बार्बरा मॅकक्लिंटॉक : द डायनॅमिक एक्सएक्स

बार्बरा मॅकक्लिंटॉक : द डायनॅमिक एक्सएक्स

शास्त्रज्ञ हा शब्द उच्चारला की सर्वात प्रथम डोळ्यापुढे वाहतात न्यूटन, आईन्स्टाईन, गॅलिलिओ, डार्विन, सी. वी. रमन, एपीजे अब्दुल कलाम इत्यादी पुरुष शास्त्रज्ञ. मेरी क्युरी किंवा लिझ माईटनर इत्यादी महिला शास्त्रज्ञांचे नाव क्वचित घेतले जाते. केवळ भारतातच नाही तर जगभरात महिलांना ज्ञानाच्या क्षेत्रात दुय्यम समजण्यात आले आहे. आजवरच्या नोबेल विजेत्या ९६२ व्यक्तींपैकी केवळ ५७ महिला आहेत (५.९%). विसाव्या शतकात तर नोबेलने सन्मानित झालेल्या ७४४ व्यक्तीमध्ये केवळ ३० महिला आहेत(४%). जसे आपल्या भारतात प्राचीन काळातील विदुषी महिलांची यादी गार्गी, मैत्रेयी यापुढे सरकत नाही, तसेच चित्र जगभरात पाहायला मिळते. सामान्य व्यक्ती हिपाटिया, मॅडम क्युरी पर्यंत नावे घेतानाच थकतो. असे का.. स्त्रियांकडे बुद्धिमत्ता नसते का.. त्या संशोधन करण्यास अक्षम असतात का???

याचे उत्तर मी द्यायची गरज नाही.. आपल्या सर्वांना माहीत आहे की निसर्गाने असा कोणता भेद नाही केला... भेद केला आहे समाज व्यवस्थेने.. एक्सएक्स गुणसूत्रे घेऊन जन्म घेतला की व्यक्ती केवळ चूल आणि मूल यातच बंदिस्त.. ही समाज व्यवस्था भेदण्याचे धाडस काही एक्सएक्स गुणसूत्रधारी करतात.. आणि इतिहास घडवतात. बार्बरा मॅकक्लिंटॉक हे नाव अश्यापैकी एक.. गुणसूत्रांवर संशोधन करणारी गुणी शास्त्रज्ञ.. जीने  जम्पिंग जीन्सचा शोध लावून नोबेल पारितोषिक पटकावले. सावित्रीमाईजयंती ते जिजाऊजयंती हे महिला सक्षमीकरणाचे नव्या वर्षाचे नऊ दिवस सरले आहेत. आणि आता हळदीकुंकू कार्यक्रमाची, संक्रांत वाणाची तयारी सुरू झाली असेल.. अश्या वेळी एका चाकोरी मोडणाऱ्या सक्षम महिलेची कहाणी सांगायला चांंगला मुहूर्त. 

बार्बरा मॅकक्लिंटॉक.. १६ जून १९०२ रोजी बार्बीचा जन्म अमेरिकेतील कनेक्टिकट राज्याची राजधानी हार्टफोर्ड येथे झाला. बार्बीचे वडील थॉमस मॅकक्लिंटॉक यांचा रडतखडत चाललेला डॉक्टरी व्यवसाय... एक पिढीआधी त्यांचे कुटुंब निर्वासित म्हणून अमेरिकेत आलेले. दोन मोठ्या बहिणी होत्या.. आता तरी पोरगा व्हावा असे आईला वाटत असताना बार्बी जन्माला आलेली.. नंतर हिच्या पाठीवर भाऊ जन्माला आला. आई सारा मॅकक्लिंटॉक ही छान कविता करायची, छान चित्र काढायची अन पियानो देखील छानपैकी वाजवायची... मात्र बार्बीचे सुर आईशी कधी जुळलेच नाहीत😔
बार्बीचे लहानपणी नाव वेगळे होते.. "एलेनार".. असे नाजूकसाजूक नाव सोडून घरच्यांना नंतर तिचे नाव बार्बरा असे का करावे वाटले काय माहित.😭 किती बर्बरतायुक्त वाटते ना.. आपण बार्बीच म्हणू तिला..😘 आपली बार्बी वयाच्या तिसऱ्या वर्षी आईवडील सोडून काकू काकांकडे राहायला आली. वडिलांची प्रॅक्टिस नीट चालत नव्हती.. उगाच पोरीची आबाळ व्हायला नको म्हणून काकाने तिला सांभाळायला आणली. काका मॅसेच्युसेट्स राज्यात माश्यांचा व्यापार करत असे. आधी त्याच्याकडे घोडागाडी होती, पण धंदा वाढला तशी त्याने एक ट्रक विकत घेतली. छोटी बार्बी त्याच्यासोबत हिंडायची.. आणि ट्रक बिघडला, अन् तो दुरुस्त करताना काकाची धांदल उडाली की तिला खूप मजा वाटायची. 

बालपणीचा काळ सुखाचा सरला, शाळेत जायचे वय झाले आणि बार्बीला पुन्हा आईवडिलांकडे जावे लागले. आता सहा वर्षांची बार्बी खूप आत्मनिर्भर झाली होती. शक्यतो तिला कोणत्या कामात मोठ्या कुणाची गरज लागत नसे. १९०८ मध्ये मॅकक्लिंटॉक कुटुंब न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन येथे शिफ्ट झाले. इथे बार्बीच्या बाबांचा वैद्यकीय व्यवसाय बऱ्यापैकी चालू लागला. एरस्मस हॉल हायस्कूलमध्ये बार्बी शिकू लागली. बार्बीचे पालक मुलांच्या शिक्षणाबाबत जास्त टेंशन नाय घ्यायचे.. त्यांचे म्हणणे की शिक्षणासोबत दुनियादारीचे अनुभव देखील पोरांना आले पाहिजेत. बार्बीला आइस स्केटिंगची आवड होती. शाळेत तर तिला सराव करायला मिळायचा.. पण घरीदेखील तिला सगळे साहित्य आणून ठेवले होते. वातावरण छान असेल तेव्हा शाळेला चक्क दांडी मारून बार्बीने स्केटिंग करावं यासाठी घरचेच आग्रह करायचे.😍
आईशी जास्त गट्टी नसली तरी बार्बी वडिलांची लाडकी होती. बार्बी अतिशय संवेदनशील होती.. वर्गात कुणी कुणाला दुखावले, त्रास दिला तरी ही कष्टी होत असे. याच कारणामुळे शाळेत शिक्षकांशी तिचे बिनसले. तिने  येवून वडिलांना सांगितले. वडिलांनी तिला शाळा सोडायला सांगितली आणि घरीच खासगी शिकवणी सुरू केली. लहानपणी बार्बीचे मैत्रिणीपेक्षा मित्रच जास्त.. रस्त्यात खेळायला आवडायचे.. बऱ्याच वेळा घरच्यांना प्रोब्लेम नसला तरी शेजारच्या काकूबाई जळतात असे काही बघून😂 बार्बीच्या शेजारी राहणाऱ्या काकूंनी शिकवायचा प्रयत्न केला की "बाळा.. पोरात पोरगी लांडोरी. असे पोरांसोबत रस्त्यात खेळणे पोरीच्या जातीला शोभत नाही. तू आपली मुलींमध्ये खेळत जा.." बार्बीच्या आईला समजल्यावर तिने फोन करून त्या काकूबाईवर एवढा जाळ काढला की कानातून धुरच निघाला असेल.😂❤️

मात्र हीच आई १९१८ मध्ये बार्बी जेव्हा शालेय शिक्षण पूर्ण करून बाहेर पडली तेव्हा बार्बीच्या पुढील शिक्षणाला नाही म्हणू लागली. मुख्य भीती ही होती की पोरगी जास्त शिकली तर तिच्याशी लग्न कोण करणार.. ऐकायला नवल वाटेल पण शंभर वर्षापूर्वी अमेरिकेत देखील भारतासारखीच स्थिती होती. १९२३ पर्यंत अमेरिकेत विज्ञानशाखेतील केवळ २३ पदवीधर महिला होत्या.. पुढील दहा वर्षात ही संख्या हजारपटीने वाढली.. (आजतर पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त असते❤️) याप्रसंगी बार्बीचे वडील तिच्यामागे खंबीर उभे राहिले, आईची समजूत काढली. मधल्या काळात बार्बीने नोकरी करत पैसे जमा केले, सत्र सुरू व्हायच्या दिवशी ट्रेन पकडून बार्बी इथाका शहरात गेली ती पुढची आठ वर्ष तिकडेच. 

बार्बीने कॉर्नेल विद्यापीठात जीवशास्त्र हा मुख्य विषय घेऊन विज्ञानशाखेत १९१९ मध्ये प्रवेश घेतला. इथे तिच्या आयुष्यात मका आला..(विद्यापीठाच्या नावातच मका होता म्हणा😂😂 ह्या ह्या ह्या.. मक्या उर्फ मकरंद अनासपुरे स्टाईल) नंतर पुढची ७० वर्षे तिने मक्यावर संशोधन केले. तिने गुणसूत्रे विषयक अभ्यासक्रमात रस आणि प्रगती दाखवून शिक्षकांना एवढे इम्प्रेस केले की पदवीधर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अभ्यासक्रमात आमंत्रित होण्यासाठी पदवीचे शिक्षण घेणाऱ्या बार्बीला त्यांनी स्वतः टेलिफोन केला. बार्बी म्हणायची, " त्या एका कॉलने माझे आयुष्य बदलून गेले."
बार्बी कॉर्नेल विद्यापीठात खूप रमली. सर्व नवीन मुलींची प्रमुख म्हणून तिची नेमणूक झाली. जेमतेम पाच फूट उंच असलेली ही पोरगी खेळात पुढे तर होतीच.. पण संगीतात तिला जबरदस्त गती होती. जाझ बँड मध्ये ती बँजो वाजवत असे. ताल लयींचा हा नाद जेव्हा अभ्यासावर अतिक्रमण करू लागला त्यावेळेस सावध होऊन ती बाजूला झाली. अनेक मित्र या काळात काजव्याप्रमाणे तिच्या आयुष्यात चमकून गेले. पण कुणाशी आयुष्यभर संबंध जोडावे असे बार्बीला वाटले नाही. उलट या निमित्ताने होणाऱ्या गॉसिपिंगला बार्बी खूप वैतागली. दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावणाऱ्या, आणि त्यांच्याबद्दलचे खरे खोटे किस्से चघळत बसणाऱ्या मुली बार्बीच्या डोक्यात जात असतं. परिणामी तिने भविष्यात केवळ स्वतलाच वेळ द्यायचे ठरवले.. 

बार्बीने १९२३ साली पदवी मिळवली. अर्थातच पदवी मिळाल्यावर पुढे काय शिकायचे हे बार्बीचं ठरलेलं होतं. पण इथे पुन्हा तिचे स्त्री होणे आड आले. विद्यापीठात गुणसूत्रे विषयक खूप चांगला अभ्यास गट तयार झाला होता, मात्र त्यात स्त्री उमेदवारांना प्रवेश नव्हता. म्हणून नाईलाजाने बार्बीने वनस्पतीशास्त्र विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी सायटोलॉजी हा मुख्य विषय आणि गुणसूत्रशास्त्र हा उपविषय म्हणून निवडला. १९२५ मध्ये मास्टर तर १९२७ मध्ये phd पदवीदेखील प्राप्त केली. शिकत असताना, तसेच पुढे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यावर वनस्पती शास्त्र विभागात निदेशक म्हणून काम करत असताना बार्बराने पुढाकार घेऊन कॉलेजमध्ये एक अभ्यास गट तयार केला होता. त्यात अनेक विद्यार्थी एकत्र येऊन मका आणि त्याची गुणसूत्र याविषयी चर्चा करीत असत. विशेष म्हणजे यातील अनेक विद्यार्थ्यांनी पुढे महत्वाचे संशोधन करून नोबेल मिळवले आहे.

Phd नंतर लॉवेल रँडॉल्फ या शात्रज्ञांची पगारी सहायक म्हणून बार्बराने काम सुरू केले. लॉवेल रँडॉल्फ यांना अमेरिकन कृषी मंत्रालयाने मका विषयक गुणसूत्रीय संशोधन करून त्याची उत्पादकता वाढविण्यासाठी नेमले होते. त्यांच्यासोबत जरी तिने अधिक काळ काम केले नाही तरी पुढील आयुष्यात तिने केलेल्या संशोधनामध्ये या कामाचा खूप फायदा झाला. बार्बराने मक्याची गुणसूत्रे सूक्ष्मदर्शकाखाली पाहण्याआधी झाडाची मुळे रंगात बुडवून घेतली. त्यामुळे पेशी विभाजन होत असताना गुणसूत्रांचा आंतरछेद ती पाहू शकली. असे पाहणारी ती पहिली व्यक्ती होती, वर्ष होते १९३०. पुढच्या वर्षी तिने मक्याच्या गुणसुत्रावरील तीन जनुके दाखवणारे मानचित्र प्रसिद्ध केले. लेविस स्टॅडलर या शास्त्रज्ञासोबत काम करताना एक्सरे चा गुणसुत्रांवर होणारा परिणाम अभासला.
गुणसूत्रशास्त्रात बार्बराच्या कामाचा दबदबा वाढत गेला. काळ लक्षात घ्या इथे.. अजून रोजालिंड फ्रँकलिनने लावलेला शोध वीस वर्ष दूर होता. बार्बरा काळाच्या खूपच पुढे होती, किमान पंचवीस-तीस वर्षे, त्यामुळे तिच्या संशोधनाला सहजासहजी मान्यता मिळत नव्हती. सलग सहा वर्ष ती मक्याच्या गुणसुत्रांवर विविध संशोधन पेपर प्रसिद्ध करत राहिली. पण प्रसिद्धी आली तरी गरिबी हटत नसते. तिला अजून कायम नोकरी नव्हती. पुन्हा तिचे स्त्री असणे आड येत होते. त्या विद्यापीठात विज्ञान विषयात आजवर महिला प्राध्यापिका नेमण्यात आली नव्हती. १९३१ ते १९३३ याकाळात तिला नॅशनल रिचर्च कॉन्सिलची शिष्यवृत्ती मिळाली होती, त्यावर बार्बरा कशीबशी गुजराण करत होती.

आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास... तिच्या आयुष्यात एक निर्णय चुकला. १९३३ साली गनिनहम स्कॉलरशिप मिळाली म्हणून ती जर्मनीला गेली. दुसऱ्या महायुद्धाचा सुरुवातीचा काळ होता तो. त्यामुळे तिथे एक वर्ष देखील काढू शकली नाही. परत अमेरिकेला आली पण आता भविष्य पूर्ण अंधारात...😔 इमर्सन यांनी मदत करून दोन वर्षासाठी रॉकफेलर फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळवून दिली. इथे तिला इमर्सनचे सहायक म्हणून काम करायचे होते. यात तिची घुसमट व्हायला लागली.. स्वतंत्र प्रज्ञा असलेली व्यक्ती सहायकाचे दुय्यम काम कशी करणार.. तिला स्वतंत्र संशोधन करायचे होते.  

त्याकाळात स्त्री संशोधक प्रयोगशाळेत आली तर पुरुष संशोधक संशोधन सोडून हिच्याकडे बघत बसतील ही भीती. जर नवरा बायकोची जोडी सोबत काम करणार असेल तरच स्त्रियांना प्रयोगशाळा उपलब्ध व्हायची...😬 बार्बराच्या कामाचे महत्त्व माहीत असणाऱ्या सहकाऱ्यांनी तिला चांगली नोकरी मिळवून देण्याचे खूप प्रयत्न केले.. पण व्यर्थ.. दर वेळी एकच कारण.. ती स्त्री होती.. 😔 अखेर १९३६ मध्ये ही कोंडी फुटली. लेविस स्टॅडलर यांनी वकिली करून मिसूरी विद्यापीठात तिला सहायक प्राध्यापकाची जागा मिळवून दिली.
लेविस स्टॅडलर सोबत काम करणे म्हणजे पुन्हा एकदा एक्स रेचा मारा करून गुणसूत्रात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करणे ओघाने आलेच.. यावेळी तिच्या लक्षात आले की गुणसूत्रे एक्सरे ने खराब झालेली स्वतःची जनुके पुन्हा नीट करून घेत आहे. जनुके खराब झालेली दोन गुणसूत्रे एकत्र येताना खराब जनुके वापरत नाहीत... त्यामुळे नवीन तयार झालेल्या पेशीमध्ये खराब जनुके येत नाहीत. बार्बराने याविषयी संशोधन पेपर प्रसिद्ध केला. याचा आधार घेऊन एलिझाबेथ ब्लॅकबर्न यांनी गुणसूत्र आणि उती याविषयी संशोधन केले आहे. केवळ ब्लॅकबर्नच नाही तर हजारो संशोधकांना दिशा दाखवणारे मौलिक संशोधन बार्बराने केले आहे. तिची मिसूरी विद्यापीठातील नोकरी लेविस स्टॅडलरवर अवलंबून असून, जेव्हा तो सोडून जाईल तेव्हा आपल्याला पण काढतील याची तिला जाणीव झाली तेव्हा तिने या नोकरीला देखील तीने रामराम करायचे ठरवले. 

१९४१ साली तिचा जूना सहकारी मार्कस र्होड्स याने तिला कोलंबिया विद्यापीठात विजिटिंग प्राध्यापकाची नोकरी मिळवून दिली. कोल्ड स्प्रिंग हार्बर येथे त्याचे मक्याचे संशोधन सुरू होते. ती जागा देखील उपलब्ध करून दिली. कोल्ड स्प्रिंग हार्बर येथे एक नव्याने प्रयोगशाळा तयार होत होती. तेथे तिला डेमेरेक यांच्या मदतीने संशोधक म्हणून जागा मिळाली. लवकरच डेमेरेक त्या संस्थेचा संचालक झाला, आणि बार्बरा पर्मनंट झाली.. इथेच तिने तो जम्पींग जीन्सचा शोध लावला.. ज्यासाठी तिला नोबेल मिळाले आहे.
आपण गुणसूत्र आणि जनुक म्हणजे नक्की काय हे समजावून घेऊ. मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची साखळी असते. या गुणसुत्रांचे काही छोटे छोटे भाग वेगळे काढता येऊ शकतात. या छोट्या भागांना जीन्स किंवा जनुके असे म्हणतात. प्रत्येक सजीवाची आनुवंशिक वैशिष्ट्ये, गुणधर्म या जनुकावर अवलंबून असतात. यामध्ये असलेल्या सांकेतिक भाषेत सजीवाचे गुणधर्म दडलेले असतात, जे पुढील पिढीत हस्तांतरित होत असतात. प्रत्येक सजीवातील गुणसूत्रांची संख्या वेगवेगळी असते. माणसात ही संख्या ४६ आहे, तर कुत्र्यामध्ये ७८, चिंपांझी ४८ गुणसूत्रे असतात. प्राण्यांमध्ये सर्वात जास्त २५४ गुणसूत्रे हर्मिट जातीच्या खेकड्यामध्ये असतात. प्राण्यांमध्ये अर्धी गुणसूत्रे आई कडून तर अर्धी वडिलांकडून मिळत असतात.
 
बार्बरा मक्याच्या दाण्यावर संशोधन करत होती. घेतलेल्या नमुन्यातील मक्याचे ५०% दाणे पुननिर्मितीसाठी अकार्यक्षम असतील असा तिचा अंदाज होता. प्रत्यक्षात फक्त २५ ते ३०% दाणे अकार्यक्षम निघाले. असे का झाले असावे, याचा तर्कसंगत विचार केला आणि "एकमेका सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ" हे जीन्सचे जीवन सूत्र तिच्या लक्षात आले. गुणसूत्रे स्वतः स्वतःला दुरुस्त करताना काही जनुके गाळली जातात. हा जंपिंग जीन्सचा शोध भविष्यात अमर्यादित संधी उपलब्ध करून देणारा ठरला.. अनुवंशिकता शास्त्रामध्ये ज्या आदराने मेंडेलचे नाव घेतले जाईल, तेवढेच बार्बराचे देखील❤️
आज एखाद्या वाणाच्या जनुकामध्ये दुसऱ्या वाणाचे जनुक टाकून त्या वाणाची उपयुक्तता वाढविणे शक्य झाले आहे. नको असलेले एखादे जनुक काढूनही टाकता येते. तसेच त्यात आवश्यक तो बदलही करता येतो. उदा. भातामधील ‘अ’ जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढवण्यासाठी त्याच्या जनुकात बदल करून शास्त्रज्ञांनी ‘गोल्डन राइस’ ही जात विकसित केली आहे. भारतात अजून खाद्य पदार्थात असे प्रयोग करायला मान्यता नसली तरी आपल्या देशात बीटी कॉटन ही कापसाची कीडप्रतिबंधक गुणधर्म असलेली जात आपण वापरात आणली आहे. बॅसिलस थुरिन्जिएन्सिस म्हणजेच बीटी या कीडप्रतिबंधक गुणधर्म असलेल्या जीवाणूंची जनुके कापसाच्या गुणसूत्रात पेरून इनबिल्ट अँटीव्हायरस सारखे कीडनियंत्रण केले आहे. भविष्यात असा प्रयोग करून रोगमुक्त सुपर मानव देखील तयार केला जाऊ शकतो. बार्बराने केलेल्या संशोधनावर आधारित नवनवीन संशोधनामुळे मानवाचे आयुर्मान वाढविण्यास मदत होणार आहे.

अर्थात बार्बराच्या संशोधनाला लगेच मान्यता मिळाली नाही. बार्बरा ही काळाच्या पुढे दोन दशके होती. जीनची स्थिती स्थिर आहे आणि उत्परिवर्तन ही एक दुर्मिळ आणि यादृच्छिक घटना आहे असा आजवरचा समज होता. बार्बराच्या निष्कर्षांमध्ये त्याला अगदी उलट करून टांगले होते. "जनुकीय द्रव्ये आपला क्रम बदलतात, शेजारच्या जनुकाला क्रियाशील किंवा निष्क्रिय करू शकतात, ज्याचामुळे नवीन पिढीमध्ये आधीच्या पिढीचे गुणधर्म हस्तांतरित होताना बदलतात" असा सिद्धांत लगेच पचनी पडणे अवघड होते. सहकारी शास्त्रज्ञ आणि विज्ञान जगतात तिच्या संशोधनाला मिळणारा थंड प्रतिसाद तिच्या पदरात नैराश्य घालत होता. नंतर तर तिने संशोधन पेपर प्रसिद्ध करणे देखील थांबवले. संशोधन मात्र कधीच थांबवले नाही. 
अर्थात तिचे संशोधन जगाने मान्य करायला उशीर केला यात तिचा पण वाटा होता. एकेकाळी कॉलेज मधली लीडर असलेली बार्बरा आता अनेक वर्षे एकलकोंडी राहिल्यामुळे प्रभावी संवादाची क्षमता गमावून बसली होती. ना तिला प्रभावी बोलता येत होते, ना स्पष्ट आणि सुलभ सोपे लिहिता येत होते. आधीच ती काम करत असलेला विषय अतिशय जटिल.. त्यात हीचा स्वभाव असा की त्याने तो विषय अगम्य बनायचा. संयम ठेवून वाचनाऱ्याला मात्र तिचे पेपर अतिशय उच्च दर्जाचे वाटायचे. तिचे संशोधन सुरू असताना दोन वेळा मोठे अडथळे आले. वेगळी कामे तिच्या गळ्यात टाकली गेली.. मात्र तिने ती निपटून आपल्या विषयावर पुन्हा पुन्हा लक्ष केंद्रित केले.

भाऊसाहेब पाटणकर यांचा एक मस्त शेर आहे.. त्यात ते म्हणतात "कीर्ती ही माझी प्रिया.. समोर येतच नाही, खूप लाजते" बार्बराबाबत हेच झाले, एवढे मौलिक संशोधन केले मात्र कीर्ती काही लवकर मिळाली नाही. भाऊसाहेब पुढे म्हणतात "उशिरा का होईना माझी प्रिया.. कीर्ती, एकदाची समोर आली, नुसतीच आली नाही तर गाल देखील केला पुढे❤️" बार्बराबाबत हेपण सेम झाले. संशोधन केल्यावर ३५ वर्षांनी तिला त्याबाबत नोबेल मिळाले. वयाच्या ८१ व्या वर्षी ती पुन्हा प्रसिद्धी झोतात आली. 
केवळ शास्त्रावर प्रेम असलेली बार्बरा, तिला आधी प्रसिद्धी मिळाली असती तरी तिने ती निश्चित टाळली असती. नंतर तिच्यावर मानद पदव्यांचा ढीग पडला.. व्याख्यान द्यायला निमंत्रकांची रांग, स्वाक्षरीखोरांची तोबा गर्दी... मात्र आयुष्याच्या अखेरीपर्यंत संशोधनात आनंद मिळवत राहिली.. कधीच रिटायर झाली नाही. कोल्ड स्प्रिंग हार्बर प्रयोगशाळेजवळ असलेल्या महिला वसतिगृहात तिने २ सप्टेंबर १९९२ रोजी शेवटचा श्वास घेतला. शेवटपर्यंत नवीन माहिती वाचत राहिली, नवीन वक्ते ऐकत राहिली.

तिची प्रयोगशाळेतील केबिन ही विविध विषयांच्या पुस्तकांनी गच्च भरलेली असे. टेबलवर विविध संशोधन पेपरचा ढीग.. ज्यातील प्रत्येक पेपर बार्बराने बारकाईने वाचून आवश्यक ते अधोरेखित केले आहे. पुस्तके हीच तिचे एकटेपणातील साथी होते. एकटेपणाची तिला एवढी सवय होती की कधी लग्न करावे वाटले नाही. "मला कोणीच एवढा आवडला नाही.. आणि मला लग्न म्हणजे काय हे पण कधीच समजले नाही, मला त्याची कधी गरज वाटली नाही" असे ती म्हणायची. संशोधन करताना देखील तिला एकटेच करण्यात आवडायचे. कदाचित त्यामुळेच असेल, ती पहिली महिला होती जिला आरोग्यशास्त्र विभागात "न विभागता" एकटीला नोबेल मिळाला आहे. तसेच ती पहिली अमेरिकन महिला जिला कोणत्याही विषयात "न विभागता" एकटीला नोबेल मिळाला आहे. तिला नोबेल जाहीर झाल्याची बातमी जेव्हा तिने रेडिओ वर ऐकली तेव्हा केवळ एकच वाक्य तिने उद्गारले, "ओह डियर" 
एकटी राहायची सवय असली तरी लहान मुलीसारख्या खोड्या करायची तिची सवय गेली नाही. एक दिवस कोल्ड स्प्रिंग हार्बर प्रयोगशाळेची मीटिंग होती. अनेक शास्त्रज्ञ त्याला उपस्थित होते. अर्थात त्यात बार्बरा एकटी स्त्री होती. मीटिंगसाठी स्थळ म्हणून एक जूने घर निवडले होते, तिथे असलेल्या दोन वॉशरूम पैकी एक पुरुषांसाठी आणि एक स्त्रियांसाठी होती. जेव्हा चहापानाचा ब्रेक झाला तेव्हा पुरुष वॉशरूम पुढे लाईन लागली. गर्दीत एखादा तरी अतिशहाणा असतो. जास्त शहाणा असेल किंवा जोराची लागली असेल, ब्रूस लेविनने स्त्रियांच्या वॉशरूम मध्ये घुसून आपले काम केले. बाहेर येतो आणि पाहतो तर बार्बरा बाहेर वाट पाहत उभी. हा आधीच खजील झाला होता, त्यात बार्बराने सगळ्यांसमोर मोठ्याने दरडावून विचारले, "पाणी टाकले का" काय बोलावे हे ब्रूसला सुचेना.. काही तंग क्षणानंतर आधी बार्बरा आणि नंतर बाकीची मंडळी एवढ्या मोठ्याने हसली.. ब्रूस पार गोरामोरा पडला😂 

बार्बरा नेहमी म्हणायची की ती नव्वद वर्षे जगेल. तिच्या ९० व्या वाढदिवशी तिला एक अनोखी भेट मिळाली. तिच्या संशोधनामुळे प्रेरित होऊन लिहिलेले लेख संकलित आणि संपादित करून एक सुंदर पुस्तक बनवले होते.तिची सहकारी नीना फेडेरॉफ हीने या कामात पुढाकार घेतला होता. पुस्तकाला छान नाव दिले होते, "द डायनॅमिक जिनोम" अनेक लेखक त्या वाढदिवसाला उपस्थित होते. एक एक लेखक त्याचा लेख वाचू लागला. भिडस्त बार्बरा या अनपेक्षित कौतुकाने आधी जराशी बुजली.. मात्र थोड्याच वेळात तिचा चेहरा अभिमानाने चमकू लागला.. एका विज्ञानाच्या संन्यासिनीला यापेक्षा सुंदर भेट कोणती असणार. ❤️ ती म्हणाली हा माझा सर्वात संस्मरणीय वाढदिवस असेल. या कार्यक्रमानंतर दोनच महिन्यात बार्बराने या जगाचा निरोप घेतला. 
असे म्हणतात की या जगात अमर व्हायचे असेल तर नवी पिढी जन्माला घाला.. त्यांच्यातील जीन्स स्वरूपात तुम्ही अमर व्हाल.. किंवा असे काहीतरी या जगाला देऊन जा, ज्याने तुमचे नाव कायम राहील. पहिला पर्याय सोपा असतो.. दुसरा अवघड. पण पहिला पर्यायात आपली नवनवीन पिढी जन्माला येईल की नाही हे आपल्या हातात नसते... दुसऱ्या पर्यायासाठी मेहनत करणे आपल्या हातात... बार्बराने जरी नवी पिढी जन्माला नसली घातली, तरी आज ती अमर आहे, कायम अमर राहील❤️ 

जय विज्ञान जय समता. ✊

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव