटेल, एम एच दलाया आणि वर्गीस कुरियन या तिघांनीही झोकून देऊन काम केले. "तीगडा सरकार" म्हणून लवकरच या तिघांची ख्याती खेडा परिसरात पसरली.  अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डेअरी व्यवस्थापन करणे यासाठी कुरियनने न्युझीलंडला जाऊन प्रशि़क्षण पूर्ण केले. पुढे जाऊन सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन अमूलसाठी पूर्णवेळ वाहून घेतले.

दुधाची नासाडी, दुध भुकटी, दुधाच्या वितरणातले दोष या सर्वच मुद्द्यावर कुरियनने काम करायला सुरुवात केली. जिथे  १९४८ साली एका दिवसात २०० लिटर दूध संकलन होत होते तिथे  १९५२ साली २०००० लिटर प्रतिदिन पर्यत दूध रोज जमा व्हायला लागले. दूध संकलन वाढले होते. आता अतिरिक्त दुधाचे काय करायचे हा प्रश्न होता. बाहेर देशात मोठमोठ्या डेअरी मध्ये गाईचे दूध असते. त्याची भुकटी करणे शक्य असते.. मात्र म्हशीच्या दुधाची भुकटी करणे जगात तोवर शक्य झाले नव्हते. कुरियनने अनेक तज्ञांकडे मदत मागितली.. मात्र सगळीकडे नकारघंटा वाजली.. शेवटी कुरियनने स्वतचं ते आव्हान समजून प्रयत्न केले.. प्रयोग यशस्वी झाला.. आणि म्हशीच्या दुधाची भुकटी जगात सर्वप्रथम भारतात बनायला लागली❤️ ( फक्त शून्याचा शोध नाही, म्हशीच्या दुधाच्या भुकटीचा शोध पण भारतात लागला आहे... सांगायला बरे तेवढेच😉)
'आपला स्वतःचा ब्रँड सहकारी सोसायटीला हवा' या भावनेतून अमूलची स्थापना करण्यात आली. हे नांव आणंद मिल्क युनियन लिमिटेड चा शॉर्टफॉर्म जसे होते तसेच "अमूल" म्हणजे ज्याचे मोल करता येणार नाही असे असाही त्याचा अर्थ होता. आधी सोसायटी स्थापन केली तेव्हाचे नाव Anand Milk Producers Union Limited जीचा शोर्टफॉर्म AMPUL होत होता. यालाच थोडा बदलून 'अमूल' करण्यात आले. सहकारी संस्था असली तरी स्पर्धेत टिकले पाहिजे या विचारातुन अमूलची जाहिरात करण्यात आली.  १९६६ साली अमूलसाठी मॉडेलिंग करणारे कार्टून जन्माला आले. तीच... अमूलच्या जाहिरातीत "अटरली बटरली डीलिशियस अमूल" म्हणणारी, खोडकर छोटी मुलगी. 👧आज आबालवृध्द कोणीही तिला पाहिले की त्यांच्या तोंडात नाव येईलच.. अमूल..
आज देशातील ७.५ लाख शेतकरी अमूलच्या डेअर्‍यांच्या माध्यमातून दररोज ३३ लाख लिटर दुध उत्पादन करत आहे. अमूल भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन, सिंगापूर, हाँगकाँग, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, बांगलादेश, मॉरिशस, आखाती आणि आफ्रिकेतील  देशांमध्ये पोहोचले आहे. नेस्ले आणि इतर मोठ्या स्पर्धकांशी टक्कर देत अमूल जगातील सर्वात मोठी डेअरी ठरली आहे. अमूलमूळे दूध व्यवसाय ना राहता ही एक सामाजिक चळवळ बनली आहे.  या उद्योगामुळे स्त्रियांच्या हाती पैसा खेळू लागला. त्यांचे आर्थिक सबलीकरण आणि सक्षमीकरण आपोआप झाले. . जातिसंस्थेसारख्या जुनाट गढीला या चळवळीमुळे काही प्रमाणात तडे गेले आहेत. "खाली जेब शैतान का घर." लोकांना समृध्दी दिसायला लागली आणि स्त्री पुरुष समता तसेच सामाजिक न्याय या बाबींना तुलनेने चांगले दिवस आले. 

१९६५ साली पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्याशी कुरियनची भेट झाली. शास्त्रीजी या भाऊवर एवढे इंप्रेस झाले की देशभर असे प्रकल्प व्हावेत याची संपूर्ण जबाबदारी कुरीयनवर सोपवण्यात आली.  देशभर धवलक्रांतीसाठी "दुधाचा महापूर" हा प्रकल्प राबविला गेला. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या पन्नास वर्षांत प्रतिव्यक्ती दूध वापराचे प्रमाण दुप्पट झाले आहे. एकेकाळी दुधाचे दुर्भिक्ष्य असलेला आपला देश देशांतर्गत मागणी भागवून दूधनिर्यात करत आहे. (देशांतर्गत मागणी ऐवजी गरज लिहिणार होतो.. पण जीभ चाचरली... सगळ्यांची नाही.. केवळ पैसे असलेल्यांची गरज भागली असे म्हणू शकू 😔) आज १९ कोटी टनांचे दूध उत्पादन देशात वर्षाला घेतले जाते, सुमारे आठ लाख कोटी रुपयांची उलाढाल त्यामधून होत आहे.. आजमितीला ८५ लाख लोक दुधव्यवसायावर अवलंबून आहेत आणि विशेष म्हणजे त्यातील ७० टक्के महिला आहेत.

आज कुरियनचे नाव धवलक्रांतीचा जनक, भारताचा मिल्कमन असे आदराने घेत आहेत. मात्र यासाठी कुरियनला असंख्य अडथळे पार करावे लागले आहेत. सरकारी लाल फितीचा कारभार, मोठ्या कॉर्पोरेटने केलेल्या कुरघोड्या, युनिसेफ़बरोबरचा यंत्रसामुग्रीचा वाद, एकदा बॉयलरला लागलेली आग.. एक ना हजारो अडचणी.. आंतरराष्ट्रीय पातळीवर जरी "दुधाचा महापूर" या प्रकल्पाचे कौतुक झाले असले तरी देशातील मोठ्या वर्तमानपत्रातून मात्र याच्या यशस्वितेवर कायम शंका व्यक्त होत राहिली. खेड्यातील दूध शहराचे पोषण करते, मात्र खेडी कुपोषित राहतात असा देखील सिद्धांत मांडला.. मात्र या सर्व बाबीवर कुरियन अतिशय धीराने, आणि पुराव्यानिशी सामोरे गेले आणि त्यावर धीराने मात केली.

बाहेरचे शत्रू तर होतेच.. पण कालांतराने अमूल मध्येच त्यांचे अमृता पटेल यांच्याशी मतभेद विकोपाला गेले. अमृता यांच्याकडे कुरियननंतर अमूलची सर्व सूत्रे गेली. अमूलला नावारूपाला आणायला त्यांचा पण मोठा वाटा होता, त्यामुळे आपल्यानंतर अमृता यांची निवड खुद्द कुरियन यांनी केली होती. मात्र ही निवड चुकली असल्याची खंत कुरियन व्यक्त करतात.. नव्हे.. तत्वासाठी अगदी वयाच्या ८५ व्या वर्षी देखील संघर्षाचा पवित्रा घेतात, ३५ वर्ष ज्या शिष्येला घडवले तिच्यासोबत... यावयात असा पवित्रा घेतला की  हट्टी, दुराग्रही, वेडा अशी विशेषणे मिळणे स्वाभाविक होते. मात्र तत्व म्हणजे तत्व .. तत्व पाळण्याबाबत कुरीयन नेहमीच आग्रही राहिले.

कुरियन अमूलला राजकारणापासून अलिप्त ठेऊ पाहत होते. अमृता पटेल यांच्या काळात अमूलने दिल्लीच्या मदर डेअरी सोबत मार्केटिंगसाठी भागीदारी केली. मदर डेअरी सरकारी मालकीची.. त्यामुळे बाबू लोकांचा शिरकाव मागील दरवाज्याने अमूलमध्ये होण्याची शक्यता होती. कुरियन यांनी त्याचा विरोध केला. शेतकरी दूध उत्पादक यांचा अमूलवर असलेला विश्वास टिकवणे हे त्यांना सर्वात महत्त्वाचे वाटत होते. अमृता यांच्यावर टीका करताना कुरियन हातचे राखत नाहीत. अमृता मात्र या सर्वाचे उत्तर देताना कुरियन यांच्याबद्दल उचित आदर राखताना दिसतात.. कदाचित जनरेशन गॅप हाच त्यांच्यात महत्वाचा मुद्दा असावा.. असो.. मात्र आणंद मध्ये जे कुरियन यांनी करून दाखवले तो एक अद्भुत चमत्कार होता असे म्हणले पाहिजे.
शाम बेनेगल यांच्यासारख्या जागतिक कीर्तीच्या संवेदनशील दिग्दर्शकाने "मंथन" या अतिशय सुंदर चित्रपटाच्या माध्यमातून कुरियनच्या आणंद येथील कार्याला मानवंदना दिली आहे. शाम बेनेगल डॉ. कुरियन यांच्याशी गप्पा मारत असताना या सिनेमाचे कथानक जन्माला आले..  ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर यांनी त्या कथानकाला पटकथेचा साज चढवला आहे. आणि या सिनेमात कुरियन यांच्या भूमिकेत गिरीश कर्नाड, तर ग्रामस्थांच्या भूमिकेत नसीरुद्दीन शाह आणि ❤️माय लव्ह स्मिता पाटील ❤️ यांनी जबरदस्त भूमिका केली आहे. गावातल्या लोकांनी दोन दोन रुपये वर्गणी काढून निर्मात्याची भूमिका बजावली आहे. या चित्रपटाला राष्ट्रीय पारितोषिक देखील मिळालेले आहे लिंक देतो आहे.. पाहिला नसेल तर आवर्जून पाहा.. 
https://youtu.be/91qliAxU1pA
कुरियन यांचे गौरी साळवी यांनी लिहिलेले ‘आय टू हॅड अ ड्रीम’  आत्मचरित्र आता सुजाता देशमुख यांनी ‘माझंही एक स्वप्न होतं’ या नावाने अनुवाद करून मराठीत उपलब्ध करून दिले आहे. त्यातील एका प्रकरणात आपल्या नातवाला पत्र लिहिताना कुरियन म्हणतात.." प्रिय सिद्धार्थ.. आयुष्यात काही गोष्टी मनाजोग्या घडतात तर अनेक गोष्टी मनाविरुद्ध होतात..  आयुष्यात घडलेल्या घटना आणि व्यक्तीची आनंदी वृत्ती यात काहीच संबंध नसतो.. व्यक्ती उगाच स्वतची तुलना इतर आनंदी दिसणाऱ्या लोकांशी करून स्वतःला दुःखी समजून घेतील.. आपल्याकडे काय नाही यापेक्षा काय आहे हे समजले तर खरा जगण्याचा आनंद सापडतो.."

कुरियनचा संसार आटोपशीर होता. जून १९५३ मध्ये  मॉली हिच्याशी लग्न केले. पोरगी पाहिली आणि वीस दिवसात लग्न पण झाले.. "चट मंगनी पट ब्याह" निर्मला नावाची एकुलती एक मुलगी झाली. मात्र महिषवंशाची प्रगती कशी होईल याचा ध्यास घेतलेल्या कुरियनने स्वतः मात्र कुटुंबविस्तार एकवर थांबवला.👨‍👩‍👧 अमूलच्या कामात एवढे वाहून घेतले होते की संसार आपला नुसता नावाला. परमुलुखात राहणाऱ्या मॉलीला सरदार पटेल यांची कन्या "मनिबेन पटेल" यांनी आईची माया देऊन जवळ केले होते. घरचे टेंशन नव्हते म्हणून कुरियन स्वतःला वाहून देऊ शकले. 
कुरियन च्या कामाची दखल राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली. त्यांना रॅमन मॅगसेसे, वॅटलर शांती पुरस्कार, जागतिक अन्न पुरस्कार यांच्यासोबत पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. कुरियनचा ९० वा वाढदिवस २६ नोव्हेंबर २०११ रोजी आणंद येथेच मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. त्याच दिवशी देशाला दूध पाजनाऱ्या कुरियनला "स्वतः दूध प्यायला आवडत नाही" हे सगळ्यांना समजले. भाऊ शतक ठोकेल असे वाटत असताना मूत्रपिंडांच्या आजारामुळे कुरियन यांचे ९ सप्टेंबर २०१२ रोजी निधन झाले.
मध्यंतरी भाजप चे माजी मंत्री दिलीप संघनी यांनी आरोप केला की "वर्गीस कुरियन हे गरीब हिंदू शेतकऱ्यांना पैश्याची लालच देऊन ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करून घेत होते."😡 खर पाहता कुरियन यांचा जन्म ख्रिस्ती धर्मात झाला असला तरी त्यांना चर्चमध्ये जाणे, बायबल वाचणे निरर्थक वाटत होते, कळायला लागल्यापासून ते कधी कोणत्या चर्च मध्ये गेले नाहीत. ते स्वतःला नास्तिक म्हणवून घेत होते.. एवढेच नाही तर मृत्यनंतर त्यांचे तसेच त्यांच्या पत्नीचे पार्थिव हे ख्रिस्ती धर्माप्रमाणे गाडण्यत आले नाही तर जाळण्यात आले आहे. कुरियन यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या पार्थिवावर आणंद येथेच अग्निसंस्कार देण्यात आले, ज्या जागी त्रिभुवनदास यांचे अंत्यविधी करण्यात आले होते. मेल्यानंतरही त्यांची दोस्ती कायम राहिली.❤️

अर्थात व्यक्तीचा इतिहास वगैरे जाणून घ्यायची गरज या दिलीप संघनी यांना वाटली नसावी.. कदाचित त्यांना जिथे संस्कार मिळाले तिथे केवळ व्यक्तीला जन्मजात मिळणारे जात आणि धर्म हेच सर्वात मोठे क्वालिफिकेशन असेल.. पण भारत देश असल्या खुज्या लोकांमुळे नाही ओळखला जात.. कुरियन यांच्यासारख्या लोकांमुळे ओळखला जातो..दिलीप संघनी सारख्या लोकांना जनता विसरेल,( कुणाला माहीत पण नसतील आता) मात्र कुरियन सारख्या लोकांना जनता विसरू शकणार नाही. जन्म शताब्दी वर्षानिमित्त मानवंदना देताना भाऊला आपल्या स्टाइल मध्ये सलाम😘😘...  अमूल.. द टेस्ट ऑफ इंडिया.. आणि वर्गीस कुरियन.. द बेस्ट ऑफ इंडिया❤️❤️❤️

#richyabhau
#milkman

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव