वर्नर हाइझेनबर्ग : नायक की खलनायक.. की कायम अनिश्चित

वर्नर हाइझेनबर्ग : नायक की खलनायक.. की कायम अनिश्चित
दुसऱ्या महायुध्दात हिटलरने केलेला नरसंहार आपल्या सर्वांना माहीत. छळछावण्यांच्या कथा ऐकून तर दगडालादेखील पाझर फुटेल.. समजा त्या काळात हिटलरकडे अणुबॉम्ब असता तर... तर अमेरिकेने जपानवर केला त्यापेक्षा जास्त भयानक अत्याचार शत्रू राष्ट्रावर हिटलर करू शकला असता.. जर्मनीमध्ये अणुबॉम्बसाठी प्रयत्न सुरूदेखील होते.. पण "वेळीच" तो तयार झाला नाही.. काही जण म्हणतात की अणुबॉम्ब बनवणाऱ्या टीमची आणि त्याच्या कॅप्टनची तेव्हढी बौद्धिक क्षमता नव्हती..तर काही जण म्हणतात, या कॅप्टनने मुद्दाम उशीर केला... हा कॅप्टन म्हणजे वर्नर हाइझेनबर्ग..

वर्नर हाइझेनबर्ग, ज्याने अनिश्चितता तत्व मांडले आणि आइन्स्टाइनसारख्या मोठ्या शास्त्रज्ञांच्या पंगतीत जाऊन बसला.. मात्र आज तो इतिहासातील नायक आहे की खलनायक हे निश्चितपणे ठरवणे अवघड झाले आहे. कारण त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याची भूमिका "अनिश्चित".. कदाचित त्याला इलेक्ट्रॉनच्या फिरण्यामध्ये स्वतःची छबी दिसली असावी, ज्यातून त्याने अनिश्चिततेचे तत्व शोधले असावे.😬 'सहकारी ज्यू वैज्ञानिकांवर' होणारा अन्याय, पटत नाही पण काही करू शकत नाही.. कारण समोर नाझीपक्षाचा धुमाकूळ... कुरुक्षेत्रावरील अर्जुनाप्रमाणे किंकर्तव्यमुढ झालेला, आणि स्वतःची कातडी वाचवणारा वर्नर हाइझेनबर्ग.. हाइझेनबर्गचे चाहते नाराज झाले असतील 'सुरुवात' वाचून.. पण आपण इतिहासातील पात्रांना केवळ काळया पांढऱ्या रंगात न पाहता त्यांच्या मर्यादा मान्य करून पाहिले पाहिजे..
जर्मनीमधील वुर्जबर्ग शहरातील एका माध्यमिक शाळेत शास्त्रीय भाषा शिकवणाऱ्या डॉ.ऑगस्ट हाइझेनबर्ग आणि त्याची पत्नी ऍनी वेक्लेन या जोडप्याच्या पोटी ५ डिसेंबर १९०१ रोजी हा बाळ जन्माला आला. ऍनीचे वडील मुनिक शहरातील नामांकित शाळेचे मुख्याध्यापक होते, जिथे ऑगस्ट 'शिकाऊ शिक्षक' 🤔 होता..  तिथे त्याची आणि ऍनीची ओळख झाली..ऍनी रोमन कॅथोलिक तर ऑगस्ट लुथेरियन पंथाचा..(तिकडे हे असले पंथभेद पाळत होते बर का😬..  वर्नरच्या आईबाबांचे आंतरपंथीय लग्न)

या जोडप्याचा दुसरा पोरगा म्हणजे वर्नर.. तब्येतीला अतिशय नाजूक..पाचव्या वर्षी आजारपणात मरता मरता वाचला... मोठा भाऊ आणि याच्यामध्ये केवळ एक वर्षाचे अंतर.. त्यामुळे छुपी स्पर्धा.. मात्र याचे पर्यवसन रोज हाणामारीमध्ये व्हायचे.. अगदी रक्त निघेपर्यंत बडवाबडवी.. त्यामुळे नाजूक वॉर्नर लवकरच कडक झाला. बाप टिपिकल जर्मन (जर्मन लोक वर्षातून एकदा हसतात म्हणे😀) शिस्त म्हणजे शिस्त आणि अभ्यास म्हणजे अभ्यास.

घरात केवळ अभ्यासाला पोषक वातावरण.. धार्मिक बाबींना फाटा मारलेला... ❤️ विविध भाषा, गणित आणि भौतिकशास्त्र यावर वर्नरचे खूप प्रेम.. अगदी अभ्यासू कीडा..  प्लेटोचे जड तत्वज्ञान अगदी लहानपणीच कोळून पीला😬 तो म्हणतो या तत्वज्ञानाचा त्याला जीवनभर उपयोग झाला.  त्याला बुद्धिबळ खेळायची, गिर्यारोहणाची तसेच पियानो वाजवायची देखील खूप आवड होती. वयाच्या तेराव्या वर्षी अतिशय अवघड रचनादेखील तो पियानो वर सहजतेने वाजवू शकत असे. ( मोठा झाल्यावर पोरगी पण याच कौशल्यावर पटवली😉) ❤️
१९०६ मध्ये वुर्जबर्गमधील शाळेत वर्नर जाऊ लागला.. १९०९ मध्ये ऑगस्टला मूनिकमध्ये चांगली प्राध्यापकाची नोकरी मिळाली आणि संपूर्ण कुटुंब मूनिकला आले. वर्नर आजोबांच्या शाळेत दाखल झाला. वर्नरच्या बालपणाचा काळ खूप भारावलेला होता.. बिस्मार्कने जर्मनीचे एक बळकट राष्ट्र बनवले होते, जनतेला देशभक्तीचे स्फुरण चढले होते हा तो काळ.. वर्नरदेखील 'पाथफाइंडर' नावाच्या युवा चळवळीचा भाग बनला, आणि लवकरच एका तुकडीचा मुख्य देखील बनला. १९१४ मध्ये पहिले महायुद्ध सुरू झाले..  शाळा बंद पडल्या, तिथे छावण्या सुरू झाल्या. याकाळात नियम होता त्यानुसार त्याने शेतावर तसेच डेअरीमध्ये काम केले. पहाटे साडे तीन वाजता उठायचे, आणि कामाला लागायचे.. गवत कापायचे मेहनतीचे काम.. थेट रात्री दहा वाजेपर्यंत..😭 तरी मोकळा वेळ भेटला की पुस्तक वाचत असे म्हणे🙄

पहिले महायुध्द संपले, आणि झालेल्या तहाने जर्मनी अस्मितेवर घाव घातला गेला. याचा परिणाम नुकत्याच मिसरूड फुटु लागलेल्या वर्नरवर देखील झाला. पाथफाइंडर ग्रुपची व्याप्ती वाढून शाळेमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनी देखील त्यात सहभाग घेतला होता. या ग्रुपने तत्कालीन साम्यवादी सरकारविरुद्ध सशस्त्र बंड करायचा छोटा प्रयत्न देखील केला होता. पुढील काळात संशोधनात मश्गूल झाला तरी या गृपशी वर्नरचे संबंध कायम राहिले होते. दर आठवड्याला होणारी मीटिंग शक्यतो ह्याच्याच घरी व्हायची, मीटिंग झाली की विविध खेळ आणि सोबत दंगा मस्ती याची मेजवानी असायची..या मेजवानीवर पुढील सहा दिवस काढायला आपला भाऊ फ्रेश व्हायचा..

१९२० मध्ये वर्नर महाविद्यालयात दाखल झाला.. खर तर त्याला खूप वर्ष घालावी वाटत नव्हते शिक्षणात.. लगेच संशोधनात उतरून काही तरी करून दाखवायची त्याला घाई झाली होती. यामुळे त्याचा कल गणीताकडे होता. त्याची आवड पाहून वडिलांनी प्रसिद्ध गणितज्ञ लिंडेमन यांच्याशी वर्नरची भेट घडवून आणली. त्यावेळी वर्नरच्या इंटरव्ह्यूचा चांगलाच पचका झाला.. 😂 ६८ वर्षाचे लिंडेमन म्हातारपणामुळे काहीसे बहिरे झाले होते.. त्यांना तोंडातल्या तोंडात बोलणाऱ्या वर्नरचे काही समजले नाही. भाऊ त्यांच्या वर्गात काही दाखल होऊ शकला नाही. मग दुसरा पर्याय होता "भौतिकशास्त्र"...

तेव्हा मूनिक विद्यापीठात भौतिकशास्त्र विषयाला होते जर्मनीचे द्रोणाचार्य "समरफेल्ड" सर.. जर्मनीतील ८० टक्के शास्त्रज्ञ ज्यांच्या तालमीत तयार झाले,  ज्यांनी नील्स बोहर यांच्या आण्विक संरचना मोडेलला अधिक विकसित केले होते असा बाप माणूस...  विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याच्या वृत्तीमुळे जगभरातील विद्यार्थी समरफेल्ड सरांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करत होते. इथेच वर्नरला वॉल्फगँग पाऊली हा शास्त्रज्ञ भेटला.. ज्याच्याशी त्याची आयुष्यभराची गट्टी जमली.. (इतकी की पुढे त्याला जुळी पोरं झाल्यावर एका पोराचे नाव देखील वॉल्फगँग ठेवले)

"काहीतरी करून दाखवण्याची" आपल्या भाऊला तर घाई झाली होती. वर्नरने केलेल्या "झिनम परिणाम" संशोधन प्रबंधातील निष्कर्षाशी सहमत नसतानाही तो प्रसिद्ध करण्याची परवानगी सरांनी दिली. १९२२ मध्येच समरफेल्ड सरांनी नील्स बोहर यांच्याशी वर्नरची ओळख करून दिली. मात्र तेव्हा वर्नरला आण्वीक क्षेत्रातच उतरावे असे वाटले नव्हते. किंबहुना त्याने सादर केलेला दुसरा रिचर्च पेपर 'द्रव पदार्थावर वेगाचा होणारा परिणाम' यावर आधारित होता. बोहर फेस्टिवल मध्ये चर्चा करताना बोहरशी वर्नरने वाद  घातला. मात्र बोहरला वर्नरची चुणूक दिसून आल्याने त्याने वर्नरवर जीव लावला.. एकदा तर हेनबर्ग पर्वतात ट्रेकिंगला देखील सोबत घेऊन गेला. वर्नर म्हणतो.. त्याच दिवशी मी वैज्ञानिक होणार याची नांदी झाली.

Phd पूर्ण करण्या आधी सहा महिने वर्नरने गटिंगन (धटिंगणचा भाऊ😂) येथील मॅक्स बॉर्न संस्थेत घालवले.. जिथे त्याला आण्विक विषयात रस वाटू लागला.. बॉर्नने त्याला सहायक म्हणून नोकरी देऊ केली.. मात्र भाऊला phd पूर्ण करायची होती. Phd viva च्या वेळी मात्र भाऊची पुरती वाट लागली. वर्ष होते १९२३ आणि याचे वय होते २२ वर्ष फक्त. पॅनलमध्ये होते 'विल्यम वेन' सारखे तज्ञ..ज्यांना प्रत्यक्ष कामाचा प्रचंड अनुभव.. भाऊच्या "थियरी" ज्ञानाचे पार धिंडवडे उडवले वेनने.. एका प्रश्नांचे नीट उत्तर देता येईना.. समरफेल्ड सरांनी रदबदली केली.. म्हणून पास केले गेले वर्नरला.. इज्जतीची फुल धुलाई झाली आणि Phd अवॉर्ड झाली भाऊला. गड आला पण सिंह गेला😂.

PhD पदरात पाडल्यावर वर्नरने एक वर्ष गटिंगनमध्ये मॅक्स बॉर्न सोबत संशोधन केले. नंतर तो कोपनहेगन येथे नील्स बोहरचा सहायक म्हणून रुजू झाला. तेव्हा डेन्मार्कचा बोहर, हॉलंडचा क्रेमर आणि अमेरिकन स्लेटर यांचे BKS थियरीवर काम सुरू होते. यामध्ये इलेक्ट्रॉनच्या भ्रमण कक्षाचे गणित मांडले जाणार होते. मात्र गणित शेवटपर्यंत जमले नाही.. आणि सिद्धांत गुंडाळून ठेवावा लागला.. मात्र याच विषयावर वर्नर आणि मॅक्स बॉर्न यांनी पुढे गटिंगनमध्ये संशोधन सुरू ठेवले. 
एकदा सुट्टीचा आनंद घेत समुद्राच्या लाटा पाहत असताना वर्नरची 'दिमागकी बत्ती अचानकसे जल गयी.' 😇  या लाटांचे येणे जसे अनिश्चित तसेच इलेक्ट्रॉनचे वर्तन असावे असा कयास त्याने बांधला...याच दिशेने संशोधन करत वॉर्नर, बॉर्न आणि पास्कल या तिघांनी इलेक्ट्रॉनच्या वर्तनाचे गणित "मॅट्रिक्सच्या मदतीने" सोडवले. म्हणून यांच्या सिद्धांताला 'मॅट्रिक्स मेकॅनिक्स' म्हणले जाते. याच वेळी श्रोडींजरने देखील नील्स बोहर यांच्या "कक्षा" सिद्धांताला छेद देत "wave" थियरी मांडली होती.. 
इलेक्ट्रॉनची जागा आणि त्याक्षणी असलेला त्याचा वेग हे दोन्ही एकाच वेळी मोजणं अशक्य असते..  इलेक्ट्रॉन कुठे आहे हे शोधण्यासाठी फोटॉन वापरला तर त्याचा धक्का लागून इलेक्ट्रॉनची किती गती बदलते.. उलटपक्षी फोटॉन वापरला नाही, तर प्रकाशाची तीव्रता कमी होईल आणि इलेक्ट्रॉनची गती मोजता येईल पण त्याचवेळी प्रकाशाच्या कमी तीव्रतेमुळे इलेक्ट्रॉनची जागा निश्चित करणे अशक्य असते.. म्हणजेच "इलेक्ट्रॉनचे वर्तन अनिश्चित असते" हेच आहे हायझेनबर्गचे अनिश्चितता तत्व.. एकाच वर्षात १९२८ मध्ये या अनिश्चितता सिद्धांताला हर्मन वाइल यांनी गणितीय सुत्रामध्ये बसवले.

श्रोडींजर त्याचा सिद्धांत मांडताना " मांजरीचा विरोधाभास" हे उदाहरण द्यायचा. समजा एका बॉक्स मध्ये मांजर कोंडून ठेवली आहे, त्या बॉक्समध्ये एक किरणोत्सारी मूलद्रव्य ठेवले आहे, ज्याचा किरणोत्सार मोजणारे एक उपकरण देखील आत आहे (Geiger counter) त्या बॉक्समध्ये एक विषाची कुपी आणि एक हातोडा आहे जो gieger उपकरणाशी जोडला आहे. जेव्हा ठरावीक किरणोत्सार होईल तेव्हा हातोडा विषाच्या कुपिवर आघात करेल. आणि बाहेर पडलेल्या विषाने मांजर मरेल.... (कसला खात्री प्लॅन आहे राव... एकदम अप्पू राजा) मात्र या ठिकाणी किरणोत्सार नक्की कधी झाला हे सांगता येणार नाही. मांजर मेलेले असेल की जिवंत असेल हे देखील बॉक्स उघडल्याशिवाय समजणार नाही...

श्रोडींजरच्या थियरीला वर्नर 'भिकार' म्हणत होता तर श्रोडींजरने 'सगळेच अनिश्चीत असेल असला सिद्धांत काय कामाचा' असे म्हणत त्याची खिल्ली उडवली. खर तर श्रोडींजर आणि बॉर्न- हायजेनबर्ग जोडीचा सिद्धांत एकमेकाला पूरक होता. आता जुन्या संकल्पना पुसून नवे क्षेत्र तयार झाले होते. बोहरने वर्नरला पुन्हा कोपनहेगन येथे बोलावून घेतले. इथेच अनिश्चितता सिद्धांताची मांडणी केली.. ज्यामुळे वर्नर हायझेनबर्ग हे नाव अणूसिद्धांताच्या इतिहासात महत्त्वाचे झाले.
इंग्लिशमध्ये एक म्हण आहे. "विधुर कुणाशी लग्न करेल आणि ज्युरी काय निर्णय देतील हे कोणी सांगू शकतं नाही" तसेच या इलेक्ट्रॉन्सचे वागणे. या सिद्धांताने  भौतिकशात्रात बदल घडवलेच.. पण तत्वज्ञानात देखील या सिद्धांताचे परिणाम उमटले. "दृष्टी तेव्हढी सृष्टी" वास्तववादी जग हे आपल्या निरीक्षणांपर्यंत सीमित असते. मात्र आपण पाहतो त्यापलीकडे देखील जग असू शकते या तत्वज्ञानाला मान्यता या सिद्धांतामुळे मिळाली. 

वर्नर हायझेनबर्गला जेव्हा नोबेल मिळाले तेव्हा त्याने मोठ्या मनाने बॉर्न आणि पास्कलचे श्रेय मान्य केले. तो म्हणतो "माझ्या सिद्धांताला मॅट्रिक्स गणितात बसवणे या दोघांमुळे शक्य झाले, अन्यथा मला मॅट्रिक्स मधले काही कळत नाही" १९२७ नंतर त्याने जर्मनी मधील लिपझीग विद्यापीठात प्राध्यापकी सुरू केली. लवकरच ज्ञानाचे मोठे केंद्र म्हणून लिपझीग विद्यापीठ नावारूपाला आले. जगभरातील अनेक महत्त्वाचे शास्त्रज्ञ घडविण्यात त्याचा वाटा आहे. १९२९ मध्ये वर्नर भारताच्या दौऱ्यावर आला.. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची भेट घेतली. भारतीय अध्यात्म त्याला खूप भारी वाटले (दुसऱ्यांची बायको देखणी वाटते तसे कदाचित😂)
डिसेंबर १९३२ मध्ये त्याला नोबेल भेटले, आणि जानेवारी १९३३ मध्ये जर्मनीत हिटलर ची हुकूमशाही सुरू झाली. आर्य विज्ञान आणि ज्यू विज्ञान अशी शास्त्राची अवैज्ञानिक विभागणी देखील झाली. आइन्स्टाइनप्रमाणे अनेक शास्त्रज्ञ जीवाच्या भीतीने देश सोडून गेले. मात्र 'आइन्स्टाइनच्या सिद्धांताचे जो समर्थन करेल तो देखील देशाचा दुश्मन' असा प्रचार ट्रोल गँग करू लागली.आइन्स्टाइनचा सिद्धांत मानतो म्हणून वर्नरकडेदेखील संशयाच्या नजरेने पाहिले जाऊ लागले. मात्र हिटलरचा उजवा हात असलेला "हिमलर" हा वर्नरचा पाहुणा होता. त्याची मदत  घेऊन वर्नरने स्वतःवर चौकशी बसवून क्लीन चीट मिळवून घेतली.

१९३५ मध्ये समरफेल्ड रिटायर होणार होते. मूनिक विद्यापीठात त्यांची जागा घ्यायला सर्वात लायक व्यक्ती वर्नर हायझेनबर्ग हीच होती. मात्र मधल्या काळात ज्यू विज्ञान समर्थक म्हणून हायझेनबर्ग विरूध्द मुद्दाम रान पेटवले होते. नोबेल विजेते जोहान्स स्टार्क आणि फिलिप लेनार्ड यांचा देखील त्यात सहभाग होता.. शेवटी समरफेल्ड यांच्या जागी विल्यम मुल्लर नावाची व्यक्ती बसवली गेली जिचा उल्लेख समरफेल्ड नेहमी 'ठार वेडा' असा करत असे.😬

त्याच वेळी हायझेनबर्गचा जवळचा मित्र मॅक्स बॉर्न याला देखील ज्यू असल्यामुळे जाच होऊ लागला.. नोकरीवरून काढले नाही, मात्र काम पण करू दिले जात नव्हते.. पहिल्या महायुद्धात जर्मनीला मदत केलेल्या ज्यू लोकांना सवलत मिळत होती.. ज्यासाठी बॉर्न पात्र होता.. मात्र सुरू असलेली दडपशाही पाहून बॉर्नने देश सोडायचा निर्णय घेतला..मात्र त्याला देखील "थोडी दिवस वाट पहा" असा सल्ला हायझेनबर्ग देत होता..या काळात मॅक्स प्लांक याने हिटलरची भेट घेऊन ज्यु शास्त्रज्ञांना चांगली वागणूक देण्याबाबत विनवणी केली. मात्र पालथ्या घड्यावर पाणी.😰 निदान प्लांकने प्रयत्न तरी केले..नुसता थोडी दिवस वाट पाहत बसला नाही.
याच धामधुमीच्या काळात हायझेनबर्ग मन रमवायला पुन्हा पियानोकडे वळला.. आणि एका पियानो कार्यक्रमात त्याला एलिझाबेथ भेटली.. पोरगी ह्याच्यावर जाम फिदा... लग्नाच्या बेडीत अडकला.. आणि लवकरच जुळ्या पोरांचा बाप पण झाला.. पुढे देवाच्या दयेने अजून पाच पोरं पण झाली 😂 मात्र इकडे एकेक संशोधन साथीदार परागंदा होत होता याचे मन त्याला खात होते. त्यांच्या संस्थेत ज्यू कर्मचारी हकालण्याची पहिली फेरी होऊन गेली... तेव्हा भाऊने शांतपणे वाट पाहिली.. मात्र दुसरी फेरी सुद्धा सुरू झाली.. तेव्हा या संचालक मंडळाने निषेध नोंदवला.. पण तोही व्यर्थ..   सरकार जर हुकूमशहा असेल तर निषेध, संप, मोर्चा यांचा काही फरक पडत नाही.. हे आपण आज पाहत आहोतच😔

याकाळात आईला पाठवलेल्या पत्रात हायझेनबर्ग म्हणतो... "विज्ञानाने घेतलेली भरारी पाहताना खूप समाधान वाटते.. लहान लहान बाबी भविष्यात किती महत्त्वाच्या ठरतात.. खूप सुंदर वाटते विज्ञानात रमायला.. मात्र त्याच वेळेस दिसते सभोवतालचे घाणेरडं जग.." या घाणेरड्या जगात त्यालाही लवकरच उतरावे लागले. बाहेर पडायची संधी होती, अनेक देशात त्याला मागणी होती..पण परत याचे सारे काही अनिश्चित.. देशभक्ती मोठी की मानवता.. देशभक्ती महत्त्वाची की विज्ञान.  हे द्वंद्व सुरू..  सवई प्रमाणे "अच्छे दिन यायची" वाट पाहत तिथेच राहिला आणि जर्मनीसाठी अणुबॉम्ब बनवायची जबाबदारी देखील हायझेनबर्गने स्वतः उचलली.

१९३८ चे वर्ष.. लिझ माईटनर आणि ओट्टो हान यांनी न्युक्लिअर फिशनचा शोध लावला.. अमेरिका आणि जर्मनी यांच्यात स्पर्धा सुरू झाली. पुढे काय झाले आपल्याला माहीत.. अमेरिका अणुबॉम्ब टाकून जागतिक महासत्ता बनली.. मात्र जर्मनीचा बॉम्ब काही बाहेर आलाच नाही. १९४१ मध्ये नील्स बोहर आणि हायझेनबर्ग यांच्यात कोपनहेगन येथे भेट झाली होती... आज हायझेनबर्ग ची बाजू घेणारे म्हणतात की त्याने मुद्दाम बॉम्ब बनवला नाही.. केवळ कागदी घोडे नाचवले... तर विरोधक म्हणतात याची तेव्हढी क्षमताच नव्हती.. स्वतः हायझेनबर्ग म्हणतो की "मला युद्धामुळे वेळ कमी मिळाला नाहीतर अपून बॉम्ब बनाकेच रेहता" अमेरिकेला पण माहीत की जर्मनी बॉम्ब बनवेल तर केवळ हायझेनबर्गच्या जोरावर.. म्हणून त्याच्या पाळतीवर गुप्तहेर सोडला होता..  ज्या दिवशी हायझेनबर्ग कुठे बोलेल की " मी बॉम्ब बनवला"... त्या दिवशी गोळी झाडून त्याची गेम वाजवली जाणार होती.🙄
१९४५ साल... जर्मनीचा पाडाव व्हायला लागला. शत्रूच्या हाती लागू नये म्हणून हायझेनबर्ग पळून गेला. एलिझाबेथचे खेडेगावात एक घर होते. तिथे पळून जायचे ठरले.. तीन दिवस सायकल तानत हायझेनबर्ग आणि एलिझाबेथ तिथे पोचले.. जिथे शत्रूचे सैन्य आधीच पोचून त्यांची वाट पाहत होते. हे तिथे येणार असल्याची खबर आधीच तिथे पोचली होती आणि त्यांच्या दृष्टीने हायझेनबर्ग ही अतिशय महत्त्वाची व्यक्ती होती.. त्याने असे गायब होणे परवडणार नव्हते. 

ओट्टो हान आणि इतर शास्त्रज्ञ देखील पकडले गेले होते. या सर्वांची बडदास्त सामान्य कैद्यांसाठी असते तशी न ठेवता त्यांना सरकारी पाहुणचार देण्यात आला. खाणे पिणे, वाचन, बैठे खेळ यांची पुरेपूर व्यवस्था करण्यात आली होती. फक्त ते ज्या गप्पा मारतील त्या रेकॉर्ड करून ऐकल्या जात होत्या.😬 जेव्हा या शास्त्रज्ञ कैद्यांना समजले की जपानवर अणुबॉम्ब टाकण्यात आला आहे.. त्यावेळी हायझेनबर्गने दिलेल्या प्रतिक्रियेवरून अमेरिकेस समजले की " भाऊ अणुबॉम्ब बनवण्यापासून खूप लांब होता" तेव्हा ओट्टो हानने आनंद व्यक्त केला होता की " बरे झाले मी बॉम्ब नाही बनवू शकलो"

१९४६ मध्ये या सर्व शास्त्रज्ञांची मुक्तता झाली. ओट्टो हानने उघडपणे अनेक ज्यू शास्त्रज्ञांना मदत केली होती.. लिझला पळून जाताना अगदी आपल्या आईची अंगठी देऊ केली होती... हायझेनबर्गने या काळात घेतलेली कातडी बचाऊ भूमिका इतर लोक विसरले नाहीत. युद्धानंतर जेव्हा जर्मनीमध्ये विज्ञानविषयक धोरणे ठरवण्यासाठी "इलिटिस्ट जर्मन संशोधन परिषद"स्थापन करायचे ठरलं तेव्हा इतर शास्त्रज्ञांनी हायझेनबर्गच्या आवाहनाला थंड प्रतिसाद दिला.  या प्रकाराने निराश झालेला हायझेनबर्ग गटिंगन शहरात परतला. तिथे सन १९५८ पर्यंत मॅक्स प्लॅन्क इन्स्टिट्यूट फॉर फिजिक्स या संस्थेमध्ये संचालक म्हणून काम केले. पुढे १९७० पर्यंत बर्लिनमध्ये मॅक्स प्लॅन्क इन्स्टिटयूट ऑफ फिजिक्स आणि अॅस्ट्रोफिजिक्स या संस्थेत काम केले. 

महायुध्द काळानंतर हायझेनबर्गने विज्ञानाची प्रचंड सेवा केली. जगभर व्याख्यानं देत, फिजिक्सचा प्रचार आणि प्रसार केला. प्लास्मा भौतिकी तसेच थर्मोन्युक्लिअर प्रक्रिया यावर त्याने संशोधन केले. जगभर सुरू असलेल्या संशोधनाचे समन्वयन करण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र मूत्राशयाच्या कर्करोगाने त्याला ग्रासले आणि शेवटी १ फेब्रुवारी १९७६ रोजी वर्नर हायझेनबर्ग अनिश्चिततेचा प्रवास करायला निघून गेला..😔

२ मार्च २०१३ रोजी भाजपाचे जेष्ठ नेते राजनाथसिंग म्हणाले होते ‘भौतिकशास्त्राचा जगप्रसिद्ध अनिश्चिततेचा सिद्धांत वेदांमध्ये अगोदरच विशद केलेला आहे. ह्या सिद्धांताचे जनक समजले जाणारे हाइझेनबर्ग यांना ह्या सिद्धांताची माहिती भारतभेटीच्या दरम्यान रवींद्रनाथ टागोर यांच्याशी झालेल्या चर्चेमधून मिळाली होती'.😂 कुठे तरी काय तरी अर्धवट ऐकायचं.. आपल्याला अनुकूल असेल तर  शहानिशा न करता पुढे हाणायचे.😭 सत्य हे आहे की हाइझेनबर्ग यांनी अनिश्चिततेचा सिद्धांत १९२७ मध्ये मांडला होता आणि भारत भेटीसाठी १९२९ मध्ये आले होते. 😃😃

कदाचित पुढच्या पिढ्या म्हणतील की अनिश्चिततेचा सिद्धांत मोदी यांनी मांडला. शेतकऱ्यांचे भविष्य ते अनिश्चीततेच्या अंधारात कोंडू पाहत आहेत  शेतकऱ्यांचे मारून मुटकून "भले" करणेसाठी जे कायदे आणू पाहत आहेत... शेतकऱ्यांनी केलेल्या प्रखर विरोधाला जुमानत नाही. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना देशद्रोही तर त्यांना समर्थन करणाऱ्यांना नक्षलवादी ठरवण्यात येत आहे... ही तशीच यंत्रणा आहे, जीने हाइझेनबर्ग यांना ट्रोल केले होते. ज्यापुढे त्याने तेव्हा लोटांगण घातले, मात्र नंतर त्याचा सल आयुष्यावर त्याला राहिला. या ट्रोलधाडीला भिऊन कुणी शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा द्यायला कचरत असेल तर त्यांनी हाइझेनबर्गचे उदाहरण नक्की पहावे.. आणि जाताजाता एक... अजून अडाणी अंबानींच्या कारखान्यात अश्या गोळ्या बनत नाहीत ज्याने देशातील जनतेची भूक भागेल...त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांपुढे झुकावे लागेल हे निश्चित आहे👍 

#richyabhau

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव