जयंत नारळीकर ; गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, साहित्यिक आणि बरेच काही ❤️


जयंत नारळीकर ; गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, साहित्यिक आणि बरेच काही ❤️


विज्ञानकथा मराठी भाषेमध्ये आणून लोकप्रिय करणारे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना या वर्षी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळणार आहे, ही बाब विज्ञानाविषयी लिहिणाऱ्या सर्व लेखकांसाठी सन्मानजनक आहे. जयंत नारळीकर हे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ.. त्यांनी संशोधनासोबत साहित्याची देखील सेवा अतिशय जिव्हाळ्याने केली आहे. मराठी वाचकांत विज्ञानाची आवड रुजवण्यामध्ये नारळीकर यांच्या विज्ञानकथांचा खूप मोठा वाटा आहे. विज्ञानकथा लिहिणं हा खूपच अवघड विषय... कारण एकाच वेळेस तुम्हाला विज्ञान आणि कल्पनाशक्ती यांची सांगड घालावी लागते. आजच्या विज्ञान कथामधून भविष्यातील विज्ञान जन्म घेत असते असे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. जयंत नारळीकर यांचे संमेलनाध्यक्षपद म्हणजे साहित्याचा हा विज्ञानाच्या दिशेने होणारा प्रवास खूप दिलासा देणारा... 

विज्ञान समजून घ्यायला त्या व्यक्तीची मातृभाषाच सर्वात उत्तम पर्याय असतो. इंग्रजीत जेव्हा एखादी माहिती मिळते तेव्हा मेंदू प्रथम त्याचे रूपांतर मायबोलीमध्ये करतो आणि समजून घेतो. वेळ आणि परिश्रम दोन्हींचा अपव्यय.. सदर ज्ञान मातृभाषेत उपलब्ध असल्यास जास्त सहजगत्या आत्मसात होते असे नारळीकर म्हणायचे.. मराठी भाषा ही नारळीकर यांच्यासाठी पावित्र्याची नाही तर जिव्हाळ्याची बाब आहे. त्यामुळे त्यांच्या कथेत इंग्रजी शब्दाऐवजी अट्टाहासी मराठी शब्द वापरायचा द्राविडी प्राणायाम त्यांना करावा लागला नाही. भाषेच्या सहजतेमुळे त्यांचे लिखाण वाचले गेले, आणि विज्ञानकथा हा साहित्य प्रकार मराठीत लोकप्रिय झाला. मराठी साहित्याचे विश्व खऱ्या अर्थाने विस्तारणारी व्यक्ती साहित्य संमेलनाची अध्यक्ष झाली आहे याचा अगदी "दिलसे" आनंद झाला आहे.❤️

‘चार नगरांतील माझे विश्व’ या जयंत नारळीकर यांच्या आत्मवृत्ताला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. या पुस्तकात त्यांची जडणघडण कशी झाली हे समजून घेता येते. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूरात झाला. विद्वत्ता ही जणू त्यांच्या घरामध्ये पाणी भरत होती. मोठा जयंत आणि छोटा अनंत असे आटोपशीर कुटुंब. आई सुमती संस्कृत भाषेमधील पंडिता. तसेच एसराज या वाद्यावर त्यांची हुकूमत. (एसराज म्हणजे काय पाहायचे असेल तर सत्येंद्रनाथ बोस यांची पोस्ट पहा.) प्रसिद्ध सांख्यिकी विजय शंकर हुजुरबाजार हे जयंतरावांचे मामा.

जयंत आणि अनंत दोघे आईला ताई म्हणायचे आणि वडिलांना तात्या. रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ. रँग्लर ही पदवी लयं मोठी. केंब्रिज विद्यापीठामध्ये दरवर्षी गणित विषयात पहिल्या वर्गात पास होणारे रँग्लर म्हणवले जातात. जयंतराव आणि त्यांचे वडील हे दोघे पण रँग्लर.❤️ वि.वा. नारळीकर खूपच हुशार. वि.वा यांचे आईन्स्टाईनने मांडलेल्या सापेक्षतावाद सिद्धांतावर प्रभुत्व होते. त्यांनी १९२८ साली BSc मध्ये ९६% मार्क पाडले होते 😇 त्यांना केंब्रिजमध्ये पुढील शिक्षण घेण्यासाठी जे एन टाटा स्कॉलरशिप मिळाली. त्यांची हुशारी पाहून कोल्हापूर संस्थानाने त्यांना इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेण्यासाठी मदत केली, परत आल्यावर संस्थानात नोकरी करायची या अटीवर.

कोल्हापूरच्या जवळील “पाचगाव” हे नारळीकर यांचे मुळगाव. जयंतरावांचे आजोबा वासुदेवशास्त्री भिक्षुकी करून पोट भरत होते. मात्र वि.वा. यांनी घराण्याचे नाव रोशन केले. घराण्याच्या नावाची पण एक मजा आहे. त्यांच्या घरी असलेल्या आंब्याच्या झाडाला म्हणे नारळाएवढे आंबे लागत.. म्हणून यांचे नाव नारळीकर. अशी दंतकथा लहानपणापासून ऐकली असल्याचे जयंतराव सांगतात,  मात्र त्यांनी कधी ते झाड पाहिलेले नाही. त्यांचा जन्म जरी कोल्हापूरच्या रांगड्या मातीत झाला असला तरी त्यांचे कुटुंब वाराणसी येथे स्थलांतरित झाले होते. रँग्लर वि. वा. नारळीकर यांना बनारस हिंदू विद्यापीठात गणित विभागप्रमुख पदी निमंत्रित करण्यात आले होते. कोल्हापूर संस्थानाने दिलेली रक्कम परत करून वि. वा. १९३२ मध्ये वाराणसी येथे स्थाईक झाले होते. 

घरात मोठ्या माणसांचा राबता. विनोबा भावे ते गोळवळकर गुरुजी अशी दोन ध्रुवावरील माणसे त्यांच्या घरी यायची. (दाढी ही एकच सामाईक बाब असावी त्यांच्यात 😉 जसे रविंद्रनाथ टागोर आणि आपल्या भाऊमध्ये आहे😭 भाऊचे नाव सांगायला नको ना😉) सी. डी. देशमुख यांच्यासारखा अर्थतज्ञ असो वा सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारखा शिक्षणतज्ञ..  दीनानाथ दलाल यांच्यासारख्या जगप्रसिद्ध चित्रकार असो वा पु. ल. देशपांडे यांच्या सारखा हरफनमौला... तुकडोजी महाराज असो वा रँग्लर परांजपे (पहिले भारतीय रँग्लर) कोणतीही महत्त्वाची मराठी व्यक्ती वाराणसीमध्ये आली तर नारळीकर कुटुंबाकडे त्यांचे जेवण ठरलेले असे. रँग्लर परांजपे यांची मुलगी शकुंतला, नात सई परांजपे (होय त्याच.. सुप्रसिद्ध दिग्दर्शिका.. जयंतराव आणि त्या समवयस्क) यांचे देखील येणेजाने होते. जयंत नारळीकर यांचा ८० वा वाढदिवस आयुकामध्ये साजरा झाला तेव्हा सईने त्यांच्या सन्मानार्थ त्यांचाच एका विज्ञानकथेवर एक नाटक बसवून सादर केले होते. 
लहानपणी आई जयंत, अनंत यांना गणिताची कोडी घालत असे.. त्यामुळे त्यांना गणित आवडायला लागले. आई दोघांना रोज झोपण्यापूर्वी इंग्रजी, मराठी मधील नामांकित लेखकांच्या गोष्टी क्रमशः भागात सांगत असे. मात्र उत्सुकता ताणली गेली की पोरं थोडीच २४ तास वाट पाहणार..  सकाळी उठल्यावर पुस्तक हाती घेणे आणि गोष्टीचा फडशा पाडणे. यातूनच जयंतरावांना वाचनाची आवड लागली. ( 😇 पोरांना पुस्तक वाच म्हणले की वाचत नाहीत.. त्यापेक्षा ही आयडिया भारी आहे राव, ट्राय केली पाहिजे आपण पण.. 😀) सुमतीबाई यांचा भाऊ मोरेश्वर हुजुरबाजार हा एमएससी करण्यासाठी वाराणसी येथे नारळीकर कुटुंबात तीन वर्ष राहिला होता. तेव्हा घरातील फळ्यावर रोज मोरुमामा जयंतसाठी एक गणितीय कोडे लिहून ठेवायचा.. जोवर ते सुटत नाही तोवर जयंतला चैन पडायची नाही. त्यामुळे शाळेतील गणिताचा अभ्यास आधीच झालेला असायचा. ❤️

जयंत आणि अनंतचे शिक्षण वाराणसी येथे हिंदी माध्यमात सुरू झाले, हिंदी ही रोजची व्यवहार भाषा.. घरात मराठी भाषा बोलली जायची, मराठी पाहुण्यांची वर्दळ, वर्षा दोनवर्षाने सुटीमध्ये महाराष्ट्र भेट व्हायची.. त्यामुळे मराठी एकदम पक्की. इंग्रजी पुस्तकातील गोष्टी वाचूनवाचून या भाषेची पण तयारी, तर सकाळ-संध्याकाळ संस्कृत श्लोकांचे पाठांतर.. जयंतराव लहानपणीच बहुभाषिक झाले. एका रात्री सर्वपल्ली राधाकृष्णन जेवायला आले असताना या दोघा भावांनी शंकराचार्यांचे दशश्लोकी स्तोत्र सादर करायचा प्रयोग केला. एका खोलीत बसून पेटीच्या साथीवर हे दोघे गात आहेत.. आणि बाहेर लॉनमध्ये बसलेली मंडळी गप्पा मारणे थांबवून हे ऐकत आहेत.. त्यांना वाटले की गाणे आकाशवाणीवर सुरू आहे. स्तोत्र संपल्यावर त्यांना समजले की अरे ही तर या दोघा भावांनी केलेली गुगली आहे. दोघांचे गाण्याचे, पठणाचे आणि उच्चारांचे खूप कौतुक झाले. प्रयोग प्रचंड यशस्वी. 😍

रस्त्यावर डोंबार्याचा पायाला काठी बांधून चालण्याचा खेळ पाहिला. घरी तसेच करायचा प्रयत्न. आणि विशेष म्हणजे त्याला ताई तात्यांचे प्रोत्साहन आणि सहाय्य. दोन्ही पोर पायांना काठी बांधून चालायला लवकरच शिकली देखील. अर्थात लहानपणी अनेक अयशस्वी प्रयोग देखील केले आहेत. गाद्यांवर उड्या मारताना एकदा अंदाज चुकला, आणि उडी थेट पलीकडल्या काचेच्या कपाटावर.. तेव्हा घुसलेल्या काचेचा व्रण आजही जयंतरावांच्या पायावर आहे. त्यासोबत बालपणातील अजून एका घटनेची आठवण त्यांच्या हृदयावर कोरली आहे. नारायणराव व्यास हे नारळीकर कुटुंबाचे स्नेही. त्यांचे नेहमी येणेजाणे. दररोज लाड करणारे व्यासमामा एकदिवस वेगळ्या मूडमध्ये होते. जयंत आणि अनंत दोघांना बोलून सांगितले की तुम्ही दोघे खूप आयदी आहात.. सगळे आयते पाहिजे तुम्हाला.. घरातले काहीच काम करत नाही. अभ्यास करताना देखील दिसत नाही. 

कधीही बोलून न घेण्याची सवय असलेले जयंत, अनंत या गोष्टीने खूपच नाराज झाले. व्यासमामा तेवढ्याने थांबले नाहीत तर त्यांनी वि. वा. आणि सुमतीबाई यांचीदेखील हजेरी घेतली. तुम्ही मुलांना धाक लावत नाही अशी तक्रार केली. वि.वा. म्हणाले "हे दोघे शाळेमध्ये कायम वरचा नंबर काढतात त्यामुळे कधी बोलायची गरज पडली नाही." व्यासमामा म्हणाले "आता अभ्यास सोपा आहे म्हणून ठीक पण कष्ट करायची सवय लागली पाहिजे." झाले... तात्यांचा खटका पडला आणि रोज पहाटे उठून चार तास अभ्यास करायचे फर्मान काढले गेले. दोघा भावांनी तेव्हा मामाचा किती उदोउदो केला असेल काय माहित..😂 पण हीच अभ्यासाची सवय जयंत, अनंत यांना जीवनात यशस्वी करून गेली. जयंतराव आज व्यासमामांबाबत कृतज्ञता व्यक्त करतात❤️

मॅट्रिक परीक्षेत घवघवीत यश मिळवून जयंतराव उत्तीर्ण झाले, मात्र त्यांच्यापुढे एक प्रश्न उभा राहिला. गणित विज्ञानासोबत संस्कृतची आवड होती, सर्वच विषयात चांगले मार्क होते. पण मॅट्रिकच्या पुढे संस्कृत आणि विज्ञान हे दोन्ही विषय एकत्र घेता येत नाहीत. एकतर आर्ट्स घ्या किंवा सायन्स. ( आपल्याकडे लयच बंधन.. बाहेर देशात तसे नाही. जेनिफर डॉडनाने बायोकेमिस्ट्री विषय घेऊन आर्टसची पदवी मिळवली होती) नारळीकर म्हणतात “अशी विभागणी चुकीची आहे. आजच्या स्थितीत कला शाखेचा विज्ञान शाखेशी संवादच उरत नाही, म्हणून उपविषय निवडणे ऐच्छिक असावे.”👍

बनारसमध्येच महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाले. घरात वडील वैज्ञानिक असल्याने कोणत्याही संकल्पनेचा शेवटपर्यंत पिच्छा करायची सवय लागली. अनेक दिग्गज शास्त्रज्ञांची व्याख्याने विद्यापीठात आयोजित केली जात होती. बुद्धीला नवी क्षितिजे खुणावत होती. १९५७ साली बी.एसस्सी. च्या परीक्षेमध्ये अभूतपूर्व, उच्चांकी गुण प्राप्त करून जयंतराव विद्यापीठात पहिले आले. वडीलांप्रमाणे जयंतरावांना देखील टाटा स्कॉलरशिप मिळाली आणि त्यांनी केंब्रिज विद्यापीठात जाण्यासाठी बोट पकडली. 
केंब्रिज येथे त्यांनी बीए, एमए व पीएचडी या सर्व पदव्या मिळवल्या. शिवाय, रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार व इतर अनेक बक्षिसे मिळाली. रँग्लरची परीक्षा लयं भारी. परीक्षार्थी विद्यार्थ्याने जीव मुठीत घेऊन हॉलच्या मध्यभागी ठेवलेल्या स्टूलावर बसायचे ( या ट्रायपॉडमुळे ही परीक्षा ‘ट्रायपॉस’ परीक्षा या नावाने देखील ओळखली जाते.) समोर प्रश्नांची फेरी झाडायला प्राध्यापकांची फौज. चहू बाजूंनी हल्ला करून बिचाऱ्या विद्यार्थ्याला जेरीस आणणारी.. विद्यार्थ्याच्या ज्ञानाची खरी कसोटी पाहिली जाते. या परीक्षेत जो टिकला तोच जिंकला.  १९५९ मध्ये बी ए  (ट्रायपॉस) परीक्षेच्या वेळी जयंतराव अपघातग्रस्त होते. पायाला प्लास्टर.. मात्र त्यांनी सर्व प्राध्यापकांना अशी उत्तरे दिली की त्या परीक्षेत जयंतराव सर्वात पहिले आले. म्हणजे सिनियर रँग्लर झाले. बापसे बेटा सवाई.❤️  

स्टीफन हॉकिंग आणि नारळीकर दोघे एकाच वेळी केंब्रिज विद्यापीठात विद्यार्थी होते. जयंतरावांच्या एक दोन वर्षं मागे होता स्टीफन. त्यांची भेट स्टीफन केंब्रिजमध्ये यायच्या आधीच झाली. १९६१ मध्ये इंग्लंडमधल्या रॉयल ग्रीनिच ऑब्झर्व्हेटरीने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विज्ञान परिषदेमध्ये जयंतराव व्याख्यान देत होते. तेव्हा ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून आलेल्या स्टीफनने सर्वात जास्त प्रश्न विचारले होते. याच विज्ञान परिषदेत दोघांनी टेबलटेनिसचा एक सामना देखील खेळला ज्यात जयंतराव विजयी झाले होते.(तेव्हा स्टीफनचा आजार जास्त बळावला नव्हता) स्टीफनची आठवण सांगताना जयंतराव म्हणतात "विद्यार्थीदशेत असलेला स्टीफन पाहता तो नंतर एवढे मोलाचे संशोधन करेल असे वाटले नव्हते. तेव्हा तो अगदी सामान्य विद्यार्थी होता. त्याने त्याच्यामधले ' बेस्ट ' नंतर बाहेर काढले."  १९६६ साली नारळीकर यांना ऍडम पारितोषिक मिळाले. स्टीफन हॉकिंग, रॉजर पेनरोज यांच्यासोबत विभागून. खुद्द स्टीफन हॉकिंग यांनी फोन करून नारळीकर यांना ही बातमी दिली होती. गणितात मिळणारी टायसन, स्मिथ आणि ऍडम अशी तीनही बक्षिसे नारळीकरांनी पटकावली. 

एम ए करत असताना जयंतरावांनी सन १९६० मध्ये खगोलशास्त्रसाठी असलेले टायसन पारितोषिक मिळवले. तर पीएचडी करताना सन १९६२ मध्ये स्मिथ पारितोषिक देखील पटकावले. १९६३ साली पीएचडी पूर्ण केली. पीएचडी करताना जयंत नारळीकर यांना सर फ्रेड हॉएल यांचे मार्गदर्शन लाभले. हॉएल हे संशोधनातील मोठे नाव. आइन्स्टाइनने मांडणी केलेला बिगबँग सिद्धांतातील त्रुटी काढून दाखवणारा हा शास्त्रज्ञ. अनेक वर्ष बिगबँग समर्थक आणि हॉएल यांच्यात वादाच्या फेरी होत होत्या.. कधी या गटाची तर कधी त्या गटाची सरशी होत होती. नारळीकर यांनी सर फ्रेड हॉएल मात्र यांच्यासोबत "कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी" मांडली. आणि या वादावर पडदा पडला.
आइन्स्टाइन म्हणतो की विश्व विस्तारत आहे. आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी त्याने प्रसंगी सिद्धांताला स्थिरांकाचे ठिगळ देखील लावले आहे. तरीही ताऱ्यांच्या जन्माचे गणन करताना काही गणितीय त्रुटी राहून जातात. यावर  हॉएलने आक्षेप घेतले. मात्र नारळीकर आणि हॉएल यांनी संशोधन केले असता असे लक्षात आले की विश्व वेळो वेळी प्रसरण देखील पावते, आणि आकुंचन देखील. (पुढे हबल दुर्बिणीने घेतलेल्या छायाचित्रांवरून हे सिद्ध देखील झाले.) हा शोध खूप महत्त्वाचा होता. एका भारतीय शास्त्रज्ञाने आइन्स्टाइनवर मात केली ही बाब "१६ वर्ष वयाच्या देशासाठी" खूप महत्त्वाची होती. (देशाला स्वातंत्र्य मिळून जेमतेम १६ वर्ष झाली होती.) भारत सरकारने त्यांना पद्मभूषण जाहीर केला. १९६५ साली जेव्हा ते काही महिन्यासाठी भारतात आले तेव्हा त्यांना बघायला तोबा गर्दी.. जयंत नारळीकर हे खूप मोठे स्टार झाले होते.. लालबहाद्दूर शास्त्रींनी देखील त्यांना आश्वासन दिले की तुम्हाला जेव्हा भारतात कायमचे परत यावे असे वाटेल तेव्हा मला सांगा.. तुम्ही म्हणाल त्या संस्थेत तुम्हाला नोकरी मिळेल. 
पीएच.डी. झाल्यावर जयंतरावांना भारतामध्ये लगेच येता आले नाही. पुढील शिक्षणासाठी फेलोशिप मिळत होती. शिवाय फ्रेड हॉएल यांनी इन्स्टिटय़ूट ऑफ थिअरॉटिकल अॅस्ट्रोनॉमी सुरू केली होती. तेथे किमान पहिली पाच वर्षे जयंतरावांनी काम करावे, आणि संस्थेची घडी बसवून द्यावी अशी हॉएलची इच्छा होती. जयंतरावांनी गुरूचा शब्द पडू दिला नाही. पाच वर्षे त्यांनी या संस्थेला दिली. त्या संस्थेचे मंगल झाले... आणि याच काळात जयंतरावांचे पण मंगलम झाले. मंगल राजवाडे या गणितज्ञ मुलीशी लग्न. ❤️ मंगला नारळीकर.. जयंत नारळीकर यांची बेटर हाफ.. अगदी अक्षरशः. त्यांची थोडी माहिती घेतल्याशिवाय पुढे जायला काहीच मजा नाही.

मंगला राजवाडे.. गणित विषय घेऊन एमए करताना मुंबई विद्यापीठात सुवर्णपदक पटकावून पहिली आलेली. जयंत नारळीकर यांच्याशी लग्न झाले, आणि त्या केंब्रिजमध्ये गेल्या. तीन वर्ष तिथे शिकवले. नंतर कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना अध्यापनकार्यास काहीसा विराम दिला. या गणिती जोडप्याला तीन मुली झाल्या. कुटुंब भारतात परतले आणि पुढे सहा वर्षे त्यांनी TIFR मध्ये शिकवले. १९८१ मध्ये.. म्हणजे लग्नानंतर १६ वर्षांनी पीएचडी पूर्ण केली. त्यांनी भरपूर लेखन केले आहे. ’नभात हसते तारे’ हे पुस्तक नारळीकर दांपत्याने मिळून लिहिले आहे. पाहिलेले देश भेटलेली माणसं, दोस्ती गणिताशी यासारखी अनेक पुस्तके मंगलाबाई यांनी लिहिली आहेत. करियर आणि कुटुंब याच्यात समतोल साधताना मंगलाबाईंना कुटुंबाला अधिक प्राधान्य द्यावे लागले. 
नारळीकर कुटुंबाने जेव्हा ठरवले की आता भारतात परतावे, तेव्हा शास्त्री कालवश झाले होते. जयंतरावांनी इंदिरा गांधी यांना पत्र पाठवले, शास्त्री यांच्यासोबत झालेल्या बोलण्याचा संदर्भ दिला. इंदिरा गांधी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद आला. "तुम्ही कुठे काम करू इच्छिता" अशी विचारणा झाली. टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) मध्ये काम करण्याची इच्छा नारळीकर यांनी व्यक्त केली अन् ती पूर्ण झाली देखील. नारळीकर कुटुंब मुंबईला टाटा संस्थेत दाखल झाले. आता मुलींना शाळेत टाकायचे होते. सोबत काम करणाऱ्या शास्त्रज्ञांची मुले महागड्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जात होती मात्र नारळीकरांनी त्यांच्या तिन्ही मुलींसाठी केंद्रीय विद्यालयामध्ये प्रवेश घेतला. 
गणित, विज्ञान वा भाषा यांचे मूलभूत आकलन होण्यासाठी, माणसाचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेत वा तिच्या जवळच्या भाषेत झाले पाहिजे, ही त्यामागची भूमिका. मुलींना कुठला कोचिंग क्लास देखील लावला नाही. स्वतः अभ्यासातून स्वतला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मुलींनी शोधली पाहिजेत. घरात अभ्यासाची सक्ती नाही. "घोड्यांच्या शर्यतीमध्ये  जिंकल्यावर घोडा कधीच खुश होत नसतो, खुश फक्त जॉकी होत असतो. मुलांच्या बाबतीत देखील हेच लागू होते" असे नारळीकर दांपत्य मानायचे. मुलींना घरांमध्ये केवळ विनोद सांगायची सक्ती. रोज जेवायला बसले सगळे की सगळ्यांनी जोक सांगायचेच. भारी ना❤️ तिन्ही मुली मोठ्या होऊन संशोधन क्षेत्रामध्ये यशस्वी झाल्या आहेत. "गीता नारळीकर" या कॅलिफोर्निया विद्यापीठात जीवरसायनशास्त्र आणि जीवभौतिकी याच्या प्राध्यापिका आहेत. "गिरिजा नारळीकर" या मेलोन यूनिवर्सिटी मध्ये संशोधिका आहेत. "लीलावती नारळीकर" या पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथे संशोधिका म्हणून कार्यरत आहेत.
१९८८ मध्ये जेव्हा पुण्यात आयुका स्थापन करायचे ठरले, तेव्हा प्रा. यशपाल यांनी जयंत नारळीकर यांना बोलावले. आयुका आज संशोधन क्षेत्रात अतिशय मोलाची कामगिरी करत आहे, यात जयंत नारळीकर यांच्या दूरदृष्टी आणि कुशल व्यवस्थापनाचा खूप मोठा आहे. नासाच्या हबल दुर्बिणीपेक्षा कमी क्षमतीची दुर्बीण आयुकाकडे असली तरी नासाच्या शास्त्रज्ञांना शक्य झाले नाही, अश्या अनेक बाबी आपले भारतीय शास्त्रज्ञ आयुकामध्ये करून दाखवत आहेत. आयुका केवळ संशोधन कार्य करत नाही तर सामान्य जनतेत विज्ञान रुजविण्याचे काम देखील करते. जगभरातील दिग्गज शास्त्रज्ञांना ऐकण्याची संधी तिथे उपलब्ध करून दिली जाते. २८ फेब्रुवारी, राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणजे आयुका मधील जत्राच. अनेक कार्यक्रमाचे, व्याख्यानांचे दिवसभराचे नियोजन असते.

पृथ्वी वर जीवन परग्रहावरून आलेल्या सूक्ष्म जीवांपासून सुरू झाले असेल असे एक गृहितक शेकडो वर्षापासून मांडण्यात येत आहे. हॉएल आणि विक्रमसिंघे या शास्त्रज्ञांनी देखील या गृहितकाचे समर्थन केले. हे गृहितक पडताळून पाहण्याचा प्रयोग नारळीकर यांच्या नेतृत्वाखाली आयुकाच्या टीमने हैदराबाद येथे जानेवारी २००१ मध्येे पृथ्वीच्या वातावरणात ४० किलोमीटर (मराठी मध्ये २०. ते ५० किमी पर्यंतच्या पट्ट्याला स्थितांबर म्हणतात) उंचीपर्यंत फुगे सोडण्यात आले. २००५ मध्ये देखील पुन्हा एकदा हा प्रयोग करण्यात आला. या स्थितांबरात पृथ्वीवर न आढळणारे सूक्ष्मजीव आढळून आले आहेत. या फुग्यांवर विविध उपकरणे जोडली होती. त्या उपकरणांनी जी निरीक्षणे नोंदवली त्यातून आलेल्या निष्कर्ष गृहितकाची पुष्टी करत असले तरी नारळीकर यांच्या मते त्यावर अधिक संशोधनाची गरज आहे.
जयंतराव लेखनाकडे कसे वळले त्याचा एक गमतीशीर किस्सा आहे. मराठी विज्ञान परिषदेने विज्ञानकथा लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. नारळीकरांनी गंमत म्हणून या स्पर्धेत भाग घेतला. मात्र एक जागतिक दर्जाचा शास्त्रज्ञ आणि पद्मभूषण असा आपला लौकिक इथे स्पर्धकांच्या आड येऊ नये यासाठी त्यांनी स्वतचं नाव बदलून कृष्णविवर ही कथा पाठवली.❤️ त्यांच्या नावाची आद्याक्षरे जविना यांचा क्रम उलट करून नाविज.. नारायण विनायक जगताप या नावाने ही कथा पाठवली. जेव्हा त्यांच्या कथेला पहिले बक्षीस मिळाले त्या वेळेस हा सगळा खुलासा झाला.😁

आईन्स्टाईन म्हणतो की जो व्यक्ती विषयांमध्ये तज्ञ असेल तोच विषय सोपा करून मांडू शकतो. नारळीकर यांच्या कथा, कादंबऱ्या किंवा भाषणे, मुलाखती वाचताना, ऐकताना सुद्धा त्यांचे विषयातील प्रभुत्व लक्षात येते. कारण अतिशय सोप्या भाषेत वाचकांपर्यंत विज्ञान पोचवले जाते. त्यांच्या विज्ञानकथा इज माय लब ❤️ कारण कथेमधील प्रश्न नेहमी भारतीय शास्त्रज्ञच सोडवत असतो. 😍 मात्र नारळीकर यांच्या मते विज्ञान हे एका देशासाठी मर्यादित नसते, संपूर्ण जगाचे असते. विज्ञानाची प्रगती होण्यासाठी प्रयत्न जगभरातून व्हावा आणि त्याचा फायदा देखील अखिल जगासाठी व्हावा.👍
पोस्टकार्डवरील उत्तर हा त्यांनी केलेला प्रयोग तर अगदीच अफलातून. कोणत्याही शाळकरी मुलाने त्यांना साधे पोस्टकार्ड पाठवून प्रश्न विचारावे आणि नारळीकर यांनी त्याला उत्तर द्यावे..ते ही अगदी स्वाक्षरीसह.❤️ तुम्हाला देशभरात हजारो व्यक्ती सापडतील ज्यांनी नारळीकर यांच्याकडून आलेल्या उत्तराचे पोस्टकार्ड जपून ठेवले असेल. व्याख्यानांच्या वेळी समोर जसे श्रोते असतील, त्यांना समजेल अशा भाषेत त्यांचे व्याख्यान होई.  महाविद्यालयीन काळातील त्यांच्या एका शिक्षकाचे राहणीमान आणि उच्चार खूपच गावठी होते. सहाजिकच विद्यार्थ्यांनी त्यांची खिल्ली उडवली होती. मात्र त्याच्या ज्ञानाने नंतर मुले खूप प्रभावित झाली. कपड्यावर ज्ञान ठरत नाही याचा धडा  जयंतरावांना तेव्हाच मिळाला होता. त्यामुळे आयुकाच्या संचालकपदी असताना देखील त्यांचा पोषाख शक्यतो साधा असायचा. नवीन व्यक्तीला त्यांच्याशी संवाद साधताना हाच साधेपणा उपयोगी ठरायचा.

सामाजिक परिवर्तनासाठी आग्रही असणारे नारळीकर प्रसंग आला म्हणून बोटचेपेपणाची भूमिका घेताना कधी दिसत नाहीत. १९८६ साली मंगला बाईंना कर्करोग झाल्याचे आढळून आले. मात्र या प्रसंगाने देखील त्यांची, मंगलाबाई यांची अंगीकारलेल्या तत्त्वांवरची निष्ठा ढळली नाही. वि वा नारळीकर यांनीदेखील आजार आणि दैववाद यांना एकत्र येऊ दिले नाही. झालेल्या आजाराची व्यवस्थित काळे मीमांसा केली त्यावर उपचार केले आणि मंगलाबाई त्यातून पूर्णतः बऱ्या झाल्या. आज ही जोडी जराशी थकली असली तरी सामाजिक कार्यात पूर्वीप्रमाणेच क्रियाशील आहे. 
शास्त्रज्ञ आस्तिक असो अथवा नास्तिक, मात्र त्याने चिकित्सक असले पाहिजे, विवेकी असले पाहिजे असा आग्रह नारळीकर धरतात. त्यांचा "पुराणातील विज्ञान विकासाची वांगी" हा लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे. त्यात ते म्हणतात की "क्वांटम फिजिक्स आणि अध्यात्म यांच्यात वरवर थोडे साम्य दिसत असले तरी क्वांटम फिजिक्स मधील सर्व संकल्पना गणिताच्या भाषेत मांडल्या जातात आणि त्या प्रयोगाने पडताळता देखील येतात. पुराणकथांमध्ये अनेक वैज्ञानिक शोध असल्याचा दावा केला जातो परंतु आजमितीला त्याचा पुरावा सापडत नाही हेच सत्य आहे."

अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य असो वा फलज्योतिषाचा भांडाफोड. आपल्या विनयी मात्र ठाम भूमिका त्यांनी वेळोवेळी मांडल्या आहेत. चिकित्सेचा आग्रह धरणाऱ्या जयंत नारळीकर यांनी फलज्योतिषाची चाचणी घेण्याचे आव्हान दिले होते. कुंडलीचा अभ्यास करून सदर व्यक्ती ती अभ्यासात हुशार आहे की नाही..  बस एवढेच सांगायचे होते. यासाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर करण्यात येणार होता. मात्र या चाचणीमध्ये कोणीही ज्योतिषी सफल झाला नाही. फलज्योतिष हे शास्त्र नाही हे सिद्ध झाले. आजही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यामध्ये नारळीकर यांनी घेतलेल्या चाचणी खूप बळ देणारी ठरली आहे. डॉ. लागू, निळूभाऊ फुले, पु ल देशपांडे, जयंत नारळीकर यांसारख्या वलयांकित व्यक्तींनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला वजन प्राप्त झाले आहे.
पु ल देशपांडे आणि नारळीकर यांची इंग्लंड मध्ये अचानक भेट झाली होती बरका. इंग्लंडमध्ये बागेत फिरताना मराठी शब्द कानावर पडले म्हणून नारळीकर कोण आहे हे पहायला गेले तर साक्षात पु ल आणि सुनीताबाई समोर. तेव्हा त्या दोघांना नारळीकरांनी मोठ्या आवडीने केंब्रिज विद्यापीठ दाखवले. पुढे आयुकाचे काम पाहिल्यावर, आवडल्यावर पुलं आणि सुनीताबाई यांनी आयुकाला भरघोस देणगी दिली. त्यातून लहान मुलांसाठी एक नवी इमारत निर्माण करण्यात आली. आणि कल्पक नारळीकर यांनी त्या इमारतीचे नाव "पुलस्त्य" ठेवले. पुलस्त्य हा सप्तर्षी मधील एक तारा आहे. पु ल आणि पुलस्त्य अशी छान सांगड घालण्यात आली. 

पुलंबाबत अजून एक गमतीशीर किस्सा घडला आहे. नारळीकर यांचे लग्न व्हायचे होते. वयाच्या पंचविशीत पद्मभूषण मिळालेले (माझ्या माहितीत सर्वात कमी वयाचे पद्मभूषण) नारळीकर प्रसिद्धीपासून दूर राहायचा प्रयत्न करायचे. एकदा त्यांच्या भावी सासऱ्याने पुलंच्या "वाऱ्यावरची वरात" ची तिकीटे आणली होती. मी नाटक पाहायला आलो आहे असा उल्लेख पु ल यांनी करू नये अशी जयंतरावांची इच्छा. मात्र खोडकर पुल यांनी त्यांचा उल्लेख केलाच. त्यातही अशी गुगली टाकली की आज आपल्याकडे नारळीकर उपस्थित आहेत असे म्हणून नारळीकर बसले होते त्याच्याविरुध्द बाजूला नजर टाकली. आसपासचे प्रेक्षक शोधत बसले नारळीकर कुठे आहेत. 😂

जीवनाचा भरभरून आनंद घेणारे जयंत नारळीकर अतिशय हजरजबाबी. त्यांना एकदा विचारले गेले.. "पुनर्जन्मावर तुमचा विश्वास नाही पण जर खरच पुढचा जन्म घेताना पर्याय असेल तर तुम्हाला काय व्हायला आवडेल?" नारळीकर उत्तरले "मला पुन्हा जयंत नारळीकर व्हायला आवडेल" ❤️ एकदा त्यांना विचारले, "आर्यभट्ट भास्कर ब्रह्मगुप्त ही नावे तुम्ही नेहमी वापरता. तुमच्यावर परंपरेचा पगडा आहे का?" नारळीकर म्हणाले, "या सर्वांनी सैद्धांतीक मांडणी केली होती. मात्र आर्यभटने सुरू केलेली परंपरा भास्करपर्यंतच संपली. दुर्बिणीने स्वतः तपासून पाहणाऱ्या गॅलेलिओच्या परंपरेचा मी पाईक आहे."
मी खूप लहान होतो तेव्हा यक्षाची देणगी कथासंग्रह (पहिली आवृत्ती १९७९ सालची) वडिलांनी घरी आणला होता. वडिलांना का विकत आणावा वाटला माहीत नाही.. पण मी आजवर त्याची किमान ५० वेळा तरी पारायणे केली आहेत. विशेष म्हणजे कागद अतिशय जीर्ण झाला असला तरी दर वेळेस आतील कथा ताज्याच वाटतात. हा त्यांचा पहिला कथासंग्रह. त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. या गणितज्ञाला अगणित पुरस्कार मिळाले आहेत. ज्यात २००४ साली मिळालेला पद्म विभूषण आणि २०११ साली मिळालेला महाराष्ट्रभूषण यांचा समावेश आहे.

नारळीकरांचे एक वाक्य नेहमी वापरले जाते,  "आकाशातील ग्रहगोलांचा मानवी जीवनावर परिणाम होतो का? असे जेव्हा मला विचारले जाते तेव्हा मला सखेद आश्चर्य वाटते. आश्चर्य यासाठी की ही व्यक्ती एकविसाव्या शतकात हा प्रश्न विचारत आहे. आणि खेद यासाठी की प्रश्न विचारणारी व्यक्ती भारतीय आहे.😔" आगामी काळात असे प्रश्न विचारनाऱ्यांची संख्या कमी होईल अशी आशा आपण बाळगूया.. विज्ञानाचा प्रसार करू या.

जय गणित जय विज्ञान
#richyabhau
#नारळीकर_जयंत

Comments

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव