जेनिफर डॉडना आणि जीन्स कापणारी कात्री.

जेनिफर डॉडना आणि जीन्स कापणारी कात्री. 

विज्ञानाच्या साह्याने मानवाने एकेकाळी अशक्य वाटतील अश्या गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचा वापर करून हरितक्रांती शक्य झाली. खर तर यात देखील जनुक तंत्रज्ञानाचा अप्रत्यक्ष वापर केला गेला होता. अधिक रोगप्रतिबंधक क्षमता असलेली, कमी वेळेत आणि खर्चात येणारी गहू, तांदळाची सुधारित वाणं यांचे निर्माण आणि वितरण करण्यात आले. ती केवळ एक सुरुवात होती. पुढील ५० वर्षात जनुकीय अभियांत्रिकी विषयाने खूपच वेग पकडला आहे. आतातर बाजारातून आणलेल्या नवीन जीन्स पँटला जसे अल्टर करतो, त्याच सहजतेने नको असलेली जनुक कापून काढण्याचे तंत्रज्ञान विकसित होत आहे. याच तंत्रज्ञानासाठी जेनिफर डॉडना आणि इमॅन्युएल चार्पेंटिअर यांना यावर्षी नोबेल मिळाला आहे. 

विसाव्या शतकात केवळ ३० महिला शास्त्रज्ञांना नोबेल पुरस्कार मिळाला होता. एकविसाव्या शतकात केवळ वीसच वर्षात २७ महिला नोबेल पुरस्कार मिळवू शकल्या.. हे नारीशक्तीचे द्योतक आहे. २०२० मध्ये पहिल्यांदाच विषयात दोन महिला या पुरस्काराने सन्मानित झाल्या आहेत. अर्थात नोबेल मिळणे हा चांगले शास्त्रज्ञ असण्याचा एकमेव निकष असू शकतं नाही. जेनिफर डॉडना यांना आयुष्यभर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.. भविष्यात देखील मिळतील... कारण त्यांचे काम अजून जोमाने सुरू आहेच.. त्यांचे संशोधन नाबाद आहे.. खर तर जनुकीय अभियांत्रिकी हा विषय नाबाद आहे. 
जेनिफर डॉडना... जेलो (जेनिफर लोपेझ) सारखीच मला आवडलेली दुसरी जेनी. कसली क्यूट आहे राव..❤️ जेनीचा जन्म १९ फेब्रुवारी १९६४ रोजी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमध्ये झाला. डोरोथी जेन आणि मार्टिन डॉडना या सुविद्य जोडप्याची ही सर्वात मोठी मुलगी. तेव्हा आईवडील दोघांना चांगली नोकरी नव्हती... जेनीच्या जन्मानंतर वडिलांना मिशिगनमध्ये नोकरी लागली. संसाराची समीकरणे जेमतेम जुळायला लागली. मार्टिनने तिथे phd साठी नोंदणी केली. चार वर्षात पूर्ण पण केली. याच काळात जेनीच्या पाठीवर अजून दोन बहिणी झाल्या. जेनी सात वर्षाची असताना डॉडना कुटुंब कामानिमित्त हवाई बेटसमूहातील हिलो या नयनरम्य बेटावर राहायला गेले. तिचे वडील इंग्लिश साहित्याचे प्राध्यापक होते. आईदेखील शिक्षणशास्त्रातील मास्टर होती. जेनीच्या वडिलांना हिलो विद्यापीठात नोकरी मिळाली होती. जेनीच्या आईने तिथे आशियाई इतिहास विषय घेऊन तिची दुसरी मास्टर डिग्री मिळवली आणि त्या बेटावरच्या स्थानिक विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. 

हवाई बेटे आपण सिनेमात पाहिली असतील.. प्रचंड सुंदर आहेत.. मात्र पर्यटकांची खूप बजबज असते. हिलो बेट याला अपवाद.. इतर बेटांपेक्षा एका बाजूला असलेले हे बेट.. हौसे, नवसे, गवसे पर्यटकांची गर्दी नाही की लोकांच्या डोक्यात धंदा घुसला नाही. जेनीला तिथे स्थानिक मित्र मैत्रिणी मिळाले.. बहुतेक सगळे आशियाई वंशाचे. कामगार, कष्टकरी पालक असलेले.. त्यांच्यात ही निळे डोळे असलेली प्राध्यापकाची मुलगी भाव खाऊन जात होती. त्यांचा ग्रुप जंगल, झरे, धबधबे धुंडाळत इकडे तिकडे फिरत असायचा. त्यासोबत निसर्गातील गमती जमती पाहताना तिचे कुतूहल देखील जागृत होत होते. लाजाळूचे झाड जेनीला खूप आवडायचे. हात लावला की कसे काय पाने मिटतात.🤔 झाड झोपले असे समजायची.. लाजाळूच्या झाडाला इंग्रजीत स्लीपी ट्री म्हणतात. ( तसेही जो लाजला तो संपला, जो झोपला तो संपला.. a=c, b=c, then a=b 😬 असेच आपले ओढून ताणून विनोद)
वडील इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक.. त्यामुळे घरात पुस्तकांची कायम रेलचेल असायची.. तिला विज्ञानाची गोडी लागावी म्हणून वडील जाणीवपूर्वक प्रयत्न करीत. तिला समजतील अशी सोप्या भाषेतील विज्ञानाच्या गमती जमती सांगणारी पुस्तके वडील घरात आणून ठेवायचे.. तिने वाचलीच पाहिजे असा अट्टाहास नाही. (अट्टाहास केला तर मुले मुद्दाम वाचत नाहीत.. माझा पण अनुभव) जेनी बारा वर्षांची असताना बाबांनी तिला जेम्स वॅटसन लिखित डबल हेलिक्स हे पुस्तक आणून दिले. डीएनए ची रचना आणि ते शोधताना शास्त्रज्ञांनी केलेले प्रयत्न वाचून जेनी खूप प्रेरित झाली. शोध लागणे हे काही जादू झाल्याप्रमाणे नसते, त्यासाठी अनेक वर्षे प्रचंड मेहनत घ्यावी लागते, या काळात आपले मानसिक संतुलन देखील सांभाळावे लागते याची तिला तेव्हाच समज आली. किंबहुना संशोधकांची ही मानवी बाजू तिला खूप आकर्षक वाटली.

आई वडील दोघांना उत्क्रांती, भूगोल, खगोलशास्त्र याविषयात रस होता. त्यामुळे सुट्टीचा दिवस पोरींना घेऊन भटकण्यात जायचा. हवाई मधील वोल्कानो नॅशनल पार्क हा त्यांचा फेवरेट स्पॉट. सहावी पर्यंत जेनीचे शालेय शिक्षण हिलो मधील सरकारी शाळेत झाले. सातवी आठवी एका कॅथलिक शाळेत तिला घातले गेले. ती नववीला गेली त्या वर्षी तिचे वडील सब्बाटीकल सुट्टीवर होते. काही विद्यापीठांमध्ये प्राध्यापक मंडळींना एक वर्षाची सब्बाटीकल सुट्टी दिली जाते. (कसले भारी ना) या कालावधीत त्यांनी प्रवास किंवा संशोधन करून स्वतःची क्षमता वाढवायची असते. जेनीने पप्पा वर्षभराची ही सुट्टी घालवायला मिशिगन येथे आले होते. हे एक वर्ष जेनीला अतिशय हायफाय शाळेमध्ये घालवायला मिळाले. जेनी म्हणते इथे तिला इंग्रजी आणि गणित विषयाचे इतके सुंदर शिक्षक मिळाले की ते विषय कायमचे पक्के होऊन गेले.

१९८० साली दहावीला जेनी पुन्हा हिलोमधील सरकारी शाळेत आली. तिथे रसायनशास्त्र शिकवायला वोंग मिस होत्या. रसायनशास्त्र हे कल्पना शक्तीचे प्रकट रूप असते असे त्या सांगायच्या. मुलांच्या मनात विज्ञान आणि वैज्ञानिक यांच्याबद्दल आदर निर्माण करायच्या. त्याच वर्षी होनोलुलु कॅन्सर सेंटर मध्ये आयोजित कर्करोगावर एक सुंदर व्याख्यान ऐकायची संधी जेनीला भेटली. निरोगी पेशी कश्या कर्करोग ग्रस्त होतात हे ऐकून जेनीला खूप विस्मय वाटला. जेनीच्या मनात वैज्ञानिक व्हायचे बेत रचले जात होते. त्यावर्षीची सुट्टी तिने खेळण्यात घालवली नाही. हिलो विद्यापीठातील प्रयोगशाळेत डॉन हेम्स या बुरशीशास्त्रज्ञाला तिने याकाळात मदत केली. सूक्ष्मदर्शकाशी जेनीची इथेच गट्टी झाली.. ❤️ दहावी पास झाल्यावर जीवरसायनशास्त्र शिकायचे ठरले.
पदवीच्या शिक्षणासाठी जेनीने कॅलिफोर्नियामधील पोमोना कॉलेज निवडले. जीवरसायनशास्त्राच्या अभ्यासासाठी हे कॉलेज सर्वोत्तम होते. येथील एक प्राध्यापक शॅरोन पॅनासेंको यांनी तिला स्वतंत्र संशोधन करण्यास संधी आणि दिशा दिली. Phd साठी तिला जॅक स्वॉस्टाक (२००९ मध्ये यांना नोबेल मिळाले) हे शास्त्रज्ञ गाईड म्हणून लाभले. जॅक यांचे विकर (एन्झाईमस) वर संशोधन आहे. जेनीने Phd करताना रायबोसोम्सवर संशोधन केले. अमिनो आम्लांची साखळी विणून त्यांचा क्रम निश्चित करण्यात रायबोसोम्स महत्त्वाची भूमिका बजावत असते. RNA हे केवळ प्रथिन संश्लेषणचे काम करण्याच्या सूचनांचे वाहक करत नसतात, तर ते त्याची गती देखील वाढवतात हे तिला समजले.. याच आधारावर पुढे तिचे संशोधन बहरत गेले आहे. Phd साठी जेनी RNA च्या जंगलात घुसली.. अनेक वर्ष तिने त्यातच संशोधन केले..

जेनी १९८९ मध्ये डॉ. जेनिफर डॉडना झाली. जेनीफरने स्वॉस्टाक सोबत काम करणे चालू ठेवलेच होते. त्यानंतर तिला कॉलेराडो विद्यापीठाकडून पोस्ट डॉक्टरल फेलोशिप मिळाली. इथे तिला थॉमस झेक सोबत काम करायचे होते ज्यांना RNA संदर्भातील संशोधनासाठी १९८९ मध्ये नुकतेच नोबेल पारितोषिक मिळाले होते. जेनिफर RNA चे स्फटिकिकरण करून देण्याच्या कामात त्याला मदत करू लागली. त्याच्याकडे अद्ययावत एक्सरे तंत्रज्ञान असलेल्या मशीन असल्याने जेनिफरला RNA चे त्रिमितीय रचना समजून घेण्यात सोपे झाले. इथेच काम करताना तिची भेट भविष्यातील जोडीदार "जेमी केट" सोबत झाली.. 
तिथे पाच वर्ष काम केल्यानंतर जेनी १९९४ मध्ये येल विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाली. सहा वर्षात प्राध्यापक पदावर प्रमोशनपण झाले. याच काळात जेनी- जेमीचे लग्न पण झाले..❤️ मात्र संसार वाढवायची जोखीम जेनिफरने घेतली नाही. संशोधन एके संशोधन. १९९८ मध्ये जेनिफरच्या टीमने हिपाटायटिस आजारास कारणीभूत असलेल्या विषाणूची रचना प्रकाशात आणली. त्यामुळे या आजारावर देण्यात येणाऱ्या लसीमध्ये सुधारणा करणे शक्य झाले. आता नवीन लस योग्य सल्ल्यानुसार दिल्यास हिपाटायटिस बी हा आजार पूर्णपणे टाळता येतो.

जेनिफरला २००२ मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापकाची नोकरी चालून आली. तिथे तिला आईची सोबत असणार होती, जिच्या सहकार्याने स्वतःच्या आईपणाची जबाबदारी देखील जेनिफर ला पार पाडता येणार होती. जेनीचा नवरा देखील त्याच विद्यापीठात शिकवत होता. त्याच वर्षी जेमीजेनी संसारात अँड्र्यू नावाचे बाळ आले. जेनिफर म्हणते बाळाचा जन्म हाच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रयोग होता. याशिवाय कॅलिफोर्निया विद्यापीठात काम करण्याचा अजून एक फायदा होता. तेथील लॉरेन्स बार्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये तिला ॲक्सेस मिळणार होता. तिथे प्रचंड ताकतीचा एक्सरे बीम तयार करणारी मशीन वापरण्यास मिळणार होती.

२००५ साली जीलियन बँफिल्ड हीने मदतीसाठी जेनिफरला कॉल केला. हा कॉल जेनिफरचे आयुष्य बदलणारा होता आणि तिच्यासाठी नवीन क्षेत्र खुले करून देणारा... जीलियनला कॅलिफोर्नियामधील एका खाणीमध्ये अतिशय तीव्र आम्लयुक्त पाण्यामध्ये जगणारे काही जीवाणू सापडले होते. या तीव्र आम्लतेमध्ये स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी या जीवाणूच्या RNA मध्ये काही बदल झाले होते. या बदलाला क्रिस्पर असे म्हणतात. RNAi बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तिने गुगल सर्च केले असता जेनिफरचे नाव तिला सर्वात प्रथम दिसले. संपर्क क्रमांक मिळवून तिने जेनिफरची मदत मागितली होती. 

क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेस्ड शॉर्ट पॅलिनड्रॉमिक रिपिटस् या शब्दाचा शॉर्टफॉर्म म्हणजे क्रिस्पर. जीवाणूवर जेव्हा एखाद्या  विषाणूचा हल्ला होतो तेव्हा स्वसंरक्षणार्थ जीवाणू मध्ये प्रतिकारशक्ती तयार होते जीच्या साह्याने तो विषाणूला हरवतो. या प्रतिकारशक्तीला क्रिस्पर हे नाव देण्यात आले आहे. क्रिस्पर क्षेत्रात असा योगायोगाने जेनिफरचा प्रवेश झाला. २००९ मध्ये दोन महिने सुट्टी घेऊन जेनीने इतर सर्व अर्धवट कामे लाइनअप केली. आणि आता यापुढे ती केवळ क्रिस्परवरच काम करणार होती. त्याचा उपयोग करून मानवी रोगांवर उपचार करता येईल का हे तपासणार होती.
मार्च २०११ मध्ये एका सूक्ष्मजीवशास्त्र परिषदेमध्ये तिची भेट इमॅन्युएल चार्पेंटिअर या फ्रेंच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञेशी झाली. इमॅन्युएल यांना Cas9 नावाचे एक विकर (एंझाइम) याचा क्रिस्परशी असलेला संबंध निदर्शनाला आला होता. थोड्याशा गप्पा मारल्या आणि त्या दोघींची मने जुळली. इमॅन्युएलच्या संशोधनामध्ये सहभाग घेण्याचे जेनिफरने मान्य केले आणि तिच्याकडचा संशोधक मार्टिन जिनेक याला फ्रान्सला पाठवले. पुढील काळात दोघींमध्ये अनेक संशोधकांची देवाणघेवाण झाली. जेलीफिश जनुकावर यशस्वी प्रयोग झाले, २०१२ मधे त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. आता गायडेड RNA चा वापर करून जनुकांमध्ये बदल करणे, खराब जनुके कापून नवीन जनुके रिप्लेस करणे इत्यादी कामाला लागणाऱ्या वेळात प्रचंड बचत झाली होती. 

‘Cas9’ हे  विकर जनुकांला आवश्यक त्या ठिकाणी तोडू शकतो. मात्र मानवी शरीरात हजारो जनुके असतात. त्यामुळे ज्या जनुकावर काम करायचे आहे, तिथपर्यंत पोचवण्याची जबाबदारी गाईडेड RNA घेत असतो. सिनेमात नाही का एक खबरी असतो तो फक्त कुणाला मारायचे हे खुणावतो आणि त्यानंतर शूटर गोळी घालतो.. अगदी तसे.😉  गाईडेड RNA आणि Cas9 ची मोट एकत्र बांधून Cas9 कॉम्प्लेक्स तयार करतात.  आणि त्यानंतर सुरू होतो Ctrl A, Ctrl F, replace चा खेळ. गाईडेड RNA शी समरूप जनुकीय क्रम सापडला की लगेच Cas9 ची कात्री चालते.  जनुकामध्ये दुहेरी कट मारला जातो. पेशीमध्ये ऑटो रिपेअर यंत्रणा असतेच. जनुक स्वत:ला जोडण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हाच नवीन भाग बसवला जातो. आणि हे सगळे होत असते अगदी सूक्ष्मातील सूक्ष्म पातळीवर.😍😍
नाही समजले तरी टेंशन घेऊ नका.. एवढे लक्षात घ्या की आता क्रिस्पर-Cas9 तंत्रज्ञान आले असल्याने जनुकीय बदल करणे हे संगणक वापरताना आपण करतो त्या ‘कॉपी-पेस्ट’ एवढ्या सोप्या पातळीवर आले आहे. आता  सिस्टिक फायब्रोसिस, सिकल सेल,  अॅनिमिया यांसारख्या अनुवंशिक व्याधीवर उपचार करणे शक्य झाले आहे. भविष्यात कर्करोग, यकृत-विकार, अनुवांशिक स्नायू-विकार यावर इलाज करता येईल. आपला मच्छर खूप त्रास देतात ना. नुसतेच चावत नाहीत तर त्यासोबत रोग सुद्धा देतात.  हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया यासारखे अनेक आजार डासापासून होतात. भविष्यात हे डास आपल्याला चावतील पण ते आजार देऊ शकणार नाही, कारण त्यांच्यामध्ये जनुकीय बदल केले असतील. 😂😂

जनुकीय कात्री शोध खूपच आमूलाग्र होता आणि अर्थातच खूप सारे पैसे मिळवून देणारा देखील. मात्र त्यासाठी पेटंट घेणे गरजेचे असते. इथे एक गंमत झाली शोध लावला होता जेनिफरच्या कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले या संस्थेने, त्यांनी पेटंटसाठी अर्ज करण्याच्या आत याच विषयावर अमेरिकेच्याच ब्रॉड इन्स्टिट्यूटमधील झांग या संशोधकाने संशोधन पेटंट दाखल केले, त्यांना पेटंट मंजूर देखील झाले आणि सुरु झाला न्यायालयीन लढा. ब्रॉड इन्स्टिट्यूटचा अर्ज आधी आला असल्याने निकाल त्यांच्या बाजूने लागला. युरोपात मात्र यासंदर्भातचे पेटंटची हक्क जेनिफरच्या संस्थेला मिळाले आहेत.
सजीवामधील जनुक क्रमवारीत बदल घडल्याने नवीन गुणधर्माचा उगम होऊ शकतो, जूना गुणधर्म नष्ट होऊ शकतो. आजवर पृथ्वीवर झालेली उत्क्रांती आणि पन्नास लाखांपेक्षा जास्त प्रजाती हे त्याचेच प्रतीक आहे. यालाच म्युटेशन असे म्हणतात. आता निसर्गाची ही निवड नाकारून त्यात मानवी हस्तक्षेप शक्य झाला. थोडक्यात हे तंत्रज्ञान निसर्गावर अतिक्रमण आहे असे देखील काही लोक म्हणतात. हिटलरसारखी वर्णांध, धर्मांध दहशतवादी लोक असतील तर अशा तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो. स्वतः जेनिफर या संशोधनाच्या प्रायोगिक वापराबाबत साशंक होती. याचा वापर लगेच करण्यात येऊ नये असेच मत तिने आधी मांडले होते. स्वप्नांमध्ये हिटलर येऊन तिला वाईट कामांसाठी हे तंत्रज्ञान वापरायला बळजबरी करत आहे असे स्वप्न देखील तिला खूप वेळा पडले होते. मात्र जेव्हा तिला अनुवंशिक त्रास असलेल्या मुलांच्या मातांची पत्रे यायला लागली, त्यावेळेस तिचे याबाबतचे मत बदलले. आणि या तंत्रज्ञानाचा वापर व्हावा याचे ती समर्थन करू लागली.

यावर्षी जेनिफर आणि इमॅन्युएल यांना नोबेल पुरस्कार मिळाला. मात्र त्याच्या आधीही तिला शेकडो पुरस्कार मिळाले आहेत. जेव्हा जेनिफरला तिच्या यशाबाबत विचारले जाते तेव्हा ती म्हणते "मला नेहमी चांगल्या प्रयोगशाळा मिळाल्या, तसेच माझ्या श्रेयामध्ये सहकारी आणि प्रयोगशाळेचे व्यवस्थापक  यांचा मोठा वाटा आहे.जेनिफर ही केवळ संशोधिका नसून एक उद्योगपती देखील आहे. क्रिस्पर तंत्रज्ञानाचा व्यापारी उपयोग करण्यासाठी तिने कॅरिब्यू नावाची संस्था काढली आहे. याशिवाय जेनिफर कार्यकारी संचालक असलेली जिनोमिक्स इन्स्टिट्यूट ही कोरोना काळात कोविड टेस्टिंग साठी महत्त्वाची मानली जात आहे. कोविड टेस्टिंगसाठी आपण वापरत असलेल्या qRT-PCR पेक्षा स्वस्त आणि जलद रिझल्ट देण्यासाठी तिने क्रिस्पर तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
जेमी आणि जेनीचा संसार सुखाचा चालू आहे. अँड्र्यू आता टीनेजर आहे. दुपारी वेळ मिळेल तेव्हा फुलांशी, ब्लू बेरीशी आणि आणि त्यावर येणाऱ्या मधमाश्याशी गप्पा मारायला जेनिफरला आवडते. जेनीला स्वयंपाकाची आवड आहे. आई पती आणि मुलगा यांच्यासोबत प्रवास करायला देखील जेनीला खूप आवडते. मातृ नोबेल मिळाल्यापासून तिथे सर्व शेडूल बिझी झाले आहे. आता ना मुलासोबत झू मध्ये जायला मिळते, ना त्याचा अभ्यास घ्यायला वेळ मिळतो. आज इथे तर उद्या तिथे, व्याख्यानांची प्रचंड मागणी.. आणि विज्ञानाच्या प्रेमामुळे जेनिफर त्यांना नाही म्हणू शकत नाही.❤️ या सर्वांमध्ये तिचे संशोधनाकडे लक्ष आहेच. विज्ञानामध्ये अजून मोलाची भर घालण्यात भविष्यात जेनिफर नक्कीच यशस्वी होईल.

आपल्याकडे जशी JNU, जामिया मिलिया मध्ये शासनपुरस्कृत दंगल झाली, अगदी तशीच जेनिफर काम करत असलेल्या कॅलिफोर्निया विद्यापीठात २०१७ साली झाली होती. ट्रंप समर्थक आणि विरोधक एकमेकांना भिडले. याचा मुद्दा करून ट्रम्प यांनी "संस्था जर निष्पाप युवकांचा ( म्हणजे ट्रम्प समर्थक 😂) आवाज बंद करायला हिंसेचा वापर करेल तर  विद्यापीठाला सरकारी फंडिंग द्यायचे बंद करेल" अशी धमकी ट्विटर वरून दिली होती. गोंधळ घालणारे तेच, हिंसा करणारे पण तेच आणि धमकी द्यायला पण तेच. ३८००० विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले होते.. जेनिफरने इथे उघडपणे राष्ट्राध्यक्ष विरोधी भूमिका घेतली होती.  शिक्षण कशाशी खातात हे माहीत नसलेले राष्ट्रप्रमुख.. मतदारांनीच तेव्हा निवडून दिलेले आणि आता घरी बसवलेले... विज्ञानाचा विजय व्हायचा असेल तर सत्तेवर विज्ञानाची जोपासना करणारे हवेत.. संविधानाची जोपासना करणारे हवेत. 

जय विज्ञान जय संविधान✊🏾✊🏾

#richyabhau
#जेनिफर_ डॉडना

आपला ब्लॉग : https://richyabhau.blogspot.com/

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव