कमला सोहोनी... पहिली भारतीय शास्त्रज्ञा

कमला सोहोनी...  पहिली भारतीय शास्त्रज्ञा

आपल्यापैकी अनेकजण कमला सोहोनी हे नाव आज पहिल्यांदा वाचत असतील... चूक आपली नाहीये..  आपल्या शिक्षण आणि समाजव्यवस्थेची आहे. आयुष्यभर डोंगराएवढं काम करून देखील त्या उपेक्षितच राहिल्या. त्यांना प्रसिद्धीचे वलय फारसे लाभले नाही. संशोधन करायला संधी मिळावी म्हणून सत्याग्रह करणारी ही अवलिया.✊🏾 होय.. महिलांना संशोधन क्षेत्रामध्ये प्रवेश दिला जात नव्हता तेव्हा हिने सत्याग्रह केला होता, तोदेखील नोबेलविजेते शास्त्रज्ञ सीव्ही रामन यांच्याविरुद्ध, परंपरेने घडवलेल्या त्यांच्या पुरुषी मानसिकतेविरुद्ध. केवळ प्रवेश मिळवला नाही तर भविष्यकाळात स्वतःला प्रूव्हदेखील करून दाखवले, सीव्ही रामन यांना स्वतःची चूक मान्य करायला लावली❤️

खर तर त्यांची गोष्ट हा नक्कीच एक सिनेमाचा विषय होऊ शकतो.. केवळ गणिताचे जादुई खेळ दाखवणे आणि भविष्याचा धंदा करणाऱ्या शकुंतलादेवीपेक्षा कमला सोहोनी यांचे काम लाखपटीने मोठे आहे, महत्त्वाचे आहे, ज्यातून विज्ञानात मोलाची भर पडली आहे. फ्रान्समध्ये मादाम मेरी क्युरी यांनी सर्वप्रथम संशोधनामध्ये स्त्रीचा ठसा उमटवला.. नंतर लिझ माईटनर हीचे काम पाहून कौतुक करताना अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणायचा की ही आमची (जर्मनीची) मेरी क्युरी ❤️ त्याच आशयाने बोलायचे तर कमला सोहोनी म्हणजे भारताची मेरी क्युरी... आपली मेरी क्युरी...

कमलाचा जन्म मध्य प्रदेशात इंदोर शहरात १८ जुन १९११ रोजी झाला. खरं तर राष्ट्रीय एकात्मतेचं अगदी आदर्श उदाहरण म्हणून कमलाचं नाव घेता येईल. मध्य प्रदेशात राहणाऱ्या महाराष्ट्रीयन कुटुंबात जन्म घेतला, कर्नाटकमध्ये शिक्षण घेतले, पुढे दिल्लीमध्ये आणि तमिळनाडूमध्ये नोकरी केली. कमला सोहोनी हे त्यांचे लग्नानंतरचे नाव, आधी त्या होत्या कमला भागवत. दरवेळेस कमळ उगवायला सभोवताली चिखल असावाच लागतो असे काही नाही... 😉 हे कमळ अतिशय चांगल्या सुंदर बागेमध्ये फुलले होते. भागवत कुटुंब.. अतिशय पुढारलेले. कमलाची आजी देखील मॅट्रिक पास, इंग्रजी बोलणारी होती.. यावरून विचार करा. 

राजारामशास्त्री भागवत हे खूप मोठे नाव... समाज सुधारक, अभ्यासक, शिक्षक, चिंतक, तत्वज्ञ, लेखक.. एक काळ त्यांनी आपल्या लेखणीने आणि वक्तृत्वाने गाजवून सोडला होता. कमलाची आजी ही त्यांची बहीण. कमलाचे वडील नारायणराव आणि चुलते माधवराव हे दोघेही बेंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधून पासआऊट. (तेव्हा त्या संस्थेचे नाव टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स असे होते.) इंदिरा गांधीच्या हुकूमशाही विरुद्ध परखडपणे आवाज उठवणाऱ्या प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत आणि कमला या दोघी बहिणीबहिणी. त्यांना अजून एक बहीण होती जी पुढे जेजे कॉलेज ऑफ आर्ट्स मधून पासआऊट होऊन कलेची सेवा करत होती.

घरची भक्कम पार्श्वभूमी लाभलेली कमला अभ्यासामध्ये अतिशय हुशार. तिचे काका माधवराव हे तिचे आदर्श. काकादेखील तिच्याप्रमाणेच गोलूमोलू होते बरं का...गुटगुटीत एकदम.. त्यामुळे काकाप्रमाणेच आपल्याला देखील केमिकल सायन्टीस्ट व्हायचे हे तिने लहानपणापासून डोक्यात घेतले होते. प्राथमिक शिक्षण इंदोरला पूर्ण झाले. मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्र हा मुख्य विषय आणि भौतिकशास्त्र हा उपविषय घेऊन कमला विज्ञानाची पदवीधर झाली. वर्ष होते सन १९३३.  विज्ञानाची पदवी मिळवणारी भारतातील पहिली महिला.✊ नुसती पदवी नाही मिळवली तर विद्यापीठात पहिली आली. पुढील शिक्षणासाठी तिला "सत्यवती लल्लुभाई श्यामळदास" स्कॉलरशिप मिळाली. 

वडील आणि चुलते यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे शिकायचे कमलाने ठरवले. कमलाचा जन्म झाला त्याचवर्षी १९११ मध्ये तिचे वडील हे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स,  बेंगलोरमधून ऑरगॅनिक केमिस्ट्री मध्ये एमएससी झाले होते. (संस्थेतून बाहेर पडलेली पहिली बॅच) काकांनी देखील इथेच संशोधन करून मुंबई विद्यापीठात प्रबंध सादर केला होता आणि सन्मानाचे "मूस गोल्ड मेडल" मिळवलं होतं. कमलाने एमएससी करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बेंगलोर इथे अर्ज केला. या संस्थेत स्त्री उमेदवाराकडून आलेला हा पहिला अर्ज. अर्ज फेटाळला गेला. पण हार मानेल ती कमला कसली. तिने वडिलांना सोबत घेऊन बेंगलोरची ट्रेन पकडली...
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे तेव्हा संचालक होते डॉ सीव्ही रामन. या संस्थेचा इतिहास खूप गौरवशाली आहे. जमशेदजी टाटा यांनी विवेकानंदाकडून प्रेरणा घेऊन भारतामध्ये मूलभूत संशोधन करता येईल अशी संस्था असावी अशी संकल्पना मांडली. म्हैसूरच्या वडियार राजासाहेबांकडून जमीन मिळाली, हैदराबादच्या निजामाकडून देखील भरपूर मदत मिळाली. आणि उभे राहिले पहिले पब्लिक प्रायव्हेट मॉडेल. संस्थेचे पहिले तीन संचालक हे ब्रिटिश सायन्टिस्ट होते. १९३० मध्ये नोबेलविजेते डॉ. सी व्ही रामन हे येथे पहिले भारतीय संचालक म्हणून दाखल झाले होते. पण जगभर फिरुन आलेले डॉ. रामन स्त्रियांच्या बाबतीत तेव्हा अगदी मनुवादी दृष्टिकोन बाळगुन होते.😔

कमलाच्या वडिलांनी रामन यांना समजावयाचा प्रयत्न केला. मात्र केवळ स्त्री असल्यामुळे कमला प्रवेश घेऊ शकणार नाही यावर रामन ठाम होते. कमला शांतपणे हे सर्व पाहत होती. घरी तिने कधीच स्त्री-पुरुष भेदभाव अनुभवला नव्हता. त्यामुळे समोर सुरू प्रकाराची तिला चीड आली. नोबेलविजेत्या रामन यांचापुढे ही २२ वर्षाची, चपचपीत दोन वेण्या घातलेली, नववारी लुगड्यातील मुलगी ताठ उभी राहिली आणि गर्जली "केवळ स्त्री असल्यामुळे तुम्ही मला डावलता आहात हे मला मान्य नाही, हा केवळ माझ्यावर नाही तर संपूर्ण स्त्री जातीवर अन्याय आहे, माझा गांधीजींच्या सत्याग्रहतत्त्वावर विश्वास आहे. मी वडिलांसोबत परत मुंबईला जाणार नाही. जोपर्यंत मला प्रवेश मिळत नाही तोपर्यंत मी तुमच्या दारात बसणार आहे." (आये हे तेरे दर पे, तो कुछ कर के उठेंगे.. ऍडमिशन ले लेंगे.. या मरके उठेंगे✊🏾)

अशावेळी कुशल प्रशासक करतो तेच काम रामन यांनी देखील केले... चेंडू दुसऱ्याच्या कोर्टामध्ये टोलावला. रसायनशास्त्राचे विभागप्रमुख श्रीनिवासय्या यांच्याकडे... त्यांनी तीन अटींवर कमलाला संस्थेत प्रवेश दिला. या अटींचे एक वर्ष काटेकोर पालन करावे लागेल तरच तिला नियमित विद्यार्थिनी म्हणून समजण्यात येईल.
१) रोज सकाळी पाच ते संध्याकाळी दहा एवढा वेळ तिला संशोधनासाठी द्यावा लागेल. 
२) इतर पुरुष संशोधकांपासून तिला लांब राहावे लागेल, संस्थेची शिस्त बिघडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
३) श्रीनिवासय्या सांगतील ते काम वेळेत पूर्ण झालेच पाहिजे.

या अटी कमलाला जाचक वाटल्या नाहीत.. पण सकाळी पाच ते संध्याकाळी दहा कमला काम करणार असेल तर तिच्या जेवणाचं काय... तो प्रश्न श्रीनिवासय्या यांनी सोडवला. रोज त्यांच्या घरून कमलासाठी देखील डबा येणार होता. गंमत म्हणजे कमलाने देखील एक अट घातली. रोज संध्याकाळी चार ते सहा यावेळेत तिला सुट्टी हवी होती..  टेनिस खेळण्यासाठी.. श्रीनिवासय्या बोलले, "इतर पुरुषांशी संबंध ठेवायचे नाहीत आणि तुझ्यासोबत खेळायला कोणी महिला मिळणार नाही मग तू खेळणार कशी" कमला बोलली, "भिंतीसोबत खेळेल. पण खेळणे गरजेचे आहे, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जतन करण्यासाठी."

अशा रीतीने अटी-शर्ती फायनल करत कमलाचा प्रोबेशन कालावधी चालू झाला. श्रीनिवासय्या यांनी दिलेली कामे तिने अतिशय सुंदर रित्या पार पाडत होती. ते पाहून श्रीनिवासय्या यांनी तिला स्वतंत्र संशोधन करण्याची मुभा दिली. श्रीनिवासय्या हे उत्कृष्ट मार्गदर्शक आणि व्यक्ती म्हणून देखील खूप चांगले होते. त्यांनी कमलाच्या प्रयोगांना दिशा दिली, शिवाय संशोधन पेपर कसे लिहावेत याबद्दलही तिला घडवले. तिने प्रथिनावरती संशोधन केले. दूध आणि कडधान्य यावर तिचे रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले. एक वर्षे पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा ताठमानेने ही स्वाभिमानी मुलगी रामन यांच्यापुढे उभी राहिली. रामन यांना वर्षभरात तिची तळमळ, धडपड दिसली होती तसेच स्वतःची चूक देखील कळली होती. ती त्यांनी मोठ्या मनाने कबूल देखील केली. ते म्हणाले, "मी मागच्या वर्षी केलेली चूक यावर्षी सुधारणार आहे आणि दोन मुलींना या वर्षी प्रवेश देणार आहे. मला असे समजले आहे की तू टेनिस छान खेळतेस, माझ्यासोबत दोन सेट खेळशील काय?❤️"

१९३६ मध्ये कमलाने प्रबंध पूर्ण करून मुंबई विद्यापीठाकडून एम.एस्सी.ची पदवी मिळाली. परंतु यावरच कमलाचे समाधान होणार नव्हते. आता पुढचे लक्ष्य होते पीएच.डी.करणे... मात्र त्याआधी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे गरजेचे होते. मुंबईची हाफकिन इन्स्टिटय़ूट औषध निर्मितीचे काम करत होती. तिथे प्राण्यांचं विच्छेदन करण्याचं काम करत असतानाच शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले. आंधळा मागतो आणि देव देतो दोन :-) 'स्प्रिंगर रिसर्च स्कॉलरशिप’ आणि ‘सर मंगलदास नथुभाई फॉरिन स्कॉलरशिप’ या मुंबईच्या विद्यापीठातील दोन्ही शिष्यवृत्त्या मिळाल्या. जीवरसायन संशोधक डॉ. डेरिक रिक्टर यांच्यापर्यंत तोवर कमलाची कीर्ती पोचली होती. त्यांच्यामुळे कमलाला पीएच.डी.साठी १८ डिसेंबर १९३७ साली केंब्रिजमधे प्रवेश मिळाला. जीवरसायनशास्त्राचे जनक, नोबेल पुरस्कार विजेते सर फ्रेडरिक गॉलंड हॉपकिन्स यांच्या मार्गदर्शनाखाली तिथे विज्ञानाचे नंदनवन फुलले होते. 

इथे अजून एक गम्मत घडली होती. मुंबईत असताना कमलाने अमेरिकेच्या महिला विद्यापीठात शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. पण अर्ज करायची अंतिम मुदत संपली होती. पुढच्या वर्षी अर्ज करा असा निरोप कमलाला मिळाला, तेव्हा मी दोन स्कॉलरशिप मिळवून केम्ब्रिजमध्ये संशोधन करत आहे असा निरोप पाठवला. 'पुअर हंग्री इंडियन' उमेदवाराकडून असे उत्तर अमेरिकेन लोकांना धक्कादायक होते. त्यांनी केंब्रिज विद्यापीठात चौकशी केली त्यावेळेस सर हॉपकिन्स  यांनी तिचे तोंड भरून कौतुक करणारे पत्र पाठवले. अमेरिकन महिला विद्यापीठात तिच्या नावाची जोरदार चर्चा झाली आणि त्यांनी तिला प्रवासी शिष्यवृत्ती ऑफर केली गेली. अशी शिष्यवृत्ती तोवर phd पूर्ण केलेल्या प्राध्यापक मंडळींनाच देण्यात आली होती. कमलाचा हा मोठा सन्मान होता. जन्माने भारतीय, शिक्षण सुरु इंग्लंड, केंब्रिजमध्ये आणि अमेरिकन फेडरेशनची फेलोशिप याप्रकारे कमला एकाच वेळी तीन देश आणि तीन खंड यांचे प्रतिनिधित्व करत होती. या तीन देशाचे प्रतिनिधित्व करत कमला लक्झेंबर्गमध्ये आयोजित लीग ऑफ नेशन मध्ये सहभागी झाली होती.
तिच्या पीएचडीचा विषय होता सायटोक्रोम आणि तिचे मार्गदर्शक डॉ. रॉबिन. वनस्पतींच्या श्वसनक्रियेत महत्त्वाचा घटक असतो सायटोक्रोम. बटाट्यातील  सायट्रोक्रोम ‘सी’ चा शोध तिने लावला. डिसेंबर १९३७ मध्ये तिने पीएचडीसाठी नोंदणी केली होती आणि मार्च १९३९ मध्ये तिला पीएचडी मिळाली सुद्धा. केंब्रिज विद्यापीठाकडून पीएचडी मिळवली ती पहिली भारतीय महिला ठरली. केवळ १४  महिन्याच्या काळात तिने केलेल्या प्रबंधाचे मार्गदर्शन आजही संशोधक घेत असतात. व्हायवा व्हायच्या आधी रंगीत तालीम म्हणून सर हॉपकिन्स यांनी कमलाला संशोधक आणि नोबेल पुरस्कारविजेत्या शास्त्रज्ञांपुढे सादर केले. ही सभा आणि व्हायवा या दोन्ही ठिकाणी कमलाने अशी बॅटिंग (खरं तर टेनिसचे शॉट मारले) केली की तिच्या विद्वत्तेची चमक पाहून सगळे चकित झाले...❤️

तिची पीएचडी चालू असतानाच भारतामधून एक खुशखबर आली. दिल्लीतील लेडी हार्डिज कॉलेजमध्ये जीवरसायनशास्त्र विभाग नव्याने उघडण्यात येणार होता. तिथे विभागप्रमुख म्हणून कमलाला बोलावण्यात आले. या महाविद्यालयाला प्रायोजित करणाऱ्या लेडी डफरीन फंडच्या सल्लागार समितीवर सर हॉपकिन्स होते. मात्र कमलाचा स्वभाव चंचल नव्हता, पीएचडी मिळवण्याचे ध्येय पूर्ण केल्याशिवाय भारतात न  परतण्याचा निर्णय तिने घेतला आणि कळवलादेखील. सर हॉपकिन्स यांना तिच्या निर्धाराचे कौतुक वाटले. त्यांनी सदर जागा तिच्यासाठी राखीव ठेवली. भारतात आल्यावर १ ऑक्टोबर १९३९ पासून डॉ. कमला भागवत त्या कॉलेजमध्ये जीवरसायनशास्त्राच्या व्याख्यात्या म्हणून रुजू झाल्या.

ही नोकरी तशी निवांतपणाची होती. स्वतंत्र ऑफिस व स्वतंत्र प्रयोगशाळा. तालकटोरा क्लबमध्ये टेनिस खेळणे आणि जवळच पोहण्याचा तलाव. दिमतीला नोकरचाकर.. सर्व व्यवस्था उत्तम. पण संशोधन करण्याचा कीडा शांत बसून देत नव्हता. तेव्हा डॉ. सुशीला नायर या लेडी हार्डीज हॉस्पिटलमध्ये भूलतज्ज्ञ म्हणून काम करत असताना ‘रक्तातला कोलेस्टेरॉल व निरनिराळ्या दुखण्यांत त्याचा होणारा प्रभाव!’ यात संशोधन करत होत्या. त्यांनी त्यांच्या संशोधनात डॉ. कमलाची मदत मागितली. हे म्हणजे असे झाले की पर्वतच मोहम्मदकडे आला..😁 

एकट्या स्त्रीला, त्यातही परदेशी शिकुन आलेल्या रूपवती स्त्रीला एकट्याने एवढ्या सुखासुखी जगता येते का.. सहकारी आणि अधिकारी पुरुषांची मानसिकता बुरसटलेली.. स्त्री एकटी आहे याचा अर्थ उपलब्ध आहे..😔 सुशिक्षित आणि सोज्ज्वळ लोकांच्या या त्रासाला आधी डॉ. कमलाने धीराने तोंड दिले. अगदी कायदेशीर बंदोबस्त करायचा पण प्रयत्न केला... पण पोलीस यंत्रणा काय आभाळातून येते का.. ती देखील त्याच समाजाचा भाग.  शेवटी त्यांनी दिल्ली सोडायचे ठरवले.  भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेने तामिळनाडूमध्ये  कुन्नूर शहरात नव्याने सुरू केलेल्या, आहारशास्त्रात संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळेत डॉ. कमलाची वर्णी लागली. तिथे पाश्चर इन्स्टिटय़ूट व न्यूट्रिशन रिसर्च लॅब अशा दोन प्रयोगशाळा होत्या. मार्च १९४२ मध्ये न्युट्रिशन रिसर्च लॅबच्या साहाय्यक संचालक या पदावर डॉ. कमला रूजू झाल्या.
तिथे भारतीय आहार आणि शास्त्रीय दृष्टिकोन यांची सांगड घालण्याचे त्यांनी प्रयत्न केले. हरभऱ्यातील जीवनसत्त्वे शोधून काढली. आहारात हरभऱ्यातील व लिंबूरसातील जीवनसत्त्वे एकत्र दिली तर रक्तवाहिन्यांचे आवरण मजबूत होते, रक्तस्राव होत नाही, हिरड्यांतून येणारे रक्त देखील थांबते हे त्यांनी प्रयोगातून सिद्ध केले. निरनिराळी रसायने हरभऱ्याचा अर्क वापरून त्यांनी अनेक द्राव तयार केले, आणि त्यांच्या साह्याने गिनीपिगवर प्रयोग केले. गिनिपिगला जीवनसत्त्वे नसलेला आहार दिला, तेव्हा रक्तस्राव लवकर थांबत नसे. पण हरभऱ्याच्या द्रावाने तो कमी होत होता. याशिवाय डॉ कमलाने शेंगदाणा पेंड लहान मुलांचे कुपोषण कमी करायला उपयोगी पडते हे शोधून त्या पेंडेला छान खाऊचे रूप दिले. याशिवाय यीस्टचा वापर करून दुसऱ्या महायुध्दात लढणाऱ्या सैनिकांसाठी गोळ्या बनवल्या. 

डॉक्टर राघवन हे रेबीज लस तयार करत होते. त्यांना आवश्यकता होती बी जीवनसत्व प्रकारातील बायोटीनची. हे बायोटिन बाजारात उपलब्ध होत नव्हते. डॉक्टर कमला यांनी बदकांच्या अंड्यापासून बायोटीन तयार करून दिले. आपण लहानपणी शिकला असाल की क जीवनसत्त्वाअभावी स्कर्वी रोग होतो.. (पण स्कर्वी झालेला रुग्ण आपण कधी पाहिलेला नसतो 😂 बेरीबेरीचे पण तसेच) एका आठ वर्षाच्या मुलाला स्कर्वी झाला होता आणि त्याच्या त्वचेखालचा रक्तप्रवाह अजिबात थांबत नव्हता. डॉक्टरांनी न्यूट्रिशन लॅबमध्ये मदत मागितली. डॉक्टर कमला यांनी मोड आलेले हरबरे प्रेशर कुकर मध्ये शिजवणे आणि त्यात केवळ मीठ आणि लिंबाचा रस टाकून त्या मुलाला खायला देणे हा उपचार केला. दिवसातून दोन वेळा अर्धी वाटी असे चारच दिवस केले आणि तो आजार आटोक्यात आला. (मला तर स्वामी समर्थ, गजानन महाराजांचे चमत्कार सांगतो आहे असे वाटते आहे 😂)

जगाच्या कोपर्‍यात कुठेही जा men will be men. डॉ. कमला एवढा शैक्षणिक तसेच प्रात्यक्षिकांचा अनुभव इतर कोणाकडे नसतानादेखील त्यांना डावलले जात होतं. केवळ स्त्री म्हणून... इथे पण त्यांचे मन रमेना.. राजीनाम्याचे विचार सुरू असतानाच जीवनात अजून एक धक्का बसला. मात्र हा धक्का सुखद होता. जीवन विमा कंपनीत ॲक्चूअरी म्हणून काम करणाऱ्या माधवराव सोहोनी यांनी कमला यांना प्रपोज केलं. आपण जी विमा उत्पादने खरेदी करतो ती तयार करत असताना भविष्यातील जोखमीचा अंदाज घेण्याचे काम ॲक्चूअरीचे असते.. साहजिक माधवरावांनी या जोखमीचा देखील विचार केला असेलच😂 भाऊ खूप दिवस फिल्डिंग लावून बसले होते पण हिम्मत झाली नव्हती..😭 ज्या दिवशी हिम्मत झाली त्या दिवशी विकेट पडली. ❤️
डॉ. कमला यांनी त्यांचा प्रस्ताव स्वीकारला एका अटीवर,  "मी आयुष्यभर संशोधन करणार आहे, त्यात तुमचे पूर्ण सहकार्य अपेक्षित असेल." माधवरावांशी लग्न करून ३६ वर्षाच्या डॉ. कमला मुंबईला स्थलांतरित झाल्या. पुढे त्यांच्या संसारवेलीवर दोन फुले देखील उमलली. एकमेकांना सहकार्य करत दोघांच्या करिअरचा उत्कर्ष झाला. पुढे माधवरावांना विमाकंपनीने अधिक उच्च शिक्षणासाठी लंडनला पाठवलं. परत आल्यावर ते एलआयसीचे व्यवस्थापकीय संचालक देखील झाले. शिस्त, टापटीप, प्रामाणिकपणा, वाचनाची आवड हे दोघांच्या स्वभावात, आणि घरातील कामे देखील दोघांनी  वाटून घेतली होती. विणकामाची एवढी आवड की घरातल्या कुणाला स्वेटर्स, लोकरी हातमोजे बाहेरून विकत घ्यायला लागले नाही..डॉ. कमला घरीच बनवायच्या
डॉ कमला १९४७ मध्ये मुंबईत आल्या. (रॉयल) ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’ या संस्थेत १९४९ मध्ये नव्याने सुरू झालेल्या जीवरसायनशास्त्र विभागाच्या प्रमुखपदी त्यांची नेमणूक झाली. इथेच संस्थेच्या संचालक म्हणून  १९६९ मध्ये सेवानिवृत्त झाल्या. इथे त्यांनी कडधान्यांतील प्रथिनांवर काम करून त्यातील अ-पाचक घटक वेगळा केला. भाताच्या तूसावर संशोधन करून खाण्यायोग्य त्याचे खाण्यायोग्य पीठ बनवले. मात्र सर्वात मोलाचे काम म्हणजे त्यांनी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि होमी भाभा यांनी सुचवल्याप्रमाणे नीराविषयक केलेले संशोधन...❤️  आपण नीरा विक्री केंद्रावर नीरेचे फायदे लिहिलेले बोर्ड वाचले असतील. ते फायदे डॉ कमला यांनी शोधून काढले आहेत. भारतभर सर्वत्र उपलब्ध असलेले हे पेय क, ब  जीवनसत्त्वे, लोह, फॉलिक अम्ल  आणि फॉस्फरसासारखे क्षार असे कुपोषण विरोधी संपूर्ण पॅकेज असते.  
डॉ कमला यांनी नीरा विषयक प्रयोगासाठी डहाणूजवळच्या आदिवासी शाळकरी मुलांची तसेच गर्भवती स्त्रियांची निवड केली. तेथील मुलांमध्ये हिरड्या मऊ पडून त्यातून रक्त येणे तसेच ॲनिमिया व खरूज हे आजार मोठ्या प्रमाणात होते. त्या मुलांना प्रत्येक दिवशी जेवणाव्यतिरिक्त एक ग्लास नीरा असे रोज पाच महिने देण्यात आली. क जीवनसत्त्वामुळे हिरड्यातून येणारे रक्त बंद झाले, तर लोहामुळे ॲनिमिया बरा झाला. इतर जीवनसत्त्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून खरूज बरी झाली. यावर त्यांनी पुढे १० वर्षे संशोधन केले आहे बरं का.. केवळ त्याच नाही तर त्याच्याकडील २५ जण एमएससी करणारे आणि १७ जण PhD करणारे विद्यार्थी या संशोधनात सहभागी होते. पण गम्मत म्हणजे खादी ग्रामोद्योग मंडळाने पहाटे तीन वाजता पाठवलेली नीरा घ्यायला प्रयोगशाळेत स्वत: डॉ. कमला जात असत.. ते ही दोन चार दिवस नाही.. दहा वर्षापेक्षा अधिक कालावधी... मला वाटतं नाही कामावर प्रेम असण्याचे यापेक्षा भारी उदाहरण तुम्ही वाचले असेल❤️

नीरेबद्दल केलेल्या मौलिक संशोधन कार्याबद्दल त्यांना सर्वोत्तम शास्त्रीय संशोधनाचे राष्ट्रपतीपदक देऊन १९६० साली गौरविण्यात आले. पुढे त्यांना अनेक ठिकाणी मार्गदर्शन करायला बोलावण्यात आले.  हाफकिन्स इन्स्टिटय़ूटची पुनर्रचना समिती गठीत झाली.. बोलवा डॉ. कमला सोहोनी यांना..  बडोद्याला महाराज सयाजीराव विद्यापीठात जीवरसायन शास्त्र विषयाचा नवा स्वतंत्र विभाग उभा रायचा आहे..बोलवा डॉ. कमला सोहोनी यांना..  नवरा परदेशी असताना दोन लहान मुलं सांभाळून त्या सारी धावपळ करीत. एक स्त्री एवढे कसे करू शकते .. दुसऱ्यांना पोटदुखी होणारच.. एक-दोन संचालकांनी त्यांना त्रास दिलाच. वरिष्ठांकडे त्यांच्या टेनिस खेळण्याची तक्रार केली गेली की, ‘सोहोनी मॅडम कामाच्या वेळात टेनिस खेळायला जातात. असे कसे चालेल... संस्थेच्या शिस्तीवर वाईट परिणाम होतो ना.. त्यांना ताकीद द्यावी.’

या पत्राची प्रत भेटली तेव्हा डॉ. कमला डायरेक्ट सचिवांच्या समोर जाऊन बसल्या. ‘‘कार्यालयीन वेळ सकाळी ११ ते ५ आहे, मान्य आहे. मी रोज संध्याकाळी १५ मिनिटे लवकर जाते,हे पण मान्य आहे. पण मी रोज सकाळी ८ वाजता लवकर येते. कित्येक वर्षांत एकही रजा घेतली नाही. सर्वात जास्त रिसर्च पेपर्स मी प्रसिद्ध केले आहेत. सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना माझ्या हाताखाली अधिकाधिक विद्यार्थ्यांना एम.एस्सी., पीएच.डी. पदव्या मिळाल्या आहेत. पत्र पाठवणाऱ्याना माझी १५ मिनिटं दिसली? आता यापुढे या पत्राचा निषेध म्हणून रोज संध्याकाळी ४ वाजताच मी जाणार आहे.  तुम्हाला जे पाहिजे ते करा.’’😂😂 रोक सको तो रोक लो.

पत्राची हवा निघून गेली... पत्र मागेदेखील घेण्यात आले. मात्र प्रमोशनच्या वेळी जेवढ्या काड्या करता येतील तेवढ्या केल्याच. संचालक निवृत्तीनंतर कधी नाही ते चार वर्षाचे एक्स्टेंशन घेऊन आले.😬 कमला सोहोनी यांना अजून चार वर्ष छोटे पद आणि कमी पगारावर काम करायला लागले. जेव्हा त्या संस्थेच्या संचालक झाल्या तेव्हा आपल्या कार्यकाळात विज्ञानाला पोषक वातावरण तयार केले.. जुन्या त्रास देणाऱ्या लोकांविषयी देखील वैरभावना ठेवली नाही. १८ जून १९६९ रोजी निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर देखील त्या सामाजिक काम करत कार्यरत राहिल्या. विज्ञानाचा वापर करून अन्नातील भेसळ कशी ओळखावी याची प्रात्यक्षिके दाखवली. यावर अनेक लेख लिहिले. ग्राहक संरक्षण विषयक "कीमत" हे नियतकालिक चालवले. स्वयंपाक करताना काय काळजी घ्यावी यावर त्यांनी आहार-गाथा (आहार व आरोग्य विचार) हे पुस्तक लिहिले. 

त्यांनी विज्ञानाच्या केलेल्या प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांना मुंबईतील ‘इंडियन विमेन सायंटिस्ट ॲसोसिएशन’ या संस्थेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात ‘पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ’ म्हणून गौरविण्यात आले. नवी दिल्लीच्या ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ या संस्थेमध्ये जेव्हा डॉ. सत्यवती अध्यक्षस्थानी आल्या तेव्हा त्यांनी कमला सोहोनी यांचा जीवनगौरव प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करण्याचे ठरवले. खूपच छान कार्यक्रम झाला. याच कार्यक्रमात सत्कार स्वीकारताना कमला सोहोनी कोसळल्या... आणि त्यानंतर लवकरच २८ जून १९९८ रोजी त्यांचा मृत्यू झाला. एक "निरामय" आयुष्य संपवून त्यांचा देह अनंतात विलीन झाला.

डॉ. कमला.. भारताची पहिली शास्त्रज्ञा.. विज्ञानाच्या क्षेत्रात स्त्रियांना संधी मिळवून देणारी...त्यांनी जो रस्ता खुला केला त्याचा फायदा आज हजारो शास्त्रज्ञा घेत आहेत.. पण त्यातील किती जणींना त्यांचा संघर्ष माहित असेल काय माहीत.. त्यांचा संघर्ष अभूतपूर्व आहेच. जरी त्यांचा जन्म तथाकथित उच्च जातीत आणि त्यातही पुढारलेल्या घरात झाला.. त्यांना घरातील संघर्षाला सामोरे जावे लागले नाही.. की समाजात जातिभेदाचे चटके सोसावे लागले नाहीत. लिंगभेदाच्या चक्रव्यूहात जरी त्यांच्यावर हल्ले झाले तरी त्यातून त्या यशस्वी बाहेर पडल्या.. 

पण कित्येक जणींना तो व्यूह भेदता आला नसेल.. किती प्रतिभा वंश, लिंग, जाती, धर्म, रूढी यांच्या कुंपणात कैद होत असतील.. आजही भारतात जन्मलेल्या एकाही महिलेला नोबेल मिळाले नाही. भाषणात कधी विचारले की "पहिली भारतीय अंतरीक्ष यात्री कोण" की हमखास उत्तर येते " कल्पना चावला" हे उत्तर चूक आहे असे सांगितले तर मग उत्तर येते, " सुनिता विल्यम्स" हे देखील चूक असते..  या दोघी भारतीय वंशाच्या असल्या तरी त्यांचे नागरिकत्व अमेरिकन आहे. म्हणजे अजून पाहिली भारतीय अंतरीक्ष यात्री झालेली नाही... ती कुणीही असू शकते.. तुम्ही.. तुमची मुलगी, तुमची बहीण, तुमची पत्नी.. कोणीही... फक्त तिच्या प्रतिभेला कुंपणातून मुक्त करायची गरज आहे.. आणि तुम्ही ती कराल.. तिच्या पंखात बळ आहेच.. तिची ती सक्षम आहेच..तुम्ही अडथळे आणू नका🙏

जय विज्ञान जय मानवता✊✊ 

#richyabhau 
#kamala_sohoni

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव