रोझलिंड फ्रँकलिन आणि तिचा डीएनए

रोझलिंड फ्रँकलिन आणि तिचा डीएनए
रोझलिंड फ्रँकलिनचे नाव पहिल्यांदा ऐकता आहात का.. ओके.. DNA चे मॉडेल कुणी बनवले???  अर्थात हे तुम्हाला माहीत असेल.. वॉटसन आणि क्रिक आणि त्यांचे "डबल हेलिक्स" मॉडेल... शाळेमध्ये हे शिकवले होते. उत्क्रांतीचे रहस्य उलगडणारे DNA...  या मॉडेलमुळे वॉटसन, क्रीक आणि मॉरिस विल्किंस यांना नोबेल पारितोषिक देखील भेटले होते. मात्र तेव्हा या नोबेलवर तेवढाच हक्क होता रोझलिंड फ्रँकलिनचा...जे  नाव आपल्या भारतात जास्त प्रसिद्ध नाही.

एक स्त्री म्हणून तिला तेव्हा जरी दुय्यम वागणूक दिली जात होती तरी तिच्यावर झालेल्या अन्यायाची आता सर्वांना जाणीव झाली आहे. आज जिचे नाव जगभरात अनेक संस्थांना दिले आहे.. आकाशात सापडलेल्या नव्या ॲस्ट्रॉइडला देखील दिले आहे. २०२२ मध्ये मंगळावर पाठविण्यात येणाऱ्या यानाला देखील तिचे नाव देण्यात आले आहे. एवढेच नाही तर विज्ञान,  तंत्रज्ञान, गणित, अभियांत्रिकी विषयांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना "रॉयल सोसायटी" मार्फत तिच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो.. अशी ही रोझलिंड फ्रँकलिन.. तिचा डीएनए आज समजून घेऊ या.

रोझलिंड फ्रँकलिन.. तिला रोझी म्हणालेले आवडायचे नाही बरं का (तिच्यावर खार खाऊन असलेल्या सहकाऱ्यांनी तिचे ठेवलेले नाव रोजी.. त्यामुळे तिचे नावडते नाव) आपण तिला🌹 रोजा🌹 म्हणू.. तर आपली ही रोजा १०० वर्षापूर्वी २५ जुलै १९२० रोजी (एकदाच फक्त😉) जन्माला आली.. लंडनमधील अतिशय श्रीमंत आणि पुढारलेल्या ज्यू धर्मीय घरात. एक मोठा, दोन लहान भाऊ आणि एक लहान बहिण एवढे सख्खे.. बाकी आत्या, चुलते असा मोठा गोतावळा. एक चुलता इंग्लंडचा गृहखात्याचा सचिव..यावरून घरातील सुबत्तेची कल्पना यावी. 
पण हे कुटुंब केवळ श्रीमंत नव्हते तर उदारपण होते. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनीमध्ये धार्मिक ध्रुवीकरण सुरू झाले आणि ज्यू लोकांचे शरणार्थी तांडे शेजारच्या देशात आसरा शोधायला लागले. या निराधारांना जमेल तेवढी मदत फ्रँकलिन कुटुंब करत होते. दोन निराधार मुले तर घरात ठेवून घेतली.. इव्ह नावाची एक पोरगी रोजाच्या खोलीत. लोकांसाठी जगणे हे रोजाच्या DNA मध्ये होते म्हणायचे. रोजाच्या DNA मध्ये अजून एक बाब होती. गणित आणि विज्ञान..   मोठमोठी अंकगणित, कोडी सोडवत बसायची नाहीतर मेमरी गेम मध्ये वेळ घालवायचा तिचा छंद. सहा वर्षांपासून घराजवळील शाळेत जाणारी रोजा जेव्हा अकरा वर्षांची झाली तेव्हा तिला सेंट पॉल शाळेत टाकले. त्या काळात भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र शिकवल्या जाणाऱ्या मोजक्या कन्याशाळेमध्ये सेंट पॉलचे नाव घेतले जायचे.

तिथे तिने जर्मन आणि फ्रेंच भाषा देखील चांगली आत्मसात केली. खेळात पण ती कायम पुढे. क्रिकेट, हॉकी सोबत ट्रेकिंग हा तिचा आवडीचा भाग. मात्र संगीतात रोजा भोपळा होती😁 तिची संगीतात एवढी गती (खर तर गती/प्रगती म्हणणे चूक) होती की शिक्षकांना डाऊट आला.. साला आपण चुकीचे शिकवत आहे की हिला ऐकूच येत नाही😜 तिच्या आईला त्यासाठी शाळेत बोलावून घेतले होते.. बाकीच्या विषयात रोजा बेस्ट... त्यामुळे अतिशय चांगल्या मार्कांनी मॅट्रिक पास झाली.. तिला स्कॉलरशिपपण मिळाली. मात्र तिच्याऐवजी दुसऱ्या एखाद्या गरजुला ती मिळावी म्हणून तिच्या वडिलांनी नाकारली होती स्कॉलरशिप.. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी..

पुढचे शिक्षण घ्यायला ती केंब्रिजला गेली. वयाच्या पंधराव्या वर्षी तिने ठरवले होते की मला शास्त्रज्ञ बनायचे आहे.. अर्थात मॅडम मेरी क्युरी यांनी रस्ता मोकळा केला असला तरी अजून संशोधनात महिलांची संख्या वाढली नव्हती.. त्यामुळे घरचे अनुकूल नव्हते. मात्र रोजाची जिद्द होती त्यापुढे घरच्यांचा प्रतिकार कमी पडला. तिथे रसायनशास्त्राचे शिक्षण घेत असताना मेरी क्युरी मॅडमचा शिष्य आंद्रे विल भेटला. त्याच्या सोबत तिची मैत्री छान जमली. फ्रेंच भाषा आणि रसायनशास्त्र दोन्हीमध्ये त्याने रोजाला मार्गदर्शन केले. (पण प्रेमात वगैरे पडणे तिने कटाक्षाने टाळले.. संस्कारी होती जणू🤪)

तिला पुढील संशोधनासाठी फेलोशिप मिळाली. आता तिला "रोनाल्ड नरिष" सोबत काम करायचे होते. स्त्री पुरुष विषमता तिने सर्व प्रथम येथे अनुभवली. साध्या साध्या गोष्टीसाठी अंगावर खेकसने तिला सहन झाले नाही.. आणि राजीनामा देऊन ती मोकळी झाली. त्यावेळी दुसरे महायुध्द अगदी तापले होते. रोजाने "ब्रिटिश कोळसा वापर संशोधन संस्था" जॉईन केली. जिथे तिने बनवलेले गॅस मास्क युद्धात सैनिकांना खूप उपयुक्त ठरले. युद्धात स्वयंसेवक म्हणून देखील तिने भरपूर काम केले.

संशोधन संस्थेत तिने कोळश्याचा सच्छिद्रतेवर काम केले. उष्णतेने रेणूंची रचना बदलते हे तिने शोधून काढले, ज्याचा उपयोग युद्धात इंधनाची कार्यक्षमता वाढविण्याासाठी, तसेच गॅस मास्क बनवण्यासाठी झाला. या विषयावरचं तिने १९४५ मध्ये संशोधन प्रबंध सादर करून phd मिळवली... आणि तिच्या आयुष्याचा महत्वाचा टप्पा सुरू झाला.. (असे महत्वाचा टप्पा वगैरे मध्ये बोलले तर वाचताना आलेली पेंग कमी होते... लोक पुन्हा डोळे वटारून वाचतात🤪)
मधल्या पाच वर्षात फ्रान्स मधील Centre national de la recherche scientifique या संस्थेत रोजाला काम करण्याची संधी आंद्रेच्या ओळखीने भेटली. जॅकस मेरींग हे तेथील संशोधन प्रमुख एक्सरे वापरून स्फटिकांच्या अंतरंगात डोकाऊ पाहत होते. त्यांच्याकडून मिळणाऱ्या मार्गदर्शनाला रोजाने आपल्या कोळसा अनुभवाची जोड दिली. एक्सरेचा मारा करून कोळशाचे ग्राफाईटिकरण करण्याबाबत तिचे संशोधन निबंध प्रसिद्ध होऊ लागले. आणि या एक्सरे विघटन क्षेत्रात आता रोजाचे नाव झाले. 
फ्रान्स मध्ये असतानाच आल्प्स पर्वताच्या माउंट ब्लँक या सर्वोच्च शिखरावर चढाई करताना रोजाच्या जीवावर बेतले होते. जीन नावाच्या मित्राने तेव्हा तिचा जीव वाचवला (आमची हिंदी हेरॉईन नक्की आता तरी प्रेमात पडली असती.. पण हीचा DNA लयच वेगळा🥶) फ्रेंच व्यक्तीच्या नाही मात्र फ्रान्सच्या प्रेमात ती पडली होती. तिथल्या संस्कृतीच्या आणि खाण्याच्या (तिथले G1 आणि J1 ❤️) इंग्लंड मधील ठोकळा चेहऱ्याची, कोरडी बोलणारी माणसे तिला कधीच भावली नाहीत.. (कदाचित त्यामुळं तिचे प्रेम लग्न वगैरे काही जमले नाही)

१९५० साली रोजाला किंग्ज कॉलेज लंडन मध्ये बोलावण्यात आले... आणि आता क्लायमॅक्स सुरू.. झाले असे की तिथे संशोधन प्रमुख होते जॉन रँडेल. तोवर DNA मधील रसायनाचा शोध लागला होता.. मात्र DNA ची रचना कशी असेल याचे कोडे उलगडले नव्हते. यावर कींग्ज कॉलेज मध्ये मॉरीस विल्कींस यांच्या नेतृत्वाखाली संशोधन सुरू होते, आणि रोजाने त्यांचे सहायक म्हणून भूमिका पार पाडायची होती. मात्र रोजा जॉईन झाली तेव्हा मॉरीस सुट्टीवर गेला होता. त्यात रँडेलने काय केले.. मॉरीस कडे असलेला विषय आणि त्यावर काम करणारा फेलो काढून रोजाकडे दिला. मॉरीस सुटीवरून आल्यावर बघतो तो काय.. हिने सगळेच ताब्यात घेतले आहे😀😀

मॉरीसचा स्वभाव वेगळा, मितभाषी, शांत, "मॅनहॅटन रिटर्न" मानसिकतेचा (अमेरिकेचा अणुबॉम्ब प्रकल्प) तिथे बसलेल्या धक्क्यातून ना सावरलेला. रोजा आत्मविश्वासयुक्त, स्वतच्या मतासाठी आग्रही आणि फटकळ बोलणारी आणि कामात कुणाची गरज नसणारी आणि त्यात "स्त्री"..  साहजिक मॉरीसला न्यूनगंड येऊ लागला. मॉरीसने मागवलेले एक्सरे यंत्र अधिक चांगल्या प्रकारे वापरून रोजा प्रयोग करत होती.. मात्र मॉरीस आणि रोजा एकमेकाला काहीच शेअर करत नव्हते. (शिवाय रोजाला स्त्री म्हणून देण्यात येणारी वागणूक पण अंतर वाढवत होती. .. प्रयोगशाळेतील महिलांनी जेवायला वेगळे बसायचे असायचे😔)
याच वेळी अमेरिकेत पाऊलिंग आणि इंग्लंड मध्ये वॉटसन आणि क्रीक ही जोडी देखील DNA ची रचना शोधून काढायला धडपडत होते. रोजाला मिळालेला फेलो "गोस्लिंग" याने DNA चे एक्सरे फोटो काढून दोन प्रकार शोधले. एक ओला असतो त्याचे नाव A.. आणि एक सुका असतो त्याचे नाव B. रँडेलने दोघांत तह करून दिला की रोजा A वर काम करेल आणि मॉरीस B वर. याकाळात वॉटसन आणि क्रीकचे किंग्ज कॉलेज मध्ये येणे व्हायचे.. त्यांनी ओळखले की मॉरीसची मदत होऊ शकते.. मग त्याच्या पुरुषी अहंकाराला फुंकर घालत गटबाजी सुरू केली. 
रोजाचे स्त्रीत्व देखील यांचे लक्ष्य असायचे. ती बोलताना मुद्दाम तिच्या शरीराकडे बघायचे.. आणि नंतर मिटक्या मारत एकमेकाला सांगायचे.. (आपण कल्पना करू शकतो.. आपल्याकडे अजून चालू आहेच की 😑) त्यात आपली रोजा म्हणजे दुसरा कपिल देव... सिंपल राहायची एकदम.. उगाच नाजुकपण किंवा नखरे दाखवून काम काढून घ्यायची नाही..स्त्री असल्याचे कॅश करायची नाही..त्यामुळे यांच्या पुरुषी अहंकाराला आव्हान दिल्यासारखे व्हायचे.
वॉटसन आणि क्रीक यांनी केलेल्या आधीच्या मोडेल मध्ये रोजाने शंभर चुका काढलेल्या, त्यामुळे वॉटसन क्रीक जोडीला त्यांच्या बॉस. ने खूप झापले होते.. DNA वर काम करणे सोडून द्यायला लागेल असा अल्टिमेटम दिला होता. इकडे गलोस्लींग आणि रोजाने १०० तास खपून एक फोटो काढला..हाच तो प्रसिद्ध.. फोटो ५१. ज्यात DNA ची रचना स्पष्ट दिसते.. मॉरीसने तो फोटो वॉटसन क्रीक पर्यंत पोचवला.. आणि युरेका... वॉटसन क्रीक यांच्या अडकलेल्या गाडीला पुढची वाट सापडली. या सर्व पार्श्वभूमीवर वैतागून रोजाने किंग्ज कॉलेज सोडले आणि तंबाखूवरील विषाणूवर संशोधन करायला ती निघून गेली.😔
रोजाला मोठे आयुष्य मिळाले नाही..३७ वर्षाची असतानाच १९५८ मध्ये तिचा कर्करोगाने मृत्यू झाला.  कदाचित एक्सरे मध्ये जास्त काळ काढल्यामुळे तिला बाधा झाली असेल.. १९५६ सालीच तिला जाणवले की आपल्या पोटात काहीतरी गडबड आहे.. तेव्हा दोन गाठी काढल्या.. तिने संशोधनकार्य सुरूच ठेवले. दोन वर्षांनी कॅन्सरने पुन्हा निर्णायक डोके वर काढले..  मरताना ती पोलिओ विषाणू वर काम करत होती, ते काम पुढे नेल्यामुळे तिचा विद्यार्थी "क्लग" याला नोबेल पारितोषिक मिळाले आहे. म्हणजे चार लोकांना नोबेल भेटण्यात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.

१९६२ साली वॉटसन क्रीक आणि मॉरीस या तिघांना DNA चे मॉडेल तयार केल्याबद्दल नोबेल पारीतोषिक मिळाले, मात्र नोबेल मिळाल्यानंतर करावयाच्या भाषणात देखील या तिघांनी रोजाचा उल्लेख टाळला😡 एवढेच नाही तर आपापल्या पुस्तकात जेव्हा रोजाचा विषय येईल तेव्हा बोर आणि मठ्ठ असाच तिचा उल्लेख केला आहे. स्त्रीने दुखावलेले पुरुषी अहंकार ती स्त्री मेल्यावर पण तिचा बदला घेत होते😡
आज रोजाच्या नावाने अनेक उपक्रम सुरू आहेत पण मला सर्वात जास्त आवडतो तिच्या नावाने महिलांना दिला जाणारा पुरस्कार. रॉयल सोसायटी कडून २००३ पासून सुरू झालेल्या या पुरस्कारात आजवर झालेल्या १७ विजेत्यांमध्ये एक भारतीय नाव आहे हे पाहून समाधान होते. सुनेत्रा गुप्ता यांना २००९ साली रोझलिंड फ्रँकलिन पुरस्कार मिळाला आहे. यांचे नाव पण पहिल्यांदा ऐकले का.. अहो खूप मोठी व्यक्ती आहेत या.. कोरोना महामारीवर देशातील सर्वात तज्ञ व्यक्तीमध्ये त्यांची गणना होईल. याशिवाय साहित्यासाठी देण्यात येत असते ते ज्ञानपीठ देखील त्यांना मिळाले आहे. आपल्याला त्यांचे नाव आणि काम माहीत असावे. परमजीत खुराना, इंदिरा हिंदुजा, अदिति पंत, मंगला नारळीकर यांची पण... मंगल मिशन पाहताना  मीनल संपत, अनुराधा टी, रितु करिधल, नंदिनी हरिनाथ आणि मौमिता दत्ता यांची कदाचित माहीत झाली असावीत😀🙏🏽

कोणत्याही धर्माचे पालन न करणारी, अज्ञेयवादी असलेली रोजालींड फ्रँकलिन तिच्या वडिलांना पत्रामध्ये म्हणते की " विज्ञान आणि रोजचे जीवन वेगळे करता येणार नाही. जीवनात पडणाऱ्या प्रश्नांचे उत्तर मला केवळ विज्ञानातून मिळते. त्यामुळे मी तुमची ईश्वर, स्वर्ग नरक या कल्पनेवर विश्वास ठेऊ शकत नाही. असा कोणी ईश्वर असू शकत नाही.. आणि असलाच तर या विशाल ब्रम्हांडातील एका पिटुकल्या छोट्या ग्रहावरील घडामोडीत त्याला रस असणे शक्य नाही." २०२२ मध्ये रोझलिंड फ्रँकलिन यांचे नाव असलेले यान मंगळावर विशुव वृत्तावर सोडण्यात येणार आहे. तिथे पाणी आणि बर्फ यांचा शोध घेण्याचे काम ते करेल. बरोबर आहे ना.. रोजा म्हणते त्याप्रमाणे देवाला वेळ नाही मिळणार.. आपल्यालाच शोधावे लागेल आता पर्यायी जीवन.. पृथ्वीची वाट लावल्यावर जायचे कोठे😬
डीएनए, आरएनए, कोळसा, ग्रेफाइट आणि विषाणूवरील रोजाचे संशोधन नक्कीच मोलाचे आहे. पण तिच्या या कामाची पावती मात्र तिला हयातीत मिळाली नाही. आणि तिने केलेल्या संशोधनासाठी नोबेल मात्र इतरांनी पटकावले.. मात्र काळाने आता तिची दखल घेतली आहे.. पण अशी दखल जितेपणीच का नाही घेतली जात.. कारण आहे मानसिकता आणि आपला DNA.. यानिमित्ताने आपले पंतप्रधान यांचे भाषण आठवते.. बांग्लादेशात शेख हसीना यांचे कौतुक करताना ते म्हणाले की " स्त्री असून पण त्यांनी आतंकवाद निपटून काढण्यासाठी कठोर पावले उचलली" ... "स्त्री असून पण"..😔 या तीन शब्दातच सगळे आले.

DNA आजवर बदलत आलाय.. म्हणूनच उत्क्रांती शक्य झालीय... हा पुरुष वर्चस्ववादी DNA लवकर बदलावा ही अपेक्षा..

#richyabhau
#रोजा

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव