वेंकी रामकृष्णन : एक रॉयल नोबेल रसायन

वेंकी रामकृष्णन : एक रॉयल नोबेल रसायन

माणसाच्या जगण्यालाsss जे लाभलं वरदान ... एकमुखाने बोला.. बोला जय जय जय विज्ञान!!! 
मानवाने विज्ञानाची कास धरली आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होत आहेत. विज्ञानाने मानवाचे जीवन सुलभ केले आहे.. अनेक कोडी सोडवली आहेत, अनेक कोडी सोडवत आहे. "विज्ञान म्हणजे स्वतःचा आणि जगाचा शोध घेणारं ज्ञान होय!" वाक्य माझे मी नाही. नोबेलविजेते भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ वेंकटरामन रामकृष्णन यांनी एका लेखात विज्ञानाची अशी अतिशय उत्तम व्याख्या केली आहे. वेंकटरामन रामकृष्णन किती मोठी नावं आहे ना..माणूस पण तेव्हढाच मोठा आहे.. पण त्यांना सगळे वेंकी याच नावाने ओळखतात. अँड आय लव वेंकीज..😍  पण हा वेंकी शाकाहारी आहे राव😭

आपल्या विज्ञानविषयक लेखात नेहमी लंडनमधील रॉयल सोसायटीच्या फेलोशिपचा उल्लेख येतो. रॉयल सोसायटी म्हणजे जगभरातील वैज्ञानिकांची काशी, मक्का. विज्ञानाची पंढरी. याची फेलोशिप मिळाली की व्यक्ती डायरेक्ट सीव्ही रामन,आईन्स्टाईनसारख्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांच्या पंगतीला जाऊन बसतो..😍 फेलोशिपचे एवढे कौतुक तर या सोसायटीचा अध्यक्ष होणे किती मोठी गोष्ट असेल.. ज्याच्या अध्यक्षपदी कधीकाळी आयझॅक न्यूटन किंवा अर्नेस्ट रदरफोर्ड सारखी व्यक्ती बसली होती. २०१५ पासून या रॉयल सोसायटीच्या अध्यक्षपदी आपला भाऊ बसला आहे..  वेंकी रामकृष्णन. 

५ एप्रिल १९५२ रोजी तामिळनाडूच्या चिदंबरम या गावात एका सुविद्य जोडप्याच्या घरात वेंकीचा जन्म झाला. नृत्याचा देव नटराज.. त्याच्या मूर्तीसाठी प्रसिद्ध असलेले हे चिदंबरम गाव. आई राजलक्ष्मी आणि वडील सी व्ही रामकृष्णन या दोघांनाही शास्त्राची पार्श्वभूमी. या जोडप्याचा हा मोठा मुलगा. नंतर सात वर्षांनी ललिता नावाची छोटी बहीण वेंकीला मिळाली. वेंकीचा जन्म झाला तेव्हा वडील पोस्टडॉक्टरल फेलोशिप घेऊन अमेरिकेमध्ये गेलेले. फेलोशिपचे पैसे एवढे नव्हते की गरोदर पत्नीला देखील सोबत घेऊन जाता येईल. वेंकी गमतीने वडिलांना आजही म्हणतो की माझा जन्म अमेरिकेत झाला असता तर कदाचित मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो असतो.😂

आई चिदंबरम मधील अण्णामलाई विद्यापीठात शिकवत असे. आई जेव्हा बाहेर असे तेव्हा आजी-आजोबा वेंकीचा चांगला सांभाळ करत असत. वेंकी सहा महिन्याचा झाला तेव्हा वडील भारतात परतले आणि मुलाचे तोंड पहिल्यांदा पाहिले. वेंकी दीड वर्षाचा झाला तेव्हा वडील पुन्हा परदेशात गेले मात्र यावेळेस आईलासोबत घेऊन. एक वर्षानंतर ते परत आले. आजीआजोबाच्या कोडकौतुकात वेंकी लहानाचा मोठा होत होता. वेंकी जेव्हा तीन वर्षाचा झाला तेव्हा हे तिघे गुजरातमधील बडोदा येथे स्थलांतरित झाले. सॉरी.  बडोदा नाही म्हणायचे आता, वडोदरा म्हणायचे. वडोदरा..  वडाच्या उदरात वसलेले नगर. 

वडोदरा मधील महाराजा सयाजीराव विद्यापीठात कमला सोहोनी यांच्या मार्गदर्शनाखाली जीवरसायनशास्त्र हा नवा विभाग सुरू होत होता. या विभागाचे प्रमुख म्हणून वेंकीच्या वडिलांची नेमणूक झाली होती. विद्यापीठातील सर्वात तरुण विभागप्रमुख असतील ते. तिथे घरी बसून आई काय करणार. आई स्कॉलरशिप मिळवून कॅनडा मधील मॅकगील विद्यापीठात पीएचडी करण्यासाठी गेली. मात्र नवरा आणि पोराला वाऱ्यावर सोडल्याचे ओझे तिच्या मनावर होते म्हणून जीवतोड मेहनत करून, अठरा महिन्यातच मानसशास्त्र विषयात पीएचडी पूर्ण करून ती वडोदऱ्याला परतली. त्यानंतर तिला हवी तशी नोकरी वडोदऱ्यामध्ये मिळाली नाही. तिने पुढे वडिलांच्या संशोधनामध्ये मदत केली.

तमिळ भाषेवरून डायरेक्ट गुजराती वर उडी... तीन वर्षाच्या मुलावर हा खूप मोठा इमोशनल अत्याचार होता राव. समोर मुले खेळताना दिसत आहेत तरी विचारणार कसं.. खाणाखुणा करून खेळण्यामध्ये प्रवेश मिळवला तरीसुद्धा कायम "बाहेरचा" यादृष्टीने वेंकीकडे पाहिले जायचे. "बाहेरचा" याबाबत वेंकी खूपच कमनशिबी..😔 वडोदरा पुढे ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड अशा अनेक ठिकाणी वास्तव्य करताना त्याने "बाहेरचा" ही वागणूक अनुभवली. आई-वडिलांना देखील गुजराती येत नव्हते. अशावेळी इंग्लिश माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेणे क्रमप्राप्त होते. तेव्हा शहरांमध्ये असलेल्या एकमेव "जीसस आणि मेरी कॉन्व्हेंट स्कूल" मध्ये वेंकी दाखल झाला.

मध्ये दीड वर्ष वेंकी, ललिता आईसोबत ऑस्ट्रेलियामध्ये होते. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असा फरक असल्याने ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्या शैक्षणिक वर्षात सहा महिन्याचा फरक आहे. त्याचा वेंकीला फायदा झाला. तिसरीचे सहाच महिने झाले असताना तिकडे चौथीला प्रवेश मिळाला. तर तिकडे पाचवीचे सहाच महिने झाले असताना इकडे सहावीला प्रवेश मिळाला. अशी एक वर्षाची बचत करण्यामागे वेंकीच्या आईचे डोके होते 😀 मात्र परत आल्यावर त्याला घरात राहता आले नाही. कारण शाळेचे नियम बदलले होते, जी मुले निवासी राहतील त्यांनाच प्रवेश देण्यात येत होता. शाळेतील मुलांची संख्या कमालीची घटली होती आणि मुलामुलींचे प्रमाण १:४ असे झाले होते. घरात भाऊ नाही की बाहेर मित्र नाहीत.. ललिता आणि आई हेच विश्व असलेल्या वेंकीला मुलींच्या गराड्यात अस्वस्थ वाटले नाही.
सहावीला वर्गात सर्वात पुढे असलेला वेंकी सातवीनंतर मात्र अभ्यासात प्रचंड घसरला. घरीदेखील तो केवळ कादंबऱ्या वाचत बसणे आणि खेळणे यातच वेळ घालवत होता. अभ्यासाचे नावच नाही. मात्र गणित, विज्ञानाला असलेले पटेलसर यांनी त्याला घासून-पुसून तयार केले. सोप्या भाषेत शिकवून विषयाची गोडी लावली. दहावीला असताना तो वर्गात दुसरा आला. हिंदी त्याला पहिल्यापासून अवघड, अगदी आजही.... हिंदीमध्ये वेंकी जेमतेम पास झाला होता. दहावीनंतर हुशार मुलांनी विज्ञान घ्यायचे असते, त्यातील अधिक हुशार मुले बारावीनंतर मेडिकल, इंजिनीअरींगकडे जातात. तर थोडी कच्ची मुले बीएससी करतात असा समज त्याकाळात देखील प्रचलित होता. बारावीनंतर वेंकीने आयआयटी तसेच वेल्लोरच्या मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशनसाठी प्रयत्न केले. मात्र तिथे त्याला ॲडमिशन मिळाले नाही. बडोदामधील मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत होते मात्र वेंकीला तिथे नको होते.

वेंकीच्या आईने त्याला राष्ट्रीय विज्ञान प्रज्ञाशोध छात्रवृत्तीबद्दल माहिती दिली होती, तयारी करून घेतली होती. ही छात्रवृत्ती बीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी असते. वेंकीला ही छात्रवृत्ती मिळाली. वडोदऱ्यामध्ये भौतिकशास्त्रात नवीन अभ्यासक्रम सुरू झाला होता, ज्यामध्ये फाइनमनच्या लेक्चरचा देखील समावेश होता. पण भौतिकशास्त्राचे शहासर सोडले तर बाकीच्या लेक्चरला सोळा वर्षांचा वेंकी बोर व्हायचा. इथे त्याला सुधीर त्रिवेदी नावाचा मित्र मिळाला, जो क्लास बंक करण्यात वेंकीचा जोडीदार झाला. एकदा तर खूप मजा आली. हे दोघे जण वर्गामध्ये खिडकीतच बसले होते. हजेरी झाली की खिडकीतून उडी टाकून, कॅन्टीनमध्ये जाऊन चहा नाष्टा हानायचा त्यांचा बेत होता. सुधीरने उडी मारली पण उडी मारताना खूप आवाज आला. साहजिकच शिक्षकांचे लक्ष खिडकीकडे गेले. वेंकीला बाहेर पडता आलेच नाही.  मग काय मधु इथे अन चंद्र तिथे  😂😂

अमेरिकेतील विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे एक पत्र त्यांच्या कॉलेजमध्ये आले. त्यांना पदवी कार्यक्रमासाठी हुशार विद्यार्थी हवे होते. १९ वर्षाचा वेंकी आवडत्या शास्त्रज्ञ रिचर्ड फाइनमनच्या देशात, अमेरिकेत जाण्यासाठी उत्सुक होता. त्याने अर्ज केला आणि त्याची निवडदेखील झाली. भाऊ तिकडे पोचला खरं पण शिक्षणात त्याचे मन लागेना. भौतिकशास्त्र डोक्यावरुन जाऊ लागलं. अशा वेळेस जे नको करायला ते सगळं केलं. अभ्यास सोडून बाकी सगळे धंदे. इकडे तिकडे उंडारणे, बुद्धिबळ खेळणे, कादंबऱ्या वाचणे, शास्त्रीय संगीत शिकणे. थोडक्यात साहित्य, कला, क्रीडा, संगीत याचा आस्वाद घेत दिवस ढकलणे सुरू होते. याच उद्योगांमुळे त्याला मिळाली आयुष्याची जोडीदार वेरा रोजनबेरी.❤️
वेरा रोजनबेरी.. चित्रकलेची विद्यार्थिनी, एका चार वर्षाच्या गोंडस पोरीची आई. वेरा आणि वेंकीची ओळख झाली.. दोघे पण शाकाहारी.. दोघांच्या तारा जूळल्या. ११ महिने दोघांनी जमेल तसे भेटून एकमेकाला समजून घेतले आणि त्यानंतर लग्न केले. १९७५ चे वर्ष सुरू होते, तेवीस वर्षाच्या वेंकीचा संसार सुरू झाला होता. पाच वर्षाची मुलगी तान्या आणि बायको...  आता जबाबदारी उचलावी लागणार होती. वेराने त्याला मानसिक आधार देऊन पीएचडी पूर्ण करायला लावली. जेमतेम पास होईल असा प्रबंध लिहून १९७६ मध्ये पीएचडी पदवी पदरात पाडून घेतली आणि भौतिकशास्त्राला रामराम केला. त्याच वर्षी वेरावेंकीचा मुलगा रामन देखील रामराम (रामन रामकृष्णन त्याचे नाव) करत जन्माला आला.😁

जीवशास्त्रामध्ये करिअर करायचे पक्के.. पण दोन पैकी कोणता पर्याय. आता पुन्हा पेच... वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा की दुसरी पीएचडी जीवशास्त्रात करायची. वैद्यकीय प्रवेश परीक्षेत ९९ टक्के पाडून देखील अमेरिकन नागरिक नसल्याने त्याला प्रवेश मिळाला नाही. मोलेक्युलर बायोफिजिक्स अँड बायोकेमिस्ट्री संस्थेने पोस्ट डॉक्टरल संशोधन करण्याची ऑफर दिली. मात्र माझा जीवशास्त्राचा पाया भक्कम झाल्याशिवाय पोस्ट डॉक्टरल करण्यात अर्थ नव्हता.  कॅलिफोर्निया विद्यापीठात जीवशास्त्र पदवीचा दोन वर्ष अभ्यास केला. चुकांमधून शिकत शिकत तो विद्यापीठात रमला. इथे त्याची मार्क ट्रोलशी मैत्री झाली. (पुढे हाच मार्क केंब्रिजमध्ये प्राध्यापक बनलेल्या ललिताशी लग्न करून वेंकीचा दाजी पण झाला) वेंकीने बायको आणि दोन्ही पोरं तिथं बोलावून घेतली. वेरानेच दोन्ही मुलांना मोठे करायची जबाबदारी उचलली होती. ते करत असतानाच तिची लहान मुलांसाठी ३० पेक्षा जास्त पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.✊🏾

दुसऱ्या वर्षात शिकत असताना रायबोसोम्सविषयी संशोधन पेपर त्याच्या वाचनात आला. आणि डोक्यात १००० वॅटचा दिवा पेटला. जीवशास्त्रामध्ये डॉक्टरेट मिळवण्यात काहीच प्रयोजन नाही, आवश्यक ते ज्ञान मिळाले होते. आधी ज्यांनी ऑफर दिली होती, त्यांच्याशी पत्रव्यवहार करून सॅन डिएगो येथे पोस्टडॉक्टरल संशोधन करायची संधी वेंकीने मिळवली. तेथील पीटर मूर यांची प्रयोगशाळा जरी छोटी होती तरी रायबोसोम्सवर प्रक्रिया करणे वेंकी लवकर शिकला. खराब झालेल्या प्रथिनांच्या जागी चांगली प्रथिने टाकून रायबोसोम्सची पुनर्रचना करणे वेंकीला जमू लागले. या प्रयोगासाठी खराब प्रथिनांवर  न्यूट्रोन मारा करण्यासाठी  ब्रुकहेवन प्रयोगशाळेतील उपकरणे वापरली होती. 
 
पोस्ट डॉक्टरलचा काळ संपला. चांगला अनुभव आणि संशोधन करण्याचा आत्मविश्वास या काळात वेंकीला मिळाला. त्यानंतर त्याला दोन जॉब ऑफर झाले. मात्र जिथे मोठ्या आशेने तो जॉईन झाला तिथे, ओक रिजमध्ये त्याचा अपेक्षाभंग झाला. त्याला तिथे स्वतंत्र संशोधन करायची संधी मिळाली नाही. प्रयोगशाळा सहायक प्रमाणे त्याला वागणूक दिली. प्रयोगशाळेत कोणी मदतनीस देखील मिळाला नाही. कसे तरी दिवस ढकलले. बेंनो नावाचा मित्र बोलला, थोडे दिवस कळ काढ, ब्रुकहेवनमध्ये वर्षभरात एक जागा निघणार आहे. 👍 इथे आपल्याकडे पीएचडी केलेली पोरं "पोस्ट निघणार आहे" असे ऐकत पाच दहा वर्ष वाट पाहतात.. मग वेंकी एक वर्ष का नाही वाट पाहणार😀
१९८३ मध्ये सगळा कुटुंब कबिला घेऊन वेंकी ब्रुकहेवनमध्ये दाखल झाला. ओकरीज मधले घर नुकसानीत विकावे लागले, पण नाईलाज होता. त्या पैश्यात परवडेल असे ब्रुकहेवन संस्थेपासून २० किमी लांब घर घ्यावे लागले. मात्र इथे समाधान खूप होते. पीटर लॅबप्रमाणे इथे संशोधन करायला वेळच वेळ होता. एकट्याने लिहिलेला पहिला संशोधन पेपर प्रकाशित झाला. (त्याने आनंदाने भारतात वडिलांना कळवले होते, वडिलांनी देखील कौतुक करत एक दिवस तुझे संशोधन "नेचर" मध्ये सुद्धा येईल असे सांगितले होते, जे पुढे खरे झाले.) अनेक वर्ष काम केल्यावर नियमाप्रमाणे संशोधन रजा उपलब्ध झाली होती. वेंकीला जेव्हा सुटी देणाऱ्या समितीने विचारले की सुट्टी मिळाली तर काय करणार, उत्तर तयार होते. जनुकीय रेणुंचे स्फटीकीकरण शिकणार. समिती खुश झाली. आणि भाऊला सुट्टी मिळाली.

१९८८ मध्ये कोल्ड स्प्रिंग हार्बर मध्ये स्फटिकीकरण विषयातील कोर्स जॉईन केला. त्याच्यासमवेत अनेक जगप्रसिद्ध शास्त्रज्ञदेखील या कोर्समधे सहाध्यायी होते. त्यानंतर इंग्लंडमधील MRC, केंब्रिज शिवाय दुसरा पर्यायच नव्हता. कारण स्फटिकीकरण क्षेत्राची गंगा केंब्रिज मधील MRC प्रयोगशाळेत मध्येच उगम पावत होती. याबाबत नवीन शोध याच प्रयोगशाळेत लागत होते. वेंकीने या प्रयोगशाळेतील संचालकांना विचारले. त्यांनी परवानगी तर दिलीच.. शिवाय अर्धा पगार देखील देऊ केला. अर्धा पगार ब्रुकहेवन देत होतीच.😍 मिळालेल्या माहितीचे रुपांतर मॉडेलमध्ये करायला वेंकी तिथेच शिकला. तीन वर्ष भरपूर माहिती गोळा करून वेंकी कुटुंबासह १९९१ मध्ये पुन्हा अमेरिकेत परतला. (पोरांच्या किती शाळा बदलून झाल्या असतील काय माहित)😭

अमेरिकेत आल्यावर नवी क्षितिजे वेंकीला खुणावत होती. एकेकाळी भारी वाटणारे ब्रुकहेवन आता जुनाट वाटू लागले होते. वेंकीला उटाह विद्यापीठात एका सेमिनारमध्ये व्याख्यान द्यायला बोलावले, मात्र त्याचे व्याख्यान "छाप" सोडून गेले. काही दिवसांनी त्याला तिथेच सहायक प्राध्यापकाची नोकरी देखील ऑफर झाली. पगार भरपूर वाढवून मिळाल्याने वेंकी तिथे रूजू झाला, मात्र केंब्रिज प्रयोगशाळेत त्याला जे समाधान मिळत होते, ते काही त्याला इथे मिळेना. शेवटी अमेरिका सोडायचे नक्की ठरवले. मोठ्या पगाराची सहायक प्राध्यापकाची सुखासुखी नोकरी सोडून संशोधन कार्याला वाहून घ्यायचे. या निर्णयावर टीका करत वेंकीला अनेक लोकांनी वेड्यात काढले होते. वेंकी कुठल्या तरी मृगजळामागे धावत आहे असे त्यांना वाटत असावे.. "मगर ये तो कोई ना जाने के मेरी मंजिल है वहा."
१९९९ मध्ये वेंकी केंब्रिजमध्ये आला. वेराने सुंदर घर शोधले, वेंकी प्रयोगशाळेत सायकल वर जाऊ शकेल इतक्या जवळ. इथे मोठी टीम उपलब्ध होती. शिवाय अमेरिकेतील संशोधनसाथी बिल, जोना आणि ब्रायन हे संपर्कात होतेच. त्यांची खूप महत्त्वाची मदत वेंकीला संशोधनात झाली. आणि नोबेल मिळवून देणारे संशोधन "नेचर" मध्ये प्रसिद्ध झाले. जनुकीय साठ्याचं परिवर्तन रायबोसोमकडून प्रथिनात कसं केलं जातं, पेशींमध्ये प्रथिनांचे संश्लेषण कसे होते याचे रहस्य आता उघड झाले होते. ऍडा योनाथ, थॉमस  स्टिटझ आणि वेंकी यांना रायबोसोम्सवर केलेल्या कामाबद्दल २००९ साली नोबेल पारितोषिक मिळाले होते. 

वेंकीला जेव्हा नोबेल मिळाल्याची बातमी कळली, तेव्हा आधी त्याचा विश्वास बसला नाही. त्यात त्याच दिवशी त्याच्या सायकलचा टायर पंक्चर झालेला, त्याने वैतागलेला वेंकी.. त्याला स्वीडनवरून कॉल आहे.. असे समजले तेव्हा त्याला वाटले कोणतरी त्याची खेचत आहे. तो फोनवरच उत्तरला.. "जाऊ दे ना भाऊ काय टाईमपास करतो." पलिकडचा माणूस जीव तोडून सांगतो.. पण ह्याचा काय विश्वास बसेना. पलीकडून माणूस बोलला "काय करू म्हणजे तुमचा विश्वास बसेल." वेंकीच्या ओळखीचा एक माणूस स्वीडिश अकॅडमीमध्ये होता. वेंकी बोलला "त्याला फोनवर बोलवा" त्या माणसाला पण फोनवर बोलवले गेले. आणि मग भाऊची खात्री पटली. 😂

नोबेल जाहीर झाले आणि भाईचा फोन दोन दिवस सतत खणानत होता. भारतातील लोकांना अचानक पुळका आला. यशाचे अनेक बाप असतात, अपयश मात्र बेवारस असते.भारतातून अनोळखी लोकांचे एवढे कॉल आणि ईमेल गेले की वेंकीला त्याचा उबग आला. त्याने ते अनेक वेळा बोलावून दाखवले. आपण इतके वर्ष सायकलवर फिरत होतो तेव्हा आपल्याला कुणी काही विचारले नाही.. नोबेल पारितोषिक मिळाल्यावर मात्र सगळ्यांना माया उमाळून आली. ज्यांना रायबोसोम्स म्हणजे काय घंटा कळत नाही असे लोक पण अभिनंदन करत आहेत असे काहीसे उद्धट वाटणारे उद्गार त्याने त्या वेळी काढले होते😀

स्पष्ट बोलण्याचा त्याचा हा स्वभाव लयं भारी. त्याला ब्रिटिश राणीने "सर" किताब दिला असला तरी पुढे जेव्हा त्याला रॉयल सोसायटीचा अध्यक्ष केले, तेव्हा ब्रिटिश सरकारच्या विज्ञानविषयक धोरणावर त्याने सपाटून टीका केली आहे. सरकारने अधिक निधी द्यावा, शिक्षणपद्धतीत आमुलाग्र बदल करावे, स्थलांतरित विशेषत भारतातून येणाऱ्या गुणवंत संशोधकांना इंग्लंडमध्ये संशोधन करू वाटावे असे वातावरण तयार करावे, त्यांना "बाहेरचा" वाटू देऊ नये असे मुद्दे त्याने मांडले. ब्रेक्झिटविरोधी मत देखील वेळोवेळी प्रदर्शित केले आहे. इंग्लंडमध्ये सरकारविरोधी मत प्रदर्शित केले म्हणून लगेच देशद्रोही असा शिक्का बसत नाही. कोरोना व्हायरस संबंधी ब्रिटनमधील तज्ञांच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून वेंकीची नियुक्ती झाली आहे. ही समिती कोरोना विषाणूसंदर्भात जगभरातून आलेल्या माहितीचे विश्लेषण करत आहे. आणि त्यानुसार व्यूहरचना आखत आहे.
त्याला नोबेल घेताना पाहायला आई जिवंत नव्हती. दोन वर्ष आधीच कालवश झाली होती. वडील अजूनही धडधाकट आहेत. चालत फिरत कामे करत. ललिता-मार्क जोडीच्या पोरांचे संगोपन करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. लहानपणी चिदंबरममध्ये वेंकीचे संगोपन केलेली गोमती मावशी आता वेंकीसोबत इंग्लंडमध्येच राहते. वेरा-वेंकीची मुलगी तान्या डॉक्टर झाली असून अमेरिकेत स्थायिक झाली आहे. मुलगा रामन याने संगीत क्षेत्रात मास्टर केले असून व्हायोलिनवादक म्हणून चांगले नाव कमावत आहे. नोबेलनंतर वेंकीचा भारत संपर्क वाढला असून पाहुणे व्याख्याते म्हणून बेंगलोर मध्ये दरवर्षी दोन महिने मार्गदर्शन करणे सुरू आहे. (डिसेंबर जानेवारी मध्ये.. जेव्हा केंब्रिज मध्ये जगणे मुश्किल असते😁😁)
भारत सरकारने वेंकीला २०१० मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. एनडीटीव्ही ने २०१३ साली २५ महान जागतिक भारतीयांची यादी प्रसिद्ध केली त्यात वेंकीचा समावेश होता. भारतात देखील  बोलत असताना वेंकी कुणाची भीड ठेवत नाही. भारतीय विद्या भवनात झालेल्या व्याख्यानात वेंकीने ज्योतिषशास्त्र हे थोतांड असल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले होते. वास्तूबँडीट वापरत असलेल्या "पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी या संकल्पना पूर्णपणे निराधार असून, त्याला कोणताही शास्त्रीय आधार आणि अर्थ नाही" असे सांगून वास्तूशास्त्राचा रीतसर पंचनामा केला होता. खरं तर सर्वच वैज्ञानिकांनी अशा छद्म विज्ञानाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. 

पण भारतात वैज्ञानिक आहेत का हे आधी तपासले पाहिजे. रामन वगळता शास्त्र विषयात कुणाला नोबेल मिळाला नाही. एस चंद्रशेखर, हरगोविंद खुराना असो किंवा वेंकी रामकृष्णन, भारतीय वंशाचे असले तरी दुसऱ्या देशाचे नागरिक... त्यांना संशोधन करायला संधी भारतात का मिळू शकली नाही.. ???  भारताचे जेव्हा मंगळयान उड्डाण करायला तयार झाले होते तेव्हा इस्रोचे प्रमुख के राधाकृष्णन हे तिरुपतीच्या पाया पडायला गेले होते. मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही असे स्पष्टीकरण देतात. वरील प्रश्नांचे उत्तर यातच दडले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन जर इस्रो प्रमुखाकडेच नसेल तर कोण शास्त्रज्ञ बुद्धीचा "बापभाऊ" करायला इथे डोके फोडून घेईल... विज्ञान हाच धर्म आणि विज्ञान हीच संस्कुती जेव्हा भारतात रुजेल.. तेव्हाच भारत महासत्ता बनेल.

जय विज्ञान, जय जय जय विज्ञान !!!!

#richyabhau
#venki

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

आपली पुस्तके..

ज्योतिषाचा पाया

गोमू आणि गोमाजीराव