नील्स बोहर : क्वांटम मेकॅनिक्सचा जनक

नील्स बोहर : क्वांटम मेकॅनिक्सचा जनक
एखादी व्यक्ती किती बोअरिंग असू शकते.. गणितावर प्रेम असणे कबुल आहे... पण इतके...🙄 आम्हीपण केलेच की गणितावर प्रेम... पण आमच्यावेळेस असे नव्हते😂 क्लबस्तरीय फुटबॉल मॅच सुरू आहे.. आणि आपला गोलकीपर "बोर" झाला म्हणून खेळाकडे न पाहता गोलपोस्टच्या खांबावर गणिते सोडवतो.. समोरची टीम बॉल घेऊन अगदी "डी" मध्ये येते तेव्हा बाकीच्यांनी आरडाओरडा केल्यावर आपला भाऊ भानावर येतो आणि गोल वाचवतो... याला काय म्हणायचे..

ती व्यक्ती मोठी झाल्यावर शास्त्रज्ञ बनते..  जगातील अतिशय महत्वाच्या व्यक्तींपैकी एक अशी.. दुसरे जागतिक महायुद्ध सुरू आहे, ही व्यक्ती जन्माने "अर्धी ज्यू" असल्याने हिटलरकडून तिच्या जीवाला धोका आहे.. तिला वाचवणे आणि इंग्लंड मध्ये घेऊन येण्यासाठी स्पेशल फायटर विमान नियुक्त केले आहे. विमान जर्मनीच्या ताब्यात असलेली नॉर्वे वरून उडणार आहे. विमानावर हल्ला झाला तर किमान याचा तरी जीव वाचावा यासाठी भाऊला इमर्जन्सी एक्झीटपाशीच बसवले आहे. विमान उंच गेले.. ऑक्सीजन मास्क लावण्याची सूचना देण्यात आली. मात्र भाऊ गणिते सोडवत तल्लीन (खरे तर टल्ली म्हणायला पाहिजे.. गणिताची नशा असतेच कडक😁) भाऊने काही ती सूचना ऐकली नाही..परिणामी ऑक्सीजन कमी पडल्याने बेशुद्ध झाला.. जीवावर बेतले असते.. गणित सोडवता सोडवता आयुष्याचे गणित चुकले असते.😭

ही व्यक्ती इतकी बोअर आहे.. की तिच्यासोबत सिनेमा पाहायला जायचे म्हणले तर तिला स्टोरी आधीच सांगून न्यावे लागते.. नायतर सिनेमा सुरू असताना हे असे कसे ?? वगैरे प्रश्न विचारून रसभंग ( कदाचित इतर श्रोत्यांकडून मुखभंगदेखील) होण्याची शक्यता... ही व्यक्ती म्हणजे "नील्स बोहर" ज्याला आज आपण क्वांटम मेकॅनिक्सचा बाप म्हणून ओळखतो.. अमेरिकन अणुबॉम्ब निर्मितीमध्ये (कदाचित जर्मन अणुबॉम्ब निर्मितीत खोडा घालण्यात देखील) ज्याची प्रमुख भूमिका आहे अशी व्यक्ती म्हणजे नील्स बोहर..
नील्स बोहरचा जन्म ७ ऑक्टोबर १८८५ साली डेन्मार्कमधील कोपेनहेगन शहरात झाला. आई ज्यू, वडील लुथेरीयन पंथाचे.. नीलू आणि भावंडांना कोणताही धर्म न पाळण्याची मुभा...❤️ एक मोठी बहीण आणि एक छोटा भाऊ.. पाच जणांचे छोटे कुटुंब, सुखी कुटुंब.  पप्पा "ख्रिस्टीयन बोहर" हे कोपेनहेगन विद्यापीठात शरीरक्रियाशास्त्राचे प्राध्यापक होते. श्वसन आणि शारीरिक व्यायाम यावर त्यांनी मोलाचे संशोधन केले होते. त्यामुळे १९०७ व १९०८ या दोन वर्षात त्यांचे नाव तीन वेळा नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केले गेले होते.. मात्र पुरस्कार मिळाला नाही. (त्याची भरपाई नील्सने एकदा आणि नील्सपुत्र "आजे बोहर" याने एकदा नोबेल मिळवून केली)
घरातील वातावरण अतिशय खेळकर.. विज्ञान आणि चिकित्सेला पोषक.. पप्पांचे शास्त्रज्ञ मित्र घरी आले तर प्रश्न विचारणाऱ्या मुलांना 'बाहेर न हकलता' चर्चेत सहभागी करून घेतले जायचे.. त्यामुळे चौकस बुध्दी व स्वतंत्र विचार मांडण्याचा आत्मविश्वास तिन्ही पोरांमध्ये अगदी लहानपणापासूनच भरला गेला..❤️ मोठे झाल्यावर बहीण जेनी शिक्षिका झाली, भाऊ हेरॉल्ड गणितज्ञ झालाच शिवाय सन १९०८ मध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये डेन्मार्ककडून फुटबॉलदेखील खेळला आहे, ज्या संघाने तेव्हा रौप्यपदक मिळविले होते.  नीलू देखील त्याच्यासोबत क्लब पातळीवर फुटबॉल खेळला आहे.

नीलू शाळेमध्ये गणित आणि विज्ञान विषयामध्ये आघाडीवर.. आणि त्यात रँचोगीरी करायला वस्ताद.. शिक्षकांनी शिकवले असेल, त्याच्यापलिकडे जाऊन विचार करण्याची क्षमता आणि संशोधन वृत्ती होती. चिकित्सा इतकी.. की पाठ्यपुस्तकातील चुका देखील काढायचा. तंत्रशुद्ध शास्त्रीय प्रबंध लिहिणारा हा नीलू निबंध लिहायला अतिशय कच्चा.. "मी पाहिलेले बंदर" या विषयावर त्याने "मी भावासोबत बंदर पाहायला गेलो होतो. तिथे अनेक जहाजे येजा करत होती" एवढा मोठा निबंध लिहिला होता😂😂😂 वडिलांकडून शारिरीक तंदुरुस्तीचे बाळकडू मिळालेले.. मग काय...वर्गात हाणामारी करून प्रश्न सोडविण्यात नीलू आघाडीवर..😂 आणि खेळण्यामध्ये देखील.❤️ 

भावंडे वडिलांच्या कार्यशाळेत लुडबुड करत असायची. त्यामुळे कोणतीही बाब "करून बघण्यात" त्यांचा रस..१९०३ साली नील्स भौतिकशास्त्रात पदवी मिळवण्यासाठी वडिलांच्या महाविद्यालयात दाखल झाला.. खगोल, गणित आणि तत्वज्ञान हे विषय देखील सोबत शिकत होता. याच काळात एक घटना घडली.. आणि नील्सचे पुढचे आयुष्य बदलून गेले.  १९०५ साली रॉयल डॅनिश अॅकाडमीने विज्ञान स्पर्धा आयोजित केली होती. अनेक अनुभवी शास्त्रज्ञ त्यात भाग घेणार होते. त्यात अद्याप पदवीदेखील प्राप्त नसलेला नील्स  सहभागी झाला.. पप्पांची कॉलेजमधील प्रयोगशाळा लहानपणापासून ओळखीची.. रात्रीचा दिवस करून, भरपूर प्रयोग करून, नवे नवे उपकरण बनवून "द्रवाचा पृष्ठीय ताण" विषयावर त्याने पेपर सादर केला आणि अनुभवी शास्त्रज्ञांना मागे टाकून बक्षीस देखील मिळवले.. इथेच त्याला प्रेरणा भेटली भौतिकशास्त्रात भरपूर संशोधन करायची..

२० व्या शतकातले पहिले दशक भौतिकशास्त्रात नवी प्रभात घेऊन आले होते. मेरी आणि पिएर क्युरी यांनी किरणोत्सार शोधून काढला, आइन्स्टाइनची जनरल थियरी देखील आली, जे जे थॉम्पसन यांनी अणू हा सगळ्यात लहान आणि अविभाज्य घटक नाही, त्यात इलेक्ट्रॉन असतात हे शोधले. रदरफोर्डने अणुच्या गाभ्याची, केंद्रकाची कल्पना केली होती... संशोधनासाठी नवे क्षितिज खुले झाले होते.  "धातूंचा इलेक्ट्रॅनिक सिध्दांत" यामधे संशोधन करून २६ वर्षाच्या नील्सने PhD प्राप्त केली.  सन १९११ मध्ये याच विषयावर पुढील संशोधनासाठी नील्स केंब्रिजमधील प्रसिद्ध "कॅवेंडिष लॅब" मध्ये दाखल झाला. इथे त्याला जे जे थॉमसन यांच्या मार्गदर्शनाखाली शिकायची संधी होती.

जेजे म्हणजे मोठे प्रस्थ.. असा शिक्षक, आजवर ज्याच्या ७ विद्यार्थ्यांनी नोबेल मिळवले आहे. (त्यात एक त्यांचा मुलगा पण) पुस्तकातील आणि शिक्षकांच्या चुका काढायची सवय असलेल्या नील्सचे तिथे जेजे सरांसोबत सारखे खटके उडायला लागले. सरांना असे काही ऐकून घ्यायची सवय नव्हती.. त्यांचा दरारा आख्या युरोपमध्ये.. मात्र आपल्या भाऊने डॉनशी पंगा घेतला राव. जेजे सरांचा माजी शिष्य आणि सन १९०८ चा नोबेल विजेता "अर्नेस्ट रदरफोर्ड" याने नील्सची झालेली गोची आणि असलेली क्षमता ओळखून आपल्या मँचेस्टर येथील प्रयोगशाळेत येण्याची परवानगी दिली. एका अटीवर.. जेजे सर परवानगी देणार असतील तर..🤔 जेजे सरांनी खुशीखुशी ही ब्याद कटवली😂
रदरफोर्ड आणि नील्सची चांगली गट्टी जमली. पुढे ती दोघांची लग्ने झाल्यावर कौटुंबिक मैत्रीमध्ये बदलली आणि शेवटपर्यंत कायम राहिली.. १९१२ मध्ये नील्सच्या आयुष्यात मार्गारेट आली.. जोडप्याची चार पोरे जगली.. त्यातील एकाने १९७५ मध्ये बापाप्रमाणे भौतिकशास्त्रात नोबेल मिळवले, बाकी तिघे एक डॉक्टर, एक इंजिनिअर तर एक वकील... सगळे वेगवेगळ्या क्षेत्रात..😁  वकील पोरगा डेन्मार्कच्या हॉकी टीममधून १९४८ सालचे ऑलिंपिकपण खेळला.. विषयांतर झाले.. पुन्हा विषयाकडे वळू👍
जेजे थॉमसन यांनी अणूरचनेविषयक मांडलेली  "प्लम पुडींग" थियरी रदरफोर्ड आणि नील्सने खोडून काढली. "प्लम केकमध्ये ज्याप्रमाणे बेदाणे सर्वत्र विखुरलेले असतात त्याप्रमाणे अणुकेंद्रात ऋण भारीत इलेक्ट्रॉन धनभारीत केंद्रक भोवती विखुरलेले असतात" अशी जेजे सरांची मांडणी होती. (तेव्हा प्रोटॉन, न्युट्रोन चा शोध लागला नव्हता बरं का) ही प्लम पुडिंग मांडणी चुकीची असून अणूकेंद्रात इलेक्ट्रॉन फिरत असतात, त्यांच्यात ऊर्जा असते, ती कमी जास्त होत असून, त्यामुळे अणू स्थिर असतो अशी मांडणी नील्स बोहर आणि रदरफोर्ड यांनी केली. 
रदरफोर्ड मॉडेलनुसार अणुकेंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन हे अनेक कक्षांतून फिरतात आणि प्रत्येक कक्षेसाठी ठराविक ऊर्जापातळी असते. ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त तो केंद्रकापासून लांबच्या कक्षेमध्ये असतो तर ज्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा कमी तो केंद्रकाजवळच्या कक्षेमध्ये फिरतो. (जसे प्राण्यांमध्ये दुबळे पिल्लू आईच्या जवळ जवळच फिरते तसे😉) मूलतः या कक्षांची ऊर्जापातळी स्थिर असते आणि एखाद्या इलेक्ट्रॉनला ठराविक ऊर्जा मिळाली की तो बाहेरच्या कक्षेत जातो किंवा त्याची ऊर्जा कमी झाली की आतल्या कक्षेत प्रवेश करतो. इलेक्ट्रॉनच्या मुक्त फिरण्याची भ्रमणकक्षा निर्धारित करण्यात मात्र तत्कालीन भौतिकशास्त्र अपुरे पडत होते. म्हणून नील्सने  इलेक्ट्रॉनच्या भ्रमनकक्षावर अधिक संशोधन करायचे ठरवले.
 
१९१२ मध्ये डेन्मार्कमध्ये परत येऊन नील्सने संसार थाटला आणि कोपनहेगन विद्यापीठात प्राध्यापकी सुरू केली. एकाच वर्षात १९१३ मध्ये अणुसंरचना आणि इलेक्ट्रॉनची भ्रमणकक्षा याबाबत शास्त्रशुध्द गणित सोडवणे नील्सला शक्य झाले. "अणूच्या केंद्रकाचा व्यास अणूच्या व्यासाच्या एक लक्षांश एवढा सूक्ष्म असतो व अणूचा बाकीचा सर्व भाग मोकळा असतो. (एवढा मोकळा की मुंबईकर व्यक्ती एक वन रूम किचन काढेल त्या जागेत 😂) केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन एवढ्या वेगाने फिरत असतात की सारी मोकळी जागा त्याने व्यापलेली आहे असा आपला भास होतो" अशी मांडणी नील्सने केली.
अर्थात नील्सच्या सिद्धांतात पुढे दुरुस्ती करण्यात आल्या आहेत. विज्ञानाचे हेच वैशिष्ट आहे. १८०३ मध्ये जॉन डाल्टन यांनी अणू अविभाज्य असल्याचा सिद्धांत मांडला. त्यावर शंभर वर्षांनी १९०६ मध्ये जे जे थॉमसन यांनी अणुच्या पोटात इलेक्ट्रॉन असल्याचे शोधले, त्यांनी मांडलेल्या प्लम पुडिंग थिअरीपेक्षा सुसंगत मांडणी रदरफोर्ड यांनी केली. त्यात ना सुटलेले भ्रमणकक्षे संदर्भातील प्रश्न नील्स बोहर यांनी सोडवले. नील्सचा सिद्धांत हलक्या मुलद्रव्याला लागू होतो, मात्र जड मूलद्रव्याला नाही हे पाहून एर्विन श्रोंडिगर याने लहरीचा सिद्धांत विकसित केला.. नवीन शोध लागताना जूने कालबाह्य होत असले तरी त्या त्या टप्प्यावर मांडणी झाली असते म्हणूनच विज्ञान विकसित होत असते. 
नील्सचा हा सिद्धांत 'मूलद्रव्य रेडिएशन का करते' यावर प्रकाश टाकणारा होता. मात्र त्याने अणुरचनेचा सिध्दांत प्रसिध्द केला त्यावेळी या शोधाचे महत्व जगाला लगेच समजले नाही. "देर आये दुरुस्त आये." १९२२ मध्ये नील्स बोहरला भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. त्याच वर्षी नोबेल भेटलेला आईनस्टाईन त्याचे कौतुक करताना बोलला की, “नील्स बोहरच्या संशोधनाविना अणुविज्ञानाचा आवाका काय असतो हे सांगणे कठीण आहे.” मात्र नोबेल भेटले किंवा अणुचे अंतरंग उकलले म्हणून नील्स बोहर ग्रेट ठरत नाही.. तो ग्रेट आहे कारण त्याने पुढे विज्ञानाचा केलेला वापर, इतर संशोधकांना उपलब्ध करून दिलेली संधी आणि मार्गदर्शन... यामुळे.

रदरफोर्डकडून नील्सला केवळ विज्ञानाबाबत शिकायला नाही मिळाले, तर त्याचे संस्था चालविण्याचे व्यवस्थापकीय कौशल्यदेखील नील्सने आत्मसात केले. रदरफोर्डच्या संस्थेच्या धर्तीवर डेन्मार्कमध्ये संशोधन संस्था सुरू केली. जिथे जेजे सरांप्रमाणे ह्याचे शिष्य देखील भविष्यात भरीव कामगिरी करून दाखवणार होते. नील्सच्या प्रयत्नातून कोपनहेगन इथे संशोधन संस्था सुरू झाली. कुशल नेतृत्व,प्रेमळ आणि शांत स्वभाव, दुसऱ्याचे ऐकून घेण्याची वृत्ती यामुळे लवकरच ही संस्था संशोधकांची पंढरी बनली. लिझ माईटनर, पाऊली, हायजेनबर्ग, चंद्रशेखर मर्यादा शोधणारे एस चंद्रशेखर आणि होमी जहांगीर भाभा यासारख्या दिग्गज शास्त्रज्ञांनी इथे संशोधन केले. मृत्यूनंतर सन १९६५ मध्ये या संस्थेला नील्स बोहरचे नाव देण्यात आले आहे. आज १००० संशोधक त्यात काम करत आहेत.
बोहरने अनेक शास्त्रज्ञांना सहकार्य करत विज्ञानाची सेवा केली. अनेक नवे सिद्धांत विकसित केले.. नोबेल भेटल्यावर तर जणू कामाची पावतीच मिळाली. डेन्मार्क मधील एक विज्ञानवेडा बियरकिंग "कार्लसबर्ग" इतका खुश झाला होता.. की त्याने बोहर कुटुंबाला आलिशान घर दिले, संशोधन करायला निधी दिला. शिवाय तिथे एक नळ असा, ज्याला कायम बियर येणार...🙄(माणसाने बियर पित बसायचे की संशोधन करायचे) १९३२ मध्ये बोहर कुटुंब या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी तिथे स्थलांतरित झाले.. पुढचे ३० वर्ष तिथेच त्यांची छान बडदास्त ठेवण्यात आली.  (मल्ल्या.. बघतोस का जरा इकडे. नुसता मॉडेल पोरींसोबत फिरतो 😉) 

अणूविज्ञान गती घेत होते, मात्र याच काळात जर्मनीमध्ये हिटलरचा उदय होत होता. हिटलरच्या हाती १९३३ साली सत्ता आली. ज्यूद्वेषी कारवाया सुरू झाल्या. अणूशास्त्रज्ञांच्या जगात देखील ‘ज्यू अणुशास्त्रज्ञ’ व ‘बिगर ज्यू अणूशास्त्रज्ञ’ असे दोन गट पडले. ज्यू शास्त्रज्ञ जर्मनी सोडून इतरत्र आसरा शोधू लागले. आइन्स्टाइन सारख्या बाप माणसाला जर्मनीसोडून अमेरिकेत आश्रय घ्यावा लागला होता. नील्स बोहरचा शिष्य हायझेनबर्ग हा ज्यू नव्हता. त्याच्याकडे जर्मन अणुशास्त्रज्ञांचे नेतृत्व करायची संधी चालून आली होती. मात्र एक अडचण होती, कारण नाझीच्या  मते ज्यू हुशार असणे कधीच शक्यच नाही.. आणि हायझेनबर्ग ' ज्यू' आइन्स्टाइनची मांडणी मान्य करत होता, म्हणून त्यालासुद्धा ‘गोरा ज्यू’ असे संबोधले जायचे. 😬
दुसरीकडे बिगर ज्यू अणूशास्त्रज्ञांचा नेता म्हणजे हायझेनबर्गचा गुरू नील्स बोहर.  द्रोणाचार्य आणि अर्जुन असा सामना.. इथे स्पर्धा अणुबॉम्ब कोण आधी बनवणार याची होती... १९३८ साली लिझ माईटनरने न्युक्लिअर रिअँक्शनचा शोध लावला होता... जो जर्मनीमध्ये ओट्टो हान तर अमेरिकेत नील्स बोहर मार्फत पोचला होता.. दोघा देशांना समान संधी होती...  मात्र इथे मॅचफिक्सिंग झाली. १९४१ साली या गुरूशिष्यांची भेट झाली. हिटलरचा माथेफिरूपणा पाहता हायझेनबर्गने मुद्दाम अणुबॉम्ब तयार केला नाही. कागदी घोडे नाचवले.. याबाबत नील्सने हायझेनबर्गचे मन या भेटीत वळवले असे काही लोक म्हणतात. ( या भेटीवर लिहिलेल्या नाटकाचा मराठीमध्ये अनुवाददेखील आला आहे)
अनेक ज्यू शास्त्रज्ञांना नील्सने आसरा दिला होता, मात्र १९४० साली जर्मनीने डेन्मार्कचा देखील घास घेतला. म्हणजे आता इथेपण जर्मन कायदा लागू होणार.. नील्सची आई ज्यू होती. (जी कधीच मेली होती) अर्धा ज्यू असला तरी नील्सच्या जीवाला धोका होता. आपल्याला अटक होणे अटळ आहे, याची टीप मिळाल्यावर त्याने डेन्मार्क सोडले. मुलगाआजे देखील शास्त्रज्ञ झाला होता, त्याला आणि पत्नीला सोबत घेऊन नील्स मासे पकडायच्या बोटीत बसून स्वीडनला गेला. दुसऱ्याच दिवशी स्वीडनच्या राजाला भेटून डेन्मार्क मधून आलेल्या ७००० निर्वासितांची व्यवस्था करण्यासाठी विनंती केली. राजाने ती मान्यदेखील केली. नील्स स्वीडनमध्ये आहे समजल्यावर त्याला इंग्लंडमध्ये आणण्यासाठी नील्सचा जुना सहकारी, न्युट्रोनचा शोध लावणारा जेम्स चाडविक याचे प्रयत्न सुरू झाले. आणि लढाऊ विमान पाठवले गेले. विमानात गणित सोडवतानाचा खरा/खोटा किस्सा तेव्हाचाच. व्यक्ती जेवढा मोठा. तेवढ्या त्याच्याबाबत दंतकथा..  

नील्सने आपले नोबेल पारितोषिक एका केमिकलमध्ये बुडवून त्याचे द्रव पदार्थात रुपांतर करून त्याची तस्करी केली ही एक अशीच दंतकथा.. खरी बाब ही आहे की नील्सने त्यांच्या नोबेल मेडलचा लिलाव करून ती रक्कम लोकोपयोगी कामासाठी कधीच वापरली होती. मात्र नील्सच्या संस्थेत संशोधन करणारे 'मॅक्स लुई' आणि 'जेम्स फ्रँक' यांचे नोबेल मेडल आम्लराज या रसायनामध्ये (आम्लराज म्हणजे हैड्रॉक्लोरीक आम्ल आणि नायट्रिक आम्ल यांचे ३:१ प्रमाण) विरघळवले. नंतर धोका टळल्यावर ते सोने पुन्हा मिळवले. नोबेल समितीकडे ते सोने पाठवून १९५२ मध्ये पुन्हा त्यांचा छाप पाडून घेण्यात आला होता🙏
इंग्लंडमधून बोहर पितापुत्र अमेरिकेला गेले. मॅनहॅटन प्रकल्पाचा आढावा घेऊन त्याची बातमी इंग्लंडमध्ये चर्चिलपर्यंत सांकेतिक भाषेत पोचवायचे काम सोपविण्यात आले. या प्रवासादरम्यान दोघांना गुप्त नाव देखील देण्यात आले..  निकोलस आणि जेम्स बेकर..  पाऊली, चाडविक, आइन्स्टाइन हे सहकारी तिथे कार्यरत होते. नील्स स्वतः अणुबॉम्ब निर्मितीमध्ये काही योगदान दिल्याचे नाकारतो.. मात्र अणुबॉम्बनिर्माता ओपेनहायमर मात्र नील्स बोहरकडून प्रेरणा मिळाल्याची कबुली देतो. अणुबॉम्ब तयार झाल्यावर तो मानवी संहारासाठी वापरू नये, यासाठी आईनस्टाईन, बोहर आदी शास्त्रज्ञांनी खूप प्रयत्न केले. प्रत्यक्ष अणुबॉम्ब टाकण्यापूर्वी जपानला अणुस्फोटाच्या भीषणतेची कल्पना द्यावी, असा आग्रह शास्त्रज्ञ मंडळींनी धरला. पण युध्दज्वर चढलेल्या अमेरिकन सरकारने कुणाचे ऐकले नाही..😔

अनेक वेळा मला प्रश्न विचारला जातो.. तू तर नास्तिक आहेस. मग तुला आमच्या धर्माचे का पडले असते.. असेल आमचा धर्म मूर्ख.. करत असू आम्ही खुळचट बाबींचे पालन.. तुला काय करायचे आहे???.. 🙄 इथे कळकळीने सांगावे वाटते... जेव्हा तुमचा धार्मिक उन्माद वाढतो.. तेव्हा त्याचा त्रास माझ्यासारख्या निधर्मी लोकांना होतो.. लिझ माईटनर असो किंवा नील्स बोहर.. दोघे नास्तिक होते.. त्यांना ज्यू धर्माशी काही घेणे नव्हते की ख्रिस्ती धर्माशी..तरी देखील त्यांना जीव वाचवून पळून जावे लागले. नील्सतर एवढा कडवा नास्तिक होता की त्याने चर्च मध्ये लग्न करायला सुद्धा नकार दिला होता.. तो तर गमतीने म्हणायचा Christian हे माझ्या बापाचे नाव आहे..😉 आणि मला दुसऱ्या कोणत्या Christian शी घेणे नाही.❤️

लिझप्रमाणे ह्याची आई ज्यू, वडील लुथेरियन पंथाचे.. आणि हे दोघे स्वतः निधर्मी.  तरी नाझी उन्मादींनी त्यांना छळ करायचे प्रयत्न केले..😔 धर्माचा उन्माद वाढला की तुमच्याआमच्यासारखे विचारी, दंगलखोर नसलेले सामान्य लोकच भरडले जातात.. अमेरिकेच्या युद्धोन्मादात निरपराध जपानी जनता भरडली गेली.. तोजोवर नाही पडला बाँब...हिटलरने आत्महत्या केली..  लढाईत नाही मेला.. जर्मन जनता जेव्हा बॉम्बच्या वर्षावाला सामोरे जात होती.. तेव्हा हिटलर बंकरमध्ये सुरक्षित होता. भविष्यात देखील दंगलखोर, युद्ध खोर सुरक्षित असतील.. धोक्यात आपण येऊ😔 
अणुबॉम्बचा वापर न व्हावा यासाठी नील्सने अतोनात प्रयत्न केले मात्र त्याला यश आले नाही. मात्र त्याची अमेरिकेने फसवले आहे अशी भावना झाली. युद्ध संपल्यावर त्याने पुन्हा संशोधन आणि मार्गदर्शन यावर लक्ष केंद्रित केले. युरोपातील हुश्शार मेंदू अमेरिकेत जाऊ नये, त्यांना युरोपमध्येच संधी मिळावी यासाठी कोपनहेगनप्रमाणे अनेक संस्थांची निर्मिती करण्यात नील्सने पुढाकार घेतला. (याचकाळात मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना कार्यक्रमात त्यांना बोलाविण्यात आले होते. त्याप्रसंगी भाषण देताना आइन्स्टाइनच्या आठवणीने रडले सुद्धा होते)

दि.१८ नोव्हेंबर १९६२ रोजी हृदयविकाराचा आजार नील्सचा श्वास हिरावून घेऊन गेला. ख्रिस्ती धर्माप्रमाणे दफन न करता त्यांच्या इच्छेप्रमाणे त्याचे दहन करण्यात आले आणि त्याच्या अस्थींचे दफन कुटुंबीयांच्या कबरी शेजारी करण्यात आले. १९८१ साली जर्मन संशोधकांनी प्रयोगशाळेत बनवलेल्या किरणोत्सारी समस्थानिकला "बोहरियम" असे बोहरचे नाव देण्यात आले आहे. मात्र नील्सने घडवलेल्या संस्था याच त्याचे जिवंत स्मारक आहेत. त्याच्या चिकाटीला सलाम, शांतीसाठी केलेल्या प्रयत्नाला सलाम.. संशोधनाला सलाम, मदत आणि मार्गदर्शन करण्याच्या वृत्तीला सलाम... जय गणित.. जय विज्ञान✊🏾✊🏾

#richyabhau
#Niels_bohr

आपला ब्लॉग https://richyabhau.blogspot.com/

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव